स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

10/28/2010

जीवदान

गणेशनं चालता चालताच आपल्या कमरेला हात लावून पिस्तुल व्यवस्थित असल्याची चौथ्यांदा खात्री केली आणि पुन्हा मनाशी सगळी उजळणी करू लागला. अंधार्‍या रस्त्यावर चालतानादेखील त्याला कुणीतरी आपल्याला पाहत असेल ही भीती सतावत होती. शेवटचा टप्पा तर मोठ्या रस्त्यावरून आणि लख्ख दिव्यांच्या प्रकाशात पार करायचा होता. उजळलेला रस्ता जवळ आला तसं त्यानं पिस्तुल हातात घेतलं आणि त्याचा खटका व्यवस्थित असल्याची शेवटची खात्री केली. आता थेट चालवतानाच बाहेर काढायची असं मनाशीच ठरवून त्यानं शेवटचं वळण घेतलं आणि तो हमरस्त्याला लागला. शहराचा उच्चभ्रू भाग असल्याची खात्री दुतर्फा असलेल्या आलिशान इमारती आणि बंगल्यांवरून पटत होती. पण तेव्हढीच सामसूम देखील होती. एखादं वाहन अचानकच दिसत होतं, तेव्हढ्या वेळासाठी गणेशच्या हृदयाची धडधड वाढत होती. रात्रीचे दोन वाजून गेले असावेत, असा मनाशी विचार करतच गणेश, 'तो' विवक्षित बंगला शोधत चालत होता. तसं गणेशनं 'हे' काम पूर्वीही अनेकदा केलं होतं. फक्त तेव्हा तो असिस्टंट होता. त्याला अजूनही त्याची पहिली वेळ आठवत होती.

त्याचा म्होरक्या प्रत्यक्ष काम उरकत असताना गणेशला पाहावलं नव्हतं आणि तो उलटा उभा राहिला होता. आणि नंतर मात्र कितीतरी वेळ उलट्या करत राहिला होता. त्यानंतर बर्‍याचवेळा अशीच असिस्टंटची कामं केली. पण आधी पैशांची गरज म्हणून सुरू झालेला हा प्रकार, पैसा हीच मुख्य गरज कधी बनवून गेला ते लक्षातच आलं नव्हतं त्याच्या. त्यातूनच आज त्यानं स्वतःवरच हे काम घेतलं होतं. तसं पाहायला गेलं तर त्याचं पहिलंच काम, स्वतंत्रपणे करत असलेलं. त्यामुळेच कदाचित आज त्याला पहिल्या वेळसारखंच होत होतं. हाताच्या तळव्यांना घाम सुटत होता. पण नजरेसमोर मिळणार असलेली भरभक्कम रक्कम येताच थोडासा धीर वाढत होता. तो विवक्षित बंगला जवळ येत होता. सावज आत एकटंच असणार होतं. घराच्या कपाटात कुलूपबंद करून ठेवलेला ऍडव्हान्स आठवून तो स्वतःला धीर देत होता. त्याच्या योजनेची मनातली शेवटची उजळणी चालू होती.

----------

डॉ. भणगेंची त्यादिवशी ७५वी सर्जरी होती. अगदी अर्ध्याच तासापूर्वीपर्यंत ते शांतपणे झोपलेले होते. शहरातले सर्वांत महाग आणि निष्णात सर्जन म्हणूनच ते ओळखले जात. त्यादिवशी रात्री मध्यरात्र उलटून गेल्यानंतर अचानक त्यांचा फोन खणखणू लागला. सर्जन असल्यानं त्यांना ह्या प्रकारांची सवय होती. डोळे चोळतच पण सामान्य आवाजात त्यांनी बोलायला सुरूवात केली होती आणि पाचच मिनिटांत त्यांची झोप खाडकन् उडून गेली होती. ते चटकन् हो म्हणून गेले होते पण त्यानंतरही अगदी आवरून ते बाहेर पडले तोवरही त्यांना कळत नव्हतं, की ते करताहेत ते योग्य की अयोग्य. त्यांना ह्या विचित्र मनःस्थितीमध्ये खरं तर गाडी स्वतः चालवायची नव्हती. पण ड्रायव्हर पिऊन पूर्ण टाईट होऊन झोपला होता, त्यामुळे उठतच नव्हता. त्याला चार शिव्या हासडून डॉक्टरांनी गाडीत आपली बॅग टाकली आणि ड्रायव्हर सीटवर बसून गाडी सुरू केली. गाडी रेस करतानाच त्यांच्या लक्षात आलं, की ते कित्येक दिवसांनंतर स्वतःचीच गाडी चालवत होते. एव्हढ्या रात्री जास्त गाड्याही नसतील रस्त्यावर, त्यामुळे फारसा त्रास होणार नाही असा विचार करतच त्यांनी क्लच सोडत ऍक्सीलरेटर दाबला.

त्यांना आज स्वतःचं संपूर्ण करियर डोळ्यांपुढे येत होतं. त्यांनी केलेल्या ७४ ऑपरेशन्समध्ये काही काही अयशस्वीही ठरली होती. काहींमध्ये दैव आड आलं होतं, तर काहींमध्ये शास्त्र, तर काहींमध्ये मानवी चुका, कधी त्यांच्या सहकार्‍यांकडून तर कधी त्यांच्याकडून. पण मुख्यतः यशस्वी ऑपरेशन्समुळेच त्यांचा दबदबा बनला होता. कारण त्यांच्या नशीबानं त्यांना काही हाय प्रोफाईल पेशंट्स मिळाले होते. एक गाजलेली सिनेनटी, एक वजनदार राजकीय नेता. ज्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या कलेची, निपुणतेची वाहवाही झाली होती. त्यांनी स्वतःच्या शुल्कात भरमसाठ वाढ केली, तरी प्रसिद्ध लोकांचा राबता वाढलाच होता, ज्यामुळे अजून पैसा मिळत गेला. मग पैशाबरोबरच गरजा वाढल्या होत्या आणि त्या गरजांसाठीदेखील पैसा पुरे पडेनासा झाला होता. मग कर्ज वाढतच गेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून तर डॉक्टरांना स्वतःच्या आर्थिक स्थितीचीच काळजी घेरू लागली होती. आणि अशातच ही संधी चालून आली होती.

त्यांच्याच ओळखीच्या, त्यांचा पेशंट राहिलेल्या एका बड्या धेंडाला हार्ट ऍटॅक आला होता. आणि सर्जरीसाठी त्यांच्या भावाने इतक्या रात्रीच डॉक्टरांना पाचारण केलं होतं. पण जीव वाचवण्यासाठी नव्हे, तर जीव घेण्यासाठी. संपत्तीचा पूर्ण मालक होण्याची चालून आलेली संधी गाठण्यासाठी भावानंच भावाचा काटा काढायचं ठरवलं होतं. ऑपरेशन यशस्वीरित्या अयशस्वी करण्याची जवाबदारी डॉक्टरांवर होती. त्याबदल्यात एखाद्या सामान्य माणसाची आयुष्यभराची ददात मिळेल इतकी रक्कम देण्याचं भावानं कबूल केलं होतं आणि त्यातला अर्धा व्यवहार ऑपरेशनच्या आधीच करण्याची तयारीही दाखवली होती. कदाचित, अयशस्वी ऑपरेशननं डॉक्टरांच्या करियरवर बट्टा लागला असता, पण त्याक्षणी डॉक्टरांना फक्त आपलं बुडतं घर दिसत होतं आणि डॉक्टर लगेच हो म्हणून निघाले होते. नक्की काय केलं, म्हणजे ऑपरेशन फसेल, ह्याची ते मनातल्या मनात उजळणी करत होते. पण त्यातच एका बाजूला त्यांना त्यांचं एक मन खात होतं. रस्त्यावर येणं किंवा सद्सद्विवेकबुद्धीला मारणं ह्यांपैकी त्यांनी दुसरा रस्ता निवडला होता. आणि ह्या मानसिक द्वंद्वामध्येच गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरवर आपटून उलटीपालटी झाली.

----------

गणेश अचानकच झालेल्या ह्या घटनेनं बावचळून गेला. हे सगळं त्याच्या योजनेत नव्हतं. सामसूम असलेल्या रस्त्यावर एकदमच मोठा आवाज होऊन अपघात झाला होता आणि त्यामुळे गणेशचा सगळी मानसिक तयारी अस्ताव्यस्त झाली. तो एकदम रिक्त झाल्यागत अपघातग्रस्त गाडीकडे पाहत उभा राहिला. त्याला काही कळायच्या आतच तो गाडीच्या दिशेनं निघाला. आजूबाजूला एव्हढी घरं असूनही फार कमी घरांमधले दिवे लागले होते आणि बाहेर पडायची तसदी तर कुणीच घेतली नाही. गणेश उलटी होऊन पडलेल्या गाडीजवळ पोचला आणि त्यानं डोकावून पाहिलं, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली एक व्यक्ति अर्धवट शुद्धीत होती. गणेश दिसताच, त्या व्यक्तिचे डोळे चमकले. त्यानं आशाळभूतपणे आपला हात उचलायचा प्रयत्न केला. गणेशनं त्या आर्जवी आणि हतबल डोळ्यांमध्ये एक क्षण पाहिलं आणि त्याला अचानक लक्षात आलं, की त्याचा म्होरक्या त्याला नेहमी सावजाच्या डोळ्यांत बघत जाऊ नको असं का बजावायचा. त्यानं अभावितपणे त्याचा हात धरला आणि जोर लावून त्याला बाहेर खेचलं. त्याला तिथेच सोडून जाण्याच्या विचारात गणेश असतानाच एक मोटरसायकल जवळ येत असल्याचा आभास झाला. ती गस्तीवरच्या पोलिसाची मोटरसायकल होती. गणेशनं कमरेला पुढे खेचलेलं पिस्तुल काढून चटकन मागे लावलं आणि शर्ट त्यावर सोडला.

पोलिसानं वायरलेसवरून संदेश दिल्यावर पाच मिनिटांत ऍम्ब्युलन्स आली आणि पोलिसानं गणेशलाही ऍम्ब्युलन्समध्येच चढवलं. गणेश नाईलाजानंच हॉस्पिटलला पोहोचला. ती व्यक्ति ऍडमिट झाल्यावर गणेश चुपचाप तिथून सटकायच्या बेतात असताना, मगाचच्याच हवालदारानं त्याला हटकलं.

"काय रे, तुझा ब्लड ग्रुप काय आहे?"

"माहित नाही साहेब."

"चल आत!"

हवालदार त्याच्या दंडाला धरून त्याला आत घेऊन गेला. गणेशनं चुपचाप कॉरिडॉरमधल्या कचरापेटीत पिस्तुल टाकलं आणि तो आत गेला.

गणेश झोपला होता आणि त्याचं रक्त शेजारीच एका पिशवीत जमा होत होतं. आपलं वाहणारं रक्त कुणाचा तरी जीव वाचवणार असल्याची एक वेगळीच जाणीव त्याला तत्क्षणी झाली. एक वेगळीच, विचित्र संवेदना त्याला जाणवू लागली. नर्सच्या आवाजाने तो भानावर आला.

"तुम्हाला ठाऊक आहे का, की तुम्ही कुणाचा जीव वाचवलाय?"

त्यानं फक्त नकारार्थी मान डोलावली.

"शहरातले प्रसिद्ध हार्ट सर्जन.त्यांनी आजवर कित्येक रुग्णांना जीवदान दिलंय. आज तुम्ही त्यांना जीवदान दिलंत. खूप लोक तुम्हाला दुवा देतील बघा.." पुढेही नर्स बरंच काही बोलत होती. तो पुन्हा त्याच वेगळ्या संवेदनेचा आनंद घेत होता. प्रत्येक कामगिरीनंतर जाणवणार्‍या मळमळीपेक्षा ही संवेदना हजारोपट चांगली होती.

----------

डॉक्टरांवर ऑपरेशन करावं लागणार होतं, त्यासाठी तयारी चालू होती. डॉक्टरांसाठी रक्ताचाही बंदोबस्त झाला होता. डॉक्टर अर्धवट शुद्धीत होते. त्यांना अचानकच सामोरा आलेला तो धूसर चेहरा अजूनही डोळ्यांपुढे दिसत होता. त्याच चेहर्‍यामुळे कदाचित डॉक्टरांना केलेल्या चुका सुधारण्याची एक अजून संधी मिळणार होती. डॉक्टरांना त्या चेहर्‍याचे आभार मानायचे होते, पण दिलेल्या इंजेक्शनमुळे डॉक्टरांची शुद्ध हरपत होती.

गणेश कॉरिडॉरमध्ये आला, तेव्हा मगाचचा हवालदार त्याच्याजवळ आला आणि त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवून स्मित केलं.

"डॉक्टरांवर ऑपरेशन चाललंय, संपेपर्यंत थांबणार आहेस इथे? कदाचित काही मोठे लोकही येतील, तुला भेटायला मिळेल."

गणेशनं फक्त हसून नकारार्थी मान डोलावली.

तो शांतपणे चालायला लागला. आणि कचरापेटीजवळ पोचून थबकला. क्षणभर तो स्वतःशीच हसला आणि तसाच मुख्य दरवाजाकडे निघाला, घेतलेला ऍडव्हान्स परत कसा करायचा ह्याचा विचार करत.

(समाप्त)

44 comments:

 1. ग्रेट. मस्तच एकदम. आणखी काय लिहू? शब्द कमी आहेत. :-)

  ReplyDelete
 2. मस्तय.. पण पटकन संपली... मला वाटलेले कहाणी मे ट्विस्ट होगा... :)
  डॉ. भणगें... तुला नावे कुठून सुचतात रे??? :D

  ReplyDelete
 3. लहान पण सुंदर गोष्ट....खुप आवडली रे...असाच लिहित रहा....रोहन म्हणतोय ते खर आहे....कुठुन सुचतात रे तुला ही नावे????

  ReplyDelete
 4. Nice story.. keep writing!

  ReplyDelete
 5. मस्त रे. छान जमलीय कथा.

  ReplyDelete
 6. विद्याधर,
  कथेच्या पहिल्या काही वाक्यांनीच मनाची पकड घेतली. गणेश कडून डॉक्टरवर रोख वळला तेव्हा अजून मजा वाटू लागली. कथेचा आशय मस्त! मांडणी मस्त! पण जरा लवकरच संपली की काय असे वाटले. थोडी अजून फुलवली असती तरी चालले असते असे माझे वैयक्तिक मत :)

  (सध्या रिअल्टी शो खूप पहात असल्याने त्यातील परीक्षकांसारखा टीकेखोर सूर आला असल्यास क्षमस्व! )

  -निरंजन

  ReplyDelete
 7. Anonymous1:03 AM

  reading ur blog for last many days and day by day getting more closer .

  ur thoughts, its presentation and the lingo is really magnetic.

  ur in-depth knowledge of international matters is very appreciable

  ReplyDelete
 8. समाजातील, दोन परस्परविरोधी स्तरातील दोन माणसांमधील, खोलवर दडपलेली माणुसकी, एकाच प्रसंगाने जागी झाली. खूप सकारात्मक गोष्ट आहे. तुझ्याच शब्दांत सांगायचं म्हणजे, 'लई भारी'! :)

  ReplyDelete
 9. Katha chan jamaliy. pan Ganeshacha savaj Dr Bhanage hote aani Dr Bhange yancha savaj to heart attack vala maanus. hee chain hoti kee ajun kaahee te neet clear jhaalaa naahee. But short n cool.

  ReplyDelete
 10. विद्याधर छान झालेय रे कथा. खास करून गणेश आणि डॉक्टर यांची होणारी घालमेल!!! त्यामुळे पात्र अगदी खरीखुरी वाटतात

  ReplyDelete
 11. मस्त कथा ! थोडक्यात अचूक वेध घेतलाय !

  ReplyDelete
 12. मस्तच.. अगदी प्रवाही..

  ReplyDelete
 13. संकेत,
  खूप धन्यवाद रे भाई!!

  ReplyDelete
 14. रोहन,
  अरे मला छोटीशीच लिहायची होती. थोडक्यातच! कदाचित थोडं डिटेलिंग करता आलं असतं, पण मला करावंसं वाटत नव्हतं...
  अरे नावं मुद्दामहून वेगवेगळी आठवतो, कुठे कुठे वाचलेली, लक्षात राहतात :P
  धन्यवाद रे भाऊ!

  ReplyDelete
 15. गौरव,
  माझ्या ब्लॉगवर तुमची पहिलीच प्रतिक्रिया बहुतेक. ब्लॉगवर स्वागत!
  प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद! लोभ असावा!

  ReplyDelete
 16. माऊताई,
  बरीच वेगळी वेगळी नावं-आडनावं लक्षात राहतात माझ्या, मग वापरायला मोठी रेंज मिळते ना! :D

  ReplyDelete
 17. सविताताई,
  खूप खूप धन्यवाद! :)

  ReplyDelete
 18. सिद्धार्थ,
  धन्यवाद भाई!

  ReplyDelete
 19. निरंजन,
  अहो टीकेखोर सूर वगैरे कसला, तुम्ही म्हणताय तशागत कदाचित खरंच फुलवता आली असती अजून. रोहनही तेच म्हणतोय.
  पण मला खरंच काल अजून काहीच लिहावंसं वाटत नव्हतं.
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 20. Anonymous,
  तुमची प्रतिक्रिया वाचून खूप खूप आनंद झाला. तुम्हाला माझं लिखाण आवडतं हे वाचून तर फारच बरं वाटलं. तुमच्यासारख्या वाचकांमुळे आणि प्रतिक्रियांमुळेच लिहिण्याचा हुरूप वाढतो.
  इतक्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
  असाच लोभ असू द्या! :)

  ReplyDelete
 21. अनघा,
  मला असंच दोन वेगळ्या स्तरांतील एकाच प्रकारची कृती आणि मग दोन उणे मिळून एक अधिक होण्याची क्रिया असं काहीसं दाखवायचं होतं!
  तुम्ही पण 'लई भारी' म्हणायला लागलात हेच मुळात लई भारी! :P

  ReplyDelete
 22. अलताई,
  अगं, ऍक्च्युअली गणेशचं सावज कोण होतं किंवा डॉक्टरांचं सावज कोण होतं हे मला दाखवायचंच नव्हतं, रादर मला स्वतःलाच माहित नाही म्हण :) फक्त दोन चुकीच्या मार्गावर निघालेले, एकमेकांच्या धडकेनं योग्य मार्गावर कसे लागले असं काहीसं लिहायचं होतं. पण कदाचित थोडासा लूज एन्ड राहिलाही असेल..
  खूप धन्यवाद गं!

  ReplyDelete
 23. श्रीराज,
  दोन एकदम विरूद्ध टोकाच्या माणसांची एकच प्रवृत्ती दाखवायचा प्रयत्न केला..
  खूप धन्यवाद रे!

  ReplyDelete
 24. संकेतानंद,
  धन्यवाद मित्रा!

  ReplyDelete
 25. हेरंबा,
  खूप धन्यवाद रे भावा!

  ReplyDelete
 26. संगमनाथ,
  खूप खूप आभार!

  ReplyDelete
 27. भरपूर दिवसांनी तुझा ब्लॉग वाचला..
  एकदम झक्कास ष्टोरी लिहून राहिलायस बे !!!
  दोघांच्या मनातली घालमेल मस्त जमलीय.
  पण मी एक वेगळा ट्विस्ट एक्पेक्ट करत होतो.. मला वाटत होतं, की तो गणेश त्या डॉक्टरालाच मारायला चालला होता, आणि त्याने त्यालाच वाचवलं..

  ReplyDelete
 28. विद्याधर, अनामिक म्हणालाय ना तसंच काहीसं मला वाटलं होतं. पण मग ते तू न करता वेगळा शेवट केलास ह्यातच ह्या गोष्टीचं वेगळेपण आहे! आणि म्हणूनच ती गोष्ट सुंदर झालीय...नेहेमीच्या टिपिकल 'बॉलीवूड साच्यापेक्षा! :)

  ReplyDelete
 29. बाबा मस्त झालीये कथा!!! कालच वाचली होती पण काल शुक्र है शुक्रवार होता ना, नेट थोडाच वेळ सुरू असते :)

  लिहीत रहा ऐसा अशिर्वाद देते है!! बाकि नावांबाबत रोहनशी सहमत :)

  ReplyDelete
 30. क्या ब्बात!!! मला मधेच वाटलं की तो मारेकरी त्या डॉक्टरलाच मारायला निघालाय आणि अपघातामुळे मधेच कुठे भेट होते... पण शेवट वेगळाच निघाला. दोन अगदी भिन्न टोकांवरच्या माणसांची सारखीच मानसिकता!!! आवडली हि संकल्पना!!!

  ReplyDelete
 31. शॉर्ट न स्वीट...आवडेश

  ReplyDelete
 32. अनामिक,
  बर्‍याच दिवसांनी आलास ते पाहून बरं वाटलं!
  मला ट्विस्ट नाही, हाच ट्विस्ट ठेवायचा होता! :)
  खूप धन्यवाद रे भाऊ!

  ReplyDelete
 33. तन्वीताई,
  आता मी कालच हा विचार करत होतो..की ताईचा शुक्रवार, त्यामुळे दिसत नाहीये कुठे!! :)
  आणि शुक्र है शुक्रवार है चा डायलॉग मी कालच कुणालातरी मारला, त्यामुळे तेच वाचून गंमत वाटली! :D

  ReplyDelete
 34. सौरभ,
  खूप खूप धन्यवाद भावा!

  ReplyDelete
 35. सुहास,
  मंडळ आभारी आहे! :D

  ReplyDelete
 36. तो ऍडव्हान्स परत करू शकला का? काही ऍडव्हान्सेस परत नाही करता येत नाहीत कारण :(

  ReplyDelete
 37. ओंकार,
  असे ऍडव्हान्सेस परत करता येत नाहीत हे सत्यच आहे..पण त्याने करायचं ठरवलं हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे! :)

  ReplyDelete
 38. विद्याधरा, मस्तच जमली आहे रे कथा.कथेचा आशय आणि मांडणी उत्तमच...

  ReplyDelete
 39. आयला,
  देवेंद्रा तुझ्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायचं राहिलं होतं हे आत्ता लस्कात आलं माझ्या! :)
  खूप धन्यवाद रे!!

  ReplyDelete