स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

5/12/2010

पोस्टचा विषय


आत्ता मी तुफान पकलोय. मला काहीतरी लिहावंसं वाटतंय, पण काय लिहू ते सुचत नाही. केव्हाचा विचार करतोय. विविध विषय आठवून पाहिले. जसे,
. सकाळपासून काय केलं - ऑफिसात संगणका समोर बसलो. काम केलं नाही केलं हा प्रश्न महत्वाचा नाही. देवकाकांच्या बझकट्ट्यावर विविध विषयांवर आपल्या मताची पिंक टाकली. मधे एकदा जेवायला आणि दोनदा कॉफी प्यायलाही जाऊन आलो. पण ह्या सगळ्यात लिहिण्यासारखं काहीच नाही.
. इंग्लंडमध्ये स्थापन होत असलेलं नवं सरकार - कॉन्झर्व्हेटिव्ह आणि लेबर (मला पर्सनली ह्या पक्षांची मराठी नावं फार फार आवडतात - हुजूर आणि मजूर. ज्यानं कोणी बनवलीत तो चांगला रसिक माणूस असणार {माझ्यासारखा}.) ह्यांच्यात लिब-डेम(लिबरल डेमोक्रॅट - हा जुना पक्ष नसल्याने त्या रसिक, बारसं करणार्‍याच्या तावडीतून वाचला; पण मी आहे ना {त्याच्यासारखा} - ह्या पक्षाचं मराठी नाव - खजूर.) ला आपल्या बाजूने ओढण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच. मग भरपूर कोलांट्याउड्या मारल्यावर मजूर पंतप्रधानाने(मस्त शब्द वाटला ऐकायला) दिलेला राजीनामा आणि हुजूर पक्षाने खजूर पक्षाशी केलेली युती. हुजूर पंतप्रधान आणि खजूर उपपंतप्रधान (हा शब्दही मस्त वाटला). ह्या सगळ्यावर मी बापुडा काय पोस्ट लिहिणार.
. नुकताच एका मराठी कम्युनिटी साईटवर झालेला कथित आर्थिक घोटाळा आणि त्याचे अन्य कम्युनिटी साईट्स वर उमटलेले पडसाद हा मला एकदम सपट परिवार महाचर्चा सारखा विषय वाटतोय. माझे बाबा हा कार्यक्रम (सपट महाचर्चा) बरेचदा पाहतात (हे हवेतलं वाक्य आहे, कार्यक्रमाच्या अस्तित्वाविषयी मला काही कल्पना नाही). मला राहून राहून प्रश्न पडतो, की सपट परिवार हा चहा आहे, तर हे लोक कार्यक्रमाचं नाव 'सपट परिवार चहाचर्चा किंवा चहा चर्चा" असं का नाही ठेवत. आधीच नावात परिवार असल्याने मिसगाईड होतो माणूस. हां तर सांगण्याचा मुद्दा हा, की आत्ता मला सपट महाचर्चा करायची इच्छा नाहीय.
. माझी शाळा - आता कुणाला हा प्रश्न पडेल की असा ५वी च्या मराठीच्या परीक्षेत निबंधाला येणारा विषय मला सुचण्याचं कारण काय. तर कारणं तशी बरीच आहेत.जसं, . नको, आता इथे A,B,C,D वगैरे घ्यावं लागेल. जाऊ द्या बुलेट्स नकोतच द्यायला. मागच्या वाक्यातली बुलेट ही बंदुकीची गोळी, किंवा मोटरसायकल ह्या अर्थाने नसून वर्ड ह्या संगणक प्रणालीतील अनुक्रमांक देण्याच्या पद्धतीला दिलेलं विचित्र नाव ह्या अर्थाने आहे(अनुक्रमांक हा शब्द मला उत्स्फूर्तपणे सुचलेला आहे, जर कुणाकडे बुलेट्स साठी खरा योग्य शब्द असेल, तर मी मोठ्या मनाने माझी चूक सुधारेन). हां तर आपण कुठे होतो, माझी शाळा हा विषय मला का सुचला. तर, त्याचं असं झालं ऑर्कुटमध्ये आमच्या शाळासोबत्यांपैकी एकाने आमच्या दहावीच्या भौगोलिक सहलीत काढलेलं एक समूह छायाचित्र टाकलं. मग सगळ्यांमध्ये त्यात चेहरे टॅग करण्याची अहमहमिका लागली. सगळे दुसर्‍यांना ओळखत होते, पण स्वतःचाच चेहरा कुणाला ओळखू येत नव्हता (आईच्यान, मी दुसर्‍याने कन्फर्म करेपर्यंत स्वतःबद्दल कॉन्फिडन्ट नव्हतो). त्यात दुसर्‍या एका आपला वेळ सत्कारणी लावणार्‍या सदगृहस्थ मित्राने माझ्या शाळेची ऑफिशियल साईट बनवली आहे. मी कर्तव्यकर्म असल्याप्रमाणे ती दुसर्‍याच दिवशी जॉईन केली होती, पण आज त्यानं त्याची थोडी जाहिरात करण्यासाठी मला सांगितलं. इतका विश्वास तर हॅरी बावेजाचाही हरमन बावेजावर नसेल. (सुज्ञ वाचकांच्या लक्षात माझी सरोगेट ऍडव्हर्टायझिंग आली असेल, मी मित्राला दिलेला शब्द मोडू शकत नाही) तर अशी दोन कारणं झाली ज्यामुळे मी माझी शाळा ह्या टायटलवर आलो होतो. पण मला आत्ता शाळेत झालेले माझे विविध पचकेच आठवत असल्याकारणे मी पोस्ट लिहू इच्छित नाही.
. दंतकथा - आता दंतकथा ह्या विषयावर मी का आलो. मला खरं म्हणजे एक लघुकथा लिहायची होती. एकदम जेन्युईन. एकदम शाळेत एक 'विजयस्तंभ' अशा कायशाशा नावाची वि.. खांडेकरांची लघुकथा होती, तशी. अजूनही मला लघुकथा म्हटलं की तीच आठवते ('विजयस्तंभ' ही लघुकथा). किमान शब्दांत कमाल आशय सांगणारी (संदर्भासहित स्पष्टीकरणात असं सगळं लिहावं लागायचं). किमान शब्दांत कमाल आशय म्हटलं की मला गिर्‍हाईकाचा 'किमान शब्दांत कमाल अपमान' करणारे पुणेरी दुकानदार आठवतात. मग ही अशी गाडी आशयावरून पॉप कल्चर(लोकसंस्कृती{पुन्हा उत्स्फूर्त शब्द...}) वर यायला लागली आणि लघुकथा लिहायचं गांभीर्यच निघून गेलं. मग लोकसंस्कृतीवरून मला पुणेरी पाट्या आनि त्याचं कल्ट असं काय काय आठवावं लागलं आणि कल्टला समानार्थी शब्द मी शोधू लागलो. सगळ्यात जवळ जाणारा शब्द मला दंतकथा वाटतो (इथे मी कल्ट ज्या अर्थी घेतोय त्यासाठी, बाकी कल्टला मिथुनदा हा देखील एक समानार्थी शब्द आहे). तर मी लघुकथेवरून दंतकथेवर आलो. पण तरीही अख्खी पोस्ट लिहावी असं मला ह्यातदेखील काही सुचेना. पण आता एव्हढं लिहिलंच आहे, तर एका छोट्याश्या दंतकथेबद्दल सांगूनच संपवतो.
त्याचं काय आहे. एन. टी. एस. उर्फ नॅशनल टॅलेंट सर्च नावाची एक परीक्षा असते. त्याच्या पूर्वपरीक्षा म्हणजे अनुक्रमे बी.टी.एस. बॉम्बे टॅलेंट सर्च(हे कदाचित आता एम.टी.एस. झालं असेल, पण तसं झालं तर कॉन्फ्लिक्टींग होईल, कसं ते पुढे) आणि एम.टी.एस. (महाराष्ट्र टॅलेंट सर्च, कळलं का कॉन्फ्लिक्ट). तर ह्या बी.टी.एस. चे मुखिया रुपारेल कॉलेजचे एक सर होते. ते इंटरव्ह्यूमध्ये पोरांना तुफान घ्यायचे(नाचीजको पर्सनल एक्स्पिरियन्स है). तर ते आणि त्यांनी घेतलेले विविध इंटरव्ह्यू हा बी.टी.एस. आणि एम.टी.एस. ला बसलेल्या पोरांसाठी एक दंतकथेचा विषय होता. त्यातली एक दंतकथा, ज्याची सत्यासत्यता बिलकुलच पडताळता येणार नाही (फक्त सर सांगू शकतात) पुढीलप्रमाणे.
एकदा सर एका मुलाचा इंटरव्ह्यू घेत असतात. त्यांच्या टेबलावर त्यावेळी एक चीनीमातीचा चहाचा कप ठेवलेला असतो आणि त्यावर एक बशी उपडी असते. ते त्या मुलाला फुल घेत असतात, पण मुलगाही पुरून उरत असतो. अचानक सर त्याला सांगतात,
"बाळ, आता असं कर, ह्या कपातला चहा, त्या बशीला हात न लावता पिऊन दाखव.
तो मुलगा स्टन होतो. विचारमग्न पण दृढ मुद्रेने तो एकदा सरांकडे आणि एकदा बशीकडे बघतो. सर विजयी मुद्रेने एकदा बशीकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहतात. मग मुलगा हळूहळू एकेका शब्दावर जोर देत म्हणतो,
"सर, पण ह्या कपात चहा कुठाय?"
"मग" आता स्टन व्हायची पाळी सरांची असते.
"कप रिकामा आहे सर. ह्यात चहा असता तर मी नक्की पिऊन दाखवला असता." मुलगा त्याच दृढ मुद्रेने म्हणतो.
"मी तुला सांगतो, की कपात चहा आहे. पिऊन दाखव." सर स्वतःला सावरत म्हणतात.
"पण सर मी सांगतोय, की ह्यात चहा नाही."
"तुला कसं माहित, चहा मी मागवलाय." सर रेस्टलेस होतात.
"कळतं सर बघून." तो थोडासा हललेला असतो, कारण कसंही असलं तरी सरांशी पंगा महागात पडू शकतो.
"आहे चहा. पिऊन दाखव."
"नाहीये, तो कप रिकामा आहे."
सर तिरीमिरीतच बशी उचलून त्याला दाखवतात, "हा बघ चहा."
तो क्षणार्धात कप उचलून तोंडाला लावतो.छ्या! एव्हढे विषय सुचूनही धड एका विषयावर पोस्ट नाही झाली.

28 comments:

  1. हा हा प्रोफेटा, एवढ्या विषयांवर धडाधड आणि मस्त लिहूनही तुला जर वाटत असेल की धड पोस्ट नाही झाली तर आम्हाला अशा धड नसलेल्या (म्हणजे 'फक्त मुंडकंच' असलं वगैरे काही नव्हे) पोस्ट्स वाचायला आवडतील.

    शेवटची सरांची दंतकथा भन्नाट !!

    ReplyDelete
  2. वाह, विषय नाही विषय नाही करत बरेच मुद्दे खरडलेस की..हे हे मस्त एकदम..

    ReplyDelete
  3. बा प्रॉफेटा... इतकं (इतके विषय) कसे सुचतात रे बाबा? पोस्ट मस्तंच.. teethstory (दंतकथा) जाम आवडली..

    पुढील पोस्ट साठी विषयः शाळेत झालेले माझे (म्हणजे तुझे) विविध पचके

    ReplyDelete
  4. चहा आणि कपाची गोष्ट फर्मास! आणि खजूर पक्ष, वा!

    ReplyDelete
  5. baaaaaaap shtory at the end !!!!
    Personally my experience of NTS interview is also not that good. I got screwed up very well by all examiners.

    Aani kharach laghukatha mhatla ki vijaystambh hi ekamev katha aathavate. Mhanje manatalya manaat laghukatha=vijaystambh asa smaeekaranach zhalay tayaar. Tasa anakalaneeya mhatla ki "kosla" ya kadambarivarun ghetalela dahavitala dhada aatahavato..

    - Onkar

    ReplyDelete
  6. हाहा..धन्यवाद हेरंब!
    अरे ती दंतकथा मनात अगदी ठसलीय बघ...झोपेतून उठवूनही कोणी विचारलं तरी मी घडाघडा म्हणून दाखवेन!

    ReplyDelete
  7. धन्यवाद सुहास,
    खरंच विषयविस्तार सुचत नव्हता. मग ह्या न सुचणार्‍या विषयविस्तारावरच पोस्ट झाली.

    ReplyDelete
  8. हाहाहा आनंद..TEETHSTORY..हे आवडलं...
    हेरंब, आदिच्या दातांवर काही येणार असेल पुढे, तर हे नाव घे!
    शाळेत झालेले विविध पचके ह्यावर मला अनेक भागांची एक मालिका चालवावी लागेल(दुर्दैवाने, मला फक्त हे असलेच प्रसंग ठळकपणे आठवतात).

    ReplyDelete
  9. Anonymous,
    काल अगदी डायेट पोस्ट झाली. चहा आणि खजूर!
    प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  10. ओंकार,
    मी NTS पर्यंत पोचलोच नाही, पण बीटीएस आणि एमटीएस नेच मला पूर्ण अनुभूती दिली होती.
    बाकी आपल्या पुस्तकांमधलं धड्यांचं सिलेक्शन हा पी.एच.डी. चा विषय होऊ शकतो किंवा सपट परिवार महाचर्चेचा.
    बाय द वे, आत्ता मला स्ट्राईक झालं, शेवटच्या दंतकथेवर लघुपट काढला, तर सपट परिवारला आपण स्पॉन्सरर म्हणून घेऊ शकतो.
    प्रतिक्रियेबद्दल आभार! :)

    ReplyDelete
  11. मस्तच रे !
    कपबशी आणि चहाची गोष्ट तर अफलातूनच.
    पण मला हे कळत नाही...चहा ’पिऊन दाखव’
    आता प्यायल्यावर कसा दाखवणार? ;)

    ReplyDelete
  12. हाहा काका..
    माझ्या डोक्यात हे आलंच नाही..त्या मुलालापण सुचलं नसणार...;)
    प्रतिक्रियेसाठी आभार काका!

    ReplyDelete
  13. Hehehehe....Bhaaarrriii....!!!
    Shevatachi dantkathaa mastach.... :)

    ReplyDelete
  14. ब्लॉगवर स्वागत मैथिली..आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  15. माझी अवस्था शंभर टक्के अशीच होती आज! "काही सुचत नाहीये" या विषयावरच पोस्ट टाकणार होतो. त्याआधी इतर ब्लॉग्स वाचता वाचता तुझ्या ब्लॉगला भेट दिली आणि पाहतो तर काय? तु आधीच सगळं लिहुन ठेवलं आहे :-( मग शेवटी प्रतिक्रियाच लिहिली. (उगाच मी याच विषयावर लिहिलं तर माझा ब्लॉग "पुन्हा चोरशील" वर यायचा ही भिती) मस्त झाली आहे पोस्ट!

    ReplyDelete
  16. अरे काल अगदीच काही सुचत नव्हतं. तुलाही तसंच झालं म्हणजे कमाल आहे.
    बाकी त्या पुन्हा चोरशीलचा महिमा काय वर्णावा.
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  17. विद्या, अरे त्याच्या दातांवर 'एक(चि)दंत' आणि 'एक चावदार संक्रमण' आहेत ऑलरेडी. अजून एक लिहिला तर लोक बॅन करतील मला मराठी ब्लॉग्स विश्वातून ;)

    @अभिलाष, कॉफीत पेस्ट टाकायला हरकत नाय. फक्त पोस्ट खाली बाबा/प्रोफेट/विभि (किंवा गेला बाजार 'मिथुनदा') यातलं एक काहीतरी असलं म्हणजे झालं.. मग नाही येणार 'पुन्हा चोरशील' वर ;)

    ReplyDelete
  18. विधाधरा, अरे एका दगडात किती पक्षी मारलेस तू... सही आहे रे...एकदम सही! दंतकथा मस्तच. हुजूर आणि मजूर अन खजूर तर भारीच... पुढच्या नंबराविषयी शांतं पापं!:D असाच मधून मधून तुफान पकत राहा.... :)

    ReplyDelete
  19. हाहा..हेरंब..त्या वाचल्यात मी ऑलरेडी..पण म्हटलं अजून येतील तेव्हासाठी..आणि तसंही, त्याचे दुधाचे पडून चहाचे येतील, तेव्हा नक्कीच करू शकतोस तू पोस्ट....

    ReplyDelete
  20. धन्यवाद भाग्यश्रीताई...
    सहसा मी लोकांना पकवतो..माझे खुद्द पकण्याचे प्रसंग विरळाच ;)

    ReplyDelete
  21. नाही नाही करता ..बरच काही लिहुन गेलात बुवा..मस्तच..

    ReplyDelete
  22. देवेंद्र...
    ब्लॉगवर स्वागत. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..बाकी आपली काकांच्या मठात भेट होईलच! ;)

    ReplyDelete
  23. बघ म्हणजे, नाही म्हटलं तरी आज मला काही सुचत नाहीये या विषयावर सुद्धा लिहीणं शक्य असतं. हा, हा.

    ReplyDelete
  24. कांचन ताई, ब्लॉगवर स्वागत!
    हो, ते मात्र खरं..पोस्ट तशीच झाली खरी! :)
    प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  25. हुजूर, मजूर,आणि खजूर...हा हा हा....सॉलिड यमक साधलंय....:)

    ReplyDelete
  26. धन्स अपर्णाताई!...:)

    ReplyDelete
  27. संकेत आपटे3:50 PM

    त्या पूर्वोल्लिखित (मला असले उत्स्फूर्त शब्द सहसा सुचत नाहीत, पण आजचा सगळा दिवस प्रस्तुत महाजाललेखकाचा (आणखी एक उत्स्फूर्त शब्द!) समग्र लेखनप्रपंच (लालूप्रसाद यादवांना ज्या रेटने मुलं होतात, त्या रेटने मला उत्स्फूर्त शब्द सुचत आहेत आज!!) वाचण्यात घालवल्याचा परिणाम असावा कदाचित...) असो. तर, त्या पूर्वोल्लिखित सरांना स्टन करण्याचा अनुभव अस्मादिकांनीही घेतलेला आहे. माझा BTS चा इंटरव्यू बादवे सरांनीच घेतला होता. 'पुण्यात कोणती नदी आहे?' या प्रश्नाला 'यमुना' आणि 'दिल्लीमधून कोणती नदी वाहते?' या प्रश्नाला 'कृष्णा' हे उत्तर दिल्यावर काही क्षण तिकडे भयाण शांतता होती. 'बॉम्बे टॅलेंट सर्च' या परीक्षेच्या नावातल्या 'टॅलेंट' या शब्दालाच आव्हान दिलं होतं ना मी! या शांततेनंतर पडलेल्या आवाजात सरांनी मला जायला सांगितलं होतं. आणि गंमत म्हणजे तरीही मला BTS मध्ये शिष्यवृत्ती मिळाली होती!!

    ReplyDelete
  28. संकेत,
    उत्स्फूर्त शब्दांची मजाच काही और असते!
    आणि मुलाखत लयच भारी दिलीस तू :P
    अस्मादिकांनीही एक अयशस्वी मुलाखत दिली होती त्यांना..पण मी नापास झालो होतो...
    एक वेगळा अनुभव होता पण ;)

    ReplyDelete