6/15/2010

लेख आणि लेखावरच्या प्रतिक्रिया - वाईड ऍन्गल!

हल्ली एका गाजलेल्या वर्तमानपत्राच्या संस्थळावर एक सदर येतं, ज्यात लोक आपले अनुभव वगैरे लिहून पाठवतात. आता सामान्य माणूस लिहिणार म्हणजे, ते काय वर्ल्डक्लास लिखाण नसणार. लोक जमेल तसं पाठवतात हौसेने. पण तिथे काही नेहेमीचे कॉमेंटणारे शिलेदार असतात, जे दांडपट्टे घेऊन तयार असतात. आला लेख की पावनखिंडीतले बाजीप्रभू चाट पडतील अश्या त्वेषाने हे लोक लेखावर तुटून पडतात. पार चिंध्या करून ठेवतात. एखाद्या सदगृहस्थाने चुकून जर स्वतःच्या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचल्या, तर तो उभ्या आयुष्यात लेखणीला हात लावायचा नाही. बरं बरेचसे लोक टोपणनावांनी कॉमेंटतात. त्यात एकच माणूस वाट्टेल तितक्या नावांनी कॉमेंटतो. एकंदरित मजा येते. पुलं 'असा मी असामी'त म्हणतात, 'नारदाच्या वाक्याला टाळी आमच्या बाबांनी घेतली' तसं, लेखापेक्षा प्रतिक्रिया वाचूनच जास्त करमणूक होते.

इथे सगळ्यांना कल्पना यावी म्हणून मी एक काल्पनिक लेख आणि त्यावरच्या काल्पनिक प्रतिक्रिया लिहितोय. ह्यातलं काहीही मूळ संस्थळावरून घेतलेलं नाही. सगळंच्या सगळं काल्पनिक आहे. कुठल्याही जीवीत अथवा मृत व्यक्तीशी ह्यातल्या कशाचाही संबंध नाही.



ती घटना आजही उडवते थरकाप!

मनोज के., लातूर

(इथे एक कार्टून, ज्यात एका १०-१२ वर्षांच्या मुलावर हल्ला करणार्‍या कुत्र्याचं विनोदी चित्र आहे.)

ही घटना साधारण २० वर्षांपूर्वीची असेल. तेव्हा मी चार-पाच वर्षांचा असेन. मी आपल्या आईसोबत मोठ्या भावाला सोडायला शाळेत चाललो होतो. त्याकाळात आम्ही सातार्‍यात राहायचो. वरच्या गुरूवार पेठेतून न्यू इंग्लिश स्कूलला जायचा रस्ता छोट्या गल्ल्यांमधून जायचा (कदाचित अजूनही जात असेल). ह्याच छोट्या गल्ल्यांमध्ये सहसा आम्ही गोट्या खेळायचो. म्हणजे माझा मोठा भाऊ खेळायचा आणि मी कच्चा लिंबू.

तर आम्ही तिघेजण रस्त्याच्या कडेने चाललो होतो. त्यावेळी रस्त्याच्या कडेने चालणं शक्य होतं, कारण लोकांकडे आजच्यासारख्या वाट्टेल तेव्हढ्या गाड्या नव्हत्या. त्यावेळी दुचाकी असणं म्हणजे सुखवस्तू असण्याचंच लक्षण होतं. आमच्या बाबांकडे तेव्हा प्रिया स्कूटर होती. म्हणजे ती आजही आहे आणि चांगली चालते. बाबांनी आणि त्यानंतर मी आणि भावाने ती व्यवस्थित ठेवली ही एक गोष्ट आणि प्रिया ही स्कूटर कंपनी चांगल्या स्कूटर बनवायची ही दुसरी गोष्ट. कुठलीही गोष्ट व्यवस्थित सांभाळून ठेवायची ही सवय आम्हाला आमच्या आजोबांकडून मिळाली असावी. त्यांनी इंग्रजांच्या काळात विकत घेतलेलं पॉकेट वॉच आजही व्यवस्थित चालत आहे. बाकी प्रिया ही स्कूटर कंपनी बंद का पडली हे मला कळत नाही, कदाचित त्यांना स्पर्धेला तोंड देता आलं नाही.

तर मुद्दा हा की, त्याकाळात रस्त्याच्या कडेने चालणं शक्य होतं, कारण लोकांकडे आजच्यासारख्या वाट्टेल तेव्हढ्या गाड्या नव्हत्या. आणि लोकांना त्या वाट्टेल तश्या वाट्टेल तिथे लावायच्या सवयीसुद्धा नव्हत्या. त्यामुळे आम्ही तिघे (मी, आई आणि भाऊ) रस्त्याच्या कडेने शाळेकडे चाललो होतो. भावाची पाटी-पुस्तक त्याच्या दप्तरात होते. सहसा तो जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याचे पाटी-पुस्तक जसे च्या तसे असत, तो शाळेत काय पाट्या टाकायचा कुणास ठाऊक. जशी गाडी नेहमी काढतात, स्लॅब नेहमी पाडतात, समिती किंवा चौकशी बसवतात, तश्या पाट्या नेहमी टाकतात असे का? हे मला आजतागायत कळलेले नाही. असो.

तर माझ्या भावाच्या दप्तरात त्याचे पाटी-पुस्तक होते. चालताना त्याला ठेच लागली आणि तो पडला. त्याचे दप्तर मात्र आईच्या हातात असल्याने पडले नाही. आई त्याला उचलण्यासाठी वाकली, तेव्हा दप्तरातून खडू पडले. आता रडणार्‍या भावाला गोळी आणि एक खडू घेऊन देणे भाग असल्याकारणे घाईगडबडीत ती शेजारच्या वाण्याच्या दुकानाकडे वळली. भाऊ एकीकडे रडत होता आणि मी लहान होतो त्यामुळे आईचे अर्धे लक्ष आमच्याकडे आणि अर्धे खरेदीकडे होते. तेव्हढ्यात माझे लक्ष कोपर्‍यावर बसलेल्या कुत्र्याकडे गेले. त्याच्यासमोर एक रंगीत कागद पडला होता. माझे बालमन आकर्षिले गेले आणि मी चटकन त्याच्याकडे गेलो. आईचे नेमके तेव्हाच थोडे दुर्लक्ष झाले होते.

मी कुत्र्यासमोर पोहोचलो. कुत्रा पायांत डोके घालून शांत बसला होता. मधेच त्याचे पाय चाटणे चालू होते. त्याचा धपाधप चाललेला श्वासोच्छ्वास मला आजही स्पष्ट आठव्बतो. त्याच्या बरोब्बर समोर तो रंगीत कागद पडला होता. मी तो रंगीत कागद उचलणार एव्हढ्यात कुत्र्याने वर पाहिले. शेजारीच त्याचे हाडूक पडले होते. मी त्याचे हाडूक घेत आहे असे त्याला वाटले असावे त्यामुळे त्याने एकदम माझ्यावर झेप घेतली. तो माझा चावा घेणार एव्हढ्यात कुठूनसा एक दगड भिरभिरत आला आणि कुत्र्याच्या पेकाटात बसला. कुत्रं कोकलत दूर पळून गेलं.

अचानक बसलेल्या धक्क्यातून मी भानावर आलो आणि भोकाड पसरलं. तोवर आईही तिथे पोहोचली. त्या कुत्र्याने त्यादिवशी नक्कीच माझी जीवनयात्रा संपवली तरी असती, नाहीतर आयुष्यभराची खूण तरी दिली असती लचके तोडून. तो संरक्षक दगड माझ्या मोठ्या भावाने मारला होता हे थोड्यावेळाने समजले. मग त्याला एका ऐवजी दोन आणि मला एक अश्या गोळ्या मिळाल्या.

ती घटना आजही काळजाचा थरकाप उडवते. जर माझ्या भावाने प्रसंगावधान दाखवून तो दगड वेळेत मारला नसता तर!

प्रतिक्रिया

कीर्ती - आई गं, केव्हढा बांका प्रसंग. माझ्याही अंगावर शहारा आला.

भुंगा - काही पण! लोक काहीही लिहितात आणि पेपरवाले काहीपण छापतात.

नाम्या - का हो त्या कुत्र्याला दिली की नाही एखादी गोळी, तुमच्या भावाचं रडं थांबवलं ना त्याने!

मुक्ता - तुम्ही तुमच्या पूर्ण लेखात कुत्रा, कुत्रा म्हणता मग मधेच कुत्रं का लिहिता? व्याकरणातलं सातत्य वगैरे काही असतं की नाही?

दुभाष - प्रिया तुम्हीपण एखादी कॉमेंट लिहा ना, किती छान कॉमेंट लिहिता तुम्ही!

चिंतामणराव - पहिली गोष्ट, जर तुमची आई भावाला शाळेत सोडायला चालली होती, तर तुमच्यासारख्या उचापती कार्ट्याला शेजार्‍यांकडे ठेवून का नाही गेली? दुसरी गोष्ट तुम्ही जर रस्त्याच्या कडेने चालला होतात, तर टेक्निकली तुम्ही लहान असल्याने रस्त्याच्या एकदम आतल्या बाजूला असणार ज्याकारणे तुमच्या भावाला ठेच लागण्याची शक्यता कमी होते. तिसरी गोष्ट, तुम्ही दोघेहीजण जर रडण्याएव्हढे लहान होतात, तर तुमची आई तुमचे हात धरायचे सोडून दप्तर धरून कशाला जात होती? चौथी गोष्ट, तुमचा भाऊ आणि तुम्ही नुसत्या गोळीने शांत होत होतात तर तुमची आई गोळ्या घेऊन फिरत का नव्हती? आणि पाचवी व महत्वाची गोष्ट, ४-५ वर्षांच्या मुलाला एव्हढं सगळं आठवतं का?

टोण्या - जियो चिंतामणराव!

वांगं - च्यायला चिंत्या, लय भारी!

उत्तम - चिंतामण, चित्रात मुलगा मोठा आहे, लक्षात राहिलं असेल.

दीप्ती - कसला ऍनॅलिसिस चिंतामणराव, तुफान!

दुभाष - प्रिया कॉमेंट लिहा ना! मी वाट बघतोय!

फेफ्या - अरे ह्या दुभाषला आवरा रे कुणीतरी!

टिपरे - चिंतामणराव तुम्ही नियमितपणे का लिहित नाही, जबरा विनोदी लिहिता राव.

काका - अरे मूळ लेखाबद्दल लिहा काहीतरी, काय चिंतामण चिंतामण, की तोच वेगवेगळे आयडी घेऊन स्वतःची स्तुती करतोय.

चिंधी - कैच्च्याकै, "मी, आई आणि भाऊ शाळेत जात असताना, मी कुत्र्याची खोडी काढली आणि कुत्रा माझ्यावर झेपावला, भावाने दगड मारून वाचवलं" एव्हढं लिहिलं असतं तरी चाललं असतं. सिरियल्स बघण्याचा परिणाम दुसरं काय?

अनिकेत - अहो सातार्‍याचं काय घेऊन बसलात, आमच्या पुण्यात तर कुत्रा पार्क करायला पण जागा नाही.

उल्हास - खूप उकडतंय....

सासरा - खरं आहे अनिकेत, अहो हे बाहेरचे लोक पुण्यात आले ना त्यामुळे पुण्याचा पार बोजवारा उडालाय.

उन्नती - तुमच्या भावाच्या प्रसंगावधानाचं खरंच कौतुक करावंसं वाटतं.

भोचक - काय च्यायला, हे पुणेकर कुठलीही गोष्ट ओढून ताणून पुणं आणि बाहेरचे लोक ह्यावर घेऊन येतातच. बाहेरच्या लोकांमुळे पुणेकर सुधरावेत ही अपेक्षा.

एक पुणेकर - भोचक, तुम्ही पुण्यात बाहेरून आलेले दिसता. चालू दे तुमचं!

विदर्भवनराज - पुणेकर पुण्याबाहेरचं काही बघू शकत नाहीत का? सारखं काय कुठेही पुणे पुणे. काय एकच शहर आहे काय जगात. उद्या न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनबद्दल कुणी लिहिलं तर हे लोक, कोरेगाव पार्कचा रेफरन्स देतील. रिकामटेकडे लोक!

कुचका - माझ्या ह्याआधीच्या दोन कॉमेंट्स दिसतच नाहीत. पेपरवाले फक्त लेखाच्या स्तुतीपर कॉमेंट छापतात काय?

डोंगळे - काय हो विदर्भवनराज. तुम्ही किंवा तुमचा मुलगा, मुलगी-जावई कुणी अमेरिकेत राहतं काय?

काळे - तुमचा आणि तुमच्या भावाचा एखादा फोटो असला(आणि त्यात दत्तगुरूंसारखा पायाशी तो कुत्रा असला तर उत्तम) पाठवून द्या. देवघरात लावतो.

सीताफळ - डोंगळे. आवडलं आपल्याला. तरीच म्हणतो अजून कोणी अमेरिकेपर्यंत कसं गेलं नाही!

कायकायएकएकलोकअसतात - तुमच्या आजोबांनी इंग्रजांच्या काळात पॉकेट वॉच घेतलं होतं, तुमच्या बाबांनी २० वर्षांपूर्वी प्रिया स्कूटर घेतली, ह्याच्याशी आम्हाला काय करायचंय. काहीतरी फालतू लिहून तुमचा आणि आमचा वेळ कशाला वाया घालवता.

उडाणटप्पू - मुद्दा सोडून लिहिण्यात तुमचा हात कुणीही धरू शकत नाही. प्रिया कंपनी काय, आजोबांचं पॉकेट वॉच काय. तुम्हाला दुसरी कामं नाहीयेत का हो. कुत्रा तुम्हाला न चावता ही अवस्था, चावला असता तर आम्हाला काय काय वाचावं लागलं असतं.

ओर्गा सारळकर इस्रायल - तुम्ही लहान असून तुमच्या आईने तुमचा हात का धरला नव्हता. असो. पण खरंच तुमच्या भावाच्या प्रसंगावधानामुळे तुम्ही वाचलात. त्याचे तुम्ही जन्मभर ऋणी राहायला हवं, हे माझं मत आहे. ओर्गा सारळकर इस्रायल.

टकले - कळशी लावा नळाला. पाणी आलंय...

पिल्लू - हा/ही ओर्गा सारळकर जाम डोक्यात जातो/जाते.

उस्ताद - लेखापेक्षा कॉमेंट्स भारी आणि फोटो लय भारी!

निषाद - ओ ओर्गाबाई, सारखं काय ते नावापुढे इस्रायल इस्रायल, कोणीतरी खेडेगावातला माणूस फॉरेनला गेल्यासारखं वाटतं.

कल्पना - काय गं बाई त्या आईवरचा प्रसंग!

(बाकी, एका गाजलेल्या हिंदी वर्तमानपत्राच्या संस्थळावरसुद्धा एक सदर चालतं, ज्यात लोक नातेसंबंधांबद्दल चित्रविचित्र(सहसा विचित्र) प्रश्न विचारतात आणि लोकांचे अभिप्राय मागवतात. आता तुम्ही लोकांचे अभिप्राय मागवले म्हणजेच 'आ बैल मुझे मार!'. तिथे तर उदंड कापाकापी चालते. त्याचा सॅम्पल लेख(आणि प्रतिक्रिया) जागेअभावी आणि परिणाम गडद होण्यासाठी पुढच्या वेळी!)

69 comments:

  1. च्यामारी... मी चुकून 'माजबोली' वाचत असल्याचा भास झाला. हे म्हणजे 'माजबोली'चं वृत्तपत्रीय स्वरूप झालं. तिकडेही प्रतिक्रिया देणार्‍यांची नावं आणि त्या प्रतिक्रिया अशाच अगम्य आणि विषयाला सोडून असतात !!!!!!!!

    ReplyDelete
  2. मध्यंतरी वाचलं होत की लेख प्रकाशित करणारे आणि लेखावरच्या प्रतिक्रिया प्रकाशित करणारे संपादक वेगळे आहेत.. कदाचित हा त्याचाच तर घोळ नसेल...

    ReplyDelete
  3. ek punekar: हे मात्र बर झालं, नाहीतर मला अन्न गोड लागत नव्हतं

    ReplyDelete
  4. मी तर बर्‍याच वेळा मा.बो. वरून पळून आलोय...!
    ते लोक मला वाटतं उपग्रहात बसून एकमेकांशी बोलतात की काय कोण जाणे...जमिनीवरल्या लोकांशी काही मेळच नसतो..!

    सहीच निरिक्षण..!

    ता.क.: हा ब्लॉग माझ्या ब्लॉगसूचित जोडला आहे.

    ReplyDelete
  5. ओ हेरंबराव...हे काय? माजबोली?? क्लिअर करा एकदा!

    ReplyDelete
  6. दर्जेदार !

    लेख जमलाय एकदम ! एकदम त्याच वर्तमानपत्रातील लेख आणि प्रतिक्रिया वाचल्याचा भास झाला.

    ReplyDelete
  7. तुझ्यावर कॉपीराईटची गदा येणार रे.. भार्री जमलाय लेख.. भलत्याच बारकाईने वाचतो रे तू...
    लेखातल्या लेखा पेक्षा लेखातल्या प्रतिक्रिया भारी ...

    ReplyDelete
  8. काय हो तुम्हाला काय काम नसतात काय. एवढ्या बारकाईने तुम्ही रोज पेपर वाचता का ?

    आणि हो आज जेवणात काय होत तुमच्या ?


    ता.क. : विभी हलकेच घेणे.

    ReplyDelete
  9. Anonymous11:21 AM

    डिक्टो लिहिलंय तुम्ही, त्यातून हि "दुभाष - प्रिया कॉमेंट लिहा ना! मी वाट बघतोय!" हे तर अगदी तुफान...
    अगदी त्याच स्थळावरचा लेख वाटतोय, हा लेख प्रसिध्द करा तिथे, तुम्ही लिहिलेल्या comments वर पण तश्याच comments येतील...

    ReplyDelete
  10. Anonymous11:30 AM

    बाहेर किती पाउस पडतो आहे...ते वर्तमानपत्र काय चाटायच आहे हया पाउसात...@ कॅनव्हास,विभींना हलकेच काय घ्यायला सांगत आहात ते स्पष्ट करावे... :)

    ReplyDelete
  11. एकदम जसच्या तस जमल आहे ....
    भार्री.....

    ReplyDelete
  12. हा हा हा..जबरा. मला वाटलं होतं या विषयावर वटवटची पोस्ट यील आधी पण सही...

    पोस्टमधली पोस्ट, पोस्टमधल्या प्रतिक्रिया आणि मुख्य पोस्टवरच्या प्रतिक्रिया समदंच लय भारी राव...

    ReplyDelete
  13. विद्याधर, तू पण नं आजकाल कायच्याकाय लिहू लागलास :D. हे असे वाण भारी पडतील बर का. गोष्ट आणि कमेंट वाचताना इतकी हसले नं.सहीच जमलयं सगळेच.

    ReplyDelete
  14. काय बोलू नुसता हसतोय..हे हे हे..एकदम फक्कड पोस्ट

    ReplyDelete
  15. आता एकदा idaia tv वरच्या कार्यक्रमाबद्दल लिहा.

    ReplyDelete
  16. तुम्ही एखाद्या गोष्टीची नक्कल फार चांगली करता, गेल्या जन्मी विदूषक होता का हो? ;) :P

    - onkar

    ReplyDelete
  17. च्यामारी या मुंबैकरांना पुणेकरांची नक्कल सोडून काही येत नाही.. कसं का असेना, आमचं ओरिजिनल आहे... ;) :P

    ReplyDelete
  18. विभि, मस्तच. मला त्या वृत्तपत्रांतील पुरवणीतील एक लेख वाचत असल्याचे जाणवत होते. जबरीच. चिंतामणी तूच ना? :-)

    ReplyDelete
  19. विद्याधर, "मुक्त पिटलय" तुम्ही!!!!

    हसून हसून पुरेवाट झाली!!!

    ReplyDelete
  20. हे हे हेरंब,
    माजबोली तर ह्याचे बाप आहेत. हे तर बिचारे दोन तीन वाक्यांमध्ये फाडतात. पुन्हा मोस्टली सगळे टवाळक्याच करताहेत हे कळतं. तिथे मात्र सगळे शहाणे आहेत. घरची फ्रस्ट्रेशन्स काढत असावेत..थोडक्यात हे रस्त्यावरची टवाळ पोरं आहेत आणि ते संसदेतले प्रतिनिधी!

    ReplyDelete
  21. भामुं,
    शक्यता आहे तसं होण्याची...पण त्याने मज़ा कमी होत नाही. ह्या सदरातले काही काही लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया, क्लासिक्स ह्या सदरात मोडतात आणि बर्‍याच जणांच्या बझांवर शेअर केलेल्या दिसतील....;)

    ReplyDelete
  22. धन्यवाद कपिल,
    :P
    खरंच आता नक्की गोड लागायला लागेल!

    ReplyDelete
  23. यशवंत,
    ब्लॉगवर स्वागत!
    खरंच...तिकडून पळून येणे हा राजमार्ग...पण आमच्यासारख्या जीवांसाठी...तिथे अदृश्य राहून वाचन करणे हा वाममार्ग! ;)
    उपग्रहात बसून संवाद, ही बेस्टच उपमा!
    प्रतिक्रियेसाठी आणि ब्लॉग सूचीमध्ये जोडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
    आणि यशवंत,
    ते टोपणनाव आहे..कसलं, विचारू नका...;) (सॉरी हेरंब, तुझ्या ऐवजी मीच उत्तर देतोय)

    ReplyDelete
  24. धन्यवाद अभिजीत,
    ह्या मनोरंजनाच्या अमूल्य ठेव्याची ओळख मला करून देणार्‍यांपैकी तूही एक होतासच. श्रेय तुलाही तितकेच जाते!

    ReplyDelete
  25. आनंद,
    मलाही कॉपीराईटचं टेन्शन आलं होतं...
    म्हणून तो एव्हढा मोठा डिस्क्लेमर मारलाय...इन्स्पायर्ड फ्रॉम रियल लाईफ स्टोरीज...;)

    ReplyDelete
  26. सचिन,
    हपिसात दिवसभरात जेव्हढे 'पेपर' हॅन्डल करतो त्यातला सगळ्यात बारकाईने मी हाच पेपर वाचतो. :)
    जेवणात आमरस पोळी!
    आणि तुला 'हलकेच' घ्यायला मी काय 'खली' आहे का?;)

    ReplyDelete
  27. अमृता,
    धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.
    अगदी तसंच झालंय वाटतंय ना तो भक्तीचा परिणाम आहे.. ;)
    ...मीरा हो गई श्याम म्हणतात ना तश्यागत!:)
    बाकी मीही विचार केला, तिथे लेख पाठवून द्यावा आणि कॉमेंट्स टॅली कराव्या...;)
    खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  28. देवेन,
    खूप पावसात वर्तमानपत्र चाटल्याने आपली भाषा वर्तमानपत्रातल्यासारखी होऊ शकते..;)
    बाकी...हलकेच घेणे अशक्य असल्याची कबुली मी आधीच दिली आहे!;)
    धन्यवाद!

    ReplyDelete
  29. धन्यवाद सागर,
    पारायणांचा परिणाम आहे...;)

    ReplyDelete
  30. अपर्णाताई,
    धन्यवाद...:D
    अगं अगदी बरोबर आहे तुझं..पण तो डायरेक्ट रणांगणात लढतोय...आम्ही बॅकएन्ड..कपडे सांभाळणारे!

    ReplyDelete
  31. भाग्यश्रीताई...:D
    वाटतंच होतं मला...;)..विस्तवाशीच खेळतोय मी...वॉकिंग द फाईन लाईन...
    पण तुम्ही सगळे असताना टेन्शन नाही...:)
    खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  32. धन्यवाद सुहास,
    नेहमी असंच किंवा याहून जास्त हसायचं हसेल, तर मूळ संस्थळाला जरूर भेट दे...हा माझा ट्रिब्यूट आहे त्या संस्थळाला...!!

    ReplyDelete
  33. अनिकेत..धन्यवाद...:D
    हो हो...तो ही मानस आहे एकदा...पण अजून त्या दर्जाला पोचण्यासाठी दांडगा अभ्यास हवा...सध्या भारतात आहे तर तेच करतोय.;)..लवकरच अभ्यास पुरा होईल...

    ReplyDelete
  34. ओंकार,
    अहो गेल्याच का, याही जन्मी तोच आहे...राज कपूरने एव्हढा ग्लॅमराईज केलाय(तीन तीन हिरॉईन्स, त्यातही एक फॉरेनर आणि एक फॉरेनरसारखं बोलणारी) की काही हरकत नाही आपली...:D
    बाकी...
    पुणेकरांइतकं ओरिजिनल तर गंगोत्रीचं पाणीही नसेल, ह्यात वादच नाही!

    ReplyDelete
  35. धन्यवाद अलताई,
    फॅनडम म्हणतात ना, त्याचीच करामत...
    बाकी मी चिंतामणी असतो, तर अजून काय हवं होतं...दुर्दैवाने तितकी प्रतिभा नाही ह्या पामराला...;)

    ReplyDelete
  36. निरंजन,
    धन्यवाद...:D
    ऑफिसात कामाच्या टेन्शनवरचा अक्सीर उतारा आहे तो..ट्रिब्यूट दिला झालं...;)

    ReplyDelete
  37. खुपच सुंदर. हसुन हसुन पुरेवाट. मिपा, मायबोली सगळीकडे हे असेच लेख आणि प्रतिक्रिया असतात. तुमच्या कल्पनाशक्तीला दाद देते मी.
    सोनाली

    ReplyDelete
  38. सही.. एकदम बेश्ट. खूपच मायन्युट ऑब्झर्वेशन आहे.
    प्रत्येक कॉमेंट वाचल्यावर माहिती असलेल्या त्या प्रकारच्या कॉमेंट देणाऱ्यांची नावं आठवली. मस्त जमलाय लेख.

    ReplyDelete
  39. बाबा,
    मा.बो. संसदेचे प्रतिनिधी आहेत तर होऊन जाऊ दे ना अशीच एखादी फर्मास फार्स पोस्ट (अशाच निरिक्षणांसह)! हल्ले आले तर आम्ही आहोतच!

    ReplyDelete
  40. सोनालीताई,
    ब्लॉगवर स्वागत!
    मी फॅन आहे ओरिजिनलचा..त्यामुळे सगळं एकदम आतून आलंय..;)
    बाकी इतर ठिकाणचं साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा...;)
    खूप धन्यवाद...:)

    ReplyDelete
  41. काका,
    ते सगळे नावंही अशी घेतात आणि कॉमेंट्सही असल्या देतात की लक्षात राहतंच...:)
    खूप आभार!

    ReplyDelete
  42. यशवंत,
    तिकडच्यांवर लिहिण्यासाठी अभ्यास करावा लागेल...;)
    आता इतकं सगळं घडतंय की तिकडे सभासदत्व घ्यावं म्हणतोय...ते देतात की नाही बघायचं...;)
    सपोर्टसाठी धन्यवाद!असाच लोभ असू द्या!!:)

    ReplyDelete
  43. अति अप्रतिम... उच्च कल्पनाशक्ती आणि विनोदबुद्धी..
    आपल्याला एक उत्तम लेखक होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!!

    ReplyDelete
  44. btw... या blog वरच्या comments पण blog सारख्याच झाल्यात.....

    ReplyDelete
  45. धन्यवाद अनामिक,
    आपल्यासारख्या मूळ संस्थळाच्या चाहत्याकडून मिळालेली ही पावती बरंच काही सांगून जाते.;)
    कॉमेंट्स बद्दल....:D

    ReplyDelete
  46. जिंकलास रे .. जबर्या लिखाण आणि अर्थात त्या आधी भन्नाट निरीक्षणशक्ती... :) आज पासून तुझा पाठलाग करतोय आणि बाकी ब्लोग्पोस्त वाचून काढतो...
    ... रोहन.. पक्का भटक्या...

    अवांतर: तुझ्या ओळखीच्या सर्व ब्लॉगर्सचे निरीक्षण कर आणि पुढच्या वेळी असे काही लिहिलेस तर त्या सर्वांच्या नावाने कमेंट्स असा काहीसा लेख लिही... मज्जा येईल वाचायला... :)

    ReplyDelete
  47. रोहन,
    ब्लॉगवर स्वागत! खूप धन्यवाद रे.
    आणि ही आयडीया भारी आहे एकदम. डिस्क्लेमर पण भारी मारावा लागेल. करेन नक्की ट्राय एकदा! :D

    ReplyDelete
  48. कपडे सांभाळणारे..ha ha ha...
    Rohan cha maan rakhun kharach ekda lihich dhammal yeil....(majha maan tu aadhich rakhala aahes(tai na mhanun (kansacha vijay aaso...)) tyabaddal khas aabhari....) aata ajun ek kaam kar word verfication kadhun taak..comments takayala kantala yeto...ani ho Milan hun posta takayala jaast wel milele...

    ReplyDelete
  49. नक्की नक्की अपर्णा,
    करीन तोही प्रयत्न...
    बाकी माझ्या ब्लॉगवर पहिल्यांदाच प्रतिक्रियांनी ५०चा आकडा गाठला(अर्ध्या माझ्याच, तरीही) आणि त्यातली ५०वी तुझी..धन्स!
    ते वर्ड व्हेरिफिकेशनचं मिलानला जाऊन बघतो नक्की!

    ReplyDelete
  50. जबर्‍या....एकदम धरून फट्याक!!!

    लय भारी लिहलय रे!!!

    ReplyDelete
  51. योगेश,
    धन्यवाद रे...मूळ सदर वाचून वाचून असलं काय काय लिहायची प्रबळ उबळ आली! ;)

    ReplyDelete
  52. हे कस वाचायचं राहून गेल मधेच ?
    कि पोस्ट लपवून ठेवली होती ?
    पुणेकरांना एवढे भिण्याचे कारण नाही कमीत कमी सातारकडच्या लोकांनी ;)

    ReplyDelete
  53. विक्रांत,
    मी वाचला होता तुमचा 'कुणीतरी आवरा' चा लेख...मस्तच होता..
    पण हे वृत्तपत्रीय स्तंभ म्हणजे डेडली प्रकरण आहे! मी फुल फिदा आहे...त्यामुळेच इतकं जमलं! :P
    इतक्या दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  54. अरे विक्रम जुनी हाय पोस्ट..म्हून दडून गेली आसल!
    बाकी मी अर्धसातार-पुणेकर आहे..कन्फ्युज्ड!

    ReplyDelete
  55. पंकज,
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  56. संकेत आपटे1:27 PM

    जसा विरेंदर सेहवाग खेळताना नेहमी सचिनचा भास होतो, तसा तुझे लेख वाचताना ठायीठायी पुलंचाच भास होतो. हुबेहूब पुलंचीच शैली! मस्तच लिहिलं आहेस. विनोदी लिखाण या नावाखाली लिहिले जाणारे बाष्कळ विनोद आणि पाणचट कोट्या वाचून कंटाळा आला होता. ही पोस्ट वाचून एकदम फ्रेश वाटलं.

    ReplyDelete
  57. संकेत,
    खूप बरं वाटलं!
    कॉम्प्लिमेंटबद्दल खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  58. आत्ता सहज ही लिंक वाचनात आली. तुझ्या या लेखाची ही स्फूर्ती आहे काय?

    http://72.78.249.124/esakal/20100719/4711632484305432417.htm

    ReplyDelete
  59. संकेत,
    अरे ह्या सदरामध्ये असे अनेक लेख आहेत..आणि सगळेच स्फूर्तिदायक आहेत! :P
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  60. Anonymous9:28 AM

    मस्तच लेख लिहिला आहे. :D
    आज इ-दुपार वाचायची गरज नाही.

    ReplyDelete
  61. अर्थांतर,
    ब्लॉगवर स्वागत!
    :)
    प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद!
    भेट देत राहा!

    ReplyDelete
  62. आईशप्पथ... कम्माल... त्या प्रतिक्रिया तुझ्याच खोपडीतुन आल्यात???!!! अशक्य!!! एकाच डोक्यातुन अनेक डोक्यातले विचार!!! तेपण हुबहु... वाह रे वाह!!!

    ReplyDelete
  63. सौरभ,
    माझ्या लेखाची आणि प्रतिक्रिया सगळ्यांची अनेकानेक प्रेरणास्थानं अविरत कष्ट घेऊन त्या वृत्तपत्राच्या इ-आवृत्तीवर आपली छाप सोडतात. मी ह्या लेखाद्वारे फक्त त्या सर्वांना सलाम केलाय!
    कधी बघून ये तिथली काही जुनी उत्तुंग स्मारकं. हल्ली मात्र रया गेलीय पार!
    :D
    धन्यवाद रे भावा!

    ReplyDelete
  64. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  65. एक नंबर!!!

    दुभाष,ओर्गा सारळकर इस्रायल .... जबरदस्त. :D :D

    ReplyDelete