काहीकाही घटना आणि त्यानंतर प्रतिक्रिया, मतमतांतरे आणि उत्तरक्रिया(!) ह्यामुळे उठणारी राळ मला आपल्या सहिष्णुतेचा असहिष्णुपणाने विचार करायला भाग पाडतात. मतलबी हुसैन आणि त्याच्याशी संबंधित सर्व बातम्या उपरोक्त सदरात मोडतात.
नग्नचित्रे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे जरी मान्य केले, तरी तो आविष्कार फक्त परधर्मीयांच्या देवीदेवता आणि भारतमाता(जिला नमन करणे त्यांच्या धर्मात बसत नाही) ह्यांच्याच बाबतीत प्रकटतो ही बाब पचनी पडण्यासाठी हाडाचे कलावादी हवेत. तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे "तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे। येरागाबाळाचे नाही काम॥". कारण ह्या परमोच्च सौंदर्यदृष्टी लाभलेल्या कलाकाराच्या दैवी कुंचल्यातून जेव्हा इस्लामिक प्रतिमा बाहेर पडतात त्या ऊंची 'वस्तरे'(नटरंग हॅंगओव्हर) लेवूनच. आता सौंदर्यदृष्टीचा हा कोन माझ्या चौकोनी बुद्धीच्या परिघाबाहेरचा आहे. ह्या पुण्यात्म्याचा नुकताच प्रकट झालेला कलाविष्कार 'रेप ऑफ इंडिया' त्याच्या अफाट प्रतिभेची ओरडून ओरडून ग्वाही देतो. त्याचा कलाविष्काराचे स्वातंत्र्य आणि धार्मिक भावनांची कदर ह्यामध्ये समतोल साधण्यात कोणी हात धरू शकत नाही. आठवा, 'मीनाक्षी' चित्रपटातील 'नूर-उन-अल्लाह' गाण्यावर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या आक्षेपानंतर बिनशर्त गाणे काढून टाकण्याची त्याची सामाजिक भान ठेवून केलेली कृती.
असो. तर सध्या तमाम बुद्धिवादी, कलावादी, सौंदर्यवादी, बुटाची वादी, लेंग्याची वादी दुःखी आहेत कारण हा महान, भूलोकीचा संत (बलात्कारित)भारतमातेतील तिच्या काही अजाण लेकरांनी कोर्टात दाखल केलेल्या खटल्यांमुळे, तिच्या मूठभर वाद्यांच्या असतील, नसतील तेवढ्या वाद्या सोडून, कलेची कदर असणार्या 'शरिया' कायद्याने चालणार्या सौंदर्यवादी राज्यात चाललाय. मराठी माणसं मात्र त्याची कदर करतात. माधुरी दिक्षीत, श्रेयस तळपदे ह्यांच्यासारखे कलावंत तर त्या पुण्यात्म्याच्या गळ्यातले ताईत. त्याच्या जाण्याने ह्या सगळ्या उपरोक्त वाद्या अगदी 'सुटल्यात'. पण दुर्दैवाने मी बटण किंवा बक्कल वापरत असल्याने माझ्या संवेदना बोथट झाल्या आहेत. जर तसं नसतं तर जेव्हा एक उपरोक्त वादी एका अग्रलेखात ' तस्लिमा नसरीनचा कळवळा असलेल्या हिंदुत्ववादी संघटना हुसैनसाहेबांच्या बाबतीत दुटप्पीपणा करतात.' असं म्हणते, तेव्हा सामाजिक अपप्रवृत्तीवर प्रहार आणि नग्नचित्रे ह्यामध्ये साम्य काय, असला बेअकली प्रश्न मला पडलाच नसता. आणि 'सावरकरांच्या मार्सेलिस (खरा उच्चार मार्से) इथल्या पुतळ्याबाबत केन्द्र सरकार उदासीन' असल्या फालतू मथळ्याने दुःखी होणार्या मला ' हुसैन यांनी भारताचा पासपोर्ट परत केला' ह्या मथळ्याचं काहीच वाटू नये. छे, छे! माझं काही खरं नाही. आमच्यासारख्या अ-कलावाद्यांमुळे(महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने आम्ही कसलीतरी वादी झालो एकदाचे) बलात्कारित भारतमाता तिचे कपडे काढणार्या एका सुपुत्राला मुकली. आमच्या नशीबी 'नूर-उन-अल्लाह' नाहीच, आम्ही 'जहन्नुम' च्याच लायक आहोत.