अशा वेळी नथुरामनी घाई केली की उतावीळपणा केला की शांतपणे निर्णय घेतला हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या मते देशाचं नुकसान थांबवण्याचा एकच मार्ग होता आणि त्यांनी तो अनुसरला. त्यासाठी होणार असलेलं यथोचित शासनही स्वीकारण्याची पूर्ण तयारी करूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. तो निर्णय चुकीचा की बरोबर किंवा नथुराम माथेफिरू की हुशार हे महत्वाचं नाही. पण नथुरामच्या कृतीचे किती विचित्र परिणाम घडले ते महत्वाचं.
नथुरामच्या कृतीनं गांधींना हौतात्म्य मिळालं. ज्याचा पुरेपूर वापर नेहरू सरकारनं करून घेतला. गांधी म्हातारपणानं गेले असते तर गांधींना जे अतिमानवीय रूप देण्यात आलंय बहुदा तसं झालं नसतं. गांधींच्या चुका आणि अतिरेक कदाचित आपोआपच देशासमोर आला असता. शेवटी गांधीदेखील माणूस होते, पण त्यांना देव बनवण्याचं काम नथुरामच्या कृतीमुळे सोपं झालं. गेली ६० वर्षं काँग्रेससकट देशातले अनेक पक्ष त्यांच्या जीवावर भाकरीचे तुकडे मोडतायत (किंवा नोटा मोजतायत असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल).
गांधींचे विचार कितीही आदर्श असले तरी त्यांनी त्या विचारांना योग्य ठिकाणी मर्यादा घातल्या नाहीत. गांधींचा प्रत्येकच बाबतीत अतिरेक होता. मग ती अहिंसा असू दे, असहकार असू दे किंवा ब्रह्मचर्य असू दे. असे प्रकार संतांसाठी ठीक असतात, पण देश चालवणार्यांसाठी नव्हे. त्यातही त्यांनी ब्रह्मचर्याबाबत केलेले प्रयोग हे कधीकधी विकृती ह्या सदरात मोडणारे होते. मग भले ते त्यांनी कितीही निरागसपणे केल्याचं सांगण्यात आलं तरीही.
कुठलीही मागणी मान्य करून घेण्यासाठी उपोषणाला बसून अख्ख्या देशाला वेठीला धरणं हे त्यांचं अमोघ अस्त्र होतं. आधी हे त्यांनी ब्रिटीशांवर आजमावलं. पण ब्रिटीशांच्या वेळी केस वेगळी होती. गांधी मेले असते तर अख्खा देश पेटेल ही भीती ब्रिटीशांना होती. थोडक्यात ते अन्यायी ब्रिटीशांना केलेलं हुशार ब्लॅकमेलिंग होतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्याच लोकांकडून स्वतःची तत्त्व राखण्यासाठी (किंवा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी) आपल्याच लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करणं हे कितपत योग्य होतं. एका माणसाच्या तत्वांसाठी अख्खा देश आणि हजारो लोकांचे प्राण पणाला लावले जात होते. आपली तत्व लोकांवर जबरदस्तीनं लादणं ही एकप्रकारची वैचारिक हिंसा ठरत नाही का? पण गांधींनी काही काही गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं होतं.
गांधींनी एकट्यानीच देशाचं नुकसान केलं असं म्हणणं कदाचित अतिशयोक्ति ठरेल. पण अशा न तशा पद्धतीनं गांधींचं पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान होतं. नेहरू आणि कंपनीने गांधींच्या नावाखाली अनेक चुका केल्या. पण गांधींनीदेखील आपल्या हट्टीपणाने अनेक गोष्टी घडवून आणल्या. गांधींची सगळ्यात मोठी चूक कदाचित ही होती की त्यांनी स्वतःची तत्व कधीच काळाच्या कसोटीवर तपासून पाहिली नाहीत. त्यांच्या ज्या समजूती होत्या त्यांचा टिकाऊपणा तपासून पाहण्याची त्यांना कधीच गरज वाटली नाही. उलट अख्ख्या जगानं आपल्याच समजुतींनुसार स्वतःची मतं बदलून चालावं ह्या हट्टाने ते मार्गक्रमणा करत राहिले. त्यांचं अहिंसेचं अन असहकाराचं अमोघ अस्त्र देखील बदलत्या काळानुसार बदल मागत आहे. आजही ज्या ज्या देशांमध्ये उठाव झालेत, तिथे सगळीकडे सुरक्षा दलं निर्दयीपणे आंदोलकांवर हल्ले करताहेत. पण आंदोलक ठिय्या मांडून उपोषणाला बसले तर एकतरी आंदोलन यशस्वी होऊ शकतं का? हा प्रश्न मला पडतो. जोवर आंदोलक आपली एकगठ्ठा शक्ति दाखवून सुरक्षा दलांनाही आपल्या बाजूनं येण्यास मजबूर करत नाहीत तोवर हे अशक्यच ठरतं. काही काही देशांमध्ये रक्तविरहित क्रांतीही झालीय. पण सर्व ठिकाणची परिस्थिती एकसारखी नसते. जेव्हा जखम जुनी होते तेव्हा जवळचा भाग कापूनच काढावा लागतो आणि त्यात थोडं रक्तही वाहून जावं लागतं.
जर नथुरामनं गांधींना गोळ्या घातल्या नसत्या. तर कदाचित काही वर्षांमध्ये स्वतंत्र भारतामध्ये गांधींभोवतीचा बुडबुडा फुटलाही असता किंवा भारत अजून मोठ्या प्रमाणावर गांधींच्या आहारी गेला असता. कदाचित अजून एक दोन संस्थांनांची घोंगडी हिंसक कारवाईअभावी भिजत पडून राहिली असती. पण ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत.
देशातल्या जनतेला ब्रिटीश अन्याय्य राजवटीविरूद्ध जागृत करण्यामधलं गांधींचं योगदान वादातीत आहेच आणि त्याबद्दल मी त्यांचा आदर करतो. पण आज स्वतःच्या तत्वांपायी अख्ख्या देशाचं आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान केल्यामुळे त्यांना महात्मा म्हणताना मात्र माझी जीभ कचरते.
आज माझ्या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी ३० जानेवारीलाच मी पहिली पोस्ट टाकली होती. सर्व वाचकांच्या प्रेमामुळे आणि सर्व मित्र आणि शुभचिंतकांच्या प्रोत्साहनामुळेच हा प्रवास पूर्ण झाला. सुरू केला तेव्हा स्वतःपासून काहीच अपेक्षा नव्हत्या. पण सर्वांच्या प्रेमानं आणि प्रोत्साहनामुळे आणि वेळोवेळी मिळणार्या चांगल्या वाईट अभिप्रायांमुळे लिहिता राहिलो. रस्त्यावर काही कौतुकंही झाली पण सगळ्याचं श्रेय वाचकांनाच जातं.
डिसेंबरमध्ये विचार केलेला की पहिल्या वाढदिवशी ब्लॉगला १०० व्या पोस्टची भेट द्यावी. पण डिसेंबरमध्ये सुट्टीवर असताना लेखनात जवळपास महिन्याभराचा खंड पडला. पण मग तरीसुद्धा पहिलीच भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याखातर गेला आठवडाभर रोज एक अन कालपासून तर दिवसाला दोन पोस्ट केल्या आहेत. ह्या अतिरेकाचा गुणवत्तेवर निश्चितच परिणाम झाला असेल. पण मला हे चॅलेंज पूर्ण करायचं होतं आणि महत्प्रयासाने ते मी पूर्ण करू शकलोय ह्याचा मला आनंद आहे. ही माझ्या ब्लॉगवरची १०० वी पोस्ट आहे.
ह्यापुढे पोस्ट्सची फ्रिक्वेन्सी पूर्ववत होईल. आणि गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, ह्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न करूर करेन.
सर्वांचे मनापासून आभार! आपला लोभ असाच कायम राहिल आणि मी कायम लिहिता राहिन हीच सदिच्छा! :)