10/10/2010

घड्याळ

तो लोकलट्रेनच्या फलाटावरच्या एका बाकावर बसला होता. संध्याकाळचे पाच वाजत असतील. त्यानं हलकेच एक कटाक्ष मनगटावरच्या घड्याळाकडे टाकला.
त्या घड्याळाच्या काचेवरून त्यानं हात फिरवला.
-------------------------------------------------------------------------------
"कसं वाटलं घड्याळ?" ती त्याच्या हातावर घड्याळ बांधत विचारत होती.
"अगं एव्हढं महागातलं कशाला आणायचं गं?" तो सोनेरी घड्याळाच्या काचेवरून प्रेमानं हात फिरवत म्हणाला.
"तू पण इतका अनरोमॅन्टिक कसा रे? आपल्या भेटीच्या पहिल्या वर्षपूर्तीची मी तुला भेट देतेय आणि तू किंमतीचा विचार करतोयस!"
"अगं हो गं! पण संसारपण करायचाय ना सुरू आता!"
"अरे राजा, पण अजून तू माझ्या घरी कुठे आलायस माझा हात मागायला? अजून लग्नही झालं नाहीये. अजून नवरोबापण झाला नाहीयेस. आणि इतक्यातच संसाराचं नियोजन सुरू!" ती नेहमीसारखी खिदळत म्हणाली.
"हस. हस. नेहमीच हसतेस माझ्यावर." तो तोंड पाडत म्हणाला.तशी तिनं हसणं कमी केलं.
"पण गंमत सांगू! हसतेस तेव्हा एकदम गोड दिसतेस!" आता तो हसायला लागला.
"तू पण ना...." तिनं हातातल्या पर्सनं त्याला खोटं खोटं मारलं. आणि हसत हसतच त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. "आता लवकर घरी येऊन माझा हात माग."
"हातमाग? तो कशाला हवाय तुला. आता तर यंत्रमागाचा जमाना आहे!"
"तुला सिरियसनेस नावाचा प्रकारच नाही का रे?" ती थोडीशी खट्टू होत म्हणाली.
"अगं हो गं! सारखी एकच रट लावतेस म्हणून असं म्हटलं. येईन मी ह्या रविवारी नक्की. मलाही घरी बोलायचंय ना गं!"
"कधी बोलणारेस घरी... आज?" ती बोलतच होती. बराच वेळ.
संध्याकाळचे साडेचार वाजत आले होते. दोघेही आज ऑफिसात सुट्ट्या टाकून दिवसभर भेटीची पहिली वर्षपूर्ती साजरी करत होते. पण नेहमीच्या वेळेसच घरी पोहोचणं भाग होतं.
चौपाटीवरून निघून दोघे स्टेशनाकडे आले. एव्हढ्यात स्टेशनात ट्रेन आली. दोघेही धावतपळत ट्रेनकडे निघाले. ती स्त्रियांच्या फर्स्ट क्लासमध्ये चढली आणि हा पुरूषांच्या फर्स्टक्लासमध्ये चढायला धडपड करत होता. गर्दीला रेटत होता. ती मधल्या जाळीतून हा डब्यात चढला की नाही ते पाहत होती. मोठं स्टेशन असल्यानं ट्रेन थोडी जास्त वेळ थांबली होती. पण गर्दीचा रेटा कमी होत नव्हता. तो नेहमीचा असूनही त्याला आज गाडी थांबल्यावर चढत असल्यानं त्रास होत होता. तो कसाबसा मार्ग काढत आत शिरला. आणि जाळीतून तिनं त्याला पाहून सुटकेचा निश्वास टाकला. पण एकदम त्याच्या लक्षात आलं की त्याचं घड्याळ त्याच्या हातावर नाहीये. तिनं आत्ताच दिलेलं घड्याळ! बाहेरच पडलं असावं बहुदा, म्हणून तो पुन्हा गर्दीच्या विरूद्ध जोर लावू लागला. सगळे त्याच्या नावानं शिमगा करू लागले. तिनंही गलका ऐकून पाहिलं, तर हा डब्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता. शेवटी एकदाचा धक्के देऊन तो बाहेर पडला आणि पडलाच. फलाटावरचे दोन-चार लोक त्याच्याजवळ काय झालं म्हणून बघायला आले. त्यानं विलक्षण व्याकुळतेनं सभोवताली पाहिलं. आणि एकदम त्या चमचमणार्‍या गोष्टीवर त्याची नजर स्थिरावली. ट्रेन सुरू झाली. त्यानं चटकन ते घड्याळ उचललं. तेव्हढ्यात कुणाचातरी पाय त्याच्या हातावर पडला. तो वेगानं उठला आणि ट्रेनकडे धावला. पण आता डब्यातले लोक त्याला चढू देईनात. त्याला मगाशी पडल्यामुळे पायाला जबर मार लागल्याचं आत्ता जाणवू लागलं आणि तो धावता धावता थांबला. स्त्रियांच्या डब्यात डोकावून पाहून ती दिसते का पाहण्याचा एक फोल प्रयत्न त्यानं केला. तो जिथे उभा होता तिथेच मट्कन बसला. दोन क्षण त्याला काही सुचेना. तो ट्रेनकडे पाहत होता. ट्रेन धडधडत निघून गेली. त्यानं घड्याळाकडे पाहिलं. त्याच्या काचेवर एक चरा पडला होता.
त्याला एकदम आपल्या थरथरणार्‍या मोबाईलची जाणीव झाली. 'अरे हो, तिला फोन करू शकत होतो की आपण!' त्याला स्वतःच्याच मूर्खपणाचं हसू आलं. तिचाच फोन होता. त्यानं हिरवं बटण दाबलं आणि कानाला फोन लावला.
"हॅलो" तो म्हणाला
"हॅलो..." पुढे फक्त एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला.
-------------------------------------------------------------------------------
स्टेशनात ट्रेन आली. तो चटकन उठला आणि नेहमीच्या सराईतपणानंच भर गर्दीतही तो सहज चढला आणि डब्याच्या मधोमध जाऊन उभा राहिला. लोक चढत उतरत होते. तो निश्चल उभा होता. ट्रेन निघाली. ट्रेन 'ती' विवक्षित जागा पार करत होती. त्यानं गर्दीतही आपला हात वर घेतला. त्यावरच्या घड्याळाकडे त्यानं प्रेमानं पाहिलं.
"काका, मी रोज ह्याच गाडीत असतो आणि रोज तुम्हाला बघतो. तुम्ही नेमक्या ह्याच ठिकाणी घड्याळात बघता. अगदी रोज, न चुकता" गाडीतला शेजारी उभा असलेला एक तरूण त्याला म्हणाला.
तो त्याच्याकडे पाहून फक्त हसला. त्यानं पुन्हा घड्याळाकडे पाहिलं. घड्याळ त्या काचेवरच्या चर्‍यातून जणू त्याच्याकडे पाहून हसत होतं. ते दोघेही तिथेच थांबले होते. गेली कित्येक वर्षं!

49 comments:

  1. Anonymous8:48 PM

    :((

    बाबा आधिचे एक दोन पॅरा वाचून तूला चिडवायचे आता अशी मानसिक तयारी होत होती पण शेवटापर्यंत डोळे पाणावले बघ!!!

    ReplyDelete
  2. काय रे विद्याधर!! :'(

    ReplyDelete
  3. फ़ारच छान...मोजक्या शब्दात बरेच काही सांगुन गेलात...

    ReplyDelete
  4. पोटात एकदम खड्डा पडला वाचून! :(

    ReplyDelete
  5. Anonymous1:13 AM

    अंगावर काटा आला रे....

    ReplyDelete
  6. नाही आवडली

    ReplyDelete
  7. एकदम परिणामकारक झाली आहे कथा.

    ReplyDelete
  8. बाबा,
    तू मला मुंबईतील माझ्या "त्या" दिवसाची आठवण करून दिली.ज्या दिवशी वेस्टर्न रेल्वेला ते लोकल मधले सिरीयल स्फोट झाले होते.त्या दिवशी मी काही एक कामा निमित्त मुंबईत अंधेरी मध्ये होतो.माझे काम झाल्यावर साधारण ६ च्या सुमारास तेथून लोकलने दादरला यायला निघालो.नंतर दादरला पोहोचून पुण्यासाठी गाडीत बसलो नि थोड्याच वेळात गाडीतल्या लोकांचे फोन खणखणू लागले नि चेहरे काळजीयुक्त होऊ लागले नंतर दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली.भीती म्हणजे काय हे त्या दिवशी मी पुरेपूर अनुभवले.ज्या कुटुंबावर त्या अनपेक्षित घटनेने आघात झाला असेल त्याची कल्पना तुझी हि गोष्ट वाचताना मी नक्की करू शकतो.हॉरिबल एवढेच ह्या क्षणी म्हणू शकतो.

    ReplyDelete
  9. हेरंब,
    भापो!

    ReplyDelete
  10. सचिन,
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  11. तन्वीताई,
    अगं शेवट असा सुचला होता की त्याला काऊंटर करायला मला सुरूवात नाजूक ठेवावीशी वाटली! पण प्रत्यक्षात त्यानं शेवटाचा परिणाम अधिक गडद झाला! :(

    ReplyDelete
  12. अनघा,
    काय करू! सुचलंच असं काहीतरी, पण लिहिणं भाग होतं!

    ReplyDelete
  13. प्रसाद,
    ब्लॉगवर स्वागत!
    प्रतिक्रियेबद्दल खूप आभार! असेच भेट देत राहा!

    ReplyDelete
  14. आदित्य,
    ब्लॉगवर स्वागत!
    प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद मित्रा! असाच भेट देत राहा!

    ReplyDelete
  15. विक्रम, मनमौजी आणि संगमनाथ,
    तुम्हा सगळ्यांच्या भावना पोचल्या!
    खूप आभार!

    ReplyDelete
  16. देवेंद्र,
    जेव्हा विचार करताना शेवट मला सुचला तेव्हा विचित्र वाटलं होतं. पण प्रत्यक्ष लिहिताना माझ्याही अंगावर काटा आला होता.
    खूप धन्यवाद रे!

    ReplyDelete
  17. निरंजन,
    खूप खूप आभार!

    ReplyDelete
  18. mynac दादा,
    ती संध्याकाळ भयाणच झाली होती. आम्ही स्फोट झाल्याच्या काही मिनिटांत बोरिवलीच्या पुलावर पोचलो होतो. सगळे खाली पाहत होते. थोड्याच वेळात वातावरणात ताण पसरला होता. तू तर रेल्वेतच होतास, तिकडे कसं वातावरण असेल कल्पनाच नाही करवत! कुटुंबियांसाठी हॉरिबल खरंच!
    :(

    ReplyDelete
  19. एकदम परिणामकारक पोस्ट... :) अनेकांनी हे खरोखर आयुष्यात अनुभवले असेल... :(

    ReplyDelete
  20. हम्म्म्म...

    ReplyDelete
  21. या पोस्टला "घड्याळ" पेक्षा "चरा" हे नाव जास्त शोभलं असतं असं वाटलं मला.

    ReplyDelete
  22. विद्याधर, 'काय करू! सुचलंच असं काहीतरी, पण लिहिणं भाग होतं' हे बरिक मला एकदम पटलं!!! आता मी काही रडकं लिहिलं ना कि मला तुझं हे वाक्य आठवणार! hehe !! ;)

    ReplyDelete
  23. बाबा, काय रे तू पण.. काही क्षण नको असतात रे आठवायला...त्या विधात्याच्या मनातच आहे कोणाची वेळ कधी संपवायची ते :(

    ReplyDelete
  24. छान लिहिलं आहेस रे. हॅट्स ऑफ टू यू...

    ReplyDelete
  25. khoopach karun..

    Ani asa hou shakata he spasht disalyane kaalpanik nahee mhanata yet..

    Chhaan re baba.

    ReplyDelete
  26. बाबा , छान लिहलंस रे !! ही कथा वाचून मला 7G rainbow Colony हा तमिळ सिनेमा आठवला !! हिरो असाच तिच्या आठवणी गोंजारत जगत असतो ती गेल्यावर.. :-(

    ReplyDelete
  27. रोहन,
    खरंच अनुभवलं असेल लोकांनी! हे मला का सुचलं ते मला अजून कळत नाहीये! :(
    खूप धन्यवाद रे!

    ReplyDelete
  28. सौरभ,
    आज सगळीकडे हुंकारच देत आहेस! :)
    आणि योगायोगाने तुझ्या 'हुंकारा' च्या खालीच 'ओंकारा' ची कॉमेंट आलीय! :D

    ReplyDelete
  29. ओंकार,
    खरंच सांगतो पोस्ट पब्लिश करायच्या आधी क्षणभर मलाही चरा हेच नाव द्यायचा विचार आला होता..पण मग शेवटचं जे वाक्य आहे, त्यामुळे मी घड्याळच ठेवलं शेवटी! :)
    खूप धन्यवाद रे!

    ReplyDelete
  30. अनघा,
    :)
    मीही काल विचार करत होतो, की आता कुणालाही असं का लिहिलं, म्हणून विचारणार नाही! :)

    ReplyDelete
  31. सागर (नेरकर),
    भावना पोचल्या रे!

    ReplyDelete
  32. सुहास,
    खरंच रे, आपल्या हातात काही नसतं हा विचारच अपार दुःखावर मात करायला उपयोगी पडतो!

    ReplyDelete
  33. संकेत (आपटे),
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  34. नचिकेत,
    होय, कदाचित थोड्याफार फरकाने काहीजणांची ही खरी कहाणीही असू शकेल!
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  35. संकेत,
    तू लिहिलंस त्या सिनेमाची विकी वाचली. चांगला वाटतोय..सबटायटल्ससकट मिळाला तर बघायला आवडेल!
    खूप धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  36. विभी काय लिहू? १० पैकी १०!

    ReplyDelete
  37. अभिलाष,
    खूप धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  38. छानच.. अगदी मनाला चटका लावून गेली..

    ReplyDelete
  39. मयूर,
    खूप धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  40. Anonymous12:48 AM

    Isi ka nam Jindagi mere dost.......
    Mast lihilay pan manala chataka laun jat

    ReplyDelete
  41. Anonymous,
    खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete