'मालिका' ह्या गोष्टीबद्दलच्या माझ्या संकल्पना 'फक्त एका रूपयासाठी' वगैरेंपासून सुरू होऊन 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' पर्यंत, फारतर 'सीआयडी' आणि 'आहट' पर्यंत येऊन थांबतात. आणि इंग्रजी मालिकांमध्ये अगदी लहान असताना जेव्हा 'स्टार प्लस' हे अप्रूप टीव्हीवर लागायचं तेव्हा 'सांता बार्बरा' आणि मजेशीर टायटल ट्रॅकवाली 'नेबर्स' (अर्थातच त्यापुढे काही कळण्याचा किंवा आता आठवण्याचा प्रश्न उद्भवत नाही) एव्हढंच आठवतं. त्यानंतर मूळच्या इंग्लिश पण हिंदीमध्ये डब केलेल्या 'डेनिस द मेनेस', 'डिफरन्ट स्ट्रोक्स', 'आय ड्रेम्ट ऑफ जिनी', 'सिल्व्हर स्पून्स', 'हूज द बॉस' किंवा 'बिविच्ड' ह्या मात्र सगळ्याच लक्षात आहेत. पण हे सर्व आजपासून किमान दहा ते बारा वर्षांपूर्वीचं. त्यानंतर मी 'इंग्रजी मालिका' ह्या प्रकाराच्या कधी वाटेला गेलो नाही. पण मालिका नावाखाली हिंदी-मराठी चॅनेल्सवर जे ही लागतं ते निमूटपणे पाहणं मी कर्तव्यकर्म मानतो. कारण आपली कुठलीही कामं उरकताना सोबत म्हणून चालू ठेवता येण्याजोगं अन मधेच एखादा सीन पाहिला तरी हरकत नसणारं असं काही केवळ मालिकाच देऊ शकते. आणि मालिका ही टीव्हीवरच पाहिली पाहिजे हा माझा आजवरचा अलिखित नियम होता. त्यामुळे अनेक मित्रांनी रेकमेंड करूनही मी कधीही 'फ्रेंड्स' च्या वाट्याला गेलो नाही. अन्यही अशा बर्याच मालिकांना मी टांग दिली. पण एक दिवस '३० रॉक' ही इंग्रजी मालिका मी मित्र फारच मागे लागल्यानंतर पाहिली अन प्रथमच 'मालिका' कॉम्प्युटरवरही पाहता येऊ शकते आणि ती प्रत्यक्षात मनोरंजन करू शकते ह्याचा साक्षात्कार झाला. पण माझा मूळ स्वभाव कर्मठ, त्यामुळे '३० रॉक' चे माझ्याजवळचे एपिसोड्स संपल्यावर मी दुसरीकडे कुठेही पाहणं टाळलं. 'फ्रेंड्स' रिक्वेस्टही रिजेक्ट केल्या आणि माझं एकमालिकाव्रत पाळलं.
पण मग गेल्या सुट्टीत भारतात होतो तेव्हा कधीतरी चॅनेल्स बदलताना एका नव्या इंग्रजी मालिकेची जाहिरात दृष्टीस पडली. 'बर्न नोटीस' अशा वेगळ्या नावानं आणि कल्पक जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. इथे परत आलो अन एक दिवस इंटरनेटचे बरेच तास शिल्लक असल्याकारणे चाळा म्हणून बर्न नोटीसचा पहिला सीझन उतरवायला सुरूवात केली. बर्याच फाईल्स असल्यानं टप्प्याटप्प्यानं पार्ट टाईम करत दोनेक महिन्यांमध्ये पूर्ण पहिला सीझन येऊन माझ्या कॉम्प्युटरवर पडून राहिला. मध्यंतरी मित्रही 'बर्न नोटीस' ची बरीच तारीफ करत होता, पण नेहमीप्रमाणेच माझा कर्मठपणा अन 'कॉम्प्युटरवर पाहायची मालिका' ह्या विषयाबद्दल माझं औदासिन्य ह्यामुळे मी निवांत होतो. अन एके दिवशी फारच कंटाळा आलेला असताना मी कॉम्प्युटर चाळत होतो तेव्हा हा फोल्डर दृष्टीस पडला. ज्या सिरियलमागे मी बरेच तास घालवले होते, ती पाहू तर कशी आहे अशा अतिशय विरक्त विचाराने मी पहिला भाग सुरू केला.
मायकल वेस्टन हा एक सीआयए चा कॉन्ट्रॅक्टेड गुप्तहेर. जो अमेरिकेसाठी हेरगिरी करतो अन अमेरिकेच्याच असंख्यांपैकी एका सुरक्षायंत्रणेचा भाग आहे, पण थेट सीआयएसाठी काम न करता त्यांचीच काही अंडरकव्हर कामं करतो. पहिल्या भागाची सुरूवातच मायकलच्या नायजेरियातल्या एका छुप्या कामगिरीपासून होते. ही कामगिरी पार पाडताना अर्ध्यातच त्याला अमेरिकन सुरक्षायंत्रणा 'बर्न' करतात. जसं नोकरदारांना 'फायर' केलं जातं, तसंच गुप्तहेरांना 'बर्न' केलं जातं. एखाद्याच्या नावानं 'बर्न नोटीस' बजावली की त्याच्याशी असलेला सरकारचा सर्व संबंध संपला. त्याचा सगळा इतिहास, पैसे रेकॉर्डसमधून पुसलं जातं. अन सरकारला त्याच्यापासून धोका वाटत असेल तर त्याच्या मरणाचाही बंदोबस्त केला जाऊ शकतो. कामगिरीच्या मध्यातच 'बर्न' झालेला मायकल जीव वाचवून पळतो आणि विमानातच अतिदमणुकीनं बेशुद्ध होतो. जेव्हा तो उठतो, तेव्हा तो त्याच्या मूळ शहरात 'मायामी' मध्ये असतो. कामावरचा किंवा कामाशी निगडीत एकही मनुष्य त्याच्याशी संबंध ठेवू शकत नाही किंवा इच्छित नाही आणि त्याच्या 'बर्न' केलं जाण्याची कारणं किंवा 'बर्न नोटीस' कुणी अन का बजावली ह्याचंही उत्तर कुणी देऊ शकत नाही. त्याच्याकडे पैसे नाहीत अन तो शहराच्या बाहेर पडू शकत नाही ह्याची काळजी घ्यायला त्याच्यावर चोवीस तास पाळत आहे. प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि इतर आयडेंटिटी प्रूफ्सही त्याच्याजवळ नाहीत.
पाकिटामध्ये 'इमर्जन्सी कॉन्टॅक्ट' म्हणून एक्स-गर्लफ्रेंडचा नंबर असल्यानं तो बेशुद्ध असताना तिला बोलावलं जातं. तीदेखील गुन्हेगारी टोळ्यांमधली असल्यानं नवं शहर म्हणून निघून येते. मूळ शहर असल्यानं मायकलची कुटुंबवत्सल पण चेनस्मोकर आई आणि छोटेमोठे गुन्हे करणारा भाऊदेखील त्याच शहरात आहेत. आणि ह्यांच्या व्यतिरिक्त एफबीआयचा इन्फॉर्मर असलेला मायकलचा जुना जिगरी दोस्त सॅम (जो मायकलच्या सांगण्यावरून मायकलबद्दलच एफबीआयला खबरी देतो), एव्हढीच ओळखीची लोकं मायकलशी बोलतात.
विचित्र परिस्थितीत अडकलेला मायकल आपल्या 'बर्न' होण्यामागचं रहस्य जाणून घ्यायचा निश्चय करतो आणि त्यादिशेनं पावलं टाकू लागतो. पण ह्या सगळ्यासाठी पैशांची गरज आहे. मग तो बिना लायसन्सचा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बनतो. त्यापुढे प्रत्येक भागामध्ये मायकल आपल्या 'बर्न नोटीस'च्या रहस्याकडे एक एक पाऊल टाकतो आणि त्या त्या भागात एक एक 'मायामी'मधली केस सोडवतो. अशा भन्नाट प्रकारे ही मालिका पुढे सरकते.
मायकल वेस्टनचं काम करणारा 'जेफ्री डोनोव्हन' हा मालिकेची जान आहे. त्याचा बोलका चेहरा अन मिस्किल हास्य मायकलच्या पात्रात रंगत भरतात. एखाद्या वर्षांनुवर्षं जगभर गुप्तहेरी केलेल्या माणसाला शोभेलसं व्यक्तिमत्व आणि अप्रतिम संवादफेक ह्यामुळे मायकल वेस्टन फारसं काही भव्यदिव्य न दाखवताही प्रचंड विश्वसनीय वाटतो. मालिकेचा फॉर्मॅट ज्यामध्ये बर्याच प्रसंगांमध्ये पॉज येतो आणि मायकल व्हॉईसओव्हरने एखाद्या होतकरू गुप्तहेराला टिप्स द्याव्यात तशा टिप्स देतो, मायकल साध्या साध्या गोष्टींमधून विविध यंत्र कशी बनवतो किंवा प्रत्यक्षात काहीही न करता टॅक्टिकली भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी कसं पळवतो आणि सगळ्या पात्रांच्या तोंडी असलेले खुसखुशीत संवाद, ह्यांमुळे एका अर्थानं थ्रिलर असलेली मालिकादेखील तणावपूर्ण किंवा नाटकीय न होता मनोरंजक होते आणि तरीही बर्यापैकी विश्वसनीय राहते.
मायकलचं पात्र इतक्या विचारपूर्वक लिहिलंय की लेखकाला सलाम करावासा वाटतो. एका भागात मायकल सांगतो 'People with happy families don't become spies. Bad childhood is the perfect background to become a spy. You don't trust anyone, you are used to getting smacked around and you never get homesick.'. मायकलचं बालपण असंच आहे. त्याचे वडील बिलकुल चांगले नसल्याचं आणि मायकलचं त्यांच्याशी वाकडं असल्याचं आपल्याला मायकल आणि त्याच्या आईच्या प्रत्येक संवादातून कळतं. पण त्याच्या आईनं तरीही केवळ मुलांसाठी अनेक वर्षं संसार केलेला आहे. एका प्रसंगात ती मायकलला म्हणते, 'You missed your father's funeral.. by eight years." मायकलचं आईवर प्रेम आहे, कसाही असला तरी भावाबद्दल ओढ आहे पण विचित्र बालपणामुळे तो नात्यांना घाबरतो, त्यामुळे कायम घरापासून आणि नात्यांपासून पळत राहिलाय. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कामाचं कारण देऊन. पण कुटुंबवत्सल आईमुळे मायकलच्या वागण्यातला फरक प्रत्येक भागानुसार गडद होत जातो. "Thirty years of karate, combat experience on five continents, a rating against every weapon that fires a bullet or holds an edge... still haven't found any defence to mom crying into my shirt." मायकलचा हा डायलॉग त्याची व्यक्तिरेखा स्पष्ट करून जातो. वर्षांनुवर्षं जगाच्या कानाकोपर्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितींमध्ये आणि वाईटात वाईट लोकांसोबत आयुष्य घालवलेला गुप्तहेर मायकल अचाट कामगिर्या करून एकेक केस सोडवतोच पण एक माणूस म्हणूनही ह्या मालिकेमध्ये पदोपदी दिसत राहतो. त्यामुळेच मी आजवर पाहिलेल्या किंवा वाचलेल्या सर्व गुप्तहेरांमधला माझा सर्वांत आवडता गुप्तहेर हे बिरूद मी मायकल वेस्टनलाच देईन.
पाच दिवसांमध्ये मी 'बर्न नोटीस' च्या पहिल्या सीझनचे पाऊण तासाचे १२ भाग संपवले. आता ह्या सप्ताहांताला दुसरा सीझन आणि कदाचित दोनेक आठवड्यांत आजवरचे सगळे भाग पाहून होतील, पण मायकल वेस्टन आणि त्याच्या जगाचं गारूड उतरणं थोडं अवघडच आहे.
गेले काही दिवस तुझे 'बर्न नोटीस' वाले बझ/ट्वीटस वाचून मी या पोस्टचा अंदाज बांधला होताच.. :)
ReplyDeleteमीही विशेष सिरीयलवाला नसल्याने माझी सिरीज सुरु होते आणि संपते ती फ्रेंड्सपाशी :) नाही म्हणायला हल्ली HIMYM बघायला लागलोय.
आता फ्रेंड्स नक्की बघायला घे.
(मनातल्या मनात : कितीही काहीही झालं फ्रेंड्स ते फ्रेंड्सच :P)
वाह... भारी प्रकरण दिसतंय हे. नक्की बघायला हवं !! :)
ReplyDeleteअरे खरंच फ्रेंड्स बघ रे एकदा :p
बघायला पाहिजे "बर्न नोटिस".
ReplyDeleteफ्रेंड्स नि HIMYM वगैरे सोड, बिग बॅंग थिअरी भारी आहे.
मला अजूनही "ये जो है जिंदगी" जी दूरदर्शनवर नव्वदच्या दशकात लागायची तीच भारी वाटते. लक्षात ठेवून पाहिलेली (पुनर्प्रक्षेपित झाल्यावर) एकमेव मालिका आहे ती. सध्या "फ्लॉप शो" बघतोय यूट्यूबवर.
बर्न नोटीस चा एक सिझन नुकताच झाला भारतामधे. माझं टिव्ही पहाणं म्हणजे मुली पहातील ते..हे सिरियल मला पण खूप आवडलं. कॅसल पण मस्त आहे, नक्की पहा.. :)
ReplyDeleteअरे वा, कॉमेंट झाली की पोस्ट आज.. आज सोनीयाचा दिनू...... :)
ReplyDelete(मनातल्या मनात : कितीही काहीही झालं फ्रेंड्स ते फ्रेंड्सच )....+++अगदी अगदी !
ReplyDeleteबघून घे रे बाबा एकदा ! उगाच म्हातारपणी 'फ्रेंड्स' बघायचं राहूनच गेलं असं नको व्हायला ! :p
लेखात उल्लेखलेले मायकलचे dialogues लय भारी आहेत...मी IIScत असताना मालगुडी डेज, व्योंकेश बक्शी, डक टेल्स वगैरे revise केले...मस्तं वाटलं बघून...पण Friends बघच एकदा...Jennifer Aniston च्या खातिर तरी ;)
ReplyDelete(मनातल्या मनात : कितीही काहीही झालं फ्रेंड्स ते फ्रेंड्सच :-p)
ReplyDeleteपण बर्न नोटीस ही नवीन माहिती आहे मला. धन्स.
Bhannat distey malika :)
ReplyDeleteAamach aani malikanche kadhi jamle nahi ;)
मस्तच! पोस्ट वाचताना जेवढी मजा आली तेवढीच कमेंट्स वाचूनही! :)
ReplyDeleteमाझ्या सगळ्या आवडत्या मालिकांची उजळणी झाली. फक्त - Heidi, प्रपंच आणि जंगलबुक तेवढे राहिले.
आमचंही मालिकांबरोबर कधी जमले नाही बुवा. पण आता इथे वाचून १-२ पाहीन म्हणतो.
ReplyDeleteबाबा Anti-FRIENDS गटात आपण पण आहोत तुझ्याबरोबर. सिरीयल म्हाणशील तर एकमेव "प्रिजन ब्रेक" पाहिली आणि ती पण पिसाटल्या सारखी, २ रात्रीत प्रत्येकी पाऊण तासाचे २२ भाग. लैई आवडली होती. "बर्न नोटीस"बद्दलचा हा लेख वाचून सिरीयल पाहावी वाटू लागली आहे.
ReplyDeleteBurn notice's theme sounds like a plot of a Robert Ludlum novel, nevertheless interesting.
ReplyDeleteआणि फ्रेन्ड्सला कंपॅरिझन आहे का?
बीबीटी, द औफिस (ही पण मॉक्युमेंटरी आहे) या पण भारी आहेत, कॉमेडीमध्ये.
थ्रिलर किंवा मिस्टरी ट्राय नाही केले अजून तरी. मुळातंच टीव्ही लोक हलकं पाहण्यासाठी पाहतात. थ्रिलरसाठी पिच्चर हा जास्ती चांगला प्लॅटफॉर्म आहे असं वाटतं मला.
हेरंबा,
ReplyDeleteअरे फ्रेंड्सचे ऍडव्होकेट मला सर्वत्र दिसतात आणि कसं कुणास ठाऊक सगळ्यांना सुगावा लागतो की मी फ्रेंड्स पाहिलेलं नाही. पण लई मजा येते माज करायला :D
मी नक्कीच पाहीन जेव्हा योग येईल तेव्हा... तोवर तू बर्न नोटीस ट्राय कर! :)
सुहास,
ReplyDeleteनक्की पाहीन रे फ्रेंड्स... पण आधी तू बर्न नोटीस पाहा! :D
ओंकार,
ReplyDeleteहोय, बिग बँग थिअरीबद्दल मीही फार ऐकलेलं आहे आणि आता बर्याच सिरियल्स रांगेत आहेत.. कारण माझ्या मित्राकडे सिरियल्सचं भांडार आहे.. :)
महेंद्रकाका,
ReplyDeleteशेवटी ब्लॉगरला पाझर फुटला तर! :)
तुम्ही एकदा बर्न नोटीसबद्दल फेबु किंवा ट्विटरवर स्टेटस टाकल्याचं स्मरतंय मला! :)
अनघाताई,
ReplyDelete:D:D त्या फ्रेंड्समध्ये कामं करणारी माणसंही म्हातारी झालीत पण माझा निर्धार अटळ आहे! :P
अगं बघेन नक्की.. उगाच माज करतोय झालं! :)
कपिल,
ReplyDeleteमालगुडी डेज, व्योमकेश बक्षी, डकटेल्स हे सर्व माझ्या प्रचंड आवडते ह्या गटातच येतात... उल्लेख राहून गेला वर.. पण अशा बर्याच सिरियल्स आहेत. :)
अरे आणि मी लिहिलेले डायलॉग्ज फक्त झांकी है... अरे इतके जबरा डायलॉग्ज आहेत ना की एक क्षण लक्ष हटत नाही मालिकेवरून! बघ नक्की..
कांचनताई,
ReplyDeleteफ्रेंड्सचा आजवर कट्टर नसलेला चाहता मला भेटायचाय.. :)
तू बर्न नोटीस बघ नक्की... उत्तम सिरियल आहे!
विक्रम,
ReplyDeleteअरे मालिकांबरोबर जमत नसलं तरी ह्याबरोबर जमेल.. तासाभराचा सिनेमा असं समजून पाहिलंस तरी जबरदस्त मनोरंजन होतं.. बघ कधी योग आला तर! :)
श्रद्धाताई,
ReplyDeleteकॉमेंट्स वाचताना मलाही लक्षात आलं की माझ्या बर्याच आवडत्या मालिका लिहायच्या राहूनच गेल्यात! :)
जंगलबुक मलाही प्रचंड आवडायची!
पंकज,
ReplyDeleteशुभस्य शीघ्रम! :) बर्न नोटीसनेच उद्घाटन कर!
सिद्धार्थ,
ReplyDeleteफायनली एक समविचारी भेटला ;)
प्रिजन ब्रेक पुढची सिरिज आहे... मित्राकडून ह्याच सप्ताहांताला घेऊन येणार आहे... एकदा बर्न नोटीस संपली की लगेच प्रिजन ब्रेक! :D
सागर,
ReplyDeleteबर्न नोटीसचा प्लॉट हा खरंच एक वेगळा कन्सेप्ट आहे. आणि हलकं फुलकं बरोबरच थोडं वेगळं मनोरंजनही मिळत असेल तर बर्न नोटीसशिवाय काहीच नाही. बर्न नोटीसचा फॉर्मॅट बघशील एकदा तर कळेल तुला मी काय म्हणतोय ते. एकाच वेळी हलकंफुलकं असणं आणि थ्रिलर असणं हे बर्न नोटीसला जमतं यार! आणि बर्न नोटीसची क्वालिटी आणि कॅनव्हास इतका उच्च आहे की पाऊण तासाचा सिनेमा म्हणूनही पाहू शकतोस!
बाकी... फ्रेंड्सला कंपॅरिजन... प्रॉबेब्ली यू आर आस्किंग अ रॉन्ग पर्सन! :P
बर्न नोटीस मस्त
ReplyDeleteमहेशकाका,
ReplyDeleteधन्यवाद! :)
बाबा तू फ्रेंड्स पाहिलेले नाही आणि मी फ्रेंड्स आणि बर्न नोटीस दोन्हीही... :) एक माज करणाऱ्या भावाची सात माजोरडी बहिण ;)
ReplyDelete(असं लोक म्हणतील ;) ... मी नाही;))
असो, तू सल्ला दिलेलाच आहेस की जमेल तेव्हा ’बर्न नोटीस’ पहा.... आणि मी आज्ञाधारकासारखी माझ्याकडची हार्ड डिस्क घेउन भारतात येणार आहे, आणि ती तूला सुपुर्त करणार आहे... आजवर तू ज्या ज्या शिणिमांची परिक्षणं लिहीलीयेस ती सगळी पडताळून पहाता यावीत (;))याच एका हेतूने मी सगळे सिनीमे पहाणार आहे, तसेच हे नोटीसीचं प्रकरणंही :) ...
असो, लेखावरून हे प्रकरण आवडेल असं नक्की वाटतय (आणि तुझ्यावर विश्वास आहेच) ....
मालिका पाहयचा जाम कंटाळा येतो...फ़्रेंडस कॉपी करुन ठेवलय पण अजुन पाहुन संपल नाही... फ़्रेंडस झाल की मग बर्न नोटीस...कधी ते माहित नाही ;)
ReplyDeleteबाबा, प्रिजन ब्रेकवर मी पोस्ट लिहिणार आहे. आत्ता तू पाहतो आहेस म्हणजे लवकर पुरी करावी लागणार.
ReplyDeleteतन्वीताई,
ReplyDelete:D नक्की घेऊन ये हार्ड डिस्क.. जे असेल नसेल ते सगळं गम्य-अगम्य टाकून देतो तुला! :)
अगं नक्की आवडेल.. अजिबात ताणतणाव येत नाहीत आणि तरीही इमोशन्स-थ्रिलर आणि कॉमेडीचा उत्तम समतोल साधलाय.
योगेश,
ReplyDeleteआधी बर्न नोटीस पाहा... आमच्या Anti-Friends गटात येशील ह्याची ग्यारंटी! :D
सिद्धार्थ,
ReplyDeleteअरे वेळ आहे मला अजून.. बर्न नोटीस संपेस्तो पुढचा सप्ताहांत उगवेल.. अजून दीड सीझन पुरा करायचाय मला... :D
तू लिही आरामात.. :)
हेरंबाणे सजेस्टलेल्या फ्रेंडसचा मोठा साठा संगणकावर जमा केलाय पण अजून पाहणे झाले नाही ... आता "प्रिजन ब्रेक" आणि "बर्न नोटीस" ची मायापण गोळा करावी म्हणतोय... पाहण कधी तरी होईलच... :)
ReplyDelete