स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

7/08/2010

सावरकर आणि आपण

लालभडक ते नेत्र चमकती, हस्त स्फुरती धीर मना।

श्री दामोदर सिद्ध जाहला जायालागी खलशमना॥

कांता वदली, कांता जाता देशहिताला करावया।

पतिराया घ्या निरोप जावे त्वरित कीर्तीला वरावया॥

लहानपणी १३-१४व्या वर्षी कधीतरी वाचलेल्या ह्या सावरकरांच्या ओळी न जाणे कश्या माझ्या स्मृतिपटलावर अगदी कोरल्या गेल्यात. तेव्हा काय वाचत होतो, तेही आठवत नाही. पण अगदी कोवळ्या वयात(वयाच्या चौदाव्या वर्षी) सावरकरांनी दामोदर चाफेकरांवर रचलेल्या पोवाड्याच्या ह्या ओळी जश्याच्या तश्या तोंडपाठ आहेत. आजही कुठे लालभडक हा शब्द वाचला, की ह्याच ओळी ओठांवर येतात. इतक्या लहान वयातही सावरकरांची देशभक्ती आणि काव्याची समज थक्क करून सोडते. ह्या ओळी जोवर लक्षात आहेत तोवर 'मला किती चांगलं सुचतं' हा माज़ कधी चढण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

आज पुन्हा ह्या ओळी ओठांवर येण्याचं कारण म्हणजे आज ८ जुलै. सावरकरांच्या जगप्रसिद्ध उडीला आज १०० वर्षे पूर्ण झाली. ८ जुलै, १९१० ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्से ह्या फ्रेंच बंदरात जहाज असताना, शौचालयाच्या छोट्याश्या खिडकीतून उडी मारली. अनेक दिवसांच्या कुपोषणाने आणि वाईट वागणुकीने खंगलेल्या सावरकरांनी तश्यातच फ्रेंच किनारा गाठला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत अभय मिळवायचा प्रयत्न केला. पण ब्रिटीश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना लाच देऊन गोर्‍यांच्या एकतेचं दर्शन घडवलं. त्यानंतर हा खटला गाजला. ह्यात फ्रेंच सरकारची नाचक्की झाल्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा खटला सावरकरांच्या बाजूने लावून धरला. जगभरच्या लोकशाहीवाद्यांनी रान उठवलं, पण साम्राज्यशाहीचाच विजय झाला आणि ब्रिटीशांनी सावरकरांना अजून त्रास द्यायला सुरूवात केली. ही सगळी माहिती आणि ह्याहूनही जास्त माहिती आज तुम्हाला अनेक ब्लॉग्जवर किंवा काही मराठी/इंग्रजी/हिंदी वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळेल. मला आज खूप बरं वाटतंय हे जाणून की खरंच सावरकरांबद्दलची जागरुकता थोड्याफार प्रमाणात का होईना वाढतेय. माझ्या नजरेतूनच मी गेली दहा वर्षं तरी नियमित वृत्तपत्रं वाचतोय. पण आज नेटच्या युगाने सावरकरांबद्दलची जागरूकता वाढवायला मदत केलीय हे मात्र खरं. ट्विटरवर, ब्लॉग्जवर, फेसबुकवर थोड्या संख्येने का होईना तरूणाई सावरकरांना मानवंदना देतेय, त्यांचे ऋण मानतेय हे ही नसे थोडके. savarkar.org च्या माध्यमातून काही जणांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलाय, हे त्याचंच एक उदाहरण. ह्या सगळ्याचाच परिणाम म्हणजे वृत्तपत्रे आणि प्रसिद्ध वेब पोर्टल्सनी त्यांच्यावरच्या अनेक उत्तम लेखांची घेतलेली दखल.

सावरकर अंदमानच्या जेलमध्ये असताना, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी बॅरीनं त्यांना मुद्दामहूनच फाशीच्या तख्ताच्या शेजारची खोली दिली. त्यामुळे फाशीच्या वेळचे भयाण आवाज कायम सावरकरांच्या कानावर पडावेत आणि त्यांची जगण्याची इच्छा संपावी. त्यांची ही युक्ती कामीही आली. सावरकरांना जगण्याचा वीट आला. त्यांना वाटलं, काय अर्थ आहे ह्या खितपत जगण्याला. ना मी मायभूमीच्या कामी येऊ शकत ना कुटुंबाच्या. म्हणून त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मृत्यूला बोलावण्यासाठी देखिल एक पद म्हटले. पण मग अचानक त्यांना उपरती झाली. त्यांनी स्वतःला सावरले. मुळात कणखर असलेलं त्यांचं मन ह्या प्रसंगानं अधिकच कणखर झालं. त्यांनी तुरूंगातल्या कैद्यांसाठी काही करायचं ठरवलं. त्या माध्यमातूनच देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. मग त्याही कोठडीत त्यांनी स्फूर्तिगीतं लिहिली. मृत्यूच्या नावालाही घाबरणारे आपण त्यास्थितीत काय करू शकलो असतो. अर्थात त्या स्थितीत पोचण्यासाठी त्यांनी जे केलं होतं, ते करण्याचीही आपली औकात नाही. पण त्याही परिस्थितीत ते घाबरून मृत्यूला कवटाळत नव्हते. 'ये मृत्यो, ये' म्हणत होते. निरुद्देश आयुष्याचा अंत शोधत होते. पण ते त्या मनःस्थितीतूनही बाहेर आले. मृत्युंजय ठरले. कदाचित मृत्यूनेच त्यांची समजूत काढली असेल. कारण शेवटीही मृत्यू त्यांच्याच आदेशाने त्यांना घेऊन गेला.

आज जेव्हा स्वातंत्र्याच्या ६० हूनही जास्त वर्षांनंतर नरबळी, हुंडाबळी, जातीय खुनाखुनी, कलियुग का अंत, बाबा, बुवा ह्यांचा सुळसुळाट दिसतो, तो पाहून आज सावरकर असते तर असं वाटल्यावाचून राहत नाही. त्यांचा संदेश होता, धर्म विज्ञाननिष्ठ हवा. आपण धर्म कि विज्ञान ह्या विषयावर वाद घालतो. त्यांचा संदेश होता जातीव्यवस्था नष्ट करा. आपण जातींचे दाखले मिळवण्यासाठी पैसे चारतो, जातीबाहेर लग्न केलेल्या जोडप्यांना मारतो. त्यांचा संदेश होता धर्म ही राजकीय नसून सामाजिक ओळख आहे आणि त्याला त्याच पातळीवर ठेवायला हवं. आपण धर्माचंच राजकारण करतो. त्यांनी सांगितलं होतं, ज्याची पुण्यभू हा अखंड हिंदुस्थान तोच हिंदु मग त्यात धर्म, जात काही आड येत नाही, पण आपण मक्का, काशी, जेरुसलेम आणि व्हॅटिकनमध्ये पुण्यभू शोधत राहतो. त्यांनी सांगितलं होतं भारतमाता हीच माता आणि तीच सर्वस्व. आपण तिचं नग्न चित्र काढणार्‍याला देशात थांबवण्यासाठी त्याच्यापुढे नाक रगडतो.

मणिशंकर अय्यर नामक क्षूद्र कीडा जेव्हा सावरकरांची वचनं अंदमानच्या जेलच्या भिंतींवरून काढतो, तेव्हा त्याला हे कळत नसतं की तो ती वचनं फक्त भिंतींवरून काढतोय. काळाच्या छातीवर सावरकरांनी स्वतःच्या रक्तानं कोरलेली आणि हजारो देशभक्तांच्या हृदयांवर सावरकरांच्या त्यागाने कोरली गेलेली वचनं तो कशी काढणार. भारतमातेच्या नीलसिंधुजलधौतचरणतलांवर उमटलेले तिच्या परमभक्त सुपुत्राच्या मस्तकाचे ठसे पैश्याला चटावलेले तिचे आजचे सारे पुत्र काय मिटवणार. तस्मातच, अनेक भारत सरकारांनी कितीही अनास्था दाखवली आणि मार्सेमध्ये सावरकर स्मारक नाही बनू दिलं, तरीही देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या अंतरात्म्यात जाणते-अजाणतेपणे एक सावरकर स्मारक आहेच, ते बनवण्यासाठी कुणा सरकाराची परवानगीही नकोय आणि ना हरकत प्रमाणपत्रही नकोय.

34 comments:

 1. अप्रतिम !! शेवटचा परिच्छेद तर अतिशय सुरेख !!

  >> ह्या ओळी जोवर लक्षात आहेत तोवर 'मला किती चांगलं सुचतं' हा माज़ कधी चढण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

  +१

  ReplyDelete
 2. वाह विभि! अतिशय अप्रतिम आणि मी नि:शब्द....

  ReplyDelete
 3. वीभी अतिशय आवडली तुझी ही पोस्ट.अप्रतिम

  ReplyDelete
 4. अगदी नि:शब्द केलंस बघ बाबा....

  ReplyDelete
 5. विभि एकदम अप्रतिम मित्रा...खरच शब्दच नाहीत ह्या पोस्टचे कौतुक करायला...
  लिहते रहा..

  ReplyDelete
 6. अप्रतिम!!! विभि....खुप सुंदर लिहल आहेस!!
  शेवट तर खुप मस्त लिहला आहेस...

  ReplyDelete
 7. मणिशंकर अय्यर नामक क्षूद्र कीडा जेव्हा सावरकरांची वचनं अंदमानच्या जेलच्या भिंतींवरून काढतो, तेव्हा त्याला हे कळत नसतं की तो ती वचनं फक्त भिंतींवरून काढतोय. काळाच्या छातीवर सावरकरांनी स्वतःच्या रक्तानं कोरलेली आणि हजारो देशभक्तांच्या हृदयांवर सावरकरांच्या त्यागाने कोरली गेलेली वचनं तो कशी काढणार. +100

  Kya baat hai vidyadhar...Punha ekada apratim post ....

  ReplyDelete
 8. एकदम मस्त लिहिलंय. छान लेख आहे.

  ReplyDelete
 9. निशब्द

  ReplyDelete
 10. >मायभूमीच्या कामी येऊ शकत ना कुटुंबाच्या. म्हणून >त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मृत्यूला >बोलावण्यासाठी देखिल एक पद म्हटले. पण मग अचानक >त्यांना उपरती झाली. त्यांनी स्वतःला सावरले. मुळात >कणखर असलेलं त्यांचं मन ह्या प्रसंगानं अधिकच कणखर >झालं. त्यांनी तुरूंगातल्या कैद्यांसाठी काही करायचं ठरवलं. >त्या माध्यमातूनच देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. मग >त्याही कोठडीत त्यांनी स्फूर्तिगीतं लिहिली. मृत्यूच्या >नावालाही घाबरणारे आपण त्यास्थितीत काय करू शकलो >असतो. अर्थात त्या स्थितीत पोचण्यासाठी त्यांनी जे केलं >होतं, ते करण्याचीही आपली औकात नाही. पण त्याही >परिस्थितीत ते घाबरून मृत्यूला कवटाळत नव्हते. 'ये >मृत्यो, ये' म्हणत होते. निरुद्देश आयुष्याचा अंत शोधत >होते. पण ते त्या मनःस्थितीतूनही बाहेर आले. मृत्युंजय >ठरले. कदाचित मृत्यूनेच त्यांची समजूत काढली असेल. >कारण शेवटीही मृत्यू त्यांच्याच आदेशाने त्यांना घेऊन गेला.

  अंती त्यांनी त्यांचे नामसिद्ध केले...

  "सावर+कर" हे; म्हणायचेय ना आपल्याला?

  :-)

  ReplyDelete
 11. अप्रतीम!!

  ReplyDelete
 12. अप्रतिम.. काय बोलायचीच गरज नाही.

  ReplyDelete
 13. Khoop chaan...!!!
  देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या अंतरात्म्यात जाणते-अजाणतेपणे एक सावरकर स्मारक आहेच, ते बनवण्यासाठी कुणा सरकाराची परवानगीही नकोय आणि ना हरकत प्रमाणपत्रही नकोय. Apratim...!!!

  ReplyDelete
 14. हेरंबा,
  धन्यवाद रे. अरे सावरकरांची नुसती प्रतिभा पाहिली तरी आपलं खुजेपण जाणवतं, त्यांच्या देशसेवेबद्दल तर बोलायलाच नको.

  ReplyDelete
 15. भारत,
  सावरकरांच्या त्यागापुढे मी ही निःशब्दच होतो.
  खूप आभार रे!

  ReplyDelete
 16. सागर,
  खूप खूप आभार रे!

  ReplyDelete
 17. अपर्णा,
  अनेक आभार! :)

  ReplyDelete
 18. सुहास,
  खूप धन्यवाद भाऊ. अरे तुम्ही सगळे इतकं प्रोत्साहन देता, त्यातच लिहित राहण्याची शक्ति मिळते.

  ReplyDelete
 19. योगेश,
  अरे तो शेवटचा परिच्छेद म्हणजे बरीच वर्षं मनात साठलेल्या भावनांचं शब्दस्वरूप आहे.
  खूप धन्यवाद रे!

  ReplyDelete
 20. तन्वीताई,
  अगं इतका आदर आणि इतकी आपुलकी वाटते ना त्यांच्याबद्दल की सगळं आपोआप लिहिलं जातं.
  खूप खूप...:)

  ReplyDelete
 21. देविदासजी,
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 22. सचिन,
  भारतला म्हणालो तेच...
  >>सावरकरांच्या त्यागापुढे मी ही निःशब्दच होतो.
  खूप आभार रे!

  ReplyDelete
 23. शिरीष,
  होय. अगदी, त्यांनी नावाप्रमाणेच फक्त स्वतःलाच नाही, तर हजारोंच्या राष्ट्राभिमानालाही सावरलं. आजही आमच्यासारख्यांना सावरताहेत.
  खूप खूप आभार!

  ReplyDelete
 24. शेखर,
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 25. आनंद,
  अरे बोलती बंदच होते, ह्या माणसाच्या कर्तृत्वापुढे!

  ReplyDelete
 26. मैथिली,
  आपला अंतरात्मा असल्या लालफितींत अडकत नाही ते किती बरंय..:)
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 27. अप्रतिम .सुंदर.,चांगला ,लेख आवडला ....

  ReplyDelete
 28. धन्यवाद काका,
  खूप खूप आभार!

  ReplyDelete
 29. विद्याधर,
  स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या वरचा हा दुसरा लेख सुद्धा अप्रतिम. त्यांची माझी जन्मठेप वाचताना अंगावर काटा येतो. ह्याच अंदमानच्या कोठडीत जीवनाचे तत्वज्ञान मांडणारे एक काव्य म्हणजे, "अनादी मी अनंत मी अवध्य मी भला मारील रिपू मजसी असा कवण जन्मला".

  ReplyDelete
 30. निरंजन,
  खूप आभार. माझी जन्मठेप हे आमच्यासारख्यांसाठी गीताच. "अनादी मी अनंत मी अवध्य मी भला" हे फक्त सावरकरच रचू जाणोत.
  प्रतिक्रियेसाठी अनेक आभार!

  ReplyDelete
 31. सावरकरांबद्दलची जागरुकता आवश्यक होतीच.
  साईट्ची माहिती तुझ्याकडूनच कळली.
  पोस्ट खुप सुंदर झाली आहे!

  ReplyDelete
 32. मीनल,
  धन्यवाद!
  ही साईट जेव्हा मला पहिल्यांदा सापडली होती तेव्हा मला खूप आनंद झाला होता. सावरकरांबद्दलची एकूणच जागरूकता अशीच वाढत जावी, हीच इच्छा!

  ReplyDelete
 33. त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाबद्दल माझ्यासारख्या शूद्राने काय लिहावे ... आपण कायम प्रेरणा घ्यावी आणि सदैव नतमस्तक व्हावे...

  स्वातंत्रवीर, नेताजी आणि शहीद भगतसिंग हे ३ थोर पुरुष...

  ReplyDelete
 34. >>आपण कायम प्रेरणा घ्यावी आणि सदैव नतमस्तक व्हावे...
  +10000

  ReplyDelete