4/05/2011

तो

वैराण रस्त्यावरचा मैलाचा दगड
त्यावर बसलेला तो
आणि जमिनीमध्ये विरघळलेली नजर
डोक्यात केवळ प्रश्न
साथीला भर दुपारी भरून आलेलं आभाळ
आणि तितकंच भरून आलेलं मन
नजर जाईल तिथवर फक्त वैराण रस्ता
पण पावलं पुढं सरकायला नाखुष
अधूनमधून मागे पडलेल्या रस्त्याचा अदमास घेणारे डोळे
कधी काठोकाठ भरून तर कधी कोरडे पडून
अचानकच जसा नेहमी येतो, तसाच
त्याही थांब्यावर 'तो' आला
'ह्या'ला रस्त्याची कधीच गरज का पडत नाही
असा विचारही त्याच्या मनात तरळून गेला
साधंसंच पण आश्वासक हसत त्यानं
खांद्यावर टाकलेला ओळखीचा हात
आणि त्याच्या स्पर्शातली ती ऊब
हजारो जन्मांचा शीण जणू वितळवून टाकणारी
"मागे वळून काय पाहतोस?" 'त्या'नं विचारलं
मागल्या फाट्यावर सुटलेलं बरंच काही आठवलं
"फाटा तरी दिसतो का आता?"
शोधक नजर पुन्हा निराश झाली
"आणि फाट्यापर्यंत पोचेस्तोवरची पावलं?"
निराशेचं रूपांतर वेदनेत झालं
"आता पावलांचे ठसे पाहत अश्रू गाळणार?
की पुढच्या रस्त्यावर नवे ठसे उमटवणार?"
वेदना कमी झाली नाही पण
पुढच्या पावलांसाठीचा जोर आला
नजरेचा मागे वळण्याचा हट्ट कमी झाला नाही
पण पुढे बघायची इच्छा झाली
पुन्हा पुढे वैराण रस्ता, नवनव्या फाट्यांची भीती
मनकवड्या 'त्या'चा हात लगेच पडला खांद्यावरती
पुन्हा ते साधंसंच हसू, 'आहे मी' असं सांगणारं
बिनधास्त पुढे हो असं न बोलून समजावणारं
पावलं पुढे टाकण्याआधी त्यानं 'त्या'ला मिठी मारली
भरून आलेलं आभाळ अखेर एकदाचं बरसलं
वैराण रस्त्याचा दाह थोडा कमी झाल्यागत वाटलं
पहिलं पाऊल टाकून तो एकदा मागे वळला
फाट्याप्रमाणेच 'तो'ही आता तिथे नव्हता
पुढची पावलं टाकताना एकच विश्वास होता
पुन्हा फाटा फुटताना खांदे पडताच सावरायला
'तो' नक्कीच येणार होता

20 comments:

  1. पोरगं लागलं फ़ाट्याला :)
    मस्तच रे विभी , आवडली खुप !!

    ReplyDelete
  2. Anonymous10:20 PM

    मस्त बाबा ...तू चालत रहा असाच सावरायला आहेच 'तो'....

    ReplyDelete
  3. Anonymous10:59 PM

    >>>पुढची पावलं टाकताना एकच विश्वास होता
    पुन्हा फाटा फुटताना खांदे पडताच सावरायला
    'तो' नक्कीच येणार होता :)

    मग काय आमचा बाबा आता काही थांबणार नाही, हो ना :)

    आगे बढो.... ’तो’ आणि हम तुम्हारे साथ है :)
    मस्त रे बाबा....

    ReplyDelete
  4. >>पुढची पावलं टाकताना एकच विश्वास होता
    पुन्हा फाटा फुटताना खांदे पडताच सावरायला
    'तो' नक्कीच येणार होता

    जबर्‍या...हे प्रचंड आवडल...मस्तच :)

    ReplyDelete
  5. अप्रतिम! तुमच्या कवितांचा ओघ खरंच खूपच मस्त वाहतो आहे! शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. सुंदर कविता...

    ReplyDelete
  7. 'भरून आलेलं आभाळ अखेर एकदाचं बरसलं
    वैराण रस्त्याचा दाह थोडा कमी झाल्यागत वाटलं'
    सुंदर!

    ReplyDelete
  8. >> पुन्हा फाटा फुटताना खांदे पडताच सावरायला
    'तो' नक्कीच येणार होता

    बाबा, तुझी कविता वाचून 'तो' तर येईलच पण एखादी 'ती' ही नक्की येईल :P:P:P

    ReplyDelete
  9. विशालदादा,
    अरे फाट्याला लागायचं नाहीये बाबा... रस्त्याला लागायचंय ;)

    ReplyDelete
  10. देवेन,
    धन्यवाद रे भाऊ! :)

    ReplyDelete
  11. तन्वीताई,
    तुम्ही सगळे आहात हा विश्वास तर आहेच गं नेहमी.. पण 'तो' येतो ते अगदी पावसाच्या एकाच सरीसारखा.. अवचित.. :)

    ReplyDelete
  12. योगेश,
    धन्यवाद भावा! :)

    ReplyDelete
  13. विनायकजी,
    खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  14. इंद्रधनू,
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  15. अनघाताई,
    कधीतरी अवचित येतो असाच अनुभव! :)

    ReplyDelete
  16. हेरंब,
    अरे 'ती' आली एकदा की 'त्या'ला यायची गरज राहणार नाही! ;)

    ReplyDelete
  17. मुझे इस पद्य से बचाओ :(

    ReplyDelete
  18. आनंद,
    रिलॅक्स भाऊ! :)

    ReplyDelete
  19. छान,छ्कास,उत्तम ,सुंदर कविता ,

    ReplyDelete
  20. धन्यवाद महेशकाका! :)

    ReplyDelete