भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६, भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१० आणि भाग -११ पासून पुढे
कोल्हे एका छोट्याशा चहाच्या टपरीजवळ बसून चहा पित होता. तेव्हाच दुसरा एक दाढीचे खुंट वाढलेला अजागळ माणूस टपरीवर येऊन उभा राहिला. एकंदर कपड्यांवरून तो मेकॅनिक वाटत होता. कोल्हे युनिफॉर्ममध्ये नव्हता. पण कोल्हेनं त्या माणसाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो शांतचित्तानं चहा भुरकत राहिला. मेकॅनिकनं कळकट हातांनी त्याहूनही कळकट असा चहाचा कप उचलला आणि तोंडाला लावला. सकाळची गडबडीची वेळ असल्यानं अधूनमधून इतरही लोक येऊन पटापट कटिंग चहा मारून पुढे जात होती. कोल्हे उठला आणि त्यानं खिशातून पाचची नोट काढली आणि त्यासोबतच काही नावं लिहिलेली एक चिठ्ठी. ते दोन्ही त्यानं बेमालूमपणे गाडीच्या उंचवट्यावर ठेवलं आणि वळून सरळ चालू लागला. मेकॅनिकनंही खिशातून पाचची नोट काढली आणि कोल्हेच्या नोटेवर ठेवली आणि ठेवतानाच त्यानं ती चिठ्ठी तेव्हढी उचलून घेतली आणि तो ही मागे न पाहता वेगळ्या रस्त्यानं चालत निघून गेला.
-----
रमेश पोलिस स्टेशनात बसून कोल्हेची वाट पाहत होता. तेव्हा त्याला कमिशनर साहेबांनी बोलावल्याचं हवालदार सांगायला आला. रमेश गेला.
"या स्पेशल ऑफिसरसाहेब." कमिशनर थोडेसे कुत्सितपणे म्हणाले.
"नमस्कार साहेब. मी आधी तुम्हालाच भेटायला आलेलो, पण तुम्ही नसल्याकारणे मग मी थेट कोल्हेंच्या जागी गेलो." रमेश स्पष्टपणे म्हणाला.
"ह्म्म. हरकत नाही. इथे आम्हाला असंही कुणी विचारत नाही."
रमेशला त्यांच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं.
"असो. तुम्ही वरूनच ऑर्डर्स घेऊन आलात त्यामुळे मी काही वेगळं सांगत नाही. फक्त आमच्या कुठल्याही एव्हिडन्सला टँपर करू नका एव्हढीच सूचना करेन. बाकी कोल्हे समर्थ आहेतच." सिन्नरकर विषादानं म्हणाले.
"ठीक सर. मी यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न करेनच." असं म्हणून रमेश उठला आणि केबिनमधून बाहेर पडला.
'नक्की काय चाललंय इथे?' हा विचार मनाशी करत रमेश कोल्हेच्या जागेकडे निघाला. आणि रमेशचे सगळे सर्व्हिस रेकॉर्ड्स मागवायची हालचाल सिन्नरकरांनी सुरू केली.
-----
नरेंद्र सावकाश एकेक पाऊल टाकत, बोगीतल्या प्रत्येक सहज दिसणार्या आणि सहज न दिसणार्या प्रवाशाची हालचाल, हावभाव टिपत स्वतःच्या जागेकडे निघाला. आणि तो स्वतःच्या जागी पोचला तेव्हा रेखा जागेवर नव्हती. नरेंद्रच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानं जागेचं निरीक्षण केलं, तर झटापटीची काहीच खूण नव्हती. आणि झटापट झाली असती, तर डब्यात थोडीतरी हालचाल झाली असती. एव्हढीही रात्र झालेली नव्हती. गाडी कुठल्यातरी सिग्नलला थांबण्याच्या बेतास आली होती. चटचट विचार करणं भाग होतं. ती बाथरूमला गेली असण्याची शक्यता होती, त्यामुळे ती एकमेव शक्यता फेटाळण्यासाठी तो आला त्याच्या विरूद्ध दिशेनं वेगानंच पण प्रत्येक बोगीचं निरीक्षण करीत निघाला. कुठे पोती पोती धान्य घेऊन निघालेलं भलथोरलं कुटुंब होतं तर कुठे कॉलेजच्या मुलामुलींचा गट, तर कुठे दोन छोटी कुटुंब मोठ्या कंपार्टमेंटमध्ये एकत्र होती. आणि दोन दोन जणांच्या बाकांवर तर बहुतांश एकेकटे प्रवास करणारे किंवा नवरा-बायको असे सगळे. नरेंद्र बोगीच्या शेवटाकडे पोचला आणि बंद बाथरूमच्या दाराबाहेर उभा राहिला. गाडी थांबली. त्यानं झटदिशी दरवाजा उघडला आणि बाहेर वाकला. त्याहून पुढच्या कंपार्टमेंटमधून एक पाच सहा जणांचा गट गाडीतून उतरताना त्याला दिसला. त्यामध्ये कुणीतरी जबरदस्तीनं धरून ठेवल्यासारखंही घोंगडीखाली असल्यासारखं त्याला वाटलं. एव्हढ्यात मागून टीसीनं त्याला हटकलं. असं उघड्या दरवाज्यातनं वाकू नका, आत जा म्हणून. त्यानं एकदा बाथरूमच्या बंद दरवाज्याकडे पाहिलं, एकदा टीसीकडे पाहिलं आणि एकदा त्या अंधारात हळूहळू माळरानांच्या दिशेनं नाहीशा होत जाणार्या गटाकडे पाहिलं. निर्णय चटकन घ्यायचा होता. आणि एकदमच त्याची ट्यूब पेटली, त्यानं खिशातून मोबाईल काढला आणि त्याचा स्क्रीन उघडला, ठिपका गाडीपासून दूर चालला होता. नरेंद्रनं क्षणार्धात गाडीतून बाहेर उडी मारली. टीसी दोन मिनिटं बोंबलला आणि त्यानं रेल्वेतल्या पोलिसाला पाचारण केलं, पण तोवर नरेंद्र त्या गटाप्रमाणेच अंधारात हरवून गेला होता.
-----
"काय रमेशसाहेब. नाईस टू सी यू." कोल्हेनं तोंडभरून हसूनच रमेशचं स्वागत केलं. त्याच्या हसण्यामधला कुत्सितपणा रमेशला चटकन जाणवला.
रमेश साधा इन्स्पेक्टर होता आणि कोल्हे आयपीएस. रमेशचं पोलिसी कौशल्य आणि प्रामाणिकपणा ह्यामुळे रमेश कायम स्टँडआऊट होता आणि कोल्हे त्याच्या एकंदरच धूर्त असण्यानं स्टँडआऊट होता. दोघेही आपापल्या परीनं पोलिसांच्या दोन विरूद्ध रूपांचे पोस्टरबॉईज होते. आणि त्यामुळेच त्यांचं आपापसात पटणं अशक्य होतं. एका केसमध्ये रमेशला कोल्हेला रिपोर्ट करावं लागलं असता त्यांच्यामध्ये काहीतरी घडलं आणि तेव्हापासून त्यांनी कधीही एकत्र कामही केलेलं नव्हतं किंवा ते एकमेकांशी कधी बोललेही नव्हते. पण त्यादिवशी परिस्थितीनं त्यांना पुन्हा एकत्र आणलं होतं.
"नमस्कार एसीपी." रमेशनं जेव्हढ्यास तेव्हढं बोलायचं ठरवलं होतं.
"मग स्पेशल ऑफिसर! काय म्हणते इमानदारीची पुंगी?"
"एसीपी. आपण कामाचं बोललं तर बरं होईल."
"हाहाहा. कामाचं काय? कुणासाठी करताहात सध्या काम?" कोल्हेचं कुत्सित हसू आणि बोलण्याचा टोन दोन्ही अतिशय तापदायक होते.
"इथे काही ट्रेल मिळाली आहे तुम्हाला असं ऐकतोय मी."
"ह्म्म. काहीतरी चांगलीच नस दाबलेली आहे वाटतं तुमची?" कोल्हे टेबलाच्या ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत म्हणाला, "नाहीतर माझ्यासमोर इतका वेळ बसून माझं इतकं ऐकून घेण्याइतपत तुमची प्रगती किंवा तुमच्या भाषेत तुमचं अधःपतन झालं नसतं." त्याला जे हवं होतं ते सापडलं आणि ती फाईल टेबलावर ठेवत तो पुढे म्हणाला, "असो. प्रत्येकाची एक किंमत असते असं माझं जे ठाम मत होतं, ते दृढ करण्यात तुम्ही हातभार लावलात ते बरं झालं."
"मी इमान विकलं नाहीये एसीपी." रमेश बराच दुखावला गेला होता.
"विकलं नसाल हो, पण गहाण नक्कीच ठेवलं आहात." कोल्हे फाईल उघडत म्हणाला, "हे बघा. वर्तकच्या ऑफिसातली शर्माची हिट, मी पाहिलेल्या बेस्ट हिट्सपैकी म्हणेन. मला कळतंय की हे वर्तकनं केलेलं नाहीय, पण सगळे पुरावे त्याच्याविरूद्ध आहेत आणि नुसतेच पुरावे नाही, तर ते अशा पद्धतीनं की ते प्लांट केलेले नाहीत असं कुणालाही वाटेल."
"देअर इज नो सच थिंग ऍज परफेक्ट क्राईम एसीपी." रमेश फाईलकडे निरखून बघत होता.
"देअर इज, व्हेन यू कॅन पिन इट ऑन समवन एल्स. वर्तकला पद्धतशीर गोवलाय पण मला असं पदोपदी जाणवतंय की त्याला गोवण्यापलिकडे खुन्याला अजून काही नकोय. तो स्वतः कधीही ट्रेस होणार नाही आणि वर्तक स्टेलमेटमध्ये अडकेल एव्हढीच सोय केलेली जाणवते."
"म्हणजे?"
"म्हणजे हे एक डिस्ट्रॅक्शन म्हणा किंवा पहिली पायरी म्हणा. धीस सीम्स टू लीड अप टू समथिंग."
"कशावरून म्हणता तुम्ही हे?"
"कारण लगेचच वर्तकच्या मेव्हण्याचा खून झाला आणि त्याची ब्लॅकमेल रिंग बाहेर पडली."
"तो ज्यांना ब्लॅकमेल करत होता, त्यांच्यापैकी कुणाची हिट असू शकते."
"नक्कीच, पण टायमिंग? आणि पुन्हा त्यामध्ये एक संदिग्ध व्यक्ती वर्तकला सोडवायच्या मिशानं त्या लोकांच्या घरी जाते आणि ही रिंग अचानकच उघडकीस येते हा योगायोग नाही वाटत."
"मी ऐकलं त्याप्रमाणे ती संदिग्ध व्यक्ती कोण, काय अन कशी हे सर्वच गुलदस्त्यात आहे."
"तुम्ही होमवर्क व्यवस्थित करता ऑफिसर. पण ती कमजोर कडीच मला संशयाला भाग पाडते आहे. कारण इतकं व्यवस्थित काम तोच करू शकतो."
"कोण तो? रतन?"
"होय."
"पण त्याचा इथे काय संबंध?"
"त्याला जी सुपारी मिळाली होती, त्यातले पैसे ज्या हवाल्यामार्फत आलेले होते, ती रिंग वर्तक आणि शर्मा सुपरव्हाईज करत होते. त्यांच्या पर्सनल डायर्यांतल्या नोंदी बघा." असं म्हणून कोल्हेनं फाईलमधली शेवटची काही पानं काढून रमेशसमोर ठेवली.
"डायरीची बाकीची पानं कुठे आहेत?"
"त्याची तुम्हाला गरज नाही." कोल्हे शांतपणे म्हणाला.
रमेशनं एक तिखट कटाक्ष कोल्हेकडे टाकला पण तो असहाय होता त्यामुळे त्यानं पुन्हा ती पानं पाहिली.
"म्हणजे तुमचं म्हणणं आहे की रतन तुरूंगातून पळाल्यावर त्याला सुपारी देणार्यांचा खून करत सुटला आहे? ह्यामध्ये काय लॉजिक आहे?"
"लॉजिक तर तुमच्याही इथे येण्यामध्ये काही नाही हो. आमच्यासोबत तुम्ही काम करण्यामध्ये तरी काय लॉजिक आहे? महत्वाचं हे आहे की कुठेतरी आणि कसेतरी ह्या लोकांशी रतनचे लागेबांधे होते. कदाचित त्यांनी त्याला वार्यावर सोडलं म्हणून तो बदला घेत असेल. पण हे काम त्याचं आहे हे मी निश्चित सांगू शकतो. तो नक्षलवाद्यांचा हेर होता एकेकाळी हे विसरू नका ऑफिसर."
"बरं मग मी नक्की करायचं काय आहे?"
"काय करायचंय हे तुम्हाला तिथूनच सांगून पाठवलंय. फक्त कसं करायचंय ते तुम्ही ठरवायचंय. तुम्हाला माग काढण्यासाठी लागेल ती मदत मी करणार, त्याप्रमाणे करतोय." कोल्हे हसत म्हणाला, "आणि हो त्याची एक लेडी ऍकॉम्प्लिस असल्याचेही काही दिशानिर्देश सापडतील तुम्हाला फायलीत."
रमेशनं ती फाईल उचलली आणि काही न बोलता तिथून बाहेर पडला.
'तो म्हणतोय ते खरंय. अधःपतन झालंय आपलं. काय करतोय आपण? आणि नक्की कशासाठी? कुठल्या मृगजळामागे धावतोय आपण?' रमेशला स्वतःचा प्रचंड राग येत होता. पण आता पश्चात्ताप करून उपयोग नव्हता. तो झरझर स्वतःच्या हॉटेलच्या दिशेनं चालू लागला.
रमेश बाहेर पडल्यापडल्या कोल्हेनं एक कॉल फिरवला.
"लेडी ऍकॉम्प्लिसचं बोललोय त्याला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजून त्याला महातोबद्दल काही बोललो नाहीये."
"शाब्बास."
"पण महातोबद्दल सांगणं महत्वाचं आहे नाहीतर तो त्याच्यापर्यंत पोचेल कसा?"
"त्याची काळजी तुम्ही नका करू. महातोच्या पुढचा प्लॅन काय आहे ते कदाचित तो शोधून काढू शकेल."
"तो कसा शोधू शकेल ते." आणि कोल्हेला एकदम लक्षात आलं. "म्हणजे तुमच्या मते तो माझ्याहून चांगला पोलिस आहे?"
"हे बघा एसीपी तुमची स्पेशालिटी वेगळी, त्याची वेगळी. त्यामुळेच त्याला वेगळा घेतला आहे ना टीमवर."
"पण त्यानं माझ्या केसेसमध्ये लुडबूड करता कामा नये."
"तेव्हढी काळजी तुम्ही स्वतः घ्यायला समर्थ आहात एसीपी." एव्हढं बोलून फोन कट झाला.
कोल्हेचा चेहरा थोडासा काळजीग्रस्त झाला.
-----
नरेंद्रनं धावता धावताच कंबरेचं पिस्तुल हातात घेतलं आणि तीन-चार मिनिटांतच त्या गटाजवळ पोचला. 'त्यांचे भाईबंद जवळपासच असतील आणि त्यांच्यापर्यंत ते पोचण्याआधीच त्यांना गाठावं लागेल.' असा मनाशी विचार करतच तो नक्की हल्ला कसा करायचा ह्याचा मनाशी आराखडा बनवत होता. पण एकदमच त्याला त्यांचं वागणं विचित्र वाटलं. ती मंडळी घाबरल्यासारखी वाटत होती. तो अजून जवळ गेला आणि जराशी खात्री होताच त्यातल्या सर्वांत दणकट माणसाच्या डोक्यावर त्यानं पिस्तुल ठेवलं आणि मानेला धरून त्याला मागे ओढलं, त्याबरोबर त्यांच्यातली एक स्त्री किंचाळली आणि मधोमध असलेल्या घोंगडीतनं छोटासा एक मुलगा दचकून बाहेर आला. त्या सगळ्यांच्याच चेहर्यावर भेदरलेले भाव दिसत होते.
"आपके आदमी बोले वैसा गाडीसे उतरके आ गये, अब क्या गोली भी मारोगे? सब तो गाडीमेंही दे दिया था." त्यातला म्हातारासा मनुष्य गयावया करत म्हणाला.
आणि नरेंद्रच्या लक्षात आलं. त्यानं त्या मुलाची तपासणी केली आणि त्याच्या अंगरख्यात रेखाचं घड्याळ होतं, ज्यामध्ये नरेंद्रचा बग होता. दगाफटका झाला होता. त्यानं झटकन मागे वळून पाहिलं, पण गाडी फार दूर गेली होती. ही संधी साधून त्यातल्या एकानं नरेंद्रला धक्का देऊन पाडायचा प्रयत्न केला, पण नरेंद्र झोपेतही हल्ले परतवू शकला असता. त्यानं त्याला जमिनीवर पालथं घातलं आणि माझं तुमच्याशी वैर नाही सांगून गाडीच्या दिशेनं थोडा पळत गेला. पण मग थोडा विचार करून तो परत त्या मंडळींकडे आला.
"यहां से कोई गांव, या रास्ता कहां पडेगा कुछ जानते हैं?" त्यानं विचारलं. पण ती मंडळी विशाखापट्टणमचीच होती, त्यामुळे ओरिसात कुठेतरी उतरल्यानं त्यांचीही पाचावर धारण बसली होती.
नरेंद्रची विचारचक्र भराभर फिरत होती. तो रेल्वे ट्रॅकपासून थोड्या तिरक्या कोनात धावू लागला, जेणेकरून तो पुढच्या दिशेलाच जाईल पण ट्रॅकपासून थोडा थोडा दूर जात राहिल्यानं कदाचित एखादं गाव नजरेस पडेल. असा तो किती तास चालत-धावत राहिला हे त्याच्याही लक्षात आलं नाही, पण रस्त्यात त्याला एक विहिर लागली. तो थकून तिथे दोन मिनिटं बसला आणि त्यानं पाणी प्यायलं. 'विहिर आहे म्हणजे नजीकच गाव असणार.' तो मनाशी म्हणाला आणि तसाच उठून पुन्हा गावाच्या शोधार्थ निघाला आणि अपेक्षेप्रमाणेच त्याला गाव सापडलं. पहाटेची वेळ होती, एक दूधवाला मोटरसायकलवरून दूध घेऊन निघाला होता. नरेंद्रनं त्याला पुढचं स्टेशन कसं गाठायचं ते विचारलं आणि पुढे जी पहिली मोटरसायकल दिसली ती सरळ घेऊन हॉटस्टार्ट करून निघाला. जवळच्या स्टेशनावर पोचून त्यानं गाडी त्यापुढे कुठे थांबेल आणि किती वेळ थांबेल ती माहिती काढली आणि मग स्टेशनाबाहेर पडून एक चांगल्यातल्या गाडीची काच फोडली आणि ती गाडी घेऊन वेगानं पुढे निघाला.
'आपण फार जास्त गुन्हे करतोय, रडारवर यायला फार वेळ लागणार नाही.' तो मनाशीच म्हणत होता, पण पर्याय नव्हता. रेखाला गमावणं अशक्य होतं. 'पण हे केलं कुणी?' मनात हजारो विचारचक्र चालली होती, पण फार अवघड होतं. तो पुढच्या स्टेशनावर ट्रेनला गाठूच शकत नव्हता, त्याहीपुढच्या नाही. पण त्यापासूनच्या तिसर्या स्टेशनावरच ते शक्य होतं. तिथपर्यंत पोचणं म्हणजे अजून साडेचार तास सलग गाडी चालवणं होतं. पण उपाय नव्हता.
जवळपास दोन तासांनंतर एकदम त्याचा मोबाईल वाजू लागला. आणि तो आश्चर्यचकित झाला. त्यानं गाडी बाजूला घेतली आणि उतरून मोबाईल कानाला लावला.
"मी पुढच्या स्टेशनावर उतरलेय. लवकर ये, मी बाहेरच एका टपरीमध्ये लपलेय." आणि फोन डिसकनेक्ट झाला.
नरेंद्रला हर्षवायूच व्हायचा बाकी होता. हा नंबर वन टाईम कॉल इमर्जन्सी नंबर होता. त्यानं सिमकार्ड काढलं आणि लायटरनं आग लावून फेकून दिलं आणि मग मोबाईल जमिनीवर टाकून पायांनी चिरडून टाकला आणि शेजारच्या गटारात ढकलून त्यानं खिशातून रूमाल काढला. गाडीची स्टेअरिंग पुसली, दरवाज्याची हँडल पुसली आणि गावात शिरला. तिथे त्यानं मागच्या गावाकडे जाणारी रिक्षा केली आणि अर्ध्या तासात तो स्टेशनापाशी पोचला. तिथे तो टपरी शोधू लागला. सकाळची वेळ झालेली असल्यानं सगळ्यांनाच जाग आली होती. आता इथे काही घमासान होण्याच्या शक्यता फार कमी होत्या. तेव्हढ्यात ती एका भाजीवालीच्या मागून बाहेर पडली आणि धावतच त्याच्या दिशेनं आली.
त्यानं चहूबाजूनं नजर फिरवली आणि तिचा हात धरून तिला एका बाजूस घेऊन गेला.
"काय झालं?"
"मी घेतलेल्या ट्रेनिंगचा आज उपयोग झाला. पण लवकर चल इथून, इथूनच मला पुढे कुठेतरी घेऊन जायचा त्यांचा प्लॅन होता. त्यांची माणसं असतील इथेच."
"असतील नाही आहेत." नरेंद्र शांतपणे म्हणाला, त्याची नजर चहूबाजूंना भिरभिरत होती.
"म्हणजे?"
"आपण घेरलो गेलो आहोत."
रेखा प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहत होती.
"इट वॉज ऑल अ ट्रॅप. हा पद्धतशीर सापळा होता रेखा. ती भाजीवाली, त्या टपर्या, ते फूलवाले, हे रस्त्यावर चालणारे लोक, ही सगळीच त्यांची माणसं आहेत. आपल्याला त्यांना हव्या त्या जागी आणि त्यांना सोयीचं जाईल इतपतच तयारीनिशी आणण्यासाठी रचलेला फूलप्रूफ प्लॅन."
मग एक एक करून तीन-चार बंदूकधारी त्यांच्या दिशेनं चालत आले.
रेखानं नरेंद्रचा हात एकदम आवळून धरला.
"चलो. दीदी राह देख रही है." त्यातला एक बंदूकधारी म्हणाला.
नरेंद्रचा चेहरा नेहमीप्रमाणेच कोरा होता, "हाथ दूर रखो. हम चलतें हैं." तो दरडावून म्हणाल्यावर बंदूकधारी थोडे दूरच उभे राहिले. "काळजी करू नकोस. मी काहीतरी मार्ग काढेन." तो हळूच रेखाच्या कानात म्हणाला आणि बंदूकधारी चालू लागले, त्यांच्यामागे चालू लागला.
-----
"ही घ्या ठरल्याप्रमाणे तुमची नवी ओळखपत्रं." कोल्हेनं वर्तकच्या पत्नीला एक एन्व्हलप दिला.
तिनं तो लगेच उघडून पाहिला, त्यात एक नवा पासपोर्ट होता आणि पॅन कार्ड वगैरे.
"आता तुम्ही जिथे आपलं ठरलंय, तिथे पोचलात की दुसरा एक एन्व्हलप मिळेलच, त्याप्रमाणे पुढे वागलात की लवकरच तुमच्या नवर्याची खबर येईल तुमच्यापर्यंत." कोल्हे पुढे म्हणाला.
"पण सगळं व्यवस्थित आहे ना?"
"होय होय. पैसे माझ्या अकाउंटमध्ये पोचलेत. आता आजच तुरूंगात त्यांच्या मरण्याची सोय केली आहे." कोल्हे डोळे मिचकावत म्हणाला आणि त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडला.
बाहेर पडल्या पडल्या त्यानं आधी फोन फिरवला.
"वर्तक आज तुरुंगात आत्महत्या करेल साहेब आणि त्याची बायको देशाबाहेर जाईल. आपल्या मार्गातला पहिला काटा दूर आहे साहेब." असं म्हणून कोल्हेनं फोन ठेवला. त्यानं पुढचा फोन करून, थायलंडमधल्या पॅकेजची सोय लागल्याची खात्री केली आणि मग स्वतःच्या गाडीत बसून शांतचित्तानं घराकडे निघाला.
-----
"आर यु शुअर भणगे?" सिन्नरकर मोबाईलवर बोलत होते.
"व्हेरी शुअर साहेब. त्याची गॅरंटी मी घेईन."
"ओके. थँक यू व्हेरी मच." असं म्हणून सिन्नरकरांनी फोन बंद केला.
इंदूरच्या कमिशनरांच्या डोक्यात भलतीच विचारचक्र सुरू होती. त्यांनी नुकतीच रमेशची अख्खी फाईल तपासली होती आणि त्याच्या त्यांना माहित असलेल्या सर्व सुपिरियर्सना फोन करून त्याची माहिती घेतली होती. पण जमेल तेव्हढी गुप्तता पाळून. कारण त्यांना रमेशचा जसा अंदाज आला, तसाच तो निघाला होता. तो नक्की ह्या लोकांसोबत का आहे, हे त्यांना कळत नव्हतं. पण कोल्हेला मात देण्यासाठीचा जो वजीर त्यांना हवा होता, तो रमेश ठरू शकत होता. रमेशशी ह्याबद्दल बोलणं म्हणजे जुगारच होता. पण हा जुगार त्यांना खेळावाच लागणार होता. नाहीतर त्यांना आरशात स्वतःकडे बघणंही कठीण होऊन बसलेलं होतं.
क्रमशः
patpat sampawa ki rao..
ReplyDeleteकुणीतरी वाचतंय हेच खूप आनंद देतं.. :)
Deleteजमेल तितक्या वेगानं लिहायचा प्रयत्न करतोय पण पुरेसा वेळ मिळत नाही.. प्रयत्न चालूच राहतील..
धन्यवाद! :)
ह्ये काय बरुबर नाय!
ReplyDeleteआमी येक भाग वाचून ईसरुन पन जातो तवा कुटं फूडचा भाग लावता अन आमाला मागला भाग पुन्यांदा वाचवा लागतुय
सुदीपजी,
Deleteमला पण खरंच एव्हढ्या मोठमोठ्या गॅप्सनं पोस्ट करायला अजिबात आवडत नाही.. पण वेळेची पंचाईत आहे जरा.. प्रयत्न करतोच आहे गॅप्स कमी करायचा..:)
धन्यवाद!
छान लिहिलंय..आवडला !!
ReplyDeleteसिद्धेश,
Deleteधन्यवाद! :)