9/30/2010

एकसो छब्बीस

रात्रीचा प्रहर होता. मुसळधार पावसातून तो धावत होता. पायात कसल्याशा वहाणा होत्या. काही चावेल, काही रुतेल, असली कसलीही पर्वा न करता तो फक्त जीवाच्या आकांतानं धावत होता. धावता धावता अचानक त्याला जवळपास वस्ती असल्याच्या खुणा जाणवू लागल्या. रानात पायवाटा झाल्याचं जाणवत होतं. अंधारात काही दिसत नसलं, तरी मोकळा झालेला रस्ता, त्याच्या सराईत वावराला जाणवून गेला. तो पायवाटेला धरून धावू लागला. पहाट फुटायच्या आत त्याला नेपाळ बॉर्डर पार करायची होती. पुढचं पुढे. पण रस्त्यात ह्या वस्तीत काही खायची सोय झाली तर, म्हणून तो तिथे निघाला होता.
बघता बघता वस्ती आली. पण झाडी कमी होण्याशिवाय आणि छोट्या घरांखेरीज वस्तीच्या कुठल्याच खुणा दिसत नव्हत्या. वीज तर सोडूनच द्या, पण तेलाचे दिवेही दिसत नव्हते. किर्र अंधार होता. आणि जरी गाव झोपलेलं असलं, तरी जिवंतपणाची जाणीव ही होतेच. तीच मुळात होत नव्हती.

'चकमकीच्या भीतीनं लोक आधीच पळालेत बहुधा!' तो मनाशीच म्हणाला. आणि थेट वस्तीत शिरला. एखादं उघडं आणि बर्‍यापैकी घर शोधत. तरच त्याला काही अन्न मिळण्याची शक्यता होती. तो एक एक घर बघत पुढे सरकत होता. सगळ्या घरांना कुलुपं लागलेली होती. अचानक एका घराकडे त्याचं लक्ष गेलं, ज्या घराची खिडकी उघडी होती. त्यानं जवळ जाऊन, आत एखादं जनावर नाही ना, ह्याचा अंदाज़ घेतला आणि सराईतपणे आत उडी टाकली. पण आत शिरताच त्याला एक विचित्र जाणीव झाली. काहीतरी एकदम वेगळंच त्याला जाणवलं. काय ते त्यालाही कळलं नाही. पण त्याची भूक त्याच्या सहाव्या इंद्रियावर भारी पडली आणि तो प्रकाश करण्यासाठी काहीतरी चाचपडू लागला. योगायोगानं जवळच्याच टेबलावर त्याच्या हाताला काडेपेटी लागली. त्यानं काडी पेटवली आणि पेटलेल्या काडीचा मिणमिणता प्रकाश खोलीभर पडला. त्याचं लक्ष एकदम समोर गेलं आणि घराचा दरवाज्याला आतून कडी असल्याचं त्याला दिसलं. क्षणभर त्याच्या मणक्यातून भीतीची एक थंड शिरशिरी गेली. त्यानं संरक्षणासाठी एखाद्या वस्तूचा शोध घ्यायला नजर फिरवली आणि ...त्याच्या हातून जळती काडीच खाली पडली. किर्र अंधारात त्याच्यासारख्या सराईत माणसालादेखील धडकी भरली होती. आपण पाहिलं ते खरंच होतं का? इथे जवळपास अजून काही असेल का? आपल्याला त्यानं पाहिलं तर नसेल?
आपल्या दिशेनं काही येतंय का? ह्याचा तो शांत राहून अंदाज़ घेऊ लागला. सोबतच आवाज न करता तो आजूबाजूला चाचपडून हाताला काही लागतंय का हे बघत होता. जवळपास दहा मिनिटं अशीच गेली असतील. काहीच घडत नव्हतं. त्याचा संयम हळूहळू तुटू लागला. त्याची पुढे जायची ओढ अनावर होत होती, ज्यामुळे त्याची भीड चेपली जात होती. एव्हाना त्याच्या हाताला एक छत्री लागली होती. तो हळूच आवाज न करता उठून उभा राहिला. मगाशी जे दिसलं होतं, त्या दिशेला तोंड करून उभा राहिला. टेबलावर त्यानं पटकन हातात घेता येईल अशा अंदाज़ानं छत्री ठेवली. काडेपेटी हातात घेतली आणि चर्र्कन आवाज होऊन काडी पेटल्याबरोबर क्षणार्धात पेटी खिशात टाकून त्यानं छत्री उचलली आणि समोर पाहिलं. समोर काहीच हालचाल नव्हती.
समोरच्या खाटेवरची ती मानवी आकृती मगाचसारखीच निपचित पडलेली होती. त्यानं धीर करून खोलीच्या चहूबाजूला नजर फिरवली. कुठेही काही हालचाल नव्हती. शेजारीच स्वयंपाकघर दिसत होतं आणि तिथेदेखील काहीच हालचाल नव्हती. आत्ताची काडी विझत आली होती, त्यानं छत्री खाली ठेवली. करंगळी आणि बाजूच्या बोटामध्ये काडी धरली आणि काडेपेटी काढून अंगठा आणि तर्जनीनं दुसरी काडी पेटवली. पहिली काडी फेकून, छत्री उचलून हळूवार धीरानं चालत तो खाटेच्या दिशेनं निघाला. बाहेर पावसाचा जोर किंचितसा कमी झाला होता. जसा तो जवळ पोचला, मंद श्वासोच्छवासाचा आवाज त्याला जाणवू लागला. खाटेजवळ तो खाली बसला आणि छत्री ठेवून काडी त्या आकृतीच्या चेहर्‍याजवळ नेणार एव्हढ्यात त्याच्या बोटांना चटका बसून काडी पडून विझली. पुन्हा किर्र अंधार झाला. अचानक काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवलं आणि नकळतच त्याचा हात पुन्हा छत्रीकडे गेला. पण तेव्हढ्यात त्याला अगदी हळू आवाजात कण्हण्याचा आवाज आला. त्यानं पुढची काडी पेटवली आणि चेहर्‍याजवळ नेली. एक साठीची खंगलेली म्हातारी कण्हत होती. त्याला थोडं हायसं वाटलं, पण तिचा उष्ण श्वास त्याच्या हातावर पडला आणि तिला भरलेल्या तापाची त्याला जाणीव झाली. त्यानं तिच्या कपाळाला हात लावला आणि त्याची खात्री पटली. तिच्याकडून काही धोका नाही हे त्याच्या लक्षात आलं.
तो चटकन उठला आणि पुढची काडी पेटवून स्वयंपाकघरात पोचला. अशा भागामध्ये कंदिल लावून लक्ष वेधून घेऊ नये हे त्याला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळेच तो समोर पडलेला कंदिल सोडून मेणबत्त्या शोधत होता. त्याला लगेच त्या मिळाल्यादेखील. चटकन एक मेणबत्ती त्यानं लावली आणि आता त्याच्या जीवात जीव आला.
स्वयंपाकघरात बरंच खाण्याचं सामान होतं. 'सगळा गाव पळाला' आणि ही काहीच उत्तर देत नसल्यानं ही गचकल्याचं समजून लोक असेच निघून गेले असतील.' तो मनाशी विचार करतच पातेल्यात तांदूळ घालून चुलीवर चढवत होता. आणि हळूच चुलीची ऊब घेत होता. घालायला कोरडे कपडे मिळाले तर हा युनिफॉर्म फेकता येईल असा विचार करत तो दुसरी मेणबत्ती पेटवून घेऊन बाहेर आला. इथे तिथे नजर फिरवत असतानाच त्याच्या कानांवर क्षीण आवाजातले शब्द पडले, "बेटा!"
अचानकच त्याची गात्रं गोठली. हा शब्द त्यानं आज कित्येक दिवसांनी ऐकला होता. त्यानं म्हातारीकडे बघितलं आणि तिच्याजवळ गेला. तिचे डोळे अजून मिटलेलेच होते. ती तापातच बरळत होती बहुतेक. "बेटा!" ती पुन्हा म्हणाली. त्याला आत्ता अचानकच १० वर्षांपूर्वीचा त्याच्या आईचा अंतिम संस्कार आठवला. तिथे तो पोलिसांसोबतच गेला होता. त्याला स्पेशल परवानगी (पॅरोल) मिळाली होती आईच्या अंत्यसंस्कारासाठी. आईचा तिर्डीवर ठेवलेला निश्चेष्ट वाळलेला देह त्याच्या डोळ्यासमोर तरळला. नक्षलवादी कॅम्पात भरती व्हायला जेव्हा तो निघाला होता, तेव्हा आपल्या मोडक्या घराच्या दरवाजात उभी राहून त्याला जिवाच्या आकांतानं "बेटा!" म्हणून हाका मारून थांबवायचा प्रयत्न करणारी आई त्याला आज का आठवली हेच त्याला कळेना! तेच तिचं झालेलं शेवटचं जिवंत दर्शन होतं. त्यानंतर गरीबीनं आणि पोलिसांच्या अत्याचारांनी पिचून तिनं दोन वर्षांत प्राण सोडला. तेव्हा तिचं जगात जर कुणी होतं, तर बाप पोलिस-नक्षली चकमकीत मेल्यानंतर तोच होता. आणि तोच तिच्या अंतिम क्षणी तिच्यासोबत नव्हता. त्यानंतर जेव्हा तो तिर्डीवर पडलेला निश्चेष्ट देह त्यानं पाहिला होता, तेव्हा तो लहान मुलासारखा हमसून हमसून शेवटचाच रडला होता. मग आज आत्ता ते सगळं त्याला का आठवत होतं?
त्या म्हातारीनं हलकेच डोळे उघडले.
"बेटा!"
तो दचकून भानावर आला.
"कौन हो बेटा?" ती खरंतर दचकायला हवी होती, पण तिची स्थिती वेगळीच होती.
".." त्याला काही सुचतच नव्हतं.
"कौन हो बेटा?" तिनं पुन्हा विचारलं.
"एकसो छब्बीस!" त्याच्या तोंडून त्याचा कैदी नंबर निघाला.
"क्या?" तिला त्या अवस्थेतही आश्चर्य वाटलं.
त्यालाही आपल्या उत्तराचं आश्चर्य वाटलं.
"तुम्हारा नाम क्या है?"
क्षणभर तो विचारात पडला. आपलं नाव? "हां भैरू!" त्याला हेच आश्चर्य वाटत होतं की तो आपलं नाव चक्क विसरला होता. जेलमध्ये तो फक्त "एकसो छब्बीस" होता. गेली १२ वर्षं तो फक्त एव्हढंच होता. हीच त्याची सर्वत्र ओळख होती. एका कालावधीनंतर त्यानंही आपलं नाव सांगणं सोडलं होतं, कारण विचारणारे लोकच कुठे होते. जेलमध्ये असलेल्या नक्षलवाद्याला कोण त्याचं नाव विचारायला येणार? आज त्याला कित्येक वर्षांनी कुणीतरी नाव विचारलं होतं आणि एकदम कोपर्‍यात अडगळीत पडलेली एखादी फाईल शोधावी तद्वत त्यानं आपलं नाव मेंदूच्या कोपर्‍यातून शोधून काढलं.
"भेरू? यहां के नहीं लगते!"
"भै.." तो तिला योग्य उच्चार समजावता समजावता थांबला. तिनं बरोबर ओळखलं होतं. तो तिथला नव्हता. महाराष्ट्रात भर्ती झालेला आणि छत्तीसगढ मध्ये लढायला आलेला नक्षली होता. १२ वर्षांपूर्वीच तो पकडला जाऊन जेलमध्ये सडत होता. ह्या जेलमधून त्या जेलमध्ये त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव हलवलं जात असताना, त्यांच्या ताफ्यावर त्यांना सोडवण्यासाठी नक्षली हल्ला झाला आणि क्रॉसफायरमध्ये तो पळाला होता. एका नक्षल्यानं त्याला नेपाळमधल्या माणसाचा संदर्भ दिला होता आणि मार्ग सांगितला होता. त्याच दिशेनं तो निघाला होता.
अचानक त्याच्या लक्षात आलं की त्याला पहाटेच्या आत पुढे पोचायचंय. तो लगेच भाताकडे बघायला उठला आणि एकदम म्हातारीनं आपल्या क्षीण हातानं त्याला स्पर्श केला. तो अचानक अपराधी जाणीव होऊन खाली बसला. मेणबत्ती तिच्या डोक्याशेजारी ठेवून तिला निरखून पाहू लागला. तिच्या डोळ्यातले करूण भाव पाहून त्याला आतल्या आत काहीतरी होऊ लागलं. तो चटकन उठून स्वयंपाकघरात गेला. भात छान शिजला होता. त्यानं भाताची पेज एका भांड्यात काढली आणि बाहेर येऊन म्हातारीला चमच्यानं पाजू लागला. त्याला एकदमच अपार समाधान वाटू लागलं. असं वाटू लागलं की ही धावपळ इथेच थांबावी. म्हातारीच्या डोळ्यांत आलेली थोडीशी चमक आणि कृतज्ञ भाव पाहून त्याला थोडंसं आंतरिक स्वास्थ्य लाभल्यासारखं वाटलं. त्याला कळत नव्हतं असं का वाटतंय. पण कदाचित आईसाठीची कर्तव्य पूर्ण न करू शकल्याचा एक अज्ञात सल जो त्याच्या मनात होता तो कमी होत होता. पेज खाऊन झाल्यावर त्यानं म्हातारीला पेलाभर पाणी पाजलं आणि चादर नीट करून तिला परत निजवलं. तिनं मायेनं त्याचा हात थोपटला.
"भेरू! बेटा!" ती हळूच म्हणाली. त्यानं फक्त एक स्मित केलं.
तिला झोप लागेस्तोवर तो तिथेच बसून राहिला. त्याला भूक राहिली नव्हती. तो एकटक मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात दिसणार्‍या म्हातारीच्या तृप्त चेहर्‍याकडे पाहत होता.
-------------------------

पाऊस पूर्ण थांबला होता. लख्ख प्रकाश पडला होता. पोलिसांच्या गाड्या गावात घुसल्याचे आवाज येऊ लागले होते. एकदमच खिडकीतून आत उडी टाकून एक हवालदार आला आणि खाटेशेजारी बसलेल्या त्याच्यावर बंदूक ताणून उभा राहिला.
"साहब!" तो जोरात बाहेरच्या दिशेस आवाज देत ओरडला.
त्याच्या मागोमाग दोघे तिघे आत आले आणि मग त्यांनी दरवाजा उघडल्यावर अजून तिघे-चौघे!
तो तसाच आपल्या कैद्याच्या पोशाखात एकटक म्हातारीकडे पाहत होता. म्हातारीच्या तृप्त चेहर्‍यावर एक छोटंसं स्मित होतं. मेणबत्ती केव्हाच विझून गेली होती. त्याच्या डोळ्यांखाली दोन सुकलेले ओघळ होते.
"कैदी नंबर एकसो छब्बीस!" त्यांच्यातला इन्स्पेक्टर म्हणाला. "अच्छा हुआ, शांतीसे पकडे गये, वरना एनकाऊंटर के ऑर्डर्स थे! चलो उठो!"
तो अजूनी तंद्री लागल्यागत बसला होता.
"एकसो छब्बीस!" इन्स्पेक्टर जोरात म्हणाला.
त्याची तंद्री मोडली. त्यानं इन्स्पेक्टरकडे पाहिलं आणि त्याच्या तोंडून शब्द फुटले, "भेरू!"
"क्या?" इन्स्पेक्टर चक्रावला.
"कुछ नहीं!" म्हणत तो उठला.
शेजारीच पेजेचं रिकामं भांडं आणि पाण्याचा रिकामा पेला पडला होता.
इन्स्पेक्टर वायरलेसवर मेसेज देत होता, "कल भागे हुएमेंसे अकेला ज़िंदा कैदी - एकसो छब्बीस पकड़ा गया है। ओव्हर।" आणि हवालदारांच्या गराड्यात बसलेला तो आपली एका रात्रीपुरती बदललेली ओळख पुन्हा पुसून टाकायचा प्रयत्न करत होता.

(समाप्त)

41 comments:

 1. वा.. अशा क्षणभर का होईना गवसलेल्या जुन्या ओळखीने आयुष्यच बदलत असेल नाही?

  ReplyDelete
 2. suMdar !!!agadi dolyaasamor aanales..

  ReplyDelete
 3. क्या बात है! मस्तच. खूप छान. कसं सुचतं रे तुला असलं काही? तुझा आणि त्या हेरंबचा ब्लॉग (म्हणजे दोघांच्याही ब्लॉग्जवरील एकूण एक पोस्ट्स) वाचून मलाही ब्लॉग लिहावसं वाटायला लागलेलं आहे. पण हेही जाणवतं की तुमच्या तुलनेत मी अगदीच रांगतं बाळ आहे. एवढ्या विविध विषयांवर लिहायला म्याटर सुचणं जवळजवळ अशक्यच दिसतंय मला. :-)

  ReplyDelete
 4. मित्रा कर्कोटका (हे शब्द पुलंकडून साभार),

  जरा आपल्या वाचकांची थोडी सोय कर की. म्हणजे नूतनलेखागमनानंतर वाचकांच्या विद्युत्पत्रिकामंजुषेत एक नवविज्ञापनपत्र प्रविष्ट होईल अशी संविधा केलीस तर प्रत्यही लेखसंग्रहावर अभ्यागम करण्याच्या वाचकांच्या कष्टांचं हरण होईल, नाही का?

  ReplyDelete
 5. एकदम हटके ...

  ReplyDelete
 6. Anonymous9:25 PM

  'आपली एका रात्रीपुरती बदललेली ओळख पुन्हा पुसून टाकायचा प्रयत्न करत होता.'

  खुप भारी बाबा...लगे रहो....

  ReplyDelete
 7. विद्याधर, बारा वर्षात स्वतःची ओळख विसरून गेलेल्या कैद्याला एक वृद्धेने हरवलेली ओळख पुन्हा मिळवून देणे...त्याचप्रमाणे तिच्यामुळे एन्काउन्टरला बळी न पड़ता पुढील आयुष्य जगण्याची संधि मिळणे...नक्षलवादी असल्याकारणाने हातून सतत हिंसाच घडली असण्याची शक्यता...आणि तरीही खोल मनात रुजलेली माणुसकी जागृत होऊन हातून एक सत्कृत्य घडून येणे...आणि उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावे लागणार असण्याचे कटू सत्य... ह्या पूर्ण कथेत सुख आणि दुःख ह्यांची उत्तम सांगड़ घातली गेली आहे. सुखांतिकेची झाक असलेली शोकांतिका म्हणता येईल...नाही का?

  ReplyDelete
 8. आणि मला का माहित नाही पण ते सुरुवातीचे वर्णन वाचून 'The Pianist' हा अतिशय सुरेख असा हॉलीवूडचा चित्रपट आठवला. :)

  ReplyDelete
 9. क्षणभर मिळालेली जुनी ओळख.....बस्स एवढीच एक गोष्ट... एका नजरेने पाहिल तर खुप क्षुल्लक पण दुसर्‍या बाजुने एखाद्या व्यक्तीला संपुर्णतः बदलवुन टाकणारी अन अपार सुख देणारी....किती विचित्र आहे ना हे आयुष्य अन त्याचे हे कंगोरे.

  ReplyDelete
 10. चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. :)

  ReplyDelete
 11. सुंदर. अप्रतिम वातावरणनिर्मिती!

  ReplyDelete
 12. Anonymous3:57 AM

  मस्तच रे भाई...

  ReplyDelete
 13. हेरंबा,
  हो ना रे!
  आपणही कुणासाठी काहीतरी आहोत, ही जाणीवदेखील आयुष्य बदलून टाकत असेल!

  ReplyDelete
 14. माऊताई!
  :)))

  ReplyDelete
 15. आनंदा,
  :):)

  ReplyDelete
 16. संकेत,
  माझं ठीक आहे, मी दिवसभर ऑफिसात (कामे सोडून) चित्रविचित्र गोष्टी वाचतो आणि त्यामुळे घरी रिकामपणी कायकाय सुचतं, पण हेरंब घरगृहस्थीवाला असून .. त्यामुळे त्याचं मला खरं कौतुक वाटतं.
  बाकी..तुला काही सुचणं आणि ब्लॉग लिहिणं फारसं अवघड नाही. माझ्याप्रमाणेच अनेकानेक चित्रविचित्र गोष्टी वाचण्यास सुरूवात कर आणि घरी रिकामपणी बसलास की जे सुचतं ते लिहायचा प्रयत्न कर!(रिकामपणी बसणं मस्ट आहे) ;)
  आणि हो..तू जे लिहिलंस त्याचा शुद्ध भाषेत मी 'इमेल सब्स्क्रिप्शन्स' असा अर्थ घेतला आणि तो एक डबा जोडलाय... :D
  धन्यवाद रे!

  ReplyDelete
 17. अपर्णा,
  खूप आभार!

  ReplyDelete
 18. देवेन,
  अरे सहजच काल आपली ओळख, वजूद असले विचार डोक्यात घोळत होते. तोच कीडा मोठा झाला..
  :D
  खूप आभार रे!

  ReplyDelete
 19. अनघा,
  >>सुखांतिकेची झाक असलेली शोकांतिका म्हणता येईल
  होय कदाचित...माझ्या मनात लिहितानाच खूप गोंधळ होता. मला सहसा क्लिअरकट दुःखांत आवडत नाहीत.. म्हणून असेल कदाचित, की मी खरोखर दुःखांतच दाखवायचा असं ठरवून सुरूवात करूनही ह्या शोकांतिकेत एक सोनेरी किनार दिसतेच! :)
  आणि.. मी "द पियानिस्ट" पाहिला नाहीये अजून..खूप जणांनी सांगितलंय पहा म्हणून., :(
  कुणास ठाऊक कधी योग येतो!

  ReplyDelete
 20. योगेश,
  >>किती विचित्र आहे ना हे आयुष्य अन त्याचे हे कंगोरे
  हो ना रे भाऊ... आपल्या अस्तित्वाला थोडासादेखील अर्थ असणं ही भावना जगण्याचं कारण बनू शकते आणि आपण कुणालाच नकोय ही भावना जीवनेच्छाच मारून टाकू शकते!

  ReplyDelete
 21. विक्रम,
  खूप धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 22. महेंद्रकाका,
  :)
  फार सिनेमे पाहिल्याचा परिणाम कदाचित!

  ReplyDelete
 23. कांचनताई,
  वरचंच उत्तर :D
  अतिसिनेमा! आणि अति(काहीबाही)वाचन!

  ReplyDelete
 24. सचिन,
  धन्यवाद रे भौ! :)

  ReplyDelete
 25. सुहास,
  मंडळ आभारी :D

  ReplyDelete
 26. :)एकदम धूप-छाँव कथा! छान.

  ReplyDelete
 27. वाह बाबा... कमाल...

  ReplyDelete
 28. चांगली जमून आली आहे पोस्ट...

  ReplyDelete
 29. सौरभ,
  खूप धन्यवाद भावा! :)
  (बाय द वे - आज तुझा सण असेल ना... शुभेच्छा! रजनीदेवाच्या एखाद्या लीलेला माझ्यातर्फे पण नाणं उडव)

  ReplyDelete
 30. सागर,
  खूप खूप आभार रे!

  ReplyDelete
 31. अरे मग काय... सगळ्या छोट्यामोठ्या रोबोटीक मशिन्सची पुजा केली जाणार आहे. यंत्र आणि मनुष्य ह्यांमधील मोठी पोकळी भरुन निघणार आहे.

  ReplyDelete
 32. बाबा तू लिहीलेल्या या अश्या पोस्टा वाचल्या ना तू भाऊ असल्याचा अभिमान वाटतो बघ पुन्हा पुन्हा.... म्हणजे काय भाऊ असलं काहितरी वेगळंच लिहिणारा म्हणजे बहिणही बरं खरडत असावी असा विचार येतो :)

  गंमतीचा मुद्दा बाजूला.... पण महेंद्रजी म्हणतात त्याप्रमाणे चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. :)

  लगे रहो बाबाभाय!!!
  (खूप सिनीमे पाहिल्याचा परिणाम ;) )

  ReplyDelete
 33. सौरभ,
  :D
  एक आयडिया आलीय!
  ह्या वर्षी जेव्हा रजनीकांत बसवाल तेव्हा आरास म्हणून रोबोटिक पार्श्वभूमी वापरा!

  ReplyDelete
 34. तन्वीताई,
  तू प्रतिक्रियेत अभिमान वाटतो लिहितेस ना...तेव्हा एकदम माझ्या अंगावर मूठभर मांस चढतं (अशा वेळी मी फिटनेसची काळजी करत नाही! ;) )
  सिनेमे फारच पाहतो नै आपण! :D

  ReplyDelete
 35. ரொம்பு னல்லா ..oops...enthiran fever..मला म्हणायचे होते खूप छान कथा.. मस्त लिहीली.. कैद्याच्या भावना छान व्यक्त केल्या...

  ReplyDelete
 36. ஸ்கெத்,
  தன்யவாத்!!
  धन्यवाद रे भाऊ!
  आणि हो ... आज समस्त मिथुनी परिवारातर्फे बंधु धर्माच्या सणाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 37. वेगवान आणि खिळवून ठेवणारे लिखाण... :) अनपेक्षित शेवट... मस्तच..
  वेगवान आणि खिळवून ठेवणारे लिखाण... :) अनपेक्षित शेवट... मस्तच..

  ReplyDelete
 38. रोहना!
  डबल आभार रे! :D

  ReplyDelete