10/24/2010

मिशन इम्पॉसिबल

जगाच्या इतिहासामध्ये बरेचदा असं होतं, की काही विक्षिप्त माणसं सर्वशक्तिनिशी एखाद्या महाशक्तिशाली व्यक्ति, संस्था किंवा समूहासमोर थेट लढा द्यायला उभी राहतात. कारणं काहीही असोत, त्यांची बाजू चूक असो, बरोबर असो किंवा चूक-बरोबरच्या मधली, पण त्यांचं हेच गोलियाथ समोर लढणार्‍या डेव्हिडसारखं (संदर्भ - बायबलमध्ये गोलियाथ ह्या प्रचंड योद्ध्याशी डेव्हिड ह्या छोट्याशा मुलानं युद्ध करून हरवलं होतं.) लढा देणं अनेकांना प्रेरणा देऊन जातं. शंभरातल्या नव्याण्णव वेळा हे 'मिशन इम्पॉसिबल'च असतं.

सध्या देखील असाच एक वेडा, विक्षिप्त डेव्हिड अमेरिकारूपी महाकाय, महाशक्तिशाली गोलियाथसमोर दंड थोपटून उभा आहे - ज्युलिअन असाँज. 'विकिलीक्स' नामक 'धोक्याची घंटा' वाजवणार्‍या वेबसाईटचा मुख्य संपादक. ज्यांनी सर्वशक्तिमान अमेरिकेच्या सैन्यानं वाळवंटी, गरीब इराक आणि अफगाणिस्तानात युद्धाच्या छायेत घडवलेले निर्दयी उत्पात आणि केलेले अमानुष अत्याचार, त्यांच्याच सैन्याच्या 'अधिकृत' कागदपत्रांना फोडून जगासमोर आणलेत. ज्युलियन असाँज ह्याच वेबसाईटचा सार्वजनिक चेहरा आणि प्रवक्ता आहे.

ज्युलिअनचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा निरागस वाटतो, पण प्रतिभेचं आणि कुठल्यातरी वेगळ्याच निश्चयाचं तेज त्याच्या चेहर्‍यावर कायम जाणवतं. मी पहिल्यांदा विकिलीक्सनं फोडलेला अमेरिकी युद्धविमानाचा व्हिडिओ पाहिला होता आणि जसे वैमानिक व्हिडिओगेम्स खेळत असल्यागत शिव्या देत जमिनीवरच्या नागरिकांना टिपत होते आणि त्याचबरोबर मागून आलेल्या ऍम्ब्युलन्सलाही त्यांनी सोडलं नाही, ते पाहून माझ्या मनात अमेरिकेबद्दल असलेली पूर्वीपासूनचीच भावना अजून बळावली.

अमेरिका ही संधीसाधू आणि जगविघातक शक्ती आहे. त्यांना स्वतःच्या देशाखेरीज आणि त्यातही भल्यामोठ्या कंपन्या आणि त्यांच्या बाजारपेठांखेरीज कशाचीही पर्वा नाही. आपलं शस्त्रसामर्थ्य आणि बाजारपेठा अबाधित राखण्यासाठी तो देश कुठलाही नैतिक किंवा अनैतिक मार्ग वापरून जगातल्या कुठल्याही देशाच्या सरकारांशी खेळ करू शकतो. अगदी राष्ट्रप्रमुखांपासून ते महत्वाच्या व्यक्तिंच्या खुनाच्या कटापर्यंत कुठलाही मार्ग वापरण्यास अमेरिका मागेपुढे पाहत नाही. दोन्ही महायुद्धांमध्ये दोन्ही बाजूंना शस्त्र विकून आपली तुंबडी भरणारी अमेरिका असो, की शस्त्रांच्या बदल्यात हुशारी करून सोनं घेणारी अमेरिका असो, जगावर राज्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती तीच. एकदा जगातलं सर्वाधिक सोनं तिजोरीत आल्यानंतर अमेरिकेला विचारणारं कुणीच नव्हतं, त्यांनी धडाधड बेसुमार डॉलर्स छापून खजिना भरून टाकला. जगाचे सगळे व्यवहार डॉलर्समध्ये होत असल्याने, अमेरिकन डॉलर्सच्या छपाईला कुठलाच आळा नाही. त्यांच्या मनात येईल तितकं चलन ते छापत होते. पण १९७० नंतर तेलाचं महत्व लक्षात आल्यावर अमेरिकेनं तिथे मोर्चा वळवला. मग अनेकानेक तेल उत्पादक देशांवर ह्या न त्या प्रकारे नियंत्रण ठेवून अमेरिकेनं आपली तेलाची आवक आणि आपल्याकडील तेल कंपन्यांची भरभराट होत राहिल ह्याची निश्चिती केली. जागतिक तेलाची उलाढाल 'डॉलर्स' मध्ये चालू ठेवून अमेरिकेनं आपला डॉलर्स छापण्याचा धंदा अबाधित राहिल ह्याची काळजी घेतली. गोल्ड डॉलर्स आता पेट्रो डॉलर्स झाले. आपली तेलाची भूक शमवण्यासाठी दुनियाभर लोकशाहीचे ढोल बडवणारी अमेरिका सौदी अरेबियाच्या जुलमी राजसत्तेकडे काणाडोळा करते. पण हीच दुतोंडी अमेरिका, त्यांना भीक न घालणार्‍या इराणच्या अलोकशाही कारभाराबाबत मात्र फारच सजगता दाखवते. ह्याचं कारण, इराणनं थेट 'युरो' ह्या चलनामध्ये तेल विकण्याचा घाट घातलाय, आणि जर तो प्रत्यक्षात आला, तर जागतिक पातळीवरील अग्रेसर ते उत्पादक इराणमुळे आजवर डॉलरमध्येच होत असलेली तेल उलाढाल खूप कमी होईल आणि अमेरिकेच्या कुठलाही ताळतंत्र न ठेवता लक्षावधी 'डॉलर्स' छापण्याला आळा बसेल. ज्यातनं आधीच मोडकळीला आलेली अमेरिकन अर्थव्यवस्था साफ झोपण्याची चिन्ह दिसू लागतील. चीनसारख्या लोकशाहीचा गळा दाबणार्‍या देशाला तोंडदेखले विरोध करणारी अमेरिका, पूर्णतया त्यांच्यावरच अवलंबून असल्याने कधीच काहीच करणार नाही, हे निश्चित आहे. अमेरिकेकडे जेव्हढे डॉलर्स नसतील तेव्हढे चीनकडे असतील अशी स्थिती लवकरच येईल, कारण चीन अमेरिकेला डॉलर्सच्या बदल्यात बॉन्ड्स देऊन अमेरिकेला बेल-आऊट करत आहे. हे सगळं जगापासून लपलेलं नाही, पण अमेरिकेचा दराराच असा आहे, की त्यांच्याविरुद्ध 'ब्र' काढणारे राष्ट्रप्रमुखही जगातून नाहीसे होतात. 'सद्दाम हुसेन' हे ताजं उदाहरण. सगळा तेलाचाच खेळ आहे. मध्यपूर्वेमध्ये रशियन वर्चस्वाला शह देण्यासाठी ओसामा बिन-लादेन ला सीआयए तर्फे शस्त्रं आणि प्रशिक्षण देऊन रशियाविरूद्ध अमेरिकेनंच वापरलं. रशिया निघून गेला आणि तालिबान अमेरिकन हात डोक्यावर घेऊन अफगाणिस्तानात मनमानी करू लागले. बुद्धाचे पुतळे फुटले, भारतीय विमान अपहरण घडलं, पण अमेरिकेला तालिबान हे धर्मांध असल्याचा साक्षात्कार ९/११ झाल्यावरच अचानक झाला. रातोरात तालिबान जगासाठी धोकादायक बनले. मग अफगाणिस्तान बेचिराख झाला आणि आता कसलेला फास अजून आवळण्यासाठी इराकलाही फडतूस कारणं देऊन झोपवण्यात आलं. जॉर्ज बुश सिनियरच्या कुवेत युद्धावेळी झालेल्या अपमानाचा बदला जॉर्ज बुश ज्युनियरनं सद्दामला फाशी देऊन घेतला. तेलाचं भंडारही थेट अमेरिकेच्या हाती आलं. अफगाणिस्तानावरचं नियंत्रण हाती ठेवण्यासाठी आणि चीन व भारतावर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानला चुचकारत ठेवण्याचं धोरण अंगिकारलेलं आहे. आणि एकीकडे जगातल्या सर्वांत मोठ्या दोन लोकशाही म्हणत भारताच्या गळ्यात गळे घालणंही. अमेरिकेसारखा स्वतःच्या कल्याणासाठी करोडो लोकांची आयुष्य उद्धवस्त करणारा देश हा ओसामाहून जास्त धोकादायक आहे.

अमेरिकेचा फास भारतासारख्या स्वतःला होणारी महासत्ता म्हणवणार्‍या देशालाही चुकलेला नाही. लालबहादूर शास्त्रींसारखा दूरदृष्टीचा नेता भारताला शस्त्रमहासत्ता बनवू शकत होता, पण त्यांना संपवण्याचं कुकर्मही सीआयएनंच केलं असल्याचे पुरावे आहेत. एव्हढंच कशाला भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक आणि अत्यंत कार्यक्षम शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा ह्यांना संपवण्याचा कटही सीआयएचाच असल्याचं नेटवर थोडंसं शोधलं तरी मिळू शकतं. इंदिरा गांधी जेव्हा अमेरिकन कार्यक्रमाच्या आड येऊ लागल्या आणि त्यांचा सोव्हिएत रशियाकडे झुकाव वाढू लागल्याचं जाणवलं तेव्हा त्यांच्यावरही दबाव आणण्यात आला होता. अगदी खलिस्तानवाद्यांना खतपाणी घालण्यात अमेरिकेचा हातभार असण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. खलिस्तानवाद्यांनी घडवलेला 'कनिष्क' विमान अपघात सगळ्यांच्याच लक्षात असेल, पण कॅनडा सरकार त्याच्या सूत्रधारांबद्दल दाखवत असलेला मवाळपणा नजरेतून सुटत नाही. अर्थात खरं किती कॉन्स्पिरसी थिअरीज किती आणि दोघांचं मिश्रण किती हे जरी आपल्या कधीच समोर येणारं नसलं, तरी नजरेसमोर घडणार्‍या घटनांचा बारकाईनं अभ्यास केल्यास बरीच संगती लागू शकते. लालबहादूर शास्त्री आणि होमी भाभांच्या हत्येमध्ये सीआयएचा सहभाग असल्याचं सांगणारी ही एक साईट बघा.

अमेरिकेच्या कुकर्मांची यादी पार १९१४ सालापासून आहे. जगाला अण्वस्त्रमुक्त करायला निघालेली अमेरिका स्वतःमात्र जगातली सर्वाधिक अण्वस्त्र बाळगून आहे. आणि जगाच्या इतिहासात आजवर अणुहल्ला करून एक पिढीच्या पिढी उद्ध्वस्त करणारा एकमेव देश हा अमेरिकाच आहे. बारकाईनं बघितल्यास आज जगाच्या कानाकोपर्‍यात चाललेल्या सगळ्या संघर्षांचं मूळ कुठून ना कुठून अमेरिकेपर्यंत जातंच. पॅलेस्टाईन-इस्रायल असोत की कोसोवो-सर्बिया, भारत-पाकिस्तान असोत की अफगाणिस्तान-इराक किंवा कॉकेशस पर्वतातली छोटी मुस्लिम राज्यं आणि रशिया. जगभरात अराजक माजवून स्वतःची तुंबडी भरण्याचा अमेरिकेचा धंदा वर्षांनुवर्षं बिनबोभाट सुरू आहे.

आणि अशा ह्या अमेरिकेचं अगदी धोतरच सोडून त्यांच्या हातात देण्याचं काम विकिलीक्स नं केलं. जगभरच्या 'मानवी हक्कां'चा ठेका घेणारी, इतर देशांमधल्या 'धार्मिक सहिष्णुते'चं मोजमाप करणारी कमिटी नेमणारी अमेरिका स्वतः इराक आणि अफगाणिस्तानात काय रंग उधळतेय हे विकिलीक्सच्या हजारो अधिकृत अमेरिकी कागदपत्र आणि चक्क युद्धविमानातूनच टिपलेल्या अधिकृत व्हिडिओंच्या मार्फत अगदी थेट जगासमोर आलं. अमेरिकेसोबतच 'मानवी हक्क' आणि लोकशाहीचं प्रतीक(!) इंग्लंड आणि वंशवादाचं उधाण आलेल्या ऑस्ट्रेलियाचीदेखील अब्रू पार चव्हाट्यावर आली. पेंटागॉन आणि अमेरिकी संरक्षण मंत्रालयापासून सगळेच अपराधी आता हे सगळं बेकायदेशीर आहे आणि ह्यामुळे आमच्या युद्धभूमीतल्या सैनिकांच्या प्राणांना धोका होऊ शकतो म्हणून बोंबा ठोकताहेत. पण 'बूंद से गयी, वह हौद से नहीं आती' हे त्यांना समजावण्याचा काहीच उपयोग नाही. हजारो निरपराध लोकांना केवळ गंमत म्हणूनही मारलं गेल्याचे किस्से समोर आल्यानं तर सगळ्याच मंडळींची तूर्तास तरी फेफे उडाली आहे. इंग्लंडमध्ये तर एका मानवी हक्क वकिलानं सैन्यावर केसेस करण्याची तयारी सुरू केलीय. आणि विकिलीक्स च्या पत्रकार परिषदेत चक्क अमेरिकेचाच एक पूर्व सैन्याधिकारी, ज्यानं पेंटागॉनच्या अमानुष धंद्यांना कंटाळून पूर्वी त्यांची कागदपत्र फोडली होती, त्यानंही हजेरी लावली आणि जगभरासमोर अमेरिकन संरक्षणव्यवस्थेची कुंडली मांडली. त्यांचीच औषधं त्यांनाच मिळताहेत हे पाहून छातीत थंडावा लाभला.

ज्युलियन असाँज आणि कंपनीचा रस्ता फारच अवघड आहे. पहिल्या हल्ल्यात त्यांना यश मिळालंय. पण विक्षिप्त असाँजवर लगेच अमेरिकेसकट सगळ्याच अपराधी गटानं फास आवळायला सुरूवात केलीय. असाँजचं बालपण आणि तरूणपण फक्त इथून तिथे फिरण्यात गेलं आणि असामान्य बुद्धिबरोबरच येणारा विक्षिप्तपणा त्याच्यात आहेच. एकदा लग्न झालं आणि मग थोड्यांच वर्षांत मुलानंतर घटस्फोट, मग मुलाच्या ताब्यावरून कोर्टसंघर्ष. मग बायकोचं मुलासोबत परागंदा होणं आणि मग ह्याचं कंटाळून पुन्हा जागा बदलणं. त्यानं युनिव्हर्सिटी ऑफ मेलबोर्नमध्ये शिक्षण घेतलं, पण कधी डिग्री घेतली नाही. तो अतिशय कुशल हॅकर आहे आणि नंतर तो ओपन सोर्स सॉफ्टवेअर चा खंदा समर्थक बनला. तो जे काही शिकलाय ते सगळं स्वतःच वाचून आणि सरावानं. त्याचं वाचन प्रचंड आहे. गणित, भौतिकशास्त्रापासून ते थेट तत्वज्ञान आणि न्यूरोसायन्सपर्यंत त्याचं वाचन आहे. अर्थातच तो विक्षिप्त आहे, त्याचबरोबर एकटाच असल्याने अय्याशही. त्यामुळे त्याचे आपल्या जुन्या प्रवक्तीसोबतच अजूनही काही स्त्रियांसोबत संबंध होते. त्याचाच फायदा घेऊन, पहिल्या लीकच्या पाठोपाठ स्वीडिश पोलिसांनी असाँजविरुद्ध बलात्काराच्या दोन केसेस दाखल केल्या. पण चोवीस तासांच्या आतच त्याच्यावरचे आरोप निराधार असल्याने मागे घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही सगळी केवळ सुरूवात आहे.

असाँज आणि त्याच्या मित्रांना, जे विकिलीक्समध्ये बिनपैशाचे कामं करतात आणि अधिकृत कागदपत्रांतून कुणाच्या जीवाला धोका करू शकणारी माहिती ओळनओळ वाचून, संपादित करून जगासमोर आणतात, संभाव्य धोक्यांची कल्पना असणारच. अमेरिकेसारख्या देशाशी थेट शत्रुत्व जीवावरही बेतू शकतं. पण सध्या बहुतेक हीच असाँजची ढाल बनू शकते. कारण आता असाँजला काही झालं, तर थेट अमेरिकेकडे बोटं उठतील. पण अमेरिकेला ह्या सर्वांचीच सवय आहे. ताकदीच्या बळावर त्यांनी पूर्वीही अनेक आवाज दडपले आहेत. पुढेही दडपत राहतील. पण महत्वाचं हे आहे, की कितीही दडपशाही झाली, तरी असं 'मिशन इम्पॉसिबल' लढण्यासाठी कोणी ना कोणी असाँजसारखे उभे राहतीलच. असाँजची बाजू चूक की बरोबर ह्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा, पण तो अमेरिकेविरूद्ध वैयक्तिक स्वार्थासाठी नक्कीच लढायला उभा नाहीये. त्याला शुभेच्छा!

(प्रस्तुत लेखासाठी मी पूर्वी वाचलेले काही विरोप, आंतरजालावर उपलब्ध असलेली माहिती आणि विकिपीडिया चा संदर्भ घेतला आहे.)

39 comments:

 1. काही महिने आधी विकीलीक्स बघितली होती. हे सर्व अवाक करणारे आहे... मानला ह्या लोकांना.. तू लेख मस्त लिहिला आहेस. 'ताश्कंद'ला नेमके काय झाले हे सत्य कधीच समोर आलेले नाही... :(

  ReplyDelete
 2. रोहन,
  एकदम सुपरफास्ट प्रतिक्रिया! :D
  अरे विकिलीक्सनं एकदम क्रांतीच घडवली. जगभरावर पाळत ठेवून, त्यांची गुप्त कागदपत्र पळवणार्‍या अमेरिकेच्याच बुडाखालून त्यांचीच कागदपत्र फोडणे आणि त्यांचे खरे दात 'अधिकृतरित्या' जगाला दाखवणे, ही महत्त्वाची कामं त्यांनी केली.
  असंच कधीतरी ताश्कंदचं सत्यही येईल समोर...दुर्दैवाने आपल्या देशाने तशी एक संधी दवडली आहे..:( त्याबद्दल पुन्हा कधीतरी!

  ReplyDelete
 3. मस्त आहे लेख. माहित नव्हतं आधी हे मला. आता सध्या विकिपिडीया धुंडाळतोय अधिक माहितीसाठी. बरं झालं कोणीतरी अमेरिकेविरुद्ध उभं राहिलं.

  ReplyDelete
 4. भन्नाट लिहिलंयस... खरंच अमेरिकेवर तुटून पडणारं कोणीतरी हवंच होतं आणि टी व्यक्ती साक्षात अमेरिकेतलीच आहे त्यामुळे बरं वाटलं.

  जाता जाता... (जुना विरोप आहे.. माहित असेलच.. तरीही..)

  Few months back, a world-wide survey was conducted by the UN. The question
  asked was... :-

  "Would you please give your honest opinion about solutions to the food
  shortage in the rest of the world ?"
  The survey was a BIG failure because...

  In Africa they didn't know what "food" means.

  In Eastern Europe they didn't know what "honest" means.

  In Western Europe they didn't know what "shortage" means.

  In China they didn't know what "opinion" means.

  In the Middle East they didn't know what "solution" means.

  In South America they didn't know what "please" means.

  In the USA they didn't know what "the rest of the world" means!!!

  ReplyDelete
 5. ^ Very apt message.
  हा मेसेज आला होता मेलमध्ये. पण, बरेच दिवस झाल्याने तो विस्मृतीच्या गर्तेत जमा झाला होता. :-)

  ReplyDelete
 6. कालगतीपुढे कोणाचं काही चालत नाही म्हणतात. हे असे डेव्हिड म्हणजे कालगतीच वाटते मला.

  @हेरंबः तो अमेरिकन नाहीये.

  ReplyDelete
 7. ओंकार, ओह राईट.. तो ऑस्ट्रेलियन आहे नाही का.. सॉरी. मी क्षणभर कम्फुज्य झालो होतो ;)

  ReplyDelete
 8. मस्त.. कुणीतरी उभा रहिला. अरे भारतात कुणी उभा राहिला ना की त्याला कायमचा आडवा करतात. कितीतरी whistle-blowers संपवलेत रे..
  अर्थात ज्युलियन असाँजला संपवण्याचे प्रयत्न होतच आहेत.त्याची साइट ऑफ़लाइन जाऊ नये म्हणून त्याने केलेली उपाययोजना थक्क करणारी आहे.तो पण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतांनाच माहिती फ़ोडत आहे. त्याच्या धाडसाला सलाम !! आजच TOI मधे ज्युलियन असाँजवर लेख आलाय आणि आता तुझा लेख..

  ReplyDelete
 9. खूप मस्त विभि. मला ह्या ज्युलियन असाँजबद्धल माहीतीच नव्हतं. पण जगातील ९५% कुकर्मांमध्ये सीआयए चा हात असतोच हे माहीत होतं. सगळं राजकारण तेल आणि सत्ता यासाठी. लाल बहाद्दुर शास्त्रींचा खून झाला हे माहीती होतं. त्यांच्या कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती की शात्स्रीजींवर विषप्रयोग करून त्यांची हत्त्या घडवून आणली होती. पण इंदिरा गांधी सरकारने ती याचिका आणि इतर सगळंच दडपून टाकलं. म्हणजे त्यांच्या शवाच्म पोस्ट मार्टेम पण न-करता ताश्कंदलाच त्यांचं क्रीमेशन केलं. हे सगळं संशयास्पद होतंच. पण यात सीआयए चा हात होता हे माहीत नव्हतं. त्याच प्रमाणे होमी भाभांच्या अपघाताविषयी सुद्धा संशयाला जागा होती, पण कोणतीच चौकशी झाली नाही. मे बी सीआयए चा हात असल्याने सगळेच गप्प बसले असतील,

  ReplyDelete
 10. विकीलिक्स इंडीयावर पण गोव्याच्या त्या खुनाची सगळी माहिती आहे. सुरुवातीला बरंच काही शोधलं होतं, पण नंतर सोडून दिलं. इतकी माहिती तिथे आहे की सगळी वाचतो म्हंटलं तरीही एखादं वर्ष सहज जाईल निघून. पण साईट खूप छान आहे.

  ReplyDelete
 11. बाबा, जबरदस्त तहलका लेख आहे हा.

  ReplyDelete
 12. काही दिसापुर्वीच मटा किं लोकसत्ता कुठल्यातरी वृत्तपत्रात ही बातमी वाचली होतो, तेव्हापासुन विकीलिंक्स वर नजर ठेवून आहे. खरेतर मीच यावर लिहायला घेणार होतो, पण आता हे वाचल्यावर एवढं च्मुद्देसुद आणि फ़ार काही वेगळं लिहू शकेन असं वाटत नाही. धन्यवाद ! Keep updating this if possible!

  विशाल

  ReplyDelete
 13. खुप उत्तम लेख विभि... अमेरिकेचा फसवा मुखवटा तेलासाठी आहे हे माहित होतंच पण बाकी सर्व जगातल्या अराजकतेमागे अमेरिकेचे हातं गुंतलेले पाहून मन विषण्ण झालं.... मानलं विकिलिक्सवाल्यांना...

  ReplyDelete
 14. Anonymous9:16 AM

  असॉंज ही देखील अमेरिकन मानसिकतेची निर्मिती आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे.

  ReplyDelete
 15. संकेत (आपटे),
  अरे ज्युलिअन असाँज सध्या जगभरचे मथळे गाजवतोय (ऑफकोर्स स्वतंत्र मीडियामध्ये). बरीच माहिती मिळेल बघ त्याची. तो व्हिडिओही मिळेल बघ..चक्क फायटरप्लेनचा इन्साईड व्हिडिओ आहे..

  ReplyDelete
 16. हेरंब,
  अरे हा ज्युलिअन असाँज नक्की कुठला आहे ते त्यालाच ठाऊक, एव्हढा तो फिरलाय :)
  पण तो चारदोन जणांना तरी पोचवणार हे नक्की!
  हा विरोप पूर्वी पाहिल्यासारखा वाटतोय..पण गुड टू सी इट अगेन!

  ReplyDelete
 17. ओंकार,
  हो रे...कालाय तस्मै नमः!

  ReplyDelete
 18. संकेत,
  होय, भारतात तर अनेकानेक व्हिसलब्लोअर्स संपवलेत सरकारनं! पण नेहमीच कुणीनाकुणी उभा राहतोच राहतो. आणि हाच जगाचा नियम आहे!
  ज्युलिअन असाँज आता थोडे दिवस तरी महत्वाची माध्यमं गाजवणार हे निश्चित!

  ReplyDelete
 19. अलताई,
  सीआयएनं जी विषवल्ली जगभर पेरलीय ना, तिची फळं आज उभं जग भोगतंय.
  ताश्कंदला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा खून झाला होता, पण आपण कायम दबावाखाली (की अजून कशाखाली) गप्पच राहिलो. असंही सांगणारी वेबसाईट आहे की, आपल्या सरकारला शास्त्री आणि भाभांच्या खुनाची कागदपत्र देण्यास एक पत्रकार तयार होता, पण आपलं सरकारच उत्सुक नव्हतं.
  कुणाकुणाची कसलीकसली पातकं भोगतोय आपण सगळे!

  ReplyDelete
 20. महेंद्रकाका,
  विकिलीक्स हा उपक्रम एकदमच जगावेगळा आहे, म्हटलं तर एथिकल, म्हटलं तर अनएथिकल. पण बरेचदा वाईट शक्तिंशी लढण्यासाठी अशाच मार्गांचा वापर करावा लागतो.
  फक्त एव्हढंच आहे की, त्यांनी कधी योग्य-अयोग्याची धूसर रेषा ओलांडू नये.. कारण ही शक्ती चुकीच्या मार्गाने वापरली गेली, तर अवघड आहे!

  ReplyDelete
 21. सचिन,
  अरे ही सगळी माहिती नेटवर इथे-तिथे विखुरलेली सापडेलच. माझा एक मित्र मला वेळोवेळी अशा अनेक साईट्स पाठवत असतो. मी फक्त बर्‍याच गोष्टी एकत्र मांडण्याचा प्रयत्न केला.

  ReplyDelete
 22. विशालदादा,
  तू पण लिही ना रे. तू नक्कीच ह्याहून चांगलं आणि अभ्यासपूर्ण लिहिशील. बाकी मी ह्यामध्ये अपडेट्स करता आल्या तर नक्कीच करत राहीन!
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 23. आनंद,
  अरे अमेरिकेचे हात न जाणे किती वेगवेगळ्या रक्तांनी बरबटलेले आहेत, आपण शोधता शोधता थकून जाऊ!
  विकिलीक्सवाले सॉलीडच आहेत!

  ReplyDelete
 24. Anonymous,
  असाँज अमेरिकेचंच औषध अमेरिकेलाच पाजतोय. पण तो अमेरिकन मानसिकतेची निर्मिती आहे असं म्हणून आपण त्याचं महत्व कमी करताय. सापाच्या विषावरचं औषध, सापाच्या विषापासूनच बनतं.

  ReplyDelete
 25. खुद्द अमेरिकेची स्थापना फारच चांगल्या तत्त्वांवर झाली होती. जेफरसन आणि लिंकनसारख्या माणसांचीपण हीच अमेरिका आहे. ठिकठिकाणचे विचारवंत, शास्त्रज्ञ अमेरिकेला आले राहायला गेल्या शतकात त्यामागे पैसा सोडून काहीतरी कारण असणारच.

  पण ब-याचदा चांगल्या तत्त्वांवर सुरू झालेल्या गोष्टीचा ताबा जसे काही कंटक घेतात तसंच काहीसं झालं असावं.

  ReplyDelete
 26. Anonymous8:38 PM

  विद्याधर पुन्हा एक उत्तम माहितीपुर्ण लेख....

  विकीलिंक्स ऐकून माहित होते, पण का माहित नाही मी पटकन या फंदात पडत नाही. एकतर जगाच्या एकूणातच चांगूलपणावर असलेल्या भाबड्या आशावादाचे कारण आणि खूप मनस्ताप होतो सरतेशेवटी... त्यामूळे एका टप्प्यावर ’असेच चालायचे हे’ असे काहिसे मान्य करून दुर्लक्ष केलेय बहुधा!!!

  तू लेख लिहीलायेस आता बहुतेक वाचेन... बाकि अमेरिका काय बोलावे..बळी तो कान पिळी हा त्यांचा न्याय आणि मिंधेपणा हा ईतरांचा...

  बाकि पोस्ट उत्तम बाबा!!

  ReplyDelete
 27. Just yesterday read about it in one mainstream English newspaper.. but of course you cover it in much more depth. Will visit the site sometime.

  ReplyDelete
 28. नमस्कार, तुमचा संपर्क पत्ता मिळेल का?

  ReplyDelete
 29. विकिलिक्सचा म्होरक्या भयग्रस्त : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6811401.cms

  ReplyDelete
 30. ओंकार,
  अरे सुरूवात चांगली झालीच असेल. आणि माझ्या मते आजही व्यक्तिस्वातंत्र्य किंवा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत अमेरिकेचा हात फक्त फ्रान्स धरू शकतो बहुतेक (अनेकदा अतिरेकही होतो पण तरी). पण माझा आक्षेप ह्या गोष्टीला आहे, की स्वतःच्या प्रगतीसाठी दुसर्‍यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार ह्यालोकांना कुणी दिला!

  ReplyDelete
 31. तन्वीताई,
  >>एका टप्प्यावर ’असेच चालायचे हे’ असे काहिसे मान्य करून दुर्लक्ष केलेय
  ह्याच स्थितीकडे आपण सगळे अल्टिमेटली पोहोचतोच! :)
  पण माझं वय अजून कमी आहे ना म्हणून मी अजून त्रागा करतो! :P
  अगं खरंच बघ कधीतरी ती साईट...आपल्यासारख्या सामान्यांना फारसं कळणं अवघड आहे त्या कागदपत्रांमधलं..पण व्हिडिओज डोळे उघडणारे आहेत!

  ReplyDelete
 32. सविताताई,
  विकिलीक्सला आता मथळे मिळताहेत, कारण एकदमच बॉम्ब फोडलाय त्यांनी. पण अजून लोकांना त्यांचं खरं काम आणि उद्देश नीट कळला नाहीये. येईल हळूहळू लोकांपर्यंत..
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 33. हेरंब,
  हेच होईल असं मला वाटत होतं..

  ReplyDelete
 34. Anonymous1:38 PM

  डिटेलातला माहितीपुर्ण लेख...भारी आहे हा असाँज...बाकी अमेरिका त्यांच्या फ़ायद्यानुसार नेहमीच दुटप्पी धोरणे अवलंबीत आली आहे...

  ReplyDelete
 35. सगळं भयानक आहे बाबा !!!

  ReplyDelete
 36. देवेन,
  अमेरिका = दुटप्पी धोरणं! :)
  धन्यवाद रे!

  ReplyDelete
 37. श्रीराज,
  दुनिया झुकती है..झुकानेवाला चाहिये...ह्याचंच उदाहरण!

  ReplyDelete
 38. अरे, त्या भिक्कीलिंक्सवर कुठाय तो भिडिओ??? हॅलिकॉप्टरवाला... ४ लाखांच्या आसपास कागदपत्र फोडली असं ऐकलय!!! इंटरनेट माध्यमाचा सर्वात योग्य उपयोग ह्याने केला असावा.

  One more interesting blog for you -
  http://nuclearsupremacyforindiaoverus.blogspot.com/

  ReplyDelete
 39. सौरभ,
  अरे विकिलीक्स शेड्युल्ड मेंटेनन्ससाठी डाऊन आहे.. !!!
  मला काळजी वाटतेय..
  अरे आणि तुझी लिंकही उघडेना भौ!

  ReplyDelete