Showing posts with label अंगारे. Show all posts
Showing posts with label अंगारे. Show all posts

3/14/2010

ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा?

बर्‍याच वर्षांपूर्वी एक तद्दन गल्लाभरू आणि कुठल्यातरी इंग्रजी सिनेमावरून ढापलेला चित्रपट आला होता, 'अंगारे'. आता इंग्रजी चित्रपटावरून ढापलेला म्हटलं की तो भट्ट कंपनीचा असल्याचा संशय तुम्हाला आलाच असेल. तर तुमच्या संशयाची मी पुष्टी करतो. आता एवढं जाणलंच आहे तुम्ही, तर तुमच्या ज्ञानात अजून थोडी भर घालतो. ह्या सिनेमानंतर अजून बर्‍याच वर्षांनी आलेला 'फूटपाथ' (आफताब आणि बिपाशा) हा ह्याच भ्रष्ट सिनेमाची आणखी भ्रष्ट नक्कल होता. आता तुम्ही म्हणाल की एवढाच फालतू सिनेमा होता तर तो लक्षात का राहिला इतकी वर्षं. तर त्याचं काय आहे, त्या सिनेमामध्ये माझा आवडता नट 'अक्षय कुमार' होता (तोंड वेंगाडू नका, तो चांगला नट आहे, चुकीचे सिनेमे करतो एवढंच). पण नुसतं एवढंच कारण नाही हा सिनेमा लक्षात राहण्याचं. दुसरं कारण आहे, ह्यामध्ये तो कच्ची अंडी फोडून सरळ तोंडात ओततो, असा सीन आहे (अहो खरंच असा सीन आहे). बरं ठीक आहे, खरं सांगतो. ह्या सिनेमात एक गाणं आहे, त्यातले शब्द आहेत,
इक बात बता मेरे यारा, मैं सोच सोच के हारा। ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा॥
आता पहिल्यांदा ऐकणार्‍याला ह्यात काहीही वाटणार नाही, पण खोल विचार केला तर जाणवतं, वरवर यमक जुळवून बनवलेलं हे गाणं, चुकून (किंवा गीतकाराला खरंच असा अर्थं अभिप्रेत असेल) एक असा प्रश्न विचारतं, जो जगातल्या भल्याभल्या विचारवंतांना अनादिकाळापासून पडत आलेला आहे.
खरंच विचारवंतांना असे प्रश्न पब्लिकली पडतात, पण तुमच्या आमच्यासारख्यांना हा प्रश्न आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगी पडतोच की! अगदी विश्वासातल्या माणसाने धोका द्यावा, अगदी कट्टर वैर्‍याने जीव वाचवावा, रस्त्यावर धडपडल्यावर दोन दिवसांपूर्वी हरवलेली अंगठी टपरीच्या खाली पडलेली सापडावी, आपण अगदी क्षुल्लक कारणावरून कोणावर डाफरावं आणि कुणी आपल्यावर डाफरलं की एवढा राग का येतो ह्याचं विश्लेषण करावं, दुसरा आपल्या बायकोवर फारच हुकूमत गाजवतो असं म्हणताना आपण आपल्या बायकोने कुठे कसे कपडे घालावेत हे ठरवावं आणि पुन्हा मग आपण असे का वागतो ह्याचा विचार करत राहावा, कधीकधी प्रत्यक्ष मृत्यू पाहूनही रडू न यावं आणि एखाद्या वाद्याचा आर्त सूर किंवा गायकाची दर्दभरी तान ऐकून डोळ्यात पाणी उभं राहावं, होणार्‍या बायकोने गृहकृत्यदक्ष असावं की करियर ओरियेंटेड असावं ह्याचं विश्लेषण करावं, एखाद्या शिकल्यासवरलेल्या ओळखीच्या माणसाने मुलगा इंजिनियर झाला तर एवढा हुंडा, एमबीए झाला तर एवढा हुंडा अश्या गोष्टी अगदी सामान्य गोष्टीप्रमाणे कराव्या, हुंडा दिला नाही म्हणून सुनेला जाळून टाकल्याची नेहमीचीच बातमी पुन्हा एकदा पेपरात वाचावी, रस्त्यात दिसणार्‍या प्रत्येक मंदिरासमोर आवर्जून नमस्कार करणार्‍याने ऑफिसमध्ये सहकार्‍यांना विनाकारण त्रास द्यावा, उच्चविद्याविभूषित आईवडिलांनी आपल्या मुलानं/मुलीनं निवड्लेल्या तोलामोलाच्या मुलाला/मुलीला केवळ ती जातीतली नाही म्हणून नकार द्यावा, 'देव सृष्टीच्या चराचरात आहे म्हणणार्‍याने लोकांना अस्पृश्य ठरवून मानवाला सृष्टीचा भाग मानण्यास नकार द्यावा, आधी स्वतःला चराचराहून वर समजून चरत राहावं आणि पुन्हा त्याच 'अस्पृश्य' मर्त्य मानवांना एकदा त्यांच्या देव्हार्‍यातल्या देवाला भेटण्याची 'परवानगी' नाकारावी, कुणीतरी त्याला वाटते त्या 'देवाला मानणे' हे पुण्य ठरवून देवाचे कुठलेही दुसरे रूप मानणार्‍याना देहांत शासन द्यावं (हे वेगळ्या धर्मांतच नाही एकाच धर्मांत देखील घडते आणि वेगळे रूप म्हणजे कामाला देव मानणे म्हणजेच नास्तिकसुद्धा), कुठे जातीच्या नावाखाली जळितकांड व्हावीत, कुणी धर्मप्रसाराच्या नावाखाली कंपनी वाढवण्यासारखे उद्योग करावे आणि धर्माला पैश्यांसाठी बदलून किंवा बदलवून लोकांच्या असहायतेचा फायदा घेवून आपल्या धर्माला मानणार्‍यांची संख्या एवढी वाढली असा बडेजाव मिरवावा, 'तुझा धर्म मोठा कि माझा, तुझा देव महान कि माझा' असले निरर्थक वादविवाद करावे आणि सर्वांनी ते टीव्हीवर पाहून आपापले रक्तदाब खालीवर करून घ्यावे, मधच्यामधे ह्या सर्वांचं सोयरसुतक नसणार्‍या कुणी ह्यात बक्कळ पैसे कमवावे,न्यायानं वागणार्‍यांनी देशोधडीला लागावं आणि गुन्हेगारांनी सुखासीन आयुष्य जगावं, पुन्हा देशोधडीला लागलेल्यांना त्याचं काहीच वाईट न वाटता त्यांनी हिसुद्धा एक परीक्षा समजावी आणि आनंदी रहावं आणि गुन्हेगारंनी एवढं सुखासीन आयुष्य असताना अजून संपत्तीसाठी हायहाय करावी, कुठल्यातरी मानवी गटाने दुसर्‍या गटावर आधिपत्य गाजवावं आणि त्यांची सगळी संपत्ती लुबाडावी, मग त्यांतल्याच कुणा प्याद्याला थोडी संपत्ती देउन त्या लोकांची जवाबदारी सोपवून निघून जावं मग त्या मूर्ख प्याद्याच्या ऐय्याशीमुळे त्या समूहाची अवस्था वाईट झाली की जुन्या सत्तधीशांनी चारदोन कवड्यांची मदत द्यावी आणि आढ्यतेने आपल्या महानतेचा बडेजाव मिरवावा, ह्या आणि अश्या अनेक घटनांनंतर मला ' ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा?" हाच प्रश्न पडतो.
आता मला ठाऊक आहे, तुमच्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकांनी इथपर्यंत वाचलंही नसेल, पण ज्यांनी वाचलं त्यांच्यासाठी पुढे लिहितो. ह्या सगळ्या घटना प्रातिनिधिक आहेत, जगाचा पसारा एवढा आहे की आपल्यासारखी सामान्यं माणसं काय कल्पना करणार. पण ह्या घटना, मग त्याच्यामागे असलेल्या वृत्तीप्रवृत्ती, त्यामागचे उद्देश, त्यांचे परिणाम ह्या सगळ्याचा विचार एकत्र केला तर कधी थोडा मेळ बसतो, तर कधी बिलकुलच नाही, पण मग दुसरी एखादी घटना घडते आणी बसलेला मेळ उलथून जातो. सैरभैर व्हायला होतं. कदाचित सगळ्यांचंच होत असेल. माहीत नाही का, पण काल रात्रीपासूनच ह्याबद्दल लिहावंसं वाटत होतं, सुरुवात केल्यावर गाडी कुठल्या रुळावर कशी गेली ते कळलंच नाही. तुम्हाला काहीच अर्थबोध झाला नसेल तर काही हरकत नाही मी क्षमा मागतो, माझं लिखाण माझ्या विचारांना कदाचित न्याय देऊ शकलं नसेल, किंवा ह्या प्रश्नाला न्याय देऊ शकलं नसेल. पण हा प्रश्न पुन्हापुन्हा अनेकांना पडत राहिल, वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या शब्दांत. पण प्रश्न तसाच राहतो आणि अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत तसाच राहणार, अनुत्तरित.