Showing posts with label केमिस्ट्री. Show all posts
Showing posts with label केमिस्ट्री. Show all posts

8/01/2010

छलकेमिस्ट्री - काजू (लय भारी) चारोळीकर

मी काजू चारोळीकरला पहिल्यांदा कधी भेटलो ते नक्की स्मरत नाही. पण कालौघात आमच्यामध्ये मैत्रीचा घट्ट बंध निर्माण झाला. काजू चारचौघांसारखाच, पण प्रचंड आत्मविश्वास असलेला मनुष्य. आम्ही कदाचित कुठल्याश्या फाईव्ह स्टार हॉटेलात कुठल्यातरी मंत्र्याच्या पार्टीतच पहिल्यांदा भेटलो असू. कारण मी जेव्हापासून पाहतोय, तेव्हापासून काजू मराठी पेज थ्री पार्ट्यांमध्ये काजू कतर्‍या उडवतानांच दिसतो. कदाचित माझ्या क्षीण स्मृतीचा परिणाम असेल. पण इतक्या मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं होतं माझं, की काजूसारख्या अनेकांना तपशीलात लक्षात ठेवणं अवघड होऊन बसतं.

काजू पोटापाण्यासाठी काय करतो, हे माझ्यासाठी शरद पवार नक्की काय आहेत? ह्याहून मोठं कोडं आहे. पण तो सहसा सगळ्यांना लेखक असल्याचं सांगतो. आता तो सांगतो म्हणजे आपण विश्वास ठेवणं भाग आहे. बाकी, तो मुंबईतल्या सगळ्या हेवीवेट नेत्यांबरोबर विविध उंची रेस्टॉरंंट्समध्ये जेवण, किंवा गोवा पोर्तुगीजा वगैरे किंवा तत्सम ठिकाणच्या मराठी पेज थ्री पार्ट्यांमध्ये विविध सेलिब्रेटींबरोबर फोटोजमध्ये हातात जेवणाचं ताट किंवा मद्याचा प्याला घेऊन येणं असले जोडधंदेही करतो. आणि हो, टेलिव्हिजनवर रोजच्या रोज नेम केल्यागत कुणाची तरी मुलाखत घ्यायचा कार्यक्रमही तो मध्ये करायचा. बाकी त्याचं मुलाखत घेण्याचं कसब इतकं नामी आहे, की तो मुलाखत घेतोय की देतोय हे ना मुलाखत देणार्‍याला कळतं, ना प्रेक्षकांना! एकंदर एकदम कलंदर माणूस आहे माझा मित्र.

हो काजूला माझा मित्रच मानतो मी. आणि कदाचित तोही मानत असावा. कारण अजून, त्याच्या "मला *** बनवल्याची गोष्ट" मध्ये माझं नाव आल्याची खबर मला लागली नाहीये. हो, पण त्यानं अजून माझ्याबरोबरची त्याची केमिस्ट्रीही लिहून मासिकात छापली नाहीये हे ही तितकंच खरं! पण माझ्यावर अजून कसले भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत, अजून माझी प्रतिमा स्वच्छ आहे, कुठल्याही प्रकारची गुंडगिरी अथवा कुकर्म माझ्या हातनं झाल्याचं कुठे छापून आलेलं नाही आणि महत्वाचं म्हणजे अजून जनतेमध्ये माझ्याबद्दल गैर(!)समज नाहीयेत की ज्यासाठी काजूला माझ्या मैत्रीखातर माझ्या बचावार्थ लेखणी उचलायची गरज पडावी. बहुधा हेच कारण असावं. पण तरीही मी मात्र त्याच्याबद्दल लिहिणार आहे. कारण हल्ली त्याच्या लेखनशैलीवर आणि मुख्यत्वेकरून प्रथम पुरूषी एकवचनी लेखनशैलीवर फारच टीका होतेय. आत्मकेंद्रित लिखाणाचा उथळ आरोप त्याला बिचार्‍याला इतका झोंबला की त्यानं स्वतःचीच स्वतःबरोबरची आत्मकेमिस्ट्री लिहून टाकली.

त्या दिवशी मी आणि सूरराज ताज च्या रेस्त्राँ मध्ये बसून बियर घेत होतो. आता सूरराज पडला मराठीहृदयांचा राजा (स्वघोषित का असेना). त्यामुळे त्यादिवशी चर्चेचा विषय हाच होता, की मराठी तरूणांना बियरच्या बाटल्या फुकट दिल्या गेल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांचं आध्यात्मिक उत्थान होऊ शकतं. एव्हढ्यात तिकडून काजू फुणफुणत आला. मी नुकत्याच चाललेल्या ठरावाला अनुसरून एक बाटली त्याच्याकडे सरकवली.

तर तो म्हणायला लागला की, "हल्ली लोक फारच उथळ झालेत. आत्मकेंद्रित आणि उथळ साहित्यातला फरकच कळत नाही त्यांना."

मी म्हटलं काय झालं बाबा. तर सांगायला लागला, "अरे मी हाडाचा लेखक आहे. मी लेखणी कुणाला अर्पण नाही केली. मी स्वतःसाठी लिहितो. कुणाच्या बापाचा नोकर नाहीये मी."

सूरराजला अंमळ जास्त झाली होती, "अरे एक सांग, त्यादिवशी त्या संपादकाकडून मानधनाचा चेक आला नाही म्हणत होतास, तो आला का रे?"

काजू उसळणार होता, पण मी खारवलेले काजू त्याच्या दिशेने सरकवत सूरराजला म्हणालो, "बाबा, विषय काय तू बोलतोयस काय? तो स्वतःसाठी लिहितो रे, मानधन वगैरे दुय्यम आहे." मग पुन्हा काजूकडे वळलो, तो खारवलेल्या काजूंचा बकाणा भरत होता. "तू बोल रे पुढे काय झालं."

"अरे काय आहे ना, लोकांनी वपु वाचले नाहीयेत. वपु म्हणतात, "ऍज यू गो ऑन रायटिंग मोअर ऍन्ड मोअर पर्सनल, इट बिकम्स मोअर ऍन्ड मोअर युनिव्हर्सल." म्हणजेच तुम्ही जितके आत्मकेंद्रित लिहाल, तितकं ते वैश्विक होत जाईल."

"तुझ्यायला, तुझ्या *** काय छापखान्याचा खिळा शिरलाय काय?" सूरराज हाताबाहेर चालला होता. मी काजूला गप्प बसायची खूण केली आणि साहेबांच्या बाहेरच उभ्या असलेल्या सहकार्‍यांना बोलावलं. पण मग आम्ही दोघांनी मागे थांबणं म्हणजे बिलाचे वांधे झाले असते, म्हणून साहेबांच्या सहकार्‍याला काऊंटरकडे पाठवून आम्ही दोघेच साहेबांना गाडीपर्यंत सोडायला गेलो.

त्यानंतर माझी काजूशी दुसर्‍याच दिवशी सकाळी योगायोगानं पुन्हा गाठ पडली. ठाण्याला एका होर्डिंगसाठी फेमस नेत्याच्या होर्डिंगखाली आम्ही दोघे भेटलो. होर्डिंगवरचे नेतेही काजूकडे कौतुकाने बघत असल्याचा मला भास झाला. मग त्याने त्याचं रडगाणं पुन्हा सुरू केलं.

"लोकांना प्लास्टिकचं लिखाण हवंय. सेंद्रिय लिखाण नकोय. सगळं कसं न अनुभवलेलं, आणि पुस्तकी. खरंखुरं आतल्या माणसाचं लिखाण नकोय. मी लिहितो तेव्हा माझा विषय असलेली व्यक्ती माझ्या हातून लिहून घेते."

मी म्हटलं, "हे सिक्रेट तू असंच सांगणार लोकांना?" मी आश्चर्याने म्हटलं.

तो एकदम गडबडला, "अरे म्हणजे माझ्यावर गारूड होतं आणि आपोआपच लिहिलं जातं. एखाद्यानं सिनेमाचं परीक्षण लिहावं तसं, गुणदोषांसकट."

"बाकी हल्ली सिनेमा परीक्षणंसुद्धा विकतच घेतलेली असतात म्हणा." मी सहज म्हटलं. "असो चल एक एक चहा घेऊ या." मी टपरीकडे इशारा केला.

"नको अरे, मला बुद्धवला भेटायला जायचंय, ओबेरॉयच्या कॉफी शॉपमध्ये!" त्याच्या चेहर्‍यावर टपरीचा तिटकारा जाणवत होता.

"बरं चल मी पण येतो, बर्‍याच दिवसांत बुद्धवलाही भेटलो नाहीये." (फुकट सकाळचा चहा एसी हॉटेलात सुटत असेल, तर कोण नाही म्हणेल.)

"तुला सांगतो, हा हितेश पक्का बापावर गेलाय." बुद्धव जाम वैतागला होता.

"अरे तुला वाटतो तसा नाहीये रे हितेश. मला दिसलेला हितेश आणि जगाला दिसतो तो हितेश वेगळा आहे." काजू कळकळीनं सांगत होता. मला राजकारणातलं जास्त कळत नसल्यानं मी गप्प बसून कपुच्चिनो असं नाव देऊन दिली जाणारी भंगार, कडू अशी कॉफी घशाखाली ढकलत होतो.

"तू साला पक्का हरामी आहेस. तुला सगळेच लोक वेगळे दिसतात. तू काय जन्मजात लेन्सेस लावून आलाय का डोळ्यांत. च्यायला, कुणीही तुला काहीही वाटतो. आणि निर्लज्जासारखा जगभर बोंबलत फिरतोस तेच." बुद्धव जेन्युईनली भडकला होता. "परवा काय तर म्हणे 'तो तरूण उद्योजक इमानदार आहे, त्याने घोटाळा केलेला असूच शकत नाही.' अरे *** तुला सांगून घोटाळा करणार का रे तो. जगाने पाहिले पेपर्स आणि तू काय चित्रगुप्त आहेस काय?"

माझ्या हातातला कप थिजला होता (ऍक्च्युअली हात थिजला होता). आणि डोळे काजूवर खिळले होते. पण काजू अनपेक्षितपणे शांत होता. त्याचं ट्रेडमार्क खळीवालं हास्य अजूनही त्याच्या चेहर्‍यावर विलसत होतं.

"रिलॅक्स बुद्धव, तुम्हा दोघांच्या भांडणात मी सूर्‍याची बाजू घेतली, तेव्हापासून तू असाच चिडतोस नेहमी. आता तुझे सगळे शत्रू माझे मित्र आहेत त्याला मी काय करू. पण तुलाही मी माझा मित्रच मानतो."

"खूप उपकार झाले माझ्यावर." म्हणून बुद्धव तसाच उठून निघून गेला. आता आली का पंचाईत. मी मॉर्निंग वॉकला निघालो होतो, त्यामुळे जवळ पैसे नव्हते. मग मी धावत बुद्धवला समजावायच्या मिषाने ," अरे बुद्धव ऐकून तर घे." वगैरे पुटपुटत गेलो. बाहेर आलो आणि चुपचाप टॅक्सी पकडली.

काजू नेहमीच मला असल्या गोंधळांमध्ये टाकतो. परवाच मी एका ऑर्किडमध्ये कुठल्याश्या पार्टीला गेलो होतो. तर काजू तिथेही हजर. मी शेजारी बसलेल्या ललनेच्या लिप्स्टिकचा रंग लाल आहे की काळा, हे अतिमंद प्रकाशामुळे कळत नसल्याने नीट निरखत होतो.

मी मद्याचा प्याला ओठांना लावणार (स्वतःच्या) एव्हढ्यात हा, "मी काय मुका नाहीये!"

मी एकदम दचकलो आणि माझ्या ग्लासातलं मद्य तिच्या अंगावर सांडता सांडता राहिलं. नशीब, नाहीतर गाल लाल आणि डोळे काळे अश्या आविर्भावात मी फारसा चांगला दिसत नाही.

"आता काय नवीन?" मी खरं तर वैतागलो होतो.

"अरे त्या टीका करणार्‍याला उत्तर दिलं मी. स्वतःवरच लेख लिहिला."

"छान!"

"अरे, मी लिहिलं, की अरे स्वतःच्या आईबद्दलही लेख लिहिताना मी गुणदोषांसकट लिहिला. उगाच कुणाची लाल करणार्‍यातला मी नाही. मी आत्मकेंद्रित लिहितो म्हणजे माझे स्वतःचे अनुभव लिहितो. आता आहेत माझ्या थोरामोठ्यांशी ओळखी त्याला मी काय करू. मी माझी लेखणी कुणाला वाहिली नाही. लेखणी कुणाच्यातरी चरणी वाहणारे संपादकही तुला जागोजाग दिसतील आणि तेही माझे परममित्र. पण मैत्री आपल्याजागी लेखणी आपल्याजागी. लिहिताना मी पूर्वग्रहांना फाट्यावर मारतो. मी कधीकधी स्वतःच्याचसुद्धा फाट्यावर मारतो." हे मद्य मी बरेचदा प्यायलं होतं. त्यामुळे, मला आता मद्याला चवच लागत नव्हती. मी ग्लास ठेवून दिला.

"अरे तुला सांगतो, तुकारामांनीही असंच लिहिलं, तेंडुलकरांनी असंच लिहिलं. त्यांना समाजानं वाळित टाकलं."

"कोण? सचिन तेंडुलकरनं कधी पुस्तक लिहिलं? तो साहित्य सहवासात राहायचा ते ठाऊके, पण त्यानेही लिहिलंय?"

"अबे विजय तेंडुलकरांची गोष्ट करतोय मी. तुम्ही बूर्झ्वा लोकांनी, क्रिकेट ह्या साम्राज्यवादी खेळाला डोक्यावर घेतलंय. आणि एका ग्लॅडियेटरला देव मानता तुम्ही."

"हे बघ मित्रा, आत्ता आपण एका क्रिकेटरच्याच पार्टीसाठी आलोय, तेव्हा जरा आवरा." मी शांतपणे म्हणालो.

"ओह्ह, पण ऐक तर. मी पुढे लिहिलं, की मी सेंद्रिय लिहितो. प्लास्टिक लिहित नाही. ज्यामुळे माझ्या लिखाणाचा जगाला त्रास होणार नाही. उलट प्लॅस्टिकच्या लिखाणाचा होईल. आजपासून १००-२०० वर्षांनी जेव्हा उत्खनन होईल, तेव्हा हेच लिखाण सापडेल, आपली संस्कृती जगाला सांगेल."

"अरे, पण जर तुझं सेंद्रिय असेल, तर डिकम्पोज नाही का होणार? प्लास्टिकचंच राहिल ना हजारो वर्षं." मी व्हॅलिड डाऊट विचारला.

"अरे तसं नाही रे. म्हणायची पद्धत आहे. तुला नाही कळायचं. मी स्वतःचे अनुभव लिहितो. उगाच कुणीतरी आयुष्य सदाशिव पेठेत काढलेल्याने, "तो मद्याचे प्याल्यांवर प्याले रिचवत होता." असली वाक्य लिहायची, ह्याल काही अर्थ आहे का सांग? "

"सचिन तेंडुलकर कसा खेळतो हे सांगायला तुम्हाला स्वतः खेळावं नाही लागत." मी बोलून गेलो.

तसा तो खवळला, "तू मुद्दा समजून घेत नाहीयेस."

मी म्हटलं ओके. असं म्हणून मी उठलो आणि बारकडे दुसरं मद्य आणायला गेलो. काजू आता माझ्या शेजारी बसलेल्या ललनेशी बोलायला लागला.

मी परतलो, तेव्हा तो तिला, त्याच्या आणि अमिताभ बच्चनच्या भेटीबद्दल सांगत होता आणि ती उत्सुकतेनं ऐकत होती.

"साला बोलबच्चन." मी मनाशीच म्हणालो आणि दुसर्‍या टेबलाकडे निघालो.

असा हा आमचा काजू. हाडाचा लेखक. आणि तेव्हढाच भारी सोशल ऍनिमल. तो सगळ्यांनाच ओळखतो. अहो परवा, मी इंग्लंडच्या पंतप्रधान कॅमेरॉनला भेटायला म्हणून गेलो (तो भारत दौर्‍यावर आहे सध्या) , तेव्हा हा तिथे दिसतोय की काय म्हणून माझी नजर सारखी भिरभिरत होती. त्याच्या अनेक गुणांमुळेच त्याला आम्हा मित्रमंडळींमध्ये 'लय भारी' हे टोपणनाव पडलंय. पण तो नावाला जागतो हे मात्र खरं.

बाकी, तो कुठेही भेटतो आणि छळ छळ छळतो म्हणून मी हा लेख लिहिला नाही. तर त्याच्या केमिस्ट्रीवरून, सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍या लोकांकडून तुकाराम महाराजाचा झाला त्याप्रमाणेच आमच्या 'लय भारी' मित्राचा जो छळ चाललाय, त्यासाठीच 'छलकेमिस्ट्री'चा हा लेखप्रपंच मी केला. ह्यापुढे मात्र लिहिणार नाही. नाहीतर लोक म्हणतील, मित्रांची लफडी झाकण्यासाठीचा पेड जर्नलिझम (विकत पत्रकारिता) करतोय म्हणून!