11/28/2010

द हँगओव्हर

मी सिनेमांवर लिहिणार नाही असं नेहमी ठरवतो पण कुठलातरी सिनेमा पाहतो, खूप आवडतो आणि मग दोन तीन दिवस मी फक्त त्याच सिनेमाचा विचार करत राहतो. त्या सिनेमाबद्दल मिळेल ते वाचत राहतो आणि दुसरा कुठलाच विषय डोक्यात नसल्यानं (आणि इतर अनेक महत्वाच्या चालू घडामोडींवर बरेचजण बरंच सकस लिखाण करतातच) माझ्यासमोर त्या सिनेमाबद्दलच काहीतरी लिहिण्याशिवाय पर्याय नसतो. विनोदी सिनेमांमध्ये अनेक प्रकार असतात. काही चुरचुरीत संवादांवर आधारलेले तर काही कमरेखालच्या विनोदांवर आधारलेले, काही पूर्णपणे अभिनेत्याच्या क्षमतेवर अवलंबून तर काही निव्वळ परिस्थितीजन्य विनोद दर्शवणारे. 'द हँगओव्हर' हे परिस्थितीजन्य विनोदावर आधारलेल्या सिनेमाचं एक ठळक उदाहरण.

'द हँगओव्हर' चा एक अभिनेता एड हेल्म्स एका मुलाखतीत सांगतो, की ह्या सिनेमाची खासियत हीच आहे, की ह्यात कुठलंही पात्र चुरचुरीत संवाद म्हणत नाही, किंवा कुठलंही एक पात्र स्मार्ट किंवा हुशार असं नाही, ज्यामुळे विनोदनिर्मिती व्हावी. ह्यातली विनोदनिर्मिती फक्त घडणार्‍या घटनांमुळेच आहे. आणि ह्या घडणार्‍या प्रत्येक घटनेत त्यातली पात्र मात्र पूर्णपणे गंभीर असतात. आणि एडचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे. 'द हँगओव्हर' मधले मित्र सिनेमाच्या अनेक भागांमध्ये मार खात असतात किंवा त्यांची फजिती होत असते किंवा ते पूर्णपणे भांबावलेले असतात आणि आपण इथे हसून हसून लोटपोट होत असतो.

'डग' चं 'ट्रेसी' बरोबर लग्न ठरलंय. त्याचं लग्न रविवारी आहे आणि त्याच्या दोन मित्रांनी(फिल आणि स्टू) त्याची 'बॅचलर्स पार्टी' शुक्रवारी रात्री 'लास व्हेगास' मध्ये साजरी करायची ठरवलीय. डगनं ट्रेसीचा थोडा विक्षिप्त भाऊ 'ऍलन' ला देखील आपल्या बॅचलर्स पार्टीला न्यायचं ठरवलंय. फिल हा एक शाळाशिक्षक आहे आणि स्टू हा एक डेंटिस्ट. फिल हा हॅपिली मॅरीड विथ अ बॉय आणि स्टू लवकरच आपल्या हुकूमशहा गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याच्या विचारात आहे. डगचा समजूतदार सासरा त्याला स्वतःची अत्यंत लाडकी व्हिंटेज मर्सिडीज लास व्हेगासला घेऊन जाण्यासाठी देतो. आणि चौकडी बॅचलर्स पार्टीसाठी व्हेगासकडे रवाना होते. व्हेगासमधल्या एका महागड्या हॉटेलमधला एक महाग स्वीट बुक करून चौघेजण लपून छपून हॉटेलच्या छतावर पार्टीची सुरूवात करायला जातात. तिथे दारू पिऊन मग जेवण आणि जुगार, स्ट्रिप क्लब इत्यादी 'बॅचलर्स पार्टी' स्पेशल कार्यक्रम करायचे प्लॅन्स करतच चौघे दारू प्यायला सुरूवात करतात आणि मग आपल्याला थेट सकाळ दिसते. हॉटेलचा आलिशान स्वीट अस्ताव्यस्त झालाय. एक कोंबडी स्वीटमध्ये फिरतेय. स्वीटचा दरवाजा उघडून बाहेर पडणारे एका बाईचे पाय आपल्याला दिसतात. आणि जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला स्टू आपल्याला दिसतो. मग कुठूनतरी ऍलन उठतो आणि बाथरूममध्ये जातो. आणि आत त्याला चक्क एक वाघ दिसतो. ऍलनची पाचावर धारण बसते आणि तो धावतच बाहेर येतो. फिलदेखील जागा होतो आणि वाघ बघून सगळेच घाबरतात. त्यातच 'डग'चा काहीच थांगपत्ता नसतो. तो जिथे झोपला असावा तिथली गादीदेखील गायब असते. आणि एका कपाटामधे एक रडणारं बाळ असतं. सगळे विचारात पडतात की नक्की असं काय झालं काल रात्री? गंमत म्हणजे कुणालाच काही आठवत नाही. फिलच्या हाताला हॉस्पिटलमध्ये बांधतात तो बँड आहे. ते जेव्हा व्हॅलेट पार्किंगमधून आपली गाडी मागवतात तेव्हा मर्सिडीजऐवजी एक पोलिस कार येते. आणि हॉटेलच्या आवारातल्या एका मोठ्या पुतळ्यावर 'डग' ज्या गादीवर झोपला होता ती गादी अडकल्याचं दिसतं. तिघेहीजण आता मोठ्याच काळजीत पडतात. आधी ते हॉस्पिटलमध्ये जातात ज्यावरून त्यांच्या लक्षात येतं की त्यांनी आदल्या रात्री रोहिप्नॉल (उच्चार नक्की माहित नाही मला) हे 'डेट रेप ड्रग' घेतलं होतं, ज्यामुळे त्यांची आदल्या रात्रीची पूर्ण स्मृती गेलेली आहे. मग ते हळूहळू आदल्या रात्रीचे संदर्भ जुळवायचा प्रयत्न करू लागतात. आणि त्यातनंच त्यांनी आदल्या रात्री दारूच्या नशेत गाजवलेले चित्रविचित्र पराक्रम एक एक करून त्यांच्यासमोर येऊ लागतात. बाथरूममधला वाघ, ते बाळ, ती बाई, पोलिस कार आणि त्यांच्या पेयांमध्ये आलेलं रोहिप्नॉल अशी सगळी कोडी हळू हळू उलगडत जातात. डगचं गायब असणं हळूहळू खूप तणावपूर्ण होऊ लागतं आणि अचानकच शेवटाकडे ह्या उर्वरित रहस्याचाही उलगडा होतो. आपली मात्र हसून हसून मुरकुंडी वळलेली असते. आणि त्यातच शेवटी त्यांना कॅमेरा सापडतो ज्यामध्ये आदल्या रात्रीचे त्यांचे सगळे फोटो असतात. ते सगळे एकमेकांशी ठरवतात की एकदाच बघून पूर्ण डिलीट करायचे. आणि सिनेमाच्या क्रेडिट्सबरोबर आपल्याला हे फोटो पहायला मिळतात.

सिनेमा तसं बघायला गेला तर 'बॉय ह्यूमर' कॅटॅगरीत मोडणारा आहे. बहुतेककरून पुरूष ऑडियन्सला डोळ्यासमोर ठेवून बनवलेला आहे. पण तरी सिनेमाची गंमत कमी होत नाही. स्वतःला शहाणं समजणार्‍यांची होत असलेली फजिती हा विनोदनिर्मितीचा हुकमी एक्का दिग्दर्शक टॉड फिलिप्स वापरतो. ब्रॅडली कूपर (कूलड्यूड शाळाशिक्षक), एड हेल्म्स (भिडस्त डेंटिस्ट) आणि झॅक गॅलिफिआनाकिस (विक्षिप्त ऍलन) ही त्रयी आपल्या वावरानं धमाल उडवते. त्यांचे एक एक कारनामे समोर येताना त्यांची जी गोची होत राहते ती ह्या तिघांच्या अभिनयामुळे खूपच गंमतीशीर वाटते.

ह्या सिनेमाचं कथानक एका प्रोड्यूसरच्या स्वानुभवावर आधारलेलं आहे. पण बाथरूममधला वाघ वगैरे काही गोष्टी दिग्दर्शक टॉड फिलिप्सच्या सुपीक डोक्यातून आलेल्या आहेत. एकंदर सिनेमा आपल्याला थोडा वेळ एका वेगळ्याच विनोदी सफरीवर घेऊन जातो. 'सम गाईज जस्ट कान्ट हँडल व्हेगास' ही सिनेमाची टॅगलाईन अक्षरशः खरी होताना आपल्याला दिसते. सिनेमात अनेक ठिकाणी 'अमेरिकन कल्चर' (उदा. बॅचलर्स पार्टीचा कन्सेप्ट, 'व्हॉटेव्हर हॅपन्स इन व्हेगास, स्टेज इन व्हेगास' हा डगच्या सासर्‍याचा डोळे मिचकावत मारलेला डायलॉग वगैरे) पुरेपूर दिसून येतं. पण तरीही सिनेमातला विनोद अगदी बोटांवर मोजता येईल इतक्याच वेळा कमरेखाली जातो.

टॉड फिलिप्सचा वेगळाच 'सेन्स ऑफ ह्यूमर' पारंपारिक भारतीय प्रेक्षकांना कितपत रूचेल ठाऊक नाही पण भारतात काही निर्मात्यांनी ऑलरेडी 'द हँगओव्हर'चा ऑफिशियल रिमेक बनवण्याची तयारी सुरू केल्याचं ऐकिवात आलं होतं मध्यंतरी. तो येईल तेव्हा येईल, पण सध्या तरी मी टॉड फिलिप्सचा नवा सिनेमा 'ड्यू डेट' ची वाट पाहतोय. ह्यात झॅक गॅलिफिआनाकिस आणि माझा प्रचंड आवडता अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनियर आहे, त्यामुळे ही ट्रीटच असण्याची शक्यता आहे. पाहू.

29 comments:

 1. असल्याच पार्श्वभूमीवर एक हिन्दी चित्रपट देखील आहे. त्यात जिमी शेरगील, शरत सक्सेना, अरबाझ खान आणि नौहीद सायरसी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचं नाव आहे ’बॅचलर्स पार्टी’.

  ReplyDelete
 2. हे हे हे ! बाबा आपला सगळ्यात आवडता मुव्ही आहे !! अ‍ॅलन टायसनच्या स्विमिंग पुल मध्ये सु सु करतो तो सीन सही सगळ्यात हिलेरिअस आहे !

  Hangover 2 is coming Soon !!

  ReplyDelete
 3. हेहेहे, बाबा, लिहीलंस परीक्षण? मस्तच होता रे, आणि स्टु(एड हेल्म्स)जे गाणे गातो पियानोवर तेपण मस्तच,शब्दांकडे लक्ष द्यायचे.

  ReplyDelete
 4. माझा आवडता शिनेमा :)
  भाई, आता बघतो परत..तू झक्कास ओळख करून दिलीस..

  ReplyDelete
 5. शेवटी एकदाची ती परिस्थिती आली. तू ज्याबद्दल लिहिलं आहेस तो चित्रपट मी पाहिलेला आहे. नाहीतर नेहमी तुझं चित्रपट समीक्षण वाचल्यावर माझ्या मनात पहिला विचार हाच यायचा की, ‘या नावाचा चित्रपट आहे?’ तेव्हा आता मी यावर ‘पाहायला हवा एकदा’ सोडून काही वेगळी प्रतिक्रिया देऊ शकतो. :-) मस्तच आहे द हँगओव्हर. मला जाम आवडला.

  ReplyDelete
 6. Anonymous11:02 AM

  मी नाही पाहिला रे...
  तु केलेल्या वर्णनावरुन बघावासा वाटतोय
  माझ्या बघायच्या पिक्चरांची लिस्ट वाढतच चालली आहे.

  ReplyDelete
 7. मी आणि ओंकारने एकत्र बघितलेला हा सिनेमा.
  नंतर आम्ही बर्‍याचदा "बाथरूम मध्ये वाघ आहे असं म्हणायचो एकमेकांना"

  तसं वाघ नेऊन तिकडे मांजर ठेवायची आयडिया तर प्रचंड भारी होती...

  ReplyDelete
 8. हुश्श! मलाही संकेत सारखंच वाटतंय बुवा! मी बघितलाय हा सिनेमा! आणि मला पण खूप आवडलेला! :D

  ReplyDelete
 9. हॅंगओव्हर हा एक कैच्याकै भारी सिनेमा आहे.

  ReplyDelete
 10. बॉय ह्यूमर काय? पाहायला हवा बाबा... ;-)

  ReplyDelete
 11. Anonymous4:45 AM

  मी नाही सिनेमा पाहिला :(

  बाबा अरे एक लिस्ट करून ठेवावी लागणार आहे तू सुचवलेल्या सिनेमांची!!

  काल दबंग पाहिला... आधि पुन्हा एकदा We R फ्यामिली पाहिला आणि हसले मग दबंगने पुन्हा हसले :)

  ReplyDelete
 12. अतिशय भारी सिनेमा आहे नो डाऊट्स....
  ऍलन सकाळी बाथरुममध्ये जातो आणि वाघाला पाहातो तो सिन अप्रतिम..
  जबरेश.. बाबा तू लिहिलं देखिल अतिशय सुरेख....

  ReplyDelete
 13. मी पण नाही पाहिलेला हा शिनुमा :( पण आता तुझ्या मस्त मस्त आढाव्याने पाहिन लगेचच. सध्या मला अशा निखळ करमणुकिची फार फार गरज आहे. धन्यू रे लगेचच समोर आणलास... :)

  ReplyDelete
 14. चेतन,
  मी ऐकलं नव्हतं ह्या सिनेमाबद्दल...आश्चर्यच आहे! :D

  ReplyDelete
 15. दीपक,
  अरे टायसनच्या घरातलं सिक्युरिटी फूटेज फुलटू धमालच आहे! कैच्याकै एकदम!! :)

  ReplyDelete
 16. संकेतानंद,
  हो ते गाणं लईच भारी आहे...आणि ते स्वतः एड हेल्म्सनंच गायलंय... जबराच आहेत एक एक सीन्स! :)
  सिनेमा डोक्यातनं जाईच ना रे..म्हणून लिहिलं!!

  ReplyDelete
 17. सुहास,
  कितीही वेळा बघता येईल असला टीपी आहे ना!! :)

  ReplyDelete
 18. संकेत,
  मलाही काळजी वाटू लागली होती की मी फार एलिटीस्ट वगैरे होत नाही ना चाललो... :P
  आता बरं वाटलं! :)

  ReplyDelete
 19. देवेंद्र,
  बोर झाला असशील आणि इन्स्टंट मूड लिफ्ट हवा असेल तर 'द हँगओव्हर' ला पर्याय नाही! :)

  ReplyDelete
 20. अनीश,
  अरे बाथरूममधला वाघ ही टॉड फिलिप्सची कल्पना होती, हे वाचून माझा त्याच्याबद्दलचा आदर वाढला! :D
  वाघाला घेऊन येतात तो सिक्वेन्स भारीच आहे! :)

  ReplyDelete
 21. अनघा,
  डोकेबाज असूनही नॉर्मल माणसाला आवडेल अशी कॉमेडी असल्यानं मला खूपच आवडला! :)

  ReplyDelete
 22. नॅकोबा,
  सोळा आणे सत्य! :D

  ReplyDelete
 23. सिद्धार्थ,
  नक्की बघ...निराश होणार नाहीस ह्याची गॅरंटी!!

  ReplyDelete
 24. तन्वीताई,
  मी बनवून ठेवतो एक लिस्ट...भेटलीस की सगळे सिनेमे एकत्रच हँडओव्हर करेन तुला... :)
  पण दबंगच्या आधी वी आर फॅमिली पाहण्याची आयडिया आवडली..सिनेमाची खुमारी आणि किंमत अजून वाढली असेल ना! :P

  ReplyDelete
 25. आनंद!,
  :)
  ऍलननं खूप भारी काम केलंय!!! पण एकंदर प्रत्येकाच्याच मोमेंट्स आहेत!!

  ReplyDelete
 26. श्रीताई,
  बघ मिळेल तसा! :)

  ReplyDelete
 27. आपलं परवा बोलणं झालं तेव्हाच मला वाटलं होतं की हँगओव्हरवर लवकरच पोस्ट येणार म्हणून.. हेहे.. मी टाकलाय डालोला.. :)

  ReplyDelete
 28. रच्याक, 'ड्यू डेट' इथे ऑलरेडी रिलीज झालाय.. मी बघितला नाहीये अजून. पण रेटिंग चांगलं आहे.

  ReplyDelete
 29. हेरंबा,
  बघ अरे हँगओव्हर...पूर्ण टीपी आहे... आणि ड्यू डेटपण बघच..मी आता शोधतो कुठे मिळतोय का ते! :)

  ReplyDelete