10/03/2010

चेहरा

काल ट्रामच्या स्टॉपवर ट्रामची वाट पाहत उभा होतो. अचानक शेजारी कुणीतरी इंग्रजीत बोलल्यासारखं वाटलं. मी एकदम चमकून पाहिलं. एका आफ्रिकन(काळा) माणसाशी कुणीतरी बोलत होतं. मी थोडं वाकून पाहिलं, तर एक भारतीय उपखंडातलासा वाटणारा माणूस होता. तो चेहर्‍यावरून त्रासलेला वाटत होता. मला वाटलं, च्यायला दारूबिरू पिऊन आत्ता भरदुपारी धिंगाणे घालणार की काय! पण त्यांचं बोलणं वेगळ्याच विषयावर चालू असल्याचं माझ्या लगेच लक्षात आलं.

"आय कॅन स्पीक इंग्लिश!" आफ्रिकन.

"गुड! आफ्टर ए लॉन्ग टाईम आय फाऊंड समवन स्पीकिंग इंग्लिश!" आशियाई.

मला त्याचे उच्चार पंजाब किंवा पाकिस्तान बाजूचे वाटत होते. चेहरेपट्टीवरून तो त्याच बाजूचा दिसत होता. पण मी मुद्दामच तिकडे लक्ष नसल्याचं दर्शवत उभा होतो. त्याची नजर माझ्यावर पडू नये किंवा पडलीच तर मी इंग्लिश समजणारा वाटू नये ह्याची काळजी घेत मी संभाषणाकडे लक्ष देत होतो (ऑफकोर्स मी इटालियन वाटणार नव्हतो, पण बांग्लादेशी वाटलो असतो तरी चाललं असतं! )

"आय कॅन स्पीक फ्रेंच, बीकॉज आय वॉज इन फ्रान्स बिफोर, बट नॉट सो गुड इंग्लिश!" आफ्रिकन सांगत होता.

"नाईस, बट यू स्पीक गुड इंग्लिश!" आशियाई.

"रिअली? धीस इज व्हॉट आय रीड." आफ्रिकनानं एक पुस्तक काढून त्याला दाखवलं. ते बहुधा इंग्लिश शिकायचं पुस्तक होतं.

"ओह. गुड!" त्यानं एकदम अधिकारी नजरेनं पुस्तक न्याहाळलं. त्याला बर्‍याच दिवसांनी किंमत मिळाल्यासारखं वाटत होतं.

"आय ऍम रीडिंग धीस, एक्ससीस नंबर फोर!" आफ्रिकन.

"ए..क्स..र..सा..ई..ज" आशियाई.

"एक्ससीस." आफ्रिकन.

"नो नो नो..धीस इज नॉट फ्रेंच..धीस इज इंग्लिश यू रीडिंग..ए क्स र सा ई ज" आशियाई.

"एग्झरसाईज" आफ्रिकन. मी असतो तर इथे त्याची पाठ थोपटली असती. पण...

"एक्सरसाईज" आशियाई. त्यानं त्याला उच्चार शिकवण्याचा चंगच बांधला होता. मलाच आता ऑड वाटायला लागलं होतं. तीन-चार वेळा हेच झाल्यावर शेवटी..

"एक्सरसाईज" आफ्रिकन.

"शाब्बास." मी मनातल्या मनात. "गुड" आशियाई त्याला म्हणाला. मी त्रस्त होऊन इंडिकेटर कडे बघितलं. ट्रामला यायला अजून ३ मिनिटं शिल्लक होती. मला ह्या दोघांच्या पकाऊगिरीचा खरं म्हणजे कंटाळा आला होता, पण इंग्रजीत बोलत असल्याने विशेष लक्ष न देताही मला कळत होतं.

"यू नो, इंग्लिश इज अ नाईस लँग्वेज." आशियाई.

"ह्म्म.." आफ्रिकन.

"बट आय डोन्ट लाईक धीस फ#ग लँग्वेज हियर." आशियाई एकदम फ्रस्ट्रेट झाला होता.

आफ्रिकन हसायला लागला. "व्हाय यू डोन्ट लाईक इटालियन."

"आय डोन्ट नो, आय जस्ट हेट. व्हेन दे से ब्वोनज्योर्नो.. आय फील लाईक रनिंग अवे. आय डोन्ट लाईक धीस लँग्वेज, आय डोन्ट लाईक धीस कंट्री. आय जस्ट वॉन्ट टू रन अवे फ्रॉम हियर." आशियाई. आताशा माझे कान चांगलेच टवकारले गेले होते.

"व्हाय? यू डोन्ट हॅव पेपर्स?" आफ्रिकन.

"येस आय हॅव. आय हॅव माय सोज्योर्नो (इथलं टेम्पररी रेसिडन्ट परमिट). बट दे स्टिल चेक यू एव्हरीव्हेअर. दे गिव्ह यू परमिट ऍन्ड दे चेक यू इन द स्ट्रीट्स. दे थ्रो यू." त्याचा आवाज कापरा झाला होता.

".." आफ्रिकन फक्त बघत होता.

"आय मीन हाऊ कॅन यू थ्रो समवन हू डझन्ट नो द लँग्वेज, हू डझन्ट हॅव मनी, हू डझन्ट हॅव वर्क, हू डझन्ट हॅव हाऊस, ऑन द स्ट्रीट्स.. हाऊ कॅन यू थ्रो देम ऑन द स्ट्रीट्स." त्याच्या आवाजात कडवटपणा आणि हतबलता पुरेपूर भरलेली होती.

"आय डोन्ट वॉन्ट टू स्टे हियर. बट आय ऍम हेल्पलेस. आय कान्ट गो एनीव्हेअर. आय ऍम स्टक हिअर. आय वॉन्ट टू रन अवे. बट आय कान्ट!"

तो बोलत होता, तेव्हढ्यात ट्राम स्टॉपजवळ आली.

तेव्हढ्यात आशियाई आफ्रिकनाला म्हणाला, "यू आर गेटिंग ऑन धीस?" तर आफ्रिकन म्हणाला "नो".

मी चटकन ट्रामेत चढलो आणि खिडकीत बसलो. ट्राम सुटली आणि मी पहिल्यांदाच त्या आशियाईचा चेहरा नीट पाहिला. (इतका वेळ पाहत नव्हतो, कारण तो भारतीय/पाकिस्तानी समजून बोलायला येईल ही भीती.) त्रासलेला आणि थकलेला होता तो. ट्राम पुढे निघाली, पण त्याचा त्रस्त चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हता.

ह्यापुढे जेव्हापण निर्वासित, बेकायदा स्थलांतर, मानवी तस्करी ह्याबद्दल वाचेन किंवा बातम्या पाहिन, नेहमी हाच चेहरा डोळ्यांसमोर येत राहिल.

21 comments:

  1. मला इटलीमध्ये बेकायदा स्थलांतर इ. बद्दल विशेष माहिती नाही..पण असं काही वाचल की Tom Hanks चा Terminal आठवतो...

    ReplyDelete
  2. आज माझी प्रतिक्रिया पहिलीच पाहून कसस होतंय का?? :) म्हणून ही दुसरी......पन्नास भक्तगण झाल्याबद्दल अभिनंदन...i somehow connect sometthing to 50 i guess...marutichi shepti ankhi kunala...:)

    ReplyDelete
  3. You are right. When the problem is personified, our outlook changes. Hope Decision Makers get such opportunities. Human beings are not material entities .. they are LIVING Beings!

    ReplyDelete
  4. बाबा मागे ईथल्या एका पेपरमधे अश्या बेकायदेशीर रहाणाऱ्यांवर किंवा जे येताना तर सगळे सोपस्कार करून आलेत पण नंतर एक्झिट विसा नसलेल्या लोकांबद्दल एक पुर्ण पानाचा लेख आला होता.... ते रहात असलेली घरं त्यांच साधारण जीवनमान.... त्यांना येणाऱ्या अडचणी याबद्दलही लिहीले होते...
    वाईटं वाटतं अश्यावेळी फार.... आपण सुखाने दुसऱ्या देशांमधे रहातो पण माणसाचीच ही अशी असहाय, हतबल अवस्था मनाला चटका लावतेच!!

    ReplyDelete
  5. संजय दत्तचा 'नाम' आठवला...
    http://www.youtube.com/watch?v=anbK1bOCiN8

    ReplyDelete
  6. खरंच यार.. कुठल्या चेहर्‍यांमागे कुठल्या विवंचना असतील ते आपल्याला कसं कळायचं !!!

    ReplyDelete
  7. निर्वासितांची हतबलता नक्कीच मनाला खुप चटका लावुन जाते.

    ReplyDelete
  8. अपर्णा,
    मला एकदमच धक्का बसला... ५० वरून एकदम फर्स्ट! :P
    अगं इटली हे युरोपचं नॉर्थ आफ्रिकेकडूनचं बेकायदा स्थलांतरासाठीचं प्रवेशद्वार आहे! त्यामुळे इथे बरंच चालू असतं त्याबद्दल! म्हणून हा विषय नेहमीच डोक्यात ताजा!
    हॅन्क्स चा टर्मिनल पाहिला नाहीये अजून! पहायचाय! :)
    पन्नासाचं खरंच तुझं काहीतरी कनेक्शन आहे! :D
    खूप आभार!

    ReplyDelete
  9. सविताताई,
    खरं म्हणजे माझ्या डोक्यात ती घटना घडली तेव्हा नक्की कसे विचार आले, किंवा त्यानंतर किंवा हे लिहिताना ते मलाही नक्की कळलं नाही. खूप वेगवेगळे अगदी निर्वासित छावण्यांपासून आपल्याकडे चाललेलं उत्तर भारतीय आक्रमण, प्रश्नाकडे पाहण्याचे दृष्टिकोन इथःपर बरंच डोक्यात आलं होतं. पण मग फार गोंधळ माजल्याने, जे जसं घडलं, फक्त तसंच लिहिलं. स्वतःचं मत मांडलंच नाही!
    खूप गुंतागुंतीचं वाटतं सगळंच प्रकरण! काही गोष्टी कुणाच्याच हातात नसतात असं वाटतं! असो!
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  10. तन्वीताई,
    अगं हो ना! इथे कित्येक डॉक्युमेंट्र्या लागतात. मिडल इस्टमधले मायग्रंट्स हा तर वेस्टर्न मीडियाचा पेट टॉपिक आहे! आणि युरोपमध्ये होणारं नॉर्थ आफ्रिकन आणि एशियन मायग्रेशन! हा प्रश्न खूप गुंतागुंतीचा आणि किचकट आहे! प्रत्येक देशाचे वेगळे नियम, त्यात दहशतवाद, रिसेशन, आणि त्यामुळे बदललेली जनतेची सहनशीलता आणि पर्यायाने जनमत, असे कित्येक कित्येक पैलू आहेत!
    अशा सगळ्या गुंत्यात फक्त माणूस म्हणून कुणी दिसतो आणि क्षणभर आपलं असं काही झालं असतं तर असा विचार मनात डोकावतो, तेव्हा एकदम गोंधळल्यासारखं होतं! परिस्थितीच्या अपरिहार्यतेचं नवल वाटतं!

    ReplyDelete
  11. अनघा,
    नाम पाहिला होता मी फार पूर्वी. मला संजय दत्त आणि कुमार गौरव दोघेही फारसे आवडायचे नाहीत पण हा सिनेमा मला आवडलाही होता!
    खूप खूप धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल!

    ReplyDelete
  12. हेरंब,
    अरे होय ना रे! कुणाची कसली विवंचना तर कुणाची काय काळजी! आपल्या आसपास अनेक चेहरे असतात, पण अचानक कुठल्यातरी चेहर्‍यामागचं सत्य समोर येतं आणि आपल्याला ते सहसा झेपत नाही! बेसिकली समजतच नाही की आपण काय रिऍक्ट व्हावं!

    ReplyDelete
  13. योगेश,
    अरे ह्या विषयावर इतक्या डॉक्युमेंट्र्या, त्यांचं राहणीमान, त्यांचे प्रॉब्लेम्स, हताश हतबलता आणि तेव्हढंच पटणारं टॅक्सपेयर्सचं मत ह्यामध्ये वैचारिक गोंधळ उडतो. मग काही इतक्या जवळून पाहायला मिळालं की सैरभैर व्हायला होतं, बनलेली सगळीच मतं पोकळ वाटू लागतात!

    ReplyDelete
  14. हे असं काही बघितल्यावर वाईट वाटतं ना!

    ReplyDelete
  15. Anonymous6:08 AM

    मी न बघितलेला तो चेहरा मलाही चटका देउन गेला... :(

    ReplyDelete
  16. श्रीराज,
    मला काय वाटत होतं ते मलाच कळत नव्हतं!
    एकदम विचारकल्लोळ झाला होता!

    ReplyDelete
  17. आपल्या देशातून बांगलादेशी कधी बाहेर काढणार काय माहित... :) कुठल्याही देशाने त्यांना रस्त्यावर टाकायचे सोडून ज्या देशाचे ते आहेत तिकडे सोडले पाहिजे... अर्थात त्याच्या देशाने तो तिथलाच आहे हे मान्य करून त्याला आत घेणे हे सुद्धा आलेच... :)
    आपल्या देशातून बांगलादेशी कधी बाहेर काढणार काय माहित... :) कुठल्याही देशाने त्यांना रस्त्यावर टाकायचे सोडून ज्या देशाचे ते आहेत तिकडे सोडले पाहिजे... अर्थात त्याच्या देशाने तो तिथलाच आहे हे मान्य करून त्याला आत घेणे हे सुद्धा आलेच... :)

    ReplyDelete
  18. रोहन,
    अरे विचित्र गुंतागुंतीचं प्रकरण आहे! वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार केल्यावर वेगवेगळे पैलू दिसतात!

    ReplyDelete
  19. Anonymous12:51 AM

    mi tanvishi sahmat aahe,mihi Gremanyt rahate aahe pan asha goshtimule vaet vatach...............

    ReplyDelete
  20. Anonymous,
    आपली हतबलता अजून बोचते, बाकी काही नाही!
    खूप आभार!

    ReplyDelete