Showing posts with label मजेशीर प्रतिक्रिया. Show all posts
Showing posts with label मजेशीर प्रतिक्रिया. Show all posts

6/15/2010

लेख आणि लेखावरच्या प्रतिक्रिया - वाईड ऍन्गल!

हल्ली एका गाजलेल्या वर्तमानपत्राच्या संस्थळावर एक सदर येतं, ज्यात लोक आपले अनुभव वगैरे लिहून पाठवतात. आता सामान्य माणूस लिहिणार म्हणजे, ते काय वर्ल्डक्लास लिखाण नसणार. लोक जमेल तसं पाठवतात हौसेने. पण तिथे काही नेहेमीचे कॉमेंटणारे शिलेदार असतात, जे दांडपट्टे घेऊन तयार असतात. आला लेख की पावनखिंडीतले बाजीप्रभू चाट पडतील अश्या त्वेषाने हे लोक लेखावर तुटून पडतात. पार चिंध्या करून ठेवतात. एखाद्या सदगृहस्थाने चुकून जर स्वतःच्या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचल्या, तर तो उभ्या आयुष्यात लेखणीला हात लावायचा नाही. बरं बरेचसे लोक टोपणनावांनी कॉमेंटतात. त्यात एकच माणूस वाट्टेल तितक्या नावांनी कॉमेंटतो. एकंदरित मजा येते. पुलं 'असा मी असामी'त म्हणतात, 'नारदाच्या वाक्याला टाळी आमच्या बाबांनी घेतली' तसं, लेखापेक्षा प्रतिक्रिया वाचूनच जास्त करमणूक होते.

इथे सगळ्यांना कल्पना यावी म्हणून मी एक काल्पनिक लेख आणि त्यावरच्या काल्पनिक प्रतिक्रिया लिहितोय. ह्यातलं काहीही मूळ संस्थळावरून घेतलेलं नाही. सगळंच्या सगळं काल्पनिक आहे. कुठल्याही जीवीत अथवा मृत व्यक्तीशी ह्यातल्या कशाचाही संबंध नाही.



ती घटना आजही उडवते थरकाप!

मनोज के., लातूर

(इथे एक कार्टून, ज्यात एका १०-१२ वर्षांच्या मुलावर हल्ला करणार्‍या कुत्र्याचं विनोदी चित्र आहे.)

ही घटना साधारण २० वर्षांपूर्वीची असेल. तेव्हा मी चार-पाच वर्षांचा असेन. मी आपल्या आईसोबत मोठ्या भावाला सोडायला शाळेत चाललो होतो. त्याकाळात आम्ही सातार्‍यात राहायचो. वरच्या गुरूवार पेठेतून न्यू इंग्लिश स्कूलला जायचा रस्ता छोट्या गल्ल्यांमधून जायचा (कदाचित अजूनही जात असेल). ह्याच छोट्या गल्ल्यांमध्ये सहसा आम्ही गोट्या खेळायचो. म्हणजे माझा मोठा भाऊ खेळायचा आणि मी कच्चा लिंबू.

तर आम्ही तिघेजण रस्त्याच्या कडेने चाललो होतो. त्यावेळी रस्त्याच्या कडेने चालणं शक्य होतं, कारण लोकांकडे आजच्यासारख्या वाट्टेल तेव्हढ्या गाड्या नव्हत्या. त्यावेळी दुचाकी असणं म्हणजे सुखवस्तू असण्याचंच लक्षण होतं. आमच्या बाबांकडे तेव्हा प्रिया स्कूटर होती. म्हणजे ती आजही आहे आणि चांगली चालते. बाबांनी आणि त्यानंतर मी आणि भावाने ती व्यवस्थित ठेवली ही एक गोष्ट आणि प्रिया ही स्कूटर कंपनी चांगल्या स्कूटर बनवायची ही दुसरी गोष्ट. कुठलीही गोष्ट व्यवस्थित सांभाळून ठेवायची ही सवय आम्हाला आमच्या आजोबांकडून मिळाली असावी. त्यांनी इंग्रजांच्या काळात विकत घेतलेलं पॉकेट वॉच आजही व्यवस्थित चालत आहे. बाकी प्रिया ही स्कूटर कंपनी बंद का पडली हे मला कळत नाही, कदाचित त्यांना स्पर्धेला तोंड देता आलं नाही.

तर मुद्दा हा की, त्याकाळात रस्त्याच्या कडेने चालणं शक्य होतं, कारण लोकांकडे आजच्यासारख्या वाट्टेल तेव्हढ्या गाड्या नव्हत्या. आणि लोकांना त्या वाट्टेल तश्या वाट्टेल तिथे लावायच्या सवयीसुद्धा नव्हत्या. त्यामुळे आम्ही तिघे (मी, आई आणि भाऊ) रस्त्याच्या कडेने शाळेकडे चाललो होतो. भावाची पाटी-पुस्तक त्याच्या दप्तरात होते. सहसा तो जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याचे पाटी-पुस्तक जसे च्या तसे असत, तो शाळेत काय पाट्या टाकायचा कुणास ठाऊक. जशी गाडी नेहमी काढतात, स्लॅब नेहमी पाडतात, समिती किंवा चौकशी बसवतात, तश्या पाट्या नेहमी टाकतात असे का? हे मला आजतागायत कळलेले नाही. असो.

तर माझ्या भावाच्या दप्तरात त्याचे पाटी-पुस्तक होते. चालताना त्याला ठेच लागली आणि तो पडला. त्याचे दप्तर मात्र आईच्या हातात असल्याने पडले नाही. आई त्याला उचलण्यासाठी वाकली, तेव्हा दप्तरातून खडू पडले. आता रडणार्‍या भावाला गोळी आणि एक खडू घेऊन देणे भाग असल्याकारणे घाईगडबडीत ती शेजारच्या वाण्याच्या दुकानाकडे वळली. भाऊ एकीकडे रडत होता आणि मी लहान होतो त्यामुळे आईचे अर्धे लक्ष आमच्याकडे आणि अर्धे खरेदीकडे होते. तेव्हढ्यात माझे लक्ष कोपर्‍यावर बसलेल्या कुत्र्याकडे गेले. त्याच्यासमोर एक रंगीत कागद पडला होता. माझे बालमन आकर्षिले गेले आणि मी चटकन त्याच्याकडे गेलो. आईचे नेमके तेव्हाच थोडे दुर्लक्ष झाले होते.

मी कुत्र्यासमोर पोहोचलो. कुत्रा पायांत डोके घालून शांत बसला होता. मधेच त्याचे पाय चाटणे चालू होते. त्याचा धपाधप चाललेला श्वासोच्छ्वास मला आजही स्पष्ट आठव्बतो. त्याच्या बरोब्बर समोर तो रंगीत कागद पडला होता. मी तो रंगीत कागद उचलणार एव्हढ्यात कुत्र्याने वर पाहिले. शेजारीच त्याचे हाडूक पडले होते. मी त्याचे हाडूक घेत आहे असे त्याला वाटले असावे त्यामुळे त्याने एकदम माझ्यावर झेप घेतली. तो माझा चावा घेणार एव्हढ्यात कुठूनसा एक दगड भिरभिरत आला आणि कुत्र्याच्या पेकाटात बसला. कुत्रं कोकलत दूर पळून गेलं.

अचानक बसलेल्या धक्क्यातून मी भानावर आलो आणि भोकाड पसरलं. तोवर आईही तिथे पोहोचली. त्या कुत्र्याने त्यादिवशी नक्कीच माझी जीवनयात्रा संपवली तरी असती, नाहीतर आयुष्यभराची खूण तरी दिली असती लचके तोडून. तो संरक्षक दगड माझ्या मोठ्या भावाने मारला होता हे थोड्यावेळाने समजले. मग त्याला एका ऐवजी दोन आणि मला एक अश्या गोळ्या मिळाल्या.

ती घटना आजही काळजाचा थरकाप उडवते. जर माझ्या भावाने प्रसंगावधान दाखवून तो दगड वेळेत मारला नसता तर!

प्रतिक्रिया

कीर्ती - आई गं, केव्हढा बांका प्रसंग. माझ्याही अंगावर शहारा आला.

भुंगा - काही पण! लोक काहीही लिहितात आणि पेपरवाले काहीपण छापतात.

नाम्या - का हो त्या कुत्र्याला दिली की नाही एखादी गोळी, तुमच्या भावाचं रडं थांबवलं ना त्याने!

मुक्ता - तुम्ही तुमच्या पूर्ण लेखात कुत्रा, कुत्रा म्हणता मग मधेच कुत्रं का लिहिता? व्याकरणातलं सातत्य वगैरे काही असतं की नाही?

दुभाष - प्रिया तुम्हीपण एखादी कॉमेंट लिहा ना, किती छान कॉमेंट लिहिता तुम्ही!

चिंतामणराव - पहिली गोष्ट, जर तुमची आई भावाला शाळेत सोडायला चालली होती, तर तुमच्यासारख्या उचापती कार्ट्याला शेजार्‍यांकडे ठेवून का नाही गेली? दुसरी गोष्ट तुम्ही जर रस्त्याच्या कडेने चालला होतात, तर टेक्निकली तुम्ही लहान असल्याने रस्त्याच्या एकदम आतल्या बाजूला असणार ज्याकारणे तुमच्या भावाला ठेच लागण्याची शक्यता कमी होते. तिसरी गोष्ट, तुम्ही दोघेहीजण जर रडण्याएव्हढे लहान होतात, तर तुमची आई तुमचे हात धरायचे सोडून दप्तर धरून कशाला जात होती? चौथी गोष्ट, तुमचा भाऊ आणि तुम्ही नुसत्या गोळीने शांत होत होतात तर तुमची आई गोळ्या घेऊन फिरत का नव्हती? आणि पाचवी व महत्वाची गोष्ट, ४-५ वर्षांच्या मुलाला एव्हढं सगळं आठवतं का?

टोण्या - जियो चिंतामणराव!

वांगं - च्यायला चिंत्या, लय भारी!

उत्तम - चिंतामण, चित्रात मुलगा मोठा आहे, लक्षात राहिलं असेल.

दीप्ती - कसला ऍनॅलिसिस चिंतामणराव, तुफान!

दुभाष - प्रिया कॉमेंट लिहा ना! मी वाट बघतोय!

फेफ्या - अरे ह्या दुभाषला आवरा रे कुणीतरी!

टिपरे - चिंतामणराव तुम्ही नियमितपणे का लिहित नाही, जबरा विनोदी लिहिता राव.

काका - अरे मूळ लेखाबद्दल लिहा काहीतरी, काय चिंतामण चिंतामण, की तोच वेगवेगळे आयडी घेऊन स्वतःची स्तुती करतोय.

चिंधी - कैच्च्याकै, "मी, आई आणि भाऊ शाळेत जात असताना, मी कुत्र्याची खोडी काढली आणि कुत्रा माझ्यावर झेपावला, भावाने दगड मारून वाचवलं" एव्हढं लिहिलं असतं तरी चाललं असतं. सिरियल्स बघण्याचा परिणाम दुसरं काय?

अनिकेत - अहो सातार्‍याचं काय घेऊन बसलात, आमच्या पुण्यात तर कुत्रा पार्क करायला पण जागा नाही.

उल्हास - खूप उकडतंय....

सासरा - खरं आहे अनिकेत, अहो हे बाहेरचे लोक पुण्यात आले ना त्यामुळे पुण्याचा पार बोजवारा उडालाय.

उन्नती - तुमच्या भावाच्या प्रसंगावधानाचं खरंच कौतुक करावंसं वाटतं.

भोचक - काय च्यायला, हे पुणेकर कुठलीही गोष्ट ओढून ताणून पुणं आणि बाहेरचे लोक ह्यावर घेऊन येतातच. बाहेरच्या लोकांमुळे पुणेकर सुधरावेत ही अपेक्षा.

एक पुणेकर - भोचक, तुम्ही पुण्यात बाहेरून आलेले दिसता. चालू दे तुमचं!

विदर्भवनराज - पुणेकर पुण्याबाहेरचं काही बघू शकत नाहीत का? सारखं काय कुठेही पुणे पुणे. काय एकच शहर आहे काय जगात. उद्या न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनबद्दल कुणी लिहिलं तर हे लोक, कोरेगाव पार्कचा रेफरन्स देतील. रिकामटेकडे लोक!

कुचका - माझ्या ह्याआधीच्या दोन कॉमेंट्स दिसतच नाहीत. पेपरवाले फक्त लेखाच्या स्तुतीपर कॉमेंट छापतात काय?

डोंगळे - काय हो विदर्भवनराज. तुम्ही किंवा तुमचा मुलगा, मुलगी-जावई कुणी अमेरिकेत राहतं काय?

काळे - तुमचा आणि तुमच्या भावाचा एखादा फोटो असला(आणि त्यात दत्तगुरूंसारखा पायाशी तो कुत्रा असला तर उत्तम) पाठवून द्या. देवघरात लावतो.

सीताफळ - डोंगळे. आवडलं आपल्याला. तरीच म्हणतो अजून कोणी अमेरिकेपर्यंत कसं गेलं नाही!

कायकायएकएकलोकअसतात - तुमच्या आजोबांनी इंग्रजांच्या काळात पॉकेट वॉच घेतलं होतं, तुमच्या बाबांनी २० वर्षांपूर्वी प्रिया स्कूटर घेतली, ह्याच्याशी आम्हाला काय करायचंय. काहीतरी फालतू लिहून तुमचा आणि आमचा वेळ कशाला वाया घालवता.

उडाणटप्पू - मुद्दा सोडून लिहिण्यात तुमचा हात कुणीही धरू शकत नाही. प्रिया कंपनी काय, आजोबांचं पॉकेट वॉच काय. तुम्हाला दुसरी कामं नाहीयेत का हो. कुत्रा तुम्हाला न चावता ही अवस्था, चावला असता तर आम्हाला काय काय वाचावं लागलं असतं.

ओर्गा सारळकर इस्रायल - तुम्ही लहान असून तुमच्या आईने तुमचा हात का धरला नव्हता. असो. पण खरंच तुमच्या भावाच्या प्रसंगावधानामुळे तुम्ही वाचलात. त्याचे तुम्ही जन्मभर ऋणी राहायला हवं, हे माझं मत आहे. ओर्गा सारळकर इस्रायल.

टकले - कळशी लावा नळाला. पाणी आलंय...

पिल्लू - हा/ही ओर्गा सारळकर जाम डोक्यात जातो/जाते.

उस्ताद - लेखापेक्षा कॉमेंट्स भारी आणि फोटो लय भारी!

निषाद - ओ ओर्गाबाई, सारखं काय ते नावापुढे इस्रायल इस्रायल, कोणीतरी खेडेगावातला माणूस फॉरेनला गेल्यासारखं वाटतं.

कल्पना - काय गं बाई त्या आईवरचा प्रसंग!

(बाकी, एका गाजलेल्या हिंदी वर्तमानपत्राच्या संस्थळावरसुद्धा एक सदर चालतं, ज्यात लोक नातेसंबंधांबद्दल चित्रविचित्र(सहसा विचित्र) प्रश्न विचारतात आणि लोकांचे अभिप्राय मागवतात. आता तुम्ही लोकांचे अभिप्राय मागवले म्हणजेच 'आ बैल मुझे मार!'. तिथे तर उदंड कापाकापी चालते. त्याचा सॅम्पल लेख(आणि प्रतिक्रिया) जागेअभावी आणि परिणाम गडद होण्यासाठी पुढच्या वेळी!)