लहानपणापासून, म्हणजे अगदी काहीही समजायला लागण्यापूर्वीपासूनच आपण कसली ना कसली निवड करत असतो. अगदी लहान असताना ही निवड आपण सहसा डीएनए मधल्या रचनेवरून करतो, मग थोडे मोठे झाल्यावर मिळत असलेल्या संस्कारांची डीएनएच्या रचनेमध्ये भर पडते आणि त्याहीपुढे प्राप्त परिस्थिती आणि अनुभवही आपल्या निवडप्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावू लागतात. पण एकंदरच निवडीचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात - १. स्वाभाविक निवड २. दर्शनी निवड
थोडं विस्तारानं असं म्हणता येईल, की बरेचदा आपण मनातून एखादी निवड करतो, पण आपला आजवरचा अनुभव, प्राप्त परिस्थिती किंवा मिळालेले संस्कार ह्यांमुळे आपण प्रत्यक्षात काही वेगळंच निवडतो. म्हणजे अजून थोडंसं ढोबळमानाने असं म्हणता येईल की आपले डीएनए आणि काही प्रमाणात अगदी लहानपणी झालेले संस्कार जे आपल्या सबकॉन्शस माईंडपर्यंत अगदी खोलवर रूजलेत किंवा आपले असे काही अनुभव ज्यांनी आपल्या मनावर खोलवर परिणाम केलेत तेच आपली खरी निवडप्रक्रिया आपल्याही अजाणतेपणी करत असतात. एखाद्या गोष्टीनं आपल्याला आतून आनंद मिळतो असं आपण म्हणतो तेव्हा ही तीच आतून झालेली निवड असते, ज्यावर आपलं कुठलंही नियंत्रण नसतं. आपल्या मनाविरूद्ध आपण एखादी गोष्ट करतो म्हणजे नेमकं काय, तर आपण आपल्या स्वाभाविक निवडीपेक्षा काहीतरी वेगळी दर्शनी निवड केलेली असते.
एव्हढं प्रास्ताविक देण्याचं कारण की, समजा तुम्ही किंवा चला मीच, मनातूनच अतिशय खुनशी आणि विकृत आहे. म्हणजे नेमकं काय, तर खुनशी किंवा विकृत गोष्टी केल्यानं किंवा पाहिल्यानं मला आनंद(ज्याला असुरी आनंद असेही म्हणतात) होतो. थोडक्यात माझी स्वाभाविक निवड ही आहे. थोडक्यात माझी निवड किंवा आवड ही सर्वमान्य समाजव्यवस्थेच्या बरोबर उलट आणि तिला मारक ठरणारी आहे. अशा वेळी जर माझी स्वाभाविक निवड बदलण्यासाठी माझ्यावर ब्रेनवॉशिंगचे प्रयोग केले म्हणजे असे प्रयोग केले गेले की ज्यामुळे कुठल्याही खुनशी किंवा विकृत कार्याच्या विचारानेदेखील मला शारिरीक वेदना आणि त्रास होऊ लागेल, तर ते योग्य ठरेल का? माझ्या मनाविरूद्ध माझ्याच मनाला, माझ्या मनाच्या निवडीवर एक ठराविक क्रिया करण्याचा आदेश देणं योग्य आहे का? माझी चांगल्या गोष्टींची निवड स्वाभाविक असावी की दर्शनी? ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न दिग्दर्शक स्टॅनली क्युब्रिक 'अ क्लॉकवर्क ऑरेंज' ह्या चित्रपटातून शोधण्याचा प्रयत्न करतो.
मी आजवर स्टॅनली क्युब्रिकचं नाव ऐकून होतं आणि त्याच्या चित्रपट बनवण्याच्या वेगळ्या शैलीपासून ते अतिशय लो-प्रोफाईल जीवनशैलीपर्यंत त्याच्याबद्दल बरंच वाचलंही होतं. पण त्याचा सिनेमा पाहण्याचा योग काही येत नव्हता. 'अ क्लॉकवर्क ऑरेंज' बर्याच दिवसांपासून मी मिळवून ठेवला होता. शेवटी आज मुहूर्त लागला. मी स्टॅनली क्युब्रिकच्या सिनेमांचं पदार्पण एकदाचं केलं.
'अ क्लॉकवर्क ऑरेंज' ह्या नावाचा एक अर्थ असा आहे की एक अशी गोष्ट जिचे मूळ गुणधर्म दडपून टाकून वेगळेच ठराविक गुणधर्म दिसण्याची सोय केलेली आहे. थोडक्यात एखादा प्रोग्रॅम केलेला जीव. हे मूलतः 'ऍन्थनी बर्गेस' ह्या लेखकाचं पुस्तक आहे. ज्यावरून 'स्टॅनली क्युब्रिक'नं चित्रपट बनवला आहे. क्युब्रिक पूर्ण सिनेमाभर पुस्तकाशी प्रामाणिक राहतो आणि एक विचित्र, बरेचदा डोळ्यांत खुपणारा, खिळवून ठेवणारा आणि तरीही बरंच सारं सामाजिक भाष्य करून जाणारा असा एक कलात्मकदृष्ट्यादेखील उच्च सिनेमा आपल्याला देतो.
चित्रपट हा पूर्णतया हिंसा आणि विकृती (शारीरिक आणि लैंगिक) हाच मूळ स्वभाव असण्यार्या मुख्य पात्राभोवती फिरतो, त्यामुळे चित्रपटातली अनेक दृश्य शिसारीही आणतात आणि कधीकधी अंगावर काटाही आणतात. मुख्य पात्र अलेक्झांडर ऊर्फ ऍलेक्सच्या प्रथमपुरूषी निवेदनातून चित्रपट उलगडत जातो. ऍलेक्स इंग्लंडमधला एक युवक आहे, जो आपल्या तीन मित्रांसोबत संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी शहराच्या रस्त्यांवर अनेक हिंसक कारवाया करत फिरत असतो. क्युब्रिक आपल्यासमोर पहिल्याच दृश्यापासून एक डिस्टोपियन जग उभं करतो, ज्यामध्ये विचित्र आणि विक्षिप्त व्यक्तिरेखा पावलापावलावर भेटतात. ऍलेक्स त्याच्या मित्रांचा स्वघोषित नेता आहे, तेदेखील कुठेतरी त्याचं नेतृत्व मान्य करत असतात. ते आपापसात विचित्र रशियन प्रभाव असलेली इंग्रजी भाषा बोलतात. ऍलेक्सचं निवेदनही तशाच भाषेत आहे. ऍलेक्स आणि मित्रांची ओळख देणारी दृश्य अंगावर काटा आणतात. रस्त्यावर दारू पिऊन पडलेल्या हार्मलेस म्हातार्याला ते सगळे मिळून उगाच बुकलून काढतात. सुसाट वेगाने उपनगरी रस्त्यांवर गाडी चालवतात, ज्यामुळे चिंचोळ्या रस्त्यावर समोरून येणार्या गाड्या घाबरून आजूबाजूला आपटतात. आणि शेवटी एका लेखकाच्या गावाबाहेरील घरात खोटं बोलून शिरून त्याला आयुष्यभरासाठी जायबंदी करतात आणि बायकोचा बलात्कार करून पैसे आणि महागड्या वस्तू लुटून घेऊन जातात. संपूर्ण कुकर्म करताना त्या सगळ्यांनी मुखवटे घातलेले असतात आणि ऍलेक्स 'सिंगिंग इन द रेन' हे गाणं गात, नाचत नाचत संपूर्ण गुन्हा करतो.
मग आपण ऍलेक्सच्या विश्वात शिरतो, जिथे त्याच्या घरी एक साप पाळलेला आहे. त्याचा आपल्या आई-वडिलांशी मोजकाच संवाद आहे. त्यांना ऍलेक्सच्या संध्याकाळच्या प्रतापांची बिलकुलच कल्पना नाही. पण ऍलेक्स 'लुडविग व्हॅन बीथोवन' ह्या प्रसिद्ध संगीतकाराचा चाहता आहे. आणि नुसता नाही तर खूप मोठा चाहता आहे. आणि त्याच्या रचना ऐकताना ऍलेक्सला अपरिमित आनंद मिळतो. पण आनंद म्हणजे काय, तर ऍलेक्सला ते संगीत ऐकताना तो काहीतरी हिंसक किंवा विकृत कृत्य करत असल्याचा आभास होऊन आनंद मिळत असतो. आत्तापर्यंत आपल्याला ऍलेक्स ह्या व्यक्तिरेखेची आणि त्याच्या डोळ्यांतल्या त्या बेफिकिर खुनशी भावांची शिसारी येऊ लागलेली असते. ऍलेक्सचा मूळ स्वभावच असा असल्याचं पूर्णपणे आपल्यावर ठसतं. त्यावर कडी म्हणजे ऍलेक्सचे मित्र त्याच्याविरूद्ध बंड करतात आणि दुसरा एक मित्र नवा नेता बनतो आणि मोठा दरोडा घालण्याचा प्लॅन ठरतो. सुरूवातीला ऍलेक्स हो म्हणतो, पण मग रस्त्यातून चालताना संगीत ऐकून त्याला प्रेरणा मिळते आणि तो बंड करण्यार्या दोघा मित्रांना बदडतो आणि त्यांचं बंड दहशतीनं दडपतो. पण तो प्लॅन तोच ठेवतो आणि रात्री तिथे पोचतो. घरमालकिणीसोबत झटापट होते आणि पोलिस घटनास्थळी पोचतात, पण ऍलेक्सचे दुखावलेले मित्र ऍलेक्सच्या तोंडावर बाटली फोडून पळून जातात. ऍलेक्स पोलिसांना सापडतो. घरमालकिण मेल्यानं ऍलेक्सला १४ वर्षांची शिक्षा होते.
तुरूंगामध्ये ऍलेक्स तुरूंगाच्या धर्मगुरूचा चांगल्या वागणुकीनं विश्वास संपादन करतो. तिथे तो आवडीनं बायबल वाचत असतो. पण बायबलमध्ये तो स्वतःला जीझसला चाबकानं फोडणार्या शिपायाच्या रूपात पाहतो. किंवा तत्सम खुनशी प्रसंगांमध्येच आनंद मिळवत असतो. बाहेरून तो अगदी सुधारल्यागत वागत असतो, कारण त्याला कुठूनतरी सुगावा लागलेला असतो की, एक नवीन पद्धत आणली गेलीय ज्यातून गुन्हेगाराचं मानसिक पुनर्वसन करून त्याला १५ दिवसांत तुरूंगातून बाहेर सोडण्यात येतं. धर्मगुरू ऍलेक्सला समजावतो, की अशा पद्धतींमुळे काही होऊ शकत नाही, माणसाला आतून बदलावंसं वाटलं तरच काही उपयोग आहे. पण ऍलेक्स त्या कार्यक्रमासाठी स्वतःची वर्णी लावण्यात यशस्वी होतो.
ह्या लुडोव्हिको कार्यक्रमाअंतर्गत ऍलेक्सचं ब्रेनवॉशिंग केलं जातं. ज्याअंतर्गत त्याला शारीरिक पॅरॅलिसिस किंवा तत्सम मृतवत संवेदना किंवा अपरिमित वेदना निर्माण करणारी औषधं देऊन हिंसक कृतींच्या चित्रफिती दाखवण्यात येतात. ज्यामुळे त्याचा मेंदू अशा हिंसक कृतींचा संबंध शारीरिक वेदनांशी लावू लागतो आणि आपोआपच त्याचं प्रोग्रॅमिंग सुरू होतं. पण एक घोळ होतो, की ह्या चित्रफितींवेळी बीथोवनच्या नवव्या सिंफनीचं पार्श्वसंगीत असतं, ज्यामुळे त्याचा मेंदू ह्या रचनेचा संबंधही वेदनेशी लावू लागतो.
ऍलेक्स प्रोग्रॅमचं परफेक्ट उत्पादन म्हणून देशासमोर आणला जातो. तुरूंगाच्या धर्मगुरूचे आक्षेप धुडकावून लावत ऍलेक्सला वाजतगाजत सोडण्यात येतं आणि लुडोव्हिको प्रोग्रॅमला मान्यता मिळते. पण ऍलेक्सला बाहेरच्या जगात कुणीच स्वीकारत नाहीत. त्याचे स्वतःचे आई-वडिल त्याला नाकारतात. मग सुरूवातीला ऍलेक्सनं मारलेला म्हातारा आपल्या साथीदारांना बोलावून हतबल आणि हिंसा करण्यास अक्षम ऍलेक्सला मारतो. ऍलेक्स आपल्याला सांगतो, की हिंसा करताना जाणवणार्या मृतवत संवेदनेपेक्षा मार खाणं सोयीस्कर वाटतं.
उर्वरित सिनेमा मग स्वतःची निवड करण्यास अक्षम आणि निवड लादली गेलेल्या ऍलेक्सच्या आयुष्यातल्या विचित्र घटना दर्शवतो. ऍलेक्स योगायोगानं त्याच्या जुन्या सावजाच्या म्हणजेच आता अपंग झालेल्या लेखकाच्या घरी पोचतो. लेखक सुरूवातीला त्याला ओळखत नाही, पण लुडोव्हिकोचं उत्पादन म्हणून ओळखतो. लेखक सरकारविरोधी असल्यानं आपल्या मित्रांना बोलावून ऍलेक्सची स्थिती जगासमोर आणून सरकार पाडण्याचा प्लॅन करतो. पण अचानकच ऍलेक्सच्या 'सिंगिंग इन द रेन' गुणगुणण्यावरून त्याला ऍलेक्सची खरी ओळख पटते आणि तो ऍलेक्सची साक्ष लिहून घेऊन मग त्याला एका खोलीत बंद करतो आणि नववी सिंफनी मोठ्या आवाजात वाजवतो. हतबल ऍलेक्स ती रचना सहन करू शकत नसतो. त्या मृतवत संवेदनेपेक्षा मरण सोयीस्कर समजून ऍलेक्स खिडकीतून उडी मारतो. पण ऍलेक्स मरत नाही. तो जगतो आणि शेवटच्या विचित्र घटनाक्रमानं दिग्दर्शक आपल्याला अजून एक जबरदस्त धक्का देऊन सिनेमा संपवतो.
स्टॅनली क्युब्रिक पूर्ण सिनेमाभर अतिशय ग्राफिक अशी दृश्य वापरतो आणि घटनाक्रमाला पेलण्यासाठी आपली मानसिक तयारी करतो. प्रसंगी काही दृश्यांनी आपल्याला ऍलेक्स आणि एकंदरच सिनेमातल्या जगाची शिसारी येते. पण सिनेमा अतिशय उत्तमरित्या सामाजिक परिस्थितीचंही दर्शन घडवण्यात यशस्वी होतो. सरकार, प्रसारमाध्यमं आणि समाज ह्यांच्यावर इतक्या वेगळ्या पद्धतीनं भाष्य करणं साधसुधं काम नाहीये. तसेच कुठल्याही जीवाची स्वाभाविक निवड करण्याची शक्ती आणि त्याचं त्याबाबतीतलं सार्वभौमत्व ह्यांवर देखील सिनेमा ऊहापोह करतो. कुणालाही एखाद्या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा योग्य मार्ग, निवड लादणं की योग्य निवड करण्याची क्षमता जागृत करणं हा मुद्दा सिनेमाचा पाया आहे. डिस्टोपियन जग म्हणजे पूर्णतः वाईट प्रवृत्तींनी भरलेलं आणि विनाशाच्या उंबरठ्यावर पोचलेली समाजव्यवस्था असलेलं जग दाखवून क्युब्रिक शेवटाकडेही आपल्याला धक्का देऊन जातो.
प्रत्यक्षात ऍन्थनी बर्गेसच्या पुस्तकात २१ प्रकरणं होती, जी त्याच्या मते २१ व्या वर्षाकडे निर्देश करत होती. कारण त्याच्यामते २१ वं वर्षं हे माणसाच्या आयुष्याला खरं वळण देणारं वय असतं. त्याच्या पुस्तकात २१ व्या प्रकरणात ऍलेक्स पुन्हा बाहेरच्या जगात आलाय आणि काही घटना अशा घडतात, ज्याने तो खरोखरच आतून बदलायचं ठरवतो. चांगल्याची स्वाभाविक निवड करतो. पण अमेरिकेतल्या प्रकाशकांनी त्याला सांगितलं की असा शेवट अमेरिकेत चालणार नाही. तो रियल वाटणार नाही, त्यामुळे बर्गेसच्या पुस्तकाच्या अमेरिकन आवृत्तीत २१ वं प्रकरण गाळलंय, त्यामुळे क्युब्रिकनंही जवळपास पूर्ण पटकथा लिहेपर्यंत त्याच्या लक्षात आलं नव्हतं की त्यानं २० प्रकरणांवर आधारितच पटकथा लिहिलीय. मग त्यानंही २१ वं प्रकरण सिनेमात वापरलं नाही. तरीदेखील सिनेमाचा इम्पॅक्ट तिळमात्रही कमी होत नाही. पण माझ्या मते क्युब्रिकच्या दिग्दर्शनाखाली २१ व्या प्रकरणानं सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं असतं.
ऍलेक्सचं पात्र आणि उभं केलेलं एकंदरच जग हे क्युब्रिकच्या कलात्मक दृष्टीची जाणीव करून देतात. प्रसंगी अतिशय हिडीस असणारी दृश्यही एस्थेटिकली वेगळी जाणवतात. क्युब्रिकच्या मी पाहिलेल्या पहिल्याच सिनेमात मी त्याचा फॅन झालोय. आता त्याचे अजून सिनेमे पाहायचेत. अर्थात हा माझा एलिटिस्ट दृष्टिकोनही वाटू शकतो अनेकांना, आणि हा सिनेमा अतिशय बीभत्स व हिडीस तसेच विकृतीचा कळसही वाटू शकतो. पण शेवटी ती आपली आपली निवड आहे.
उत्तम कलाचित्रपटांचा विषय काहीवेळा ज्या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत किंवा मिळणारही नाहीत अशा गोष्टींचा उहापोह करण्याचा असतो. असे प्रश्नांचा जेव्हा समाजाला सामना करावा लागतो तेव्हा ब-याचदा असा पर्याय निवडला जातो ज्यामुळे समाजाची स्थिरता भंग पावणार नाही.
ReplyDeleteआता ऍलेक्सची नैसर्गिक प्रवृत्ती असेलही हिंसाचारी, पण समाजाला ते मारक आहे त्यामुळे त्याला समाजापासून विलग करण्यात येते. आता कोणी म्हणेल की जर त्याचा स्वभावच तसा असेल तर त्याची काय चूक? चूक त्याची नाहीच, चूक कोणाचीच नाही, आणि चूक कोणाची याला उत्तर नाहीच. पण मग अशा वेळेस करणार काय? तर समाज म्हणेल तो पर्याय. किंवा मग तुम्ही समाजाला बदला.
आणि तू उल्लेखिलेला सिनेमा किंवा युद्धचित्रपट अशा ग्रे एरिआचं चित्रण ब-याचदा करतात. कधीकधी असे सिनेमे अशा दिग्दर्शकांचं अशा प्रश्नांवरचं भाष्य म्हणून बघायला चांगले वाटतात पण ब-याचदा अशा सिनेमांचं फलित काही नसल्याने खूपदा या प्रकारचे सिनेमे पाहिल्यावर विषण्णताही येते. मी अशा "undecidable propositions" वरचे सिनेमे बघणं म्हणूनच आजकाल एकदम कमी केलं आहे.
हे नवीन पोस्टच झालं की राव. असो.
>>माझ्या मनाविरूद्ध माझ्याच मनाला, माझ्या मनाच्या निवडीवर एक ठराविक क्रिया करण्याचा आदेश देणं योग्य आहे का?
ReplyDeleteखरच इंटरेस्टिंग विषय आहे हया चित्रपटाचा,तुझ्या पोस्टमधुन तर एकदा पाहिलाच तरीही पाहायच्या लिस्टमध्ये टाकुन ठेवतो.सुरुवातीच प्रास्ताविकही छान लिहल आहेस.
मस्तच लिहितोस रे तू चित्रपटांची समीक्षणं. संपूर्ण चित्रपट डोळ्यांसमोर मांडतोस. सहीच. चित्रपट मी पाहिला नाहीये अजून. (यात नवल नाही. मी चित्रपट एवढे कमी पाहतो की मी अजून देव आनंदचा एकही चित्रपट पाहिलेला नाही. एवढंच काय अमिताभचेही शोले आणि सत्ते पे सत्ता वगळता बाकीचे चित्रपट पाहिलेले नाहीत... हीहीही ... ;-) ) पण, लेख मात्र आवडला.
ReplyDelete=D>...=D>.........
ReplyDeleteMay be I won't go for the movie .. but sure would like to read the book!
ReplyDelete'बीभत्स' रसातल्या चित्रपटांपासून मी अलिकडे जरा लांब रहात असल्याने बघण्याची शाश्वती नाही पण वर्णन आणि समीक्षण तू अतिशय उत्तम केलं आहेस यात वादच नाही. वाचतानाच पूर्ण चित्रपट बघितल्यासारखं वाटलं.. लेखातलं शेवटचं वाक्य तर एकदम बेस्ट !
ReplyDeleteओंकार,
ReplyDeleteतू म्हणतोस ते एका मर्यादेपर्यंत खरं आहेच. 'undecidable propositions' वरचे सिनेमे बरेच असतात. खूपदा असे सिनेमे फेस्टिव्हल फिल्म्स किंवा एलिटिस्ट सिनेमे म्हणूनही ओळखले जातात. पण ह्या केसमध्ये मला तितकंसं अनडिसायडेबल काही दिसत नाही. कुणालाही प्रोग्रॅम करणं चुकीचंच आहे. समाजाला मान्य नाही ना, मग छोटा गुन्हा असेल, तर हृदयपरिवर्तनाचा प्रयत्न करा. हाताबाहेरची केस असेल तर जेलमध्ये टाका, नाहीतर मग फाशी द्या. ऑफकोर्स फाशी ह्या प्रकारावरही अनेक सो कॉल्ड एलिटिस्ट सिनेमे आलेत. अगदी माझं दैवत 'किएस्लोव्स्की'चा देखील स्टँड ऍन्टि-डेथ सेन्टेन्स होता. पण मी तरीसुद्धा फाशीच्या बाजूनंच आहे.
असं असूनदेखील मी हे सगळे सिनेमे ऍप्रिशिएट करतो. कारण सिनेमा हे माध्यम चर्चा करण्यासाठी आणि घडवण्यासाठीच आहे. उत्तरं देण्यासाठी नव्हे. उत्तरं समाजानं स्वतःच शोधायची असतात.
च्यायला खूप लिहिलं! :)
धन्यवाद भाऊ!
देवेन,
ReplyDeleteनक्की बघ अरे. खूपच विचित्रसा वाटणारा पण विचारप्रवृत्तही करणारा सिनेमा आहे!
संकेत,
ReplyDeleteअरे आवघडय गड्या... :)
बरं आहे भावा, तुला सिनेमांचं व्यसन नाहीये ते... नाहीतर आमच्यासारखी अवस्था व्हायची :P
बघ पण कधी जमलं तर...अमेरिकेत तर कल्ट क्लासिक आहे..वन ऑफ द बेस्ट सायन्स फिक्शन मूव्ही!
माऊताई,
ReplyDelete:) तुला आवडला लेख :D
सविताताई,
ReplyDeleteनक्की वाचा पुस्तक. मी स्वतः अजून वाचलं नाहीये, पण सिनेमा इतका उत्तम आहे तर पुस्तक नक्कीच त्याहून चांगलं असेल..
हेरंब,
ReplyDeleteहो सिनेमा बरेचदा 'बीभत्स' रसातच आहे हे तर खरं. पण खरंच एकदम वेगवान आहे सिनेमा. तो कायम एका काल्पनिक जगात घडत असल्याचं आपल्याला मनाच्या एका कोपर्यात जाणवत असतं, पण तरीही आपण ओढले जातो त्यात.. :)
कधी योग आला, तर बघ!
@विद्या :
ReplyDeleteकोणालाही प्रोग्रॅम करणं चुकीचं आहे असं कसं म्हणता येईल? संस्कार म्हणजे एका प्रकारे प्रोग्रॅमिंग करणे नव्हे का? फक्त ते काळाच्या परीक्षेत तावून सुलाखून निघाल्याने आपल्याला तसं वाटत नाही.
समजा एखाद्याला घातक न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. तर त्याला आयुष्यभर समाजापासून विलग ठेवण्यापेक्षा जर सम्यक विचार करून त्याच्या संमतीने एखादा योग्य बदल घडवता आला आणि त्यामुळे त्याला समाजात राहून एक परिपूर्ण आयुष्य जगण्याची संधी मिळाली तर हे योग्य की अयोग्य? इकडे सम्यक विचार हा महत्वाचा.
ह्या वादाला "nature vs nurture" वाद म्हणतात, कदाचित तुला माहीत असेल. आणि nature आणि nurture मधील सीमारेषा अस्फुट आहेत. ते व्हेरिएबल्स सेपरेट करता येत नाहीत. त्यामुळे सर्व फॉर्म्समधलं प्रोग्रॅमिंग टाळणं हे निव्वळ अशक्य आहे. कोणत्याही बाकीच्या गोष्टींप्रमाणे सुवर्णमध्यच साधावा लागेल.
(आणि हो, सिनेमा माध्यम चर्चा घडवण्यासाठी आहे याच्याशी पूर्ण सहमत)
परत एक ब्लॉगपोस्टच झालं!
http://en.wikipedia.org/wiki/Nature_versus_nurture
ReplyDeleteविद्याधर, तुझ्या सिनेमा ह्या विषयांवरच्या पोस्ट वाचल्या कि एक बरं होतं....मी थोडा अभ्यास करू लागते!
ReplyDeleteतर काल तेच केलं....आणि आज लिहायला म्हणून इथे आले तर 'ओंकार भारद्वाज' नी मला जे बोलायचं होतं ते सगळं बोलूनच टाकलंय!! :(
तेच ते Nature v Nurture.
मला आता आठवतोय तो आपला जुना हिंदी सिनेमा....'दो आँखे बारह हाथ.' तो ह्याच थीम वर होता नाही का? आणि खूप चांगल्या सकारात्मक पद्धतीने हाताळलेला होता. हो ना?
चित्रपटांची समीक्षणं तू खूप चांगली लिहितोस ते संकेतच मत मलाही खूप पटलं! :)
ओंकार,
ReplyDeleteगंमत म्हणजे तू तुझ्या दुसर्या कॉमेंटात तेच लिहिलंयस जे मी माझ्या पोस्टमध्ये लिहिलंय..
माझ्या वाक्याचा कंटेक्स्ट बहुदा क्लिअर नाही झाला, म्हणून मी मॉडिफाय करतो..
>>कुणालाही 'फोर्सफुली' प्रोग्रॅम करणं चुकीचंच आहे..
कारण संस्कार जे माणसाच्या अंतर्मनाच्या परवानगीने केले जातात ते प्रोग्रॅमिंगची पांढरी बाजू आहेत...पण कुणावरही निवड लादणं हे चूकच आहे...हां त्याने ती निवड करावी अशी त्याची अनुकूल मानसिक अवस्था बनवणं हे माझ्या सद्सद्विवेकबुद्धिला पटतं आणि ते मी लेखातही लिहिलं आहेच.
@अनघा,
ReplyDeleteबहुतेक तुमच्या प्रश्नालाही माझं वरचंच उत्तर आहे.
कारण दो आंखे बारह हाथ मध्ये कैद्यांवर चांगुलपणा लादला जात नाही, तर त्यांचं हृदयपरिवर्तन घडवून आणलं जातं.
थोडक्यात धाकदपटशाने किंवा दहशतीने समाज सुधरत नाही, असाच संदेश दोन्ही चित्रपटांचा आहे, फक्त त्यांनी आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी वेगळे रस्ते वापरलेत.
मला लेख आणि त्यावरील चर्चा दोन्ही प्रचंड आवडले . तू एखाद्या हात्क्या सिनेमाचे परीक्षण लिहितोस आणि मी तो बघतो .. kontroll बघितला -->अप्रतिम !! आता हा बघावा लागेल .. फारच विभात्स असेल तर बघणार नाही .. मी "saw" series आणि तत्सम सिनेमे बघितले नाहीत आणि बघ्नरही नाही. इथली विभित्स दृश्ये त्या प्रकारची आहेत काय ? असतील तर मी हा सिनेमा बघणार नाही , पुस्तक मिळवून वाचेन .
ReplyDeleteसहजच म्हणून - आपटेंच्या संकेतचे आणि माझ्या बऱ्याच गोष्टी लय जुळतात , मी पण एखादाच सिनेमा बघायचो , b.e. ला आल्यावर सिनेमे बघणे सुरु केले . अजूनही कित्येक प्रसिद्ध सिनेमे बघितले नाहीत..
मला दुसऱ्या वाक्यात हटके म्हणायचे होते.
ReplyDelete@ संकेत,
ReplyDeleteएक महत्त्वाचा फरक आहे. तू परीक्षण वाचून तरी निदान Kontroll बघितलास. मी परीक्षण वाचून फक्त या विभिच्या लेखनाला दाद दिली. :-)
संकेतानंद,
ReplyDeleteतुम्ही दोघे संकेत मिळून सिनेमा न बघण्याच्या कुठल्या संकेताचं पालन करता कोण जाणे! :P
अरे मी स्वतःदेखील बी.ई. तिसर्या वर्षापर्यंत लहानपणापासून सगळे मिळून थेटरात ८-१० सिनेमे पाहिले असतील..आणि एकदा वेड लागल्यानंतर तर कधी कधी दोनेक आठवड्यांतच एव्हढे बघून होतात. :)
kontroll बापच सिनेमा आहे रे! पण क्लॉकवर्क ऑरेंज सॉ सारखा बीभत्स बिलकुलच नाही. बिनधास्त बघ! आणि पुस्तकची वाच! :)
बाय द वे...
तुझं ते हात्क्या 'हटके' आहे हे मला लगेच कळलं होतं...पण त्यावरून मला शक्ति कपूरच्या 'हाच्क्या!' ची आठवण झाली! :D
संकेत,
ReplyDeleteबघशील, बघशील...कधीतरी तूही बघशील..मग मी म्हणेन.. वेलकम टू द क्लब! :)
हा मी पाहिला कारण एका मित्राने मला सांगितलं की ह्या चित्रपटावरुन "जोशी-अभ्यंकर" खुन प्रकरणातील आरोपी प्रभावित झालेले. "माफीचा साक्षीदार" ह्यामानाने बराच मवाळ वाटतो.
ReplyDeleteसौरभा,
ReplyDeleteहे मात्र खरं आहे...माफीचा साक्षीदार मवाळ आहेच..पण तोच फरक आहे...तिथे अंडरप्ले करून हिंसा दाखवली आहे...इथे ओव्हर द टॉप हिंसा दाखवून हिंसेचा फोलपणा! :)
परंतु, जर आधीच हिंसक प्रवृत्ती असलेली माणसे अशा प्रकारच्या चित्रपटातील हिंसक दृश्ये बघून प्रभावित होत असतील तर ह्याचाच अर्थ असा नाही का होत कि ह्या प्रकारचे चित्रपट बनवून, त्यात भडक हिंसा दाखवून, समाजाचे काहीही भलं होत नाही आहे. उलट समाजाला ते घातकच ठरत आहे. कारण आधीच मानसिक संतुलन बिघडलेले असलेल्या मनुष्याच्या बाबतीत, त्या हिंसक भावना उद्दीपित होणे ह्या पलीकडे काहीही घडत नाही आहे.
ReplyDeleteअनघा,
ReplyDeleteहा एकदम पायाभूत प्रश्न आहे. चित्रपट ह्या माध्यमाचे समाजमनावर होणारे परिणाम. मीही ह्यावर बरेचदा विचार केला. पण मग अशा वेळी मनात विचार येतो, की ह्याच मार्गाने जायचं, तर फक्त यश चोपडांचेच सिनेमे बनवावे लागतील. चांगलं हे वाईटाच्याच पार्श्वभूमीवर उठून दिसतं. अर्थात, कुठल्याही गोष्टींना मर्यादा असतेच. आणि कोण कशातून काय संदेश घेईल, ह्याला कुठलाही धरबंद नसतो. पुलंनी सखाराम गटणेमध्ये विनोदी तर्हेने हे स्पष्ट केलंच आहे. तेव्हा त्याला घाबरून कलानिर्मितीला बंधनं घालून घेणं मला योग्य वाटत नाही.
तरीदेखील माझ्यामते एका विशिष्ट चौकटीत राहून, कुठेही वैयक्तिक किंवा पूर्वग्रहदूषित विधानं न करता कलानिर्मितीचे वेगवेगळे प्रयोग करण्यातूनच काहीतरी चांगलं बाहेर येऊ शकतं असं मला वाटतं.
चौकट कुठली, ते शेवटी समाजाच्या अभिसरणावर अवलंबून असतं! :)
आज सिनेमा पहायचा योग आला, प्रचंड अंगावर येतो सुरुवातीच्या तासाभरात आणि आपण कंटाळायला लागताच असा काही बदलतो की विचार करून करून डोक्याचा भुगा करतो... अप्रतिम समिक्षण केलं आहेस, सिनेमा किंबहुना क्युब्रिक, बर्गसच्या व्ह्यू कळाला... अप्रतिम लिहिलं आहेस...
ReplyDelete