5/28/2010

स्वातंत्र्यसूर्य!

आज २८ मे. बर्‍याचश्या भारताच्या आणि कदाचित जगाच्या विस्मरणात गेलेला दिवस. उगाच खोटं कशाला बोला. मी ही मारून मुटकून लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. प्रसंग मोठा बांका आहे. सगळ्या राष्ट्रपुरूषांच्या जन्मदिवसांचं जसं मार्केटिंग होतं, तसं होत नाही ह्या दिवसाचं. पण हरकत नाही. पण ह्या विराट राष्ट्रपुरूषाची स्मृती मात्र माझ्या मनात कायम तेवत असते. वृथाचा गर्व नाही मला, सार्थ अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्या महापुरूषाला मी वंदन करतो. आज त्यांचा जन्मदिवस आहे. १२७ वर्ष होतील आज त्या ऐतिहासिक दिवसाला. एक असा दिवस ज्याने देशाचा इतिहास बदलायची क्षमता असलेल्या महापुरूषाचा जन्म पाहिला.
मी मुद्दाम 'बदलायची क्षमता' असलेल्या असं लिहिलंय. कारण सावरकरांचं पद्धतशीर खच्चीकरण करून तत्कालीन कॉन्ग्रेसच्या धुरीणांनी देशाला त्यांच्या विशाल दृष्टीकोनापासून वंचित ठेवलं. गांधीवधाच्या खटल्यात गोवणे, पाकिस्तानचा पंतप्रधान काश्मीर युद्धानंतर स्वतंत्र भारतदेशाच्या भेटीवर आला असताना जेलमध्ये टाकणे ह्या आणि असल्या अनेक कुरूप युक्त्या-प्रयुक्त्या वापरून सावरकरांना देशवासीयांच्या नजरेतून उतरवण्यात आले. पण खरे कृतघ्न आपले देशवासी. तेही ह्या ऍग्रेसिव्ह मार्केटिंग तंत्राला बळी पडून एका महान देशप्रेमी क्रांतिकारकाला विसरले.
एक असा मुलगा, ज्याला उच्च शिक्षण, उज्ज्वल भवितव्य आणि अतिशय चांगल्या घरातल्या पत्नीबरोबरचं आयुष्य खुणावत होतं. तो हे सगळं पणाला लावून फक्त देशप्रेमाखातर थेट इंग्लंडातून क्रांतिकारक कृतींची सुरूवात करतो. पिस्तुलं स्मगल करण्यापासून मॅझिनीचं आत्मचरित्र, १८५७चं स्वातंत्र्यसमर(ह्याला 'सेपॉय म्युटिनी' म्हणून हिणवलं जायचं, त्याचा उद्धार सावरकरांनी केला) असली सकस पुस्तकं लिहितो. तोच तरूण अनेक क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान बनतो. इंग्रज सरकारने एकतर्फी खटला चालवून ५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा दिल्यावर आपल्या आयुष्याची किंचितशीही चिंता न करता पटकन म्हणतो, "तुमचं सरकार इतके दिवस टिकणार आहे का?". ज्या तरूणाने आपल्या आयुष्याची तारूण्याची ११ सोनेरी वर्षे अंदमानला तेलाचा घाणा हाकण्यात काढली आणि तेथेही आपल्या असामान्य प्रतिभेने, त्या वातावरणातही हलक्या फुलक्या प्रेमकवितांपासून, जाज्वल्य राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या अनेक कविता आणि महाकाव्य जेलच्या भिंतींवर खरडली, पुन्हा बाहेर पडताना हे सगळं तोंडपाठ केलं अश्या मनुष्याबद्दल मी पामर काय म्हणणार. माझ्याकडे शब्द नाहीत.
हा देशभक्त येन केन प्रकारेण अंदमानातून बाहेर पडून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ इच्छित होता. त्यासाठी त्याने सरकारकडे दयाअर्ज पाठवण्याचा प्रयोग केला. अर्थात सरकारला जाणीव होती, की जो माणूस आपल्या विरोधात एव्हढं सारं करत होता, तो दयाअर्जातल्या अटी किती पाळणार. पण आज महामूर्ख लोक ह्या अर्जांचा उल्लेख करून स्वातंत्र्यवीरांची दयावीर म्हणून संभावना करतात, तेव्हा काळीज तीळ तीळ तुटतं. म्हणजे ह्या लोकांचं काय म्हणणं होतं की सावरकरांनी तुरूंगातच खितपत पडून मरून जायला हवं होतं का?
स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या दूरदृष्टीला युद्धखोर, आक्रस्ताळे असं म्हणून हिणवलं गेलं. परिणाम आपल्यासमोर आहेत. चीनच्या गळ्यात गळे घालून काय साधलं आणि जातिव्यवस्थेमुळे काय मिळालं. दैवदुर्विलास पहा, जातिव्यवस्था मोडून टाका, आधुनिकीकरण करा म्हणणार्‍या सावरकरांचं चित्रही संसदेमध्ये लावण्यावर लोकांना आक्षेप आहेत, पण जातिव्यवस्था हा भारतीय समाजाचा कणा आहे म्हणणारे गांधी राष्ट्रपिता म्हणवले जातात. महान इटालिअन क्रांतिकारक मॅझिनीचं चरित्र लिहून हजारो तरूणांना स्फूर्ति देणार्‍या आणि इंग्रज सरकारला पुस्तकावर बंदी घालायला भाग पाडणार्‍या सावरकरांचा फोटो संसदेत लावण्यास विरोधही एका इटालिअन बाईच्या सांगण्यावरून देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाने करावा हासुद्धा एक दैवदुर्विलासच.
आज सावरकरांबद्दल अनेक गैरसमज अगदी सुशिक्षित लोकांमध्येही आहेत. सावरकर खरं तर कुणालाच समजले नाहीत. युद्धतयारी करा, जातिव्यवस्था मोडा, आधुनिकतेची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरा, हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून देशाला एक करा इतक्या सार्‍या युक्तीच्या गोष्टी फक्त एक माणूस सांगत होता, पण प्रत्येक वेळी मुद्दाम उलटं करून कॉन्ग्रेसने देशाचं वाटोळं केलं. द्विराष्ट्रवादाचा त्यांचा सिद्धांत आणि फाळणी ह्यांचा इतका काल्पनिक आणि सज्जड खोटा, चुकीचा संबंध (ह्याला बादरायण संबंध म्हणतात कदाचित) लावण्यात आला, की खरी व्हिलन कॉन्ग्रेस बाजूलाच राहिली, जणू काही फाळणी सावरकरांच्या सांगण्यावरूनच झाली होती. ते काळाच्या एव्हढे पुढे होते, की आम्ही छोटी माणसे त्यांना समजण्यात कमी पडलो. आमची लायकीच नाही. आजपासून अनेक वर्षांनीसुद्धा त्यांनी सांगितलेला आधुनिकतेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार लागू राहिल. देशातलं पहिलं अस्पृश्य पुजारी असलेलं मंदिर सावरकरांनी सुरू केलं, आपल्या मुलाची मुंजही केली नाही. जातिव्यवस्था मोडा म्हणताना त्यांनी कृतीसुद्धा केली. आधुनिकता, धर्म आणि राजकारण ह्याबद्दल त्यांच्यासारखेच जवळपास विचार असणारा तुर्कस्तानचा केमालपाशा ह्याच्यावर सावरकरांनी एक वस्तुनिष्ठ स्तुतिपर निबंध लिहिलाय. ह्यातूनच त्यांचा कुठल्याही धर्माबद्दल नाही, तर आंधळ्या धर्मप्रेमी जोखडांवर राग होता हे सिद्ध होतं. पुन्हा त्यांनी फक्त मुसलमान धर्मालाच का, हिंदू धर्मातल्या जोखडांवरही इतके जिव्हारी लागणारे योग्य वार केलेत की कट्टर हिंदुत्ववाद्यांना चीड यावी, उदाहरणार्थ, गाय हा फक्त उपयुक्त पशू आहे, देव नाही हा त्यांचा निबंध. पण तरीही सावरकरांना कट्टर हिंदुत्ववादी हे लेबल लावण्यात येतं. मला वाटतं सावरकरांचं चुकलंच, त्यांनी लढ्यातच देह ठेवायला हवा होता, मग त्यांचाही उदोउदो केला गेला असता, गुरूदत्त प्यासात म्हणतो, ते किती खरं आहे, "ये बस्ती हे मुर्दापरस्तों की बस्ती!"
सावरकरांनी अफाट लेखन केलंय, तेही एवढ्या धामधुमीत. त्यांचे अनेक निबंध वाचलेत आणि वाचायचेत. समग्र सावरकर वाचून काढायचेत. त्यांनी सांगितलेला मार्ग आपल्या आयुष्यात कितपत बाणवता येईल माहित नाही, पण त्यांना समजून घेऊन मी एक क्षुद्र माणूस प्रयत्न जरूर करणार आहे. सावरकर उभं आयुष्य कट्टरतेविरूद्ध लढले, पण मी मात्र कट्टर सावरकरवादी आहे.
ह्या लेखाचा प्रपंच सावरकरांचं उदात्तीकरण करणे हा बिलकुलच नाही. माझं अल्पज्ञान, माझं अनेकांशी बोलण, माझे आजवरचे अनेकानेक अनुभव मला जे सांगतात ते मी लिहिलं. माझ्या लिहिण्याने उजळावी इतकी काही सावरकरांची प्रतिमा कुणाची मिंधी नाही. ना ही माझ्या लोकांना ओरडून सांगण्याची गरज पडावी इतकी सावरकरांची महानता कुणाची मिंधी आहे. पण, सावरकरांचे अंदमानच्या सेल्युलर जेलवरचे शब्द एका कॉन्ग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याने काढून टाकणे, के. आर. नारायणन ह्या राष्ट्रपतीपदावरच्या प्याद्याने मुदामहून सावरकरांच्या मरणोत्तर 'भारतरत्न' मिळण्याच्या शक्यतेवर वर्षानुवर्ष बसून राहणे, सावरकरांच्या मार्से इथल्या स्मारकाबद्दल सरकारची उदासीनता ह्या आणि असल्या अनेक बातम्या सढळ हस्ते उपलब्ध असताना त्यांच्याबाजूने त्यांच्या ह्या क्षुद्र भक्ताने काहीतरी लिहायचं ठरवलं बस. बाकी, त्यांची बाजू कुणी घ्यावी, आणि ती बरोबर असल्याचं एन्डोर्स करावं ह्याची गरज त्यांना तेव्हाही नव्हती आणि कधीच नसेल.
त्यांच्या स्मृतीस माझं नम्र आणि भावपूर्ण अभिवादन!

अद्यतन : घाईअगडबडीत लिहिला असल्याकारणे बर्‍याच चुका दिसत होत्या, त्या दुरूस्त केल्या. बाकी अजूनही काही नजरेतून सुटल्या असतील तर माफ करून टाका.;)

5/23/2010

मला तर बाबा काहीच कळत नाही

फार वर्षांपूर्वी दूरदर्शन सह्याद्री (कदाचित तेव्हा ते फक्त DD-१० होतं)वर नववर्षाचा एक कार्यक्रम लागला होता. नववर्षाचा कार्यक्रम म्हणजे तोच जो ३१ डिसेंबरला रात्री लागतो. एकेकाळी DD-१० वरचा तो कार्यक्रम दर्जेदारही असायचा. त्यावेळीही आमच्याकडे केबल असावं, पण मराठी वाहिन्यांचा सुकाळ नसल्याने आम्ही बाण्याला जागून कदाचित बाकी सगळ्या वाहिन्या(हिंदी) सोडून हा कार्यक्रम पाहत होतो. अर्थात मी बराच लहान होतो, मला फारसं काही आठवत नाहीये, फक्त प्रदीप पटवर्धन धूसर आठवतायत. पण त्या कार्यक्रमातली एक गोष्ट अगदी ठसठशीत लक्षात राहिली, ती म्हणजे त्यामध्ये दाखवलेल्या (कॉमेडी) कविसंमेलनात सादर केल्या गेलेल्या एका कवितेचं ध्रुवपद(हे एकदम 'इस दिल में क्या है धडकन, धडकन में क्या है साजन' च्या स्टाईलमध्ये झालं).

तर ते ध्रुवपद होतं, "मला तर बाबा काहीच कळत नाही।"

अहो खरंच, असंच ध्रुवपद होतं. तुमच्यापैकी कुणाला आठवत असेल हा कार्यक्रम. असो. नसला आठवत तरी हेच ध्रुवपद होतं. एव्हढी सगळी प्रस्तावना फक्त एव्हढ्यासाठी, कारण आज मी हेच ध्रुवपद उसनं घेऊन एक माझी बेसुमार सुमार कविता सादर करणार आहे. बर्‍याच वर्षांनी मी कविता करत आहे, तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. एका कम्युनिटी साईटवर आढळलेलं एक छान प्रोफाईल वाक्यही इथे उद्घृत(क्लृप्ती प्रमाणेच सलग पाच वेळा हा ही म्हटल्यास जीभ साफ होऊ शकते, दोन्ही एकत्र म्हटल्यास सुपडाही साफ होऊ शकतो) करतो. "जर तुम्हाला माझे काम आवडले तर इतरांना सांगा, जर नाही आवडले तर फक्त मला"!

अथ :

सूर्य प्रकटतो पूर्व दिशेने पूर्वरंग दाखवतो,

ढगाळ आसमंतातही आशेचा किरण दाखवतो,

मनावरचे मळभ मात्र काही केल्या टळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

थेंब बिचारे कोसळती अगणित जलधारांमधूनी,

त्यांच्या क्षणभंगूर अस्तित्वाची दखल ती घ्यावी कोणी,

आसुसलेल्या धरणीवरती आसराही का मिळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

माणसे मरतात चटचट, किंमती वाढतात पटपट,

मुकी बिचारी कुणीही हाकण्याचे असिधाराव्रत, चालूच राहते अविरत,

प्रतिकारास्तव मुक्या तरूंचे एक पानदेखील का सळसळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

पोलीसाच्या घरात होते चोरी, कानाखाली वाजवतात पोरी,

ऑफिसात नेहमीची स्टोरी, स्वप्नात बार्बरा मोरी,

हल्ली हटकल्यानंतर रस्त्यावरचं कुत्रंदेखील पळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

उगाच काहीतरी विचार, डोक्याचं भजं साचार,

कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही आचार,

हव्या त्या योग्य वळणावर मनाचा कावळा का वळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

आता संपवायलाच हवी कविता, नाहीतर आटून जाईल वाचकसरिता,

ओढूनताणून यमक आणिता, पडतील चारदोन सपाता,

एव्हढं कळून देखील प्रतिभेच्या मेणबत्तीचे मेण का वितळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

इति।

तुम्हालाही काही कळलं नसेलच, त्यामुळे इथे मी तुम्हाला धन्यवाद म्हणण्याऐवजी तुम्ही मला धन्यवाद म्हणत असाल. त्यामुळे उगाच अजून संवाद साधायचा प्रयत्न करून वाद न वाढवता अपवाद म्हणून मी पोस्ट नेहमीपेक्षा लवकर, इथेच संपवतो.

5/20/2010

प्यासा - एक चिंतन

नाही. मी काहीही तिरकस लिहिणार नाहीये.
मला खूप लहान असताना मोठा झाल्यावर काय बनायचंय हे ठाऊक नव्हतं. थोडा मोठा झाल्यावर माझ्या बाबांसारखं व्हायचंय असं वाटू लागलं. पण तेव्हाही ठाऊक नव्हतं, की बाबांसारखं म्हणजे नक्की काय व्हायचंय. मग अजून थोडा मोठा झाल्यावर बाबा जे काम करतात तसंच काहीतरी करायचं असं पक्कं केलं. बाबा त्यावेळी एल.एल.बी.चा अभ्यास करायचे. त्यांची तराजूचं चित्र काढलेली पुस्तकं घरी असायची(आणि ते ती वाचायचे सुद्धा). ती पुस्तकं पाहून आपणही मोठे झाल्यावर ही पुस्तकं वाचायची हे मी ठरवून टाकलं. थोडा अजून मोठा झालो, मग माझा चुलत भाऊ, नोकरीसाठी मुंबईत आल्याने आमच्याकडे काही दिवस राहायला होता. १९९६ म्हणजे संगणक अभियंत्यांच्या गोल्डन पिरियडमध्ये तो संगणक अभियंता झाला होता. लगेच वर्षभरात तो अमेरिकेला गेला. मग मला त्याच्यासारखंच संगणक अभियंता व्हावंसं वाटायला लागलं. ते वेड अगदी दहावी होईपर्यंत होतं. अजूनी आठवतंय, दहावीच्या रिझल्टनंतर आमच्या शाळेच्या एका ट्रस्टींनी मला विचारलं होतं, की तू पुढे जाऊन काय होणार. "कॉम्प्युटर इंजिनियर" हे उत्तर मी उजळलेल्या चेहर्‍याने आणि इंचभर फुगलेल्या छातीने दिलं होतं. त्यावर ते मला म्हणाले होते, "पासपोर्ट काढून ठेव स्वतःचा!"
प्रवाहपतिताप्रमाणे जे जगाने केलं, ते करत गेलो. हाताशी मार्क होते, जे जे उत्तम मिळण्याच्या आवाक्यात दिसत होतं, ते ते करत गेलो. आणि शेवटी अगदी लहानपणी ठरवलेलंच खरं झालं, मी माझ्या बाबांसारखाच इलेक्ट्रीकल इंजिनियर झालो. झालो. नोकरीही लागली. परदेशातही आलो(पासपोर्टचं भाकित). पण.
पण मग मन मागे मागे जातं. सारखा एकच विचार छळतो. आपण बरोबर केलं? हेच करायचं होतं आपल्याला? काम करतो, पण कामात मन नाही लागत. लहानपणापासून कसली आवड होती? तसं बघायला गेलो तर कसलीच नाही. हां, पण लिहायला आवडायचं. आपण लिहिलेलं, आपल्या कविता, लोकांनी वाचाव्यात, कौतुक करावंसं वाटायचं. काही काही वेळी झालंही कौतुक. मग पुढे दहावीला गणितात पार पानिपत झालं, तेव्हा सगळ्या भाषांमध्ये मिळालेले उत्तम गुण आठवतात. संस्कृत शिकायची मनापासून इच्छा होती. पण त्यासाठी आर्टस ला जावं लागलं असतं आणि आर्टस ला गेलो असतो, तर पुढे पोटापाण्याचं काय?
इथे माझी कहाणी प्रातिनिधिक आहे. मी काय करायला हवं होतं, कसं करायला हवं होतं, अजूनी काय करता येईल, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे नाहीत. महत्वाचा आहे तो हा प्रश्न, की एका कलाकाराच्या, खेळाडूच्या पोटापाण्याचं काय? जर एखाद्याला त्याची कला, क्रीडा सोडून काहीच येत नसेल, तर त्याचं काय? हे सगळे प्रश्न आपण डोळे झाकून, ब्रिटीशांनी आपल्यातून दुय्यम मध्यमवर्ग बनवण्यासाठी आपल्यावर लादलेली शिक्षणव्यवस्था स्वीकारल्यापासून सतत ऐरणीवर येताहेत. आपण अजूनी डोळे मिटून बसलोय. मग आपल्यात बुकर का नाही मिळत, आपण ऑलिम्पिक्स मध्ये मागे का असले प्रश्न चघळत बसायचं. त्यावर ३ इडियट्स सारखा मुद्द्याला हात घालणारा पण बराच भरकटलेला सिनेमा आला की त्याच्या हाईपच्या निमित्ताने गरमगरम चर्चा करायची, टीआरपी वाढवायचे आणि विसरून पुन्हा तेच.
हे सगळे मुद्दे मी आत्ता काढण्याचं कारण? गेल्या लेखावर पुष्पराजने एक कॉमेंट केली, त्यात त्याने गुरूदत्त आणि प्यासाबद्द्ल प्रशंसा केली. प्यासा हा माझा वीक पॉईंट. मी पोचलो मागे. प्यासाच्या दुनियेत, विजयच्या दुनियेत. 'प्यासा' हे प्रत्येक कलाकाराचं(प्रवाहापासून वेगळा असणार्‍या प्रत्येकाचं) प्रतिबिंब आहे. १९५७ साली सुद्धा जवळजवळ तेच प्रश्न होते. गुरूदत्तने एका कविच्या प्रेमभंगाचा बॅकड्रॉप घेऊन एक अप्रतिम सिनेमा उभा केला.
सिनेमा सुरूच होतो तो एका बागेत निसर्गाकडे बघत बसलेल्या विजयपासून. निसर्गाची स्तुती करत तो म्हणतो, की इतके सुंदर नजारे आहेत, ह्या निसर्गात सर्व आहे आणि म्या पामराकडे काय आहे देण्यासाठी? - "कुछ आंसू और कुछ आहें" मग विजयची गोष्ट उलगडत जाते. कॉलेजात कवि म्हणून प्रसिद्ध विजय, दुनियेच्या बाजारात पराभूत असतो. त्याच्याजवळ नोकरी नाही. तो नैतिकता मानतो, त्याच्याजवळ त्याच्या कविता आणि प्रतिभेशिवाय काही नाही. त्याच्या प्रतिभेचं, त्याच्या कवितेचं त्याच्या घरीही मोल नाही. त्याच्या घरचे त्याच्या कविता रद्दीत विकतात. दुःखी विजय अजून विमनस्क आहे, कारण त्याची कॉलेजातली प्रेयसी सुरक्षित भविष्यासाठी विजयला सोडून एका प्रथितयश प्रकाशकाशी लग्न करते. मग विजयला भेटते, गुलाबो. त्याच्या शायरीची भक्त. विजय गुलाबोला भेटतो सीनही अप्रतिम. गुलाबो, रद्दीच्या दुकानातून त्याचं पुस्तक घेते आणि त्याची शायरी गात असते. विमनस्क विजय ते ऐकून चक्रावतो आणि तिचा पाठलाग करतो. एकदा पोलीस गुलाबोला हटकतो, तेव्हा विजय गुलाबो आपली पत्नी असल्याचं सांगतो. विजय दुःखामध्ये वहावत कोठ्यापर्यंत जाऊन येतो. विजयच्या नजरेतून आपण तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब पाहत राहतो. अन एक दिवस विजय रेल्वेखाली येतो. गुलाबो विजयची अखेरची इच्छा म्हणून त्याचं पुस्तक पदरचे पैसे देऊन त्याच्या पूर्व प्रेयसीच्या प्रकाशक नवर्‍याकडून छापून आणते. पुस्तक लोकप्रिय होतं. जो तो विजयचा फॅन होतो. पैसे आल्याने वाटेकरी येतात, विजयचा भाऊ, मित्र हिस्सा मागायला येतात. आणि विजय परत येतो. त्याच्या शोकसभेलाच जिवंत विजय येऊन सांगतो, की मी जिवंत आहे. पण पैश्यांच्या लालसेने जेव्हा आधी ओळख नाकारणारे भाऊ आणि मित्र विजयची बाजू घेतात, तेव्हा विजय व्यासपीठावर चढून सांगतो, की मैं वो विजय नहीं हूं!
शेवटी विजय गुलाबोकडे जातो आणि तिला विचारतो, "साथ चलोगी?"
एक प्रश्नही न विचारता आजारी गुलाबो तशीच त्याच्याबरोबर निघते. कुठे? ते गुरूदत्त आपल्यावर सोडतो.
विजयच्या व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे होते. विजय कवि आहे, जो कवितेला उदरनिर्वाहाचं साधन न मानणार्‍या समजाचा बळी ठरतो. विजय सरळमार्गी आहे, जो कपटी कारस्थानी लोकांचा बळी ठरतो. विजय नैतिकतेचा पुजारी आहे, जो प्रॅक्टिकल जगाचा बळी ठरतो. विजय भावूक आहे, जो प्रेयसीच्या कॅलक्युलेटेड प्रेमाचा बळी ठरतो. विजय शेवटीसुद्धा हरतोच, पण ती हार तो स्वतः मान्य करतो, कारण त्याला कंटाळा आलाय ह्या जगाचा. तो कुठे चाललाय हे फक्त त्यालाच माहिती, पण तो आपल्याबरोबर फक्त गुलाबोला नेऊ इच्छितो. तिही आपल्या पवित्र प्रेमाला जागून काहीही न विचारता त्याच्यामागे जाते.
ह्या सिनेमात वाट्टेल तेव्हढा सिम्बॉलिझम आहे, पण कुठेही तो अगम्य होत नाही. विजयचं वेश्यावस्तीत कोलमडून जाणं, विजयचं स्वतःच्याच शोकसभेला जाणं, प्रेमभंग आणि एका वेश्येकडून मिळणारं, तितकंच पवित्र प्रेम. "जाने क्या तूने कही", "जिन्हें नाझ हैं हिंद पर वो कहां हैं", "सर जो तेरा चकराये", "जाने वो कैसे लोग थे जिनके" आणि "ये महलों, ये तख्तों ये ताजों की दुनिया" सारखी अप्रतिम गाणी. "ये हंसते हुए फूल", "ग़म इस कदर बढें", "तंग आ चुके हैं क़श्मकश़-ए-ज़िन्दगी से हम" सारख्या शायरी, रफी, हेमंतदा ह्यांचे आवाज, एस.डी. बर्मनचं संगीत, साहिरची गीते आणि लेखक अब्रार अल्वी, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता गुरूदत्त ; बस ह्यापेक्षा जबरदस्त कॉम्बिनेशन असूच शकत नाही.
सिनेमाचा आणि माझ्या सुरूवातीच्या फ्रस्ट्रेशनभर्‍या प्रस्तावनेचा कितपत संबंध आहे हे सिनेमा बघून तुमचं तुम्ही ठरवा. मी आपला माझा दृष्टिकोन मांडला. कारण माझं आणि प्यासाचं नातं दृढ असण्याचं तेच एक महत्त्वाचं कारण आहे. मी विजयच्या एका अंशामध्ये स्वतःला पाहतो.

अद्यतन - नजरचुकीने मी लेखकही गुरूदत्त असंच लिहिलं होतं, ते अब्रार अल्वी असल्याचा बदल केलाय.

5/15/2010

दृकश्राव्य परिणाम

आज सहजच विचार आला. सिनेमाचा इफेक्ट जबरदस्त असतो. पण सिनेमातली गाणी? हा प्रकार फक्त आपल्या भारतीय सिनेमांमध्ये पहायला मिळतो. ते आपलं महत्वाचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. गाणी कधीकधी नुसतीच श्राव्य असतात, तर कधीकधी त्यांचं पिक्चरायझेशनही जोरदार असतं. कधीकधी ती सिनेमात अगदी दुधातल्या साखरेप्रमाणे विरघळून जातात, तर कधी ती जेवणात खडा दाताखाली यावा तशी त्रास देतात. तर कधी फक्त गाण्यांचं पिक्चरायझेशनच पूर्ण सिनेमात विरंगुळा देतं. नुसती श्राव्य गाणी किंवा गाण्यांचा दर्जा वगैरे माझा प्रांत नाही. माझ्या..माझ्याच काय प्रत्येकाच्याच संगीतात वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. पण आजवर पाहिलेल्या वेगवेगळ्या काळातल्या सिनेमातली वेगवेगळी अनेक गाणी आहेत, जी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पिक्चरायझेशनमुळे माझ्या मनावर छाप सोडून गेलीत. आत्ता त्याबद्दल लिहावंसं वाटलं म्हणून लिहितोय.

(मी ज्या क्रमाने लिहितोय, त्या क्रमाला काहीही अर्थ नाहीय. जशी आठवतायत तशीच लिहितोय.)

१. हम आपकी आखों में इस दिल को जगह दे तो (प्यासा) - गुरुदत्त आणि माला सिन्हावर चित्रित झालेलं हे गाणं, हिंदी सिनेमातलं पहिलं ड्रीम सिक्वेन्स म्हणून ओळखलं जातं. हे गाणं अतिशय मधुर आहे, पण मला हे सिनेमा पाहताना दाताखाली खडा आल्यासारखं वाटलं (ह्याबाबत माझा बहुतेकांशी मतभेद आहे). सिनेमा मस्त आपल्या लयीत चाललेला असतो आणि एकदम गुरुदत्त आणि माला सिन्हा ड्रीमसिक्वेन्ससाठी नाचायला लागतात. बाकी गाण्याचं चित्रिकरण मस्त झालंय, पण सिनेमात गाण्याचा मोह केव्हा टाळावा ह्यासाठीचं एक क्लासिक एग्झांपल म्हणूनच ते माझ्या लक्षात राहिल.

सिनेमा पाहून झाल्यावर कालांतराने कुठेतरी वाचताना कळलं, की गुरुदत्तने शूटिंग झाल्यावर गाणं सिनेमातून काढायचा निर्णय घेतला होता. पण डीस्ट्रीब्युटर्सच्या दबावाखाली ते गाणं त्याला ठेवावं लागलं. पण डीस्ट्रीब्युटर्सचा दबाव योग्यच ठरला, कारण ते गाणं फारच हिट झालं आणि सिनेमा सुपरहिट ठरला. पण मी आजही विचार करतो, ते गाणं काढलं असतं, तर 'प्यासा' तेव्हढाच मोठा हिट ठरला असता का?

२. जिन्हें नाज है हिंद पर वो कहां हैं (पुन्हा प्यासा {पुन्हा प्यासा हे सिक्वेलचं नाव नसून ते, हे देखील प्यासातलंच आहे, ह्या अर्थी आहे})- हे गाणं नुसत्या बोलांसाठीच नाही, तर त्याच्या पिक्चरायझेशनसाठी माझ्या ऑलटाईम फेव्हरेट्स लिस्ट मध्ये आहे. उध्वस्त विजय आपल्या मित्रांच्या नादाने वेश्यावस्तीत आलाय. पण ते वातावरण, ते एक्सप्लॉयटेशन तो सहन करू शकत नाही. तो स्वतःच्या नैतिक अधःपतनामुळे दुखावलाय. समाजाच्या एकंदरितच अधःपतनाचं दुःख तो ह्या गाण्यातून व्यक्त करतो. आणि ह्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे विजयचं त्या मोहल्ल्यात फिरणं त्या त्या क्षणाचं वर्णन करणार्‍या बोलांबरोबर समोर दिसतं. काही क्षण अगदीच सरधोपट चित्रित झालेत, पण अनेक बोल, बरोबरच्या दृश्यांमुळेच जास्त अर्थपूर्ण वाटतात आणि अंगावर येतात. काय आणि कुठले ते सांगत नाही बसत (मेलडी खाओ खुद जान जाओ).

३.नायक नहीं खलनायक हूं मैं (खलनायक) - सुभाष घईचा तेव्हाचा मॅग्नम ओपस. ठीकठाक म्हणता येईल अश्या सिनेमातलं हे गाणं, ऐकायला मस्त वाटतं. पर्सनली हे गाणं मला खूप आवडतं. पण सिनेमाच्या शेवटाजवळ जेव्हा संजय दत्त विचित्र सूट घालून ह्या गाण्यावर नाचतो, ते दृश्यही माझ्या मनात ठसलंय. ह्या गाण्याचा जो कोणी कोरियोग्राफर आहे त्याचे मला पाय धरावसे वाटतात. संजय दत्तला जे हावभाव करायला सांगितलेत, ते पाहून हसून हसून पुरेवाट होते. तो खलनायक न वाटता जोकर वाटतो. इथे संजय दत्त वेड्यासारखा नाचत असतो(अंगविक्षेप करत असतो), तिथे रम्या (हे अजून एक कारण गाणं लक्षात राहण्याचं) काहीतरी वेगळेच नृत्यप्रकार करून डोळ्यांचं पारणं फेडत असते, टकलू व्हिलन उगाच रहस्यमय चेहरे आणि गूढ हास्य करत हातात दारूचा ग्लास घेऊन फिरत असतो, जॅकी श्रॉफ राखीला हातावरच्या घड्याळात ट्रान्स्मिटर लावून पाठवतो आणि ते घड्याळ व्हिलन काढून टाकतात, आणि इथे पार्टीत व्हिलनच्या हेडक्वार्टर्समध्ये सगळे एक्स्ट्रॉज कोरस देत देत नाचत असतात. एव्हढा मूर्खपणा एकाच गाण्यात एकाचवेळी बघायला मिळण्याची अशी संधी विरळाच.

४. ७० च्या दशकातलं हिरोनं पियानोवर बसून म्हटलेलं प्रत्येक गाणं - प्रत्येक गाण्याचा इफेक्ट मला सेम यायचा. बहुधा थीम एकच असायची. हिरॉईनचं दुसर्‍या कुणाशी लग्न ठरलंय. ह्या केसमध्ये दोन पॉसिबिलीटीज असायच्या - अ. हिरॉईनला मजबुरीमध्ये (ही बापाचा आग्रह पासून मरणासन्न दादीमा पर्यंत काहीही असू शकते) करावं लागतंय किंवा ब - हिरोला काही कारणंस्तव हिरॉईनशी बेवफाई करावी लागतेय (ह्याचीही कारणं जवळपास तीच, पण ऍडीशनल महत्वाचं कारण त्याला त्याच्या बापाच्या खुन्याचं रहस्य सांगणार्‍यानं ही प्रीकंडीशन घातलीय). असो, तर अश्या वेळी तो आपलं दुःख पियानोवर बसून सांगतो. आणि ९९% वेळा तो सूट घालूनच असतो(मला आजवर कधीही साधे कपडे घालून पियानो वाजवतानाचं कॅरॅक्टर सिनेमात दिसलेलं नाही; कदाचित पियानो वाजवायचा सूट हा युनिफॉर्म असल्याचा दिग्दर्शकांचा समज असावा)कारणं थोडी इकडे तिकडे होतील, पण पियानोचा प्रत्येक सीन माझ्या मनःपटलावर कोरला गेलाय. पियानोचा आवाज मी ऐकला की हिरो सूट घालून कुठल्या पोझिशनमध्ये बसलाय हे माझ्या डोळ्यांसमोर येतं, त्याचे कुठल्या पीसला केस कसे उडतात, कुठल्या पीसला तो डोळे मिटतो आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात, अगदी जिवंत चित्र उभं राहतं. माझं सगळ्यांत आवडतं - दिल के झरोखे में तुझको बिठाकर, यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर, रखूंगा मैं दिल के पास, मत हो मेरी जां उदास!

५. यादों की बारात (यादों की बारात) - मागे ह्या सिनेमावर आणि ह्यासारख्या अनेक सिनेमांवर पोस्ट लिहिली होती. ह्यात हे गाणं बरेचदा बरेच जण गातात. पण भावांच्या मिलनाच्या वेळचं दृश्य माझ्या डोक्यात बसलंय. ठरल्याप्रमाणे दुसरा भाऊ गाणं पूर्ण करतो. जाऊन भावाला मिठी मारतो. धाकट्या भावाची लहानपणापासूनची केअरटेकर आया (हे कॅरॅक्टर बॅड मेकपची क्लासिक केस आहे. ती बाई नुसती केस पांढरे केल्यासारखी वाटते, म्हातारी बिलकुल वाटत नाही) अश्रू पुसते. धर्मेंद्र भावांना ओळखतो, पण सगळ्यांसमोर दाखवू शकत नाही, म्हणून चुपचाप अश्रू गाळतो. पॉवरफुल सीन (!).

६. जां जब तक है जान, जाने जहां मैं नाचूंगी (शोले) - हे गाणं माझ्याच काय अलम हिंदुस्थानाच्या मनःपटलावर कोरलं गेलं, ते त्या गाण्याआधी येणार्‍या, "बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना!" ह्या धर्मेंद्रच्या डायलॉगमुळे (पुढे कुत्रा हा धर्मेंद्रचा ट्रेडमार्क बनला तो कायमचा, एव्हढा की आजही धर्मेंद्र म्हटलं, की त्याच्या उत्तम अभिनयाचे सिनेमे न आठवता 'कुत्ते-कमिने मैं तेरा खून पी जाऊंगा' हेच आठवतं, त्याच्या ह्या ट्रेडमार्कचा वारसा सनीनेही घायलमध्ये "बलवंतराय के कुत्तों" म्हणून चालवला). बिचारा धर्मेंद्र डायलॉग मारतो, पण बसंतीला कुत्तों के सामने नाचावच लागतं, तेही काचांच्या तुकड्यांवर. आज ह्या सीनवर राजू श्रीवास्तव पासून जॉनी रावत पर्यंत सगळ्यांनी स्पूफ बनवलेत, पण तो बालिश वाटणारा सॉन्गसीनसुद्धा शोलेमध्ये फक्त जबरदस्त पटकथेचा भाग असल्यामुळे अजरामर झाला. कदाचित तो बालिश आहे, म्हणूनच माझ्या वेगळा लक्षात राहिला असेल.

७. यम्मा यम्मा (शान) - हे गाणं एका अतिशय महत्त्वाकांक्षी पण तेव्हढ्याच बालिश सिनेमातलं, तेव्हढंच बालिश गाणं, म्हणून लक्षात राहतं. च्यायला, तो शाकाल काय वेडा असतो का, हे लोक गाणी गात नाचत त्याला बनवायला निघालेले असतात. आणि तो शाकाल पण हुशार असतो, तो अख्खं गाणं एन्जॉय करतो आणि मग त्यांना पकडतो. शोलेसारखा अप्रतिम सिनेमा दिल्यावर रमेश सिप्पीला काय अवदसा सुचली आणि त्याने हा सिनेमा काढला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण अगदी हास्यास्पद अश्या चित्रीकरणामुळे आणि सिनेमातल्या तेव्हढ्याच हास्यास्पद प्लॉटींगमुळे हे गाणं चांगलंच लक्षात राहतं.

८. तहलका सिनेमातलं गाणं - बोल लक्षात नाहीत माझ्या आत्ता - तहलका सिनेमा म्हटला म्हणजे, पहिलं आठवतं, ते "पुट ऑन द घुंगरू ऑन माय फीट ऍंड वॉच माय डीराम्मा" म्हणणारा धर्मेंद्र आणि दुसरं आठवतं ते "शॉम शॉम शॉम शामो शा शा" म्हणणारा चिनी भुवया केलेला डॉन्ग अमरीश पुरी. पण ह्यातलं हे गाणं स्टॅंडआऊट आहे, ज्याचे बोल मला आठवत नाहीत. आता हे गाणं मला का एव्हढं लक्षात, तर असं.

'व्हेअर इगल्स डेअर' असा एक क्लिंट इस्टवूडचा सिनेमा आहे. त्यात नाझी कॅम्पमध्ये शिरायसाठी दोघेजण एक युक्ती लढवतात. नाझी युनिफॉर्म्सचा जुगाड करतात आणि कॉन्फिडन्टली जर्मन बोलत बोलत गेटमधून आत प्रवेश करतात. त्यामुळे त्यांना कुणीही आयकार्ड, बॅज विचारत नाहीत. पण तहलकात नसीरूद्दीन शाह आणि धर्मेंद्र नाचत गात शत्रूच्या कॅंम्पमध्ये प्रवेशतात. हे साम्य मी लोकसत्तातल्या परीक्षणात वाचलं, मग मी व्हेअर इगल्स डेअरमधला तो सीन पाहिला, त्यानंतर जेव्हा मी तहलका पाहिला, तेव्हापासून तो सीन कायमचा लक्षात राहिलाय. धन्य तो अनिल शर्मा (तहलकाचा डायरेक्टर, होय तोच गदरवाला)

९. जुम्मा चुम्मा दे दे (हम) - हे गाणं स्ट्रिक्टली कुठल्यातरी हॉलिवूड फिल्मवरून कॉपी केलेलं बियरचे फेसाळलेले ग्लास पिणारे गोदीकामगारांचं दृश्य आणि किमी काटकर ह्यामुळे लक्षात राहतं. ते गोदीकामगार आणि ते बियरचे फेसाळलेले ग्लास ही क्लियरली कुठल्यातरी हॉलिवूड सिनेमाची कॉपी दिसते. पण त्यातल्या डान्स स्टेप्स, अमिताभचा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स, किमी काटकरचा ग्लॅमर कोशन्ट आणि सुदेश भोसलेंचा थेट अमिताभचा वाटेल असा आवाज हे एक डेडली कॉम्बिनेशन होतं.

१०. सिंग इज किंग (सिंग इज किंग) - मध्यंतरानंतर अतिशय असंबद्धपणे उगवणारं गाणं. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अश्या रितीनं हे गाणं अचानक स्क्रीनवर सुरू होतं. आपल्याला क्षणभर काहीच कळत नाही. एकदम झगमग लाईट्स सिनेमातली सगळी पात्र एकामागोमग एक येऊन सिग्नेचर स्टेप करून जातात. बाहुली कटरिना आणि अनावृत बाहुली नेहा धुपिया काही न कळणार्‍या स्टेप्स करतात. आपण अजून विचार करतोय की सिनेमा संपला की काय (हुश्श). पण मग अक्षय कुमार येतो. (माझ्या पुढच्या वक्तव्यावरून भांडणं उद्भवू शकतात) माझ्या मते अमिताभ बच्चननंतर जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स सध्या फक्त अक्षय कुमारचा आहे(संपलं वक्तव्य). हे गाणं सिनेमात का आहे, हे मला अजून कळलं नाहीये. ते शेवटचा व्हिडीयो म्हणून असायला हवं होतं (त्याने सिनेमाच्या ओव्हरऑल क्वालिटीत काहीही फरक पडला नसता हा भाग अलाहिदा).

असो, माझं दृकश्राव्य परिणाम पुराण संपलं आणि मिथुनदाचं एकही गाणं कसं नाही हा विचार तुमच्या मनात येत असेल तर थांबा. अश्या अशक्य गोष्टींचा विचार करू नका. मिथुनदाच्या गाण्यांना मी कुठल्याही नंबरांत कसा ठेवू शकतो. त्याची अनेकानेक गाणी आहेत. अगदी 'आय ऍम अ डिस्को डान्सर' पासून ते "आपही आपही ...(वीर)" पर्यंत. पण त्याच्या आवडत्या गाण्यांसाठी सेपरेट पोस्ट लिहावी लागेल. म्हणून सर्वांत जास्त परिणाम सोडणारं गाणंच सांगतो. "हम ये लुंगी उठाती तुमको डिस्को दिखाती" (अग्निपथ). एकदम हार्डकोअर दाक्षिणात्य वाटणारा आणि लुंगी हाताळण्यापासून बोलण्यापर्यंत अगदी हुबेहूब वाटणारा मिथुनला पाहून, सुंदर दिसणारी नीलम इम्प्रेस होते हे पाहून लहानश्या माझ्यातला(मी तेव्हा लहान होतो) मिथुनभक्त सुखावला होता. क्रिष्नन अय्यर येम.ये. हे पात्रच अविस्मरणीय होतं, पण हे गाणं आणि तो डान्स माझ्या मनावर कोरला गेलाय.

5/12/2010

पोस्टचा विषय


आत्ता मी तुफान पकलोय. मला काहीतरी लिहावंसं वाटतंय, पण काय लिहू ते सुचत नाही. केव्हाचा विचार करतोय. विविध विषय आठवून पाहिले. जसे,
. सकाळपासून काय केलं - ऑफिसात संगणका समोर बसलो. काम केलं नाही केलं हा प्रश्न महत्वाचा नाही. देवकाकांच्या बझकट्ट्यावर विविध विषयांवर आपल्या मताची पिंक टाकली. मधे एकदा जेवायला आणि दोनदा कॉफी प्यायलाही जाऊन आलो. पण ह्या सगळ्यात लिहिण्यासारखं काहीच नाही.
. इंग्लंडमध्ये स्थापन होत असलेलं नवं सरकार - कॉन्झर्व्हेटिव्ह आणि लेबर (मला पर्सनली ह्या पक्षांची मराठी नावं फार फार आवडतात - हुजूर आणि मजूर. ज्यानं कोणी बनवलीत तो चांगला रसिक माणूस असणार {माझ्यासारखा}.) ह्यांच्यात लिब-डेम(लिबरल डेमोक्रॅट - हा जुना पक्ष नसल्याने त्या रसिक, बारसं करणार्‍याच्या तावडीतून वाचला; पण मी आहे ना {त्याच्यासारखा} - ह्या पक्षाचं मराठी नाव - खजूर.) ला आपल्या बाजूने ओढण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच. मग भरपूर कोलांट्याउड्या मारल्यावर मजूर पंतप्रधानाने(मस्त शब्द वाटला ऐकायला) दिलेला राजीनामा आणि हुजूर पक्षाने खजूर पक्षाशी केलेली युती. हुजूर पंतप्रधान आणि खजूर उपपंतप्रधान (हा शब्दही मस्त वाटला). ह्या सगळ्यावर मी बापुडा काय पोस्ट लिहिणार.
. नुकताच एका मराठी कम्युनिटी साईटवर झालेला कथित आर्थिक घोटाळा आणि त्याचे अन्य कम्युनिटी साईट्स वर उमटलेले पडसाद हा मला एकदम सपट परिवार महाचर्चा सारखा विषय वाटतोय. माझे बाबा हा कार्यक्रम (सपट महाचर्चा) बरेचदा पाहतात (हे हवेतलं वाक्य आहे, कार्यक्रमाच्या अस्तित्वाविषयी मला काही कल्पना नाही). मला राहून राहून प्रश्न पडतो, की सपट परिवार हा चहा आहे, तर हे लोक कार्यक्रमाचं नाव 'सपट परिवार चहाचर्चा किंवा चहा चर्चा" असं का नाही ठेवत. आधीच नावात परिवार असल्याने मिसगाईड होतो माणूस. हां तर सांगण्याचा मुद्दा हा, की आत्ता मला सपट महाचर्चा करायची इच्छा नाहीय.
. माझी शाळा - आता कुणाला हा प्रश्न पडेल की असा ५वी च्या मराठीच्या परीक्षेत निबंधाला येणारा विषय मला सुचण्याचं कारण काय. तर कारणं तशी बरीच आहेत.जसं, . नको, आता इथे A,B,C,D वगैरे घ्यावं लागेल. जाऊ द्या बुलेट्स नकोतच द्यायला. मागच्या वाक्यातली बुलेट ही बंदुकीची गोळी, किंवा मोटरसायकल ह्या अर्थाने नसून वर्ड ह्या संगणक प्रणालीतील अनुक्रमांक देण्याच्या पद्धतीला दिलेलं विचित्र नाव ह्या अर्थाने आहे(अनुक्रमांक हा शब्द मला उत्स्फूर्तपणे सुचलेला आहे, जर कुणाकडे बुलेट्स साठी खरा योग्य शब्द असेल, तर मी मोठ्या मनाने माझी चूक सुधारेन). हां तर आपण कुठे होतो, माझी शाळा हा विषय मला का सुचला. तर, त्याचं असं झालं ऑर्कुटमध्ये आमच्या शाळासोबत्यांपैकी एकाने आमच्या दहावीच्या भौगोलिक सहलीत काढलेलं एक समूह छायाचित्र टाकलं. मग सगळ्यांमध्ये त्यात चेहरे टॅग करण्याची अहमहमिका लागली. सगळे दुसर्‍यांना ओळखत होते, पण स्वतःचाच चेहरा कुणाला ओळखू येत नव्हता (आईच्यान, मी दुसर्‍याने कन्फर्म करेपर्यंत स्वतःबद्दल कॉन्फिडन्ट नव्हतो). त्यात दुसर्‍या एका आपला वेळ सत्कारणी लावणार्‍या सदगृहस्थ मित्राने माझ्या शाळेची ऑफिशियल साईट बनवली आहे. मी कर्तव्यकर्म असल्याप्रमाणे ती दुसर्‍याच दिवशी जॉईन केली होती, पण आज त्यानं त्याची थोडी जाहिरात करण्यासाठी मला सांगितलं. इतका विश्वास तर हॅरी बावेजाचाही हरमन बावेजावर नसेल. (सुज्ञ वाचकांच्या लक्षात माझी सरोगेट ऍडव्हर्टायझिंग आली असेल, मी मित्राला दिलेला शब्द मोडू शकत नाही) तर अशी दोन कारणं झाली ज्यामुळे मी माझी शाळा ह्या टायटलवर आलो होतो. पण मला आत्ता शाळेत झालेले माझे विविध पचकेच आठवत असल्याकारणे मी पोस्ट लिहू इच्छित नाही.
. दंतकथा - आता दंतकथा ह्या विषयावर मी का आलो. मला खरं म्हणजे एक लघुकथा लिहायची होती. एकदम जेन्युईन. एकदम शाळेत एक 'विजयस्तंभ' अशा कायशाशा नावाची वि.. खांडेकरांची लघुकथा होती, तशी. अजूनही मला लघुकथा म्हटलं की तीच आठवते ('विजयस्तंभ' ही लघुकथा). किमान शब्दांत कमाल आशय सांगणारी (संदर्भासहित स्पष्टीकरणात असं सगळं लिहावं लागायचं). किमान शब्दांत कमाल आशय म्हटलं की मला गिर्‍हाईकाचा 'किमान शब्दांत कमाल अपमान' करणारे पुणेरी दुकानदार आठवतात. मग ही अशी गाडी आशयावरून पॉप कल्चर(लोकसंस्कृती{पुन्हा उत्स्फूर्त शब्द...}) वर यायला लागली आणि लघुकथा लिहायचं गांभीर्यच निघून गेलं. मग लोकसंस्कृतीवरून मला पुणेरी पाट्या आनि त्याचं कल्ट असं काय काय आठवावं लागलं आणि कल्टला समानार्थी शब्द मी शोधू लागलो. सगळ्यात जवळ जाणारा शब्द मला दंतकथा वाटतो (इथे मी कल्ट ज्या अर्थी घेतोय त्यासाठी, बाकी कल्टला मिथुनदा हा देखील एक समानार्थी शब्द आहे). तर मी लघुकथेवरून दंतकथेवर आलो. पण तरीही अख्खी पोस्ट लिहावी असं मला ह्यातदेखील काही सुचेना. पण आता एव्हढं लिहिलंच आहे, तर एका छोट्याश्या दंतकथेबद्दल सांगूनच संपवतो.
त्याचं काय आहे. एन. टी. एस. उर्फ नॅशनल टॅलेंट सर्च नावाची एक परीक्षा असते. त्याच्या पूर्वपरीक्षा म्हणजे अनुक्रमे बी.टी.एस. बॉम्बे टॅलेंट सर्च(हे कदाचित आता एम.टी.एस. झालं असेल, पण तसं झालं तर कॉन्फ्लिक्टींग होईल, कसं ते पुढे) आणि एम.टी.एस. (महाराष्ट्र टॅलेंट सर्च, कळलं का कॉन्फ्लिक्ट). तर ह्या बी.टी.एस. चे मुखिया रुपारेल कॉलेजचे एक सर होते. ते इंटरव्ह्यूमध्ये पोरांना तुफान घ्यायचे(नाचीजको पर्सनल एक्स्पिरियन्स है). तर ते आणि त्यांनी घेतलेले विविध इंटरव्ह्यू हा बी.टी.एस. आणि एम.टी.एस. ला बसलेल्या पोरांसाठी एक दंतकथेचा विषय होता. त्यातली एक दंतकथा, ज्याची सत्यासत्यता बिलकुलच पडताळता येणार नाही (फक्त सर सांगू शकतात) पुढीलप्रमाणे.
एकदा सर एका मुलाचा इंटरव्ह्यू घेत असतात. त्यांच्या टेबलावर त्यावेळी एक चीनीमातीचा चहाचा कप ठेवलेला असतो आणि त्यावर एक बशी उपडी असते. ते त्या मुलाला फुल घेत असतात, पण मुलगाही पुरून उरत असतो. अचानक सर त्याला सांगतात,
"बाळ, आता असं कर, ह्या कपातला चहा, त्या बशीला हात न लावता पिऊन दाखव.
तो मुलगा स्टन होतो. विचारमग्न पण दृढ मुद्रेने तो एकदा सरांकडे आणि एकदा बशीकडे बघतो. सर विजयी मुद्रेने एकदा बशीकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहतात. मग मुलगा हळूहळू एकेका शब्दावर जोर देत म्हणतो,
"सर, पण ह्या कपात चहा कुठाय?"
"मग" आता स्टन व्हायची पाळी सरांची असते.
"कप रिकामा आहे सर. ह्यात चहा असता तर मी नक्की पिऊन दाखवला असता." मुलगा त्याच दृढ मुद्रेने म्हणतो.
"मी तुला सांगतो, की कपात चहा आहे. पिऊन दाखव." सर स्वतःला सावरत म्हणतात.
"पण सर मी सांगतोय, की ह्यात चहा नाही."
"तुला कसं माहित, चहा मी मागवलाय." सर रेस्टलेस होतात.
"कळतं सर बघून." तो थोडासा हललेला असतो, कारण कसंही असलं तरी सरांशी पंगा महागात पडू शकतो.
"आहे चहा. पिऊन दाखव."
"नाहीये, तो कप रिकामा आहे."
सर तिरीमिरीतच बशी उचलून त्याला दाखवतात, "हा बघ चहा."
तो क्षणार्धात कप उचलून तोंडाला लावतो.



छ्या! एव्हढे विषय सुचूनही धड एका विषयावर पोस्ट नाही झाली.

5/08/2010

शॉर्ट फॉर्म्स

काही दिवसांपूर्वी ब्लॉगविश्वाची सफर करताना, मी 'दिसामाजी काहीतरी' ह्या ब्लॉगवर गेलो होतो. तसा मी ह्या ब्लॉगचा जुना वाचक आहे. पण मी असाच अधून मधून भेटी देऊन एकदम भरपूर वाचतो. तर त्यादिवशी त्यावर "महू" ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाबद्दल पोस्ट होती. मी तसं थोडंफार ऐकून होतो, पण 'महू' (इंग्रजीमध्ये MHOW) ह्या नावाचा "मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वेस्टर्न इंडिया " हा फुलफॉर्म आहे, हे वाचून मी थंड झालो('असा मी असामी' मधले धोंडोपंत जसे 'पॉपकॉर्न म्हणजे लाह्या' हे पाहून थंड होतात अगदी तसाच). मग मी आपल्या नेहेमीच्या कामांना लागलो(पक्षी {आता हे पक्षी का लिहितात, 'बर्डस आय व्ह्यू' शी ह्याचा काही संबंध असेल का?}) - ब्लॉग वाचणे मेल चेक करणे आणि अधूनमधून ऑफिसचे काम देखील करणे). त्यानंतर थोडे दिवस उलटले असतील, मी टीव्हीवर बातम्या पाहत होतो. त्यात आपल्या नेहेमीच्या सामाजिक संघटनांबद्दल काहीतरी उपयुक्त माहिती देणं चाललं होतं. तेव्हा माझ्या एका फेव्हरीट संघटनेचा उल्लेख आला, "लष्कर-ए-तोयबा"(हल्ली हे "लष्कर-ए-नायबा" झालेत). हे लोक बहुतांशी स्वतःचा काहीही संबंध नसलेल्या लोकांच्या(पक्षी - काश्मीर) स्वातंत्र्यासाठी शस्त्र वगैरे हातात उचलतात, जिहाद का कायसा करतात, म्हणजे थोडक्यात 'लष्करच्या भाकर्‍या(भाकरी-ए-लष्कर) भाजतात'. (मग मी थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं, की कदाचित त्यांच्यात पण असा काहीसा वाक्प्रचार असेल, 'भाकरी-ए-लष्कर भूनना', म्हणून ह्यांच्या स्थापनकर्त्यांनी संघटनेच्या नावातच लष्कर ठेवलं, जेणेकरून कोणी लष्करच्या भाकर्‍या भाजताय, असे टोमणे मारू नये. असो पाणचटपणा पुरे झाला.) मुद्द्यावर येऊ या. थोडा अधिक विचार करता माझ्या डोक्यात हे आलं, की उर्दू भाषेची मजा अशी आहे, की इंग्रजीत नाव लिहिल्यावर सहज शॉर्टफॉर्म मिळू शकेल अशी नावं ठेवता येतात. उदाहरणार्थ, लष्कर-ए-तोयबा(LeT), हरकत-उल-मुजाहिदीन(HuM), जैश-ए-मोहम्मद(JeM). त्यातून आता माझी आवडती भाकर्‍या भाजणारी संघटना बंद झाल्याने त्यांच्या पॅरेंट कंपनीचं नाव हल्ली बातम्यांमध्ये यायला लागलंय; 'जमात-उद-दवा'(JuD). सगळ्यांना मस्त शॉर्टफॉर्म्स मिळतात. पण अजून एक सामाजिक संघटना आहे, ज्याचा माझ्यामते शॉर्टफॉर्म आधी ठरवला असावा आणि मग नाव ठरलं असावं, हुजी (HuJI-हरकत-उल-जमात-ए-इस्लामी), किंवा ऍट लीस्ट त्यांनी शॉर्टफॉर्मसाठी नाव नक्कीच ऍडजस्ट केलं असावं. कारण मोठ्या शिताफीने -ए- वगळलाय.
मग शॉर्टफॉर्मचा विचार करताना, माझ्या डोक्यात अनेक शॉर्टफॉर्म यायला लागले. लोकं पण च्यायला काय काय झोल करून शॉर्टफॉर्म्स ऍडजस्ट करतात. आता हेच बघा, मुंबईत हॉटेल्सच्या मालकांची संघटना आहे, त्याचा शॉर्टफॉर्म - आहार(AHAR(Assosication of Hotel And Restaurant owners)). डोकं पाहिजे खरंच. माझा एक आवडता अर्थहीन शॉर्टफॉर्म - मामि(Mumbai Association of Moving Images). हा मला उगाच उच्चारण जमावं म्हणून ऍडजस्ट केलेला वाटतो. उगाच जुळवाजुळवीसाठी शॉर्टफॉर्म ऍडजस्ट करण्याचा अजून एक प्रकार म्हणजे एकेका शब्दातली दोन तीन अक्षरं उचलायची, उदाहरणार्थ, आदिदास हा इंटरनॅशनल स्पोर्टिंग ऍक्सेसरीजचा ब्रॅंड, मला कित्येक दिवस तिथे काहीतरी भारतीय कनेक्शन असावं असं वाटायचं, मग कळलं Adolf Dassler ह्या मालकाच्या नावावरून कंपनी बनली, पण मग आयडिया सुचली आणि "All Day I Dream About Sports" झालं. छ्या, मला नसतं सुचलं असलं काही(म्हणूनच मी अजून नोकरी करतोय). त्याहून मजेशीर अजून एका सामाजिक संघटनेचं नाव आहे, LTTE . बिचार्‍यांनी नाव मनापासून ठेवलं असावं, म्हणजे ठेवण्याआधी शॉर्टफॉर्मचा वगैरे विचार केलेला नसावा, त्यामुळे बात कुछ जमी नही. मग मीडीयाला काही झेपेना एव्हढं, मग त्यांनीच क्लृप्ती(कुणी हा शब्द मला सलग पाच वेळा न थांबता{आणि न चुकता} म्हणून दाखवावा) लढवली आणि पहिल्या शब्दातला एल आणि आय घेऊन लिट्टे(LiTTE) असं थोडं भारदस्त नाव बनवलं असावं. मला वाटतं हे असले फंडे सांगायचे लोक पैसे सुद्धा घेत असतील. अजून एक कॉमन प्रकार म्हणजे, ऍन्ड, ऑफ असले फडतूस शब्द वगळायचे किंवा जरूरतीप्रमाणे वापरायचे. बीसीसीआय ह्यांना उगाच ऑफ, फॉर, इन नको होते कारण मजा गेली असती नावातली, आता तुम्हीच सांगा बीएफसीओआयआय(BfCoCiI) ह्यात काय मजा आहे, धड उच्चारही नाही. ह्याउलट पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर(PoK), किंवा प्रिझनर्स ऑफ वॉर(PoW) हे लिहिताना, बोलताना ऑफ ला किंमत मिळते.
निरनिराळ्या जागतिक संघटना जसे, संयुक्त राष्ट्रसंघ(UNO), आंतरराष्ट्रीय कामगार संघटना(ILO), आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना(WHO) किंवा युनिसेफ(UNICEF) ह्यांनी ऍडजस्ट केलंय की नाही, ते कळायला मार्ग नाही, पण जमून मात्र झक्क गेलंय. मग नंबर येतो आंतरराष्ट्रीय खेळ संघटनांचा. इथे क्रिकेट सोडलं तर वेगळीच मजा आहे. कारण बाकीच्या सगळ्या संघटना स्थापण्यामध्ये फ्रान्सचा पुढाकार होता, त्यामुळे सगळीकडे पूर्ण नावं फ्रेंच आहेत आणि त्यामुळे शॉर्टफॉर्म बनायला थोडीशी मदतच झालीये. उदाहरणार्थ, फिफा(FIFA{Fédération Internationale de Football Association}), आईबा(हे आई-बाबा च्या प्रचंड जवळ जातं पण हे बॉक्सिंग संघटनेचं नाव आहे)(AIBA{Association Internationale de Boxe Amateur}).
आता थोडी वेगळी नावं, आयएसओ(ISO{International Organization for Standardization}) हे जवळपास प्रत्येक नोकरदार वर्गाने ऐकलेलं नाव आहे, ह्याचा पण फुलफॉर्म शॉर्टफॉर्म ह्यात काहीही संबंध नसून शॉर्टफॉर्म हा ग्रीक शब्द isos(equal) वरून घेतला आहे हे मला ठाऊकच नव्हतं. मला आयएसओ ट्रेनिंग होईपर्यंत 'इंटरनॅशनल स्टॅंडर्ड्स ऑर्गनायझेशन' असं समजत होतो. जगातल्या जवळजवळ प्रत्येक भाषिक माणसाला कळणारा एक सर्वव्यापी सर्वसमावेशक शब्द म्हणजे "ओके"(OK). आता ह्या शब्दाला फुलफॉर्म सहसा लोक "ऑल करेक्ट" असा काहीसा सांगतात, प्रत्यक्षात "Ola Kala"(Everything is good) ह्या ग्रीक शब्दांवरून घेतला असण्याची दाट शक्यता आहे. शॉर्टफॉर्मची मजा आणि इंग्रज फ्रेंच अस्मितेचा टकराव ह्यांचं उत्तम उदाहरण म्हणजे जागतिक प्रमाणवेळेचा जगन्मान्य शॉर्टफॉर्म - UTC(Coordinated Universal Time). इंग्रजी की फ्रेंच अशी दुविधा निस्तरण्यासाठी, दोघांचाही नसलेला अर्थहीन शॉर्टफॉर्म मान्य केला गेला. मला विकीमातेने सांगितलं.
आमच्या कॉलेजमध्येही (प्रत्येक कॉलेजमध्ये असतात), एकसेएक शॉर्टफॉर्म असायचे. उदाहरणार्थ, अतुल म्हणजे "ऑल टाईम उदास लडका/लडकी". एखादा मुलगा फारच मुली मुली करणारा असेल, किंवा त्याच्या मागेपुढे अनेक मुली असल्या तर 'द्राक्ष आंबट' ह्या भावनेने, त्याला "वापीलिंपी"(वासना पीडित लिंग पिसाट) म्हणायचं. आता ह्याचा फुलफॉर्म अगदीच डेडली असला(आणि प्रत्यक्ष जगात तो अनेक जणांना खरंच लागू होत असला) तरी तो कॉलेजात अगदी कॅज्युअली सांगितला जायचा.
लोक ह्या शॉर्टफॉर्म्स चा उपयोग एकमेकांची विकेट काढण्यासाठी करतात. माझ्या कंपनीतला एका मुलाने एक दिवस सकाळी मेसेंजरवर मला मेसेज पाठवला, "जीएम" (गुड मॉर्निंग), मी त्याला रिप्लाय केला "डीजीएम" (उगाच मस्ती), तर त्याने मला माझं अज्ञान दूर करण्यासाठी "जी आणि एम" हायलाईट करून "गुड मॉर्निंग" असं लिहून पाठवलं, मग मी, "डी, जी आणि एम" हायलाईट करून "डेफिनेटली गुड मॉर्निंग" असं(पुन्हा उगाच मस्ती - यू एम) परत लिहून पाठवलं. आता माझा एक मित्र पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत होता. तो मला त्याच्या एका संध्याकाळीबद्दल सांगत होता. "काय झालं, मी आणि माझा एमएल, माझ्या पीएम बरोबर मीटिंग करत होतो, ती झाल्यावर आम्ही केटी सेशनला गेलो. मग केटी सेशन झाल्यावर आमचं ठरलं की आपण एसपीडीपी खायला बाहेर जाऊया. मग ते झाल्यावर थोडा टीपी करून परत येऊया." मी शांत चित्तानं त्याला म्हटलं आता फुलफॉर्म वापरून वाक्य परत बनव. "काय झालं, मी आणि माझा मॉड्युल लीडर, माझ्या प्रोजेक्ट मॅनेजर बरोबर मीटिंग करत होतो, ती झाल्यावर आम्ही नॉलेज ट्रान्सफर सेशनला गेलो. मग नॉलेज ट्रान्सफर सेशन झाल्यावर आमचं ठरलं की आपण शेव पुरी दही पुरी खायला बाहेर जाऊया. मग ते झाल्यावर थोडा टाईमपास करून परत येऊया." मी एक सुस्कारा सोडला (मनात) "काय ही भाषेची दुरवस्था!" (व्यक्त)"सोड यार मी निघतो आता, माझी सीएसटीची ट्रेन मिस होईल."(पुन्हा मनात)"डब्ल्यू टी एफ(WTF)?"
मग हल्ली बझकट्ट्यावर पाहतो तर सगळेच शॉर्टफॉर्ममध्ये बोलतात. माझा ऊर नुसता अभिमानाने भरून येतो. कारण आत्तापर्यंत सगळे शॉर्टफॉर्म फक्त इंग्रजीतच पाहत होतो(वापीलिंपि चा सन्माननीय अपवाद वगळता), इथे कट्ट्यावर मात्र मराठी शॉर्टफॉर्म्सचं दळिद्र घालवायचा सगळ्यांनीच विडा उचललाय. इथे सुद्धा लोक वर वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला हवे तसे शॉर्टफॉर्म्स बनवतात. शुभ रात्री चं कुणी शुरा करतं, कुणी शुत्री करतं, काय वाट्टेल ते चालतं. पण सगळं मराठीत आहे ना, म्हणून "इट्स ओके!"
फारच पकवापकवी झाली आता इथेच पोस्ट संपवतो नाहीतर कॉमेंट्स मध्ये सगळ्यांना माझ्यासाठी RIP(Rest In Peace) असं लिहावं लागेल.

5/04/2010

आग - द स्टेन - ३

सूचनाः ही कथा भलतीच मोठी झाल्याने मला तीन भागांमध्ये विभागावी लागली आहे. एकच भाग वाचल्यास जास्त अर्थबोध न होण्याची शक्यता आहे.
भाग १
भाग २ पासुन पुढे

वजिरा-वजिरी
"त्या हरामखोर चिमण्याने मुद्दाम आपल्या होणार्‍या बायकोला माझ्या घामाचा पैसा दिला, मी काही बोललो नाही. त्याच्यामुळे गुजरातेची पार्टी नाराज झाली, मी काही बोललो नाही. तुमच्या लातूरवाल्यांना पण काम मिळू नाही दिलं साल्यानं, मी काही बोललो नाही. पण काका आता हद्द झालीये. त्यानं माझ्या त्या "तिला" स्वतः लक्ष घालून व्हिसा मिळवून दिलाय. आता ती येतेय इथे माझ्या उरावर बसायला." तुळजाराम रागाने लाल झालेले असतात. “त्यातून ती मूर्ख तारा आपली खरेदीविक्री सोडून त्या प्रेम आणि प्रेमभंगामध्ये बुडून बसलीये, फोनपण नाही उचलत आहे आपला. साले सगळेच पार्टनर्स एकाहून एक भ्रमिष्ट आहेत. एक दारू बनवणारा, एक स्वतःच्या प्रेमात पडलेला सिनेनट. ग्रहच फिरलेत म्हणायचे माझे."
(आता कॅमेरा पुन्हा डोक्याकडून)"शांत हो, तुळ्या. असं एक्साईट व्हायचं नसतं. थंड डोक्याने गेम करायचा असतो. मी गेली चाळीस वर्ष का टिकलोय असं तुला वाटतंय? हे पाणी पी आधी."
(कॅमेरा हळूवार उजवीकडून फिरत तुळ्याच्या डोक्यामागे स्थिरावणार.)काकांचं हे काळजी घेणारं नवंच रूप पाहून तुळ्या थोडा शांत होतो.
"हे बघ. अजूनी वेळ गेलेली नाही. आता त्याच्याच शस्त्राने त्याला मात दे. काढ एखादं लफडं बाहेर. मी दिल्लीत सांभाळतो."
".."
[दोन दिवसांनंतर]
(कॅमेरा काकांच्या डोक्यामागून, त्याच्या उजवीकडे असणारा त्यांचा टीव्ही फ्रेम मध्ये येईल असा)
(टीव्हीवरचा रिपोर्टर सांगत असतो)"काल तुळजारामांनी गौप्यस्फोट केल्यानंतर अडचणीत आलेल्या चिमणरावांनी आज तुळजारामांवर पलटवार केलाय. दरम्यान, दिल्लीत चिमणरावांच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टीचीच हवा आहे. हे वैयक्तीक हेव्यादाव्यांचं फलित आहे, की बुद्धिबळाच्या पटावरच्या दोन खेळाडूंनी केलेली वजिरा-वजिरीची जोखमीची चाल आहे, हे वेळच सांगेल."
काकांच्या टेबलावरचा फोन वाजतो.
"हॅलो काका, अहो, तो चिमण्या भलताच चिवट निघतोय हो. च्यायला, आपली पण सगळी कुलंगडी बाहेर येतील हो. बघा जरा."
"शांत व्हा उत्फुल्ल." काकांचा पेटंट गालात कापसाचा बोळा ठेवल्यासारखा धीरगंभीर आवाज."बघू काय करता येतंय ते. आपण चुकीच्या माणसाला वजिर बनवलंय हे खरंय, पण समोरचा वजिर घेऊनच मी आपला वजिर मारलाय. थोडे दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल, पण दोनेक महिन्यांत सगळेजण विसरून जातील. विश्वास ठेवा, मी तुमच्याहून जास्त पावसाळे पाहिलेत." ते कुत्सित हसत म्हणतात. "बरं ते सोडा. पोरीला सांगा, माझा जावई आणि पोरगी सिंगापूरहून येतायत, एक चार्टर प्लेन बुक करून ठेव म्हणावं."
स्प्लीट स्क्रीन करून उत्फुल्ल आणि काकांचा टॅटू दाखवायचे आणि मग फेडींग स्क्रीन.

"बिन नावाचा प्रसंग"
तो चेहर्‍यावर पाणी मारून पुन्हा आरश्याकडे बघतो. तोंड पुसतो आणि दरवाजा उघडून बाहेर पडणार एव्हढ्यात मला शर्टावर कसलासा डाग पडल्याचं दिसतं. तो साफ करायला पुन्हा नळ उघडतो आणि अचानक कसलासा मोठा आवाज होतो. तो बाहेर बघणार एव्हढ्यात त्याला मागून कुणीतरी आल्याचा भास होतोतो वळणार एवढ्यात त्याला एकदम हलका हलका झाल्यासारखं वाटायला लागतंतो पाहतो, तर त्याचं निष्प्राण शरीर जमिनीवर पडलेलं असतं.
"आयला, हे काय?" तो जिवाच्या आकांतांने ओरडतो आणि वळून पाहतो, तर "एकलव्य" मधल्या अमिताभसारखा गेटप करून एकजण उभा असतो. (एकलव्य मधल्या अमिताभ सारखीच ह्याची ही दृष्टी अधू दिसली पाहिजे.)
"मी यमदूत, मित्रा. आपल्याला आता अनंताच्या सफरीला जायचंय."
"अहो, पण इतक्या लवकर? अहो, माझं लग्नही नाही झालंय अजून."
"आता मी काय करू पोरा, माझाही जीव तुटतो रे, पण काय करणार नोकरी आहे. रिटायरमेंटला दोन महिने आहेत अजून, काम पूर्ण नाही केलं तर चित्रगुप्त पेन्शनीचे वांधे करेल रे."
"खरंय आजोबा, समजू शकतो मी. असो. चला." तो आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं आपलं ऑफिस बघून ओरडतो. "च्यायला ऑफिसात आग कसली?"
"अरे वेड्या, बॉम्ब फुटलाय तिथे." तो कपाळाला हात मारतो.
आजोबा त्याला घेऊन तरंगत एका व्हिडीओकोच बसपाशी येतात. चल आत.
"पण, माझ्या ऑफिसातले बाकी लोक कुठे आहेत?"
"अरे ही पहिली बस आहे. तुला मी जरा जास्तच लवकर आणलेलं दिसतंय. ते येतील मागच्या बसनी. चढ बघू तू आत.
तो आत चढतो, तर आत ७०-८० गणवेशातले लोक बसलेले असतात. तो चालत चालत बसच्या शेवटाकडे जातो, तर तिकडे अगदी गरीब पोटं खपाटीला गेलेले, डोळ्यांखाली काळं झालेले असे गावाकडचे लोक असतात.
"हे कोण लोक हो आजोबा?"
"अरे हे पुढे आहेत ते सीआरपीएफ चे जवान आहेत, आजच नक्षली हल्ल्यात मेलेत. आणि हे विदर्भातले शेतकरी आहेत."
"..."
अचानक बस सुरु होते आणि बसमधला टीव्ही सुरू होतो.
बसवर कुठल्याश्या न्यूजचॅनेलवर आधी चिमणरावांच्या आणि तुळजारामांच्या गच्छंतीची बातमी चघळली जात असतेमग तासाभराने सानिया मिर्झाच्या शोएब मलिकशी होत असलेल्या लग्नाचं रिसेप्शन दाखवत असतात. सगळे जवान आणि शेतकरी नवलानं ती बातमी पाहू लागतात. तो ही उत्सुकतेनं आपली बातमी येतेय का ते पाहू लागतो. पुढचा अर्धा तास तीच बातमी चालू असते. खाली फक्त "नक्षलवादी हल्ल्यात ८० सीआरपीएफ जवान ठार" आणि "मुंबईत खाजगी कंपनीत बॉम्बस्फोट" एवढ्या बातम्या स्क्रोल होतात. शेतलर्‍यांची तर काहीच बातमी नसते. तो डोळे मिटून स्वस्थपणे बातमीच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू असलेलं "राजा की आयेगी बारात.." हे गाणं ऐकत राहतो.
"अहो ह्याचं नाव सापडत नाहीये, हजार चौर्‍याऐंशी" चित्रगुप्त वैतागून यमदूत आजोबांना म्हणतो.
"काय?" तो चाट पडतो.
"असं कसं असेल हो. मी वेळेच्या दोन मिनिटं आधीच ह्याला बाहेर काढलं, पण म्हणून काय नाव नसेल असं थोडंच. जरा पुन्हा बघा ना!" आजोबा अजिजीने म्हणतात.
"अहो नाहीये हो. कॉम्प्युटरला किती वेळा सर्च क्वेरी देऊ मी."
"अहो. पांढराशुभ्र स्वच्छ शर्ट घातलेला आरश्यासमोर उभा असलेला मुलगा, असंच वर्णन सांगितलं होतंत ना तुम्ही मला?" आजोबा विचारतात.
"ते वर्णन मी नाही, कॉम्प्युटरनी दिलं होतं."
(त्याच्या डोक्यावर प्रकाशझोत पडतो.) "आयला आजोबा, गेम केलात तुम्ही. तो मी नसणार. हे बघा, माझ्या शर्टावर डाग आहे. तो माझा मित्र, बाहेरच्या आरश्यासमोर उभा होता, त्याला आणायचं होतं. त्यानेही पांढराशुभ्र शर्ट घातला होता."
चित्रगुप्त कपाळाला हात मारतो. "आता जा परत सोडून या ह्याला. गेल्या दोन महिन्यातली ही तिसरी केस आहे. आणि आता त्यामुळे ह्याच्या मित्रालाही आणता येणार नाही. त्याची वेळ गेली. मायनॉरिटी रिपोर्ट बनवावा लागेल त्याचा. आणि हो, ह्याचं शरीर अजून ठीक असेल तरच ह्याला जाता येईल. नाहीतर, पुढच्या जन्माची वेळ येईपर्यंत हा इथेच प्रवेशद्वाराजवळ थांबेल त्या मागच्या तीन केसेस सारखा."
तो चित्रगुप्ताने केलेल्या अंगुलीनिर्देशाकडे बघतो. तिकडे एक सुंदर मुलगी बसलेली असते आणि बरोबर एक म्हातारा-म्हातारी. तो (मनात) "च्यायला, थांबावं लागलं, तरी एव्हढी वाईट अवस्था नाही."(इथे एक पांढर्‍या कपड्यांतलं ढगांवरचं गाणं टाकता येऊ शकतं.)
मग एकदम भानावर येऊन तो म्हणतो, "आजोबा, चला लवकर, त्या बसपेक्षा फास्ट काही आयटम नाहीये का?"
चित्रगुप्त आजोबांकडे एक चावी फेकतो.
तो, हार्ले डेव्हिडसनवर आजोबांच्या मागे बसलेला असतो. दोघेजण त्याच्या ऑफिसपाशी येतात. आग आटोक्यात आलेली असते. अग्निशामक दलाचे जवान त्याच्या शौचालयाच्या दिशेने येत असतात. तो आजोबांकडे बघतो, आजोबा हार्लेचा स्टॅंड शोधत असतात.
तो ओरडतो, "अहो आजोबा, इथे माझा जीव खालीवर होतोय. आणि तुम्ही.." तो पुढे होऊन स्वतः स्टॅंडवर लावतो.
"अरे पोरा, माझ्या ग्रॅच्युईटीतून कापून घेतील डॅमेजेस. म्हणून एव्हढी काळजी."
मग ते त्याला पुन्हा त्याच्या बॉडीत टाकायला जातात, तेव्हा त्याची बॉडी उचलली जात असते. ते चटकन त्याच्या डोक्यावर हात ठेवतात.
तो एकदम दमेकर्‍यासारखा खोकत उठतो. जवान दचकून स्ट्रेचर पाडतात.
------
बाहेर त्याचा मित्र त्याच्या स्ट्रेचरजवळ येतो.
"तुझे देखके कितनी तसल्ली हो रही है! तू जानता है, सब कहते है मेरा बचना चमत्कार है। मैने तेरी तो उम्मीद ही छोड दी थी।"
तो स्वतःशीच एक स्मित करतो, (मनात) "तू पूछ रहा था ना, किधर जा रहा है? उस सवालका असली जवाब अभी देखके आया हूं।"
त्याच्या त्या स्मितावरच फेडींग स्क्रीन.
समाप्त
कास्टींग तुम्हीच सगळे ठरवा.

5/03/2010

आग - द स्टेन - २

सूचनाः ही कथा भलतीच मोठी झाल्याने मला तीन भागांमध्ये विभागावी लागली आहे. एकच भाग वाचल्यास जास्त अर्थबोध न होण्याची शक्यता आहे.
भाग १ पासून पुढे

"काका"
स्थळ - काकांचं ऑफिस.
वेळ - स्पेसिफिक काही नाही, कारण सगळं ऑफिस कृत्रिम दिव्यांनी उजळलेलं आहे.
(काकांवर कॅमेरा मागून मारायचा. काकांचं टक्कल फक्त दिसलं पाहिजे. थोडं कंटेम्पररी वाटण्यासाठी डोक्याच्या खालच्या भागापासून मानेपर्यंत एखादा टॅटू दाखवता येईल. डब्ल्यू डब्ल्यू ई च्या बटिस्टा वगैरे सारखा. आणि काकांच्या पात्राचा आवाज थोडासा धीरगंभीर पण गालात कापसाचा बोळा ठेवल्यासारखा{काकांचं माऊथ कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे.} आणि काकांचं पात्र बोलताना माना हलवणार नाही. फक्त डोक्याच्या स्नायूंची जी हालचाल होईल तेव्हढीच. बाकी व्हॉईसओव्हर वाटावा असाच आवाज. समोर दोन गूढ व्यक्तिमत्व बसलीयत.)
"काय आहे? आमचा माणूस थोडा काळजीत पडलाय. तुम्ही जरा बघा की चिमणराव." काका.
"त्याचं काय आहे काका, आम्ही आमच्या पार्टीला शब्द दिलाय हो. म्हणून म्हणतो थोडं कन्सिडर करा. ह्यावेळेस सांभाळून घ्या. तेव्हढे टक्के पोहोचवतो की." डावीकडे {कॅमेराच्या} बसलेले चिमणराव डोळा मारतात.
मग बाजूच्यांनाही कंठ फुटतो. "काका, अहो एव्हढं ह्यावेळेस सांभाळून घ्या. मी पण मराठी, तुम्ही पण मराठी."
"हाहाहा..."काका पेटंट हसतात. "च्यायला अहो, आपल्या महाराष्ट्राच्या स्थापनेला पन्नास वर्षं झाली आणि अजून तुम्ही मराठी-मराठी करताय. अहो, बाहेर पडा ह्या कूपमंडूक वृत्तीतनं."
"काका, तुम्ही जनतेसमोर भाषण नाही देत आहात. हिअर, देअर(होहिअर आणि देअर एका मागोमाग एकइफेक्ट आला पाहिजे ना) इज सिरियस मनी इन्व्हॉल्व्हड."
"हाहाहा. तर तुम्ही ऐकणार नाही तर." काका सुस्कारा सोडतात.
चिमणराव मनातून चांगलेच धास्तावतात. (मनात) "च्यायलाह्या नंदेनं सगळा घोटाळा करून ठेवला रावत्यादिवशी काय मला बुद्धी सुचली आणि मी ते स्वेट इक्विटी बोलून गेलोआता हे नसतं झेंगाट गळ्यात आलंय. चांगला चिवचिवत होतो. आधीच नको तिकडे नको ते बोलून अडकलेलो आहे. त्यातून आता काकांसारख्या मुरब्बी खेळाडूशी पंगा घ्यावा लागतोय. बाईपाई राज्य बुडाली म्हणतात, आमचंही योगदान ह्या वदंतेला असं नको व्हायला."
चिमणराव आणि तो दुसरा माणूस दोघंही खाली मान घालून बसतात.
"ठीक." (आता कॅमेरा हळूवार डावीकडून फिरत, समोर बसलेल्या दोघांच्या मध्ये येऊन स्थिरावतो. काकांचा चेहरा आता मध्यभागी आहे. त्यांच्या मागे एकीकडे एक १०.१० वाजता थांबलेलं घड्याळ आहे आणि दुसर्‍या बाजूला चालू घड्याळ आहे.) काका सावकाश डोळ्यांवरचा चष्मा काढतात. "जाऊ शकता तुम्हीबघतो आता काय करता येतं ते."
चिमणराव दरवाजा उघडून बाहेर पडतात. त्यांचे हातपाय अजून थरथरताहेत. आणि समोरून तुळजाराम चालत येतात. तुळजारामांबरोबर अजून कोणीतरी आहे. तुळजाराम आणि चिमणराव एकमेकांकडे अनोळखी नजरेने बघतात. जणू एकमेकांचा अदमास घेतात. तुळजाराम आत शिरतात आणि चिमणराव आपल्याबरोबरच्या माणसाला म्हणतात. "पक्का आहे हा साला."
(आत) "नमस्कार काका." (कॅमेरा अजूनी काका आणि दोन घड्याळे असाच आहे.)
"हं. तुळ्या, हेच का ते गुजरातेची पार्टी."
"होय. काका. तो चिमण्या साला. पाठीत खंजीर खुपसला काका त्याने."
"असं म्हणू नको. त्यानं चान्स मारला. तुला जमलं नाही सांभाळायला." मग ते गुजरातेच्या पार्टीकडे बघून म्हणतात. "माफ करो भाई. इस बार गडबडी हो गयी. अगली दफा जरूर करेंगे. अभी आप जाईये, मेरा सेक्रेटरी आपका सारा इन्तजाम कर देगा." काका 'इंतजाम' शब्दावर जोर देतात आणि त्यावेळी आचमनाची क्रिया करून दाखवतात.
पार्टी उठल्यावर ते तुळजारामांकडे बघतात आणि त्याच्याकडे रोखून पाहत तर्जनी उचलून म्हणतात, "हे बघ तुळ्या, आता शेवटचा चान्स आहे. लातूरची पार्टी आलीय एक. ह्या गुजरात्यांऐवजी त्यांना द्यायचंय काम. तेव्हा चिमणला आता कसं पटवायचं ते बघ. अजून तरी मला वाटत नाही, मी ह्या सगळ्यात उतरायची गरज आहे." तुळ्या काकांच्या क्षणोक्षणी भाव बदलण्याच्या विलक्षण हातोटीकडे पाहून भावविभोर झालेला असतो. "आणि तुला कुठेही जायचं असलं तर आपले उत्फुल्लजी आहेतच विमानमंत्री, हा त्यांच्या पोरीचा नंबर घे. एअर इंडीयाचं कुठलंही विमान, कधीही कुठेही न्यायची सोय करून देईल ती. ठीक आहे? निघा आता."

"गॅबीचा पासपोर्ट"
तुळ्या बाहेर पडतो आणि घरी फोन लावतो.
"हॅलो मीना.."
"ओ डार्लिंग, मी मीना नाही मी गॅबी बोलतेय."(इथे बजेट असल्यास आपण प्रत्यक्ष परदेशी नटी वापरू शकतो {राज ठाकर्‍यांची परवानगी घेऊन} किंवा नुसता आवाज.)
तुळजाराम चमकून आपल्या फोनच्या स्क्रीनकडे बघतो. (मनात) "आयला, हे जान म्हणून बायकोचा आणि जानू म्हणून हिचा नंबर ठेवल्यामुळे सगळा घोळ झालाय."
"हाय जान आपलं जानू, कसं चाललंय. आज तुझी आठवण झाली म्हणून फोन केला."
"हो..हो..माहितीये किती आठवण येते ती." गॅबी जेन्युईनली लटक्या रागाने म्हणते."
"अगं तुझ्या गळ्याशप्पथ."
"माझ्या का, स्वतःच्या गळ्याशप्पथ घे की."
"बरं, माझ्या गळ्याशप्पथ." तुळजाराम ऊर्फ तुळ्या शेजारच्या खांबावर हात ठेवून म्हणतो.
"अं.."गॅबी. तुळजाराम (मनात) "लाडे लाडे अक्कल वाढे."
"ह्यावेळेस किनई, मी आले की आपण एकत्र ताजमहाल बघायला जाऊ. आणि ए, तू बायकोला कधी सोडणार आहेस. मग आपण लग्न करू. हां"
तुळजाराम (मनात) "हं. रंगव स्वप्नं. आधी येऊन तर दाखव इथे." (व्यक्त) "कधी येणार आहेस जान, आपलं जानू."
", हे सारखं जान काय म्हणतोयस. कुणी दुसरी तर नाही ना."
"अगं नाही गं. तुम्हा बायकांची जातच संशयी. तिकडे ती आणि इकडे तू."
"कोण तिकडे?"
", ते सोड गं, तू आधी सांग कधी येतेयस ते."
"अरे माझा पासपोर्टच हरवला होता सांगितलं ना तुला. आता मला भारताचा व्हिसा परत काढायचाय. अर्ज केलाय. बघू किती दिवस लागतील ते. . तू तेव्हढं बघ ना रे."
"बरं बरं, पूर्ण नाव काय म्हणालीस?"
"इश्श, विसरलास?"
"..."
"...."
"बरं. मी बघतो. ठेवू आता फोन?"
फोनकडे निरखून बघत आता तुळ्या नीट बायकोला फोन लावतो.
"जान, मी बोलतोय गं."
"हां."
", तू त्या नंदा धक्केला ओळखतेस ना चांगली?"
"कोण, ती नटवी? चिमणरावांची होणारी तिसरी बायको?"
"हो, हो तीच."(मनात)"च्यायला ह्या बायका.."
"आमच्या किटी पार्टीतच तर आहे. तिचं काय झालं? मोडलं की काय?"
"अगं नाही गं माझे आई. तिला एकदा चहाला बोलाव आपल्याकडे. कशाला ते नको विचारूस. मी सांगतो घरी आल्यानंतर."
आता तुळ्या चिमणरावांना फोन लावतो.
"चिमण, मी तुळ्या बोलतोय रे."
"का रे बाबा आमची आठवण झाली? मघाशी तर ओळखही दाखविनास."
"अरे बाबा, दुसर्‍या माणसांसमोर अश्या ओळखी दाखवायच्या नसतात. कधी शिकणार बाबा तू. अरे काकांकडून शिक काही, नाहीतर दिल्लीत निभाव लागणं कठीण आहे तुझा."
"ते सगळं सोड रे. काम काय काढलंस बोल."
"अरे हो, ते जरा नाजूक काम आहे रे."
"बोल तर." एक छद्मी हसू आणत चिमणराव म्हणतात.
"अरे ते एका पोरीबद्दल बोललो होतो आठवतंय मी मागे? तेच रे आपण काकांच्या फार्म हाऊसवर हुरडा पार्टीसाठी गेलो होतो आणि तू तुझ्या ब्रॅंडच्या स्कॉच साठी अडून बसला होतास."
"बरं बरं. ते होय." चिमणराव थोडेसे वरमून म्हणाले.
"हां. तर तिचा व्हिसा अर्ज आला असेल. तो.."
"लगेच प्रोसेस करू का?"
"नाही नाही. तेच तर. रिजेक्ट करून टाका."
"काय?" चिमणरावांना कळेना. (मनात) "च्यायला काकांसारखंच काकांच्या माणसांचंही काही कळत नाही.)
"हो. ते जरा महत्वाचं आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो ना मित्रा?" तुळ्या अधीर झाला होता.
"बरं बरं, तू एक काम कर आमच्या जोश्यांना मेल करून टाक. मी बघतो पुढे."

"तारा आणि मिकीमाऊस - "
मैदानाच्या कडेला एकटीच तारा उभी आहे.
"नेहमी मॅचच्या वेळेस मिकी ऑफलाईन असतो. नक्कीच माझ्या टीममधला कोणी असावा. प्रॅक्टीस सेशनच्या वेळेसही तो ऑफलाईन असतो. कोण असेल तो? मेघनाद तर नाही. ! पण तो राक्षस आहे. पण तरी काय झालं. मला कित्ती समजून घेतो तो. आणि पुन्हा चांगला फिट आहे. एव्हढाही वाईट नाहीये काही तो. कॉन्ट्रास्ट मॅचिंग छानच दिसेल आमचं. पण तो नसला तर. कोणी दुसरा हॅंडसम असला तर? कित्ती मजा नाही." तिची तंद्री अचानक शांत झालेल्या प्रेक्षकांमुळे भंग पावते.
छावा मान खाली घालून आपला तुंदिलतनू देह सावरत डगआऊटच्या दिशेने चालत येत असतो.
"मेल्या सुक्कळीच्या तुजा मुडदा बशिवला .. माजं करोडाचं नुसकान केलं मेल्या तू..."
"अगं पण तारा ऐकशील तर खरं! अशी उल्केसारखी कोसळतेस काय सारखी!"
"मला कायबी ऐकायचं न्हाय. तुला येव्हढं साधं समजत न्हाई, आरं तुझ्यावर येव्हढा पैसा ओतला म्या. तू जिंकून द्यावस म्हून आणि तू खाण्या-पिण्याबिगर आन पोरी फिरवल्याबिगर कायबी न्हाय केलंस. आरं एखाद्या मॅचमध्ये तरी खेळायचंस. त्यो मेघनाद बघ कसा झ्याक खेळतो ते. उगाच न्हाय मी त्यास्नी कर्णधार केलं."
"मग घेऊन बस उरावर त्यालाच." बॅट फेकून छावा ड्रेसिंगरूमकडे निघून गेला. ताराला का कुणास ठाऊक वाईट वाटतं.
छावा (स्वतःशीच) "येतो एखाद्याला बॅडपॅच. म्हणून काय कर्णधारपदावरून काढून टाकायचं. हिच्यावरच्या प्रेमापोटी तो अपमानही गिळला. पण ही त्या राक्षसाच्याच प्रेमात. त्या फ्रिजवाल्यानं सोडल्यावर हिला आधार दिला मी. आणि आता फळं खातोय हा मेघनाद." तो फोन उचलतो, कुणालातरी डायल करतो, तर समोरच्याची कॉलर ट्यून असते, "भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राज कुंवर.." रागाच्या भरात छावा फोन फेकून देतो. तो फोन ड्रेसिंगरूमच्या बाहेर जाऊन पडतो.
"श्या." छावा मटकन खाली बसतो. "ही माझ्यापासून दूर जायला लागल्याने मी दारूच्या आहारी गेलोय, अनिर्बंध खातोय, त्यामुळे फॉर्म आणि फिटनेस दोन्हीचे बारा वाजलेत आणि त्यामुळेच तीही अजून दूर जायला लागलीये. काय करू कळत नाही."
काहीश्या अंतःप्रेरणेने तारा ड्रेसिंगरूमकडे येते आणि तिला बाहेर छाव्याचा मोबाईल दिसतो. ती तो उचलते तर त्याच्या वॉलपेपरवर तिचाच फोटो असतो, गेल्या स्पर्धेवेळी तिनं एका सामन्यानंतर आनंदातिशयाने त्याला मिठी मारली होती तेव्हाचा. ती विचारातच त्याचं कॉन्टॅक्ट बुक उघडते. त्यात तिला तिचं नाव दिसत नाही. (मनात) "असं कसं?" मग ती स्वतःचा नंबर डायल करते आणि कॉलचं बटण दाबते. स्क्रीनवर अक्षरं झळकतात, "मिनी". तिच्या हातून त्याचा मोबाईल गळून पडतो. तिच्या डोळ्यांत अश्रू गर्दी करतात. ती जायला वळते तेव्हढ्यात त्याचे ते शब्द तिच्या अंगाअंगावर रोमांच उभे करतात.
"हो मी वारा, मी पाऊस - अगं तारा, मीच तुझा मिकीमाउस."
ती भावातिशयाने त्याला जाऊन बिलगते. तिच्या मोबाईलवर कुठलातरी फोन वाजत राहतो, पण तिला आता जगाची पर्वा राहिलेली नाही.


क्र....म....शः......!!!

 भाग ३

5/02/2010

आग - द स्टेन - १

प्रस्तावना - गेल्या सोमवारी माझं नेहमीचं स्फूर्तीस्थान, 'झी सिनेमा यूके' वर एक चित्रपट लागला होता.(त्याला मी अप्रतिम, बेकार किंवा तत्सम कुठलंही विशेषण लावलं नाही, कारण काही सुचत नाहीये.) तर त्या सिनेमाचं नाव - "दाग - द फायर". मी हा सिनेमा कदाचित चौदाव्यांदा पाहत असेन. मग तो सिनेमा जेव्हा नुकताच रिलीज झाला होता, तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही मित्र मित्र चर्चा करत असताना विचार करत होतो, की सिनेमाचं नाव,"आग- द फायर" असं तरी असायला हवं होतं किंवा "दाग - द स्टेन" असं तरी असायला हवं होतं. पण मग तेव्हाही कुणाच्यातरी सुपीक डोक्यात ही कल्पना आली की जेव्हा आपण सिनेमा काढू, तेव्हा "आग - द स्टेन" असं नाव ठेवून काव्यात्म न्याय करू. मग अनेक वर्षे लोटली. इतक्या वर्षांत जितके वेळा सिनेमा पाहिला, तितके वेळा माझ्या भविष्यकालीन सिनेमा विषयी डोक्यात विचार आला. पण कथा काही सुचत नव्हती. मग काही दिवसांपूर्वी बझाबझी करताना, सचिनच्या बझवर थोडीशी रंगलेली एक चर्चा वाचताना(आणि अर्थात करताना) डोक्यात कीडा वळवळला. नाही नाही, डोक्यात सफरचंद पडलं, बाथटब मधून पाणी बाहेर पडलं आणि शेवटी, "आग- द स्टेन" ला कथा मिळाली. म्हटलं, उडवून टाकू बार.


"बिन नावाचा प्रसंग"
वेळ - संध्याकाळी ५.३०.
तो त्याच्या कार्यस्थानकावरून संगणक बंद करून उठतो. अंगावर जाकीट चढवतो आणि दप्तर खांद्यावर टाकून तो बाहेरच्या दिशेने चालायला लागतो. बाहेर निघण्याच्या दरवाजाच्या अगदी बाजूलाच असलेल्या प्रसाधनगृहामध्ये तो प्रवेशतो. प्रसाधनगृहात आरशासमोर त्याचा मित्र उभा आहे. तो त्याचा टाय व्यवस्थित करतोय.
तो(मनात) - साहेबाने थांबायला सांगितलेले दिसतेय.
मित्र(माझ्याकडे पाहून - व्यक्त) - किधर जा रहा है?
तो(प्रतिक्षिप्तपणे) - घरपे (आणि तो एका शौचालयात प्रवेशतो)
मित्र(तो दरवाजा उघडून अगदी आत शिरतानाच) - अबे..वैसे नही...(पुढचे तो ऐकू शकत नाही)किसी सुपरमार्केट जा रहा है क्या? ऐसे पूछ रहा था...
तो(आतमध्ये आरशाच्या समोर{आतमध्ये देखील एक आरसा आहे}-मनात) - "मी "शौचालयात" असे अजून समर्पक उत्तर देऊ शकलो असतो" आणि तो स्वतःशीच हसतो.
त्याच्या कुत्सित हसणार्‍या चेहर्‍यावर फेडींग स्क्रीन.

"तारा आणि मिकीमाऊस - "(प्रेरणा यॉनिंग डॉगची ही नोंद)
छावा एका लालसर रंगाच्या खेळाच्या पोषाखात एका गोल फिरणार्‍या काचेच्या दरवाजातून आपला तुंदिलतनू देह सावरत प्रवेश करतो. त्याच्या पाठीवर लिहिलेलं छावा नाव वाचून दरवान त्याला ओळखतो आणि त्याची सही घेण्यासाठी आत धावतो, पण तो काचेचा दरवाजा त्याच्या उत्सुकतेच्या आड येतो आणि नाक चोळत तो धडपडत पुन्हा उभा राहतो. छावाच्या उजवीकडून आणि डावीकडून दोन मुली अचानक प्रकटतात आणि ते एका कोपर्‍यातल्या टेबलाकडे जातात. अचानक दरवाज्यातून विजेच्या वेगाने एक मध्यमवयीन तरूणी आत शिरते. तिच्या डोळ्यांवर मोठा काळा चष्मा असतो आणि अंगात मिकीमाऊसचं चित्र असलेला, छाव्याच्या पोषाखाच्याच रंगाचा टीशर्ट असतो. ती तडक छाव्याच्या टेबलाच्या दिशेने जाते. तिला येताना पाहून छावा थोडा चपापतो आणि एकदम दोन्ही मुलींना उद्देशून म्हणतो,
"ताई, आपण 'सांप्रतच्या स्त्रियांना सतावणारी वस्त्रटंचाई' ह्या विषयी चालवलेल्या कामाचा जो आढावा आत्ता घेतला, तो मला तितकासा समाधानकारक वाटला नाही, तेव्हा आपण लवकरच पुन्हा भेटून ह्याबाबत सविस्तर चर्चा करू आणि मग मी तुम्हाला तुमच्या ह्या चळवळीसाठी काही आर्थिक मदतही तेव्हाच देऊ करीन."
ताई, ह्या शब्दाने चपापलेल्या त्या तरूणी, पुढील वाक्य ऐकून चेहर्‍यावर एक मंद स्मित आणतात आणि एकदा त्या मध्यमवयीन तरूणीकडे आणि एकदा छाव्याकडे पाहून उठून निघून जातात.
"ये तारा, बस ना ! अशी धूमकेतूसारखी अचानक कशी काय?" त्याच्याकडे ती नक्की कोणत्या नजरेने पाहतेय हे त्याला तिने घातलेल्या मोठ्या चष्म्यामुळे कळत नव्हतं.
"आरं मेल्या, मी कवाची धुंडाळतेय तुला? कितींदा सांगितलंय तुला की आसं मैदान सोडून हिकडं-तिकडं भटकू नै. त्यो मेघनाद बघ कसा दिवसंरात घाम गाळित असतो."
"काय गं? अशी का बोलतेयस? तब्येत ठीक आहे ना?" छावाला कळेना प्रकार काय आहे!
"आरं, म्या नवा शिनुमा करत्ये. "हेच सौभाग्यवतीचं कुंकू". त्यामदी मला मुख भूमिका मिळालीया. मंग त्यापायी ह्याच पधतीनं बोलायाचं हाय मला आता. आतापरीस फकस्त एक दिस झालाया, अजून दुन म्हैने आसंच चालायाचं."
"..."
"आरं मेल्या, त्ये सम्दं सोड. आधी सांग, तू मैदान सोडून हितं काय करायाला आलयसा? तिकडं त्ये मेघनाद, त्येचा भाऊ, आनि त्ये बरीच मंडळी तुझी वाट पाहत्यात, जा! तुला कर्णधारावरून काढला आणि पार वाटोळं करून घेतलयंस रे.." त्याच्या वाटोळ्या पोटाकडे पाहत ती म्हणाली.
त्यानं आपला चष्मा काढला आणि दाढीचे खुंट कुरवाळत म्हणाला, "त्येनला आन तू लंकेस्नं आणि...मायला मी पण तुझ्यासारखाच बोलायला लागलो की...हां..ते साले लंकेचे राक्षस तुला प्रिय आहेत आणि मी आपला माणूस तुला नकोसा झालोय. तुला ना देशाची काही पर्वाच नाही. तुझा प्रेमी पण कोण तर म्हणे "मिकीमाऊस"..."
त्याचं बोलण तोडत रागाने ती म्हणाली, "माझ्या मिकीमाऊसबद्दल एक शब्द काढशीला तर कानाखली समई काढीन मी. त्यो किनई, माझा चॅट फ्रेंड आहे.." ती बोलता बोलता सुरनळी करण्यासाठी पदर शोधू लागली, मग टेबलावरचाच एक टिश्यू पेपर घेऊन त्याची सुरनळी करता करता पुढे म्हणाली, "तो फ्रिज दुरुस्तीवाला सोडून गेल्यावर ह्यो मला भेटला इंटरनेटवर. "मिकीमाऊस" हे त्याचं चॅटनेम हाय. मला आक्षी समजून घेतो तो. मी त्याला कध्धीच पाहिलं न्हाई अजून. त्यो म्हंतो, योग्य वेळ आल्यासुदीक भेटायचं न्हाय."
छावा आपल्या ओठांच्या कोपर्‍यातून हसत होता, एवढयात मेघनाद विकट हास्य करत त्यांच्या टेबलाजवळ आला. आणि त्याला पाहताच त्याच्या भोवती आजूबाजूच्या लोकांचा गराडा पडला, स्वाक्षर्‍या घेण्यासाठी. त्यांना मनसोक्त स्वाक्षर्‍या दिल्यावर तो आपल्या मूळच्या काळ्या चेहर्‍यावरचा काळा चष्मा काढत बसला.
"बरं झालं चष्मा काढलास ते, नाहीतर ह्या अंधुक उजेडात मला तुझे फक्त दात दिसत होते." छावा. तारा अस्वस्थ होऊन मेघनादाकडे पाहू लागली.
"हं हं हं..छान जोक मारतोस हां...बाकी अंधाराचा फायदा चांगला आहे, लोकांनी तुला ओळखलंच नाही." मेघनाद आपलं स्वाक्षरीचं पेन नाचवत म्हणाला.
"हं, ते मी मुद्दामहून वजन वाढवून घेतलंय, जेणेकरून लोकांनी ओळखू नये आणि सारखा त्रास देऊ नये. आम्ही काय तुमच्यासारखे दोन महिन्यांसाठी जंगलातून शहरात येत नाही ना खेळायला."छावाचा चेहरा एरंडेल तेल पी.(हे तेलाचं नाव आहे) प्यायल्यासारखा झाला होता.
तारा मधे पडणार एवढ्यात तिचं लक्ष मेघनादाच्या पेनाकडे गेलं, त्यावर मिकीमाऊसचं चित्र होतं.

"तुळजाराम आणि चिमणरावांची होणारी (तिसरी) बायको"
स्थळ - तुळजारामांच्या घरचा दिवाणखाना. चहाच्या टेबलावर तुळजाराम, मीनाताई आणि नंदाताई बसलेल्या असतात.
"आमचे हे किनई फारच द्वाड आहेत हो. मागे एकदा अमरावतीला शिकायला असताना, ह्यांनी आणि ह्यांच्या मित्रांनी काही पोरांना चिंचोके विकायचे आहेत म्हणून दुसर्‍या एका गल्लीतल्या पोरांना कळवलं. तर ती पोरं आली हो आणि कसलं काय, ह्यांच्याकडे चिंचोके नव्हतेच, मग ह्यांनी त्या पोरांना गावठी छर्र्याच्या बंदुकीचा धाक दाखवून पैसे काढून घेतले. पण नशीब म्हणतात ना, त्या पोरांमधला एक पोलिसाचा पोरगा." मीनाताई कौतुकाने आपल्या नवर्‍याचे पराक्रम सांगत असतात.
"अय्या मग?" नंदाताई खोटीखोटी उत्सुकता दाखवत म्हणतात.
"मग काय, काढल्या दोन रात्री जेलमध्ये. आहे काय त्यात. देशातली सगळी मोठी माणसं जेलमध्ये जाऊन आलीत. तेव्हाच मी मनानं ह्यांना वरलं." चहा भुरकणार्‍या तुळजारामांकडे कौतुकानं पाहत मीनाताई म्हणतात.
"पण मीनाताई, तुमचं हे दुसरं लग्न ना? आणि त्यातून तुम्ही तुळजाभाऊजींपेक्षा नऊ वर्षं मोठ्या नाही का? म्हणून भाऊजींच्या वडीलांनी तुम्हाला वारश्यातून बेदखल केलंय." नंदाताई निरागसतेचा आव आणून म्हणतात. तुळजारामांना चहा पिता पिता ठसका लागतो. मीनाताईंच्याही कपाळावर आठ्या उमटतात.
"वर बघा, वर बघा हो." त्यांच्या पाठीवरून हात फिरवत मीनाताई म्हणतात.
"हो, अगदी अहो. होते चूक एखादेवेळेस नाही का? पण बाकी तुमचं आणि चिमणरावांचं दोघांचंही तिसरं लग्न नाही का?" मीनाताई पलटवार करतात. ह्यावेळी कौतुकाने बघायची पाळी तुळजारामांची असते.
"चला मला निघायला हवं." मानापमानाचा प्रयोग आटपता घेण्यासाठी नंदाताई म्हणतात.
"अहो, जा बरं त्यांना सोडून या." तुळजाराम चमकून मीनाताईंकडे पाहतात. ते मनात म्हणतात, "मीनाताई काकांपेक्षाही जास्त वेगाने रंग बदलतायत." नंदाताईही चपापतात. त्या दारात जोडे पायात घालत असताना, मीनाताई प्रश्नार्थक चेहरा केलेल्या तुळजारामांना कानात म्हणतात, "त्या मॉडेलांना कसं बोलण्याच्या ओघात गंडवता, तसंच हिलाही जरा झुलवा. माहिती काढा. " आपल्या बायकोकडे अभिमानाने बघत तुळजाराम गाडीकडे जातात.
गाडीत बसून पट्टा लावल्यावर तुळजाराम रेडीओ लावतात.
"सात समुंदर....सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गयी"
"अय्या तुम्हाला कसं माहिती, मला आणि आमच्या ह्यांना हे गाणं फार आवडतं म्हणून. ते यू.एस. हून आणि मी दुबईहून जेव्हा भारतात आलो आणि भेटलो ना तेव्हा रेडीओवर हेच गाणं लागलं होतं. हाऊ सिंबॉलिक ना?"
"तुम्हाला हाऊ रोमॅंटीक म्हणायचंय का?" तुळजाराम शांतपणे म्हणतात.
"जाऊ दे." नंदाताई कॅटलकडे बघावं तश्या बघून म्हणतात.
"बाय द वे. मी गाणं लावलं नाहीये, रेडीओवर लागलंय."
"हम्म."
थोडावेळ शांततेत जातो. मागे रेडीओची गाणी अखंड चालू. "सात समुंदर.." संपल्यावर "बोई, बोई, बम ब ब बम बोई.." हे गाणं चालू होतं(रेडीओचं दृश्य असल्याने कॉपीराईटचा प्रॉब्लेम यायचा नाही बहुतेक). गाडी कायम वेगाने जात असते. तुळजाराम नंदाताईना न्याहाळतात. (मघाशी बायकोसमोर कसं न्याहाळणार). कॅमेरा हळूहळू नंदाताईंच्या महागड्या घड्याळावरून, त्यांच्या महागड्या जरीकाम केलेल्या पदरावरून त्यांच्या भरमसाठ मेकप केलेल्या चेहर्‍यावर येतो. तुळजारामांना एकदम "शेहनाझ हुसेन"चा चेहरा आठवतो आणि अचानक गाडी गचका खाते.
"सॉरी हां" तुळजाराम ओशाळून जात म्हणतात.
"ठीक आहे, जरा नीट पाहून चालवा हो." नंदाताई पुन्हा कॅटलकटाक्ष टाकून म्हणतात. मनात म्हणतात, "माझं मेकपचं सामान चांगलंच काम करतंय असं दिसतं. हा ही चांगलाच भाळलाय. आता ही नवी लाईन बाजारात उतरवायला हवी - 'मुड मुड के'"
"बाय द वे. ही स्वेट इक्वीटीची आयडीया कुठून आली हो." तुळजाराम फायनली विषयाला हात घालतात.
नंदाताई थोड्या सावध होतात. "का हो? हे काही बोलले नाहीत का तुम्हाला?"
"नाही म्हणजे तसं नाही, आपलं सहज विचारलं." आपण जरा जास्तच थेट हात घातला हे त्यांना जाणवतं."आता तुमच्यासारख्या देखण्या बाई आय मीन होणार्‍या बायकोसाठी कुणीही इतकं करेल हो. पण स्वेट इक्वीटी ही आयडीया भन्नाटच. आता आम्हीही आपल्या बाईसाठी आय मीन बायको साठी इकडेतिकडे जुगाड करतो, पण हे डोक्यात यायला फाईव्ह स्टार मेंदूच पाहिजे." तुळजाराम नावाला जागत शाब्दिक कंदी पेढ्यांचा पुडाच उघडतात.
नंदाताई मोहरतात. "अहो, काय सांगू, परवा किनई एक सिनेमा लागला होता कुठलासा. त्यात तो व्हिलन असतो ना तो एक डायलॉग मारतो. तो पाहून अचानक त्यांना ही कल्पना सुचली."
"काय?" गाडी पुन्हा गचका खाता खाता राहते. "कुठला सिनेमा?"
"अहो तो हो..." नंदाताई विचारात गढतात. तेव्हाच "बोई, बोई.." संपून "क्यूं ये बर्फ पिता है व्हिस्की में डालके.." हे गाणं सुरू होतं. आणि नंदाताईंच्या डोक्यावर सफरचंद पडतं (बाथटबचा सीन टाकल्यास, प्रेक्षक खेचण्यासाठी मदत होईल, पण "" सर्टिफिकेट मिळण्याचा धोका उत्पन्न होईल. मध्यममार्ग म्हणजे असा सीन होता, पण तो कापावा लागला अशी आवई उठवायची.). "हे गाणं होतं त्या सिनेमात.." नंदाताईएकदम ओरडतातगाडी पुन्हा गचका खाते.
"हे गाणं?"तुळजाराम विचारात गढतात. (मनात)"इथून स्वेट इक्वीटी?" (व्यक्त) "हे तर गुंडामधलं गाणं आहे!" आणि एकदम त्यांच्या चेहर्‍यावर प्रकाश पडतो.(डोक्यात पडतो हे दाखवायचा वेगळा प्रकार. किंवा डोक्यावर झोत पाडूनही हवा तसा इफेक्ट मिळेल कदाचित.
नंदाताई चालू होतात. "इश्श हो. गुंडा नाही का. मी किनई विसरभोळी झालीये मेली. अहो, त्यात नाही का तो व्हिलन पुढे "हसीना का पसीना" असा कायसा डायलॉग म्हणतो..तेव्हाच अगदी हे डोक्यावर सफरचंद पडल्यासारखे उठले.(इथे बाथटब टाकून काही फायदा नाही. ऑन द सेम लाईन आपण ह्या कथेचं नाव, "तुळजाराम, चिमणरावांची होणारी (तिसरी) बायको आणि सफरचंद(लक्षात आहे ना बाथटबची फक्त आवई आहे)" असं ठेवू शकतो.)..."
नंदाताई पुढे काय म्हणत होत्या हे तुळजाराम ऐकतच नाहीत, आणि आपणही त्यांचा साऊंडट्रॅक बंद करून, "क्यूं ये बर्फ पीता है.." बॅकग्राऊंडला चालू ठेवायचं. कॅमेरा विंडशिल्डवरून सरळ दोघांच्या चेहर्‍यावर. बाई अजून बरळतायत, तुळजाराम समोर पाहतायत आपल्याच तंद्रीत. गूढ इफेक्ट येण्यासाठी पाऊस दाखवू आणि इंटरमिटन्ट व्हायपर. बर्फाचं गाणं आहे म्हणून छोट्या गाराही दाखवता येतील.
अचानक बॉनेटमधून ठिणग्या उडायला लागतात आणि गाडी आचके देत थांबते. नंदाताई आणि तुळजाराम आळीपाळीने बॉनेटकडे आणि एकमेकांकडे बघतात आणि रेडीओवरचं गाणं बदलतं."टिप टिप बरसा पानी...पानी ने आग लगायी"(फायनान्सर्स ची इच्छा असल्यास इथे एक पावसातला सिडक्टीव्ह ड्रीम सिक्वेन्स टाकता येईल. मला विचाराल तर नको.) तुळजारामांचा फोन वाजायला लागतो, " नायक नही...खलनायक हूं मैं" दोन्ही गाणी एकत्र चालू. इथेच हळू हळू फेडींग स्क्रीन.


क्र....म....शः......!!!

 भाग २