"तुमी येवडी आठवन ठिऊन येतासा! लय छान वाटतं." गगनची आई मनापासून सांगत होती. "न्हाईतर छोट्या लोकांकडे पाणी प्यायला पण येत न्हाईत लोक."
अभयच्या चेहर्यावर वेदना उमटली. त्यानं गगनकडे पाहिलं आणि म्हणाला, "काकू, आता तसलं काही राहिलं नाहीये हो. गगन आणि मी एकत्रच काम करतो, एकत्रच जेवतो. कधी वेगळेपणा वाटत नाही. तुम्ही असं काही बोलू नका हो. एकदम अवघडल्यासारखं होतं!" अभय गगनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
त्या फक्त हसल्या. मग त्यांनी गगनच्या धाकट्या बहिणीला बोलावलं आणि अभयच्या पाया पडायला सांगितलं.
"राहू दे राहू दे! बारावीला ना तू? तालुक्याच्या कॉलेजात जातेस ना? दादा सांगत असतो कायम तुझ्याबद्दल!"
तिनं मान डोलावली.
"खूप अभ्यास कर. त्याची स्वप्न पूर्ण कर. तुला मोठ्ठी अधिकारी झालेलं पाहायचंय त्याला. त्यासाठीच तिकडे शहरात राब राब राबतोय तो!" तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला आणि त्यानं स्मित केलं.
त्यांचा सगळ्यांचा निरोप घेऊन तो महारवाड्यातून बाहेर पडून घराकडे निघाला.
अचानक त्याला दूरून छोट्या जमावाचा गोंधळ ऐकू आला, पण तो घराच्या विरूद्ध दिशेनं होता. तिकडे दुर्लक्ष करून तो घराकडे पोचला. तर घराचे सगळे दिवे चालू आणि दरवाजा सताड उघडा. त्याला शंका आली म्हणून तो स्मृतीला हाका मारत घरात शिरला. त्यानं अख्खं घर पालथं घातलं, पण घरात कुणीच नव्हतं. तो एकदम धास्तावला आणि धावतपळतच घराबाहेर पडला. त्याच्या डोक्यात तर्हेतर्हेचे विचार येत होते. काय करावं ते कळत नव्हतं. आणि अचानक समोरून त्याला गगन येताना दिसला.
"काय झालं साहेब? मी तुमच्याचकडे येत होतो, तुमचा रूमाल राहिला होता घरी."
"अरे माझ्या घरचे सगळे गायब आहेत. घर सताड उघडं आहे." अभय पूर्ण भांबावला होता.
"अरेच्चा!" गगनलाही अर्थबोध होईना. "असं करा, तुम्ही इथे बघा, मी इथून जातो. दहा मिनिटं बघू कुणाच्या घरी गेलेत का? नाहीतर मग सरपंचांकडे जाऊ."
आणि दहाच मिनिटांत गगन ओरडत आला.
"साहेब, साहेब.." त्याला धाप लागली होती.
"काय झालं?"
"साहेब, चावडीसमोर... देवीच्या देवळाच्या पुढ्यात..."
"काय?"
"चला तुम्ही लगेच!" आणि ते दोघे धावत निघाले.
----------
देवळासमोरचं दृश्य पाहून अभय हबकूनच गेला. ५०-१०० लोकांचा जमाव बसला होता. पुढ्यात एक शेकोटी होती. आणि शेकोटीसमोर एका खांबाला स्मृतीला बांधलेलं होतं. तिच्या तोंडात कापडाचा बोळा घातला होता. शेजारी विजयी मुद्रेनं मांत्रिक उभा होता आणि एका बाजूला त्याचं सगळं कुटुंब खाली माना घालून उभं होतं.
अभयला काहीच कळेना. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे सगळं खरंच घडत होतं?
तो खांद्यावर गगनच्या झालेल्या स्पर्शानं भानावर आला.
"ए..." तो जोरात ओरडला आणि धावतच जमावातून रस्ता काढत शेकोटीकडे जायला लागला.
सगळे लोक स्तिमित होऊन त्याच्याकडे बघत होते. तो स्मृतीजवळ पोचला आणि पहिल्यांदा तिच्या तोंडातला बोळा त्यानं काढून टाकला. तिला एकदम ढास लागली. तो तिचे हात सोडवू लागला एव्हढ्यात त्याला मांत्रिकानं मागे ढकललं.
"दूर राहा." मांत्रिक दरडावून म्हणाला.
"काय चाललंय काय इथे? मला माझ्या बायकोपासून दूर राहायला सांगणारा तू कोण?"
"ही तुझी बायको राहिलेली नाही, ही चेटकीण आहे."
"काय?" त्याला धक्क्यांमागून धक्के बसत होते. समोर त्याची हतबल बायको त्याला दिसत होती.
"विचार तुझ्याच आईला. तिनंच सगळ्यांसमोर मान्य केलंय, की हिच्यामुळेच तू चेटूक झाल्यागत वागायला लागला आहेस."
अभयनं विस्मयानं वळून आईकडे पाहिलं. ती मान खाली घालून उभी होती. त्याच्या भावानं मान वर केली आणि स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून पुन्हा मान खाली घातली. अभय आतून पूर्णतः ढासळून गेला होता.
"ही चेटकीण असल्यामुळेच देवाचा कोप होऊन ही वांझ राहिली." मांत्रिक म्हणाला.
"ए...तोंड बंद ठेव तुझं!" अभयच्या अंगात काहीतरी संचारलं आणि त्यानं मांत्रिकाला धक्का दिला. मांत्रिक दोन फूट मागे पडला.
'चेटूक, चेटूक' म्हणून लोक कुजबुजायला लागले आणि एक एक करून उठायला लागले. अभयनं मागे नजर टाकली. गगन कुठेही दिसत नव्हता.
लोक अभयवर चाल करून येणार असं वर्तमान होतं. अभयनं आजूबाजूला नजर फिरवली आणि शेकोटीतलंच एक जळतं लाकूड एका बाजूला धरून उचललं. आणि तयारीत उभा राहिला.
"कुणी पुढे आलं आणि माझ्या बायकोला हात जरी लावायचा प्रयत्न केला, तर माझ्याशी गाठ आहे." अभय पूर्णपणे स्मृतीला कव्हर करून उभा होता.स्मृतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
मांत्रिक उठला आणि पुढे झाला. अभयनं सर्वप्रथम त्याला जोरकस फटका दिला, त्याबरोबर तो मागे कोसळला आणि बेशुद्ध पडला. बाकीचे लोक एकदम घाबरले आणि अभयचा तो आवेश पाहून त्यांची पुढे यायची हिंमत होईना. सगळे थोडे मागे सरले. अभय आईकडे वळला.
"आई.. ही तुला चेटकीण वाटते?"
आई काहीच बोलली नाही.
"ही मुलगी, जिनं तुझं मन राखण्यासाठी माझं वंध्यत्व स्वतःवर घेतलं, ती तुला चेटकीण वाटते?"
आईला एकदम धक्का बसला आणि तिनं वर पाहिलं. भाऊ-वहिनीसुद्धा चकित होऊन पाहायला लागले.
"काय बोलतोयस तू?"
"होय आई. मी नामर्द आहे! तुझा मुलगा. ती वांझोटी नाहीये. तिचे उपकार आहेत तुझ्यावर की ती तुझ्या नामर्द मुलाला सांभाळून घेतेय. हवंतर कुठल्याही डॉक्टराकडून तपासणी करून घे आमची."
त्याच्या आईचा विश्वास बसेना.
"आणि हीच चेटकीण तुझा मुलगा सहा महिने अंथरूणाला खिळून होता, तेव्हा घर एकहाती सांभाळत होती आणि तुझ्या मुलाची शुश्रुषाही करत होती. तीन वर्षांत तू तिला इतकंच ओळखलंस आई? ह्या बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून तुला तिचे हाल करताना काहीच वाटलं नाही?" आईची मान परत खाली गेली.
"आणि तू अमोल, अबोलीसाठी म्हणून गप्प उभा आहेस. पण लक्षात ठेव, हीच वेळ उद्या अबोलीवर येईल, तेव्हा कुणाकडे कुठल्या अधिकारानं पाहशील?" अमोलचीही मान खाली गेली.
"आणि वहिनी? जाऊ दे! तुमचाही काय दोष? तुम्हा सगळ्यांनाच अंधश्रद्धेचा रोग झालाय." तो जोरात ओरडून म्हणाला.
जमावाकडे पाहून म्हणाला. "कुणालातरी त्रास देऊन त्या क्रियेचा असुरी आनंद घ्यायचा रोग आहे हा. माणसं नाही आहात, जनावरं झाला आहात तुम्ही सगळे!"
जमाव गप्प होता.
"अरे तुमच्या घरातल्या बायकांवरसुद्धा अशी वेळ येईल उद्या. ह्या असल्या पाखंडी बाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याची वाटोळी कशाला करताय? गावात शाळा आहे ती ओस पडलीय आणि तुम्ही लोक चेटकिणीला मारायच्या कार्यक्रमांना गर्द्या करताय?" त्याच्या आवाजात दुःख ओतप्रोत भरलेलं होतं. जमाव कधीही उठून येईल ही भीती होती.
"चूक आमच्या पिढीची सुद्धा आहे." तो स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला, पण एव्हढी स्मशानशांतता होती, की सगळ्यांना ऐकू येत असेल, "आम्ही शहरात गेलो आणि तिकडचेच झालो. तिथे जे शिकलो, ते इथे गावात रूजवण्यात आम्ही कमी पडलो. आमच्याबरोबरच गावाचा विकास घडवण्यात कमी पडलो. कदाचित गावाबद्दलच्या आमच्या कर्तव्यातच कमी पडलो."
आणि एकदम वर बघून तो जोरात म्हणाला, "पण ह्या सगळ्याचा अर्थ हा नाही, की कुठलंही अमानुष कृत्य देवाच्या नावाखाली केलं जावं! ह्या बुवाबाबांच्या शब्दांवर निरपराध व्यक्तिंचे बळी दिले जावेत! मी माझ्या बायकोला ह्या सगळ्याची बळी ठरू देणार नाही." असं म्हणून त्यानं ते पेटतं लाकूड वर धरलं.
एव्हढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागला. जमाव गप्पच होता. गगन तालुक्याहून पोलिसांना घेऊन आला होता. अभयनं जळतं लाकूड खाली फेकलं. आणि पटकन वळून स्मृतीला सोडवलं. स्मृती झाल्या प्रकारानं पूर्ण उन्मळून गेली होती. तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली.
----------
स्मृतीला हळूहळू शुद्ध आली. तिनं डोळे उघडले, तर सकाळ झाली होती आणि समोर चिंताग्रस्त चेहरा करून अभय बसला होता. तिनं सभोवताली पाहिलं तर ती त्यांच्या शहरातल्या घरी होती.
"इथे?" ती अस्फुट म्हणाली.
तू उठू नकोस बरं, सांगतो सगळं मी.
"पोलिस आले आणि त्यांनी गुरूजी, मुसळेबाई आणि आईला अटक केली."
"काय?"
"हो. आईला त्यांनी समज देऊन सोडून दिलं, कारण गुरूजी आणि मुसळेबाईंचा ट्रॅक रेकॉर्ड निघालाय तालुक्याचा पोलिसांकडे! त्यांचे सगळे कारनामे काल गावासमोरच सांगितले. आई आणि गावकरी दोघांचेही डोळे उघडलेत."
"पण मग आपण इथे?"
"मला तिथे गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. आईला तुझी माफी मागायची होती. पण मी म्हटलं पुन्हा कधीतरी!"
"तू पण ना! इतकं का करायचं?"
"हे तू बोलतेयस? तुझे किती हाल झालेत ह्या सगळ्यांत! आणि तुला काही झालं असतं म्हणजे?"
"हो मीच बोलतेय. हाल माझेच झालेत ना? मग मी माफ केलं तर तुला काय?"
"बरं बाई माफ कर मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत."
"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही!"
(समाप्त)
ही कथा ह्यापूर्वी मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० मध्ये प्रकाशित झाली होती.
मस्त रे...
ReplyDeleteबाबा,त्या अंकात वाचायची राहून गेली होती.. छान आणि वास्तववादी आहे कथा...अंधश्रद्धेपायी हे असले प्रकार आजही घडत आहेत हे आपल दुर्दैव आहे...
ReplyDeleteबाबा, मस्तच आहे कथा.. अगदी वास्तवदर्शी... हे असले प्रकार अजूनही घडतात हे आपलं दुर्दैव !! :(
ReplyDeleteभारी आहे यार... मस्तच एकदम. हे असले प्रकार स्वतःला सुशिक्षित म्हणवणार्या लोकांमध्येही घडतात हीच तर खरी शोकांतिका!
ReplyDeleteयोगेश,
ReplyDeleteधन्यवाद भावा! :)
देवेंद्र,
ReplyDeleteछोटे छोटे शहरों में..ऐसी बड़ी बड़ी बातें होती रहती हैं..
:)
हेरंब,
ReplyDeleteअरे दुर्दैवाचे द्शावतार आहेत आपल्याकडे.. :(
संकेत,
ReplyDeleteअरे लोक सुशिक्षित होतात...पण सुसंस्कृत होत नाहीत.. :-S
भाई, मस्तच रे एकदम...
ReplyDeleteतिथे ही आवडली होती आणि इथे ही. :)
मानलं बाबा तूला....
ReplyDeleteआवडली कथा... अरे या अंधश्रद्धेचे ईतके अनुभव घेतलेत काही ठिकाणी की हे प्रकार घडतात यात नवल काही नाही असे वाटते!! बरं स्वत:ला तथाकथित पुढारलेले म्हणवणारे लोक हे असे वागतात, मग काय बोलावे!!!
सुहास,
ReplyDeleteधन्स भाई!
ताई,
ReplyDeleteअगं बर्याच असल्या बातम्या पाहून हे सगळं सुचलं! :(