मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण...वाटो.लहान असताना सिनेमे म्हणजे काय हे ही माहित नसताना मी अमिताभ बच्चनचा 'जंजीर' पाहिला होता. अगदी मनावर ठसला होता तो सिनेमा. ती पांढरा घोडावाली चेन, रात्री स्वप्नात खिंकाळणारा पांढरा घोडा पाहून उठणारा घामाघूम अमिताभ, "यह पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं।" म्हणत खुर्चीला लाथ घालणारा अमिताभ, "यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी" वर रुमाल उडवत नाचणारा केस लाल रंगवलेला प्राण, रुळावर फेकून दिलेला जखमी अमिताभ (आणि टेन्शनमध्ये आलेला मी) आणि ऐनवेळी त्याला रुळावरून खेचणारा(आणि माझ्या दुवा मिळवणारा) प्राण. मी विसरूच शकत नाही. मग पुढे त्याचा खास लहान मुलांसाठी बनवलेला(कुणीही काहीही म्हणो, माझ्या म्हणण्यानुसार तो लहान मुलांसाठीच बनवलेला होता)'अजूबा'. अजूबा तर मी कित्येक वेळा आवडीने बघितला होता(अजूनी लागला की बघतो, कदाचित मी मनाने मोठा झालो नाही{लोकांना सांगायला, "मी तो सिनेमा 'नॉस्टॅल्जिक' होण्यासाठी बघतो"}). मग माझ्या लहानपणी माझा आवडता अजून एक आवडता सिनेमा होता, "हाथी मेरे साथी". त्या सिनेमातलं जास्त काहीही माझ्या लक्षात नाही. पण तो सिनेमा मला तेव्हा जाम आवडायचा, कारण त्यातला हिरो - रामू हत्ती(मला आवडण्याचं अजून एक कारण हेही असावं की मला नावीन्याची हौस आहे{पुलं सांगतात त्याप्रमाणे 'भर वर्गात सदरा काढून डोक्याला गुंडाळण्या'च्या सदरातली हौस नाहीये, पण} आणि एरव्ही नोकरासाठी म्हणून राखून ठेवलेलं नाव हिरोला देण्यात आलं होतं). तो जेव्हा मरतो तेव्हा, रस्त्याने राजेश खन्ना गाणे गात जातो तेव्हा मीही रडायचो. पण त्या सिनेमाशी माझी एक एम्बॅरॅसिंग आठवण पण जुळलेली आहे. त्यातल्या शेवटच्या प्रसंगात राजेश खन्ना व्हिलनला त्वेषाने सांगतो, "मैं तुम्हें नही छोडूंगा", तर हा प्रसंग आई-वडिलांना रंगवून सांगतेवेळी(का सांगत होतो ते आठवत नाही) मी तेव्हढ्याच त्वेषात येऊन, "मैं तुझे नही सोडूंगा" असे म्हणालो होतो. आई-बाबा बराच वेळ हसले, मला कळेना आपलं काय चुकलं. मग त्यांनी बर्याच जणांना माझ्या भूमिकेत शिरण्याची ही कथा सांगून माझा साफ वडा केला (अजूनी करतात, त्यानंतर मी त्याच त्वेषाने राष्ट्रभाषा सभेच्या चार परीक्षा 'विशेष योग्यते'त पास करूनही माझ्या कपाळीचा हा डाग पुसला गेला नाही आहे). असो, तर मी नेहेमीप्रमाणेच मुद्द्यापासून बराच भरकटलो आहे, तेव्हा पुन्हा मुद्द्यावर येतो.
मुद्दा हा, की मी लहान असताना माझे काही ठराविक सिनेमे आवडीचे होते(दूरदर्शन एक वर शनिवारी रात्री लागणारे). पण आवडीचा नट एकच. अमिता बच्चन(मी 'भ' नजरचुकीने विसरलेलो नाही). फक्त अमिता बच्चन अशासाठी कारण तो ढिशूम ढिशूम करायचा, राजेश खन्ना नाही कारण त्या सिनेमाचा हिरो रामू होता. पण मग एखादं वर्ष झालं असेल. दूरदर्शनवर "बॉक्सर" हा सिनेमा लागणार होता. आमच्याकडे व्ही.सी.आर. होता, काही ठराविक सिनेमे आम्ही रेकॉर्ड करायचो. मी बॉक्सर ह्या नावानेच प्रभावित झालो होतो, त्यामुळे साहजिकच मी बाबांच्यामागे तो रेकॉर्ड करण्यासाठी धोशा लावला. माझ्या भावाने मला त्या सिनेमाचा हिरो मिथुन चक्रवर्ती याची माहिती पुरवली - "तो गरीबांचा अमिताभ आहे." बस माझ्या डोक्यात ते चांगलंच ठसलं. आणि मला मिथुन एकदम आपला माणूस वाटायला लागला (ह्या घटनेचा सोशिओ-सायको ऍनॅलिसिस असा करता येईल की - मला एव्हढंच माहित होतं की आपण श्रीमंत नाही, म्हणजे आपण गरीबच असलं पाहिजे. आणि आपण गरीब तर गरीबांचा अमिताभ तो आपला अमिताभ. लॉजिक.) बॉक्सर मधल्या मिथुनच्या बॉडीची वाहवा त्यानंतर मी कित्येक दिवस जो भेटेल त्याच्याकडे करायचो (रती अग्निहोत्रीची वाहवा करण्याएव्हढं वय झालं नव्हतं माझं तेव्हा). मी काही मुव्ही बफ नव्हतो तेव्हा, की मिथुन आवडतो म्हणून मिथुनचे सगळे सिनेमे बघ (अर्थात तेव्हा काही सोयही नव्हती, सिनेमांच्या कॅसेटी भाड्याने आणून बघणे ही ३-४ महिन्यांतून एकदा केली जाणारी चैन मानली जायची.). तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही माझा मिथुन ह्या माणसाबद्दलचा आदर कमी झाला नाही. 'डीस्को डान्सर', 'डान्स डान्स', वगैरेंबद्दल मी पूर्ण अनभिज्ञ होतो. अमिताभ हा का कुणास ठाऊक फार दूरचा वाटायला लागला. मिथुन आपला माणूस वाटायचा. माझ्या दादाने दिलेल्या तत्वज्ञानाची आणि बालमानसशास्त्राची सांगड घातली, तर कदाचित ह्या अतर्क्य घटनेचा अन्वयार्थ लागण्याची शक्यता आहे(हे वाक्य मी का लिहिलं, ह्या अतर्क्य घटनेच्या मागचं कारण कदाचित आज ऑफिसात कामे सोडून वाचलेले अनेक मराठी ब्लॉग्ज हे असू शकतं). मग त्याचा क्रिष्नन अय्यर येम.ये. आला आणि माझ्या दीवानगीला पुरावा मिळाला. "विजय दीनानाथ चौहान" ह्या गारूड करणार्या पात्रापेक्षा मी "क्रिष्नन अय्यर येम.ये." च्या जास्त प्रेमात पडलो, हाच तो पुरावा. "ये लडका, चिंगारी, बडा होके हम सबको, जलाके राख कर देगा. आऐ(ह्या उच्चाराला शब्दबद्ध करण्यासाठी मला मार्गदर्शनाची गरज आहे)." हा डायलॉग मला आवडला पण ,"हम ये लुंगी उठाती, तुमको डिस्को दिखाती" चा जप मी कित्येक दिवस करत होतो.
मग पेपरात मिथुनला त्याच्या "जल्लाद" ह्या सिनेमासाठी "बेस्ट व्हिलन"चं फिल्मफेअर मिळालं हे वाचून मला झालेला आनंद मला आजही आठवतो. जल्लाद हा मिथुनदाच्या पुढे येणार्या अनेक "ब" सिनेमांची नांदी होती. हे बॉलीवूडच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला अलगद बाजूला केलं. त्यालाही फरक पडत नव्हता. त्याने ऊटीमध्ये हॉटेल बांधलं होतं. के.एल.व्ही. प्रसाद हा पार्टनर दिग्दर्शक, स्वतः हिरो, स्वस्तातली हिरॉईन, सगळं शूटिंग हॉटेलात किंवा आवारात. आणि एवढ्या स्वस्तात बनवूनही यू.पी. बिहारमध्ये होणारी कमाई, हा फायद्याचाच सौदा होता. मग "गुंडा", "लोहा", "हिटलर", "चीता", असं सगळं चालू होतं. एव्हढ्या गुणी कलाकाराला असं करताना पाहून जीव तुटायचा. "चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबूतर रे" म्हणणार्या मिथुनचा राग मात्र कधी आला नाही.
इकडे अमिताभ, ABCL, टॅक्स बुडवणे असले प्रकार करून नजरेतून उतरत होता तेव्हाच कचरापेटीत सापडणालेल्या मुलीला दत्तक घेणार्या आणि एकही मेनस्ट्रीम सिनेमा न करून सर्वात जास्त कर भरणार्या मिथुनबद्दल वाचून अभिमान वाटायचा. नक्षलवादाची कास सोडून चहाच्या टपरीपासून नव्या आयुष्याची सुरुवात करणारा आणि मोठा माणूस झाल्यावर त्याच टपरीवाल्याला मोठं हॉटेल काढून देणारा मिथुनदा वेगळा आहे ह्याची खात्री पटली.मग मी कॉलेजात आलो. आणि मिथुनचा "तितली" नावाचा बंगाली सिनेमा आल्याचं वाचलं. त्यात अपर्णा सेन आणि कोंकोणा सेन होती. मिथुनदाच्या अभिनयाची स्तुती वाचून तेव्हाही बरं वाटलं होतं. मग वर्षभरातच ती बातमी आली - "मिथुनदा मेनस्ट्रीम सिनेमात परततोय." विक्रम भट्टचा "ऐलान". कॉलेजातल्या मित्रांनी चिडवलं, पण मी म्हटलं, पिंजर्यात राहिला म्हणून वाघाची शेळी होत नाही. सिनेमा साफ पडला, पण माझ्यासाठी त्यातलं मिथनदाचं पात्र "बाबा सिकंदर" हे त्याच्या परतीचं द्योतक होतं. मग मी आणि माझे काही टवाळ मित्र कॉलेजात एकमेकांना "हेल मोगॅम्बो" सारखे "जय बाबा सिकंदर" किंवा "बाबा की जय" असे म्हणून ग्रीट करायचो. मग हे लोण बर्यापैकी पसरलं, काही माहीत नसणारेही मला असंच ग्रीट करायचे. हळूहळू माझं टोपणनाव बाबा पडलं. त्याच सुमारास मी माझा इंग्रजी ब्लॉग मजा म्हणून ब्लॉगस्पॉट वर चालू केला होता. मी बाबा धर्माची पताका खांद्यावर घेतलेली असल्याने त्याचं युआरएल "द बाबा प्रॉफेट" असं ठेवलं. त्याचं नाव ठेवलं "बाबा की जय!" पासवर्ड होता, "जयबाबासिकंदर" (प्रयत्न करू नका आता बदललाय). आता ब्लॉगरचं युजरनेम गुगल बरोबर मर्ज केलंय, पूर्वी ब्लॉगरला वेगळं युजरनेम असायचं, आणि माझं युजरनेम "द प्रॉफेट" असं होतं. मी खेळाडूंमध्ये राहुल द्रविडचा सच्चा भक्त असल्याने टॅगलाईन होती, "ग्रेट वॉल ऑफ बाबा!". प्रोफाईल फोटो मिथुनदाचा. मग पुढे मी तो ब्लॉग बंद करून सोफिस्टिकेटेड ब्लॉग बनवला. रूढार्थाने मी मोठा झालो.
तीन-चार वर्षे गेली. मी मिथुनदाचे सगळे नवे-जुने सिनेमे पाहिले. "ट्रक ड्रायव्हर सुरज", "कूली शंकर", "हिटलर", "अमावस" सगळ्या लीला पाहिल्या मी. पण तोच "ब" मिथुनदा गुरू मध्ये आपला खरा दर्जा दाखवताना पाहून अभिमानही वाटला. मग मी एक दिवस मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश केला. माझ्या साईटवरचा माझा मराठी-इंग्रजी ब्लॉग काही कारणास्तव तिथे जोडला गेला नाही, मग मी तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा ब्लॉगर उघडलं. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. "मराठी ब्लॉगला काय नाव द्यायचं?", हा प्रश्न मला पडलाच नाही. "ग्रेट वॉल ऑफ बाबा" चं "'बाबा' ची भिंत" झालं आणि प्रोफाईल फोटो बदलण्याचा प्रश्नच नव्हता.
मी आजही मिथुनदाचा तेव्हढाच मोठा पंखा आहे. त्याच्या ब सिनेमांची मी कितीही टवाळी केली तरी त्यात कौतुकाचा भागच जास्त असतो. पण हे मात्र खरं की मृगया साठी नॅशनल ऍवॉर्ड घेऊन कारकीर्दीची सुरुवात करणारा आणि अभिनयासाठी दोन नॅशनल ऍवॉर्ड मिळवणारा मिथुन ह्यांच्याबरोबरच, "ये खून नही, मेरे क्रोध का रंग है, चाटेगा इसे?"(क्लासिक डान्स ऑफ लव्ह), "बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा!"(गुंडा) आणि "दिखनेमें बेवडा, दौडने मे घोडा और मारने मे हाथोडा हूं मैं" (लोहा) म्हणणारा मिथुनही माझा तितकाच आवडता आहे. कदाचित तारा जुळल्यात.
(तळटीप{वटवट सत्यवानाकडून साभार} - मला बर्याच जणांनी ब्लॉगच्या विचित्र नावाबद्दल विचारलं. परवा आनंदशी बोलताना त्याने ह्याबद्दल एक ब्लॉग पोस्ट लिहायची कल्पना सुचवली. मग त्याबद्दल लिहायचं तर हे सगळं आपोआपच आलं. इथपर्यंत वाचलं असाल तर सहनशीलतेबद्दल धन्यवाद. आणि आनंद, कल्पने बद्दल धन्यवाद{लोकहो, शिव्या घालायच्या असतील तर डायरेक्ट त्यालाच घालणे.})
आणि हो ....
मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण...वाटो.
Mala vatala hota ke Babachee bhinta mhanje Facebook chya wall la bhint mhantat tasha type ahe prakar -
ReplyDeleteJaam maja alee vachoon :)
हाहा हाहा हाहा !!!
ReplyDeleteबाबा, आपण महान आहात.. तुझ्या url आणि ब्लॉगच्या नावाविषयी असेच प्रश्न मला पडले होते. आता उत्तरं मिळाली. ही पोस्ट स्टॅटिक पेज म्हणून चिकटवून टाक. अनेक अश्राप जीवांचे दुवे घेशील ;-)
आणि हो.. सगळे कंस एकसेएक आहेत :-)
आनंदा, धन्स रे :)
विद्याधरा... धन्यवाद रे...माझ्या विनंतीचा मान ठेवल्याबद्दल.
ReplyDelete{लोकहो, शिव्या घालायच्या असतील तर डायरेक्ट त्यालाच घालणे.})
याबद्दल सुद्धा धन्यवाद... ;-) (पण लोकांनी याला सिरियस घेउ नये)
पण या पोस्ट मधुन मिथुनदा बद्दल बरीच अनोखी माहिती मिळाली.
मिथुनदा नसला तरी राहुल द्रविड आमच्या श्रद्धास्थानात येतो बरं
मस्त आहे. मजा आली.
ReplyDeleteहेरंब अनेकांच्या मनातला प्रश्न विचारलास रे बाबा... आणि उत्तरही मस्तच आहे :)
ReplyDeleteमिथूनच्या बाबत मी पुर्वी neutral होते.... आवडायचाही नाही आणि रागही यायचा नाही. याला अपवाद केवळ अग्निपथ मधली त्याची भुमिका. मला लहानपणी गोविंदा आवडला होता कोणे एके काळी.... :)
आता मात्र मिथून अचानक आवडायला लागलाय कारण डान्स ईंडिया डान्स या शोमधला त्याचा संयत, शांत जज पहायला मिळाला. नेमके बोलून कार्यक्रमातली रंगत वाढवणे, स्पर्धकांचा उत्साह वाढवणे त्याला साधले आहे. आणि पुन्हा हे करताना आपण स्वत: नॅशनल ऍवॉर्ड्स मिळवलेले आहेत वगैरे कुठलाही गर्व त्याच्या वागण्यात कधीच पाहिला नाही.
कदाचित त्याच मुळे तुझी ही आजची पोस्ट मला आवडली.... तेव्हा ’बाबा की जय!!!’ :)
बाकि आनंद ,राहूल द्रविड आमच्यादेखील श्रद्धास्थानात येतो बरं.... :)
हे हे,
ReplyDeleteआपण पण मिथुन चा लय मोठ्ठा पंखा आहे बर का.
एक वेळ अशी होती आपण नुसते मिथुन चे चित्रपट पाहयाचो.
अगदी परवा तिसर्यांदा पाहिला गुंडा.
आणि तितली तर एकदम मस्त बर का.
त्यात पण त्याची गळयात मफलर गुंडाळायची स्टाईल आहे बर.
जवळपास त्याच्या सगळ्या चित्रपटात त्याने मफलर नाहीतर टोवेल गळ्याभोवती गुंडाळलेला आहे.
हाहा यॉ डॉ, आयडीया चांगली आहे....
ReplyDeleteपण आता उशीर झाला...मी खरं ते सांगून टाकलं... ;-)
बाय द वे मी अजून असे म्हणू शकतो, कि माझ्या डोक्यात आधीपासूनच दोन्ही अर्थ होते....
अरे धन्यवाद हेरंब,
ReplyDeleteअरे हो आयडीया चांगली आहे....
पण नको..आमच्या एम्बेरेसिंग मोमेंटस अश्या स्थितीक(स्टेटिक) कशाला करा! ;-)..
बाय द वे, स्थितीक करतात कसं?
अरे आनंदा,
ReplyDeleteमिथुनदाचे चित्रपट बघ....तू हि पंख्यांच्या लिस्ट मध्ये येशील...
खूप खूप धन्यवाद देविदास.
ReplyDeleteएकदम बरोबर तन्वी,
ReplyDeleteडान्स इंडिया डान्स मधला मिथुनदा खरंच सही वाटतो...एकदम डाऊन टू अर्थ....त्याने स्वतःला रीब्रेंड केलंय...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....
आणि हो ... 'बाबा' की जय!
ब्लॉगवर स्वागत कॅनव्हास,
ReplyDeleteहो.."गुंडा" तर आता दंतकथा बनलाय....
आणि त्याची ती मफलर गुंडाळायची स्टाईल जी आता ट्रेडमार्क बनलीये, ती कदाचित तो आपले गळ्यावरून कळणारे वय लपविण्यासाठी करीत असावा!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....
For static page
ReplyDeletedraft.blogger.com -> posting -> edit pages -> new page
तन्वी, प्रश्न (अनेकांप्रमाणेच) माझ्या मनात होता पण विचारला आनंदने .. so thanks to "आनंदपत्रे" :)
हेरंब!
ReplyDeleteबनवलं मी स्थितीक पान....मस्त कल्पना आहे....मी वर्डप्रेसमध्ये हे धंदे केले होते...ब्लॉगर ची कल्पना नव्हती...धन्यवाद....!
कृष्णाने जेव्हढ कंसाला फेमस केलं नसेल...तितकं तू केलयंस..!
मिथुनदादा म्हणजे गरिबांचा अमिताभ असे लहानपणी मी नेहमी ऐकायचे.:D डिस्को डान्सर, डान्स डान्स... शौकीन, अग्निपथ, अजूनही काही आठवत आहेत.:) तुझी भक्ती जबरीच आहे. बाकी जंजीर माझाही एकदम आवडता.
ReplyDeleteअरे हो...शौकीनबद्दल लिहिलंच नाही मी..पण त्यातही त्याचा रोल तसा महत्वाचा नव्हता. जंजीर मोठेपणीसुद्धा कित्येकदा पाहिलाय, त्यातला हॉस्पिटलचा सीन अंगावर काटा आणतो.
ReplyDeleteबाबा आणि भिंत दोन्ही शब्दांचे (लपलेले) अर्थ एकदमच कळाले....मिथुन आणि चित्रपट अस काही माझा प्रांतातलं नाही पण ती भिंत आली तेव्हापासुन पंखा आहे मी...:)
ReplyDeleteपोस्ट तर एकदम झ्यॅक झालीय....(थोडी इमो...पण..बहुतेक मिथुनदामुळे) इतक्यात अभिषेक बरोबर त्याचा एका पत्रकाराचा रोल होता नं...(पिक्चरची नाव आणि मी जन्मजन्मांतरीचं वैर आहे...आठवलं की परत येईन...) हा तर तो रोल छान होता...
हाहाहा!! अगं अपर्णाताई, तोच 'गुरू' सिनेमा...
ReplyDeleteआणि हो पोस्ट थोडी दिल के करीब आहे खरी...;)
अनेक आभार!
mitun & baba navacha rahasya kalal bar watal...wichar karat hote baba nav ka avdal asel & mituncha photo...mithun da apaka blog dekhge tho bahot khus hoge...vary good job.keep it up
ReplyDeleteसुषमा,
ReplyDeleteमिथुन आणि बाबा इन्सेपरेबल आहेत..:D
मिथुनदांनी खरंच एकदा जरी माझा ब्लॉग बघितला तरी मी धन्य होईन!
धन्यवाद!