3/05/2012

मृत्युदाता -७

भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५ आणि भाग -६ पासून पुढे


"जेव्हा सुरूवातीला इथे पोलीस आले तेव्हा मला त्यांना सर्व सांगावंसं वाटलं, पण त्यांचा ऍप्रोच आणि त्यांचे प्रश्न ऐकून माझी खात्री पटली की त्यांना केस बंद करण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा ते इथलीच झडती घेत होते." डॉ. काळेंची पत्नी बोलत होती.
"कोण होतं? नाव आठवतंय तुम्हाला?"
"हो, कसं विसरेन मी. एसीपी विशाल कोल्हे."
"ह्म्म." रमेशला कोल्हेचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड ठाऊक होता. "काय काय केलं त्यांनी नक्की."
"सगळ्या घराची झडती घेतली आणि ह्यांचा लॅपटॉप घेऊन गेले."
"डॉक्टर अलिकडे कशामुळे चिंताग्रस्त वगैरे होते का?"
"होय, हेच तेलीही विचारत होता पण मी सांगितलं नाही काहीच."
"नक्की काय काय नाही सांगितलंत तुम्ही?"
"हेच की नुकतेच एका ऑटॉप्सीमुळे ते चिंताग्रस्त होते. राजे म्हणून कुणीतरी."
"त्याचं काय?" रमेश एकदम कानात प्राण आणून ऐकू लागला.
"ह्यांना त्या केसमध्ये काहीतरी फाऊल प्ले वाटत होता बहुतेक. एकदा काहीतरी अर्धवट म्हणाले, पण ते सहसा कामावरच्या गोष्टी घरी बोलत नसत, त्यामुळे मीही जास्त खोदून विचारलं नाही. पण मग ते राजेंच्या घरी एकदा जातो म्हणाले."
"मग गेले की नाही?"
"कल्पना नाही."
रमेश विचारात पडला.
"त्यांचा ऍक्सिडेंट कुठल्या रस्त्यावर झाला?" रमेशनं विचारलं.
"अंधेरी वीरा-देसाई रोड."
रमेशनं डोक्यात कॅलक्युलेशन्स केली. "परफेक्ट!" तो एकदम म्हणाला.
"काय?"
"ते बोरिवलीच्या दिशेनं येत होते की सांताक्रूझच्या?"
"बोरिवलीच्या, पण का?"
"ते राजेंच्या घरूनच परत येत होते." रमेश म्हणाला.
"पण ह्याचा काय अर्थ."
"ह्याचा अर्थ हा की राजेंच्या घरावर कुणाचीतरी पाळत होती. आणि डॉक्टर त्यांच्या घरी गेल्यामुळे डॉक्टर रडारवर आले. आणि त्यांना लगेच मार्गातून हटवलं गेलं." रमेश बोलून गेला, पण मग आपण कुठे बसलो आहोत ह्याचं त्याला भान आलं आणि तो चटकन थांबला.
तिचे डोळे पाण्यानं डबडबले होते. आणि तिच्या मांडीवरचं पिल्लू एकदा तिच्याकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहत होतं.
"आय ऍम सॉरी मिसेस काळे" तो जेमतेम म्हणाला.
"इट्स ओके." ती डोळे पुसत म्हणाली, "तुम्ही जर त्यांच्या खुन्यांना शोधणार असाल तर मी काहीही मदत करायला तयार आहे. फक्त पुन्हा इथे येऊ नका, कारण जर त्यांची इथेही नजर असेल तर.." आणि तिनं वैभवीच्या डोक्यावरून हात फिरवला.
"अं.. हो.." रमेशच्या एकदमच त्यानं केव्हढी मोठी चूक केली होती हे लक्षात आलं. त्याच्या ऑब्सेशनमध्ये त्यानं एका छोट्याशा पोरीचा जीव धोक्यात घातला होता.
"माझा नंबर लिहून घ्या आणि कधीही कॉल करा." ती म्हणाली.
"ओके." तो नंबर लिहून घेत म्हणाला. "मी कॉल करीन." त्यानं नंबरखाली 'मिसेस काळे' असं लिहिलं.
"भैरवी."
"काय?"
"मिसेस भैरवी काळे नाव आहे माझं."
"ओह्ह." त्यानं कागदावर करेक्शन केलं.
तो उठून उभा राहिला आणि त्यानं पुन्हा एकदा हॉलवरून नजर फिरवली.
"तुम्ही आत्ता आलाच आहात, तर तुम्हालाही एकदा झडती घ्यायची असली घराची, तर घेऊ शकता." ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली.
"त्याची गरज नाही. कोल्हे जे काही करतात, त्यात निष्णात आहेत."


-----


नरेंद्र आणि रेखा गुवाहाटीतल्या फेमस पान बझार भागातून चालले होते. नरेंद्र कधीकाळी तिथे येऊन गेल्यासारखा इथे तिथे पाहत चालला होता.
"नरेंद्र."
तिच्या बोलण्यानं त्याची तंद्री भंग पावली. "हं."
"आपण इथे का फिरतोय?" ती उन्हामुळे कंटाळली होती.
"काही नाही, सहज, हा गुवाहाटीतला फेमस एरिया आहे, म्हणून म्हटलं तुला जरा दाखवावा. चल इथे छानपैकी रेस्टॉरंट आहे, जेवून घेऊ, तुला भूक लागली असेल."
"तू मला इथे साईटसिईंगला आणलंयस का?"
"कमॉन, मी एरव्ही खूप कोरडा वागतो म्हणून तक्रार करत असतेस तू."
"हं. पण आत्ताही काही फार वेगळा वागत नाहीयेस." तिनं थोडंसं रागानंच म्हटलं. तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता.
"हाहाहा." त्याला हसू फुटलं.
"काय झालं?" ती अजूनच रागावली.
"काही नाही. जेवून घे बरं तू, त्याशिवाय तुझा राग उतरायचा नाही."रेस्टॉरंटमध्ये शिरता शिरता त्यानं '.बी. महातो ऍन्ड असोसिएट्स' ही पाटी आणि इमारतीचा परीघ नीट पाहून घेतला. 'दुपारी पुन्हा एकदा आढावा घ्यावा लागेल म्हणजे रात्री कामास लागता येईल' असा मनाशी आडाखा बांधत तो टेबल शोधू लागला.


-----


रमेशनं इमारतीवर एक नजर फिरवली. मोठ्या कॉम्प्लेक्समधली एक इमारत. शेजारी ३-४ इमारती, म्हणजे पाळत ठेवण्यासाठी शेकडो मार्ग. तो तिथे आल्याचं एव्हाना रजिस्टर झालंच असणार. पण फरक पडत नव्हता. त्यानं बाईक स्टँडवर लावली आणि बेफिकीरपणे पावलं टाकत इमारतीत शिरला. पत्रपेट्यांच्या ओळीवर एक नजर टाकली. राजेंच्या पत्रपेटीच्या कुलूपाशी कुणीतरी झटापट केल्याचं दिसत होतं आणि ती पत्रपेटी रिकामी होती. तो जिन्यानं वर गेला."नमस्कार. मी इन्स्पेक्टर रमेश." रमेशनं दरवाजा उघडणार्‍या मध्यमवयीन स्त्रीला आपलं आयकार्ड दाखवलं.
"या." रडून सुजलेल्या डोळ्यांवरून ती स्त्री बहुतेक राजेंची पत्नी असावी असा रमेशनं अंदाज बांधला. "बसा, मी पाणी आणते." म्हणून त्या आत गेल्या.
रमेशनं हॉलवरून नजर फिरवली आणि समोरच्याच फोटोवरून ती स्त्री श्रीमती राजे असल्याचं स्पष्ट झालं. रमेशनं खिशातून एक उपकरण काढलं आणि सुरू केलं, त्याबरोबर ते वाजू लागलं.
"हे तुमच्याबद्दल गेले काही दिवस बरंच काही सांगायचे." राजेंच्या पत्नी बाहेर आल्या आणि त्यांना काय चालू आहे कळेना. रमेशनं त्यांना शांत राहण्याची खूण केली आणि एकेक करून तो एलेक्ट्रिक सॉकेट्स चेक करू लागला.
"राजेंसोबत थोडे दिवस काम केलं मी वहिनी. त्यांच्यासारखा सिनियर मी आजवर पाहिला नाही. इट वॉज ऍन ऑनर टू वर्क विथ हिम." रमेश एकीकडे बोलता बोलता आता रिमोट कंट्रोल्स शोधू लागला. त्याला समोरच पडलेली एक पोलिस बेनिफिट समारंभाची सीडी दिसली. "ह्या समारंभाला ते मला भेटले होते. ही ती सीडी." असं म्हणून त्यानं सीडी लावली आणि आवाज अतिशय मोठा केला. मग तो श्रीमती राजेंच्या अगदी जवळ गेला आणि हळू आवाजात त्यांना म्हणाला, "तुमच्या घरामध्ये छुपे मायक्रोफोन्स लावलेले आहेत."
"काय?" त्यांचा आवाज एकदम वाढला. रमेशनं त्यांना हळू बोलण्याची खूण केली.
"होय. पोलीस तपासाला कोण आलं होतं?"
"एसीपी विशाल कोल्हे."
"ह्म्म." रमेशनं स्वतःशीच मान डोलावली.
"म्हणजे पोलिसांनीच.."
"नक्की सांगता येत नाही." रमेशनं काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. "पण तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला किंवा तुमच्या घरच्या अजून कुणालाही धोका नाही." हे तो बोलला आणि एकदम त्याला शरम वाटली. "आय ऍम सॉरी. माझा तो अर्थ नव्हता, पण खरंच आता ते फक्त राजेंच्या खुन्यापर्यंत कुणी पोहोचू नये म्हणूनच प्रयत्न करताहेत."
"खुनी? पण त्यांना तर हार्ट ऍटॅक आला होता."
"होय. हार्ट ऍटॅक आला होता, पण तो नॅचरल नव्हता. काहीतरी गडबड केली गेली होती. आणि ती काय आहे, तेच मी शोधायचा प्रयत्न करतोय."
"पण मग नक्की काय.."
"डॉ. काळे काय विचारत होते?"
"ते तुम्हाला भेटले नाहीत का?"
"ही इज डेड." रमेश बोलला आणि त्यानं जीभ चावली. "घाबरू नका वहिनी. आय नो, ह्या शब्दांना अर्थ नाही. पण खरंच तुमच्या जीवाला धोका नाहीये. मला सगळं नीट आठवून सांगा."
"त्यांनी ह्यांना काय काय विकार होते आणि हे कुठली औषधं घेत होते म्हणून विचारलं?"
"मग?"
"ह्यांना फक्त डायबिटीस होता आणि त्यांची तीच औषधं सुरू होती."
"औषधं कुठे आहेत?"
"पोलीस घेऊन गेले तपासासाठी."
"आणि प्रिस्क्रिप्शन देणारे डॉक्टर कोण?"
"डॉ. केदार. मी त्यांचं कार्ड देते तुम्हाला."
रमेशची नजर हॉलभर फिरत होती. 'राजेंच्या मृत्युला पाच दिवस उलटलेत आणि अजूनही ट्रान्समिटर्स सुरू आहे, म्हणजे घरातलाच पॉवर सोर्स वापरला आहे. पण कुठे?' असं स्वतःशीच तो म्हणत असताना त्याची नजर कोपर्‍यातल्या मोठ्या स्पीकर्सवर गेली. त्यानं ते सरकवले आणि मागे पॉवर केबलला जोडलेला छोटासा मायक्रोफोन त्याच्या नजरेस पडला.
मायक्रोफोन बघून श्रीमती राजे अजूनच गांगरल्या. "हे सगळं काय चाललंय माझ्या घरात?" म्हणून त्या सोफ्यावर बसल्या.
रमेश त्यांच्या शेजारी बसला आणि थोडा वेळ तसाच बसून राहिला. मग हळू हळू एक एक शब्द म्हणाला, "राजे वॉज अ व्हेरी ब्रेव्ह मॅन. त्यांनी काही खूप पॉवरफुल लोकांना एक्सपोज करायचा प्रयत्न केला. फार मोठ्या फोर्सपुढे एकटे उभे ठाकले. त्यामुळे हे सर्व घडलंय आणि आता सारवासारव सुरू आहे त्यामुळे थोडा त्रास होणार. पण तुम्हाला ह्या सर्वावर मात करायलाच हवी वहिनी. आणि आय ऍम शुअर तुम्ही निश्चितच कराल." हौसलाअफजाई हे रमेशचं डिपार्टमेंट कधीच नव्हतं, त्यामुळे त्याला स्वतःचंच नवल वाटत होतं.
"पण मग हे पॉवरफुल लोक कोण आहेत?" श्रीमती राजेंनी रमेशकडे पाहत म्हटलं. त्यांचे डोळे विलक्षण सुन्न वाटत होते.
"तेच मी शोधायचा प्रयत्न करतोय."
"पण मग तुमच्याही जीवाला धोका.."
"असाच विचार राजेंनाही करता आला असता, पण त्यांनी नाही केला. आता मी तसा विचार करून त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही." रमेशला अशा सिच्युएशन्समध्ये कसं वागायचं ते मृत व्यक्तिंच्या नातेवाईकांना भेटून थोडंफार माहित होतं, पण काय बोलायचं हे मात्र जमत नसे, त्यामुळे तो फार पुस्तकी बोलत असे.
"हे घ्या कार्ड डॉक्टरांचं."
"ओके."
मग त्यानं घरभर बग स्वीपर फिरवला आणि झडती घेतली. पण मायक्रोफोन फक्त हॉलमध्येच होता.
"आणि हो. अजून एक .. डॉ. काळे मला विचारत होते की ह्यांना पाठीचं काही दुखणं होतं का म्हणून. आणि त्यावर ते काही औषधं घ्यायचे का म्हणून."
"मग?"
"नाही. ह्यांना पाठीचं कसलंही दुखणं नव्हतं."
"ह्म्म." रमेश स्वतःशीच सगळे तुकडे जुळवायचा प्रयत्न करत होता."फक्त एव्हढीच काळजी घ्या की हॉलमध्ये विचारपूर्वक बोला. बाकी घरभर काळजी नाही. आणि कुणीही आलं किंवा काही झालं तर मला फोन करा." रमेशनं आपलं कार्ड त्यांना दिलं. "आणि हो. आजपासून तीन-चार दिवसांनी, तो मायक्रोफोन काढा आणि कचर्‍यात फेकून द्या." असं म्हणून रमेशनं सीडी प्लेयर बंद केला आणि तो घराबाहेर पडला.


-----


नरेंद्र खिडकीतून बाहेर पाहत होता. त्यानं इमारतीचे सगळे एन्ट्रन्स दिसतील अशीच खोली निवडली होती. तो त्याच्या खोलीपर्यंत पोचणारे सगळे मार्ग पुन्हा एकदा नीट पाहून घेत होता.
"नरेंद्र, तुला मला काही सांगायचंय?" रेखा ओट्याजवळून म्हणाली.
"अं" तो खिडकीपासून दूर झाला. "नाही. पण तू आत्ता कसला स्वयंपाक करते आहेस? मी बाहेरून जेवण आणेन म्हटलं होतं ना तुला?"
"ही खोली तुला कशी मिळाली?"
"कशी मिळाली म्हणजे?" तो उसनं हसत म्हणाला, "हे हॉटेल आहे आणि आपण इथे खोली बुक केलीय."
"मला नक्की काय समजतोस तू?"
"म्हणजे?" त्याला काही उमजेनासं झालं होतं.
"मी पहिल्या दिवसापासून तुला संपूर्ण साथ दिली आहे. आणि प्रत्येक काम मी स्वेच्छेनं केलंय. आणि जे आपण करतोय, त्यात तुझ्याएव्हढीच किंबहुना तुझ्याहून जास्तच माझी गुंतवणूक आहे."
"हो मग?"
"मग तू मला अंधारात का ठेवतो आहेस?" ती नरेंद्रकडे रोखून पाहत म्हणाली.
नरेंद्रनं तिच्या नजरेला नजर दिली नाही.
"माझ्याकडे बघ." तिचा आवाज चढला होता. "डोन्ट ट्राय टू प्रोटेक्ट मी."
"मी तुला प्रोटेक्ट करत नाहीये." नरेंद्र जमेल तेव्हढ्या ताकदीनं बोलला.
"मग काय करतोयस?"
"मी फक्त एव्हढाच प्रयत्न करतोय की तुला.."
"प्लॉझिबल डिनायेबिलीटी राहावी?"
"होय."
"कशासाठी?"
"कारण.."
"काय कारण?"
"कारण हे सगळं संपल्यावरही तुझ्यासाठी एक आयुष्य राहावं अशी माझी इच्छा आहे." नरेंद्र शक्तिपात झाल्यासारखा मटकन खाली बसला.
रेखा त्याच्याकडे अविश्वासानं पाहत राहिली. मग ती त्याच्याशेजारी जाऊन बसली.
"मी तुला भेटले, त्याआधीच कितीतरी दिवस माझं आयुष्य संपलं होतं." ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली.
नरेंद्रनं फक्त तिच्याकडे पाहिलं. तिनं त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि ती क्षणभर थोडीशी शहारली.
"काय झालं?" नरेंद्रला तिची अस्वस्थता जाणवली.
"काही नाही." ती उठू लागली.
नरेंद्रनं तिचा हात धरला. "काय झालं ते सांग."
तिनं दोन क्षणाचा पॉज घेतला, "तुला भेटल्यापासून पहिल्यांदाच तुझे डोळे मला वाचता आले नाहीत." त्याच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिह्न पाहून ती चटकन पुढे म्हणाली, "आय नो, मी काहीही बोलते कधीकधी. बायकांचं असंच असतं." म्हणून तिनं हात सोडवला आणि ओट्याकडे गेली.


-----


"शिंदे. एक काम आहे तुमच्यासाठी." रमेश बाईक चालवताना ब्ल्यूटूथवर बोलत होता.
"बोला साहेब."
"मी एक सिरियल नंबर सांगतो, तो लिहून घ्या. आणि ह्या मॉडेलचे आणि ह्या लॉटचे स्पाय मायक्रोफोन्स कुणी आणि कुठून घेतलेत त्याची माहिती काढा." मग त्यानं सिरियल नंबर सांगितला, तेव्हढ्यात त्याला दुसरा कॉल येऊ लागला. "शिंदे, मिळाली माहिती की फोन करा." असं म्हणून त्यानं दुसरा कॉल घेतला.
"हॅलो?" एका स्त्रीचा आवाज होता.
"कोण बोलतंय?"
"मी भैरवी काळे."
"ओह्ह. बोला बोला." त्यानं बाईक लगेच रस्त्याच्या कडेला घेतली. "काय झालं?"
"ह्यांचा लॅपटॉप ते एसीपी घेऊन गेले, पण ते मरण्यापूर्वी एक पुस्तक लायब्ररीतून इश्यू करून घेऊन आले होते, ते आमच्या उशीखाली पडलं असल्यामुळे कुणाच्या नजरेस पडलं नाही. ते मला आत्ता मिळालंय."
"काय आहे त्याच्यात?" आणि ती काही बोलायच्या आत त्याला राजेंच्या घरच्या मायक्रोफोन आठवला. "आईशप्पथ. मिसेस काळे. एक मिनिट. काही बोलू नका. फक्त मी सांगतो तसं करा. आणि प्लीज काहीही प्रश्न विचारू नका." आणि मग त्यानं तिला काही सूचना केल्या आणि शिंदेंना पुन्हा एक फोन लावून वेगानं मोटरसायकल हाणली.
काळेंच्या घरापासून एक किलोमीटरवर त्यानं मोटरसायकल थांबवली आणि तिला फोन केला.
"तुमच्या सोसायटीच्या ऑफिसच्या दरवाजाशेजारी ठेवलेलं उपकरण चालवून पाहिलंत?"
"होय. त्यावर काहीही आवाज आला नाही."
"सगळ्या खोल्या चेक केल्यात?"
"होय."
"ह्म्म.. म्हणजे नशीबानं त्यांनी तुमच्यावर नजर ठेवलेली नाहीये. तरीही मी काही तिथे येत नाही. पुस्तक उपकरण होतं तिथेच ठेवलंत ना?"
"होय. ठीकच. काही वाटलं तर कधीही फोन करा. आणि काळजी घ्या." एव्हढं बोलून त्यानं फोन ठेवला.


-----


"आज रात्री मी '.बी. महातो असोशिएट्स'च्या ऑफिसकडे जाणार होतो." नरेंद्र ओट्याजवळ जात म्हणाला.
"पण त्या इमारतीकडे पाहून वाटत नाही की तिथे सिक्युरिटीसाठी दोनदा पाहणी करण्याची गरज आहे."
नरेंद्रनं एकदम चमकून तिच्याकडे पाहिलं.
"काय? तुला काय वाटलं, तूच एकटा ऍलर्ट असतोस?"
त्याच्या चेहर्‍यावर एक हलकंसं हसू उमटलं.
"मग कितव्यांदा आलायस गुवाहाटीत?"
नरेंद्र पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला.
"अरे काय, तुझ्या डोळ्यांत दिसत होती ती ओळख."
"मला माझ्या डोळ्यांवर काम करणं तरी गरजेचं आहे किंवा कायम गॉगल्स वापरणं तरी."
"काही नको, गॉगल्स वापरा. चांगले छान स्वच्छ डोळे आहेत, ते चेहर्‍यासारखे दगडी नको करून घेऊस."
"ह्म्म." म्हणून त्यानं बॅगेतून छोटी बंदूक काढली.
"आज काय करणार आहेस नक्की? रात्री कोण असणार आहे तिथे?"
"जर ए.बी.महातो असोशिएट्समध्ये काही असेल तर आपल्याला तिथे रात्री काय चालतं, ह्यावरूनच कळेल."
"आणि जर काही आहे हे कळलं तर आपण ती माहिती ऑफिसातून काढणार कशी? हंगामा टाळता येणं अवघड आहे, स्टेट ऑफ द आर्ट सिक्युरिटी सिस्टम्स असतील."
"आपल्याला ऑफिसातून किंवा कुठल्याही कॉम्प्युटरमधून माहिती काढायची नाहीये."
"मग कशी काढायची आहे."
".बी.महातोकडून."
"काय करायचंय नक्की?" रेखाला काहीच कळेनासं झालं होतं.
"अपहरण."


-----


"साहेब, ह्यात फक्त पाठदुखीच्या स्टेरॉईड्सची माहिती आहे." शिंदे रमेशच्या शेजारी बसत म्हणाले.
रमेश गेले दोन तास पुस्तक वाचत होता. "तेच मला कळत नाहीये. हे पाठदुखीचं काय गौडबंगाल आहे कळायला मार्ग नाही. राजेंना पाठदुखी नव्हतीच, त्यांना फक्त डायबिटीस होता. मग काय संबंध आहे ह्या सगळ्याचा?" आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तो पुस्तकाची पानं पलटू लागला.
"परफेक्ट. हे स्टेरॉईड, जर डायबिटीक ओरल मेडिकेशन म्हणून घेतलं, तर कार्डिऍक अरेस्ट होऊ शकतो."
"म्हणजे.."
"म्हणजे राजेंना कुणीतरी त्यांच्या औषधांमधून पाठदुखीचं स्टेरॉईड दिलं आणि तेच डॉ. काळेंना सापडलं. आणि कदाचित त्यांनी पोस्ट-मॉर्टेममध्येही लिहिलं असेल. पण मग रिपोर्ट बदलला गेला आणि त्यांना शंका येऊ लागल्या, त्यामुळे त्यांनाही संपवलं गेलं."
"पण मग हे केलं कुणी? आणि कुठलं स्टेरॉईड आहे हे कसं कळणार आपल्याला?"
"शिंदे, डॉ. काळे जरी तरूण असले, तरी त्यांचा अनुभव ७-८ वर्षांचा सहज होता."
"मग?"
"त्यांना पुस्तकाची गरज कशाला भासावी?" रमेश पुस्तक उलटं पालटं करून प्रत्येक पान पाहू लागला.
"म्हणजे?"
"म्हणजे डॉ. काळेंना नक्कीच शंका आली असावी कुणीतरी मागावर असल्याची. म्हणून हे पुस्तक आहे."
"म्हणजे ह्यामध्ये क्ल्यू आहे?"
"होय. आणि तो सहजासहजी सापडणार नाही, कारण जर पुस्तक चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तरी तो शोधणं अवघड व्हावं असाच प्रयत्न असणार डॉक्टरांचा."
"म्हणजे आता क्ल्यू शोधायचा म्हणजे खुनी सापडेल?"
"कदाचित. पण निदान खुन्यापर्यंत पोचायचा रस्तातरी सापडेल."क्रमशः

2 comments:

  1. good...

    getting more and more interesting...

    ReplyDelete
  2. सुन्न झालोय... सगळे भाग टाकल्यानंतर परत पहिल्यापासून वाचाव लागेल.. :)

    ReplyDelete