11/21/2010

परतावा

"ठरलं तर मग!" शेठजी खुर्चीतून उठत म्हणाले. त्याबरोबर सगळं विश्वस्त मंडळ उठून उभं राहिलं. मग शेठजींनी नमस्कार केला आणि ते खोलीतून बाहेर पडले. बाहेर त्यांचा स्वीय सहाय्यक होताच, त्यानं लगेच गाडी बोलावली आणि काही क्षणांमध्ये शेठजी आपल्या गाडीत बसून पुन्हा शहराकडे प्रयाण करते झाले.

शेठजींची ह्या देवस्थानावर फार श्रद्धा होती. लाखो भक्तांप्रमाणेच शेठजींसाठीदेखील हे देवस्थान नेहमीच जागृत ठरलं होतं. छोटासा कापडाचा व्यापारी ते आजचा कपडेसम्राट हा त्यांच्या प्रवास केवळ देवाच्या त्यांच्या कृपेमुळेच घडल्याचं शेठजींचं ठाम मत होतं. त्यामुळे शेठजींनी पदरचे कित्येक लाख खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पण शेठजींसारखेच देवस्थानाचे अनेकानेक श्रीमंत भक्त होते. आणि सामान्य भक्तही देत असलेली रक्कम ह्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये हे देवस्थान देशातल्या सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणून गणलं जाऊ लागलं होतं. मंदिर चकाचक होतंच आणि व्हीआयपी दर्शनार्थींची चोख व्यवस्था हे देवस्थानाचं वैशिष्ट्य होतं. हां, आता एव्हढी सगळी व्यवस्था करताना कधी कधी सामान्य भक्तांची गैरसोय होत असे, पण त्याला काही इलाज नव्हता. देवळामुळे अनेक फुलवाले आणि प्रसाद बनवणार्‍यांबरोबर लोकांना गंडे घालणार्‍या बडव्यांच्याही रोजगाराची सोय झाली होती, पण शेवटी प्रत्येक ठिकाणी चांगल्याबरोबर वाईट असतंच. आता देवस्थान श्रीमंत झाल्यामुळे देवाची आपल्यावर जास्तीत जास्त कृपा होण्यासाठी श्रीमंत भक्तांनी देवाच्या कृपेची किंमत हळूहळू लाखांच्या घरात नेली होती. त्यामुळे आता चांदीच्या पादुका, सोन्याची छत्री वगैरे गोष्टी देवाला मिळू लागल्या होत्या. आणि देवानं नवस पूर्ण करायचे आणि परताव्याखातर देवाला महागातले दागिने मिळत होते. आणि त्याचबरोबर देवाला त्या त्या वस्तूच्या दुप्पट किंवा तिप्पट किंमतीची अजून कृपा करायची होती. एव्हढी माफक अपेक्षा ठेवून देवालयाला असा दानधर्म करण्याची श्रीमंत भक्तांमध्ये अहमहमिका लागली होती. त्यातच आज शेठजींनी बाजी मारली होती.

शेठजींनी देवाला आजवरची सर्वांत महाग भेटवस्तू, अर्थात २५ किलो वजनाचं संपूर्ण सोन्यानं बनलेलं आणि विविध माणकांनी मढवलेलं सिंहासन देण्याचं ठरवलं होतं आणि त्याबाबतच विश्वस्त मंडळाशी चर्चा करून मोठ्या प्रसन्न आणि समाधानी मनानं ते परत निघाले होते. त्यातच त्यांच्या कॉलेजात जाणार्‍या कन्येचा फोन आला होता आणि तिनं बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी पास केल्याची बातमी दिली होती. त्यामुळे अजून एक नवस पूर्ण झाल्याच्या आनंदातच त्यांचा प्रवास सुरू होता. परतीचा रस्ता गावांमधून जाऊन मग महामार्गाला मिळत होता. ह्या रस्त्याच्या दुतर्फा, थोड्या थोड्या अंतरावर छोटी छोटी गावं वसलेली होती. उन्हं उतरली होती आणि हळूहळू अंधार पडू लागला होता. गावांमधली दिवेलागण सुरू झाली होती. पण अचानकच थोड्या वेळानं आजूबाजूच्या गावांच्या पट्ट्यातले दिवे गेले. रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या गाड्यांच्या उजेडाशिवाय दुसरा उजेड नव्हता आणि त्यातच थोड्या अंतरावर असणार्‍या गावांमधले दिवेही दिसेनासे झाले. मधेच एखादा कंदिल दिसत होता आणि थोड्याशा चांदण्याचाच काय तो आधार उरला होता. आणि अशातच वळणावर समोरून एक मोठं वाहन आलं आणि त्या चालकाचं नियंत्रण सुटलं. शेठजींच्या गाडीला जबर धडक बसली आणि गाडी उलटीपालटी होऊन रस्त्यावरच मागे फेकली गेली. शेठजी बसले होते तो दरवाजा मोडला आणि शेठजी रस्त्यावर पडले. ड्रायव्हर आणि गाडी त्यांच्यापासून शंभर मीटरावर आणि ट्रक रस्त्यावरून बाहेर जाऊन उलटला.

अचानक बसलेल्या धक्क्यानं शेठजींना काही क्षण उमजेनासं झालं होतं. अर्धवट शुद्धीत की अर्धवट बेशुद्धीत ह्याचंही भान त्यांना नव्हतं. अशातच एकदम एक दिवा जवळ येत असल्याची भयावह जाणीव त्यांना झाली. त्यांनी त्या दिव्याकडे पाहिलं. एक गाडी वेगानं त्यांच्या दिशेनं येत होती. शेठजींनी हात-पाय हलवायचा क्षीण प्रयत्न केला, पण वेदनेमुळे किंवा निव्वळ भयामुळे त्यांचे हात-पाय थिजून गेले होते. त्यांनी डोळे मिटून घेतले आणि देवाचा धावा करायला सुरूवात केली. गाडी जवळजवळ येत असल्याची जाणीव तीव्र होत होती आणि एकदम कुणीतरी त्यांच्या हात धरल्याचं आणि जोरात ओढल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या जोराबरोबर ते रस्त्यावरून बाजूला ओढले गेले आणि गाडीपासून वाचले. त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर एक धूसर आकृती त्यांना दिसत होती. त्या आकृतीचा हात त्यांच्या मानेकडे येत असल्याचं त्यांना जाणवलं. एकदम शेठजींना जाणवलं की त्यांच्या गळ्यात कित्येक तोळ्याच्या सोन्याचा चेन्स आहेत. पण तो हात त्यांच्या मानेखाली गेला आणि दुसरा हात त्यांच्या गुडघ्याखाली गेला आणि शेठजी हवेत उचलले गेले. आणि त्या आकृतीनं शेठजींना रस्त्यापासून थोडं दूर गवतात नेऊन ठेवलं. शेठजींना मनातल्या मनात स्वतःच्याच विचारांची घृणा वाटली. ती आकृती दूर दूर निघाली. शेठजींना 'जाऊ नको' म्हणून ओरडावंसं वाटत होतं, पण त्यांचा आवाजही फुटत नव्हता. दहा मिनिटांनी ती आकृती परत आली आणि तिनं शेठजींना उचललं आणि एका हातगाडीवर ठेवलं.

----------

शेठजींना हळूहळू शुद्ध आली आणि त्यांनी समोर बघितलं तर एक पस्तिशीचा गावकरी गृहस्थ त्यांच्या शेजारी बसला होता.

"कसं वाटतंय आता?" त्यानं विचारलं.

"अं.." शेठजींना अजूनही पूर्ण अर्थबोध झाला नव्हता. त्यांनी हालचाल करायचा प्रयत्न केला, तर एकदम कळ उठली.

"असू दे. थोडा वेळ अजून आराम करावा लागेल बहुतेक. ही गरम पाण्याची पिशवी घ्या. जेवणासाठी तरी थोडं उठून बसा." असं म्हणत त्या गृहस्थानं त्यांना उठून बसायला मदत केली आणि बायकोला हाक मारत खोलीतून बाहेर पडला.

शेठजी विचारात होते. नकळत त्यांचा हात गळ्याकडे गेला. त्यांचे सगळे दागिने जागच्या जागी होते. एव्हढ्यात तो मनुष्य आत आला.

"मी पोलिसांना अपघाताबद्दल कळवायला आमच्या गावातल्या एकाला पाठवलंय." तो म्हणाला.

"आणि माझी गाडी आणि ड्रायव्हर?" शेठजींनी विचारलं. त्यातच आपण ड्रायव्हरच्या आधी गाडीचा उल्लेख केल्याचं शेठजींना स्वतःलाच आश्चर्य वाटलं.

"गाडी अशीही रस्त्याच्या एका बाजूलाच फेकली गेली होती. पण तुमचा ड्रायव्हर आणि दुसर्‍या गाडीचा चालक दोघेही वाचू शकले नाहीत. मी इतर गावकर्‍यांच्या मदतीनं त्यांची प्रेतं बाजूला करून ठेवली आहेत. पोलिसच ऍम्ब्युलन्स घेऊन येतील."

"इथे हॉस्पिटल नाहीये जवळपास?" शेठजींनी कसंतरी विचारलं.

"इथे काहीच नाहीये शेठजी." तो ओशाळत म्हणाला. एव्हढ्यात त्याची बायको जेवण घेऊन आली. त्यानं तिच्याकडून ताट घेतलं आणि शेठजींना मदत करू लागला. जेवण उरकल्यावर हात धुवायला पाणीही तो घेऊन आला.

शेठजी त्याचं घर निरखत होते. घर यथातथाच होतं आणि जेवणावरूनही तो गृहस्थ सुखवस्तू वाटत नव्हता. 'एव्हढं सगळं कोण करतं परक्यांसाठी? आपल्या गळ्यातल्या सोन्याच्या चेन्सचा इफेक्ट असावा.' शेठजी मनाशीच विचार करत होते. एव्हढ्यात तो परत आला.

"आता तुम्ही आराम करा. तुम्ही बेशुद्ध होतात तेव्हा डॉक्टर येऊन गेले गावातले. ते म्हणाले की तुम्हाला फक्त मुका मार बसलाय. थोड्या आरामानं ठीक होईल."

"इथे फोन आहे का? आणि माझा सेलफोन?" शेठजी खिसे चाचपायचा प्रयत्न करत म्हणाले.

"तुमच्याजवळ फोन होता का? मला तिकडे रस्त्याजवळ दिसला नाही अंधारात." तो मान खाली घालून म्हणाला. "आणि आमच्याकडेच पूर्ण गावात एकच फोन आहे, पोस्ट ऑफिसात. ते बंद झालं असेल आता. उद्या सकाळी करता येईल. तोवर तुम्ही आराम करा."

शेठजी विचारात पडले. 'घरचे सगळे काळजीत असतील. पोलिस इथेपर्यंत आले, तर काहीतरी होऊ शकतं.'

"अरे हो, माझ्याबद्दल सांगितलंच नाही ना मी." तो बोलला. "मी सदाशिव. गावातल्या शाळेत शिक्षक आहे. मी काही कामानिमित्त मुख्य रस्त्याजवळ गेलो होतो, तेव्हा अपघात नजरेस पडला. आता गावात काय, गावाच्या जवळपासही कुठे सोयी नाहीत. त्यात तुम्हाला कितपत इजा झाली असेल ह्याचा अंदाज आला नाही, म्हणून तुम्हाला घरीच घेऊन आलो."

"बरं बरं." शेठजी म्हणाले. "पोलिसांना इथेही बोलवा आले तर."

"बरं शेठजी मी लक्ष ठेवतो. तुम्ही आराम करा." असं म्हणून तो गेला.

----------

सकाळी शेठजींनी डोळे उघडले आणि क्षणभर आपण कुठे आहोत हा प्रश्न त्यांना पडला. मग एकदम काल रात्रीचा विचित्र घटनाक्रम त्यांना आठवला. आणि त्यांनी हालचाल करून पाहिली. वेदना थोड्या कमी झाल्या होत्या. शेजारी ठेवलेल्या तांब्या-भांड्यातून त्यांनी मोठ्या मुष्किलीनं पाणी प्यायलं आणि ते उठून बसले. त्याला हाक मारावी का ह्या विचारातच शेठजी असताना तो आत आला.

"शेठजी, उठलात होय तुम्ही. जास्त वेळ नाही ना झाला?"

शेठजींनी नकारार्थी मान डोलावली. "पोलिस?" त्यांनी विचारलं.

"पोलिस आले होते पहाटे पण तुम्ही गाढ झोपला होता. मग त्यांना म्हटलं ३-४ तासांनी या." तो निरागसपणे म्हणाला. "चहा आणू."

"नको मला आधी फोन करायचाय." शेठजी उठायचा प्रयत्न करत म्हणाले. पण वेदना अजूनही खूप होत्या. तो एकदम पुढे झाला. आणि त्यांना आधार देत त्यानं उठवलं.

"आधी थोडं खाऊन घ्या, कदाचित बरं वाटेल." असं म्हणून तो त्यांना खोलीबाहेर घेऊन आला. आणि त्याचं घर पाहून शेठजींना धक्काच बसला. शेठजी ज्या खोलीत झोपले होते, ती खोली सोडून बाहेर एकच छोटी खोली होती आणि संडास-मोरी होते. छोट्या खोलीत एका कोपर्‍यात चूल होती. बहुतेक तो, त्याची बायको आणि आत्ता दिसणारी ८-९ वर्षांची मुलगी सगळे उर्वरित चिंचोळ्या जागेत कालची रात्र झोपले होते. तो त्यांना मोरीकडे घेऊन गेला आणि बाहेर उभा राहिला.

शेठजी त्यांच्या खोलीत बसून नाश्ता करत होते. तो शेजारीच बसला होता.

"मुलगी कितवीत शिकते?" शेठजींनी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.

"चौथीत आहे." तो म्हणाला.

"म्हणजे आता मोठ्या शाळेत जाईल पुढच्या वर्षी! तुम्ही आहातच त्यामुळे बरं आहे." शेठजी सहज म्हणाले.

"कसली मोठी शाळा शेठजी. गावात चौथीच्या पुढची शाळा नाही. एव्हढ्याशा पोरीला रोज दूर कसं पाठवायचं हीच काळजी आहे. आता जिथे शाळा जवळ असेल अशा ठिकाणी कुठेतरी नोकरी शोधायची नाहीतर पोरीला घरी बसवायचं हेच दोन पर्याय आहेत." तो खिन्न होत म्हणाला.

शेठजींच्या डोळ्यांपुढे त्यांची स्वतःची मुलगी आली क्षणभर. कालपासून शेठजींना खूपच विचित्र वाटू लागलं होतं. एव्हढ्यात पोलिस आले. शेठजींनी योग्य ती नावं सांगितली आणि लगेच हालचाली झाल्या. शेठजी मोठा माणूस असल्याचं सदाशिवच्या आधीच लक्षात आलं होतं, पण शेठजी खूपच मोठे माणूस असल्याचं त्याला पोलिसांनी सांगितल्यावर कळलं. चटाचट शेठजींसाठी खास हेलिकॉप्टरची सोय झाली.

हेलिकॉप्टर आल्यावर शेठजींना घ्यायला दोन वॉर्डबॉय आले. शेठजींनी गळ्यातल्या दोन मोठ्या चेन्स काढल्या आणि सदाशिवच्या हातात ठेवल्या. सदाशिव एकदम चमकला आणि त्यानं त्या परत शेठजींच्या हातात दिल्या.

"शेठजी, मी माणुसकी म्हणून केलं सगळं."

शेठजींना धक्का बसला आणि ते थोडे खजील झाले. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. वॉर्डबॉयनं आणलेल्या व्हिलचेअरवर बसून शेठजी जेव्हा निघाले, तेव्हा त्यांच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला होता. वॉर्डबॉय आपापसात बोलत होते.

"अरे तू बातमी ऐकलीस का? दोनच महिन्यांनी देवस्थानामध्ये २५ किलो वजनाचं सोन्याचं बनलेलं आणि माणकांनी मढवलेलं सिंहासन स्थापित होणार आहे. अनाम भक्ताची भेट आहे. मोठा सोहळा असेल. येणार आहेस की नाही तू?"

शेठजी एकदम थांबले. आणि त्यांनी सदाशिवला बोलवायला सांगितलं. सदाशिव प्रश्नार्थक चेहर्‍यानं आला.

"तुला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. आणि तुलाच काय कुणालाच कुठेही जायची गरज नाही." शेठजी बोलले.

सदाशिवला काहीच अर्थबोध होत नव्हता.

"आता गावातच माध्यमिक शाळा निघणार आहे. आणि जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर हॉस्पिटल." शेठजी बोलत होते आणि सदाशिवचा चेहरा उजळत होता. तो शेठजींना वारंवार नमस्कार करत होता.

----------

वॉर्डबॉईजनी शेठजींना व्हिलचेअरसकट हेलिकॉप्टरमध्ये चढवलं. आणि ते त्यांच्या शेजारीच बसले. शेठजी त्यांच्याकडे वळले आणि म्हणाले,

"ती सिंहासन स्थापनेची बातमी खरी नाहीये. फक्त अफवा आहे."

वॉर्डबॉईज एकमेकांकडे आश्चर्यानं पाहू लागले. शेठजींच्या चेहर्‍यावर फक्त एक समाधानी स्मितहास्य होतं.


'स्टार माझा' नं आयोजित केलेल्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेमध्ये ह्या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झालं आहे. हे सगळं केवळ सर्व वाचकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच शक्य झालं आहे. सर्व वाचकांचे खूप खूप आभार आणि अभिनंदनही कारण बक्षीस मिळण्यात मोठा वाटा तुमचाही आहे!

44 comments:

 1. हार्दिक अभिनंदन... पोस्ट नेहमीप्रमाणेच मस्त... विभि, We re proud of you... :-)

  ReplyDelete
 2. हार्दिक अभिनंदन!
  पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
  साताऱ्या वर काहीतरी लिहिले तर मजा येईल :)

  ReplyDelete
 3. Anonymous7:12 PM

  असा साक्षात्कार हया शेठ मंडळींना खरच व्हायला हवा.....
  पोस्ट नेहमीप्रमाणे मस्तच झाली आहे.
  बाबा,अभिनंदन...असच लिहत राहा..यु रॉक्स यार..!

  ReplyDelete
 4. बाबा, नेहमीप्रमाणे झकास कथा.. !!

  'ब्लॉग माझा'च्या यशाबद्दल अभिनंदन !!

  ReplyDelete
 5. Anonymous8:18 PM

  बाबा मस्त कथा!!! :)

  ब्लॉग माझातल्या यशाबद्दल मनापासून अभिनंदन.... खूप खुप यशस्वी हो!!

  ReplyDelete
 6. भाई कौतुक करून शब्द संपत आलेत :) हॅट्स ऑफ..

  अभिनंदन

  ReplyDelete
 7. झकास कथा.. !!

  ReplyDelete
 8. छान कथा आहे. कथेतील शेठ्जींचे जसे मतपरिवर्तन झाले तसे खऱ्या आयुष्यातही सर्व छोट्या-मोठ्या शेठ्जींचे मतपरिवर्तन होवो हीच सदिच्छा..  आपल्याला, आपल्या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्याचे वाचून आनंद झाला. अशीच प्रगती राहो. आपले हार्दिक अभिनंदन..

  ReplyDelete
 9. छान आहे गोष्ट. बोध घेण्यासारखी. मी असं ऐकलंय कि शिरडीच्या साईबाबांची खुर्ची कोट्यावधी रुपयांची आहे! मी गेले नाहीये कधी तिथे. पण हे ऐकिवात आहे! विद्याधर, तुझं खूप खूप अभिनंदन, स्टार माझ्याच्या यशाबद्दल! :)

  ReplyDelete
 10. farach changle lihile ahe. Ashi uparati anek dhanikanna hovo..

  ReplyDelete
 11. मस्त बोधकथा आहे.

  त्या विश्वनाथ कराड ना द्यायला पाहिजेल वाचायला ही कथा.त्यांनी दिलेली देणगी पंढरपूर मंदिराच्या विश्वस्त नी नाकारली तर खूप राग आला म्हणे त्यांना.
  अरे एवढी देणगी द्यायची आहे तर देवळा बाहेर भक्तांसाठी काहीतरी सोय करा म्हणावं.

  ReplyDelete
 12. आवडली कथा..
  "आणि माझी गाडी आणि ड्रायव्हर?" शेठजींनी विचारलं. त्यातच आपण ड्रायव्हरच्या आधी गाडीचा उल्लेख केल्याचं शेठजींना स्वतःलाच आश्चर्य वाटलं.
  मस्तंच

  ReplyDelete
 13. कथा छानच आहे.. आता सवय झाली आहे असे म्हणायची. याचा अर्थ तू आता वाईट कथा लिहत जा असा होत नाही. :P पण सगळ्या गोष्टी कथेप्रमाणे घडतात असे नाही,याचेच वाईट वाटते. आपल्या सगळ्या शेठजींना अशी सद्बुद्धी लाभली तर किती छान होईल.
  "आणि माझी गाडी आणि ड्रायव्हर?" शेठजींनी विचारलं. त्यातच आपण ड्रायव्हरच्या आधी गाडीचा उल्लेख केल्याचं शेठजींना स्वतःलाच आश्चर्य वाटलं. >> हे वाक्य मलादेखील आवडलं. छोट्या छोट्या प्रसंगांत कथा छान खुलवली आहे.

  ReplyDelete
 14. संकेत,
  खूप धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 15. प्रसाद,
  खूप धन्यवाद!
  सातार्‍यावर नक्कीच बरंच काही लिहिण्याचा मानस आहे.

  ReplyDelete
 16. अभिलाष,
  खूप धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 17. गौरव,
  खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 18. देवेन,
  अरे असा साक्षात्कार त्या लोकांना होईल तो सुदिन!
  खूप खूप आभार रे! :)

  ReplyDelete
 19. हेरंबा,
  धन्यवाद रे!
  ब्लॉग माझाच्या यशाबद्दल तुझंही अभिनंदन :)

  ReplyDelete
 20. तन्वीताई,
  मी कालपासून सगळ्यांना अभिमानानं सांगतोय की विजेत्यांमध्ये माझ्या ताईचं नाव आहे! :)

  ReplyDelete
 21. सुहास,
  धन्यवाद भाई आणि तुझंदेखील अभिनंदन!

  ReplyDelete
 22. सविताताई,
  खूप खूप आभार! :)

  ReplyDelete
 23. आका,
  लई आभारी हाय मित्रा!

  ReplyDelete
 24. अपूर्व,
  ही कथा ज्यादिवशी 'कथा' न राहता 'सत्यकथा' होईल त्यादिवशी खूप आनंद होईल मला! :)
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 25. अनघा,
  नुसतं शिर्डीच काय, कित्येक देवस्थानांची हीच कथा आहे. कधीतरी कुणालातरी सद्बुद्धी त्यांचा देवच देईल अशी आशा आहे.
  खूप धन्यवाद आणि तुमचंदेखील अभिनंदन!

  ReplyDelete
 26. साईसाक्षी,
  ब्लॉगवर स्वागत! धनिकांना उपरती व्हावी ही माझीदेखील इच्छा आहे.
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! भेट देत राहा!

  ReplyDelete
 27. सचिन,
  अरे खोटे अहंभाव आणि दांभिकपणा घेऊन, डोळ्यांना झापडं लावून फिरणारी अनेक माणसं आहेत जगात. पण तितकीच चांगली माणसंही आहेतच. दांभिक माणसांना जेव्हा उपरती होईल, तेव्हा जगातला चांगुलपणाही आपोआप वाढेल.

  ReplyDelete
 28. आनंद,
  अरे बरेचदा असं घडतं. कधीकधी आपल्याही बाबतीत, आपण भौतिक गोष्टींचा माणसांपेक्षा जास्त विचार करतो. स्वतःचीच लाज आणि आश्चर्य वाटतं मग.

  ReplyDelete
 29. संकेतानंद,
  माणसांना बरेचदा जाणीव होईस्तोवर वेळ निघून गेलेली असते. अनेकांना वेळ असेस्तोवरच जाणीव व्हावी हीच इच्छा आहे.
  खूप खूप धन्यवाद भाऊ!!

  ReplyDelete
 30. बाबा अभि आणि नंदन तर करणाच होते पण त्यांनी तुला उत्तेजन द्व्याव म्हणजे असो....आता काय वाद...:)
  या कथेमुळे मात्र काही शेटजींना योग्य दानासाठीच उत्तेजन मिळालं तर बर होईल....(मी कथा खरच वाचायला कंटाळते रे...आता जरा जुन्या लायनीवर पण ये की....)

  ReplyDelete
 31. मस्त यार,अभिनंदन, मजा आली वाचून.

  ReplyDelete
 32. अभिनंदन! भिंत अशीच चालत राहो!

  ReplyDelete
 33. ज्ञानेश,
  तुमचं ब्लॉगवर कॉमेंटरूपानं स्वागत!
  खूप खूप आभार! असाच लोभ असू द्या!

  ReplyDelete
 34. गौरी,
  पहिलीच कॉमेंट ना तुमची? स्वागत! :)
  खूप आभार! भेट देत राहा!

  ReplyDelete
 35. अपर्णा,
  हाहा....खरंच मला खरं उत्तेजन तर तुम्हा सगळ्या वाचकांच्या कॉमेंट्सनीच मिळतं! :)
  येतो की परत लाईनवर आहे काय नाही काय... मलाही कथा लिहिताना खूप जास्त विचार करावा लागतो ;)

  ReplyDelete
 36. Bhai ekdam mastach...sundar lihal aahes...aavdali

  ReplyDelete
 37. विद्या, पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! :)

  कथा आवडलीच. खरेच असे साक्षात्कार लोकांना वारंवार होऊ लागले तर... पण शेवटी दिखाव्याच्या रंगाला भुललासींचेच राज्य रे...

  ReplyDelete
 38. योगेश,
  धन्यवाद भावा!!!

  ReplyDelete
 39. श्रीताई,
  हो ना..कलियुगात दिखावाच महत्वाचा ठरतोय! :(

  ReplyDelete
 40. शेवटी चांगला मेसेज दिला आहेस... :)
  असे अनेक 'अपघात' होऊन अनेक शेठजींना अक्कल येऊ दे... :)

  ReplyDelete
 41. रोहन,
  :)... आल्या अकला तर ठीकच!

  ReplyDelete