8/22/2010

वेटिंग फॉर गोदो

वेटिंग फॉर गोदो बद्दल मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा 'टॉम ऑल्टर' त्यातली लकीची भूमिका मराठी आवृत्तीत करणार अशी काहीशी बातमी होती. तेव्हा नाटकाबद्दल चार-दोन ओळी पेपरात वाचल्या आणि त्यातलं अवाक्षरही कळलं नव्हतं. मग नाटकाबद्दल मी तसा विसरून गेलो. पण ते नाव, विचित्र नाव मी कधीच विसरलो नाही. मग पुन्हा एके दिवशी कुठेतरी ह्याच नाटकाचा उल्लेख वाचला. तेव्हा हाताशी विकिपीडिया होता. लगोलग विकिमातेला प्रणाम केला. आणि मला धक्का बसला. हे नाटक ऍब्झर्डिस्ट असल्याचं लिहिलं होतं. माझी गाडी नेहमीच ऍब्झर्डिझमपाशी येऊन थांबते. मग प्लॉट वाचायला गेलो, पण थांबलो. म्हटलं आधी नाटक वाचूया.

मग लेखक सॅम्युएल बेकेटच्या मूळ फ्रेंच पण इंग्रजी अनुवादित नाटकाचा शोध सुरू झाला. 'प्रोजेक्ट गुटेनबर्ग' नावाचा एक स्तुत्य उपक्रम आहे, खूप जुनी अनेक पुस्तकं, ज्यांचे कॉपीराईट्स एक्स्पायर झालेत, त्यांची इ-बुक्स बनवून फुकटात डाऊनलोड करायला दिली जातात. तिथेच मला २०व्या शतकात लिहिलेलं हे नाटक मिळालं. अवघं ४० पानांचं नाटक. मी म्हटलं, 'वाह, चटदिशी वाचून होईल. मग जेव्हा ती चाळीस पानं समोर धरली, तेव्हा भ्रमनिरास झाला.

कारण, नाटक ह्या प्रकाराशी इतका जवळून संबंध शाळा सुटल्यावर पहिल्यांदाच आला होता. अर्थात शाळेतही, एकदाच स्नेहसंमेलनाला केलं होतं म्हणा. पण नाटकाचं वाचन, तेही काही दशकं जुनं, प्रगल्भ नाटक. मी तीन-चार ओळींतच पानं खाली ठेवून दिली.

मग ६-७ महिने उलटले. एका शुक्रवारी संध्याकाळी मला कुठेतरी जायचं होतं. मी ठराविक वेळ होण्याची वाट पाहत होतो आणि अश्या कंटाळवाण्या प्रतिक्षेच्या क्षणीच योगायोगानं मला 'वेटिंग फॉर गोदो' ची आठवण झाली. माझा पराभव करणारं एक छोटंसं नाटक. मी निर्धाराने ते पुन्हा हातात घेतलं आणि कष्टानं पहिल्या १०-१२ ओळी वाचल्या. आणि ह्यावेळी मात्र जमलं होतं. मी हळूहळू नाटकात शिरू लागलो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनच्या जगात पोचलो होतो. ती संध्याकाळ, तो निर्मनुष्य रस्ता, ते पानगळ झालेलं झाड, तो एस्त्रागॉन बसतो तो कट्टा, ते एस्त्रागॉनचे बूट, विसरभोळा एस्त्रागॉन आणि ठाम, तत्वज्ञानी व्लादिमीर. नाटकाची टॅगलाईनच सांगते, 'ए ट्रॅजिकॉमेडी इन टू ऍक्ट्स'. कदाचित हे नावातच दिल्यामुळे असेल, पण वाचताना खरंच प्रत्येक ओळीला कारूण्याची एक अदृश्य झालर जाणवत राहते. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची बरेचदा असंबद्ध आणि विस्मृतीने ल्यालेली संभाषणं विनोदाची निर्मिती तर करतात, पण त्यांचं शेवटचं, 'नथिंग टू बी डन.' त्यांची असहायता पुढे आणतं. आणि मग, "व्हाय कान्ट वी गो?" , "वी आर वेटिंग फॉर गोदो!" "आह.." हे प्रत्येक संवादाचं धृवपद ठरतं.

त्यांच्या एक झाड, कट्टा आणि रस्त्याच्या जगात पोझ्झो आणि लकी प्रवेशतात. पोझ्झो हा एक निर्दयी जमिनदार आहे आणि लकी त्याचा गुलाम. तो लकीकडून अशी अशी कामं करून घेतो, जी पोझ्झोची अमानुषता दर्शवतात. पण मजा म्हणजे, लकीही ती कामं अगदी मन लावून करत असतो. पोझ्झो त्याला, 'पिग', 'हॉग' म्हणून संबोधतो. एका प्रसंगी तर त्याला लकी म्हटल्यावर तो 'ओ' देत नाही, पण 'पिग' म्हटल्यावर लगेच 'ओ' देतो. पोझ्झोच्या म्हणण्यानुसार, त्याला आता लकी नकोय, कारण तो म्हातारा झालाय, त्यासाठीच तो त्याला विकायला निघालाय. पण लकीला त्याला सोडून जायचं नाहीये, म्हणून तो अधिक जास्त आज्ञाधारकपणा दाखवतोय, जेणेकरून पोझ्झो त्याला विकणार नाही. पोझ्झोचं एकंदर आगाऊ आणि दांभिक वागणं, तो व्लादिमीर आणि एस्त्रागॉनशी वागताना मात्र दाखवत नाही. ते दोघे त्याचे वेळ घालवण्याचे साथी असल्याने तो त्यांना समान वागणूक देतोय, असे तो म्हणत राहतो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची लकीबद्दलची सुरूवातीची अनुकंपा, नंतर लकीच्याच विचित्र वागण्यानं कमी होते. मग लकी आणि पोझ्झो निघून जातात. थोड्या वेळाने गोदोचा संदेश घेऊन एक मुलगा येतो आणि गोदो आज येणार नाही, उद्या नक्की येईल असे सांगून जातो. संध्याकाळ संपते, रात्र सुरू होते. पहिला अंक पडतो.

एव्हढे वाचून मी बाहेर गेलो, पण मला त्याच दिवशी पूर्ण वाचायचं होतं. पण मग परत यायला उशीर झाल्यामुळे मी शनिवारी पुन्हा नाटक उचललं.

तीच जागा, पण ह्यावेळी झाडाला पालवी फुटलेय. पुन्हा व्लादिमीर आणि एस्त्रागॉन उगवतात. पुन्हा ते दोघे दिवसभर काय केलं ह्याच्या चर्चा करतात. पुन्हा गाडी विविध असंबद्ध आणि विसराळूपणाच्या संवांदावरून फिरत, "नथिंग टू बी डन." आणि "वी आर वेटिंग फॉर गोदो." वर येऊन थांबते. आश्चर्य म्हणजे, पुन्हा लकी आणि पोझ्झो येतात. ह्यावेळी, पोझ्झो आंधळा झालाय. लकी अजून म्हातारा झालाय. एस्त्रागॉन त्या दोघांनाही ओळखत नाही, पण व्लादिमीर ओळखतो. ह्यावेळी, रंगमंचावर सगळीच पात्र कोलमडतात आणि मग मदत आणि मानवजात सारख्या गहन विषयांवर अतिशय सामान्य भाषेमध्ये अर्थपूर्ण चर्चा होते. लकी आणि पोझ्झो पुन्हा निघून जातात आणि पुन्हा व्लादिमीर आणि एस्त्रागॉन वाट पाहत राहतात. शेवटाकडे पुन्हा एक मुलगा येतो, ह्यावेळी हा दुसरा मुलगा असतो. तो पुन्हा गोदोचा तोच संदेश देतो, की गोदो आज नाही येणार उद्या येईल आणि निघून जातो.

व्लादिमीर आणि एस्त्रागॉन रात्र पडल्यामुळे, 'आता आपण जाऊया.' म्हणतात आणि पहिल्या अंकाप्रमाणेच जागचे न हलता बसून राहतात.

नाटक फक्त संध्याकाळींंचंच वर्णन करतं. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनच्या संवादांवरून जाणवतं, की ते दोघे रात्र आणि दिवस वेगवेगळे असतात, पण संध्याकाळी मात्र ते वाट बघायला ह्या विवक्षित ठिकाणी येतात. गोदो कोण आहे, हे त्यांच्या संवादांवरून पुसटसंच जाणवतं. प्रत्यक्षात दोघेही गोदोला नीट ओळखत नाहीत. एस्त्रागॉन तर विसरभोळा आहे, पण व्लादिमीरही 'गोदो आपल्याला कसलीतरी प्रार्थना शिकवणार आहे' असं काहीसं सांगतो. एस्त्रागॉन रोज कुणाकडून तरी मार खाऊन येतो.व्लादिमीर रोज त्याला सांगतो, की मी आहे म्हणून तू आहेस, मी नसतो तर तुझं काय झालं असतं. दोघे अनेकदा एकमेकांवर चिडतात, पण मग एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांना सावरतात.

लकी आणि पोझ्झो ही जोडी मालक आणि गुलामाची जोडी आहे. पोझ्झो लकीकडून वाट्टेल ते करवतो. लकीच्या गळ्यात एक दॉरी बांधलेली आहे, जिचं एक टोक पकडून पोझ्झो चालतो(ह्या दोरीचा परिणामकारक वापर स्टेजचं माप घेऊन दृश्य परिणामासाठी सुद्धा केलाय). पोझ्झोच्या हातात एक चाबूक सुद्धा आहे, जो फटकावून तो वेळोवेळी लकीचं लक्ष वेधून घेतो. लकी खूप सारं सामान घेऊन फिरतो. तो दमलाय, तो उभ्याउभ्याच पेंगतो आणि मग पोझ्झोच्या शिव्या खातो. पोझ्झो त्याला गायला, नाचायला तर सांगतोच, पण करमणुकीसाठी 'विचार करायला' पण सांगतो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉन, पोझ्झोची साथ दिल्याच्या मोबदल्यात करमणूक म्हणून लकीला विचार करायला लावतात. लकीचं प्रकट विचार करणं हा नाटकाचा एक हायपॉईंट आहे. तो प्रसंग, लकीचं काम करणार्‍या नटाची परीक्षा पाहणाराच असेल. पोझ्झो जेव्हा दुसर्‍या अंकात येतो तेव्हा तो आपण 'ब्लाईंड ऍज फॉर्च्युन' झाल्याचं सांगतो. ह्यावरून लेखक नशीब आणि धन ह्या दोन्हीवर श्लेष तर साधतोच पण पोझ्झो नक्की कशाचं प्रतिनिधित्व करतोय हे ही सांगतो.

अंकांच्या शेवटी येणारी मुलं हा अजून एक विचित्र भाग आहे. दोन्ही वेळेला मुलं आपल्या दुसर्‍या भावाविषयी बोलतात. दोन्ही वेळेस ही मुलं आपल्या भावाबरोबर गोदोसाठी काम करत असल्याचं सांगतात, पण कधीही ती दोन्ही मुलं भाऊ असल्याचं स्पष्ट होत नाही. व्लादिमीर दोन्ही वेळी चौकशी करतो, पण ती मुलं आपण व्लादिमीरला पहिल्यांदाच भेटत असल्याचं सांगतात.

नाटकाच्या संपूर्ण संवादांमध्ये सांकेतिकता पुरेपूर भरलीय. व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांशी जे काही बोलतात, त्यावरून त्या दोघांची शोकांतिका सामोरी येत राहते. ते दोघे, जीजस बरोबर सुळावर गेलेल्या दोन चोरांबद्दल बोलतात. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या गॉस्पेल्समध्ये असलेल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाबद्दल बोलतात. इथे मला 'राशोमान'ची बीजं जाणवतात. नंतर ते एस्त्रागॉनच्या कवी असण्याबद्दल बोलतात, तेव्हा तो कवी होणं मला परवडणारं नसल्याचं बोलतो. इथे मला 'प्यासा'ची बीजं दिसतात. लकी आणि पोझ्झो कोसळलेले असताना, आणि आंधळा पोझ्झो मदतीची याचना करत असताना व्लादिमीर आणि एस्त्रागॉन जे बोलतात, ते असंच समजावायला एखाद्या तत्ववेत्त्याला पुस्तक लिहावं लागेल, पण नाटकातला तो सहज आणि सुंंदर संवाद ५ मिनिटांत खूप मोठं तत्वज्ञान समजावून जातो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची पात्र ही न उलगडणारी कोडी आहेत. ते नक्की काय आहेत, ह्यावर अनेक दिग्गजांचे मतभेद आहेत. कुणाला ते घट्ट मित्र वाटतात, तर कुणाला समलिंगी जोडपं. पण मला ती पात्र ह्याहीपेक्षा वेगळी वाटतात. मला ती पात्र जगात दोन व्यक्तिंमध्ये असू शकणार्‍या सगळ्या नात्यांचं प्रतिनिधित्व करणारी वाटतात.

लकी आणि पोझ्झो ही दोन पात्रं अनुक्रमे शोषित आणि शोषकाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचे संवाद हे आजही ह्या दोन वर्गांचं प्रतिनिधित्व करतात. शोषित शोषकांचंच लांगुलचालन करत राहतो आणि शोषक शोषत राहतो. पुन्हा, शोषक शोषिताचे विचारही करमणुकीसाठी ऐकतो. इतकी भेदक वक्तव्य नाटकात विनोदी स्थितीमध्ये होतात. ह्या नाटकाची खासियतच अशी आहे, की विनोद हा त्या पात्रांच्या स्थितीमुळे येतो. ती पात्र हसत नाहीयेत, ती आनंदी नाहीयेत. सगळीच पात्र दुःखी आहेत. पण त्यांचं दुःख आपल्यासाठी 'तमाशा' बनलंय.

व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांबरोबर रोज त्याच ठिकाणी येतात आणि रोज, हीच जागा आहे की नाही ह्यावर वाद घालतात. आपण मूळचे ह्या भागातले नसल्याने आपल्याला कल्पना नाही असं सांगत राहतात. जरी नाटकात सलगचे दोन दिवस असल्याचं लिहिलेलं असलं, तरी ते दोन दिवस सलगचे आहेत का? आणि असे किती दिवस आधी आणि किती दिवस नंतर ते वाट पाहणार आहेत? आणि ते दोघे कधी वेगळे तरी होतात का? कारण शेवटीही आपण जाऊया म्हणून ते जागचे हलत नाहीत. असे कित्येक प्रश्न आपल्याला पडत राहतात. त्यांच्या संवादांमधून त्यांच्या वाट पाहण्याचा कालावधीचा एक पुसटसा अंदाजही येतो. लकी आणि पोझ्झोचं त्यांच्या आयुष्याच्या 'रस्त्या'वरचं त्यांना अचानक भेटणं, आणि त्यांचं 'नथिंग' हे काहीतरी असल्यागत 'नथिंग' टू बी डन म्हणणं, ह्यातून लेखकाची जबरदस्त प्रतिभा दिसत राहते.

गोदो हे असं पात्र आहे जे कधी येतंच नाही. पण त्याची चर्चा बरेचदा होते. त्याच्या कामाच्या स्वरूपाबद्दलही बोलणं होतं. त्याचे दोन दूतही येऊन जातात. काही नाट्यसमीक्षकांच्या म्हणण्यानुसार 'गोदो' जो कसलीतरी प्रार्थना शिकवणार असतो, तो म्हणजे देव किंवा प्रेषित आहे आणि ती दोन मुलं, म्हणजे दूत किम्वा एंजल्स सारखे. पण एक नक्की, की गोदो, दिदि आणि गोगो (व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांना असे बोलावतात) ची वाट पाहण्यातून मुक्तता करू शकतो. त्यांना मोक्ष मिळवून देऊ शकतो.

एकंदरित, मोक्षप्राप्तीसाठी किंवा उद्धारासाठी कायम कुणा 'गॉड'(God) किंवा 'गोदो'(Godot) ची वाट पाहत राहणार्‍या मर्त्य मानवाची एक रुपककथा असं हे नाटक आपल्यावर गारूड करून जातं हे नक्की. जेव्हढ्या वेळा हे नाटक वाचावं तेव्हढ्या वेळा नवं काहीतरी मिळत जाईल. आता फक्त एकदा, ह्या नाटकाचा प्रयोग बघायचाय. कुठल्याही भाषेत असला, तरी काय फरक पडणार आहे. व्लादिमीर, एस्त्रागॉन, पोझ्झो आणि लकी तर इथे माझ्या डोक्यात बसलेत.

41 comments:

  1. :( वरून गेल सगळ. लय अवघड दिसतंय नाटक?

    ReplyDelete
  2. बाबा मी अर्धवट वाचून सोडून दिली आहे ही पोस्ट.
    जमल तर पात्रांची ती क्लिष्ट नाव बदलून परत लिही राव
    :( वरून गेल सगळ. लय अवघड दिसतंय नाटक?+१००

    ReplyDelete
  3. सचीन आणि सागर शी खुपशी सहमत...पुन्हा उद्या वाचेन..मग समजेल असे वाटतेय..

    ReplyDelete
  4. फारच सुंदर आणि गहिरे नाटक आहे हे. आणि समजायला पण फारच कठीण. मी हे नाटक इंग्रजी भाषेत बघितले आहे. पुण्यात "सुदर्शन रंगमंच" नावाची एक जागा आहे. तिथे प्रायोगिक नाटके होत असतात. तिथेच बघितले आहे मी हे. वाचले नाहीये पण अजून.

    ReplyDelete
  5. लकी आणि पोझ्झो ही दोन पात्रं अनुक्रमे शोषित आणि शोषकाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचे संवाद हे आजही ह्या दोन वर्गांचं प्रतिनिधित्व करतात. शोषित शोषकांचंच लांगुलचालन करत राहतो आणि शोषक शोषत राहतो. पुन्हा, शोषक शोषिताचे विचारही करमणुकीसाठी ऐकतो. इतकी भेदक वक्तव्य नाटकात विनोदी स्थितीमध्ये होतात. ह्या नाटकाची खासियतच अशी आहे, की विनोद हा त्या पात्रांच्या स्थितीमुळे येतो. ती पात्र हसत नाहीयेत, ती आनंदी नाहीयेत. सगळीच पात्र दुःखी आहेत. पण त्यांचं दुःख आपल्यासाठी 'तमाशा' बनलंय.
    he natkache sar aahe ase mala vatate

    ReplyDelete
  6. सचिन,
    अरे वाटतंय तितकं अवघड नाहीये नाटक..
    एकदा त्या पात्रांशी एकरूप झालो ना.. की सगळं चित्र स्पष्ट व्हायला लागतं!

    ReplyDelete
  7. सागर,
    पोस्ट अर्धवट सोडलीस.. इट्स नॉर्मल.. सॅम्युएल बेकेटच्या आणि माझ्या लिहिण्यात किएस्लोव्स्की आणि कांती शाह एव्हढा फरक आहे! त्यामुळे नाटक जरूर वाच ते सहज कळेल....
    माझी पोस्ट फक्त ओळख करून देण्याच्या हेतूनं लिहिलेली आहे!

    ReplyDelete
  8. माऊताई,
    निवांत वाच अगं पोस्ट..आणि पोस्ट नाही वाचलीस तरी हरकत नाही... नाटक जरूर वाच..ते खूप सहज सुंदर आहे...
    माझी पोस्ट फक्त नाटकाची ओळख करून देण्यासाठी आणि मला काय वाटलं ते सांगण्यासाठी!

    ReplyDelete
  9. अभिजीत,
    सही...तू नाटक पाहिलंयस! बेस्ट!!
    मला कधी संधी मिळेल कुणास ठाऊक..
    आणि तू पाहिलंच आहेस, तर एकदा वाचूनही बघ... मस्त वाटेल!

    ReplyDelete
  10. विक्रम,
    होय...तो नाटकाचा महत्वाचा संदेश आहेच...
    पण त्याहीपलिकडे नाटकाला इतके कंगोरे आहेत, की मी माझ्या कस्पट लेखणीनं त्या सगळ्याला न्याय देऊ शकणार नाही!
    ते स्वतःच अनुभवणं केव्हाही चांगलं!

    ReplyDelete
  11. खूप वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऐकलं होतं या नाटकाबद्दल.. तेव्हाही असंच वेगळं, अनाकलनीय आहे असंच ऐकलं होतं. दुर्दैवाने अजून बघायचा/वाचायचा योग आला नाहीये.. बघू कधी येतो ते..

    >>एकंदरित, मोक्षप्राप्तीसाठी किंवा उद्धारासाठी कायम कुणा 'गॉड'(God) किंवा 'गोदो'(Godot) ची वाट पाहत राहणार्‍या मर्त्य मानवाची एक रुपककथा

    हा या नाटकाचा संदेश असेल तर मला नक्की आवडेल बघायला..

    ReplyDelete
  12. काय रे बाबा.. हे तू कुठल्या पेपरात वाचलास ??? ;) हेहे.. हे पण स्वप्न का रे??

    अरे.. या बद्दल अजिबातच माहिती नसल्याने 'वा..छान', 'आवडले हो', 'उत्तम लिखाण', 'मस्त मस्त' असे काहीही न लिहिता...एकच सांगतो...

    विषय लय 'डीप' हाय... आन तू त्या 'डेप्थ' मध्ये शिरला आहेस हे नक्की. आम्हाला (आधी मला लिहिणार होतो पण वरच्या काही प्रतिक्रिया वाचून ते आम्हाला केले) काही फारसे कळले नसले तरी तुला मात्र ते पुरेपूर 'डेप्थ' मध्ये उमगलेले आहे...:)

    ReplyDelete
  13. Anonymous7:59 PM

    बाबा, नाटक भले चांगले असेल पण सॉरी ही पोस्ट मला तरी नाही आवडली... :(
    तुझ्या नेहमीच्या शैलीत प्रमोट करायच होतस रे पुस्तकाला..सकाळ सकाळ हा डोस नाही उतरला..परत वाचुन बघेन नंतर...

    ReplyDelete
  14. खूप वर्षांपूर्वी पुण्यात या नाटकाचे प्रयोग झाले होते असे वाचल्याचे आठवतेय. बहुधा माधुरी पुरंदरेंनी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे - नक्की माहिती नाही. मीही हे नाटक वाचलेले नाही, आता कदाचित वाचेन.

    ReplyDelete
  15. Anonymous3:43 AM

    बेकेटसाहेबांचं गोदो न कळणार्‍यांसाठी महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वानं त्याचं विडंबन विनोदी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट/अ‍ॅब्सर्ड स्वरूपात करून ठेवलंय.
    अनेकदा वाचून हसून हसून वेडा झालोय. मूळ नाटकाचा गाभा त्यात कितपत आहे हे माहित नाही पण!

    ReplyDelete
  16. Anonymous3:48 AM

    btw माझं हे पोस्ट तर आठवतच असेल तुम्हाला

    http://wp.me/pxHte-4G

    ReplyDelete
  17. १९८४ ते ८६ ह्या काळात कधीतरी पुण्यात पुरुषोत्तमला पाहिल्याचे आठवते.(बहुदा एस.पी.ने सादर केले असावे अस वाटतंय) त्याच्या विशिष्ट आणि विचित्र नावामुळेच फक्त त्यावेळी सुद्धा लक्षात राहिले होते.त्या वेळी सुद्धा काही कळले नव्हतेच आणि नंतर बघायचे धाडस झाले नाही.पण ह्या नाटकाच्या(एकाकांकिका)वेळचा एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.स्पर्धेतला प्रयोग संपला.सगळ्यांनी,म्हणजेच खास करून त्या कॉलेजवाल्यानी नेहमी प्रमाणे टाळ्यांचा गजर केला,पुढच्या प्रयोगास अर्थातच थोडा वेळ असल्याने,पण खरे सांगायचे तर डोके पिकल्या मुळे घाईघाईने त्या कॉलेजवाल्यान बरोबरच "भरतच्या" बाहेर अगदी घाई घाईने आलो.ती मुले तर बहुदा जाम खुश असावी.त्यांची माझी ओळख पाळख नसताना देखील त्या खुशीतच त्यातील एकाने मला "अंगावर आल का? का हा प्रश्न विचरला.त्या वेळी सुद्धा माझे नाटका विषयीचे ज्ञान अगाधच होते.मला वाटले "अंगावर येणे"म्हणजे बहुधा वाईट असावे त्या मुळेच मी अतिशय कोऱ्या नि निरागस चेहऱ्याने त्याला नाही-नाही चांगल होत असे म्हणालो.माझ्या उत्तरानंतर मात्र त्याचा चेहरा पाहण्या सारखा झाला.अर्थातच ज्याने मला तेथे नेले होते त्याने त्या नंतर मला तेथून बाहेर काढले हे तुला सांगायला नकोच.चल आता थांबतो नाही तर तू मला येथून बाहेर काढशील.

    ReplyDelete
  18. "प्रामाणिक कबूलनामा"
    आत्ता सुद्धा नुसते "गोदुबाईंचे" नाव वाचूनच लेख वाचायचे मात्र हुशारीने टाळलेच आहे.प्लीज रागावू नकोस.खरेतर "रागावू नकोस"असे सांगून,खरे तर रागाची आठवण करून द्यायला नि तुला राग यायला मी प्रवृत्तच करीत आहे ह्याची मला जाणीव आहे पण ह्या वेळी मात्र मला मोठ्या मानाने माफ कर.पुणेरी चहाटाळपणा साला काही ह्या वयात सुद्धा जात नाही एवढे मात्र खरे.

    ReplyDelete
  19. हेरंब +१...
    खरच जर तू म्हणतोयेस तसा काही संदेश असेल तर बघायला नक्कीच आवडेल हे नाटक...
    एक मात्र राहून राहून जाणवतेय विद्याधर तुझ्याकडे खूप प्रतिभा आहे वगैरे मी नेहेमी म्हणत असतेच तरिही त्याबरोबरच एक सुक्ष्म शक्ती असते ज्याद्वारे असे काही सो कॉल्ड ऍबसर्ड समजते/आकलन होते... ती तुझ्याकडे आहे असे हल्ली वारंवार जाणवतेय... तेव्हा तुझी जबाबदारी वाढतेय....

    हे जे जे असे काही आहे जे आमच्या डोक्यावरून जातेय ते सहजसोपे करून सांगणे हे आता तुझ्याकडे लागलं .. कसे? :)

    ReplyDelete
  20. हेरंबा,
    नाटक ह्याच गोष्टीवर रूपक बनून लिहिलंय...
    नक्की वाच/बघ कधी संधी मिळाली तर...
    मी फकस्त इन्ट्रो दिलाय... कदाचित त्यामुळे स्टार्ट लवकर मिळेल .. :D

    ReplyDelete
  21. रोहना,
    अरे मराठी पेपरात वाचलं होतं पहिल्यांदा... :P
    हो रे, विषय डीप आहे...
    कळायला पहिल्यांदा जड जातो. पण एकदा सूत्र सापडलं, की त्या विक्षिप्त संवादांमध्ये सुद्धा मजा यायला लागते.
    वाचून बघ कधी जमलं तर!

    ReplyDelete
  22. देवेन,
    अरे नाटकाचा पिंड वेगळाच आहे रे... त्यामुळे मी दुसरं कुठल्याच पद्धतीनं लिहूच शकलो नाही.. मला डॉक्युमेंट्री फॉर्ममध्येच लिहावं लागलं...
    माझं पोस्ट सोडून दे... नाटक सहज मिळतं नेटवर.. ते वाच!

    ReplyDelete
  23. सविताताई,
    होय.. झालेच असतील प्रयोग...मध्यंतरी ते पुनरूज्जीवित केलं होतं...आता प्रयोग चालताहेत की नाही ठाऊक नाही!
    अनुवादाबद्दल मलाही कल्पना नाही!
    बाकी जमलं तर वाचून बघा नक्की!

    ReplyDelete
  24. काय सांगतो आल्हाद!
    मला ठाऊक नव्हतं हे.. कुठे मिळेल हे विडंबन..
    पीडीएफ असेल तर सांग की...
    आणि भाई, तुझं ते पोस्ट मला चांगलंच आठवतंय.. मी जेव्हा वाचलं होतं, तेव्हाच मला नामसाधर्म्य लक्षात आलं होतं..पण तोवर मी नाटक वाचलं नव्हतं... ;)
    बाकी.. मला तुम्हाला वगैरे म्हणू नकोस रे... 'तू' बेस्ट!

    ReplyDelete
  25. mynac,
    दादा...
    सर्वप्रथम, तुझा फोटो, ८४ ते ८६ हा काळ, आणि 'ह्या वयात' ह्या शब्दांमध्ये खूप कन्फ्युजन होतंय...
    त्यामुळे मी जे आगाऊपणे 'तू' म्हणतो..त्यावर मला डाऊट यायला लागलाय! असो.. आजच्या प्रतिक्रियेपुरता मी 'तू'च म्हणून घेतो.. :P
    किस्सा लय भारी आहे... 'अंगावर आलं का?' हा प्रश्न एकदम टिपीकल नाटकवाल्यांचा आहे! उत्तर भारीच होतं...;)
    बाकी.. लेख नाही वाचलास ते एका अर्थी बरं केलंस..नाटक सुखानं वाचू शकशील.. ;)

    ReplyDelete
  26. तन्वीताई,
    अगं संदेश असा डायरेक्ट नाहीये... बस अशा स्थितीत अडकलेल्या माणसांची गोष्ट आहे...
    आणि ताई,
    असल्या चित्र विचित्र गोष्टी पाहायचा नाद लागलाय.. त्यामुळे नसलेले सिम्बॉलिझम सुद्धा ओरबाडून काढतो हल्ली! :D
    बाकी, प्रयत्न नेहमीच करतो, अशा गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा..
    हळूहळू तीही कला अवगत होईल! :)

    ReplyDelete
  27. विद्या, अरे बाबा प्रायोगिक वाल्यांनी हे नाटक एकदा रंगमंचावर आणले होते. मी लहानच होते म्हणा तेव्हां आणि असेही आजही जरा डोक्यावरूनच जाईल हे नक्की. जर याचा सिनेमा कोणी काढला नं तर मात्र जास्त आकलनाला वाव आहे.

    पुस्तक मी वाचायला घेतलं होतं पण तेव्हां मी मायदेशात होते. आता सरावाने ही इथली नावे अंगवळणी पडलीत पण तेव्हां तर यामुळेच अर्धा इंटरेस्ट संपला आणि एकंदरीतच विषय फार गुंतागुंतीचा, समाज रचनेचा, त्यातील सुक्ष्म बारकावे, कंगोरे उलगडून दाखवणारा व विषण्ण करणाराच आहे. :(

    तुझी पोस्ट मी अगदी नेट लावून वाचली मग पुन्हा एकदा वाचली. खरेच सांगते विद्या, इतका रस घेऊन तू अशा क्लिष्ट रचनेविषयी लिहील्याने मला पुन्हा एकदा ते पुस्तक पूर्ण वाचायचा जबरा मोह होतोय. :)

    जियो! तन्वीशी सहमत. कुछ खास बात हैं जरुर...!!

    ReplyDelete
  28. प्रिय विद्या,
    तू दादा म्हणून सगळा चार्म घालवलास.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी फिफ्टी प्लस आहे ह्याची मला आठवण करून दिलीस.असो.जे होत ते चांगल्या साठीच.राहता राहिली गोष्ट "माझ्या" फोटोची.अरे मी तसा अजून या तुमच्या इंटरनेट क्षेत्रात बालच आहे.हव तर बच्चा म्हण.त्या मुळे मी हे जेव्हा पूर्वी पासून(इथे पूर्वी म्हणजे २-३ वर्ष अस वाचावं)नेट वर 'जायला''बसायला'लागलो तेव्हा मला ह्यातील काहीच माहित नव्हते नि कळत नव्हते त्या मुळे अशाच एकाने हे(म्हणजे प्रोफाईल)तयार करून दिले.ते तसच ठेवलयन काय,मुळात मी stock मार्केटचा जुना खेळाडू.त्यातील चढ उताराप्रमाणेच स्वभाव हि खेळकर बनत जातो.कारण आपण जे स्वतःला हुशार वगैरे काही समजत असतो त्याची वास्तवता आपल्याला तिथे कळते.नि पराभव पचवायची नि विजय रिचवायची ताकद मिळते.क्षेत्र चांगल कि वाईट,निवडाव कि नाही हा चर्चेचा,वादाचा विषय नक्कीच आहे ह्यात शंका नाही.
    त्या मुळे मी तुला ह्या वयात अस म्हणालो नि तसं सुद्धा आता जाळ फेकण्याचे काय नि त्यात अडकण्याचे काय दिवस राहिले नाहीत. त्या मुळे नेटान "ह्या" नेट मध्ये नेटपूर्वक अडकायची मजा काही औरच आहे.
    ता.क.
    जालवाणीला कान दिला.कांचन ताई,अपर्णा ताई नि तुझे पुणे फारच मस्त.चल येतो.

    ReplyDelete
  29. मला बहुतेक कळलं नाटकाचं स्वरूप... बहुतेक... विभी, जरा हलकं फ़ुलकं लिहित जा रे बाबा.

    ReplyDelete
  30. Anonymous1:56 AM

    मस्त बाउन्सर आहे! परंतु काहीतरी खूप विलक्षण, उच्च पातळीचा नाटक आहे एवढा लक्षात आला हेच पुष्कळ झालं माझ्यासाठी :)
    जहीर

    ReplyDelete
  31. श्रीताई,
    अगं खूपच गहन नाटक आहे. मला कधीकधी प्रश्न पडतो, की एव्हढं सिम्बॉलिक लोक लिहूच कसं शकतात. चाळीस पानांमध्ये किती अर्थ आणि किती वेगवेगळ्या प्रकारचा.
    प्रायोगिकवाल्यांचं हे नाटक फेव्हरेट असणार ह्यात वादच नाही!
    हो सिनेमा काढला तर एखादेवेळेस समजायला जास्त वाव असेल..पण खूप डोकं लावूनच बनवावा लागेल.. :)
    आणि ताई...हे असले जिगसॉ घेऊन बसलं की सप्ताहांत चटचट जातो असा माझा अनुभव आहे.. त्यामुळे एव्हढा रस घेतो मी! :P
    तू नक्की वाच वेळ मिळेल तेव्हा!

    ReplyDelete
  32. mynac,
    हाहाहा..चार्म घालवला.. काय करणार.. कन्फ्युज झालो होतो..
    असो.. मांडवली.. मी अरेतुरे + दादा म्हणतो..
    शेवटी एकदाचं कोडं उलगडलं तर...
    स्टॉक मार्केट हे खूप आकर्षक क्षेत्र आहे खरं.. पण खरंच मला त्यातलं ओ की ठो कळत नाही! दुरून डोंगर साजरे! ;)
    आणि जालवाणीचं श्रवण केलंस, अभिप्रायाबद्दल लय लय आभार!

    ReplyDelete
  33. अभिलाष,
    अरे एग्झॉस्ट व्हायला होतं..एकदा नाटक वाचल्यावर आणि लिहिताना ते पुन्हा मनोमन अनुभवल्यावर!
    तुला थोडंफार तरी कळलं मी लिहिलेलं.. बरं वाटलं..
    बाकी, हलकं फुलकं काय, येतंच राहिल.. ;)

    ReplyDelete
  34. जहीर,
    ब्लॉगवर स्वागत!
    नाटक विलक्षण आहे हे खरंच...कधी जमलं तर जरूर बघा/वाचा!
    प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
    असेच भेट देत राहा!

    ReplyDelete
  35. तू दिलेली लाच स्विकारली नव्हती चटकन, पण आता पश्चाताप होतोय.. :)
    ही नाटकाची अ‍ॅबस्ट्रॅक्ट पोस्ट चांगली झाली आहे.
    लिहीत रहा..

    ReplyDelete
  36. Sundar post, naatak tar vaachanyasaarkha aselach pan te tu tuzya lekhanadware vaachaayala pravrutta karatoyas hi ajun ek goshta!

    ReplyDelete
  37. मीनल,
    म्हणूनच मी नेहमी योग्य ती लाच योग्य ठिकाणी देण्यात बिलिव्ह करतो ;)
    उपयोग कर आता त्या लाचेचा(कसला शब्द आहे)! :)

    ReplyDelete
  38. ओंकार,
    भाई खूप खूप धन्यवाद रे!
    वाच जमेल तेव्हा..छोटंसंच आहे!

    ReplyDelete
  39. sounds interesting!! :)

    ReplyDelete
  40. सौरभ!
    वाच कधीतरी! ;)

    ReplyDelete