10/21/2010

नियंत्रण ते नियमन व्हाया गुगल

सहसा लोक ऑफिसात काय करतात? - काम हे उत्तर मला कुणी देणार नाही आणि चुकून कुणी दिलंच तर तो धादांत खोटं बोलत आहे, हे मी इथेच ग्राह्य धरतो. कारण माझा प्रश्न पुरेसा स्पष्ट आहे. 'सहसा' लोक ऑफिसात काय करतात? सहसा लोक विविध उपयुक्त उपक्रम आणि क्रिया करतात. जसे की, गॉसिप्स करणे (स्त्रिया)/चकाट्या (राजकारणापासून ते क्रिकेटपर्यंत कशावरही) पिटणे (पुरूष), मेल फॉर्वर्ड करणे, मेल फॉर्वर्ड्स वाचणे, चहा/कॉफी पिणे (फुकट मिळत असेल तर उत्तम), सोशल नेटवर्किंग साईट्स, ब्लॉग्ज वाचणे हे झालं 'सहसा'चं उत्तर (क्रम वेगवेगळा असू शकतो). आणि ह्या सगळ्यांतून वेळ उरला किंवा डेडलाईनचा बांबू बसला तर 'काम' करणे. माझ्या आधीच्या वाक्यावर तीव्र आक्षेप असणार्‍या सर्व वाचकांची मी आधीच क्षमा मागून हा दावा करतो, की एकतर ते खरोखर कामसू आहेत (ज्या केसमध्ये मला त्यांच्या कंपनीला अभिनंदनपत्र पाठवावेसे वाटते) किंवा त्यांच्या ऑफिसात इंटरनेट उपलब्ध नाही.

असो. मागचा परिच्छेद विनोदनिर्मितीचा एक अगोचर प्रयत्न म्हणून सोडून दिला तर आपण सापशिडीत साप लागल्यागत पुन्हा पहिल्या प्रश्नावर पोचतो. तर प्रश्न काय होता? 'सहसा' लोक ऑफिसात काय करतात? व.पुं. नी कुठेतरी म्हटलंय. की 'व्हेन यू गो ऑन रायटिंग मोअर ऍन्ड मोअर पर्सनल इट बिकम्स मोअर ऍन्ड मोअर युनिव्हर्सल'. अर्थात जसजशा तुम्ही अधिकाधिक वैयक्तिक गोष्टी लिहित जाता, तसतशा त्या अधिकाधिक वैश्विक होत जातात. तर हे वाक्य प्रमाण मानून आपण शिडी शोधायचा, अर्थात उत्तर शोधायचा प्रयत्न करू. म्हणजेच आता मी स्वतः, व्यक्तिशः ऑफिसात 'सहसा' काय करतो ह्याचा परामर्श घेणं क्रमप्राप्त आहे.

मी सकाळी आठच्या ठोक्याला ऑफिसात हजर होतो. तसं माझं काम कागदपत्रांशीदेखील संबंधित असलं तरी संगणक हे माझ्या कामाचं अतिमहत्वाचं साधन आहे. त्यामुळे माझा संगणक मी जेव्हढा वेळ ऑफिसात असतो, तेव्हढा वेळ सुरू असतो आणि माझ्या ऑफिसातील वेळाच्या बहुतेक ८५% वेळ मी संगणकावर काही ना काही करत असतो. इतक्या निरीक्षणानंतर 'काही ना काही' ह्या शब्दांमध्ये आपल्या 'सहसा' चं उत्तर दडलेलं आहे.

एका सामान्य नेटकराच्या मूलभूत गरजा काय असतात? इ-मेल, चॅट, डॉक्युमेंट्स हाताळणे, व्हिडिओ पाहणे, सर्च, बातम्या, सोशल नेटवर्किंग, ब्लॉगवाचन, करत असल्यास ब्लॉगिंग, आणि ब्लॉगिंग करत असल्यास स्टॅटिस्टिक्स. ओके, ह्या सामान्य नेटकराच्या नाहीत, पण अगदी 'असामान्य' नेटकराच्या देखील नाहीत. असो. तर आता मी 'सहसा' चं उत्तर देतो. 'सहसा' मी हेच सर्व ८५% वेळाच्या जवळपास ५०-५५% (विथ पॉझिटिव्ह टॉलरन्स) करत असतो. मग तुम्ही विचाराल मी काम कधी करतो किंवा मुळात मी काम करतो का? तर कृपया ह्याचे उत्तर तुम्ही माझ्या साहेबांना विचारा.

तर आपल्याला माझ्या 'वैयक्तिक' सहसाचं उत्तर मिळालं. मग आता आपण वपुंचं प्रमाणवाक्य वापरून, वैयक्तिकला वैश्विक करूया. आणि आपल्या प्रश्नाला इथेच पूर्णविराम देऊया.

जिज्ञासूंना उत्सुकता असेल की मुळात हा प्रश्न आला कुठून? ह्याचं उत्तर विश्वाची उत्पत्ती कशी झाली, ह्या प्रश्नाच्या उत्तराएव्हढं अवघड आणि लांबलचक नसलं तरी थोडं लांबच आहे. पण प्रश्न आलाय तेव्हा उत्तर द्यावंच लागेल.

त्याचं झालं असं, की मी ऑफिसातल्या संगणकाचा उंदीर डाव्या हाताने वापरतो. एके दिवशी एक मित्र आला आणि माझ्या संगणकावर काहीतरी शोधायचंय म्हणू लागला. मी मागे झालो आणि तो उजव्या बाजूला उंदीर शोधू लागला. दोन क्षण निष्फळ नजर फिरवल्यावर तो माझ्याकडे पाहून म्हणाला,

"अबे, माऊस कुठाय?"

इतकी वेळ त्याची उडालेली त्रेधा पाहून मजा घेणारा मी छद्मीपणे हसलो आणि कळफलकाच्या डावीकडे बोट दाखवून म्हणालो,

"हा काय?"

"आयला, तू लेफ्टी आहेस?"

मी विजयी मुद्रेनं "छ्या! बिलकुल नाही."

"मग?" त्यानं उलट्या बाजूला लेफ्ट आणि राईट क्लिक असल्याने जाम गोंधळतच मला विचारलं.

"अरे, असंच. उजवा खांदा एके दिवशी खूप दुखू लागला. आणि बोटांना मुंग्या आल्यागत वाटू लागलं. मग स्पॉन्डिलायटिस असेल की काय, ह्या काळजीनं मी थोडा भार डाव्या हातावर टाकण्याचं ठरवलं." असं म्हणत मी त्याच्या हातून उंदीर घेत सफाईदारपणे त्याचं काम करून दिलं.

असेच काही दिवस गेले. एक दिवस एक साहेब आला. मला संगणकावरून काही हवंय म्हणाला. मी बाजूला झालो. आणि पुन्हा पहिलाच पूर्ण प्रसंग. आणि पुन्हा मी विजयीमुद्रेनं माझं कारण सांगून छाप पाडण्यात यशस्वी.

अजून काही दिवस उलटले. मी असाच बसलोय आणि दुसरा एक मित्र पुन्हा काही कामाने येतो आणि माझ्या डावर्‍या उंदराबद्दल आश्चर्य व्यक्त करून जातो. त्यानंतर मला पुन्हा संपूर्ण कारण सांगावं लागतं. पण आतापर्यंत मी मी कंटाळून गेलोय उत्तर देऊन. तेच तेच सविस्तर सांगून. लोकांना गोंधळलेलं पाहण्याचा उत्साह सरून गेलाय. अशा स्थितीतच एक दिवस माझं काम प्रचंड वाढलं. प्रचंड म्हणजे परिस्थिती हाताबाहेर गेल्यागत झालं. मी माझ्या संगणकावर सोडा, जागेवरच असेनासा झालो आणि असलोच तर दूरध्वनीवर कामाच्याच चर्चांमध्ये. त्यामुळे माझा संगणकाचा वापर अगदीच कमी झाला.

आता ह्या इथे आपल्याला मागून एक रेफरन्स घ्यावा लागणार आहे. तर परिच्छेद क्रमांक चार, अर्थात नेटकराच्या गरजांचा रेफरन्स इथे देणं गरजेचं ठरतं. त्या गरजा नीट पाहा आणि आता मी इथे एक यादी देतो. गुगल मेल (इ-मेल), गुगल टॉक (चॅट), गुगल डॉक्युमेंट्स (डॉक्युमेंट्स हाताळणे), यूट्यूब (व्हिडिओ पाहणे), गुगल (सर्च), गुगल न्यूज (बातम्या), ऑर्कुट, गुगल बझ (सोशल नेटवर्किंग), गुगल रीडर (ब्लॉगवाचन), ब्लॉगर (करत असल्यास ब्लॉगिंग), आणि गुगल ऍनॅलिटिक्स (ब्लॉगिंग करत असल्यास स्टॅटिस्टिक्स). माझ्या ह्या सर्व गरजा आश्चर्यकारकरित्या एकाच युजरनेम आणि पासवर्डने पूर्ण होतात. 'गुगल' नं माझ्या वैयक्तिक आयुष्याला वैश्विक बनवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. कधी कधी प्रश्न पडायचा की गुगल माझ्या वाढलेल्या गरजा पूर्ण करतो, की आधी स्वतःच माझ्या गरजा वाढवतो आणि मग स्वतःच त्या पूर्णाही करतो. उत्तर काहीही असो, पण मी कामाच्या प्रचंड रगाड्याखाली ह्याच गरजांना चाट दिली होती. अशातच स्वनियंत्रणाचा कीडा डोक्यात वळवळला आणि मी वेळ असतानाही गुगलपासून फारकत घेण्याचं ठरवलं. फक्त ब्लॉगिंग चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं बंद १००% यशस्वी होणं शक्य नव्हतं. मधे मधे रिकामा झालो की सवयीनं फायरफॉक्सची खिडकी उघडायचो आणि लक्षात यायचं की 'हाय रे! इथे काहीच नाही'. एक उदास रेडिफचं होमपेज किंवा इंडियाटाईम्स किंवा महाराष्ट्र टाईम्स माझ्याकडे पाहून केविलवाणं हसायचे. मी माझ्या सुन्या मैफिलीकडे एकदा आणि टेबलावर पडलेल्या कागदांकडे एकदा पाहायचो. मनोनिर्धाराचा आणि नियंत्रणाचा वारंवार विजय व्हायचा.

आणि असंच एकदा इकडे तिकडे पाहताना माझं लक्ष माझ्याच डाव्या हाताकडे गेलं. मग मला तेच तेच जुने संवाद आठवले. मग मनाशी पुन्हा विचार आला की समजा आपण जर अजूनही उजव्या हातानेच उंदीर चालवत असतो, तर ८५% मधल्या ५०-५५% वेळ नेटकराच्या गरजा भागवताना आपल्या हातावर किती ताण पडला असता? पण ह्या प्रश्नातून आपण नक्की काय करायला ऑफिसला येतो असा एक थेट मुळावर आघात करणारा लक्षवेधी प्रश्न माझ्या मनात उद्भवला. आणि ह्याच अभूतपूर्व मानसिक द्वंद्वामधून मार्ग काढण्यासाठी मी 'वैयक्तिक' चा 'वैश्विक' असा बदल करून पडलेल्या प्रश्नाला 'सहसा' लोक ऑफिसात काय करतात? असं गोंडस आणि मनाला कमी दुखावणारं स्वरूप दिलं. पण दैवदुर्विलासाने मला उत्तर शोधण्यासाठीही तेच प्रमाणवाक्य वापरावं लागलं आणि मी सर्क्युलर रेफरन्समध्ये अडकलो.

असो. तर ह्याच सर्क्युलर रेफरन्स लूपमध्ये म्हणजेच अंतर्निर्देशी आवर्तामध्ये अडकून मी फायरफॉक्सच्या रिकाम्या उदास विंडोकडे बघत असताना माझा एक तिसरा मित्र माझ्याकडे आला आणि संगणकावरून काहीतरी हवंय म्हणाला. मी सवयीने मागे झालो आणि त्यानं सवयीनं उजवीकडे उंदीर शोधला. आणि सवयीनेच (माझ्यासाठी) म्हणाला.

"माऊस कुठाय?"

मी काही न बोलता डावीकडे बोट दाखवलं.

"तू लेफ्टी आहेस?" मी वैतागलो होतो, पण अचानकच मला साक्षात्कार झाला आणि मी खुदकन् हसलो.

"हो. मी लेफ्टी आहे." आणि मी उंदीर स्वतःच धरून त्याचं काम चटकन करून दिलं.

पुढचे प्रश्न पडले नाहीत, आवर्त उठला नाही आणि महत्वाचं म्हणजे स्वनियंत्रणाची जागा पुन्हा मूलभूत गरजांनी घेतली. तात्पर्य काय तर कसलातरी साक्षात्कार होण्यासाठी गरजांवर नियंत्रण ठेवल्यावर मला हा साक्षात्कार झाला, की गरजांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा गरजांचं नियमन जास्त महत्वाचं आहे.

34 comments:

 1. थोड विस्कळीत वाटतंय रे....(कृ राग नसावा...) पण सुरुवात आणि मध्य मग शेवट काही तरी जुळत नाहीस.....कळण्यासारखे मुद्दे आहेत बरेच...पण....असो...
  जाता जाता....मी उंदीर दोन्ही हाताने चालवते....laptop चा बोट धरून फिरवायचा डाव्या आणि आपलं नेहमीचा उजव्या..तेही डावखुरी असताना...हे मी आता ही पोस्ट वाचताना खर म्हणजे एकदम जास्त जाणवलं....

  ReplyDelete
 2. साक्षात्कारी बाबा, हरी ओम.

  गरजांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा गरजांचं नियमन जास्त महत्वाचं आहे. अगदी खर

  ReplyDelete
 3. :)
  कशामुळे कशाकशावर ताण पडतो ;)

  ReplyDelete
 4. छान लिहिले आहेस. :)

  ReplyDelete
 5. हीहीही... छान आहे. वास्तविक थोडी विस्कळीत आहे, पण हसायला आलं मला वाचताना चार-पाच वेळा. सो, कार्य साध्य झालं आहे. आवडला बुवा आपल्याला लेख. :-)

  ReplyDelete
 6. लोकं "सहसा" ऑफीसमध्ये काही करत नसले तर ब्लॉगवर प्रतिक्रिया आल्या नसत्या ;-)
  बाकी आपल्या सर्व गरजा आश्चर्यकारकरित्या एकाच युजरनेम आणि पासवर्डने पूर्ण होतात हे माझ्या देखील आत्ताच लक्षात आलं. ;-)

  ReplyDelete
 7. आयला मीपण माऊस डाव्या हाताने वापरतो आणि मी लेफ्टी नाहीये. अशीच सवय करून घेतली मी. मलाही विचारतात सगळे ते बघून की डावरा आहेस का म्हणून.
  नियंत्रण आणि नियमन या शब्दांमध्ये काही विशेष फरक वाटत नाही मला :(

  ReplyDelete
 8. sorry to say पण तुला नक्की काय सांगायचंय हे समजायला दोनदा पोस्ट वाचली.. :-D ..म्हणजेच पोस्ट थोडी विस्कळीत झाली.
  बाकी सुरवात छान होती. मी माउस दोन्ही हातानं वापरतो.कदाचित डाव्या बाजूलाच ठेवला असता पण आता उजव्या हाताची सवय झालीय माउसला.गुगलबाबा आपल्या गरजांचे नियमन करतो हे मात्र खरे..

  ReplyDelete
 9. Anonymous2:35 AM

  बाबा अरे काल तूला ’तू हापिसात काम कधी करतोस ?;) ’ असे मी सहजच विचारले होते :)

  जाम मनावर घेतलेस की काय :)

  असो, पोस्ट आवडली.....शब्दछल सुपर्ब!!!

  नियंत्रण आणि नियमन सहीच!!

  ReplyDelete
 10. बाबा ?....?

  ReplyDelete
 11. >> कशामुळे कशाकशावर ताण पडतो ;)

  + १

  लोल :)

  ReplyDelete
 12. अपर्णा,
  राग वाटण्यासारखं काय आहे! तुझं मत आहे, तू मांडलंस! आणि मला बरंच वाटतं जे खरं वाटतं ते सगळ्यांनी सांगितलं की!
  आणि अगं अशा बर्‍याच गोष्टी अचानकच रिअलाईज होतात! मग अशा पोस्टा निर्माण होतात! :)

  ReplyDelete
 13. सचिन,
  अरे खरंच नियंत्रण आपल्याला जमत नाही...आपण नियमन करण्याचा प्रयत्न करावा! ;)

  ReplyDelete
 14. आनंदा,
  मी अर्धपुणेकर असल्याचा तू असा फायदा घेशील असं वाटलं नव्हतं! :)

  ReplyDelete
 15. महेंद्रकाका,
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 16. संकेत,
  विस्कळितपणातला अर्थ शोधायचा प्रयत्न करतोय मी (गिरे तो भी टांग उप्पर! :P )
  बाकी, तुला आवडला बरं वाटलं!
  धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 17. सिद्धार्थ,
  अरे खरं म्हणजे मी 'ब्लॉगवाचन' ह्यातच ते समाविष्ट धरलं होतं...जे वाचूनही कॉमेंट लिहित नाहीत (मीही करतो असं कधीकधी) त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट ;)
  अरे अशा बर्‍याच गृहित गोष्टी अचानकच समोर येतात!
  धन्यवाद रे!

  ReplyDelete
 18. ओंकार,
  कुणीतरी समानधर्मी भेटला, बरं वाटलं.. किमान तू मला आणि मी तुला हा प्रश्न विचारणार नाही! :P
  बाकी, तुला पण FAQ लावावा लागेल!
  आणि हो नियंत्रण आणि नियमन ह्यात अगदी सूक्ष्म फरक आहे.. Control आणि Management!

  ReplyDelete
 19. संकेतानंद,
  अरे पोस्ट लिहायची प्रोसेसच खूप मजेदार झाली. साक्षात्कारामुळे सुरू झालेली पोस्ट लिहिता लिहिता अजून बरेच साक्षात्कार होत गेले. मला सांगायचं बेसिकली काहीच नव्हतं.मला जाणवलेल्या गोष्टींची प्रोसेस लिहायचा प्रयत्न केला. मी पोस्ट लिहिणं एन्जॉय केलं..बाकी वाचकांवर! ;)
  खूप धन्यवाद तू स्पष्ट मत मांडलंस!

  ReplyDelete
 20. तन्वीताई,
  हो ना अगं...चक्क ताई म्हणतेय म्हटल्यावर मी एकदम अंतर्मुख वगैरे झालो आणि पोस्ट लिहिली ;)
  अगं दोन आठवड्यांच्या गुगलोपासाची फलोत्पत्ती आहे सगळी! :)

  ReplyDelete
 21. mynac दादा,
  तुला प्रश्न पडणं साहजिक आहे..मी देखील मला पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठीच पोस्ट लिहिली होती. आणि काही उत्तरं चक्क सापडलीसुद्धा! :D

  ReplyDelete
 22. हेरंबा,
  हे बरंय!
  माझ्या पोस्टला टाळी आनंदनं घेतली (नारदाच्या वाक्याला टाळी आमच्या बाबांनी घेतली च्या धर्तीवर वाचावे)!

  ReplyDelete
 23. हे काय बाबा लेफ्टी आहेस...मग हळूच बाबाने माउस सरकावला आणि कॉमेंट ला रिप्लाइ केला...हे हे
  कसा आहेस? खूप दिवस गायबलोय अजुन परत होईन काही दिवस काळजी नसावी ;)

  ReplyDelete
 24. Anonymous9:34 PM

  खुप नशीबवान आहात रे तुम्ही सगळे...ऑफ़िसात आमच्या संगणकावर नेट नाही,तश्या कंपनीतील मेल आयडीवर काही ब्लॉगसचे फ़ीड घेतले आहेत,बाकी काही ठिकाणी नेट आहे पण त्यात सर्व ब्लॉक केल आहे आणि तिथे जास्त वेळ बसता ही येत नाही...तरीही मी तिथे काम करतो हा गैरसमज करुन घेउ नका... :)
  तिथे एक तरी पुस्तक असते माझ्या सोबतीला...

  बाबा तु लेफ़्टी आहेस... ;)

  ReplyDelete
 25. काम म्हणजे काय रे भाऊ??? हे..हे.. मी लेफ्टी आहे रे बाबा... :) माउस जमतो बरं का आपल्याला.. हा...

  तू जे सांगितले आहेस ना ते सर्वांना लागू होते बरं का... लोक ऑफिस मध्ये काम कमी आणि नेटिंग जास्त करतात म्हणून डेडलाईनचा बांबू लावावा लागतो... :)

  ReplyDelete
 26. सुहास,
  अरे खरंच FAQ लावायची पाळी येणार आहे जर असंच चालू राहिलं तर ;)
  अरे तुझी खबरबात सगळेच विचारत होते. नेमकं त्याच वेळी मी आणि आनंदपण गायब होतो..योमुं कधीकधी आणि देवेन पण..गंमतच सगळी...आता एकदा ठरवून दंगा करू बघ! :D

  ReplyDelete
 27. देवेन,
  अरे आता त्याच गोष्टीचं टेन्शन येऊ लागलंय. कारण जेव्हा मुंबईला परतेन, तेव्हा वांधे होणार आहेत. तिथे नेट नसतं ऑफिसात आणि वर्क कल्चरही बेक्कार आहे!
  पण पुस्तकाची आयडिया बेस्टच आहे! :)

  ReplyDelete
 28. अनघा,
  अहो माझ्यापण डोक्यांत एकदम बरेच विचार होते. मी गुंता सोडवण्यासाठीच पोस्ट लिहिली पण इतर बर्‍याचजणांसाठी गुंताच बनून राहिली बहुतेक ;)

  ReplyDelete
 29. रोहन,
  हेहे...काम म्हणजे काय रे भाऊ? असाच प्रश्न विचारायची वेळ येते कधी कधी! म्हणूनच बांबू लावतात...हे अगदी सोळा आणे सत्य! :)

  ReplyDelete
 30. विद्याधर, म्हणून मी तुझा fan झालोय गेल्या काही दिवसात. किती सुंदर परीमार्ष केलायस सगळ्याचा!!! बाबा मी पण असा दावा कधीच करणार नाही कि मी साडे ८ तास कामच करत असतो. १ तास तरी मी इकडे तिकडे timepassच करत असतो.

  ReplyDelete
 31. श्रीराज,
  खूप धन्यवाद!
  मी जिथे काम करतो तिथलं वर्क कल्चर मस्त आहे. तुम्ही किती वेळ काम करता ह्यापेक्षा तुम्ही किती काम करता ह्याला जास्त महत्व आहे. आऊटपुट मिळतंय, तोवर तुम्ही बाकी काय काय करता ह्याची कुणाला पर्वा नाही!

  ReplyDelete
 32. गुरुजी: ज्याला समजलं नाही त्याने हात वर करा...

  (बंड्या दोन्ही हात वर करुन उभा आहे..)

  ReplyDelete
 33. सौरभ,
  बंड्या तसाच उभा राहणार रे...
  कारण मलाच अजून कळलेलं नाही एग्झॅक्टली काय झालं ते...साक्षात्कार बहुतेक वेळा असेच असतात.. अगम्य ;)

  ReplyDelete