5/23/2010

मला तर बाबा काहीच कळत नाही

फार वर्षांपूर्वी दूरदर्शन सह्याद्री (कदाचित तेव्हा ते फक्त DD-१० होतं)वर नववर्षाचा एक कार्यक्रम लागला होता. नववर्षाचा कार्यक्रम म्हणजे तोच जो ३१ डिसेंबरला रात्री लागतो. एकेकाळी DD-१० वरचा तो कार्यक्रम दर्जेदारही असायचा. त्यावेळीही आमच्याकडे केबल असावं, पण मराठी वाहिन्यांचा सुकाळ नसल्याने आम्ही बाण्याला जागून कदाचित बाकी सगळ्या वाहिन्या(हिंदी) सोडून हा कार्यक्रम पाहत होतो. अर्थात मी बराच लहान होतो, मला फारसं काही आठवत नाहीये, फक्त प्रदीप पटवर्धन धूसर आठवतायत. पण त्या कार्यक्रमातली एक गोष्ट अगदी ठसठशीत लक्षात राहिली, ती म्हणजे त्यामध्ये दाखवलेल्या (कॉमेडी) कविसंमेलनात सादर केल्या गेलेल्या एका कवितेचं ध्रुवपद(हे एकदम 'इस दिल में क्या है धडकन, धडकन में क्या है साजन' च्या स्टाईलमध्ये झालं).

तर ते ध्रुवपद होतं, "मला तर बाबा काहीच कळत नाही।"

अहो खरंच, असंच ध्रुवपद होतं. तुमच्यापैकी कुणाला आठवत असेल हा कार्यक्रम. असो. नसला आठवत तरी हेच ध्रुवपद होतं. एव्हढी सगळी प्रस्तावना फक्त एव्हढ्यासाठी, कारण आज मी हेच ध्रुवपद उसनं घेऊन एक माझी बेसुमार सुमार कविता सादर करणार आहे. बर्‍याच वर्षांनी मी कविता करत आहे, तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. एका कम्युनिटी साईटवर आढळलेलं एक छान प्रोफाईल वाक्यही इथे उद्घृत(क्लृप्ती प्रमाणेच सलग पाच वेळा हा ही म्हटल्यास जीभ साफ होऊ शकते, दोन्ही एकत्र म्हटल्यास सुपडाही साफ होऊ शकतो) करतो. "जर तुम्हाला माझे काम आवडले तर इतरांना सांगा, जर नाही आवडले तर फक्त मला"!

अथ :

सूर्य प्रकटतो पूर्व दिशेने पूर्वरंग दाखवतो,

ढगाळ आसमंतातही आशेचा किरण दाखवतो,

मनावरचे मळभ मात्र काही केल्या टळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

थेंब बिचारे कोसळती अगणित जलधारांमधूनी,

त्यांच्या क्षणभंगूर अस्तित्वाची दखल ती घ्यावी कोणी,

आसुसलेल्या धरणीवरती आसराही का मिळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

माणसे मरतात चटचट, किंमती वाढतात पटपट,

मुकी बिचारी कुणीही हाकण्याचे असिधाराव्रत, चालूच राहते अविरत,

प्रतिकारास्तव मुक्या तरूंचे एक पानदेखील का सळसळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

पोलीसाच्या घरात होते चोरी, कानाखाली वाजवतात पोरी,

ऑफिसात नेहमीची स्टोरी, स्वप्नात बार्बरा मोरी,

हल्ली हटकल्यानंतर रस्त्यावरचं कुत्रंदेखील पळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

उगाच काहीतरी विचार, डोक्याचं भजं साचार,

कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही आचार,

हव्या त्या योग्य वळणावर मनाचा कावळा का वळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

आता संपवायलाच हवी कविता, नाहीतर आटून जाईल वाचकसरिता,

ओढूनताणून यमक आणिता, पडतील चारदोन सपाता,

एव्हढं कळून देखील प्रतिभेच्या मेणबत्तीचे मेण का वितळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

इति।

तुम्हालाही काही कळलं नसेलच, त्यामुळे इथे मी तुम्हाला धन्यवाद म्हणण्याऐवजी तुम्ही मला धन्यवाद म्हणत असाल. त्यामुळे उगाच अजून संवाद साधायचा प्रयत्न करून वाद न वाढवता अपवाद म्हणून मी पोस्ट नेहमीपेक्षा लवकर, इथेच संपवतो.

19 comments:

  1. Mastach kavita re :D

    Anee malahee to akryakram athavato ahe. Tyat pradip patwardhan hota, anee nantar pudhe prashant damle pan hota. Navavarshache te karyakram sahee asayche

    ReplyDelete
  2. मस्त कविता आहे रे बाबा (कवितेतला बाबा नाही 'बाबाची भिंत' मधला बाबा ;))

    तिसरं कडवं मला खूप आवडलं. ते आत्ताच्या एकूण परिस्थितीला (आजूबाजूच्याही आणि ब्लॉग व ब्लॉगेतर विश्वातल्याही) अतिशय सुट होतंय. !!!

    ReplyDelete
  3. कार्यक्रम अजिबात आठवत नाहीये, पाहीलाच नसेल ही दाट शक्यता. बाकी तुझी कविता सुंदर आहे, हेरंबच्या मताशी पुरेपुर सहमत आणि शेवटचे कडवे तर अप्रतिम... वेळीच आवरते घेतल्याबद्द्ल धन्यवाद.

    बार्बरा मोरी स्वप्नाय येतेय काय? काकुSSSSSSSSSSSSSS लाऊ का फोन?

    ReplyDelete
  4. 'बाबा’ न समजायला काय रे झाले... आम्हाला तर आवडले रे बाबा.....
    अशीच आणि एक ओळ होती कश्यात तरी ’हो की नाही गं पुष्पे’ कश्यात आठवत नाही.....पण ती लक्षात मात्र राहिलीये....

    आता कवितेबद्दल .....कविता छानच झालीये केवळ त्या ’मोरी’ साठी आनंदच्या मताशी सहमत :)..

    नववर्षाचे कार्यक्रम...अगदी जागून पाहिलेले... आठवणीत गेले सगळे ....

    ReplyDelete
  5. अरे,सहिच आहे की कविता..बार्बरा मोरी स्वप्नात[:o]वाह्ह..छान...तन्वी शी १००% सहमत...सगळे नववर्षाचे कार्यक्रम आठवणीत गेले...[:(]

    ReplyDelete
  6. यॉडॉ,
    अगदी तोच कार्यक्रम वाटतं..प्रशांत दामलेही असणार...मोरूची मावशीमुळे दोघंही फॉर्मात होते...
    आणि होय रे ते कार्यक्रम झकास असायचे...
    धन्यवाद!

    ReplyDelete
  7. धन्यवाद हेरंब,
    मला वाटतं ते एकच कडवं थोडंसं समजेलसं झालंय, बाकीचं सगळं अगदी ध्रुवपदाला जागेलसं झालंय(हा विरोधाभास आहे).

    ReplyDelete
  8. आनंद,
    शेवटच्या कडव्यापर्यंत माझ्यातला त्रयस्थ आणि सुज्ञ ब्लॉगवाचकही समजून चुकला होता, की गाडी कुठे निघालीय..आणि वरून माझ्याकडचे 'कळत नाही' चे यमकही संपले होते...पण महत्वाचं म्हणजे ब्लॉगवर काहीतरी दर्जाहीन आणि प्रतिभाहीन येऊन समस्त ब्लॉगविश्वाचं नाक कापलं जाऊ नये ह्या सदहेतूने(!) बोटं आवरती घेतली...चिंता करितो ब्लॉगविश्वाची!

    ReplyDelete
  9. तन्वी,
    अश्या वेगळ्याच ओळी छान लक्षात राहतात. हे पण मस्त आहे, 'हो की नाही गं पुष्पे'...नाही काळजी नसावी, नवी कविता पडणे नाही ह्यावरून...
    ते कार्यक्रम खूप मिस करतो हल्ली, ती निरागसता राहिली नाही आता...

    ReplyDelete
  10. धन्यवाद माऊ,
    ते नववर्षाचे कार्यक्रम आता नॉस्टॅल्जिया म्हणूनच राहिलेत, पण त्यांचंही कल्ट डेव्हलप व्हावं अशी इच्छा आहे...:)..कुठे व्हिडिओज मिळतात का बघायला हवं...

    ReplyDelete
  11. @ आनंद, तन्वी आणि माऊ,
    तुमचं तिघांचं तिच्याबद्दलचं (त्या ओळीबद्दलचं) एकमत पाहून अगदी सद्गदित झालोय मी....माझा ती ओळ लिहिण्याचा उद्देश पूर्ण झाला...;)

    ReplyDelete
  12. मस्तं जमलीय कविता. खूप आवडली
    -निरंजन

    ReplyDelete
  13. खूप धन्यवाद निरंजन...

    ReplyDelete
  14. आठ नऊ दिवस जरा धामधुम होती तोवर इकडे बरेच उत्पात घडलेत की. :D ’बाब” ची कविता सहीच. नववर्षाचे कार्यक्रम एकेकाळी खासच असायचे.आता नुसत्या आठवणी काढत जे माथी मारतील ते पाहायचे झाले...

    ReplyDelete
  15. अगदी भाग्यश्रीताई,
    जोरदार उत्पात. आणि त्यांचं 'कवित्व' अजून सरलेलं नाही. त्यातंच मी हात धुवून घेतले..;)
    आणि हो, ते नववर्षाचे कार्यक्रम, ती निरागसता आठवतंच आताची सवंग करमणूक बघायची, दुसरं काय! :(

    ReplyDelete
  16. हा हा .. बाबा, 'कवित्व' चा श्लेष जबरा !!

    ReplyDelete
  17. धन्यवाद हेरंब...:)(इथे टोपी काढून दाखवण्याचा स्मायली हवा होता)

    ReplyDelete
  18. हव्या त्या योग्य वळणावर मनाचा कावळा का वळत नाही,


    मला हे फार फार फार लागू पडत बघ...मला खुपच आवडली रे कवीता (माझी एकाही कवीता या मुलीशी ओळख नाही)...त्यामुळे तू लिहिलेली कवीता आवडली...

    ReplyDelete
  19. धन्यवाद सागर!
    माझ्याबरोबरही असंच आहे बघ. प्रतिक्रियेसाठी खूप आभार!

    ReplyDelete