10/14/2010

कोन्त्रोल (Kontroll)

सध्याचा सर्वांत जास्त चर्चिला जाणारा आणि खरोखरच कौतुकास्पद असा विषय म्हणजे 'चिले'च्या खाणकामगारांची प्रेरणादायक कहाणी. त्यांचे जमिनीखालचे ७० दिवस आणि सगळ्या जगाने एकत्र केलेल्या त्यांच्या सुटकेच्या प्रार्थना आणि शेवटी सुटका. जमिनीच्या ७०० मीटर खाली एका छोट्याशा बंदिस्त जागेत पहिले दोनेक आठवडे ही तेहतीस माणसं जगाशी कुठल्याही संपर्काशिवाय होती. जगानं त्यांच्या जिवंत असण्याची आशा केव्हाच सोडलेली होती. त्यांच्या बाजूनं तीन गोष्टी होत्या, एक म्हणजे प्रचंड मानसिक शक्ती, दोन म्हणजे नशीब आणि तीन म्हणजे त्यांचं एकत्र असणं. पण ज्या छोट्याशा कॅप्सुलमधून त्यांची सुटका करण्यात आली, ती जेमतेम एकजणच मावेल एव्हढी होती. आणि तब्बल १० मिनिटं ती अंधार्‍या बंदिस्त जागेतून प्रवास करणार होती. अशा प्रवासाचा विचार माझ्या मनाला शिवताच क्षणभर माझ्या अंगावर शहारा आला. ह्या भीतीला 'क्लॉस्ट्रोफोबिया' म्हणतात. म्हणजेच बंदिस्त जागेची भीती. खाणकामगारांच्या ह्या गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या कहाणीमध्ये मी बरेचदा ह्याच शब्दाचा उल्लेख ऐकला आणि खाणीत काम केल्याने त्या सगळ्याच कामगारांवर ह्या 'फोबिया'चा परिणाम कमी कसा होईल ह्याच्या चर्चा सुरू होत्या. पण ह्या शेवटच्या प्रवासाने मात्र माझ्यातला क्लॉस्ट्रोफोबिया जागा केला. आणि जेव्हा जेव्हा क्लॉस्ट्रोफोबिया जागा होतो, तेव्हा तेव्हा मला 'कोन्त्रोल' आठवतो.

'कोन्त्रोल' हा २००३ सालचा एक हंगेरियन सिनेमा आहे. आणि सिनेमाचं कथानक बर्‍याच अंशी क्लॉस्ट्रोफोबियाभोवती फिरतं. सिनेमाचा नायक 'बुलचू' ची ही कहाणी आहे. हंगेरीतल्या बुडापेस्टची अंडरग्राऊंड मेट्रो ही युरोपातल्या जुन्या मेट्रोंपैकी एक आहे. त्याच मेट्रोच्या जाळ्यामध्ये संपूर्ण सिनेमा फिरतो. सुरूवातीलाच सिनेमाचा दिग्दर्शक स्पष्ट करतो की ह्यामध्ये दाखवलेली 'तिकीट तपासनीसां'ची पात्र ही पूर्णतया काल्पनिक आहेत आणि असं काहीही प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही.

हंगेरियन भाषेत 'कोन्त्रोल' म्हणजे 'तिकीट तपासनीस'. सिनेमाचा नायक 'बुलचू' हा एक तिकीट तपासनीस असतो. सिनेमात सुरूवातीलाच मेट्रोत वाढत असलेल्या 'सकृद्दर्शनी आत्महत्यांमागे' एक अज्ञात 'खुनी' असल्याचं जाणवतं. सुरूवातीच्या भागात तिकीट तपासनीसांची आणि त्यांच्या गटांची ओळख होते. त्यांच्या गटांमध्ये चांगल्या कामगिरीबद्दल मिळाणार्‍या खास सोयींसाठी चाललेली स्पर्धा आणि त्यातून उद्भवणारे हेवेदावे ह्यानं सिनेमात हळूहळू रंगत येत जाते. 'बुलचू' च्या गटात विचित्र पात्रांचा भरणा असतो. एकाला 'नार्कोलेप्सी' असते. म्हणजे तो चालताना, बोलताना अचानक कुठल्याही क्षणी झोपू शकतो. हा खराखुरा रोग आहे. माणूस मेल्यागत कोसळतो. एकजण नुकताच भरती झालाय आणि त्याला कुठलाही प्रवासी बिलकुल भाव देत नाही. काही ठराविक, नावाजलेले बिनतिकीटाचे मस्तीखोर प्रवासी आणि त्यांची व बुलचूच्या गटाची स्पर्धा हे सगळं दाखवत दाखवत हळूहळू बुलचूवर लक्ष केंद्रित होऊ लागतं. सुरूवातीपासूनच बुलचूबद्दलचं कुतूहल जागृत होत राहतं. तो जवळपास दिवसरात्र अंडरग्राऊंडमध्येच राहत असल्यासारखं जाणवतं. त्याला ट्रेनमध्ये भेटलेली एक 'फॅन्सी ड्रेस' घातलेली मुलगी त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी असल्यागत वाटतं. किंवा तो तिच्या प्रेमात पडल्यागत. ती कधीच तिकीट घेत नसते. एक सुटाबूटातला माणूस, ज्याला बुलचू टाळायचा प्रयत्न करतो, बुलचूला त्याच्या परत येण्याबद्दल विचारतो. तुझी वाट पाहतोय म्हणून निघून जातो. बुलचू जवळपास अख्खी रात्र अंडरग्राऊंडच घालवत असतो. रात्री तो मेट्रोच्या एका वृद्ध ड्रायव्हरला भेटायला जात असतो, जो त्याचा मित्र असतो. एके रात्री त्याला कळतं की ती मुलगी जिच्या तो प्रेमात आहे, ती त्याच मेट्रो ड्रायव्हरची मुलगी आहे, त्यामुळे ती तिकीट काढत नाही.

बुलचूचं एका अंधार्‍या खड्ड्यात अडकून पडल्याची स्वप्न पाहणं, कायम झोप पूर्ण न झाल्यासारखं दिसणं ह्यानं बुलचूबद्दलचं गूढ वाढत जातं. बुलचूला त्याचा प्रतिस्पर्धी (सध्याच्या सर्वोत्तम गटाचा प्रमुख) चिडवतो आणि 'रेलिंग' चं चॅलेंज देतो. बुलचू आधी खूप नाही सांगतो, पण शेवटी तयार होतो. बुलचूच्या नवोदित साथीदाराप्रमाणेच आपल्यालाही 'रेलिंग' माहित नाही. रेलिंग म्हणजे रात्रीची शेवटून दुसरी ट्रेन निघाली की एका विवक्षित स्टेशनावर त्या ट्रेनच्या पाठोपाठ ट्रॅकवर प्रतिस्पर्ध्यांनी उड्या मारायच्या आणि ट्रेनच्या मागे अंधार्‍या बोगद्यांतून जिथे कुठले कुठले धूर, धूळ आणि धातूंचे कण असू शकतात, धावत धावत जायचं. मागून दुसरी ट्रेन येतेच आहे. त्या ट्रेननं गाठायच्या आत पुढच्या स्टॉपवर प्लॅटफॉर्मवर चढायचं. नाही जमलं तर...

थरारक सीनच्या शेवटी बुलचू वर येतो आणि त्याचा प्रतिस्पर्धी पडण्याच्या मार्गाला असतो. ट्रेन अगदी जवळ आलीय, पण बुलचू त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या हाताला धरून अखेरच्या क्षणी त्याला वर ओढतो. पण मग आपल्याला 'तो' पुन्हा दिसतो. माणसांना ट्रेनसमोर 'ढकलणारा'. मग पुन्हा बुलचूची प्लॅटाफॉर्मवरच होत असलेली सकाळ आपल्याला दिसते. आपल्याला पुन्हा एकदा बिनातिकीटबहाद्दर 'बूट्सी' दिसतो. जो तपासनीस जवळ आल्यावर त्याच्या डोळ्यांत फवारे मारून पळत असतो आणि नेहमीच चपळतेनं सगळ्यांना गुंगारा देत असतो. पण आता मात्र बुलचू त्याला धरण्याचा पूर्ण निर्धार करतो. एक थरारक पाठलाग सुरू होतो. शेवटी बुलचू आणि बूट्सी एका रिक्त प्लॅटफॉर्मवर पोचतात आणि आता बुलचू त्याला धरणार एव्हढ्यात... 'तो' बूट्सीला धक्का देतो आणि ट्रॅकवरून धडधडत ट्रेन येते. बुलचू थिजून गेलेला असतो. बुलचूकडे 'त्या'ची पाठ असते. तो वळायला लागतो, पण बुलचू डोळे मिटून घेतो. जेणेकरून त्यानं त्याला काही करू नये. कारण त्याच्या कुकर्माचा बुलचू हा एकमेव साक्षीदार असतो. बुलचूचे डोळे मिटलेलेच असतात आणि तो बुलचूसमोरून निघून जातो.

प्लॅटफॉर्म कॅमेरांवरून एकमेव साक्षीदार बुलचूला चौकशीसाठी बोलावलं जातं. पण बुलचू काहीच न बघितल्याचं सांगतो. कुठलाही कॅमेरा 'त्या'ला टिपण्यात अयशस्वी ठरल्याचं कळतं. पण अधिकारी बुलचूचं येणं आणि बूट्सीचं मरण अशी टेप बनवून बुलचूला फसवण्याची धमकी देतात. ह्यावर बुलचू काहीच बोलत नाही. बुलचू कधीच अंडरग्राऊंडमधून बाहेर पडत नाही, तो रात्रीदेखील कुठेतरी आतमध्येच झोपतो, त्यामुळे बुलचूला अंडरग्राऊंड आणि तिथल्या सर्व कॅमेर्‍यांची इत्थंभूत बातमी आहे ह्या बळावर सहज बुलचूला अपराधी ठरवणं शक्य असल्याचं दिसतं. बुलचूची नोकरी अखेर सुटते.

पण बुलचूला अंडरग्राऊंड जगातून बाहेर पडायचं नाहीये. त्या रात्री मेट्रोची कसलीशी पार्टी आहे. संगीत जोराने वाजतंय. लोक थिरकताहेत. पण बुलचू मात्र गोंधळलाय. आणि अचानक त्याला 'तो' दिसतो. प्रथम बुलचू त्याला शोधायचा प्रयत्न करतो, पण मग 'तो'च बुलचूच्या मागे लागतो. बुलचू जीव वाचवत पळतो. आणि बुलचूला प्लॅटफॉर्मवर उतरावं लागतं. मागून ट्रेन येतेय. बुलचू पुन्हा 'रेलिंग' करतोय. ह्यावेळेस दोन मृत्यू मागे आहेत. पण बुलचू वेळेत प्लॅटफॉर्मवर चढतो आणि मागून धडधडत ट्रेन निघून जाते. मागे कुणीही नसतं. बुलचू 'मुक्त' झालाय.

त्याला प्रचंड थकवा जाणवतो आणि 'ती'च पुन्हा वेगळ्या कपड्यांमध्ये पार्टीसाठी आलेली त्याला भेटते. आता त्याचं मनही तयार झालंय. ती त्याला हाताला धरून बाहेरच्या जगात घेऊन जाणार्‍या सरकत्या जिन्यांकडे घेऊन जाते. वरून येत असलेल्या प्रकाशाच्या दिशेनं बुलचू निघतो. सगळेच सरकते जिने वरच्या दिशेनं जात असतात.

ह्या सगळ्या कथेचे अनेकानेक अर्थ निघतात. छोटे छोटे सुरेख सिम्बॉलिझम सिनेमात आहेत, जसं त्या मुलीचं फॅन्सी ड्रेस घालून लहान मुलीसारखं (म्हणजेच मुक्त) असणं आणि म्हणजेच बुलचूच्या अगदी विरूद्ध. बुलचूचं पात्र इतकं गुंतागुंतीचं वाटतं पण ते तितकंच सरळ आहे. तुकड्या तुकड्यांतून आणि त्याच्या सूटबूट वाल्याशी संवादातून बाहेरच्या जगातल्या स्पर्धेला कंटाळलेला (तिथल्या बंदिस्त वातावरणाला घाबरलेला) बुलचू अंडरग्राऊंडच्या बंदिस्त जागेचा आधार घेतो. आणि ह्या बंदिस्त जागेतून त्याला बाहेर पडायचं नाहीये. त्याच्या साथीदारांची पात्र, रेलिंगचा पहिला थरारक सीन आणि बूट्सीचा पहिला अयशस्वी आणि दुसरा यशस्वी थरारक पाठलाग आणि त्यावेळचं संगीत खुमारी वाढवतच जातं. 'तो' हे पात्र तर जबराच घेतलंय.

सिनेमातला हायपॉईंट म्हणजे शेवटचा पाठलाग आहे. इथे एक छोटासा क्ल्यू मिळतो, ज्याने आपल्याला 'बुलचू' आणि 'तो' ह्यांच्याबद्दलची रहस्य उलगडतात. पण तो क्ल्यू तसाच समजून घेतला तर. जर त्या क्ल्यूवर विचारच नाही केला, तरीदेखील कोन्त्रोल एक प्रचंड मनोरंजक, थरारक सिनेमा आहे. पण जर बुलचूची मानसिक आंदोलनं आणि त्याची स्थिती आणि शेवटचा क्ल्यू ह्यांच्यासकट जर सिनेमा पाहिला तर मात्र एक अप्रतिम कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळतं. हा सिनेमा त्यावर्षीच्या 'बेस्ट मूव्ही इन फॉरेन लॅन्ग्वेज' कॅटेगरीमध्ये ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता.

30 comments:

  1. सहीये. अजून यासारखे must watch (non-English) पिच्चर असतील तर सांग. नाही तर एखादा ब्लॉगंच लिही...

    ReplyDelete
  2. तू मागे म्हणालेलास तेव्हाच डालो करून ठेवलाय. बघायचा योग यायचाय अजून. लवकरच बघतो आणि मग प्रतिक्रिया देतो. (कारण सध्या तरी पोस्ट वाचून माझा जाम गोंधळ उडालाय :) )

    ReplyDelete
  3. मस्त.पाह्यला पाहिजे.

    ReplyDelete
  4. बराच गुंतागुंत असलेला चित्रपट दिसतोय. एकंदर छान लिहलय्स त्याबद्दल. बघायला हवा कुठे मिळतो ते.

    ReplyDelete
  5. पिक्चर पाहणे आणि मी हे तसं फार समीकरण वगैरे नाहीये..पण इथे मोकळा वेळ जरा मायदेशापेक्षा जास्त मिळतो म्हणून पाहिलेही जातात...
    ही पोस्ट मात्र सुरुवात चिलीच्या खाणीच्या उल्लेखामुळे झाली म्हणून वाचली...कालच तो पहिला कामगार बाहेर आला ते live पाहत होतो....ती कॅप्सूल पाहून त्यात बसायच्या कल्पनेने कस तरी वाटलं....
    by the way this sounds like a hatke movie....

    ReplyDelete
  6. चिलेच्या खाणकामगारांची कहाणी म्हणजे खरचं कौतुकास्पद. त्यांच्या आयुष्यातले ते ७० दिवस त्यांनी कसे काढले असतील? कल्पनाच करवत नाही. पिक्चर डाउनलोड करून पहाणं तितकं जमत नाही पण तुझं समीक्षण वाचून पहावासा वाटतोय.

    ReplyDelete
  7. http://www.youtube.com/watch?v=nJQnWCPMrII
    धन्यवाद विद्याधर. YouTube वर ट्रेलर बघितलं. नक्की बघेन आता. :)

    ReplyDelete
  8. छान लिहिला आहे लेख. बघायला हवा एकदा चित्रपट... :-)

    ReplyDelete
  9. कथा आवडली !! आता तर बघायलाच हवा ! download मारतो आजच!
    ६९ दिवस खाणीत !! कसे काढले असतील ???

    ReplyDelete
  10. मस्तच आहे हो चित्रपट!चिलेमधल्या कामगारांच्या घटनेत आणि चित्रपटात खरंच खूप साम्य आहे.असे सिनेमे आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातात!

    ReplyDelete
  11. सागर,
    नक्की सांगीन रे! मोठी लिस्टच आहे.. :)
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  12. हेरंब,
    गोंधळ उडायचं कारण नाही!
    चांगलं वाईट मत सिनेमा बघूनच बनव.. नक्की बघ लवकरात लवकर!

    ReplyDelete
  13. सचिन,
    नक्की पहा रे भाई!

    ReplyDelete
  14. सौरभ,
    गुंतागुंतीचा आहे तसा, पण शिरलं ना एकदा की मस्त वाटते ती गुंतागुंतच! पात्र इतकी सशक्त आहेत आणि अभिनय आणि संकलन भन्नाट..आपण वाहत जातो!
    टॉरेंटवर सहज मिळेल बहुदा! शोधून पहा! :)

    ReplyDelete
  15. अपर्णा,
    मला वाटलंच होतं, सुरूवातीच्या परिच्छेदामुळे मब्लॉवि किंवा फीड बघणार्‍यांची दिशाभूल होईल...पण ती सुरूवातीपासूनची वैचारिक साखळी तशीच लिहिणं भाग होतं!
    आणि हो..खरंच हटके आहे सिनेमा..संधी मिळाली तर बघ...बिलकुल कंटाळा येणार नाही, ह्याची मी गॅरंटी देतो!

    ReplyDelete
  16. सिद्धार्थ,
    अरे ह्या खाणकामगारांप्रमाणेच ऍन्डीज पर्वतात ७० दिवस विमान अपघातामुळे अडकलेल्या रग्बी टीमची पण एक वेगळीच कहाणी आहे आणि योगायोगाने तीही दक्षिण अमेरिकेतलीच! 'अलाईव्ह' नावाचा सिनेमा होता. पण त्याही आधी मी 'सत्तर दिवस' हे त्यावरचं अनुवादित पुस्तक वाचलं होतं. मानवी जीवनेच्छा आणि इच्छाशक्तीची उदाहरणं आहेत ही!
    आणि जमलं तर सिनेमा नक्कीच पहा!

    ReplyDelete
  17. अनघा,
    हा बराच फेमस सिनेमा आहे त्यामुळे सहज मिळेल.. बघा लवकरच! हॅपी वॉचिंग!!! :)

    ReplyDelete
  18. संकेत (आपटे),
    लय भारी आहे रे सिनेमा..मी कसं लिहिलंय, सिनेमाला कितपत न्याय दिलाय ठाऊक नाही..पण सिनेमा नक्कीच शतपटीने थरारक आणि अविस्मरणीय अनुभव देईल ही गॅरंटी!

    ReplyDelete
  19. संकेत,
    जरूर बघ...पटकथा, अभिनय, संकलन, संगीत आणि दिग्दर्शन ह्यामुळे एकदम वेगवान आणि खिळवून ठेवणारा होतो सिनेमा! पण तितकाच अंतर्मुखही करतो! :)
    नक्की बघ!
    आणि तीव्र जीवनेच्छा, हेच कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे!! :)

    ReplyDelete
  20. विनायकजी,
    खरंच...असे सिनेमे नेहमीच आपल्याला आपल्याच जगाची दुसरी बाजू दाखवतात..समीक्षकांच्या भाषेत सांगायचं तर आपल्या आयुष्याला उभा किंवा आडवा छेद देऊन त्याचं अंतरंग दाखवतात..आम्हा इंजिनियर्सच्या भाषेत सेक्शन काढून दाखवतात! :)
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  21. अरे तसं नाही रे. चांगल्या वाईटबद्दलचा गोंधळ म्हणत नाहीये मी. कन्फ्युजिंग या अर्थी गोंधळ म्हणतोय मी. खूप कन्फ्युजिंग चित्रपट असावा असं उगाचंच वाटलं. बघणार आहे हे तर नक्की.

    ReplyDelete
  22. http://www.youtube.com/watch?v=sz9ZbXwVZZs

    ReplyDelete
  23. बाबा तुमने सुचवा है तो देखना पडेगा....

    ReplyDelete
  24. विद्याधर तू ज्या प्रकारे सगळं अगदी तपशीलवार लिहितोस ना...मानतो तुला मी. सिनेमा तर पाहायलाच हवा. क्रॉसवर्डमध्ये मिळेल असं वाटतंय...बघू...

    ReplyDelete
  25. हेरंब,
    अरे मला वाटलं, की आपल्या आवडीनिवडींच्या इतिहासाकडे बघून तू तसं म्हणतोयस! असो!
    बघून सांग नक्की!

    ReplyDelete
  26. सागर,
    यूट्यूबवर अख्खा उपलब्ध आहे हे ठाऊक नव्हतं...धन्यवाद रे सांगितल्याबद्दल!

    ReplyDelete
  27. तन्वीताई,
    नक्की नक्की बघच!!

    ReplyDelete
  28. श्रीराज,
    खूप आभार!
    क्रॉसवर्डमध्ये मिळेलच बहुतेक, गाजलेला आहे...शोधायची गरज नाही तशी...
    यूट्यूबवर १०-१० मिनिटांच्या ११ भागांमध्ये उपलब्ध आहे संपूर्ण सिनेमा!

    ReplyDelete
  29. पाहून पोस्ट वाचतो आणि मग कमेंटतो

    ReplyDelete
  30. आनंदा,
    बघ नक्की सिनेमा!

    ReplyDelete