स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

5/20/2010

प्यासा - एक चिंतन

नाही. मी काहीही तिरकस लिहिणार नाहीये.
मला खूप लहान असताना मोठा झाल्यावर काय बनायचंय हे ठाऊक नव्हतं. थोडा मोठा झाल्यावर माझ्या बाबांसारखं व्हायचंय असं वाटू लागलं. पण तेव्हाही ठाऊक नव्हतं, की बाबांसारखं म्हणजे नक्की काय व्हायचंय. मग अजून थोडा मोठा झाल्यावर बाबा जे काम करतात तसंच काहीतरी करायचं असं पक्कं केलं. बाबा त्यावेळी एल.एल.बी.चा अभ्यास करायचे. त्यांची तराजूचं चित्र काढलेली पुस्तकं घरी असायची(आणि ते ती वाचायचे सुद्धा). ती पुस्तकं पाहून आपणही मोठे झाल्यावर ही पुस्तकं वाचायची हे मी ठरवून टाकलं. थोडा अजून मोठा झालो, मग माझा चुलत भाऊ, नोकरीसाठी मुंबईत आल्याने आमच्याकडे काही दिवस राहायला होता. १९९६ म्हणजे संगणक अभियंत्यांच्या गोल्डन पिरियडमध्ये तो संगणक अभियंता झाला होता. लगेच वर्षभरात तो अमेरिकेला गेला. मग मला त्याच्यासारखंच संगणक अभियंता व्हावंसं वाटायला लागलं. ते वेड अगदी दहावी होईपर्यंत होतं. अजूनी आठवतंय, दहावीच्या रिझल्टनंतर आमच्या शाळेच्या एका ट्रस्टींनी मला विचारलं होतं, की तू पुढे जाऊन काय होणार. "कॉम्प्युटर इंजिनियर" हे उत्तर मी उजळलेल्या चेहर्‍याने आणि इंचभर फुगलेल्या छातीने दिलं होतं. त्यावर ते मला म्हणाले होते, "पासपोर्ट काढून ठेव स्वतःचा!"
प्रवाहपतिताप्रमाणे जे जगाने केलं, ते करत गेलो. हाताशी मार्क होते, जे जे उत्तम मिळण्याच्या आवाक्यात दिसत होतं, ते ते करत गेलो. आणि शेवटी अगदी लहानपणी ठरवलेलंच खरं झालं, मी माझ्या बाबांसारखाच इलेक्ट्रीकल इंजिनियर झालो. झालो. नोकरीही लागली. परदेशातही आलो(पासपोर्टचं भाकित). पण.
पण मग मन मागे मागे जातं. सारखा एकच विचार छळतो. आपण बरोबर केलं? हेच करायचं होतं आपल्याला? काम करतो, पण कामात मन नाही लागत. लहानपणापासून कसली आवड होती? तसं बघायला गेलो तर कसलीच नाही. हां, पण लिहायला आवडायचं. आपण लिहिलेलं, आपल्या कविता, लोकांनी वाचाव्यात, कौतुक करावंसं वाटायचं. काही काही वेळी झालंही कौतुक. मग पुढे दहावीला गणितात पार पानिपत झालं, तेव्हा सगळ्या भाषांमध्ये मिळालेले उत्तम गुण आठवतात. संस्कृत शिकायची मनापासून इच्छा होती. पण त्यासाठी आर्टस ला जावं लागलं असतं आणि आर्टस ला गेलो असतो, तर पुढे पोटापाण्याचं काय?
इथे माझी कहाणी प्रातिनिधिक आहे. मी काय करायला हवं होतं, कसं करायला हवं होतं, अजूनी काय करता येईल, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे नाहीत. महत्वाचा आहे तो हा प्रश्न, की एका कलाकाराच्या, खेळाडूच्या पोटापाण्याचं काय? जर एखाद्याला त्याची कला, क्रीडा सोडून काहीच येत नसेल, तर त्याचं काय? हे सगळे प्रश्न आपण डोळे झाकून, ब्रिटीशांनी आपल्यातून दुय्यम मध्यमवर्ग बनवण्यासाठी आपल्यावर लादलेली शिक्षणव्यवस्था स्वीकारल्यापासून सतत ऐरणीवर येताहेत. आपण अजूनी डोळे मिटून बसलोय. मग आपल्यात बुकर का नाही मिळत, आपण ऑलिम्पिक्स मध्ये मागे का असले प्रश्न चघळत बसायचं. त्यावर ३ इडियट्स सारखा मुद्द्याला हात घालणारा पण बराच भरकटलेला सिनेमा आला की त्याच्या हाईपच्या निमित्ताने गरमगरम चर्चा करायची, टीआरपी वाढवायचे आणि विसरून पुन्हा तेच.
हे सगळे मुद्दे मी आत्ता काढण्याचं कारण? गेल्या लेखावर पुष्पराजने एक कॉमेंट केली, त्यात त्याने गुरूदत्त आणि प्यासाबद्द्ल प्रशंसा केली. प्यासा हा माझा वीक पॉईंट. मी पोचलो मागे. प्यासाच्या दुनियेत, विजयच्या दुनियेत. 'प्यासा' हे प्रत्येक कलाकाराचं(प्रवाहापासून वेगळा असणार्‍या प्रत्येकाचं) प्रतिबिंब आहे. १९५७ साली सुद्धा जवळजवळ तेच प्रश्न होते. गुरूदत्तने एका कविच्या प्रेमभंगाचा बॅकड्रॉप घेऊन एक अप्रतिम सिनेमा उभा केला.
सिनेमा सुरूच होतो तो एका बागेत निसर्गाकडे बघत बसलेल्या विजयपासून. निसर्गाची स्तुती करत तो म्हणतो, की इतके सुंदर नजारे आहेत, ह्या निसर्गात सर्व आहे आणि म्या पामराकडे काय आहे देण्यासाठी? - "कुछ आंसू और कुछ आहें" मग विजयची गोष्ट उलगडत जाते. कॉलेजात कवि म्हणून प्रसिद्ध विजय, दुनियेच्या बाजारात पराभूत असतो. त्याच्याजवळ नोकरी नाही. तो नैतिकता मानतो, त्याच्याजवळ त्याच्या कविता आणि प्रतिभेशिवाय काही नाही. त्याच्या प्रतिभेचं, त्याच्या कवितेचं त्याच्या घरीही मोल नाही. त्याच्या घरचे त्याच्या कविता रद्दीत विकतात. दुःखी विजय अजून विमनस्क आहे, कारण त्याची कॉलेजातली प्रेयसी सुरक्षित भविष्यासाठी विजयला सोडून एका प्रथितयश प्रकाशकाशी लग्न करते. मग विजयला भेटते, गुलाबो. त्याच्या शायरीची भक्त. विजय गुलाबोला भेटतो सीनही अप्रतिम. गुलाबो, रद्दीच्या दुकानातून त्याचं पुस्तक घेते आणि त्याची शायरी गात असते. विमनस्क विजय ते ऐकून चक्रावतो आणि तिचा पाठलाग करतो. एकदा पोलीस गुलाबोला हटकतो, तेव्हा विजय गुलाबो आपली पत्नी असल्याचं सांगतो. विजय दुःखामध्ये वहावत कोठ्यापर्यंत जाऊन येतो. विजयच्या नजरेतून आपण तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब पाहत राहतो. अन एक दिवस विजय रेल्वेखाली येतो. गुलाबो विजयची अखेरची इच्छा म्हणून त्याचं पुस्तक पदरचे पैसे देऊन त्याच्या पूर्व प्रेयसीच्या प्रकाशक नवर्‍याकडून छापून आणते. पुस्तक लोकप्रिय होतं. जो तो विजयचा फॅन होतो. पैसे आल्याने वाटेकरी येतात, विजयचा भाऊ, मित्र हिस्सा मागायला येतात. आणि विजय परत येतो. त्याच्या शोकसभेलाच जिवंत विजय येऊन सांगतो, की मी जिवंत आहे. पण पैश्यांच्या लालसेने जेव्हा आधी ओळख नाकारणारे भाऊ आणि मित्र विजयची बाजू घेतात, तेव्हा विजय व्यासपीठावर चढून सांगतो, की मैं वो विजय नहीं हूं!
शेवटी विजय गुलाबोकडे जातो आणि तिला विचारतो, "साथ चलोगी?"
एक प्रश्नही न विचारता आजारी गुलाबो तशीच त्याच्याबरोबर निघते. कुठे? ते गुरूदत्त आपल्यावर सोडतो.
विजयच्या व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे होते. विजय कवि आहे, जो कवितेला उदरनिर्वाहाचं साधन न मानणार्‍या समजाचा बळी ठरतो. विजय सरळमार्गी आहे, जो कपटी कारस्थानी लोकांचा बळी ठरतो. विजय नैतिकतेचा पुजारी आहे, जो प्रॅक्टिकल जगाचा बळी ठरतो. विजय भावूक आहे, जो प्रेयसीच्या कॅलक्युलेटेड प्रेमाचा बळी ठरतो. विजय शेवटीसुद्धा हरतोच, पण ती हार तो स्वतः मान्य करतो, कारण त्याला कंटाळा आलाय ह्या जगाचा. तो कुठे चाललाय हे फक्त त्यालाच माहिती, पण तो आपल्याबरोबर फक्त गुलाबोला नेऊ इच्छितो. तिही आपल्या पवित्र प्रेमाला जागून काहीही न विचारता त्याच्यामागे जाते.
ह्या सिनेमात वाट्टेल तेव्हढा सिम्बॉलिझम आहे, पण कुठेही तो अगम्य होत नाही. विजयचं वेश्यावस्तीत कोलमडून जाणं, विजयचं स्वतःच्याच शोकसभेला जाणं, प्रेमभंग आणि एका वेश्येकडून मिळणारं, तितकंच पवित्र प्रेम. "जाने क्या तूने कही", "जिन्हें नाझ हैं हिंद पर वो कहां हैं", "सर जो तेरा चकराये", "जाने वो कैसे लोग थे जिनके" आणि "ये महलों, ये तख्तों ये ताजों की दुनिया" सारखी अप्रतिम गाणी. "ये हंसते हुए फूल", "ग़म इस कदर बढें", "तंग आ चुके हैं क़श्मकश़-ए-ज़िन्दगी से हम" सारख्या शायरी, रफी, हेमंतदा ह्यांचे आवाज, एस.डी. बर्मनचं संगीत, साहिरची गीते आणि लेखक अब्रार अल्वी, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता गुरूदत्त ; बस ह्यापेक्षा जबरदस्त कॉम्बिनेशन असूच शकत नाही.
सिनेमाचा आणि माझ्या सुरूवातीच्या फ्रस्ट्रेशनभर्‍या प्रस्तावनेचा कितपत संबंध आहे हे सिनेमा बघून तुमचं तुम्ही ठरवा. मी आपला माझा दृष्टिकोन मांडला. कारण माझं आणि प्यासाचं नातं दृढ असण्याचं तेच एक महत्त्वाचं कारण आहे. मी विजयच्या एका अंशामध्ये स्वतःला पाहतो.

अद्यतन - नजरचुकीने मी लेखकही गुरूदत्त असंच लिहिलं होतं, ते अब्रार अल्वी असल्याचा बदल केलाय.

16 comments:

 1. विद्याधरा, प्यासा बद्दल तुझं चिंतन जितकं पटलं त्यापेक्षाही अधिक उत्तम पहिला भाग वाटला.

  ब्रिटीशांनी आपल्यातून दुय्यम मध्यमवर्ग बनवण्यासाठी आपल्यावर लादलेली शिक्षणव्यवस्था

  एकदम पटले...

  ReplyDelete
 2. अरे आनंद तो पहिला भाग स्वानुभवाचा आहे. अगदी आतून आलेला.

  ReplyDelete
 3. लहानपणी तर मी पण किती जॉब/नोकर्‍या बदलल्या काय सांगू...पोलीस होऊन गुंडाना मारेन, किवा रस्त्यात बनवणारा रोड रोलर ऐटीत फिरवेन, स्वताच हॉस्पिटल काढेन आणि सगळ्यात शेवटी कंप्यूटर प्रोफेशनल :) :) :)
  जोक्स अपार्ट, प्यासा चिंतन मस्त झालाय...आणि प्यासा बद्दल माझ आणि तुझ मत डिट्टो बघ :)

  ReplyDelete
 4. हो रे जस जस मोठ होत गेलो तस लहानपणची स्वप्न बदलत गेली.

  आणि प्यासा बद्दल काय बोलायचं आता तू एवढ सगळ सांगितला आहेस ना....

  ReplyDelete
 5. मला प्यासा जेवढा आवडला नाही (म्हणजे खूप नव्हता आवडलेला :) ) तेवढं हे 'प्यासा' चं चिंतन आवडलं. आणि पूर्वार्ध तर उत्तमच.. !!

  ReplyDelete
 6. prachand sunder post aahe....!!! Khoop ch aawadali...
  ब्रिटीशांनी आपल्यातून दुय्यम मध्यमवर्ग बनवण्यासाठी आपल्यावर लादलेली शिक्षणव्यवस्था
  mala sudha patale...

  ReplyDelete
 7. सुहास,
  खरंच प्यासा खूपच युनिव्हर्सल सिनेमा आहे!

  ReplyDelete
 8. सचिन,
  आपल्या निर्णय घेण्याच्या अक्षमतेपेक्षा आपली व्यवस्थाच आपल्या अंतिम निवडीला कारणीभूत ठरते. त्यामुळे प्यासा एव्हढा भिडतो.

  ReplyDelete
 9. हेरंब,
  आनंदला सांगितलं तसं. डायरेक्ट दिल से आल्यामुळे कदाचित.

  ReplyDelete
 10. धन्यवाद मैथिली,
  शेवटी काय आपला निर्णय आपण मनापासून घेणे महत्वाचे, व्यवस्था आपल्यापासूनच बदलायला सुरूवात होते.

  ReplyDelete
 11. सह्ही रे, एकूण ७५% आयटीवाल्यांना आयटीमधे यायचे नव्हते असे माझे मत आहे ते बरोबर आहे असे वाटले :)
  प्यासाबद्दल सुंदरच

  ReplyDelete
 12. प्यासा...चे चिंतन...मान गये...खुप अप्रतिम लिहिले आहे...अवढ चिंतन फ़ार कमी लोकांनी केले असेल....

  ReplyDelete
 13. यॉडॉ,
  अगदी बरोबर मत आहे तुझं...मी तिकडे जाता जाता राहिलो, पण तरीही जागा चुकलोच! ;)

  ReplyDelete
 14. धन्यवाद माऊ,
  आणि प्रतिक्रियेबद्दल आभार...

  ReplyDelete
 15. ’प्यास” मला फार आवडला नसला तरी गुरूदत्तची मी जबरी वेडी. कुछ बात थी गुरुदत्त में। फक्त त्याच्या सारख्या माणसाने जीव द्यावा हे मला आजही सहन होत नाही. हा एकमेव सुटकेचा मार्ग आहे असे त्याला व अनेक थोर लोकांना का वाटते हे कोडे सुटत नाही.
  प्यासाचे चिंतन भावले.

  ReplyDelete
 16. होय भाग्यश्रीताई,
  गुरूदत्तमध्ये एक वेगळीच चमक होती. त्याचा चेहरा जबर बोलका होता. पण त्याची आत्महत्या खरंच विचित्र होती. अतिप्रतिभावंत माणसांना अपरिमित मानसिक आंदोलनांचा शापच असावा, त्यातलाच गुरूदत्त होता.
  असो.

  ReplyDelete