11/07/2010

हत्या -१

इन्स्पेक्टर रमेश लिफ्टमधून बाहेर आला. लगेच त्याचा हात नाकाकडे गेला. बॉडी तीन-चार दिवस जुनी असावी.

"शिंदे, ते रानडे आहेत का बघा घरात."

हवालदार शिंदे लगबगीने बाजूच्या दाराकडे गेले. रमेश शांतचित्ताने फ्लॅट नंबर २०२ च्या दरवाजाची पाहणी करू लागला. दारावर पाटी नव्हती. जुनी पाटी काढल्याची खूण तेव्हढी होती. सेफ्टी डोअर नव्हता. बेल सुस्थितीत दिसत होती. पाहणी करता करताच नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यानं हातमोजे खिशातून काढून हातावर चढवले. दरवाज्याच्या लॉकशीही प्रथमदर्शनी काही छेडछाड केल्यासारखं दिसत नव्हतं. दरवाजाही चांगल्या लाकडाचा आणि दणकट होता. रमेश चाचपत विचार करत होता. एव्हढ्यात त्याची तंद्री भंग पावली.

"नमस्कार साहेब, मी पुरुषोत्तम रानडे. मीच आपल्याला फोन केला होता."

रमेशनं वळून पाहिलं. ४०-४५ वर्षांचा गोरा, घारा देखणा गृहस्थ. सुखवस्तूपणा देहावरून जाणवत होता. तशीही वस्ती उच्चभ्रूंचीच होती. चेहर्‍यावरून थोडा घाबरल्यासारखा वाटत होता. आता ७ वर्षांच्या नोकरीत, मध्यमवर्गीय माणूस गुन्हेगारांपेक्षा पोलिसांना जास्त घाबरतो हे रमेशला चांगलंच माहित झालं होतं.

"बरं, तुम्ही होय. तुमच्याकडे चावी असेल ती द्या बरं जरा."

"ही घ्या चावी साहेब." शिंदे.

"मग तुम्ही घेऊन उभे कशाला होतात, लगेच द्यायची ना मला." रमेश थोडा वैतागला. आधीच वास डोक्यात जात होता. एव्हढे खून पाहूनही त्या वासाचा रमेशला विलक्षण तिटकारा होता. दार उघडताच वासाचा एकदम मोठा भपकारा आला.

'तीन चार दिवस नक्कीच.' रमेश मनात विचार करत होता.

घरात सुरूवातीलाच पॅसेज होता. पुढे उजवीकडे हॉल आणि डावीकडे स्वयंपाकघर आणि पॅसेजनेच सरळ गेल्यावर पुढे उजवी-डावीकडे एक एक बेडरूम. उजवीकडच्या बेडरूममध्येच बॉडी होती. रमेशला बॉडी शब्द बरा वाटायचा, मृतदेहच्या ऐवजी. का कुणास ठाऊक! रानडे घाबरून बाहेर गेले. रमेशने शांतपणे मास्क घातला आणि शिंदेंना फोटोग्राफर्स आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सना बोलवायला सांगितलं.

'झालं, आजच्या रात्रीचं खोबरं.' विचार करतच रमेश कपाटं उघडून पाहत होता. संध्याकाळचे सात वाजत होते. रमेश ड्यूटीवर आल्याआल्याच इकडे आला होता. बाहेर आभाळ भरून आलं होतं. रस्त्यावर नेहमीचीच गर्दी. लोक आपापल्या कामांत मग्न होते.

रात्रीचे नऊ वाजेपर्यंत इमारतीतले लोक फोटोग्राफर्स आणि पोलिसांची वर्दळ पाहून समजून चुकले होते. गॉसिप्स सुरू झाली होती.

-------------------------

"धत् यार. तू साला ऐकून घेत नाही माझं. कितीदा बोललोय मी तुला." ग्लास भरत जीतू बोलत होता. त्याच्या बोलण्यातून नशा जाणवत होता. त्याच्यासमोरचा फक्त मंद स्मित करत होता.

"यार रोहन. तू साला सॉफ्टवेअर इंजिनियर. एव्हढ्या चांगल्या कंपनीत तू काम करतो. पण आपली दोस्ती विसरला नाही हां तू. मानतो तुला आपण." पाचवा पेग तोंडाला लावत जीतू बोलत होता. आताशा त्याचे शब्द घसरायला लागले होते.

"अबे जीतू, कमी पी जरा. किती पिशील. पुन्हा सकाळी उठून कामाला पण जायचंय." रोहन.

"अबे साल्या, तुला काय कळणार पोरगी नाही म्हणाल्याचं दुःख."

"चल बे. काहीच्या काही बोलू नको. ही सगळी भ्याडपणाची लक्षणं आहेत. असं एक पोरगी नाही म्हणाली म्हणून कोणी स्वतःचं आयुष्य नासवून घेतं का?"

"तेच म्हणतोय मी. तुला काय कळणार?" मूठभर खारे शेंगदाणे उचलत जीतू म्हणाला. "तू कधी प्रेमात नाही पडला ना."

रोहन एकदम गप्प झाला. विचारात गढला.

"का रे? काय झालं?" जीतू.

रोहनचं लक्ष नव्हतं. तो आपल्याच विचारात होता.

"अबे..."

रोहन दचकून भानावर आला. "काय? काय म्हणालास?"

"काही नाही..तू..विचार...कसला?.."

"जीतू झोप आता!" रोहननं जीतूच्या हातून ग्लास काढून घेतला आणि दिवा मालवायला उठला.

-------------------------

रमेश वारंवार बॉडीचे फोटोग्राफ्स बघत होता. पण त्याला काहीच क्लू लागत नव्हता. समोरून छातीवर तीन वार केले गेले होते. फॉरेन्सिक रिपोर्ट यायचा होता, पण रमेश फोटोंकडे पाहून एव्हढं समजू शकत होता, की वार वरच्या दिशेने खाली केले गेले होते. बहुदा खुनी मयत तरूणीपेक्षा उंच असावा. मयत तरूणी ५ फूट ८ इंच होती, म्हणजे खुनीही बर्‍यापैकी उंचीचा असावा. रमेश कंटाळून गेला होता. कुठलाच अंदाज फारसा यशस्वी ठरेलसं वाटत नव्हतं. फॉरेन्सिक रिपोर्ट येईस्तो, जरा मयत तरूणीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती करून घेणं योग्य ठरलं असतं. त्यानं शिंदेंना तिची टेलिफोन बिलं जमा करायला सांगितली आणि तो स्वतः तिच्या ऑफिसकडे निघाला.

क्रमशः

भाग -२

भाग -३
भाग -४

15 comments:

  1. सहीये.. पुढचा भाग येउद्या लवकर..

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे उत्कंठावर्धक! दूसरा भाग लवकर येऊ दे आता!!

    ReplyDelete
  3. छान सुरूवात भाई...पुढच्या भागाची वाट बघतोय..

    ReplyDelete
  4. मस्त सुरुवात झाली आहे !!! उत्कंठावर्धक ... आता पुढचे भाग लवकरात लवकर येऊ द्या ...

    ReplyDelete
  5. मग पुढे काय झालं? लवकर सांगा भाऊ! :)

    ReplyDelete
  6. बाबा उत्कंठा वाढली आहे..

    ReplyDelete
  7. सुरुवात चांगली आहे. जितु पीत असताना 'रोहन' सुद्धा पीत होता की नाही ते समजले नाही... ;)

    पण बाबा.. खूपच छोटा भाग. इतके लहान भाग लिहू नकोस. उत्कंठा ताणली जाते वगैरे ठीक आहे पण अधिक सलगता हवी कथेत. विशेष करून गूढ कथा असेल तर हवीच. बघ विचार कर... :)

    ReplyDelete
  8. पुढील भाग लवकर येउ दे...सुरुवात चांगली झाली आहे.

    ReplyDelete
  9. मस्त. पुढचा भाग कधी?

    ReplyDelete
  10. PM वर मारलेला डायलॉग परत मारतो इकडे आता. लवकर पुढचा भाग पोस्ट कर नाही तर तुझीच हत्त्या करतो मी मिलान ला येऊन....

    ReplyDelete
  11. @हेरंब, अभिलाष, सुहास, संकेतानंद, अनघा, भारत, योगेश, संकेत,
    येतोय येतोय, आशा आहे की लवकरच येतोय पुढचा भाग!
    खूप खूप धन्यवाद सर्वांचे 'क्रमशः' सहन करण्यासाठी! :)

    ReplyDelete
  12. रोहन,
    हाहाहा, अरे मी नेहमी आपल्यातली नावं अव्हॉईड करतो. पण हे मी खूप पूर्वी वहीत लिहून ठेवलेलं टंकलंय, त्यामुळे घाईघाईत नाव बदलणं राहून गेलं! :)
    अरे आणि ह्या छोट्या भागामागे उत्कंठा ताणणे वगैरे काहीही सद्हेतू नव्हता. फक्त आळस हे एकमेव कारण. १ वाजेपर्यंत एक सिरीज बघत बसलो, त्यामुळे कथा फार लिहिता आली नाही, त्यात थोडं वहीत लिहिलेलं, थोडं मनातलं..असो..
    आता आणायचा प्रयत्न करतो रुळावर!

    ReplyDelete
  13. सागर,
    तू मिलानला आलास, तर आयआयटीवाले आत्म'हत्या' करतील त्याचं काय! :P
    येतोय रे पुढचा भाग लवकरच! :)

    ReplyDelete
  14. तू मला ना Hitchcock-चा पक्का अनुयायी वाटतोस!!! :)

    ReplyDelete
  15. श्रीराज,
    तसा मी हिचकॉकचा भक्त आहे रे पण अजून त्याचे बरेच सिनेमे पाहायचे बाकी आहेत! 'सायको' चा मोठा पंखा आहे मी! :)

    ReplyDelete