स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

8/26/2010

आवर रे-१

नावामधला अंक पाहून पळू नका. ही कथा नाहीये! प्रसंगवर्णन आहे. काही वर्षांपूर्वी प्रवीण दवणे 'सावर रे' अश्या नावाचं एक सुंदर सदर पेपरात लिहायचे. त्यावरून हे शीर्षक सुचलंय, ही त्या सदराची पॅरडी, थट्टा, विडंबन, विटंबन वगैरे नाहीये. पण मग हे नक्की काय आहे, ते वाचूनच ठरवा.

बभ्रुवाहन 'कॅफे कॉफी डे' मध्ये त्याच्या मैत्रीणीची वाट पाहत बसला होता. एव्हढ्यात समोरून दृष्टद्युम्न आला. बभ्रुवाहननं इकडे-तिकडे बघण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण दृष्टद्युम्नच्या बाज़ नजरेनं त्याला बरोबर पकडलं आणि समस्त प्रेमी युगुलं, मीटिंग करत असलेले बिझनेसमन आणि पाचकळपणा करत बसलेले कॉलेज ग्रुप्स एकत्रच फ्रीज झाले अशी एक हाळी कॅफे कॉफी डे (ह्यापुढे सीसीडी) च्या आसमंतात घुमली.

"आयला बब्या!"

आता सगळ्याजणांनी 'बब्या' कोण म्हणून बभ्रुवाहनाकडे पाहिलं. चेहर्‍यावर कसंनुसं हासू आणत बभ्रुवाहननं (बब्या) दृष्टद्युम्नाकडे पाहिलं. दृष्टद्युम्न आपल्याच मस्तीत चालत चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं हसू घेऊन बब्याच्या सोफ्यापाशी आला आणि हक्कानं बसला (बब्यानं मोठ्या कष्टानं वेळेच्या तासभर आधी येऊन कष्टानं नजर ठेवून पटकावलेल्या आयत्या सोफ्यावर).

"काय रे बब्या, तू चक्क सीसीडीमध्ये!" दृष्टद्युम्न.

"अरे हळू बोल ना डी." बब्या गयावया करत, इकडेतिकडे बघत म्हणाला. (दृष्टद्युम्न ह्या नावाचा कुठलाही शॉर्टफॉर्म संभवत नसल्याने त्याला सगळेच 'डी' एव्हढंच म्हणतात. नाईलाजाने 'बब्या' देखील.)

"अरे काय तिच्यायला तू पण, भित्री भागूबाई, चुलीपुढे.."

"बरं बरं कळलं."

"काय मग, इथे कुठे?"

"अरे सहज, कॉफी प्यायला!"

"बब्या, सीसीडीमध्ये एकट्यानं कोणी 'कॉफी प्यायला' येत नाही. इथे लोक गप्पा मारून वेळ काढण्यासाठी किंवा तत्सम प्रकारांसाठी येतात, कॉफी जागेचं भाडं म्हणून पितात. एकट्यानं येऊन कॉफी पिउन जाण्याइतकी एकतर कॉफी स्वस्त नाही आणि दुसरं म्हणजे कॉफीसारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी ७० रुपये उगाच मोजणार्‍यातला तू नाहीस."

"बरं बरं. पुरे माझी स्तुती." बब्याचं लक्ष अजून दरवाज्याकडे होतं. मैत्रीण यायच्या आत ही ब्याद घालवणं आवश्यक होतं. "मग तू एकटा कसा काय? की तुझ्याकडे आहे पैसा उडवायला?" कितीही प्रयत्न केला तरी बब्याला डी इतकं तिरकं बोलता येत नसे.

"अरे मी असाच. हा गल्ल्यावर उभा आहे ना, 'अरविंद' तो माझा मित्र आहे." डी गल्ल्याच्या दिशेने बोट करून म्हणाला. बब्यानं पाहिलं, तर गल्ल्यावर तीन माणसं होती.

"डी, अरे तीन जण आहेत, ह्यातला अरविंद कोण?" डीचं लक्ष नव्हतं. तो मेन्युकार्ड वाचण्यात गढला होता. "डी.." बब्यानं अजून एक प्रयत्न केला.

"हं." डीनं वर पाहिलं.

"अरे गल्ल्यावर तीन जण आहेत. ह्यातला अरविंद कोणता?" डीनं बेफिकीरपणे गल्ल्याकडे पाहिलं.

"तो रे! उजवीकडे उभा आहे ना!" असं म्हणून डी पुन्हा मेनुकार्डात गढला.

"अरे पण तुझ्या उजवीकडे की त्या माणसाच्या?" बब्याला खूप इंटरेस्ट आला होता. गल्ल्यावरच्या माणसाशी ओळख असणं भविष्यात उपयोगी पडलं असतं. बब्या आधीच भविष्यात पोचला होता, पण वर्तमानातली मैत्रीण अजून पोचली नव्हती, सीसीडीत.

"अरे तुझ्या उजवीकडे आहे तो." डी नेहमीच्याच शांतपणे, न वैतागता, मेन्युकार्डामधून डोकंही वर न उचलता म्हणाला.

"म्हणजे तो, हिरवा शर्ट?"

"असेल रे. तू कशाला चौकश्या करतोयस एव्हढ्या? इंट्रो करून हवाय का?" डीनं नेहमीप्रमाणेच इंट्रो शब्दावर खोचकपणे भर देत विचारलं.

"कैच्याकै!" बब्या एकदम वरमला. पुन्हा त्याचं लक्ष दरवाज्याकडे जाऊन परत डीवर आलं.

"तू एव्हढं काय वाचतोयस त्यात. काय पाठ करणार आहेस काय मेन्युकार्ड? अरविंदच्या जागी घेताहेत की काय तुला?" बब्यानं सूक्ष्म विनोदनिर्मितीचा प्रयत्न केला, पण डी वर हवा तो परिणाम झाला नाही. त्यानं शांतपणे मेन्युकार्ड बंद केलं आणि टेबलावर ठेवलं.

"काय आहे, मेन्युकार्ड वाचताना मला अचानकपणे काही गोष्टी जाणवल्या!"

"फार महाग आहेत ना सगळ्या गोष्टी! जायचा विचार करतोयस ना तू इथून."

चेहर्‍यावर एक छोटंसं स्मित आणून डी म्हणाला, "मी काय म्हणतो, तू मेन्युकार्ड वाचतोस, तेव्हा उजवी बाजू आधी वाचतोस की डावी बाजू?"

"आयला अरे तो अरविंद बोलावतोय बहुतेक तुला. जा ना भेटून घे त्याला. तुला पुढेही जायचं असेल ना, उशीर होईल रे तुला, माझ्याशीच गप्पा मारण्यात वेळ काढलास तर!" बब्याचा एक डोळा दरवाज्याकडे होता आणि दुसरा डीच्या हालचालींकडे. दोन्ही डोळ्यांना हवी तशी दृश्यं दिसली नाहीत.

"अरे गोली मारो अरविंदको! त्याची ड्युटी बराच वेळ आहे. बीसाईड्स, त्याला माझ्याकडे काम आहे. गरज असेल तर येईल इथे. आणि मला पुढे काहीही कार्यक्रम नाहीये. मी तुझ्याच घरी चक्कर टाकायच्या विचारात होतो."

"तू कॉफी पिणार का?" बब्या डी ला कटवण्यासाठी पैसेही खर्च करायला तयार होता.

"मी पिऊन आलोय घरून. तू मागव पाहिजे असेल तर! पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे!" बब्यानं मनातल्या मनात हिशोब केला आणि त्याचं चित्तपावन मन भारी पडलं, "नाही मला आत्ता थोडी ऍसिडीटी वाटतेय, थोड्या वेळाने घेईन!"

"अरे मग एखादं एरेटेड ड्रिंक घे!"

"नको रे बाबा, होईल सगळं आपोआपच थोड्या वेळात ठीक."

"हं, पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस!"

"कुठला प्रश्न!"

"मेन्युकार्ड वाचताना तू उजवी बाजू आधी वाचतोस की डावी बाजू?"

"तू माझ्या घरी चक्कर टाकणार होतास म्हणालास. काही विशेष काम होतं का?" बब्याला विषय बदलायचा होता, कारण डी जेव्हा असं काही सुरू करतो, तेव्हा त्यात काहीतरी मोठा मुद्दा दडलेला असतो. आणि आत्ता त्याला मोठी चर्चा परवडणारी नव्हती.

"काही विशेष नाही, सहज कॉलेजची बाष्कळ गॉसिपिंग करावीशी वाटत होती."

"काय?"

"अरे काही नाही, ते सोड, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे!" आता अजून तंगवणं शक्य नाही हे उमजल्यानं, बब्यानं पुन्हा एकदा दरवाज्याकडे व्यर्थ कटाक्ष टाकला आणि म्हणाला,

"तुझी उजवी की माझी उजवी!"

"मेन्युकार्डची उजवी-डावी"

"उजवी की डावी?"

"ते उत्तर तू द्यायचंय." कितीही फालतूपणा केला तरी डी विचलित कसा होत नाही, ह्याचं बब्याला नेहमीप्रमाणेच आजही आश्चर्य वाटलं.

"उजवी ऑफकोर्स. मी चित्तपावन आहे."

"हं. मी तुझ्याकडून तीच अपेक्षा केली होती. पण ही चित्तपावनांचीच नाही, तर तमाम मध्यमवर्गीयांची थोड्याफार फरकाने मेंटॅलिटी असते. पण उगाच प्रत्येक गोष्टीला जातीय रंग द्यायची आपल्याला खोड असते."

"मी कुठे जातीय रंग दिला. मी सहज म्हणालो होतो. बीसाईड्स मी माझ्या जातीबद्दल बोललो."

"जातीचा उल्लेख करायची काय गरज होती? आणि तुझी जात म्हणजे काय तू काहीही बोलशील का? मी म्हणू का मी मराठा आहे म्हणजे पैलवानी डोक्याचा असणारच."

"अरे म्हणायची पद्धत आहे. आणि काहीही काय बोललो, मला अभिमान वाटतो मी काटकसरी आहे ह्याचा."

"कसलेही अभिमान बाळगणे ही दुसरी वाईट खोड. उद्या मी म्हणीन मी डोक्यानं विचार करत नाही ह्याचा मला अभिमान आहे."

"आवरा! तू फुकट काहीतरी उकरून काढतोयस. तुला वादासाठी वाद घालायचाय का?"

"नाही, तू मला सोप्पं सांग. तुला मी चित्तपावन आहे हे सांगावंसं का वाटलं?"

"अरे सांगायचं काय आहे? मी आहे हे तुला ठाऊक आहे. बोलायची पद्धत आहे राजा."

"बरी आहे की बोलायची पद्धत. मग आमचे छावा आणि ब्रिगेडचे पब्लिक बोलले की राग येतात तुम्हाला."

"तुमचे ब्रिगेड आणि आम्हाला राग? अरे कैच्याकै काय बोलतोयस तू? ठीक आहेस ना? कालच वर्गात रिताला मराठा ही जात नसून साम्राज्याच्या पाईकांसाठीचा शब्द असल्याचं सांगत होतास!"

"रिताला मधे आणून विषय बदलू नकोस. ब्रिगेडचा कशाला रे राग तुम्हा लोकांना? काय चुकीचं बोलतात ते?"

"काय चुकीचं बोलतात? आवरा, हे तू मला विचारतोयस?"

"इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे?"

"तू पण असला करंटा निघशील वाटलं नव्हतं मला. ती बांडगुळं..."

"बरं ते सोड. मला एक सांग, भगव्या आतंकवादाबद्दल तुझं काय मत आहे? कालच चिदुभाऊ म्हणालेत, की तो आपल्या देशासमोरचं एक मोठं आव्हान बनलाय म्हणून."

"अरे काय चाललंय तुझं? ह्या प्रश्नाचा आधीच्या मुद्द्याशी काय संबंध आहे?"

"अरे तू बांडगूळ म्हणालास त्यावरून एकदम आठवले चिदुभाऊ!"

"तू ठीक आहेस ना?"

"होय, मी आता ठीक आहे." घड्याळाकडे बघत डी म्हणाला.

"म्हणजे?"

"नंदिनीचा आज साखरपुडा झाला." डी बब्याचा चेहरा निरखत म्हणाला.

"क्काय?" बब्या जोरात ओरडला. मगाचचेच लोक पुन्हा फ्रीज झाले, पुन्हा नजरा वळल्या आणि पुन्हा बब्या ओशाळला.

"अरे तिनं मला इथे भेटायला बोलावलं होतं!"

"ठाऊक आहे मला. तुला कुणीना कुणीतरी फोन करून हे सांगितलं असतं आणि तू तिथे जाऊन धिंगाणा घातला असतास म्हणून मी इथे आलो."

"काय संबंध?"

"ती तुझ्या लायक नव्हती हे मला पहिल्या दिवसापासून ठाऊक होतं. तिचं ऑलरेडी अफेयर चालू होतं. तू तिला परीक्षेच्या नोट्ससाठी हवा होतास आणि तू वेडा!"

"मग हे आधीही सांगता आलं असतं ना!"

"तू विश्वास ठेवला असतास माझ्यावर?"

"आता का ठेवू?"

"फोन चालू करून बघ, मित्रांचे मिस्ड कॉल्स मेसेजेस दिसतील. त्यातल्या कुणालाही फोन करून विचार!"

"फोन ऑफ कधी केलास?"

" मेन्युकार्ड वाचायला मला तीस सेकंद पुरतात, पण तुझं लक्ष दरवाज्यापासून गल्ल्याकडे भिरभिरत असताना तुझ्या खिशातून मोबाईल काढून ऑफ करून पुन्हा ठेवायला ५ मिनिटं!" डी मिश्किल हसत म्हणाला.

"अरे पण तुला कसं कळलं ती इथे येणार होती ते!"

"हीच प्रत्येक गोष्टीची चिरफाड करण्याची सवय देशाला घेऊन बुडणार!" डी उठत म्हणाला.

"अरे पण कॉफी तर घेऊ!"

"नको, एक कुकीजचा पुडा घेऊ काऊंटरवरून!"

गल्ल्यावर आत्ता एकच माणूस होता. आणि त्याच्या शर्टावर 'पुनीत' असं लिहिलेला बॅज होता. बब्यानं प्रश्नार्थक नजरेनं डी कडे पाहिलं.

"बाजीप्रभूंनी शिवाजीमहाराजांसाठी प्राण दिले! एव्हढं पुरेसं नाही ना तुम्हा लोकांना? ते कोण, कसे.."

"आवरा!!!"

काहीही क्रमशः नाहीये आणि समाप्तही नाहीये. आता क्रमांकाबद्दल सांगतो. भविष्यात कधी पुन्हा असंच काहीतरी निरूद्देश लिहावंसं वाटलं, तर अनुक्रमांकांची सोय आत्तापासूनच करून ठेवतो.

38 comments:

 1. हे हे वाह...या विभ्याला आवरा !!!
  प्रचंड भारी भाई

  ReplyDelete
 2. "अरे तू बांडगूळ म्हणालास त्यावरून एकदम आठवले चिदुभाऊ!"
  he sagalyat best hot !!

  chimakhadya aksharabaddal kshamasv

  ReplyDelete
 3. हे हे हे
  "अरे तू बांडगूळ म्हणालास त्यावरून एकदम आठवले चिदुभाऊ!"
  लई भारी

  ReplyDelete
 4. सहीच! थोडे खोचक, थोडे शालजोडीतले आणि थोडे मार्मिक. मस्तच.

  सगळ्यात बेष्ट "अरे तू बांडगूळ म्हणालास त्यावरून एकदम आठवले चिदुभाऊ!"

  ReplyDelete
 5. बाबा.. आवरा.. कैच्याकै शालजोडीतले रे... :)

  हातात २ तास आहेत इकडे हॉटेलवर. त्यात पण झोप सोडून मी सर्वांचे ब्लोग वाचत बसलोय. मला सुद्धा एक 'पुराव्याने शाबित करीन' पोस्ट लिहायची आहे... बघू घरी जाऊनच संपेल बहुदा.. :)

  ReplyDelete
 6. आवराsssssssssssssssssssssssss..कैपण हां....भाउ..लय भारी सुचतयं..

  ReplyDelete
 7. आवरा, कैच्याकै, भन्नाट ........

  चिरफाड करायची सवयच लागलीये लोकांना.

  ReplyDelete
 8. >> "अरे तू बांडगूळ म्हणालास त्यावरून एकदम आठवले चिदुभाऊ!"

  बेष्ट. पोस्ट आडस रे...

  ReplyDelete
 9. वाह विभी! मस्त एकदम!

  ReplyDelete
 10. विभिदा कैच्याकै भारी जमलय.....

  ReplyDelete
 11. >>अरे तू बांडगूळ म्हणालास त्यावरून एकदम आठवले चिदुभाऊ

  हे सगळ्यात जबर्‍या आहे....

  अशक्य भारी लिहल आहेस....

  आवरा रे विभ्याला आवरा....

  ReplyDelete
 12. सगळ्यांच्या कमेंट्स परत एकदा... बांडगुळ बेश्ट..

  ReplyDelete
 13. >>>>>बब्याचा एक डोळा दरवाज्याकडे होता आणि दुसरा डीच्या हालचालींकडे. दोन्ही डोळ्यांना हवी तशी दृश्यं दिसली नाहीत.

  मस्त खेळलास शब्दांशी...

  कैच्याकै झालीये पोस्ट.... म्हणजे बाबा पुन्हा सुटलाय त्याला ’आवरू नका’!! :)

  बाकि बांडगुळ कळस!! :)

  ReplyDelete
 14. Part 2 lavkaraat lvkar yeude baabyaa :D

  ReplyDelete
 15. विद्या,
  तू "our ray"
  अस म्हटलं तर वावग ठरणार नाही.अगदी शेवट पर्यंत गुंगवून ठेवलस हे मात्र खंर.

  ReplyDelete
 16. सुहासा,
  खूप खूप धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 17. हाहा हेरंबा,
  अरे तो रिमार्क एकदम आतून आला होता. बाकी, चिमखडे बोल ऐकले होते. अक्षरं पहिल्यांदाच पाहिली ;)

  ReplyDelete
 18. सागर(बाहेगव्हाणकर),
  हेरंबला म्हटलं तसंच, परवा बातमी पाहिली ना टीव्हीवर तेव्हा एकदम दिल से रिमार्क आला होता तो! बाकी दुसर्‍या विषयावर तू इतकं छान ऑलरेडी लिहिलं होतंस त्यामुळे मी आवरलं ;)

  ReplyDelete
 19. श्रीताई,
  आपल्या हातात नाहीतर काय आहे गं. फक्त डायरेक्ट शिव्या घालण्याऐवजी शालजोडीतून द्यायच्या म्हणजे निदान चार लोकांची करमणूक तरी होते आणि आपलाही मानसिक त्रास कमी होतो. :)

  ReplyDelete
 20. रोहना,
  ब्लॉग वाचनाचं व्यसन लागलेलं आहे आपल्या सर्वांना.(थोडी स्वतःचीही लाल करून घेतली) ;)
  अरे आणि पुराव्याने शाबित करून टाक रे लवकर, वाट बघतोय!

  ReplyDelete
 21. माऊताई,
  :D
  रिकाम्या डोक्यात असले विचार येतात, बासुंदी नाही मिळाली की! ;)

  ReplyDelete
 22. सचिन,
  खूप धन्यवाद रे भाऊ!
  चिरफाड खरंच नको तिकडे फार करतात लोक :P

  ReplyDelete
 23. सिद्धार्थ,
  ब्लॉगवर स्वागत!
  प्रतिक्रियेसाठी खूप आभार!
  असाच भेट देत राहा!

  ReplyDelete
 24. अभिलाष,
  खूप खूप आभार भाई!

  ReplyDelete
 25. सागर(नेरकर),
  खूप आभार रे भाऊ :)

  ReplyDelete
 26. योगेश,
  आवरायचा खूप प्रयत्न केला रे...पण मी आवरायचं ठरवलं की अंतर्मन म्हणतं, 'आवरा' आणि मग मी इन्फायनाईट लूपमध्ये जातो...
  आवरा!!! ;)
  खूप आभार रे!

  ReplyDelete
 27. आनंद,
  कधीकधी आपल्यासारख्याच्या तोंडूनही खरं निघून जातं ते असं! ;)

  ReplyDelete
 28. तन्वीताई,
  अगं शब्दच्छल, हा एकच प्रकार बोलताना इमानेइतबारे करतो आणि लोकांच्या शिव्या खातो ;)
  पण लेखनात तेच केलं की वाचायला नेहमीच बरं वाटतं.. :)
  अजब न्याय आहे ना जगाचा! :D

  ReplyDelete
 29. ओंकार,
  खूप आभार रे...
  अरे पार्ट टू जेव्हा सुचेल काही तेव्हा.. तोवर जे सुचेल ते! ;)

  ReplyDelete
 30. विक्रम,
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 31. mynac दादा,
  "our ray" आवडलं! :)
  खूप खूप आभार!

  ReplyDelete
 32. Anonymous10:42 AM

  कसला सुटलायस रे बाबा...भन्नाट एकदम...

  ReplyDelete
 33. देवेन भाई,
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 34. संकेत आपटे9:53 AM

  लई झ्याक आहे. पुलंची आठवण होते वाचताना. In fact, सोन्या बागलाणकराची खूप जास्त छाप आहे दृष्टद्युम्नावर... :-)

  ReplyDelete
 35. संकेत भाई,
  ब्लॉगवर स्वागत!
  अरे मी वाचलं नाहीये सोन्या बागलाणकरचं!
  पण तू खूप मोठी कॉम्प्लिमेंट दिलीयेस...खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 36. स्सुईईईईईंग.... भिंतीवरुन घसरगुंडी करत खाली आलो मी... माझ्या बुद्धीमत्तेला अनझेपेश होतं. :(

  ReplyDelete
 37. सौरभ,
  अरे खूपच आवरा झालं असेल! ;)

  ReplyDelete