10/31/2010

निवड

लहानपणापासून, म्हणजे अगदी काहीही समजायला लागण्यापूर्वीपासूनच आपण कसली ना कसली निवड करत असतो. अगदी लहान असताना ही निवड आपण सहसा डीएनए मधल्या रचनेवरून करतो, मग थोडे मोठे झाल्यावर मिळत असलेल्या संस्कारांची डीएनएच्या रचनेमध्ये भर पडते आणि त्याहीपुढे प्राप्त परिस्थिती आणि अनुभवही आपल्या निवडप्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावू लागतात. पण एकंदरच निवडीचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात - १. स्वाभाविक निवड २. दर्शनी निवड

थोडं विस्तारानं असं म्हणता येईल, की बरेचदा आपण मनातून एखादी निवड करतो, पण आपला आजवरचा अनुभव, प्राप्त परिस्थिती किंवा मिळालेले संस्कार ह्यांमुळे आपण प्रत्यक्षात काही वेगळंच निवडतो. म्हणजे अजून थोडंसं ढोबळमानाने असं म्हणता येईल की आपले डीएनए आणि काही प्रमाणात अगदी लहानपणी झालेले संस्कार जे आपल्या सबकॉन्शस माईंडपर्यंत अगदी खोलवर रूजलेत किंवा आपले असे काही अनुभव ज्यांनी आपल्या मनावर खोलवर परिणाम केलेत तेच आपली खरी निवडप्रक्रिया आपल्याही अजाणतेपणी करत असतात. एखाद्या गोष्टीनं आपल्याला आतून आनंद मिळतो असं आपण म्हणतो तेव्हा ही तीच आतून झालेली निवड असते, ज्यावर आपलं कुठलंही नियंत्रण नसतं. आपल्या मनाविरूद्ध आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे नेमकं काय, तर आपण आपल्या स्वाभाविक निवडीपेक्षा काहीतरी वेगळी दर्शनी निवड केलेली असते.

एव्हढं प्रास्ताविक देण्याचं कारण की, समजा तुम्ही किंवा चला मीच, मनातूनच अतिशय खुनशी आणि विकृत आहे. म्हणजे नेमकं काय, तर खुनशी किंवा विकृत गोष्टी केल्यानं किंवा पाहिल्यानं मला आनंद(ज्याला असुरी आनंद असेही म्हणतात) होतो. थोडक्यात माझी स्वाभाविक निवड ही आहे. थोडक्यात माझी निवड किंवा आवड ही सर्वमान्य समाजव्यवस्थेच्या बरोबर उलट आणि तिला मारक ठरणारी आहे. अशा वेळी जर माझी स्वाभाविक निवड बदलण्यासाठी माझ्यावर ब्रेनवॉशिंगचे प्रयोग केले म्हणजे असे प्रयोग केले गेले की ज्यामुळे कुठल्याही खुनशी किंवा विकृत कार्याच्या विचारानेदेखील मला शारिरीक वेदना आणि त्रास होऊ लागेल, तर ते योग्य ठरेल का? माझ्या मनाविरूद्ध माझ्याच मनाला, माझ्या मनाच्या निवडीवर एक ठराविक क्रिया करण्याचा आदेश देणं योग्य आहे का? माझी चांगल्या गोष्टींची निवड स्वाभाविक असावी की दर्शनी? ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न दिग्दर्शक स्टॅनली क्युब्रिक 'अ क्लॉकवर्क ऑरेंज' ह्या चित्रपटातून शोधण्याचा प्रयत्न करतो.

मी आजवर स्टॅनली क्युब्रिकचं नाव ऐकून होतं आणि त्याच्या चित्रपट बनवण्याच्या वेगळ्या शैलीपासून ते अतिशय लो-प्रोफाईल जीवनशैलीपर्यंत त्याच्याबद्दल बरंच वाचलंही होतं. पण त्याचा सिनेमा पाहण्याचा योग काही येत नव्हता. 'अ क्लॉकवर्क ऑरेंज' बर्‍याच दिवसांपासून मी मिळवून ठेवला होता. शेवटी आज मुहूर्त लागला. मी स्टॅनली क्युब्रिकच्या सिनेमांचं पदार्पण एकदाचं केलं.

'अ क्लॉकवर्क ऑरेंज' ह्या नावाचा एक अर्थ असा आहे की एक अशी गोष्ट जिचे मूळ गुणधर्म दडपून टाकून वेगळेच ठराविक गुणधर्म दिसण्याची सोय केलेली आहे. थोडक्यात एखादा प्रोग्रॅम केलेला जीव. हे मूलतः 'ऍन्थनी बर्गेस' ह्या लेखकाचं पुस्तक आहे. ज्यावरून 'स्टॅनली क्युब्रिक'नं चित्रपट बनवला आहे. क्युब्रिक पूर्ण सिनेमाभर पुस्तकाशी प्रामाणिक राहतो आणि एक विचित्र, बरेचदा डोळ्यांत खुपणारा, खिळवून ठेवणारा आणि तरीही बरंच सारं सामाजिक भाष्य करून जाणारा असा एक कलात्मकदृष्ट्यादेखील उच्च सिनेमा आपल्याला देतो.

चित्रपट हा पूर्णतया हिंसा आणि विकृती (शारीरिक आणि लैंगिक) हाच मूळ स्वभाव असण्यार्‍या मुख्य पात्राभोवती फिरतो, त्यामुळे चित्रपटातली अनेक दृश्य शिसारीही आणतात आणि कधीकधी अंगावर काटाही आणतात. मुख्य पात्र अलेक्झांडर ऊर्फ ऍलेक्सच्या प्रथमपुरूषी निवेदनातून चित्रपट उलगडत जातो. ऍलेक्स इंग्लंडमधला एक युवक आहे, जो आपल्या तीन मित्रांसोबत संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी शहराच्या रस्त्यांवर अनेक हिंसक कारवाया करत फिरत असतो. क्युब्रिक आपल्यासमोर पहिल्याच दृश्यापासून एक डिस्टोपियन जग उभं करतो, ज्यामध्ये विचित्र आणि विक्षिप्त व्यक्तिरेखा पावलापावलावर भेटतात. ऍलेक्स त्याच्या मित्रांचा स्वघोषित नेता आहे, तेदेखील कुठेतरी त्याचं नेतृत्व मान्य करत असतात. ते आपापसात विचित्र रशियन प्रभाव असलेली इंग्रजी भाषा बोलतात. ऍलेक्सचं निवेदनही तशाच भाषेत आहे. ऍलेक्स आणि मित्रांची ओळख देणारी दृश्य अंगावर काटा आणतात. रस्त्यावर दारू पिऊन पडलेल्या हार्मलेस म्हातार्‍याला ते सगळे मिळून उगाच बुकलून काढतात. सुसाट वेगाने उपनगरी रस्त्यांवर गाडी चालवतात, ज्यामुळे चिंचोळ्या रस्त्यावर समोरून येणार्‍या गाड्या घाबरून आजूबाजूला आपटतात. आणि शेवटी एका लेखकाच्या गावाबाहेरील घरात खोटं बोलून शिरून त्याला आयुष्यभरासाठी जायबंदी करतात आणि बायकोचा बलात्कार करून पैसे आणि महागड्या वस्तू लुटून घेऊन जातात. संपूर्ण कुकर्म करताना त्या सगळ्यांनी मुखवटे घातलेले असतात आणि ऍलेक्स 'सिंगिंग इन द रेन' हे गाणं गात, नाचत नाचत संपूर्ण गुन्हा करतो.

मग आपण ऍलेक्सच्या विश्वात शिरतो, जिथे त्याच्या घरी एक साप पाळलेला आहे. त्याचा आपल्या आई-वडिलांशी मोजकाच संवाद आहे. त्यांना ऍलेक्सच्या संध्याकाळच्या प्रतापांची बिलकुलच कल्पना नाही. पण ऍलेक्स 'लुडविग व्हॅन बीथोवन' ह्या प्रसिद्ध संगीतकाराचा चाहता आहे. आणि नुसता नाही तर खूप मोठा चाहता आहे. आणि त्याच्या रचना ऐकताना ऍलेक्सला अपरिमित आनंद मिळतो. पण आनंद म्हणजे काय, तर ऍलेक्सला ते संगीत ऐकताना तो काहीतरी हिंसक किंवा विकृत कृत्य करत असल्याचा आभास होऊन आनंद मिळत असतो. आत्तापर्यंत आपल्याला ऍलेक्स ह्या व्यक्तिरेखेची आणि त्याच्या डोळ्यांतल्या त्या बेफिकिर खुनशी भावांची शिसारी येऊ लागलेली असते. ऍलेक्सचा मूळ स्वभावच असा असल्याचं पूर्णपणे आपल्यावर ठसतं. त्यावर कडी म्हणजे ऍलेक्सचे मित्र त्याच्याविरूद्ध बंड करतात आणि दुसरा एक मित्र नवा नेता बनतो आणि मोठा दरोडा घालण्याचा प्लॅन ठरतो. सुरूवातीला ऍलेक्स हो म्हणतो, पण मग रस्त्यातून चालताना संगीत ऐकून त्याला प्रेरणा मिळते आणि तो बंड करण्यार्‍या दोघा मित्रांना बदडतो आणि त्यांचं बंड दहशतीनं दडपतो. पण तो प्लॅन तोच ठेवतो आणि रात्री तिथे पोचतो. घरमालकिणीसोबत झटापट होते आणि पोलिस घटनास्थळी पोचतात, पण ऍलेक्सचे दुखावलेले मित्र ऍलेक्सच्या तोंडावर बाटली फोडून पळून जातात. ऍलेक्स पोलिसांना सापडतो. घरमालकिण मेल्यानं ऍलेक्सला १४ वर्षांची शिक्षा होते.

तुरूंगामध्ये ऍलेक्स तुरूंगाच्या धर्मगुरूचा चांगल्या वागणुकीनं विश्वास संपादन करतो. तिथे तो आवडीनं बायबल वाचत असतो. पण बायबलमध्ये तो स्वतःला जीझसला चाबकानं फोडणार्‍या शिपायाच्या रूपात पाहतो. किंवा तत्सम खुनशी प्रसंगांमध्येच आनंद मिळवत असतो. बाहेरून तो अगदी सुधारल्यागत वागत असतो, कारण त्याला कुठूनतरी सुगावा लागलेला असतो की, एक नवीन पद्धत आणली गेलीय ज्यातून गुन्हेगाराचं मानसिक पुनर्वसन करून त्याला १५ दिवसांत तुरूंगातून बाहेर सोडण्यात येतं. धर्मगुरू ऍलेक्सला समजावतो, की अशा पद्धतींमुळे काही होऊ शकत नाही, माणसाला आतून बदलावंसं वाटलं तरच काही उपयोग आहे. पण ऍलेक्स त्या कार्यक्रमासाठी स्वतःची वर्णी लावण्यात यशस्वी होतो.

ह्या लुडोव्हिको कार्यक्रमाअंतर्गत ऍलेक्सचं ब्रेनवॉशिंग केलं जातं. ज्याअंतर्गत त्याला शारीरिक पॅरॅलिसिस किंवा तत्सम मृतवत संवेदना किंवा अपरिमित वेदना निर्माण करणारी औषधं देऊन हिंसक कृतींच्या चित्रफिती दाखवण्यात येतात. ज्यामुळे त्याचा मेंदू अशा हिंसक कृतींचा संबंध शारीरिक वेदनांशी लावू लागतो आणि आपोआपच त्याचं प्रोग्रॅमिंग सुरू होतं. पण एक घोळ होतो, की ह्या चित्रफितींवेळी बीथोवनच्या नवव्या सिंफनीचं पार्श्वसंगीत असतं, ज्यामुळे त्याचा मेंदू ह्या रचनेचा संबंधही वेदनेशी लावू लागतो.

ऍलेक्स प्रोग्रॅमचं परफेक्ट उत्पादन म्हणून देशासमोर आणला जातो. तुरूंगाच्या धर्मगुरूचे आक्षेप धुडकावून लावत ऍलेक्सला वाजतगाजत सोडण्यात येतं आणि लुडोव्हिको प्रोग्रॅमला मान्यता मिळते. पण ऍलेक्सला बाहेरच्या जगात कुणीच स्वीकारत नाहीत. त्याचे स्वतःचे आई-वडिल त्याला नाकारतात. मग सुरूवातीला ऍलेक्सनं मारलेला म्हातारा आपल्या साथीदारांना बोलावून हतबल आणि हिंसा करण्यास अक्षम ऍलेक्सला मारतो. ऍलेक्स आपल्याला सांगतो, की हिंसा करताना जाणवणार्‍या मृतवत संवेदनेपेक्षा मार खाणं सोयीस्कर वाटतं.

उर्वरित सिनेमा मग स्वतःची निवड करण्यास अक्षम आणि निवड लादली गेलेल्या ऍलेक्सच्या आयुष्यातल्या विचित्र घटना दर्शवतो. ऍलेक्स योगायोगानं त्याच्या जुन्या सावजाच्या म्हणजेच आता अपंग झालेल्या लेखकाच्या घरी पोचतो. लेखक सुरूवातीला त्याला ओळखत नाही, पण लुडोव्हिकोचं उत्पादन म्हणून ओळखतो. लेखक सरकारविरोधी असल्यानं आपल्या मित्रांना बोलावून ऍलेक्सची स्थिती जगासमोर आणून सरकार पाडण्याचा प्लॅन करतो. पण अचानकच ऍलेक्सच्या 'सिंगिंग इन द रेन' गुणगुणण्यावरून त्याला ऍलेक्सची खरी ओळख पटते आणि तो ऍलेक्सची साक्ष लिहून घेऊन मग त्याला एका खोलीत बंद करतो आणि नववी सिंफनी मोठ्या आवाजात वाजवतो. हतबल ऍलेक्स ती रचना सहन करू शकत नसतो. त्या मृतवत संवेदनेपेक्षा मरण सोयीस्कर समजून ऍलेक्स खिडकीतून उडी मारतो. पण ऍलेक्स मरत नाही. तो जगतो आणि शेवटच्या विचित्र घटनाक्रमानं दिग्दर्शक आपल्याला अजून एक जबरदस्त धक्का देऊन सिनेमा संपवतो.

स्टॅनली क्युब्रिक पूर्ण सिनेमाभर अतिशय ग्राफिक अशी दृश्य वापरतो आणि घटनाक्रमाला पेलण्यासाठी आपली मानसिक तयारी करतो. प्रसंगी काही दृश्यांनी आपल्याला ऍलेक्स आणि एकंदरच सिनेमातल्या जगाची शिसारी येते. पण सिनेमा अतिशय उत्तमरित्या सामाजिक परिस्थितीचंही दर्शन घडवण्यात यशस्वी होतो. सरकार, प्रसारमाध्यमं आणि समाज ह्यांच्यावर इतक्या वेगळ्या पद्धतीनं भाष्य करणं साधसुधं काम नाहीये. तसेच कुठल्याही जीवाची स्वाभाविक निवड करण्याची शक्ती आणि त्याचं त्याबाबतीतलं सार्वभौमत्व ह्यांवर देखील सिनेमा ऊहापोह करतो. कुणालाही एखाद्या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा योग्य मार्ग, निवड लादणं की योग्य निवड करण्याची क्षमता जागृत करणं हा मुद्दा सिनेमाचा पाया आहे. डिस्टोपियन जग म्हणजे पूर्णतः वाईट प्रवृत्तींनी भरलेलं आणि विनाशाच्या उंबरठ्यावर पोचलेली समाजव्यवस्था असलेलं जग दाखवून क्युब्रिक शेवटाकडेही आपल्याला धक्का देऊन जातो.

प्रत्यक्षात ऍन्थनी बर्गेसच्या पुस्तकात २१ प्रकरणं होती, जी त्याच्या मते २१ व्या वर्षाकडे निर्देश करत होती. कारण त्याच्यामते २१ वं वर्षं हे माणसाच्या आयुष्याला खरं वळण देणारं वय असतं. त्याच्या पुस्तकात २१ व्या प्रकरणात ऍलेक्स पुन्हा बाहेरच्या जगात आलाय आणि काही घटना अशा घडतात, ज्याने तो खरोखरच आतून बदलायचं ठरवतो. चांगल्याची स्वाभाविक निवड करतो. पण अमेरिकेतल्या प्रकाशकांनी त्याला सांगितलं की असा शेवट अमेरिकेत चालणार नाही. तो रियल वाटणार नाही, त्यामुळे बर्गेसच्या पुस्तकाच्या अमेरिकन आवृत्तीत २१ वं प्रकरण गाळलंय, त्यामुळे क्युब्रिकनंही जवळपास पूर्ण पटकथा लिहेपर्यंत त्याच्या लक्षात आलं नव्हतं की त्यानं २० प्रकरणांवर आधारितच पटकथा लिहिलीय. मग त्यानंही २१ वं प्रकरण सिनेमात वापरलं नाही. तरीदेखील सिनेमाचा इम्पॅक्ट तिळमात्रही कमी होत नाही. पण माझ्या मते क्युब्रिकच्या दिग्दर्शनाखाली २१ व्या प्रकरणानं सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं असतं.

ऍलेक्सचं पात्र आणि उभं केलेलं एकंदरच जग हे क्युब्रिकच्या कलात्मक दृष्टीची जाणीव करून देतात. प्रसंगी अतिशय हिडीस असणारी दृश्यही एस्थेटिकली वेगळी जाणवतात. क्युब्रिकच्या मी पाहिलेल्या पहिल्याच सिनेमात मी त्याचा फॅन झालोय. आता त्याचे अजून सिनेमे पाहायचेत. अर्थात हा माझा एलिटिस्ट दृष्टिकोनही वाटू शकतो अनेकांना, आणि हा सिनेमा अतिशय बीभत्स व हिडीस तसेच विकृतीचा कळसही वाटू शकतो. पण शेवटी ती आपली आपली निवड आहे.

10/28/2010

जीवदान

गणेशनं चालता चालताच आपल्या कमरेला हात लावून पिस्तुल व्यवस्थित असल्याची चौथ्यांदा खात्री केली आणि पुन्हा मनाशी सगळी उजळणी करू लागला. अंधार्‍या रस्त्यावर चालतानादेखील त्याला कुणीतरी आपल्याला पाहत असेल ही भीती सतावत होती. शेवटचा टप्पा तर मोठ्या रस्त्यावरून आणि लख्ख दिव्यांच्या प्रकाशात पार करायचा होता. उजळलेला रस्ता जवळ आला तसं त्यानं पिस्तुल हातात घेतलं आणि त्याचा खटका व्यवस्थित असल्याची शेवटची खात्री केली. आता थेट चालवतानाच बाहेर काढायची असं मनाशीच ठरवून त्यानं शेवटचं वळण घेतलं आणि तो हमरस्त्याला लागला. शहराचा उच्चभ्रू भाग असल्याची खात्री दुतर्फा असलेल्या आलिशान इमारती आणि बंगल्यांवरून पटत होती. पण तेव्हढीच सामसूम देखील होती. एखादं वाहन अचानकच दिसत होतं, तेव्हढ्या वेळासाठी गणेशच्या हृदयाची धडधड वाढत होती. रात्रीचे दोन वाजून गेले असावेत, असा मनाशी विचार करतच गणेश, 'तो' विवक्षित बंगला शोधत चालत होता. तसं गणेशनं 'हे' काम पूर्वीही अनेकदा केलं होतं. फक्त तेव्हा तो असिस्टंट होता. त्याला अजूनही त्याची पहिली वेळ आठवत होती.

त्याचा म्होरक्या प्रत्यक्ष काम उरकत असताना गणेशला पाहावलं नव्हतं आणि तो उलटा उभा राहिला होता. आणि नंतर मात्र कितीतरी वेळ उलट्या करत राहिला होता. त्यानंतर बर्‍याचवेळा अशीच असिस्टंटची कामं केली. पण आधी पैशांची गरज म्हणून सुरू झालेला हा प्रकार, पैसा हीच मुख्य गरज कधी बनवून गेला ते लक्षातच आलं नव्हतं त्याच्या. त्यातूनच आज त्यानं स्वतःवरच हे काम घेतलं होतं. तसं पाहायला गेलं तर त्याचं पहिलंच काम, स्वतंत्रपणे करत असलेलं. त्यामुळेच कदाचित आज त्याला पहिल्या वेळसारखंच होत होतं. हाताच्या तळव्यांना घाम सुटत होता. पण नजरेसमोर मिळणार असलेली भरभक्कम रक्कम येताच थोडासा धीर वाढत होता. तो विवक्षित बंगला जवळ येत होता. सावज आत एकटंच असणार होतं. घराच्या कपाटात कुलूपबंद करून ठेवलेला ऍडव्हान्स आठवून तो स्वतःला धीर देत होता. त्याच्या योजनेची मनातली शेवटची उजळणी चालू होती.

----------

डॉ. भणगेंची त्यादिवशी ७५वी सर्जरी होती. अगदी अर्ध्याच तासापूर्वीपर्यंत ते शांतपणे झोपलेले होते. शहरातले सर्वांत महाग आणि निष्णात सर्जन म्हणूनच ते ओळखले जात. त्यादिवशी रात्री मध्यरात्र उलटून गेल्यानंतर अचानक त्यांचा फोन खणखणू लागला. सर्जन असल्यानं त्यांना ह्या प्रकारांची सवय होती. डोळे चोळतच पण सामान्य आवाजात त्यांनी बोलायला सुरूवात केली होती आणि पाचच मिनिटांत त्यांची झोप खाडकन् उडून गेली होती. ते चटकन् हो म्हणून गेले होते पण त्यानंतरही अगदी आवरून ते बाहेर पडले तोवरही त्यांना कळत नव्हतं, की ते करताहेत ते योग्य की अयोग्य. त्यांना ह्या विचित्र मनःस्थितीमध्ये खरं तर गाडी स्वतः चालवायची नव्हती. पण ड्रायव्हर पिऊन पूर्ण टाईट होऊन झोपला होता, त्यामुळे उठतच नव्हता. त्याला चार शिव्या हासडून डॉक्टरांनी गाडीत आपली बॅग टाकली आणि ड्रायव्हर सीटवर बसून गाडी सुरू केली. गाडी रेस करतानाच त्यांच्या लक्षात आलं, की ते कित्येक दिवसांनंतर स्वतःचीच गाडी चालवत होते. एव्हढ्या रात्री जास्त गाड्याही नसतील रस्त्यावर, त्यामुळे फारसा त्रास होणार नाही असा विचार करतच त्यांनी क्लच सोडत ऍक्सीलरेटर दाबला.

त्यांना आज स्वतःचं संपूर्ण करियर डोळ्यांपुढे येत होतं. त्यांनी केलेल्या ७४ ऑपरेशन्समध्ये काही काही अयशस्वीही ठरली होती. काहींमध्ये दैव आड आलं होतं, तर काहींमध्ये शास्त्र, तर काहींमध्ये मानवी चुका, कधी त्यांच्या सहकार्‍यांकडून तर कधी त्यांच्याकडून. पण मुख्यतः यशस्वी ऑपरेशन्समुळेच त्यांचा दबदबा बनला होता. कारण त्यांच्या नशीबानं त्यांना काही हाय प्रोफाईल पेशंट्स मिळाले होते. एक गाजलेली सिनेनटी, एक वजनदार राजकीय नेता. ज्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या कलेची, निपुणतेची वाहवाही झाली होती. त्यांनी स्वतःच्या शुल्कात भरमसाठ वाढ केली, तरी प्रसिद्ध लोकांचा राबता वाढलाच होता, ज्यामुळे अजून पैसा मिळत गेला. मग पैशाबरोबरच गरजा वाढल्या होत्या आणि त्या गरजांसाठीदेखील पैसा पुरे पडेनासा झाला होता. मग कर्ज वाढतच गेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून तर डॉक्टरांना स्वतःच्या आर्थिक स्थितीचीच काळजी घेरू लागली होती. आणि अशातच ही संधी चालून आली होती.

त्यांच्याच ओळखीच्या, त्यांचा पेशंट राहिलेल्या एका बड्या धेंडाला हार्ट ऍटॅक आला होता. आणि सर्जरीसाठी त्यांच्या भावाने इतक्या रात्रीच डॉक्टरांना पाचारण केलं होतं. पण जीव वाचवण्यासाठी नव्हे, तर जीव घेण्यासाठी. संपत्तीचा पूर्ण मालक होण्याची चालून आलेली संधी गाठण्यासाठी भावानंच भावाचा काटा काढायचं ठरवलं होतं. ऑपरेशन यशस्वीरित्या अयशस्वी करण्याची जवाबदारी डॉक्टरांवर होती. त्याबदल्यात एखाद्या सामान्य माणसाची आयुष्यभराची ददात मिळेल इतकी रक्कम देण्याचं भावानं कबूल केलं होतं आणि त्यातला अर्धा व्यवहार ऑपरेशनच्या आधीच करण्याची तयारीही दाखवली होती. कदाचित, अयशस्वी ऑपरेशननं डॉक्टरांच्या करियरवर बट्टा लागला असता, पण त्याक्षणी डॉक्टरांना फक्त आपलं बुडतं घर दिसत होतं आणि डॉक्टर लगेच हो म्हणून निघाले होते. नक्की काय केलं, म्हणजे ऑपरेशन फसेल, ह्याची ते मनातल्या मनात उजळणी करत होते. पण त्यातच एका बाजूला त्यांना त्यांचं एक मन खात होतं. रस्त्यावर येणं किंवा सद्सद्विवेकबुद्धीला मारणं ह्यांपैकी त्यांनी दुसरा रस्ता निवडला होता. आणि ह्या मानसिक द्वंद्वामध्येच गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरवर आपटून उलटीपालटी झाली.

----------

गणेश अचानकच झालेल्या ह्या घटनेनं बावचळून गेला. हे सगळं त्याच्या योजनेत नव्हतं. सामसूम असलेल्या रस्त्यावर एकदमच मोठा आवाज होऊन अपघात झाला होता आणि त्यामुळे गणेशचा सगळी मानसिक तयारी अस्ताव्यस्त झाली. तो एकदम रिक्त झाल्यागत अपघातग्रस्त गाडीकडे पाहत उभा राहिला. त्याला काही कळायच्या आतच तो गाडीच्या दिशेनं निघाला. आजूबाजूला एव्हढी घरं असूनही फार कमी घरांमधले दिवे लागले होते आणि बाहेर पडायची तसदी तर कुणीच घेतली नाही. गणेश उलटी होऊन पडलेल्या गाडीजवळ पोचला आणि त्यानं डोकावून पाहिलं, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक व्यक्ति अर्धवट शुद्धीत होती. गणेश दिसताच, त्या व्यक्तिचे डोळे चमकले. त्यानं आशाळभूतपणे आपला हात उचलायचा प्रयत्न केला. गणेशनं त्या आर्जवी आणि हतबल डोळ्यांमध्ये एक क्षण पाहिलं आणि त्याला अचानक लक्षात आलं, की त्याचा म्होरक्या त्याला नेहमी सावजाच्या डोळ्यांत बघत जाऊ नको असं का बजावायचा. त्यानं अभावितपणे त्याचा हात धरला आणि जोर लावून त्याला बाहेर खेचलं. त्याला तिथेच सोडून जाण्याच्या विचारात गणेश असतानाच एक मोटरसायकल जवळ येत असल्याचा आभास झाला. ती गस्तीवरच्या पोलिसाची मोटरसायकल होती. गणेशनं कमरेला पुढे खेचलेलं पिस्तुल काढून चटकन मागे लावलं आणि शर्ट त्यावर सोडला.

पोलिसानं वायरलेसवरून संदेश दिल्यावर पाच मिनिटांत ऍम्ब्युलन्स आली आणि पोलिसानं गणेशलाही ऍम्ब्युलन्समध्येच चढवलं. गणेश नाईलाजानंच हॉस्पिटलला पोहोचला. ती व्यक्ति ऍडमिट झाल्यावर गणेश चुपचाप तिथून सटकायच्या बेतात असताना, मगाचच्याच हवालदारानं त्याला हटकलं.

"काय रे, तुझा ब्लड ग्रुप काय आहे?"

"माहित नाही साहेब."

"चल आत!"

हवालदार त्याच्या दंडाला धरून त्याला आत घेऊन गेला. गणेशनं चुपचाप कॉरिडॉरमधल्या कचरापेटीत पिस्तुल टाकलं आणि तो आत गेला.

गणेश झोपला होता आणि त्याचं रक्त शेजारीच एका पिशवीत जमा होत होतं. आपलं वाहणारं रक्त कुणाचा तरी जीव वाचवणार असल्याची एक वेगळीच जाणीव त्याला तत्क्षणी झाली. एक वेगळीच, विचित्र संवेदना त्याला जाणवू लागली. नर्सच्या आवाजाने तो भानावर आला.

"तुम्हाला ठाऊक आहे का, की तुम्ही कुणाचा जीव वाचवलाय?"

त्यानं फक्त नकारार्थी मान डोलावली.

"शहरातले प्रसिद्ध हार्ट सर्जन.त्यांनी आजवर कित्येक रुग्णांना जीवदान दिलंय. आज तुम्ही त्यांना जीवदान दिलंत. खूप लोक तुम्हाला दुवा देतील बघा.." पुढेही नर्स बरंच काही बोलत होती. तो पुन्हा त्याच वेगळ्या संवेदनेचा आनंद घेत होता. प्रत्येक कामगिरीनंतर जाणवणार्‍या मळमळीपेक्षा ही संवेदना हजारोपट चांगली होती.

----------

डॉक्टरांवर ऑपरेशन करावं लागणार होतं, त्यासाठी तयारी चालू होती. डॉक्टरांसाठी रक्ताचाही बंदोबस्त झाला होता. डॉक्टर अर्धवट शुद्धीत होते. त्यांना अचानकच सामोरा आलेला तो धूसर चेहरा अजूनही डोळ्यांपुढे दिसत होता. त्याच चेहर्‍यामुळे कदाचित डॉक्टरांना केलेल्या चुका सुधारण्याची एक अजून संधी मिळणार होती. डॉक्टरांना त्या चेहर्‍याचे आभार मानायचे होते, पण दिलेल्या इंजेक्शनमुळे डॉक्टरांची शुद्ध हरपत होती.

गणेश कॉरिडॉरमध्ये आला, तेव्हा मगाचचा हवालदार त्याच्याजवळ आला आणि त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवून स्मित केलं.

"डॉक्टरांवर ऑपरेशन चाललंय, संपेपर्यंत थांबणार आहेस इथे? कदाचित काही मोठे लोकही येतील, तुला भेटायला मिळेल."

गणेशनं फक्त हसून नकारार्थी मान डोलावली.

तो शांतपणे चालायला लागला. आणि कचरापेटीजवळ पोचून थबकला. क्षणभर तो स्वतःशीच हसला आणि तसाच मुख्य दरवाजाकडे निघाला, घेतलेला ऍडव्हान्स परत कसा करायचा ह्याचा विचार करत.

(समाप्त)

10/24/2010

मिशन इम्पॉसिबल

जगाच्या इतिहासामध्ये बरेचदा असं होतं, की काही विक्षिप्त माणसं सर्वशक्तिनिशी एखाद्या महाशक्तिशाली व्यक्ति, संस्था किंवा समूहासमोर थेट लढा द्यायला उभी राहतात. कारणं काहीही असोत, त्यांची बाजू चूक असो, बरोबर असो किंवा चूक-बरोबरच्या मधली, पण त्यांचं हेच गोलियाथ समोर लढणार्‍या डेव्हिडसारखं (संदर्भ - बायबलमध्ये गोलियाथ ह्या प्रचंड योद्ध्याशी डेव्हिड ह्या छोट्याशा मुलानं युद्ध करून हरवलं होतं.) लढा देणं अनेकांना प्रेरणा देऊन जातं. शंभरातल्या नव्याण्णव वेळा हे 'मिशन इम्पॉसिबल'च असतं.

सध्या देखील असाच एक वेडा, विक्षिप्त डेव्हिड अमेरिकारूपी महाकाय, महाशक्तिशाली गोलियाथसमोर दंड थोपटून उभा आहे - ज्युलिअन असाँज. 'विकिलीक्स' नामक 'धोक्याची घंटा' वाजवणार्‍या वेबसाईटचा मुख्य संपादक. ज्यांनी सर्वशक्तिमान अमेरिकेच्या सैन्यानं वाळवंटी, गरीब इराक आणि अफगाणिस्तानात युद्धाच्या छायेत घडवलेले निर्दयी उत्पात आणि केलेले अमानुष अत्याचार, त्यांच्याच सैन्याच्या 'अधिकृत' कागदपत्रांना फोडून जगासमोर आणलेत. ज्युलियन असाँज ह्याच वेबसाईटचा सार्वजनिक चेहरा आणि प्रवक्ता आहे.

ज्युलिअनचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा निरागस वाटतो, पण प्रतिभेचं आणि कुठल्यातरी वेगळ्याच निश्चयाचं तेज त्याच्या चेहर्‍यावर कायम जाणवतं. मी पहिल्यांदा विकिलीक्सनं फोडलेला अमेरिकी युद्धविमानाचा व्हिडिओ पाहिला होता आणि जसे वैमानिक व्हिडिओगेम्स खेळत असल्यागत शिव्या देत जमिनीवरच्या नागरिकांना टिपत होते आणि त्याचबरोबर मागून आलेल्या ऍम्ब्युलन्सलाही त्यांनी सोडलं नाही, ते पाहून माझ्या मनात अमेरिकेबद्दल असलेली पूर्वीपासूनचीच भावना अजून बळावली.

अमेरिका ही संधीसाधू आणि जगविघातक शक्ती आहे. त्यांना स्वतःच्या देशाखेरीज आणि त्यातही भल्यामोठ्या कंपन्या आणि त्यांच्या बाजारपेठांखेरीज कशाचीही पर्वा नाही. आपलं शस्त्रसामर्थ्य आणि बाजारपेठा अबाधित राखण्यासाठी तो देश कुठलाही नैतिक किंवा अनैतिक मार्ग वापरून जगातल्या कुठल्याही देशाच्या सरकारांशी खेळ करू शकतो. अगदी राष्ट्रप्रमुखांपासून ते महत्वाच्या व्यक्तिंच्या खुनाच्या कटापर्यंत कुठलाही मार्ग वापरण्यास अमेरिका मागेपुढे पाहत नाही. दोन्ही महायुद्धांमध्ये दोन्ही बाजूंना शस्त्र विकून आपली तुंबडी भरणारी अमेरिका असो, की शस्त्रांच्या बदल्यात हुशारी करून सोनं घेणारी अमेरिका असो, जगावर राज्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती तीच. एकदा जगातलं सर्वाधिक सोनं तिजोरीत आल्यानंतर अमेरिकेला विचारणारं कुणीच नव्हतं, त्यांनी धडाधड बेसुमार डॉलर्स छापून खजिना भरून टाकला. जगाचे सगळे व्यवहार डॉलर्समध्ये होत असल्याने, अमेरिकन डॉलर्सच्या छपाईला कुठलाच आळा नाही. त्यांच्या मनात येईल तितकं चलन ते छापत होते. पण १९७० नंतर तेलाचं महत्व लक्षात आल्यावर अमेरिकेनं तिथे मोर्चा वळवला. मग अनेकानेक तेल उत्पादक देशांवर ह्या न त्या प्रकारे नियंत्रण ठेवून अमेरिकेनं आपली तेलाची आवक आणि आपल्याकडील तेल कंपन्यांची भरभराट होत राहिल ह्याची निश्चिती केली. जागतिक तेलाची उलाढाल 'डॉलर्स' मध्ये चालू ठेवून अमेरिकेनं आपला डॉलर्स छापण्याचा धंदा अबाधित राहिल ह्याची काळजी घेतली. गोल्ड डॉलर्स आता पेट्रो डॉलर्स झाले. आपली तेलाची भूक शमवण्यासाठी दुनियाभर लोकशाहीचे ढोल बडवणारी अमेरिका सौदी अरेबियाच्या जुलमी राजसत्तेकडे काणाडोळा करते. पण हीच दुतोंडी अमेरिका, त्यांना भीक न घालणार्‍या इराणच्या अलोकशाही कारभाराबाबत मात्र फारच सजगता दाखवते. ह्याचं कारण, इराणनं थेट 'युरो' ह्या चलनामध्ये तेल विकण्याचा घाट घातलाय, आणि जर तो प्रत्यक्षात आला, तर जागतिक पातळीवरील अग्रेसर ते उत्पादक इराणमुळे आजवर डॉलरमध्येच होत असलेली तेल उलाढाल खूप कमी होईल आणि अमेरिकेच्या कुठलाही ताळतंत्र न ठेवता लक्षावधी 'डॉलर्स' छापण्याला आळा बसेल. ज्यातनं आधीच मोडकळीला आलेली अमेरिकन अर्थव्यवस्था साफ झोपण्याची चिन्ह दिसू लागतील. चीनसारख्या लोकशाहीचा गळा दाबणार्‍या देशाला तोंडदेखले विरोध करणारी अमेरिका, पूर्णतया त्यांच्यावरच अवलंबून असल्याने कधीच काहीच करणार नाही, हे निश्चित आहे. अमेरिकेकडे जेव्हढे डॉलर्स नसतील तेव्हढे चीनकडे असतील अशी स्थिती लवकरच येईल, कारण चीन अमेरिकेला डॉलर्सच्या बदल्यात बॉन्ड्स देऊन अमेरिकेला बेल-आऊट करत आहे. हे सगळं जगापासून लपलेलं नाही, पण अमेरिकेचा दराराच असा आहे, की त्यांच्याविरुद्ध 'ब्र' काढणारे राष्ट्रप्रमुखही जगातून नाहीसे होतात. 'सद्दाम हुसेन' हे ताजं उदाहरण. सगळा तेलाचाच खेळ आहे. मध्यपूर्वेमध्ये रशियन वर्चस्वाला शह देण्यासाठी ओसामा बिन-लादेन ला सीआयए तर्फे शस्त्रं आणि प्रशिक्षण देऊन रशियाविरूद्ध अमेरिकेनंच वापरलं. रशिया निघून गेला आणि तालिबान अमेरिकन हात डोक्यावर घेऊन अफगाणिस्तानात मनमानी करू लागले. बुद्धाचे पुतळे फुटले, भारतीय विमान अपहरण घडलं, पण अमेरिकेला तालिबान हे धर्मांध असल्याचा साक्षात्कार ९/११ झाल्यावरच अचानक झाला. रातोरात तालिबान जगासाठी धोकादायक बनले. मग अफगाणिस्तान बेचिराख झाला आणि आता कसलेला फास अजून आवळण्यासाठी इराकलाही फडतूस कारणं देऊन झोपवण्यात आलं. जॉर्ज बुश सिनियरच्या कुवेत युद्धावेळी झालेल्या अपमानाचा बदला जॉर्ज बुश ज्युनियरनं सद्दामला फाशी देऊन घेतला. तेलाचं भंडारही थेट अमेरिकेच्या हाती आलं. अफगाणिस्तानावरचं नियंत्रण हाती ठेवण्यासाठी आणि चीन व भारतावर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानला चुचकारत ठेवण्याचं धोरण अंगिकारलेलं आहे. आणि एकीकडे जगातल्या सर्वांत मोठ्या दोन लोकशाही म्हणत भारताच्या गळ्यात गळे घालणंही. अमेरिकेसारखा स्वतःच्या कल्याणासाठी करोडो लोकांची आयुष्य उद्धवस्त करणारा देश हा ओसामाहून जास्त धोकादायक आहे.

अमेरिकेचा फास भारतासारख्या स्वतःला होणारी महासत्ता म्हणवणार्‍या देशालाही चुकलेला नाही. लालबहादूर शास्त्रींसारखा दूरदृष्टीचा नेता भारताला शस्त्रमहासत्ता बनवू शकत होता, पण त्यांना संपवण्याचं कुकर्मही सीआयएनंच केलं असल्याचे पुरावे आहेत. एव्हढंच कशाला भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक आणि अत्यंत कार्यक्षम शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा ह्यांना संपवण्याचा कटही सीआयएचाच असल्याचं नेटवर थोडंसं शोधलं तरी मिळू शकतं. इंदिरा गांधी जेव्हा अमेरिकन कार्यक्रमाच्या आड येऊ लागल्या आणि त्यांचा सोव्हिएत रशियाकडे झुकाव वाढू लागल्याचं जाणवलं तेव्हा त्यांच्यावरही दबाव आणण्यात आला होता. अगदी खलिस्तानवाद्यांना खतपाणी घालण्यात अमेरिकेचा हातभार असण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. खलिस्तानवाद्यांनी घडवलेला 'कनिष्क' विमान अपघात सगळ्यांच्याच लक्षात असेल, पण कॅनडा सरकार त्याच्या सूत्रधारांबद्दल दाखवत असलेला मवाळपणा नजरेतून सुटत नाही. अर्थात खरं किती कॉन्स्पिरसी थिअरीज किती आणि दोघांचं मिश्रण किती हे जरी आपल्या कधीच समोर येणारं नसलं, तरी नजरेसमोर घडणार्‍या घटनांचा बारकाईनं अभ्यास केल्यास बरीच संगती लागू शकते. लालबहादूर शास्त्री आणि होमी भाभांच्या हत्येमध्ये सीआयएचा सहभाग असल्याचं सांगणारी ही एक साईट बघा.

अमेरिकेच्या कुकर्मांची यादी पार १९१४ सालापासून आहे. जगाला अण्वस्त्रमुक्त करायला निघालेली अमेरिका स्वतःमात्र जगातली सर्वाधिक अण्वस्त्र बाळगून आहे. आणि जगाच्या इतिहासात आजवर अणुहल्ला करून एक पिढीच्या पिढी उद्ध्वस्त करणारा एकमेव देश हा अमेरिकाच आहे. बारकाईनं बघितल्यास आज जगाच्या कानाकोपर्‍यात चाललेल्या सगळ्या संघर्षांचं मूळ कुठून ना कुठून अमेरिकेपर्यंत जातंच. पॅलेस्टाईन-इस्रायल असोत की कोसोवो-सर्बिया, भारत-पाकिस्तान असोत की अफगाणिस्तान-इराक किंवा कॉकेशस पर्वतातली छोटी मुस्लिम राज्यं आणि रशिया. जगभरात अराजक माजवून स्वतःची तुंबडी भरण्याचा अमेरिकेचा धंदा वर्षांनुवर्षं बिनबोभाट सुरू आहे.

आणि अशा ह्या अमेरिकेचं अगदी धोतरच सोडून त्यांच्या हातात देण्याचं काम विकिलीक्स नं केलं. जगभरच्या 'मानवी हक्कां'चा ठेका घेणारी, इतर देशांमधल्या 'धार्मिक सहिष्णुते'चं मोजमाप करणारी कमिटी नेमणारी अमेरिका स्वतः इराक आणि अफगाणिस्तानात काय रंग उधळतेय हे विकिलीक्सच्या हजारो अधिकृत अमेरिकी कागदपत्र आणि चक्क युद्धविमानातूनच टिपलेल्या अधिकृत व्हिडिओंच्या मार्फत अगदी थेट जगासमोर आलं. अमेरिकेसोबतच 'मानवी हक्क' आणि लोकशाहीचं प्रतीक(!) इंग्लंड आणि वंशवादाचं उधाण आलेल्या ऑस्ट्रेलियाचीदेखील अब्रू पार चव्हाट्यावर आली. पेंटागॉन आणि अमेरिकी संरक्षण मंत्रालयापासून सगळेच अपराधी आता हे सगळं बेकायदेशीर आहे आणि ह्यामुळे आमच्या युद्धभूमीतल्या सैनिकांच्या प्राणांना धोका होऊ शकतो म्हणून बोंबा ठोकताहेत. पण 'बूंद से गयी, वह हौद से नहीं आती' हे त्यांना समजावण्याचा काहीच उपयोग नाही. हजारो निरपराध लोकांना केवळ गंमत म्हणूनही मारलं गेल्याचे किस्से समोर आल्यानं तर सगळ्याच मंडळींची तूर्तास तरी फेफे उडाली आहे. इंग्लंडमध्ये तर एका मानवी हक्क वकिलानं सैन्यावर केसेस करण्याची तयारी सुरू केलीय. आणि विकिलीक्स च्या पत्रकार परिषदेत चक्क अमेरिकेचाच एक पूर्व सैन्याधिकारी, ज्यानं पेंटागॉनच्या अमानुष धंद्यांना कंटाळून पूर्वी त्यांची कागदपत्र फोडली होती, त्यानंही हजेरी लावली आणि जगभरासमोर अमेरिकन संरक्षणव्यवस्थेची कुंडली मांडली. त्यांचीच औषधं त्यांनाच मिळताहेत हे पाहून छातीत थंडावा लाभला.

ज्युलियन असाँज आणि कंपनीचा रस्ता फारच अवघड आहे. पहिल्या हल्ल्यात त्यांना यश मिळालंय. पण विक्षिप्त असाँजवर लगेच अमेरिकेसकट सगळ्याच अपराधी गटानं फास आवळायला सुरूवात केलीय. असाँजचं बालपण आणि तरूणपण फक्त इथून तिथे फिरण्यात गेलं आणि असामान्य बुद्धिबरोबरच येणारा विक्षिप्तपणा त्याच्यात आहेच. एकदा लग्न झालं आणि मग थोड्यांच वर्षांत मुलानंतर घटस्फोट, मग मुलाच्या ताब्यावरून कोर्टसंघर्ष. मग बायकोचं मुलासोबत परागंदा होणं आणि मग ह्याचं कंटाळून पुन्हा जागा बदलणं. त्यानं युनिव्हर्सिटी ऑफ मेलबोर्नमध्ये शिक्षण घेतलं, पण कधी डिग्री घेतली नाही. तो अतिशय कुशल हॅकर आहे आणि नंतर तो ओपन सोर्स सॉफ्टवेअर चा खंदा समर्थक बनला. तो जे काही शिकलाय ते सगळं स्वतःच वाचून आणि सरावानं. त्याचं वाचन प्रचंड आहे. गणित, भौतिकशास्त्रापासून ते थेट तत्वज्ञान आणि न्यूरोसायन्सपर्यंत त्याचं वाचन आहे. अर्थातच तो विक्षिप्त आहे, त्याचबरोबर एकटाच असल्याने अय्याशही. त्यामुळे त्याचे आपल्या जुन्या प्रवक्तीसोबतच अजूनही काही स्त्रियांसोबत संबंध होते. त्याचाच फायदा घेऊन, पहिल्या लीकच्या पाठोपाठ स्वीडिश पोलिसांनी असाँजविरुद्ध बलात्काराच्या दोन केसेस दाखल केल्या. पण चोवीस तासांच्या आतच त्याच्यावरचे आरोप निराधार असल्याने मागे घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही सगळी केवळ सुरूवात आहे.

असाँज आणि त्याच्या मित्रांना, जे विकिलीक्समध्ये बिनपैशाचे कामं करतात आणि अधिकृत कागदपत्रांतून कुणाच्या जीवाला धोका करू शकणारी माहिती ओळनओळ वाचून, संपादित करून जगासमोर आणतात, संभाव्य धोक्यांची कल्पना असणारच. अमेरिकेसारख्या देशाशी थेट शत्रुत्व जीवावरही बेतू शकतं. पण सध्या बहुतेक हीच असाँजची ढाल बनू शकते. कारण आता असाँजला काही झालं, तर थेट अमेरिकेकडे बोटं उठतील. पण अमेरिकेला ह्या सर्वांचीच सवय आहे. ताकदीच्या बळावर त्यांनी पूर्वीही अनेक आवाज दडपले आहेत. पुढेही दडपत राहतील. पण महत्वाचं हे आहे, की कितीही दडपशाही झाली, तरी असं 'मिशन इम्पॉसिबल' लढण्यासाठी कोणी ना कोणी असाँजसारखे उभे राहतीलच. असाँजची बाजू चूक की बरोबर ह्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा, पण तो अमेरिकेविरूद्ध वैयक्तिक स्वार्थासाठी नक्कीच लढायला उभा नाहीये. त्याला शुभेच्छा!

(प्रस्तुत लेखासाठी मी पूर्वी वाचलेले काही विरोप, आंतरजालावर उपलब्ध असलेली माहिती आणि विकिपीडिया चा संदर्भ घेतला आहे.)

10/21/2010

नियंत्रण ते नियमन व्हाया गुगल

सहसा लोक ऑफिसात काय करतात? - काम हे उत्तर मला कुणी देणार नाही आणि चुकून कुणी दिलंच तर तो धादांत खोटं बोलत आहे, हे मी इथेच ग्राह्य धरतो. कारण माझा प्रश्न पुरेसा स्पष्ट आहे. 'सहसा' लोक ऑफिसात काय करतात? सहसा लोक विविध उपयुक्त उपक्रम आणि क्रिया करतात. जसे की, गॉसिप्स करणे (स्त्रिया)/चकाट्या (राजकारणापासून ते क्रिकेटपर्यंत कशावरही) पिटणे (पुरूष), मेल फॉर्वर्ड करणे, मेल फॉर्वर्ड्स वाचणे, चहा/कॉफी पिणे (फुकट मिळत असेल तर उत्तम), सोशल नेटवर्किंग साईट्स, ब्लॉग्ज वाचणे हे झालं 'सहसा'चं उत्तर (क्रम वेगवेगळा असू शकतो). आणि ह्या सगळ्यांतून वेळ उरला किंवा डेडलाईनचा बांबू बसला तर 'काम' करणे. माझ्या आधीच्या वाक्यावर तीव्र आक्षेप असणार्‍या सर्व वाचकांची मी आधीच क्षमा मागून हा दावा करतो, की एकतर ते खरोखर कामसू आहेत (ज्या केसमध्ये मला त्यांच्या कंपनीला अभिनंदनपत्र पाठवावेसे वाटते) किंवा त्यांच्या ऑफिसात इंटरनेट उपलब्ध नाही.

असो. मागचा परिच्छेद विनोदनिर्मितीचा एक अगोचर प्रयत्न म्हणून सोडून दिला तर आपण सापशिडीत साप लागल्यागत पुन्हा पहिल्या प्रश्नावर पोचतो. तर प्रश्न काय होता? 'सहसा' लोक ऑफिसात काय करतात? व.पुं. नी कुठेतरी म्हटलंय. की 'व्हेन यू गो ऑन रायटिंग मोअर ऍन्ड मोअर पर्सनल इट बिकम्स मोअर ऍन्ड मोअर युनिव्हर्सल'. अर्थात जसजशा तुम्ही अधिकाधिक वैयक्तिक गोष्टी लिहित जाता, तसतशा त्या अधिकाधिक वैश्विक होत जातात. तर हे वाक्य प्रमाण मानून आपण शिडी शोधायचा, अर्थात उत्तर शोधायचा प्रयत्न करू. म्हणजेच आता मी स्वतः, व्यक्तिशः ऑफिसात 'सहसा' काय करतो ह्याचा परामर्श घेणं क्रमप्राप्त आहे.

मी सकाळी आठच्या ठोक्याला ऑफिसात हजर होतो. तसं माझं काम कागदपत्रांशीदेखील संबंधित असलं तरी संगणक हे माझ्या कामाचं अतिमहत्वाचं साधन आहे. त्यामुळे माझा संगणक मी जेव्हढा वेळ ऑफिसात असतो, तेव्हढा वेळ सुरू असतो आणि माझ्या ऑफिसातील वेळाच्या बहुतेक ८५% वेळ मी संगणकावर काही ना काही करत असतो. इतक्या निरीक्षणानंतर 'काही ना काही' ह्या शब्दांमध्ये आपल्या 'सहसा' चं उत्तर दडलेलं आहे.

एका सामान्य नेटकराच्या मूलभूत गरजा काय असतात? इ-मेल, चॅट, डॉक्युमेंट्स हाताळणे, व्हिडिओ पाहणे, सर्च, बातम्या, सोशल नेटवर्किंग, ब्लॉगवाचन, करत असल्यास ब्लॉगिंग, आणि ब्लॉगिंग करत असल्यास स्टॅटिस्टिक्स. ओके, ह्या सामान्य नेटकराच्या नाहीत, पण अगदी 'असामान्य' नेटकराच्या देखील नाहीत. असो. तर आता मी 'सहसा' चं उत्तर देतो. 'सहसा' मी हेच सर्व ८५% वेळाच्या जवळपास ५०-५५% (विथ पॉझिटिव्ह टॉलरन्स) करत असतो. मग तुम्ही विचाराल मी काम कधी करतो किंवा मुळात मी काम करतो का? तर कृपया ह्याचे उत्तर तुम्ही माझ्या साहेबांना विचारा.

तर आपल्याला माझ्या 'वैयक्तिक' सहसाचं उत्तर मिळालं. मग आता आपण वपुंचं प्रमाणवाक्य वापरून, वैयक्तिकला वैश्विक करूया. आणि आपल्या प्रश्नाला इथेच पूर्णविराम देऊया.

जिज्ञासूंना उत्सुकता असेल की मुळात हा प्रश्न आला कुठून? ह्याचं उत्तर विश्वाची उत्पत्ती कशी झाली, ह्या प्रश्नाच्या उत्तराएव्हढं अवघड आणि लांबलचक नसलं तरी थोडं लांबच आहे. पण प्रश्न आलाय तेव्हा उत्तर द्यावंच लागेल.

त्याचं झालं असं, की मी ऑफिसातल्या संगणकाचा उंदीर डाव्या हाताने वापरतो. एके दिवशी एक मित्र आला आणि माझ्या संगणकावर काहीतरी शोधायचंय म्हणू लागला. मी मागे झालो आणि तो उजव्या बाजूला उंदीर शोधू लागला. दोन क्षण निष्फळ नजर फिरवल्यावर तो माझ्याकडे पाहून म्हणाला,

"अबे, माऊस कुठाय?"

इतकी वेळ त्याची उडालेली त्रेधा पाहून मजा घेणारा मी छद्मीपणे हसलो आणि कळफलकाच्या डावीकडे बोट दाखवून म्हणालो,

"हा काय?"

"आयला, तू लेफ्टी आहेस?"

मी विजयी मुद्रेनं "छ्या! बिलकुल नाही."

"मग?" त्यानं उलट्या बाजूला लेफ्ट आणि राईट क्लिक असल्याने जाम गोंधळतच मला विचारलं.

"अरे, असंच. उजवा खांदा एके दिवशी खूप दुखू लागला. आणि बोटांना मुंग्या आल्यागत वाटू लागलं. मग स्पॉन्डिलायटिस असेल की काय, ह्या काळजीनं मी थोडा भार डाव्या हातावर टाकण्याचं ठरवलं." असं म्हणत मी त्याच्या हातून उंदीर घेत सफाईदारपणे त्याचं काम करून दिलं.

असेच काही दिवस गेले. एक दिवस एक साहेब आला. मला संगणकावरून काही हवंय म्हणाला. मी बाजूला झालो. आणि पुन्हा पहिलाच पूर्ण प्रसंग. आणि पुन्हा मी विजयीमुद्रेनं माझं कारण सांगून छाप पाडण्यात यशस्वी.

अजून काही दिवस उलटले. मी असाच बसलोय आणि दुसरा एक मित्र पुन्हा काही कामाने येतो आणि माझ्या डावर्‍या उंदराबद्दल आश्चर्य व्यक्त करून जातो. त्यानंतर मला पुन्हा संपूर्ण कारण सांगावं लागतं. पण आतापर्यंत मी मी कंटाळून गेलोय उत्तर देऊन. तेच तेच सविस्तर सांगून. लोकांना गोंधळलेलं पाहण्याचा उत्साह सरून गेलाय. अशा स्थितीतच एक दिवस माझं काम प्रचंड वाढलं. प्रचंड म्हणजे परिस्थिती हाताबाहेर गेल्यागत झालं. मी माझ्या संगणकावर सोडा, जागेवरच असेनासा झालो आणि असलोच तर दूरध्वनीवर कामाच्याच चर्चांमध्ये. त्यामुळे माझा संगणकाचा वापर अगदीच कमी झाला.

आता ह्या इथे आपल्याला मागून एक रेफरन्स घ्यावा लागणार आहे. तर परिच्छेद क्रमांक चार, अर्थात नेटकराच्या गरजांचा रेफरन्स इथे देणं गरजेचं ठरतं. त्या गरजा नीट पाहा आणि आता मी इथे एक यादी देतो. गुगल मेल (इ-मेल), गुगल टॉक (चॅट), गुगल डॉक्युमेंट्स (डॉक्युमेंट्स हाताळणे), यूट्यूब (व्हिडिओ पाहणे), गुगल (सर्च), गुगल न्यूज (बातम्या), ऑर्कुट, गुगल बझ (सोशल नेटवर्किंग), गुगल रीडर (ब्लॉगवाचन), ब्लॉगर (करत असल्यास ब्लॉगिंग), आणि गुगल ऍनॅलिटिक्स (ब्लॉगिंग करत असल्यास स्टॅटिस्टिक्स). माझ्या ह्या सर्व गरजा आश्चर्यकारकरित्या एकाच युजरनेम आणि पासवर्डने पूर्ण होतात. 'गुगल' नं माझ्या वैयक्तिक आयुष्याला वैश्विक बनवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. कधी कधी प्रश्न पडायचा की गुगल माझ्या वाढलेल्या गरजा पूर्ण करतो, की आधी स्वतःच माझ्या गरजा वाढवतो आणि मग स्वतःच त्या पूर्णाही करतो. उत्तर काहीही असो, पण मी कामाच्या प्रचंड रगाड्याखाली ह्याच गरजांना चाट दिली होती. अशातच स्वनियंत्रणाचा कीडा डोक्यात वळवळला आणि मी वेळ असतानाही गुगलपासून फारकत घेण्याचं ठरवलं. फक्त ब्लॉगिंग चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं बंद १००% यशस्वी होणं शक्य नव्हतं. मधे मधे रिकामा झालो की सवयीनं फायरफॉक्सची खिडकी उघडायचो आणि लक्षात यायचं की 'हाय रे! इथे काहीच नाही'. एक उदास रेडिफचं होमपेज किंवा इंडियाटाईम्स किंवा महाराष्ट्र टाईम्स माझ्याकडे पाहून केविलवाणं हसायचे. मी माझ्या सुन्या मैफिलीकडे एकदा आणि टेबलावर पडलेल्या कागदांकडे एकदा पाहायचो. मनोनिर्धाराचा आणि नियंत्रणाचा वारंवार विजय व्हायचा.

आणि असंच एकदा इकडे तिकडे पाहताना माझं लक्ष माझ्याच डाव्या हाताकडे गेलं. मग मला तेच तेच जुने संवाद आठवले. मग मनाशी पुन्हा विचार आला की समजा आपण जर अजूनही उजव्या हातानेच उंदीर चालवत असतो, तर ८५% मधल्या ५०-५५% वेळ नेटकराच्या गरजा भागवताना आपल्या हातावर किती ताण पडला असता? पण ह्या प्रश्नातून आपण नक्की काय करायला ऑफिसला येतो असा एक थेट मुळावर आघात करणारा लक्षवेधी प्रश्न माझ्या मनात उद्भवला. आणि ह्याच अभूतपूर्व मानसिक द्वंद्वामधून मार्ग काढण्यासाठी मी 'वैयक्तिक' चा 'वैश्विक' असा बदल करून पडलेल्या प्रश्नाला 'सहसा' लोक ऑफिसात काय करतात? असं गोंडस आणि मनाला कमी दुखावणारं स्वरूप दिलं. पण दैवदुर्विलासाने मला उत्तर शोधण्यासाठीही तेच प्रमाणवाक्य वापरावं लागलं आणि मी सर्क्युलर रेफरन्समध्ये अडकलो.

असो. तर ह्याच सर्क्युलर रेफरन्स लूपमध्ये म्हणजेच अंतर्निर्देशी आवर्तामध्ये अडकून मी फायरफॉक्सच्या रिकाम्या उदास विंडोकडे बघत असताना माझा एक तिसरा मित्र माझ्याकडे आला आणि संगणकावरून काहीतरी हवंय म्हणाला. मी सवयीने मागे झालो आणि त्यानं सवयीनं उजवीकडे उंदीर शोधला. आणि सवयीनेच (माझ्यासाठी) म्हणाला.

"माऊस कुठाय?"

मी काही न बोलता डावीकडे बोट दाखवलं.

"तू लेफ्टी आहेस?" मी वैतागलो होतो, पण अचानकच मला साक्षात्कार झाला आणि मी खुदकन् हसलो.

"हो. मी लेफ्टी आहे." आणि मी उंदीर स्वतःच धरून त्याचं काम चटकन करून दिलं.

पुढचे प्रश्न पडले नाहीत, आवर्त उठला नाही आणि महत्वाचं म्हणजे स्वनियंत्रणाची जागा पुन्हा मूलभूत गरजांनी घेतली. तात्पर्य काय तर कसलातरी साक्षात्कार होण्यासाठी गरजांवर नियंत्रण ठेवल्यावर मला हा साक्षात्कार झाला, की गरजांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा गरजांचं नियमन जास्त महत्वाचं आहे.

10/17/2010

एक आहे स्मायली...

गेल्या काही दिवसांपासून चॅट अगदी म्हणजे अगदीच कमी झालं. त्यामुळे एरव्ही दिवसात सहज केली जाणारी स्मायलींची उधळण कमी झाली. गुगल बंद ठेवलेलं असल्याने इतर कम्युनिटी साईट्सवरचा वावर थोडा वाढला आणि विविध प्रकारचे स्मायली दिसले. मग काल अशीच वेगवेगळ्या प्रकारच्या स्मायलींची चर्चा आणि तुलना करताना ही पोस्ट लिहायची कल्पना माऊताईनं दिली. मग फक्त 'स्मायली' ह्या शब्दावरून जे जे सुचलं, ते ते लिहायचा प्रयत्न केला. :)

स्मायली म्हणजे मराठीत भाषांतर केलं तर 'हसरा'. पण इंटरनेट ऊर्फ आंतरजालाने 'स्मायली'ला स्माईल शिवाय बरंच काही काही करायला लावलं. 'स्मायली' हे विशेषण न राहता विशेषनाम झालं. आणि त्याला अनेकानेक रूपांमध्ये पेश केलं जाऊन त्याच्या विशेषणपूर्ण नावामागे अनेकानेक विशेषणं जोडली गेली. स्मायली कधी चिडवणारा, तर कधी चिडणारा, कधी हसवणारा, तर कधी हसणारा आणि कधी कधी तर चक्क 'रडका' स्मायली (ऑक्झिमोरॉन म्हणतात इंग्रजीत अशा शब्दांना, मराठीत विरोधाभासी शब्द असं भारदस्त नाव सुचतंय मला)! जगभरातल्या इंटरनेट चॅट्स चा आधारस्तंभ – स्मायली!

नेटावर थोडी शोधाशोध केली तर कळलं, पहिला स्मायली फिल्मवर दिसला तो १९४८ साली चक्क 'इंगमार बर्गमन' ह्या गाजलेल्या स्वीडीश चित्रपट दिग्दर्शकाच्या 'हॅमस्टाड' ह्या सिनेमात. पण स्मायलीला आजच्या रूपात पहिल्यांदा डिझाईन करण्याचा मान 'हार्वे बॉल' ह्या माणसाला दिला जातो, त्यानं १९६३ साली हे डिझाईन बनवलं. वॉलमार्ट ह्या मोठ्या सुपरमार्केट चेनचं स्मायली हे कित्येक वर्षं ओळखचिन्ह होतं. पण स्मायली हे नाव आणि लोगो मात्र फ्रेंच पत्रकार फ्रँकलिन लुफ्रानिकडे आहे, ज्यानं पहिल्यांदा पेपरामध्ये चांगल्या बातम्यांसाठी हे चिन्ह वापरायला सुरूवात केली. पण ह्या सगळ्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉपीराईट इश्यूज आहेत. पण ह्या सगळ्या गोंधळापासून अलिप्त 'स्मायली' मात्र आपल्या जन्मदात्यांच्या हक्कावरून चाललेल्या भांडणांमध्ये न पडता, लोकांची भांडणं जमलीच तर सोडवण्याचं काम करतो.

एकतर स्मायली हे बायकी नाव आणि त्यात कुणीही त्याला कुठलीही क्रिया करायला लावावी. बिचारा दिवसाचे चोवीस तास कुठल्या न कुठल्या प्रमाणवेळेमध्ये कुणा न कुणाकडून एक्स्प्लॉईट केला जातो. होय, एक्स्प्लॉईट! शोषण होतं त्याचं. कारण वापर हा शब्द तेव्हा वापरतात जेव्हा तो प्रमाणामध्ये होतो. पण स्मायली काय, फुकट आहे मग केलं जातं शोषण! माझ्या मते शोषण ही वस्तू अथवा सेवा फुकटात मिळण्यामुळे निर्माण होत असलेली मानसिक वृत्ती आहे. आमचा एक साहेब म्हणतो, "काही लोकांची, 'मुफ्त में मिलेगा, तो फिनाईल भी पी लेगा' ही वृत्ती असते." तद्वतच ही प्रमाणाबाहेर स्मायली वापरण्याची माणसांची वृत्ती. ज्यानं स्मायलीचं शोषण चालू आहे.

स्मायली हा माझ्यामते जगातला एकमेव असा प्राणी असेल, जो जन्मतः हसरा असेल आणि नंतर त्याला जगानं रडवलं. आणि नुसतं रडवलंच नाही, तर जीभ काढून दाखवायला लावली, तर कधी दात काढून हसायला लावलं, कधी नुसतंच तोंड पाडायला लावलं तर कधी मौन पाळायला, कधी रागाने लाल व्हायला तर कधी गॉगल चढवून स्टाईल मारायला न जाणे त्याला काय काय करायला लावलं लोकांनी. आणि अजूनही अगदी आत्ता ह्या क्षणी देखील तो बापुडा कुणाच्या तरी बोटांच्या इशार्‍यावर विविध हावभाव करून दाखवत असेल आणि कुणाला तरी रिझवत, रडवत, चिडवत किंवा हसवत असेल. तो लोकांच्या बोटांवर नाचतो, पण वृत्तीनं मात्र अगदीच बोटचेपा आहे.

स्मायली एव्हढासा दिसतो, पण त्याची क्षमता प्रचंड आहे. कधीकधी १० ओळी लिहूनपण जो भाव व्यक्त होणार नाही, तो एक स्मायली व्यक्त करून जातो. त्यामुळेच मूलतः आळशी असलेली मानवी जमात स्मायलीच्या मागे एव्हढी दिवानी आहे. दोन ते तीन कळा दाबून मणभर भावना व्यक्त करण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्मायली. बोळकं असलेल्या लहान बाळापासून ते बोळकं झालेल्या आजीआजोबांपर्यंत सर्वांपर्यंत योग्य भावना योग्य रितीने पोचवू शकणारा एकमेव विश्वासू व्यक्ती म्हणजे स्मायली. कुठल्याही भाषेची आडकाठी नाही की कुठल्याही भाषेच्या काठीची गरज नाही असा स्वतःवर नं भुंकता देखील 'स्वयंभू' असणारा म्हणजे स्मायली. स्मायलीला फक्त चेहराच असतो (काही काही ठिकाणी पूर्ण शरीर असलेले द्विमिती स्मायलीही असतात, पण एकमितीवाल्या स्मायलीची मजा और आहे), पण त्यामुळे त्याच्या भावना व्यक्त करण्याला मर्यादा येण्याऐवजी त्यातली गंमत अजूनच वाढते. नुसती चॅटविंडोच कशाला, कागदाच्या कपट्यावर एक छोटासा स्मायली काढून कुणाला दिला तरी समोरच्याला भावना लगेच पोचतात. स्मायली खर्‍या अर्थाने वैश्विक आहे.

त्याला स्वतःचा असा एकच भाव आहे. एक स्मितहास्य, बस. त्यामुळे त्याचं चिन्ह तेच आहे. एअर इंडियाच्या महाराजाप्रमाणे तो कायम हसतमुख असतो. मग लोक त्याच्याकडून वाट्टेल ते करवतात. कधी कधी विचार येतो, की अशी अनेकानेक चांगली माणसं, जी फक्त दुसर्‍यांना दुःख होऊ नये म्हणून आपल्या भावभावना लपवून ठेवून दुसर्‍याला चांगलं वाटेल असं वर्तन करतात. किंवा समाजासाठी किंवा देशासाठी संपूर्ण आयुष्य देऊन फक्त इतरांच्यासाठी जगणारे लोक. ही सगळी माणसं म्हणजे एकप्रकारचे स्मायलीच असतात. दुसर्‍यांच्या भावभावनांसाठी स्वतःचं सगळं उधळून टाकणारी माणसं.

स्मायली हा खरं बघायला गेलं, तर एक महान अभिनेता आहे. कुठलीही भावना चटकन आणि तेही फक्त मुद्राभिनयाने व्यक्त करू शकणं हा त्याचा हातखंडा. पण कधी त्याची कथा लिहायची पाळी आली, तर ती शोकांतिकाच असेल असं का कुणास ठाऊक वाटतं. बालबुद्धीला अतितीव्रताण देऊन विशाल कल्पनाविस्तार करता माझ्यासमोर आत्ता 'एका तुफानाला कुणी चॅटविंडो देता का चॅटविंडो!" म्हणत भरकटणारा स्मायली येतोय. पण फरक इतकाच आहे की आबालवृद्धांपासून सगळ्यांना आवडणारा आणि आपल्याच वयाचा वाटणारा स्मायली स्वतः मात्र चिरतरूण आहे, चिरंजीव आहे. पण तो अश्वत्थाम्यासारखा भळभळती जखम घेऊन तेल मागत फिरत नाहीये, उलट तो जमलंच तर लोकांच्या जखमांवर फुंकर घालत फिरतोय.

10/14/2010

कोन्त्रोल (Kontroll)

सध्याचा सर्वांत जास्त चर्चिला जाणारा आणि खरोखरच कौतुकास्पद असा विषय म्हणजे 'चिले'च्या खाणकामगारांची प्रेरणादायक कहाणी. त्यांचे जमिनीखालचे ७० दिवस आणि सगळ्या जगाने एकत्र केलेल्या त्यांच्या सुटकेच्या प्रार्थना आणि शेवटी सुटका. जमिनीच्या ७०० मीटर खाली एका छोट्याशा बंदिस्त जागेत पहिले दोनेक आठवडे ही तेहतीस माणसं जगाशी कुठल्याही संपर्काशिवाय होती. जगानं त्यांच्या जिवंत असण्याची आशा केव्हाच सोडलेली होती. त्यांच्या बाजूनं तीन गोष्टी होत्या, एक म्हणजे प्रचंड मानसिक शक्ती, दोन म्हणजे नशीब आणि तीन म्हणजे त्यांचं एकत्र असणं. पण ज्या छोट्याशा कॅप्सुलमधून त्यांची सुटका करण्यात आली, ती जेमतेम एकजणच मावेल एव्हढी होती. आणि तब्बल १० मिनिटं ती अंधार्‍या बंदिस्त जागेतून प्रवास करणार होती. अशा प्रवासाचा विचार माझ्या मनाला शिवताच क्षणभर माझ्या अंगावर शहारा आला. ह्या भीतीला 'क्लॉस्ट्रोफोबिया' म्हणतात. म्हणजेच बंदिस्त जागेची भीती. खाणकामगारांच्या ह्या गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या कहाणीमध्ये मी बरेचदा ह्याच शब्दाचा उल्लेख ऐकला आणि खाणीत काम केल्याने त्या सगळ्याच कामगारांवर ह्या 'फोबिया'चा परिणाम कमी कसा होईल ह्याच्या चर्चा सुरू होत्या. पण ह्या शेवटच्या प्रवासाने मात्र माझ्यातला क्लॉस्ट्रोफोबिया जागा केला. आणि जेव्हा जेव्हा क्लॉस्ट्रोफोबिया जागा होतो, तेव्हा तेव्हा मला 'कोन्त्रोल' आठवतो.

'कोन्त्रोल' हा २००३ सालचा एक हंगेरियन सिनेमा आहे. आणि सिनेमाचं कथानक बर्‍याच अंशी क्लॉस्ट्रोफोबियाभोवती फिरतं. सिनेमाचा नायक 'बुलचू' ची ही कहाणी आहे. हंगेरीतल्या बुडापेस्टची अंडरग्राऊंड मेट्रो ही युरोपातल्या जुन्या मेट्रोंपैकी एक आहे. त्याच मेट्रोच्या जाळ्यामध्ये संपूर्ण सिनेमा फिरतो. सुरूवातीलाच सिनेमाचा दिग्दर्शक स्पष्ट करतो की ह्यामध्ये दाखवलेली 'तिकीट तपासनीसां'ची पात्र ही पूर्णतया काल्पनिक आहेत आणि असं काहीही प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही.

हंगेरियन भाषेत 'कोन्त्रोल' म्हणजे 'तिकीट तपासनीस'. सिनेमाचा नायक 'बुलचू' हा एक तिकीट तपासनीस असतो. सिनेमात सुरूवातीलाच मेट्रोत वाढत असलेल्या 'सकृद्दर्शनी आत्महत्यांमागे' एक अज्ञात 'खुनी' असल्याचं जाणवतं. सुरूवातीच्या भागात तिकीट तपासनीसांची आणि त्यांच्या गटांची ओळख होते. त्यांच्या गटांमध्ये चांगल्या कामगिरीबद्दल मिळाणार्‍या खास सोयींसाठी चाललेली स्पर्धा आणि त्यातून उद्भवणारे हेवेदावे ह्यानं सिनेमात हळूहळू रंगत येत जाते. 'बुलचू' च्या गटात विचित्र पात्रांचा भरणा असतो. एकाला 'नार्कोलेप्सी' असते. म्हणजे तो चालताना, बोलताना अचानक कुठल्याही क्षणी झोपू शकतो. हा खराखुरा रोग आहे. माणूस मेल्यागत कोसळतो. एकजण नुकताच भरती झालाय आणि त्याला कुठलाही प्रवासी बिलकुल भाव देत नाही. काही ठराविक, नावाजलेले बिनतिकीटाचे मस्तीखोर प्रवासी आणि त्यांची व बुलचूच्या गटाची स्पर्धा हे सगळं दाखवत दाखवत हळूहळू बुलचूवर लक्ष केंद्रित होऊ लागतं. सुरूवातीपासूनच बुलचूबद्दलचं कुतूहल जागृत होत राहतं. तो जवळपास दिवसरात्र अंडरग्राऊंडमध्येच राहत असल्यासारखं जाणवतं. त्याला ट्रेनमध्ये भेटलेली एक 'फॅन्सी ड्रेस' घातलेली मुलगी त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी असल्यागत वाटतं. किंवा तो तिच्या प्रेमात पडल्यागत. ती कधीच तिकीट घेत नसते. एक सुटाबूटातला माणूस, ज्याला बुलचू टाळायचा प्रयत्न करतो, बुलचूला त्याच्या परत येण्याबद्दल विचारतो. तुझी वाट पाहतोय म्हणून निघून जातो. बुलचू जवळपास अख्खी रात्र अंडरग्राऊंडच घालवत असतो. रात्री तो मेट्रोच्या एका वृद्ध ड्रायव्हरला भेटायला जात असतो, जो त्याचा मित्र असतो. एके रात्री त्याला कळतं की ती मुलगी जिच्या तो प्रेमात आहे, ती त्याच मेट्रो ड्रायव्हरची मुलगी आहे, त्यामुळे ती तिकीट काढत नाही.

बुलचूचं एका अंधार्‍या खड्ड्यात अडकून पडल्याची स्वप्न पाहणं, कायम झोप पूर्ण न झाल्यासारखं दिसणं ह्यानं बुलचूबद्दलचं गूढ वाढत जातं. बुलचूला त्याचा प्रतिस्पर्धी (सध्याच्या सर्वोत्तम गटाचा प्रमुख) चिडवतो आणि 'रेलिंग' चं चॅलेंज देतो. बुलचू आधी खूप नाही सांगतो, पण शेवटी तयार होतो. बुलचूच्या नवोदित साथीदाराप्रमाणेच आपल्यालाही 'रेलिंग' माहित नाही. रेलिंग म्हणजे रात्रीची शेवटून दुसरी ट्रेन निघाली की एका विवक्षित स्टेशनावर त्या ट्रेनच्या पाठोपाठ ट्रॅकवर प्रतिस्पर्ध्यांनी उड्या मारायच्या आणि ट्रेनच्या मागे अंधार्‍या बोगद्यांतून जिथे कुठले कुठले धूर, धूळ आणि धातूंचे कण असू शकतात, धावत धावत जायचं. मागून दुसरी ट्रेन येतेच आहे. त्या ट्रेननं गाठायच्या आत पुढच्या स्टॉपवर प्लॅटफॉर्मवर चढायचं. नाही जमलं तर...

थरारक सीनच्या शेवटी बुलचू वर येतो आणि त्याचा प्रतिस्पर्धी पडण्याच्या मार्गाला असतो. ट्रेन अगदी जवळ आलीय, पण बुलचू त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या हाताला धरून अखेरच्या क्षणी त्याला वर ओढतो. पण मग आपल्याला 'तो' पुन्हा दिसतो. माणसांना ट्रेनसमोर 'ढकलणारा'. मग पुन्हा बुलचूची प्लॅटाफॉर्मवरच होत असलेली सकाळ आपल्याला दिसते. आपल्याला पुन्हा एकदा बिनातिकीटबहाद्दर 'बूट्सी' दिसतो. जो तपासनीस जवळ आल्यावर त्याच्या डोळ्यांत फवारे मारून पळत असतो आणि नेहमीच चपळतेनं सगळ्यांना गुंगारा देत असतो. पण आता मात्र बुलचू त्याला धरण्याचा पूर्ण निर्धार करतो. एक थरारक पाठलाग सुरू होतो. शेवटी बुलचू आणि बूट्सी एका रिक्त प्लॅटफॉर्मवर पोचतात आणि आता बुलचू त्याला धरणार एव्हढ्यात... 'तो' बूट्सीला धक्का देतो आणि ट्रॅकवरून धडधडत ट्रेन येते. बुलचू थिजून गेलेला असतो. बुलचूकडे 'त्या'ची पाठ असते. तो वळायला लागतो, पण बुलचू डोळे मिटून घेतो. जेणेकरून त्यानं त्याला काही करू नये. कारण त्याच्या कुकर्माचा बुलचू हा एकमेव साक्षीदार असतो. बुलचूचे डोळे मिटलेलेच असतात आणि तो बुलचूसमोरून निघून जातो.

प्लॅटफॉर्म कॅमेरांवरून एकमेव साक्षीदार बुलचूला चौकशीसाठी बोलावलं जातं. पण बुलचू काहीच न बघितल्याचं सांगतो. कुठलाही कॅमेरा 'त्या'ला टिपण्यात अयशस्वी ठरल्याचं कळतं. पण अधिकारी बुलचूचं येणं आणि बूट्सीचं मरण अशी टेप बनवून बुलचूला फसवण्याची धमकी देतात. ह्यावर बुलचू काहीच बोलत नाही. बुलचू कधीच अंडरग्राऊंडमधून बाहेर पडत नाही, तो रात्रीदेखील कुठेतरी आतमध्येच झोपतो, त्यामुळे बुलचूला अंडरग्राऊंड आणि तिथल्या सर्व कॅमेर्‍यांची इत्थंभूत बातमी आहे ह्या बळावर सहज बुलचूला अपराधी ठरवणं शक्य असल्याचं दिसतं. बुलचूची नोकरी अखेर सुटते.

पण बुलचूला अंडरग्राऊंड जगातून बाहेर पडायचं नाहीये. त्या रात्री मेट्रोची कसलीशी पार्टी आहे. संगीत जोराने वाजतंय. लोक थिरकताहेत. पण बुलचू मात्र गोंधळलाय. आणि अचानक त्याला 'तो' दिसतो. प्रथम बुलचू त्याला शोधायचा प्रयत्न करतो, पण मग 'तो'च बुलचूच्या मागे लागतो. बुलचू जीव वाचवत पळतो. आणि बुलचूला प्लॅटफॉर्मवर उतरावं लागतं. मागून ट्रेन येतेय. बुलचू पुन्हा 'रेलिंग' करतोय. ह्यावेळेस दोन मृत्यू मागे आहेत. पण बुलचू वेळेत प्लॅटफॉर्मवर चढतो आणि मागून धडधडत ट्रेन निघून जाते. मागे कुणीही नसतं. बुलचू 'मुक्त' झालाय.

त्याला प्रचंड थकवा जाणवतो आणि 'ती'च पुन्हा वेगळ्या कपड्यांमध्ये पार्टीसाठी आलेली त्याला भेटते. आता त्याचं मनही तयार झालंय. ती त्याला हाताला धरून बाहेरच्या जगात घेऊन जाणार्‍या सरकत्या जिन्यांकडे घेऊन जाते. वरून येत असलेल्या प्रकाशाच्या दिशेनं बुलचू निघतो. सगळेच सरकते जिने वरच्या दिशेनं जात असतात.

ह्या सगळ्या कथेचे अनेकानेक अर्थ निघतात. छोटे छोटे सुरेख सिम्बॉलिझम सिनेमात आहेत, जसं त्या मुलीचं फॅन्सी ड्रेस घालून लहान मुलीसारखं (म्हणजेच मुक्त) असणं आणि म्हणजेच बुलचूच्या अगदी विरूद्ध. बुलचूचं पात्र इतकं गुंतागुंतीचं वाटतं पण ते तितकंच सरळ आहे. तुकड्या तुकड्यांतून आणि त्याच्या सूटबूट वाल्याशी संवादातून बाहेरच्या जगातल्या स्पर्धेला कंटाळलेला (तिथल्या बंदिस्त वातावरणाला घाबरलेला) बुलचू अंडरग्राऊंडच्या बंदिस्त जागेचा आधार घेतो. आणि ह्या बंदिस्त जागेतून त्याला बाहेर पडायचं नाहीये. त्याच्या साथीदारांची पात्र, रेलिंगचा पहिला थरारक सीन आणि बूट्सीचा पहिला अयशस्वी आणि दुसरा यशस्वी थरारक पाठलाग आणि त्यावेळचं संगीत खुमारी वाढवतच जातं. 'तो' हे पात्र तर जबराच घेतलंय.

सिनेमातला हायपॉईंट म्हणजे शेवटचा पाठलाग आहे. इथे एक छोटासा क्ल्यू मिळतो, ज्याने आपल्याला 'बुलचू' आणि 'तो' ह्यांच्याबद्दलची रहस्य उलगडतात. पण तो क्ल्यू तसाच समजून घेतला तर. जर त्या क्ल्यूवर विचारच नाही केला, तरीदेखील कोन्त्रोल एक प्रचंड मनोरंजक, थरारक सिनेमा आहे. पण जर बुलचूची मानसिक आंदोलनं आणि त्याची स्थिती आणि शेवटचा क्ल्यू ह्यांच्यासकट जर सिनेमा पाहिला तर मात्र एक अप्रतिम कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळतं. हा सिनेमा त्यावर्षीच्या 'बेस्ट मूव्ही इन फॉरेन लॅन्ग्वेज' कॅटेगरीमध्ये ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता.

10/10/2010

घड्याळ

तो लोकलट्रेनच्या फलाटावरच्या एका बाकावर बसला होता. संध्याकाळचे पाच वाजत असतील. त्यानं हलकेच एक कटाक्ष मनगटावरच्या घड्याळाकडे टाकला.
त्या घड्याळाच्या काचेवरून त्यानं हात फिरवला.
-------------------------------------------------------------------------------
"कसं वाटलं घड्याळ?" ती त्याच्या हातावर घड्याळ बांधत विचारत होती.
"अगं एव्हढं महागातलं कशाला आणायचं गं?" तो सोनेरी घड्याळाच्या काचेवरून प्रेमानं हात फिरवत म्हणाला.
"तू पण इतका अनरोमॅन्टिक कसा रे? आपल्या भेटीच्या पहिल्या वर्षपूर्तीची मी तुला भेट देतेय आणि तू किंमतीचा विचार करतोयस!"
"अगं हो गं! पण संसारपण करायचाय ना सुरू आता!"
"अरे राजा, पण अजून तू माझ्या घरी कुठे आलायस माझा हात मागायला? अजून लग्नही झालं नाहीये. अजून नवरोबापण झाला नाहीयेस. आणि इतक्यातच संसाराचं नियोजन सुरू!" ती नेहमीसारखी खिदळत म्हणाली.
"हस. हस. नेहमीच हसतेस माझ्यावर." तो तोंड पाडत म्हणाला.तशी तिनं हसणं कमी केलं.
"पण गंमत सांगू! हसतेस तेव्हा एकदम गोड दिसतेस!" आता तो हसायला लागला.
"तू पण ना...." तिनं हातातल्या पर्सनं त्याला खोटं खोटं मारलं. आणि हसत हसतच त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. "आता लवकर घरी येऊन माझा हात माग."
"हातमाग? तो कशाला हवाय तुला. आता तर यंत्रमागाचा जमाना आहे!"
"तुला सिरियसनेस नावाचा प्रकारच नाही का रे?" ती थोडीशी खट्टू होत म्हणाली.
"अगं हो गं! सारखी एकच रट लावतेस म्हणून असं म्हटलं. येईन मी ह्या रविवारी नक्की. मलाही घरी बोलायचंय ना गं!"
"कधी बोलणारेस घरी... आज?" ती बोलतच होती. बराच वेळ.
संध्याकाळचे साडेचार वाजत आले होते. दोघेही आज ऑफिसात सुट्ट्या टाकून दिवसभर भेटीची पहिली वर्षपूर्ती साजरी करत होते. पण नेहमीच्या वेळेसच घरी पोहोचणं भाग होतं.
चौपाटीवरून निघून दोघे स्टेशनाकडे आले. एव्हढ्यात स्टेशनात ट्रेन आली. दोघेही धावतपळत ट्रेनकडे निघाले. ती स्त्रियांच्या फर्स्ट क्लासमध्ये चढली आणि हा पुरूषांच्या फर्स्टक्लासमध्ये चढायला धडपड करत होता. गर्दीला रेटत होता. ती मधल्या जाळीतून हा डब्यात चढला की नाही ते पाहत होती. मोठं स्टेशन असल्यानं ट्रेन थोडी जास्त वेळ थांबली होती. पण गर्दीचा रेटा कमी होत नव्हता. तो नेहमीचा असूनही त्याला आज गाडी थांबल्यावर चढत असल्यानं त्रास होत होता. तो कसाबसा मार्ग काढत आत शिरला. आणि जाळीतून तिनं त्याला पाहून सुटकेचा निश्वास टाकला. पण एकदम त्याच्या लक्षात आलं की त्याचं घड्याळ त्याच्या हातावर नाहीये. तिनं आत्ताच दिलेलं घड्याळ! बाहेरच पडलं असावं बहुदा, म्हणून तो पुन्हा गर्दीच्या विरूद्ध जोर लावू लागला. सगळे त्याच्या नावानं शिमगा करू लागले. तिनंही गलका ऐकून पाहिलं, तर हा डब्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता. शेवटी एकदाचा धक्के देऊन तो बाहेर पडला आणि पडलाच. फलाटावरचे दोन-चार लोक त्याच्याजवळ काय झालं म्हणून बघायला आले. त्यानं विलक्षण व्याकुळतेनं सभोवताली पाहिलं. आणि एकदम त्या चमचमणार्‍या गोष्टीवर त्याची नजर स्थिरावली. ट्रेन सुरू झाली. त्यानं चटकन ते घड्याळ उचललं. तेव्हढ्यात कुणाचातरी पाय त्याच्या हातावर पडला. तो वेगानं उठला आणि ट्रेनकडे धावला. पण आता डब्यातले लोक त्याला चढू देईनात. त्याला मगाशी पडल्यामुळे पायाला जबर मार लागल्याचं आत्ता जाणवू लागलं आणि तो धावता धावता थांबला. स्त्रियांच्या डब्यात डोकावून पाहून ती दिसते का पाहण्याचा एक फोल प्रयत्न त्यानं केला. तो जिथे उभा होता तिथेच मट्कन बसला. दोन क्षण त्याला काही सुचेना. तो ट्रेनकडे पाहत होता. ट्रेन धडधडत निघून गेली. त्यानं घड्याळाकडे पाहिलं. त्याच्या काचेवर एक चरा पडला होता.
त्याला एकदम आपल्या थरथरणार्‍या मोबाईलची जाणीव झाली. 'अरे हो, तिला फोन करू शकत होतो की आपण!' त्याला स्वतःच्याच मूर्खपणाचं हसू आलं. तिचाच फोन होता. त्यानं हिरवं बटण दाबलं आणि कानाला फोन लावला.
"हॅलो" तो म्हणाला
"हॅलो..." पुढे फक्त एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला.
-------------------------------------------------------------------------------
स्टेशनात ट्रेन आली. तो चटकन उठला आणि नेहमीच्या सराईतपणानंच भर गर्दीतही तो सहज चढला आणि डब्याच्या मधोमध जाऊन उभा राहिला. लोक चढत उतरत होते. तो निश्चल उभा होता. ट्रेन निघाली. ट्रेन 'ती' विवक्षित जागा पार करत होती. त्यानं गर्दीतही आपला हात वर घेतला. त्यावरच्या घड्याळाकडे त्यानं प्रेमानं पाहिलं.
"काका, मी रोज ह्याच गाडीत असतो आणि रोज तुम्हाला बघतो. तुम्ही नेमक्या ह्याच ठिकाणी घड्याळात बघता. अगदी रोज, न चुकता" गाडीतला शेजारी उभा असलेला एक तरूण त्याला म्हणाला.
तो त्याच्याकडे पाहून फक्त हसला. त्यानं पुन्हा घड्याळाकडे पाहिलं. घड्याळ त्या काचेवरच्या चर्‍यातून जणू त्याच्याकडे पाहून हसत होतं. ते दोघेही तिथेच थांबले होते. गेली कित्येक वर्षं!

10/07/2010

बृहस्पती, नदी आणि आपण

मी लहान होतो तेव्हा (हे मी कितव्यांदा लिहितोय ते आठवत नाहीये) मी एक छानशी गोष्ट ऐकली होती.
एकदा एका गावामध्ये सभा सुरू असते. सभा गावाच्या शाळेशेजारच्या मैदानावर सुरू असते. सभेचा विषय हा गावाच्या विकासाशी आणि भविष्याशी निगडीत असा महत्वाचा असतो. नुसतेच समाजधुरिण नाही, तर गावातल्या प्रत्येकानेच आवर्जून ऐकले पाहिजेत असे तज्ज्ञ, मान्यवर वक्ते सभेला आलेले असतात. सभा शांततेत आणि चांगल्या प्रकारे सुरू असते. एक महत्वाचा वक्ता उठून भाषणाला उभा राहतो. त्याचं भाषण सुरू असतानाच शाळेची मधली सुट्टी होते. मुलं बाहेर येऊन शाळेच्या अंगणात खेळ खेळायला लागतात. थोडासा गोंधळ घालायला लागतात. त्यामुळे सभेतल्या श्रोत्यांचं लक्ष तिकडे जातं आणि बरेचसे श्रोते मुलांच्या लीला पाहण्यात मग्न होतात. थोड्याच वेळात वक्त्याच्या हे लक्षात येतं. त्याचं भाषण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आलेलं असतं, पण हळूहळू जवळपास ८०% श्रोत्यांचं लक्ष विचलित झालेलं असतं. सभेचा नूर बघून एकदम वक्ता म्हणतो.
"आता मी एक गोष्ट सांगतो. तुमच्यापैकी कुणीच ही गोष्ट कधीच ऐकली नसेल."
गोष्ट शब्द ऐकताच अनेक श्रोत्यांचं लक्ष पुन्हा वक्त्याकडे जातं. वक्ता पुढे सुरू करतो.
"एकदा काय होतं. देवांचे गुरू बृहस्पती, एक चिमणी आणि एक मासा असे तिघेजण अरण्यामार्गे इंद्राकडे निघालेले असतात. रस्ता काट्याकुट्यांचा असतो. मजल दरमजल करत ते तिघे पुढे पुढे जात असतात."
आता हळूहळू सगळ्या श्रोत्यांचं लक्ष पुन्हा वक्त्याकडे वळतं.
"अचानक त्यांना रस्त्यात खूप मोठी नदी लागते. आता आली का पंचाईत. नदी पार कशी करायची? चिमणी उडते आणि थेट नदीच्या पलिकडे जाऊन पोचते. मासा पाण्यात झेपावतो आणि पोहत पोहत पलिकडे जाऊन पोचतो. आता ते दोघेजण बृहस्पतीकडे बघू लागतात."
श्रोते गोष्टीत पूर्णपणे शिरलेले असतात आणि ह्याच क्षणी वक्ता आपल्या भाषणातला महत्वाचा मुद्दा मांडून पुढच्या भाषणाला सुरूवात करतो.
लोक एकदम भांबावतात. ते एकदम गोंधळ सुरू करतात. वक्त्याला ही कल्पना असतेच, त्यामुळे तो लगेच थांबून काय झालं म्हणून विचारतो. लोक म्हणतात, "बृहस्पतीचं पुढे काय झालं सांगा?"
वक्ता म्हणतो, "जेव्हा माणसं महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फुटकळ गोष्टींकडेच लक्ष देण्यात किंवा फुटकळ गोष्टी करण्यात वेळ घालवणं बंद करतील, तेव्हा बृहस्पती आपोआप नदीपार पोहोचेल."
आता हेच बघा ना, आजच बातमी वाचली, गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा उभारणार आहेत. मोदीभाईंना मी मानतो, एक अतिशय उत्तम प्रशासक आहेत ते. पण हा निर्णय वाचून मला धक्काच बसला. इकडे आपल्याकडे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचाय. सगळे पुतळा पुतळा खेळणार आहेत. करोडो रुपयांचा चुराडा करायचा, तितकेच सगळ्यांनी घशात घालायचे आणि बांधायचे काय, तर पुतळे? आणि जास्त पुतळे पुतळे करू नका राव, तिकडे मायावती उत्तर प्रदेशात स्वतःचा एखादा भव्य पुतळा बांधेल. पूल, महामार्ग, धरणं वगैरे महत्वाच्या गोष्टी बांधता येतात, पण आपण फुटकळ गोष्टी बांधायच्या - पुतळे!
भारतीय वंशाच्या लोकांना जागतिक स्तरावर सन्मान मिळतात, आपलं पब्लिक त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जाणून बिणून घेत नाही, ते लोक भारतीय वंशाचे आहेत असं सांगत चार दिवस मिशीला कोकम लावून तूप तूप म्हणून सांगत फिरतात. (आणि माझ्यासारखे ते भारतीय नाहीतच हे सगळ्या आजूबाजूच्यांना ओरडून समजावून सांगण्यात मग्न असतात.)
गेल्या निवडणुकीवेळी वाचलेला माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग. प्रियांका गांधी-वड्रा आपल्या मुलांना घेऊन कुठल्यातरी गावात प्रचाराला गेली होती. मुलांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं होतं. मुलं पांढरे कपडे घालून सगळ्यांना नमस्कार वगैरे करत होते. गावाच्या मुखियानं मुलांकडे बघून म्हटलं, "ये इंदिराजी की चौथी पिढी है। गुण तो दिखायी दे रहें हैं।"
आवरा. अरे चौथी पिढी म्हणून काय काहीही! आणि हे छापायचं? च्यायला इथे सिग्नलवरचं पोरही नमस्कार करून भीक मागतं, तिथे गुण नाही दिसत का?
संजय दत्त कोर्टाच्या फेर्‍या मारत होता, तेव्हा न्यूज चॅनेलवर त्याने आज त्याचा लकी निळा शर्ट घातलाय, आज त्याने काळा शर्ट घातलाय, आज त्याच्या हातात अंगठी होती हे सगळं दाखवत होते. च्यायला, मला तर डाऊट आहे बर्‍याच जणांना त्याच्यावर कसली केस चाललीय ते माहित नसेल. माझंच बघा, मला तो निळा शर्ट घालून हवालदाराला सलाम करत आत जाणारा संजय दत्त आठवतोय, पण त्याचं एग्झॅक्ट निकालपत्र आठवत नाहीये.
अबू सालेम क्लिन शेव्ह करून कोर्टात कसा चिकना दिसत होता, राहुल गांधीनं दाढी बाळगली, मग काढली मग पुन्हा बाळगली. आयला राहुल गांधीनं भाषणात काहीही चुका केल्या त्या दिसत नाहीत. आपलं पब्लिक म्हणजे काय विचारू नका!
आपल्याला २ ऑक्टोबरला गांधी आठवतात लालबहादूर शास्त्री आठवत नाहीत, लोकसभेत सोनिया चालते सावरकरांचं तैलचित्र चालत नाही, लालू लक्षात राहतो लोहिया लक्षात राहत नाहीत, निवडणुकांच्या दिवशी सुट्टी दिसते मतदान दिसत नाही, गुजरात दंगली लक्षात राहतात गोध्रा आणि दंगलीनंतरचा गुजरात लक्षात राहत नाही, रामदासांची जात दिसते (च्यायला इथेपण आणलं का मी) रामदास दिसत नाहीत, (रामदासांवरून आठवले) रामदास आठवले दिसतो बाबासाहेब आठवत नाहीत, आमच्या भागात संजय निरुपम दिसतो पण बिनखड्ड्याचा रस्ता दिसत नाही, अस्लम शेख आणि निरूपमचे बॅनर दिसतात झाडं दिसत नाहीत, टीव्हीवर जाहिराती दिसतात सिरियल्स दिसत नाहीत, सिरियल्समध्ये चकचकीत कपड्यातले स्त्रीपुरूष दिसतात स्टोरी दिसत नाही, आयपीएल घोटाळ्यात ललित मोदी लक्षात राहतो शरद पवार लक्षात राहत नाहीत ('आयपीएल घोटाळ्यात' असं मुद्दाम लिहिलं नाहीतर शरद पवार कसे लक्षात राहणार नाहीत, एकवेळ सावरकरांना विसरतील लोक पण शरद पवारांना शक्यच नाही), आयपीएल दिसते चीअरलीडर्स दिसत नाहीत, दबंगमध्ये पडदाभर सलमान दिसतो सोनाक्षी दिसत नाही, गोलमाल-३ च्या प्रोमोमध्ये जास्तवेळ प्रभुजी दिसत नाहीत, कपुच्चिनो दिसतं सकस गरम दूध दिसत नाही, जेवताना पिझ्झा दिसतो सलाड दिसत नाही.
छ्या! बघा ह्या पोस्टमध्येसुद्धा बृहस्पती पार होता होता राहिले!

10/03/2010

चेहरा

काल ट्रामच्या स्टॉपवर ट्रामची वाट पाहत उभा होतो. अचानक शेजारी कुणीतरी इंग्रजीत बोलल्यासारखं वाटलं. मी एकदम चमकून पाहिलं. एका आफ्रिकन(काळा) माणसाशी कुणीतरी बोलत होतं. मी थोडं वाकून पाहिलं, तर एक भारतीय उपखंडातलासा वाटणारा माणूस होता. तो चेहर्‍यावरून त्रासलेला वाटत होता. मला वाटलं, च्यायला दारूबिरू पिऊन आत्ता भरदुपारी धिंगाणे घालणार की काय! पण त्यांचं बोलणं वेगळ्याच विषयावर चालू असल्याचं माझ्या लगेच लक्षात आलं.

"आय कॅन स्पीक इंग्लिश!" आफ्रिकन.

"गुड! आफ्टर ए लॉन्ग टाईम आय फाऊंड समवन स्पीकिंग इंग्लिश!" आशियाई.

मला त्याचे उच्चार पंजाब किंवा पाकिस्तान बाजूचे वाटत होते. चेहरेपट्टीवरून तो त्याच बाजूचा दिसत होता. पण मी मुद्दामच तिकडे लक्ष नसल्याचं दर्शवत उभा होतो. त्याची नजर माझ्यावर पडू नये किंवा पडलीच तर मी इंग्लिश समजणारा वाटू नये ह्याची काळजी घेत मी संभाषणाकडे लक्ष देत होतो (ऑफकोर्स मी इटालियन वाटणार नव्हतो, पण बांग्लादेशी वाटलो असतो तरी चाललं असतं! )

"आय कॅन स्पीक फ्रेंच, बीकॉज आय वॉज इन फ्रान्स बिफोर, बट नॉट सो गुड इंग्लिश!" आफ्रिकन सांगत होता.

"नाईस, बट यू स्पीक गुड इंग्लिश!" आशियाई.

"रिअली? धीस इज व्हॉट आय रीड." आफ्रिकनानं एक पुस्तक काढून त्याला दाखवलं. ते बहुधा इंग्लिश शिकायचं पुस्तक होतं.

"ओह. गुड!" त्यानं एकदम अधिकारी नजरेनं पुस्तक न्याहाळलं. त्याला बर्‍याच दिवसांनी किंमत मिळाल्यासारखं वाटत होतं.

"आय ऍम रीडिंग धीस, एक्ससीस नंबर फोर!" आफ्रिकन.

"ए..क्स..र..सा..ई..ज" आशियाई.

"एक्ससीस." आफ्रिकन.

"नो नो नो..धीस इज नॉट फ्रेंच..धीस इज इंग्लिश यू रीडिंग..ए क्स र सा ई ज" आशियाई.

"एग्झरसाईज" आफ्रिकन. मी असतो तर इथे त्याची पाठ थोपटली असती. पण...

"एक्सरसाईज" आशियाई. त्यानं त्याला उच्चार शिकवण्याचा चंगच बांधला होता. मलाच आता ऑड वाटायला लागलं होतं. तीन-चार वेळा हेच झाल्यावर शेवटी..

"एक्सरसाईज" आफ्रिकन.

"शाब्बास." मी मनातल्या मनात. "गुड" आशियाई त्याला म्हणाला. मी त्रस्त होऊन इंडिकेटर कडे बघितलं. ट्रामला यायला अजून ३ मिनिटं शिल्लक होती. मला ह्या दोघांच्या पकाऊगिरीचा खरं म्हणजे कंटाळा आला होता, पण इंग्रजीत बोलत असल्याने विशेष लक्ष न देताही मला कळत होतं.

"यू नो, इंग्लिश इज अ नाईस लँग्वेज." आशियाई.

"ह्म्म.." आफ्रिकन.

"बट आय डोन्ट लाईक धीस फ#ग लँग्वेज हियर." आशियाई एकदम फ्रस्ट्रेट झाला होता.

आफ्रिकन हसायला लागला. "व्हाय यू डोन्ट लाईक इटालियन."

"आय डोन्ट नो, आय जस्ट हेट. व्हेन दे से ब्वोनज्योर्नो.. आय फील लाईक रनिंग अवे. आय डोन्ट लाईक धीस लँग्वेज, आय डोन्ट लाईक धीस कंट्री. आय जस्ट वॉन्ट टू रन अवे फ्रॉम हियर." आशियाई. आताशा माझे कान चांगलेच टवकारले गेले होते.

"व्हाय? यू डोन्ट हॅव पेपर्स?" आफ्रिकन.

"येस आय हॅव. आय हॅव माय सोज्योर्नो (इथलं टेम्पररी रेसिडन्ट परमिट). बट दे स्टिल चेक यू एव्हरीव्हेअर. दे गिव्ह यू परमिट ऍन्ड दे चेक यू इन द स्ट्रीट्स. दे थ्रो यू." त्याचा आवाज कापरा झाला होता.

".." आफ्रिकन फक्त बघत होता.

"आय मीन हाऊ कॅन यू थ्रो समवन हू डझन्ट नो द लँग्वेज, हू डझन्ट हॅव मनी, हू डझन्ट हॅव वर्क, हू डझन्ट हॅव हाऊस, ऑन द स्ट्रीट्स.. हाऊ कॅन यू थ्रो देम ऑन द स्ट्रीट्स." त्याच्या आवाजात कडवटपणा आणि हतबलता पुरेपूर भरलेली होती.

"आय डोन्ट वॉन्ट टू स्टे हियर. बट आय ऍम हेल्पलेस. आय कान्ट गो एनीव्हेअर. आय ऍम स्टक हिअर. आय वॉन्ट टू रन अवे. बट आय कान्ट!"

तो बोलत होता, तेव्हढ्यात ट्राम स्टॉपजवळ आली.

तेव्हढ्यात आशियाई आफ्रिकनाला म्हणाला, "यू आर गेटिंग ऑन धीस?" तर आफ्रिकन म्हणाला "नो".

मी चटकन ट्रामेत चढलो आणि खिडकीत बसलो. ट्राम सुटली आणि मी पहिल्यांदाच त्या आशियाईचा चेहरा नीट पाहिला. (इतका वेळ पाहत नव्हतो, कारण तो भारतीय/पाकिस्तानी समजून बोलायला येईल ही भीती.) त्रासलेला आणि थकलेला होता तो. ट्राम पुढे निघाली, पण त्याचा त्रस्त चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हता.

ह्यापुढे जेव्हापण निर्वासित, बेकायदा स्थलांतर, मानवी तस्करी ह्याबद्दल वाचेन किंवा बातम्या पाहिन, नेहमी हाच चेहरा डोळ्यांसमोर येत राहिल.