4/25/2011

अक्षय कुमार यास अनावृत पत्र

अक्कीदादा (तुझ्याबद्दल प्रचंड आपुलकी वाटते त्यामुळे, तुम्हाला/आपल्याला वगैरे न वापरता थेट अरे दादावर घसरतोय),
तुला मराठी उत्तम कळतं आणि बोलता येतं त्यामुळे बिनधास्त मराठीमध्ये पत्र लिहितोय. बर्‍याच वर्षांपासून तुला पत्र लिहिण्याची इच्छा होती, पण नेहमी काही ना काही कारणामुळे राहून गेलं. प्रत्येक वेळी पत्र लिहिण्याचं कारण आणि विषयही वेगळे होते. आज मात्र अनावृत पत्र लिहितोय कारण मी जे लिहू इच्छितो ते थेट तसंच्यातसं तुझ्या इतर असंख्य चाहत्यांनाही वाटतं.
मी तुझा एक असा पंखा आहे जो कधीच फिरायचा बंद होणार नाही. तुझ्या असंख्य कट्टर चाहत्यांपैकी एक. तुझ्या 'खिलाडी' सिनेमापासून तुझ्याशी जडलेलं नातं 'जीना इसी का नाम है' कार्यक्रमातल्या तुझ्या मुलाखतीनं घट्ट झालं. ही मुलाखत पाहेपर्यंत एक मार्शल आर्ट एक्सपर्ट ऍक्शन हिरो वाटणारा तू थेट आपल्यातला वाटू लागलास. तुझं सामान्य बालपण आणि त्यातनंच पुढे येऊन तू मिळवलेलं असामान्य यश आणि तरीही आपल्या सामान्य बालपणाशी कधीच तुटू न दिलेली नाळ हे सगळं तुझ्याशी कनेक्ट करून गेलं. मग तुझे 'मिस्टर बॉन्ड' पासून ते 'अंगारे', 'जानवर' इत्यादी इत्यादी सारे सिनेमे पाहिले. काहींची नावे विसरलोही असेन, पण टीव्हीवर तुझा सिनेमा आहे आणि मी चॅनेल बदलला असं कधी झालं नाही. तू अनेक सामान्य ते तद्दन भिकार सिनेमे केलेस, हे तू स्वतःही मान्य करतोस. किंबहुना तुझा हाच सच्चेपणा मला भावतो. नसीरूद्दीन शाह हा असामान्य कलावंत तुझ्याबरोबर दोन-तीन मसाला सिनेमांमध्ये होता. तेव्हा तू छोटा स्टार होतास. सुपरस्टार झाल्यानंतर एकदा नसीरूद्दीन शाहनं एका मुलाखतीत तुझा उल्लेख केला होता. तो म्हणाला, "अक्की स्वतः मला म्हणतो की मला ठाऊक आहे मी चांगला अभिनेता नाही, पण मी नेहमीच उत्तम देण्याचा प्रयत्न १०० टक्के करतो. आणि अक्की खरंच सिनेमाला जेव्हढं देतो, जेव्हढी मेहनत करतो ती काबीलेतारीफ आहे." ती मुलाखत पाहिल्यावर मला तुझा आणखीनच अभिमान वाटलेला.
मी तसा एलिटिस्टही गणला जाऊ शकतो असा सिनेरसिक आहे. फेस्टिव्हल फिल्म्स किंवा आर्ट फिल्म्सवर तासनतास विचार करणं आणि मग अगम्य भाषेत लिहिणं हा माझा छंदही आहे. पण तरीही तू माझा आजच्या पिढीतला सर्वांत आवडता अभिनेता आहेस, ह्याचं लोकांना आश्चर्य वाटतं. कधीकधी मलाही वाटतं, पण हे सत्य आहे. एक मिथुनदा आणि त्यानंतर थेट तू. तू केलेली असंख्य लफडीसुद्धा मला तुझा फॅन होण्यापासून कधीच रोखू शकली नाहीत. त्याचं कारण कदाचित हे आहे की तू कधी त्यांपासून दूर पळायचा प्रयत्न केला नाहीस. जे जसं होतं तसंच तू मान्य केलंस. एका वर्षांत अर्धा डझन फ्लॉप सिनेमे दिल्यावर तू एकदा सिनेसंन्यासाची भाषा केली होतीस, पण मग 'जानवर' आला आणि तू निर्णय बदललास. योग्यच केलंस कारण नाहीतर 'हेराफेरी' आला नसता आणि हिंदी सिनेमाला एक वेगळा प्रकार मिळाला नसता. 'हेराफेरी' येईपर्यंत कधीच सिनेमाचे मुख्य नायक 'कॉमेडी' करत नव्हते. त्यासाठी स्पेशल पात्र असायची. पण 'हेराफेरी' नं मुख्य नटाला 'कॉमेडीयन' बनता येतं हे सिद्ध केलं. त्यानंतर अशा सिनेमांची लाट आली, त्यातच तू ही काही सारखे सिनेमे केलेस पण 'हेराफेरी' पुन्हा जमला नाही. चालायचंच.
पण तू त्यात वाहावत गेलास, ह्याचं वाईट वाटतं. शाहरूख खानमध्ये जर काही अभिनय असलाच तर तो चोपडा-जोहर कंपनीनं झाकून टाकला आणि तुझ्यातला कलाकार तू स्वतःच. मिथुनदांनीही त्यांच्या उतारवयात तेच केलेलं. माझ्या दोन सर्वाधिक आवडत्या नटांचा एकसारखा रस्ता पाहून थोडंसं आश्चर्य आणि वैषम्य वाटतं. तुझे 'कॉमेडी' च्या नावाखाली हल्ली जे सिनेमे येतात, ते पाहून अपार यातना होतात. मी तरीदेखील भारतात असेन तर तुझा प्रत्येक पिक्चर थेटरात जाऊन पाहतोच. पण खरंच माझ्यासोबत येणार्‍या मित्रांना तुला नावं ठेवताना पाहून काळीज तुटतं. तुला आपला मानलंय त्यामुळे प्रत्येक वेळी तुझी बाजू घेऊन मी भांडत राहीनच. पण आता खरंच बदलाची वेळ आहे रे.
माझ्या मते हिंदी सिनेसृष्टीला मिळालेलं सर्वोत्तम ऍक्शन हीरो मटेरियल तू आहेस. जर हॉलीवूडच्या तोडीस तोड कुणी ऍक्शन हीरो असेल तर तूच आहेस आणि ह्यात कुणीही हरकत घेऊ शकत नाही. पण तू ते सगळं वाया घालवतोस असं वाटतं. तू अभिनेता नाहीस असं नाही, पण तुला जेव्हढा अभिनय येतो त्याच्या एकशतांशाचाही तू वापर करत नाहीस. तुझी गणितं आणि तुझे निर्णय सर्वस्वी तुझेच आहेत आणि ह्या गोष्टीचा मान राखूनच मी सांगतो की तुझी सिनेमांची निवड हल्ली मला कोड्यात टाकते. तू आता मोठा माणूस आहेस त्यामुळे तू थेट सहनिर्माता बनून नफ्यातला हिस्सा घेतोस. मग एव्हढी ताकद हाताशी असताना तू 'थँक यू' आणि 'खट्टा मीठा' सारखे सिनेमे का करतोस? मला तुलना आवडत नाही पण मी तुला बॉलीवूडचा विल स्मिथ मानतो, पण तू असे सिनेमे करत राहशील तर कसं होईल? तुझ्या व्यक्तिमत्वात जादू आहे हे 'खतरों के खिलाडी' सारख्या शोजच्या यशावरून सिद्ध होतं. पण ती जादू योग्य जागी लागत नाही असं नाही वाटत तुला?
आजच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत चाळिशी उलटून गेलेल्या हिरोंचीच चलती आहे, त्यामधलंच एक नाव तू. पण तू इतर सर्वांहून वेगळा आहेस. तुझा रस्ता निराळा आहे आणि तुझी कलाही. तू तुझा आब वेगळ्याच पद्धतीनं राखला आहेस, पण मग ही हुशारी तुझ्या सिनेमांच्या निवडीत का दिसत नाही ह्याचं प्रचंड वैषम्य वाटतं. थेट हॉलीवूडपर्यंत झेप घेण्याची तुझी क्षमता आहे आणि तशी तू घेतलीही असल्याचं मध्यंतरी कानावर आलं होतं. पण मग अचानक ह्या बथ्थड सिनेमांची लाट आली आणि काहीतरी मोठी चूक झाल्यागत जाणवू लागलं.
तुझ्याबद्दल प्रचंड तळमळ वाटते म्हणून एव्हढं सगळं लिहिलं. तू अजून मोठा व्हावंस अशी नेहमीच इच्छा आहे. म्हणूनच एकदा आपल्या सिनेमांच्या निवडीवर लक्ष देऊन पाहा. तू प्रयत्न करतोस हे '८x१० तस्वीर' वरून दिसतंच पण एक प्रयत्न फसला म्हणून प्रयत्न करणं सोडू नकोस. आणि सिनेमामध्ये 'अक्षय कुमार' बनून राहू नकोस, जे शाहरूखचं झालं तेच तुझंही होताना दिसतंय, पण शाहरूखच्या इमेजला(लव्हरबॉय) मरण नाही, हे त्याचं नशीब आणि तुझ्या 'स्ट्रीटस्मार्ट' इमेजला तेव्हढं शेल्फ लाईफ नाही हे तुझं. त्यामुळे लवकरात लवकर ह्या फेजमधून बाहेर पड. माझ्यासारख्या चाहत्यांच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत.
तुझा,
(तुला आणि मिथुनदांना घेऊन 'शॉशँक रिडेम्प्शन'चा रिमेक बनवायचं स्वप्न बाळगणारा चाहता) विद्याधर.

32 comments:

  1. बाबा, या सगळ्या लोकांमध्ये एका गोष्टीचा प्रचंड अभाव आहे आणि एका गोष्टीचा प्रचंड मोठा साठा. पहिली गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास !!!!! या दोन्ही गोष्टींमधलं परस्परांमधलं अंतर जेव्हा वाढत जातं तेव्हा असले भिकार चित्रपट करायची बुद्धी त्यांना होते.

    माझे अक्कीचे आवडते चित्रपट तीनच खिलाडी, हेराफेरी आणि खाकी.. या तिन्हीत जीव ओतलाय त्याने !!

    ReplyDelete
  2. बाबा,
    सर्व प्रथम तुझे अभिनंदन....बऱ्याच दिवसांनी माझ्या सारख्या बाल बुद्धीच्या वाचकांसाठी ,तुझ्या चाहत्यांसाठी ,कॉमेंट देताना फार "विचार" करायला न लावणारी,(हो कारण त्याचा(विचाराचा) नि आमचा मागेच काडीमोड झालाय) अशी सहज सुंदर पोस्ट दिल्या बद्दल......हे म्हणजे कस कि आम्हाला घरच्या खेळपट्टी वर खेळल्याचा आनंद मिळाल्या सारखं होत.असो....हे विषयांतर होतंय..पण येथे महत्वाच असं कि...
    आक्की हा मला सुद्धा नेहमीच एक निरागस कलाकार कि जो स्वतःच्या अभिनयाशी प्रामाणिक रहात आलाय असा ... म्हणून भावत आलाय.निरागस नि ठोकळा ह्या मध्ये कृपया गल्लत करू नकोस.ठोकळा म्हटल्यावर पटकन डोळ्यापुढे अनिल धवन किंवा भरतभूषणच आला पाहिजे. म्हणजे ठोकळ्याची व्याख्या समजायला सोप्पी जाते.अन राहता राहिली दुसरी गोष्ट कि "एव्हढी ताकद हाताशी असताना तू 'थँक यू' आणि 'खट्टा मीठा' सारखे सिनेमे का करतोस?" तर होत रे असं..... कधी कधी... संबंधांमुळे,......तेथे सगळ गुंडाळून ठेवण भाग पडत.त्याला का हे कळत नसेल ? पण तेंडुलकरला सुद्धा सलील अंकोला,अबीद अली,के.दुबे वगैरे साठी बेनेफिट मॅचेस खेळाव्या लागल्याच ना? आक्कीच सुद्धा कदाचित तसचं काहीसं असावं...नक्की काही कळत नाही,पण बेनेफिट ऑफ डाऊट द्यायला तुझी हरकत नसावी...:) नि सर्वात महत्वाचे म्हणजे माणूस म्हणून फारच मस्त आहे रे...त्याचे इंटरव्हूच सांगतात ना ? आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याला तुझ्या बरोबरीने आपल मानलंय :) डोन्ट वरी...

    ReplyDelete
  3. मस्त रे. अक्षय कुमारने हे पत्र वाचावं ही इच्छा आहे माझी. माझं मत पण काहीसं तुझ्यासारखंच आहे. पण माझा गिव्हअप फार आधीच झाला होता. आणि तुझी आशा पण आंधळी वाटते आहे मला की अक्षय परत कमबॅक करेल. बॉलीवूडमध्ये एक नवीन प्रकार आला आहे पॅकेज डील चा. मॅन्युफॅक्चरींग सारखा फटाफट पिच्चर काढतात अक्षय आणि अजय देवगण सारखे लोक त्यात नफ्यात हिस्सा घेतात. आणि सगळी वसूली 2-3 दिवसातंच होते. मला नाही वाटंत अक्षय ह्यातून बाहेर पडेल. त्याचा पण शाहरूख झालाय.

    ReplyDelete
  4. यप्प..अजून काय बोलू. काही चुकीचे निर्णय त्याला खुप महागात पडत आहेत आणि इतके दिवस सांभाळलेला तो यशस्वी डोलारा आता कोसळतोय हे पाहून फार वाईट वाटत :(
    आय होप, तो ह्या चुकांमधून नक्कीच शिकेल आणि आपलं अक्की आपल्याला परत मिळेल :) :)

    माझे अक्कीचे आवडते चित्रपट तीनच खिलाडी, हेराफेरी आणि खाकी.. या तिन्हीत जीव ओतलाय त्याने !! +१

    ReplyDelete
  5. 'हेराफेरी' येईपर्यंत कधीच सिनेमाचे मुख्य नायक 'कॉमेडी' करत नव्हते. त्यासाठी स्पेशल पात्र असायची. पण 'हेराफेरी' नं मुख्य नटाला 'कॉमेडीयन' बनता येतं हे सिद्ध केलं.


    असं अजिबात नाहीये.. माझ्या मते गोविंदा हा प्रथम कॉमेडीयन मुख्य नायक आहे..

    बाकी एकुणएक लेख पटला..

    ReplyDelete
  6. बाबा तुम्ही भारी लिवता, असेच लिवत रहा, मला अक्की चा अजुन एक चित्रपट फ़ार आवडतो तो म्हणजे वक्त हमारा है (स्पॉट नाना मेन व्हिलन आहे त्यात) तसेच मोहरा पण उत्तम आहे.

    ReplyDelete
  7. Mast post aani Heramb barobar 100% sahmat

    Akkicha Chandani chouk 2 chine pahun mala radavas vatat hot :(

    ReplyDelete
  8. Anonymous9:59 PM

    हेरंब + १ ...

    मला अक्षय कूमार आवडण्याचे आणि एक कारण म्हणजे त्यालाही किचनमधे रमायला तितकेच आवडते जितके मला :) ;)

    बाबा, पोस्ट आवडली.... अक्षयचा प्रामाणिकपणा असावा कारणीभूत पण त्याचा राग कधीच करावासा वाटत नाही... म्हणजे तो आहे म्हणून मी भुलभुलैया पण टिव्हीवर लागेल तेव्हा पहाते आणि शायनी अहूजा नामक प्रकार पहाण्याचा अन्याय स्वत:वर करून घेते.... हेराफेरी, खाकी आणि दिल तो पागल है माझे कायम आवडते.... त्याच्या अभिनयात सहजता आहे की त्याच्या स्वभावातली सच्चाई, सहजता अभिनयात उतरते प्रश्नच आहे पण जमिनीवर पाय घट्ट रोवलेली व्यक्ती असे त्याच्याबद्दलचे माझे मत आहे!!!

    बाकि पोस्ट्बाबत काय बोलू... बाबा स्टाईल, मस्त आणि खरीखूरी!!

    ReplyDelete
  9. हेरंब +१ ...

    शिनेमाच्या एनसायक्लोपिडीयाने सांगितल्याप्रमाणे गोविंदा हा प्रथम कॉमेडीयन मुख्य नायक आहे..हे बरोबर आहेच पण अक्षयकुमारच्या हेराफ़े्री ने मुख्य नायक=कॉमेडीयन या संकल्पनेला वेगळ प्रमाण दिले की जे गोविंदा करु शकला नाही (आनंदरावजी पत्रे सरकार यांची माफ़ी मागुन ;) )अस मला वाटत.

    ReplyDelete
  10. मस्त पत्र लिहिलंय :)

    माझे अक्कीचे आवडते चित्रपट तीनच खिलाडी, हेराफेरी आणि खाकी.. या तिन्हीत जीव ओतलाय त्याने !!
    आणि चांदनी चौक टू चायना मध्ये जीव घ्यायचा प्रयत्न.. पण वाचलो आम्ही ;)


    असं अजिबात नाहीये.. माझ्या मते गोविंदा हा प्रथम कॉमेडीयन मुख्य नायक आहे..
    बाकी एकुणएक लेख पटला..

    आनंदशी सहमत.

    आणि तसे म्हणायला गेले तर नायकाने विनोदी भूमिका करण्यात आधीच्या लोकांनी प्रयत्न केला, पण गोविंदाएवढा साठा आणि प्रतिसाद नसेल मिळाला कोणाला.
    गोलमाल, चुपके चुपके हे ही मुख्य नायकांनी कॉमेडी केल्याचीच उदाहरणे आहेत. :)
    आणि अंदाज अपना अपना ही.

    ReplyDelete
  11. 'आंखे' मधली त्याची सिक्स्थ सेन्स वाली भूमिका सुद्धा न विसरता येण्याजोगी आहे.

    ReplyDelete
  12. हेरंबा,
    आत्मपरीक्षणाचा अभाव हे एक कारण आहेच.. पण तो अधूनमधून प्रयत्न करताना दिसतो.. त्याचं नशीब फुटकं की तिथेही तो मार खातो.. आणि आत्मविश्वास म्हणशील, तर तेच त्याचं मुख्य भांडवल आहे! :)
    >>खिलाडी, हेराफेरी आणि खाकी
    हे आहेतच.. पण 'वक्त','आंखें' असे अजूनही काही सिनेमे आहेत, ज्यामध्ये तो आपल्या भूमिकेनं जान आणतो!

    ReplyDelete
  13. mynac दादा,
    अरे मलाही सहसा साधंसुधं हलकंफुलकंच आवडतं रे... पण बरेचदा माझ्यात आर्ट सिनेमाचं वारं संचारतं एव्हढंच! नाहीतर मी हाडाचा 'पिटातला' प्रेक्षकच.. त्यामुळे अक्षय कुमार हा सामान्य घरातला मनुष्य फारफार आवडतो.. तो आपल्यातला वाटतो.. सलमान, शाहरूख, आमिर फार दूरची माणसं वाटतात..
    आणि तू म्हणतोस तसा 'बेनिफिट ऑफ डाऊट' मी त्याला नेहमीच देत आलोय आणि देत राहीन.. :)
    >>एक निरागस कलाकार कि जो स्वतःच्या अभिनयाशी प्रामाणिक रहात आलाय असा
    हे त्याचं अगदी अचूक वर्णन आहे! :)

    ReplyDelete
  14. सागर,
    मला कधी गिव्ह अप करणं जमलंच नाही... हां मी म्हातारपणीच्या अमिताभला गिव्ह अप केलं फक्त..
    पण अक्षय कुमारनं ह्याहून वाईट स्थितींतून कमबॅक केलेला आहे.. तसाच तो करेल अशी आशा आहे... काही चांगले सिनेमे लाईन्ड अप आहेत.. पाहू कसं होतं ते! :)

    ReplyDelete
  15. सुहास,
    होय रे... त्याचा डोलारा कोसळतोय खरा... पण बरंच आहे.. बिनअर्थी फुगवटा जाईल आणि सगळं पुन्हा नॉर्मल होईल... 'आपला अक्की आपल्याला परत मिळेल' :)

    ReplyDelete
  16. आनंद,
    गोविंदापेक्षाही आधी देवदत्त म्हणतात त्याप्रमाणे हृषीकेश मुखर्जींच्या सिनेमांमध्ये मुख्य नटांनीच कॉमेडीचा डोलारा सांभाळला.. पण त्या सिनेमांची धाटणी आणि गोविंदाच्या सिनेमांची धाटणी ह्यांत जमीन अस्मानाचा फरक होता. 'हेराफेरी' चं ज्यॉनर आणि सादरीकरण हे अजूनच वेगळं होतं. कारण नीट पाहता 'हेराफेरी' हा न्वार कॉमेडी म्हणता येईल असा होता. फ्लॉड कॅरॅक्टर्सचा ह्यूमर आणि त्यातच ऍक्शन. त्यानंतर प्रियदर्शन अक्षय जोडीनं काही 'गोविंदाछाप' सिनेमेही केले. पण असो..
    पण ढोबळमानाने पाहता.. 'हेराफेरी' नं ह्या पद्धतींच्या सिनेमाला पुन्हा सुगीचे दिवस आणले असं म्हणता येईल.

    ReplyDelete
  17. धनुर्वेद,
    ब्लॉगवर स्वागत! वक्त हमारा है.. मलाही बराच आवडतो.. 'क्रिप्टॉन बॉम्ब' आणि अनुपम खेरचा कबाडीवाला खासच.. रामी रेड्डीचा कर्नल चिकारा आणि त्याचे एकसुरी डायलॉग्ज.. मस्तच कॉम्बो होतं.. :)
    मोहरा हा एक खरंच उत्तम ऍक्शन थ्रिलर होता.. अक्षयचे बरेच सिनेमे आहेत ज्यांचा नामोल्लेख झाला नाहीये! :D

    ReplyDelete
  18. विक्रम,
    अरे चांदनी चौक टू चायना चा मलाही त्रास झाला, पण तो निखिल आडवाणीमुळे.. अक्कीचा मला आजवर कधीच राग आला नाही.. मी हा सिनेमा तीनदा पाहिलाय! :D

    ReplyDelete
  19. तन्वीताई,
    इत्तेफाकन मलाही किचनमध्ये रमायला आवडतं.. पण.. जेवण बनवून जेवून होईस्तो.. भांडी घासायचा कंटाळा येतो :P
    अक्षय कुमारनं कित्येक सिनेमे एकहाती सुसह्य केलेत त्याला गणतीच नाही..
    >>त्याच्या अभिनयात सहजता आहे की त्याच्या स्वभावातली सच्चाई, सहजता अभिनयात उतरते प्रश्नच आहे पण जमिनीवर पाय घट्ट रोवलेली व्यक्ती असे त्याच्याबद्दलचे माझे मत आहे!!!
    हे अगदी असंच मला वाटतं. जी माणसं स्वतःला ओळखतात ना ती सहज दुसर्‍याशी कनेक्ट होऊ शकतात.. त्यांपैकीच तो एक आहे! :)

    ReplyDelete
  20. योगेश,
    मलाही तसंच म्हणायचं होतं. गोविंदानं नायकाला 'कॉमेडीयन' बनवताना एक पायरी खाली नेलं आणि 'हेराफेरी'नं कॉमेडीयन ला नायक बनवून एक पायरी वर नेलं असं काहीसं म्हणता येईल. पोस्टमधली माझी वाक्यरचना थोडी बदलता येईल. :D

    ReplyDelete
  21. देवदत्त,
    तुम्ही म्हणता ते १००% खरं आहे.. पण आनंदला आणि योगेशला म्हणालो त्याप्रमाणे, ह्या सिनेमांमध्ये मूलभूत फरक आहेत.. पण ढोबळमानाने असं नक्कीच म्हणता येईल! :)
    धन्यवाद!

    ReplyDelete
  22. क्षितिज,
    होय.. आंखेंमध्ये तो काही सीन्समध्ये अमिताभसमोरही बर्‍यापैकी पाय रोवून उभा राहिलाय!

    ReplyDelete
  23. बाबा Anti-FRIENDS ते अक्कीचा चाहता. आपले विचार लैई जुळतात मित्रा.

    अक्कीचा चित्रपट लागला की माझी बायको म्हणते "तो बघ तुझा छावा आलाय" पण हल्लीचे त्याचे चित्रपट पाहून लाज वाटते रे. तीसमारखाँ चित्रपटातील कुठली ही ५ मिनिटे ही त्या शरमेचा कळस आहेत. नेहमी नेहमी हेराफेरी जमणार नाही. त्याऐवजी आवारा पागल दिवाना वैगरे सारखे चित्रपट देखील चालतील पण चांदणीचौकसारख्या ठिकाणी पुन्हा जाऊ दे नको म्हणजे मिळवली. नाहीतर फक्त Thumps UP च्या जाहिराती करू दे. तिथे बघवतं त्याला.

    ReplyDelete
  24. विद्या, काय की पण मला अजाबात आवडत नाही अक्षयकुमार. आजकाल तर मुळीच पाहवत नाही त्याला. परवाच मी विमानात त्याचा " अ‍ॅक्शन रिप्ले ’ पाहून अक्षरश: स्वत:ला कोसले. :(

    हेरंब+१

    ReplyDelete
  25. गोविंदानं नायकाला 'कॉमेडीयन' बनवताना एक पायरी खाली नेलं आणि 'हेराफेरी'नं कॉमेडीयन ला नायक बनवून एक पायरी वर नेलं असं काहीसं म्हणता येईल

    पीटातल्या प्रेक्षकाचं हे मत? आश्चर्य आहे

    ReplyDelete
  26. बाबा... तुझा अक्कीदादा वरचा लेख आवडला.. परिपूर्ण आहे. हेराफेरी नंतर तो वाहवत गेला हे खरेच. त्याचा पंखा म्हणून सर्वांना घेऊन चांदनी चौक टू चायना बघायला गेलो होतो. ते सुद्धा सर्वांची तिकिटे मी स्वतः काढून.... चित्रपट बघतानाच तिकिटाचे पैसे काही परत मिळायचे नाहीत हे मला कळून चुकले होते... :) असो...

    गेल्या फिल्मफेअरला त्याने स्वतःचे एक बक्षीस आमिरच्या गजनी साठी नाकारले होते तेंव्हा हा आता काही चांगले चित्रपट घेऊन येतोय की काय असे वाटले होते... बघुया.... अक्की काय करतो ते...

    ***अनेक दिवसानंतर वाचलेला आणि प्रतिक्रिया दिलेला पहिलाच ब्लॉगपोस्ट..***

    ReplyDelete
  27. बाबा, माझी चित्रपट या बाबतीत जी काही अल्प माहिती आहे त्यानुसार मला तरी पूर्ण पटेश आहे ही पोस्ट....शेवट सही केलास ...:)



    रच्याक, शंभरी भरलीय (तुज्या भक्तगणाची म्हणते रे) हबिनंदन....बाकी पन्नास आणि त्याच्या पटीत काही असलं या ब्लॉगवर तर माझ्यापेक्षा जास्त हक्काने कोण सांगणार नाही का??

    ReplyDelete
  28. पण आम्हाला बाबा 'बाबा'च आवडतो :)

    ReplyDelete
  29. Anonymous10:45 PM

    अक्की, माझा एकदम फेवरीट कधी नव्हता पण आवडायचा... पण सध्याचे त्याचे सिनेमे पाहिले कि खरच वाईट वाटते....तू लिहिलेल पत्र आवडल ,आज अक्कीच्या पंख्याच्या मनात असलेल्या विचाराना प्रातिनिधिक रूपात मांडल आहेस... अक्कीला आत्मपरीक्षणाची गरज आहे,नाहीतर एक चांगला अभिनेता वाया जाईल... त्याने लवकरच एक चांगला सिनेमा घेवून याव अस वाटतय...

    ReplyDelete
  30. Anonymous11:35 PM

    अगदी पटलं...
    अक्कीचा नुकताच येऊन लगेच गेलेला ’तिसमार खां’ पाहिल्यावर तर त्याने हा पिक्चर कां केला असे वाटले...
    त्याच्या जुन्या चित्रपटांपैकी ‘खिलाडी’, ‘हेराफेरी’ अगदी ’मि. अ‍ॅन्ड मिसेस खिलाडी’ (जुहीबरोबरचा) हे चित्रपट आवडले होते.. पण नंतर तो टाईपकास्ट होत गेला. :( नवीन आलेल्यातले ‘खाकी’, ‘भुलभुलैया’ आवडले.

    ReplyDelete
  31. अगदी पटलं...
    अक्कीचा नुकताच येऊन लगेच गेलेला ’तिसमार खां’ पाहिल्यावर तर त्याने हा पिक्चर कां केला असे वाटले...
    त्याच्या जुन्या चित्रपटांपैकी ‘खिलाडी’, ‘हेराफेरी’ अगदी ’मि. अ‍ॅन्ड मिसेस खिलाडी’ (जुहीबरोबरचा) हे चित्रपट आवडले होते.. पण नंतर तो टाईपकास्ट होत गेला. :( नवीन आलेल्यातले ‘खाकी’, ‘भुलभुलैया’ आवडले.

    ReplyDelete
  32. शेवटची ओळ :
    (तुला आणि मिथुनदांना घेऊन 'शॉशँक रिडेम्प्शन'चा रिमेक बनवायचं स्वप्न बाळगणारा चाहता)
    एकदम भारी !!
    झाकाक्स आयडिया आहे !!

    ReplyDelete