3/22/2010

जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे...

मला लहानपणी रामदास स्वामींचं जाम कुतुहल वाटायचं. त्याचं एकमेव कारण म्हणजे ' ते लग्नमंडपातून 'सावधान' हा शब्द ऐकल्यबरोबर पळून गेले होते' ही त्यांची ऐकलेली कथा. 'लग्नात पळून जाण्यासारखं काय?' असं वाटायचं. आता स्वतःच तसं करावे लागेल की काय? असे वाटून उगाच रामदास स्वामींबद्दलचा आदर वाढतो. अर्थात अजून दिल्ली दूर आहे. असो, विषयांतर झालं. पुढे शाळेत असताना त्यांचे मनाचे श्लोक पाठ केले, आणि पाठांतर स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्यावर तर रामदास स्वामी अगदी 'फेव्हरेट' झाले. मग वडिलांकडून त्यांची आणि शिवाजी महाराजांची 'खडक फोडिता रोडकी। निघे तयातून एक बेडकी॥ सिन्धू नसता तियेचे मुखी पाणी कोण घालितो। तो राम आम्हाला देतो॥' ही गोष्ट ऐकली. आणि मग पु.लं. कडून 'हरितात्यां'च्या तोंडून 'आई, चिंता करितो विश्वाची' ऐकलं आणि रामदास ही व्यक्ती पुरती डोक्यात भिनली.
रामदास स्वामींची एवढी प्रस्तावना देण्याचं कारण म्हणजे, आज सहजच, म्हणजे अगदी सहज, काही संंबंध नसताना मला, "जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे। जनी वंद्य ते सर्व भावे करावे॥' ह्या ओळी आठवल्या. मग असंच विचारचक्र फिरायला लागलं. रामदास स्वामींसारखा माणूस जो स्वतः प्रस्थापित समाजाचे संकेत सोडून संन्यस्त झाला, तो लोकांना मात्र 'जनी निंद्य' ते न करण्याचा आणि 'जनी वंद्य' ते 'सर्व भावे' करण्याचा का सल्ला देतोय. की रामदास स्वामींचा त्याकाळच्या माणसांवरून विश्वास उडाला होता? ज्यामुळे ते त्यांना नाकासमोरच चालण्याचा सल्ला देत होते. सामान्य माणसांमधली असामान्य बनण्याची क्षमताच नष्ट करू शकणारा हा श्लोक वाटतो. 'जनी' च्या ऐवजी 'मनी' असतं तर बरं झालं असतं का? की मग ते ओशोचं तत्वज्ञान झालं असतं?
अर्थात पुढे 'मना वासना दुष्ट कामा न ये रे..' वगैरे आहे, पण हे 'जनी निंद्य' मला भलतंच खटकतंय. काही कळत नाही, लहानपणापासून हजारो वेळा ऐकलं असेल हे, पण आज असा जो विचार येतोय, तस कधीच आला नाही. माझा विचार चुकीचाही असेल, कारण एवढ्या मोठ्या माणसाच्या श्लोकाचा कदाचित मी योग्यं अर्थ लावू शकत नसेन. पण मला तो पटत नाहीये हे मात्र खरं.
असो. आता स्वामीचं बाकी साहित्य वाचणं भाग आहे, खरा अर्थ जाणून घेण्यासाठी. पण कुणाला वेगळा अर्थ लागत असल्यास जरूर सांगा.
बाकी तोपर्यंत मी 'चिंता करितो विश्वाची!'

6 comments:

  1. फार अभ्यास नाही माझा ह्या विषयातला पण तरीही...

    परि अंतरी सज्जना नींववावे ह्या श्लोकाचा अर्थ समजला तर आपल्याला हवे ते जाणायला मदत होईल असे वाटते...

    ReplyDelete
  2. ब्लॉगवर स्वागत शिरीष,
    होय आता मनाच्या श्लोकांचा नीट अभ्यास करायला हवा असं दिसतेय.
    प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  3. Anonymous9:55 AM

    ज्नी वंद्य ते सर्व भावे करावे म्हणजे परंपरेला अनुसरुन आहे ते वॆयक्तिक सोयी-गॆरसोयींचा बाऊ न करता करावे

    ReplyDelete
  4. होय. तोच अर्थ अभिप्रेत असावा...
    प्रतिक्रियेबद्दल आभार अनामित!

    ReplyDelete
  5. संकेत आपटे7:23 PM

    वाईट गुण हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ: चोरी करणे, खोटे बोलणे वगैरे वगैरे. माणूस स्वतः कितीही खोटं बोलला, तरी दुसर्‍याच्या खोटारडेपणाची निंदाच करतो. तेव्हा ’जनी निंद्य’ चा ’वाईट गुण’ हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. लग्न न करणे किंवा सोवळंओवळं न पाळणे या आणि अशा गोष्टींचीही समाजात निंदाच होते, पण ’रुढी आणि परंपरा’ हा अर्थ इथे अभिप्रेत नाही.

    ReplyDelete
  6. अर्थ चांगलाच अभिप्रेत आहे रे संकेत...
    पण प्रश्न विचित्र पडला...की जनी निंद्य, म्हणजे जनरली वाईटच असेल असं नाही ना? आणि जनी वंद्य, ते नेहमीच चांगलं असेल असं नाही! आणि हे स्वतः रामदासांनीच कृतीतून सांगितलं...
    असो...मोस्टली, मी उगाच कीस पाडतोय...इथे लेमॅनचाच अर्थ अभिप्रेत असणार!
    धन्यवाद!

    ReplyDelete