6/11/2012

मृत्युदाता -१९ (अंतिम-पूर्वार्ध)


"रमेश, त्या शिक्षिकेचं काय झालं?" सिन्नरकर बसत म्हणाले
"जर मी त्या लोकांना व्यवस्थित ओळखतो आणि तुम्ही सांगितलेली तिची माहिती खरी आहे, तर एकतर ती गायब असेल किंवा मेलेली असेल." रमेश खोलीवर एक नजर फिरवत म्हणाला.
"डोन्ट वरी रमेश, ह्या जागेबद्दल मी पर्सनली खात्री केलेली आहे. इथे आपल्याला व्यवस्थित डिस्कस करता येईल. कर्नलची माणसं इथवर पोचणार नाहीत."
"हम्म"
"मग पुढे काय केलंत तिचं?"
"मी तिचं नाव बेपत्तांच्या यादीत शोधलं आणि तिथे मला ते सापडलं. बरोब्बर दोन वर्षांपूर्वीपासून ती बेपत्ता आहे आणि कधीही सापडली नाही."
"ती कल्पना मलाही होतीच."
"मग?"
"ती कुणाची मैत्रिण होती ते महत्वाचं होतं."
"कुणाची?"
"उत्तमराव बेळे-पाटलांच्या पुतण्याची."
"म्हणजे खुन्याला भेटायला, खून झालेल्याच्याच पुतण्याची मैत्रिण?"
"एक्झॅक्टली. हे प्रकरण दिसतं तितकं सरळ नाहीये रमेश."
रमेश विचारात गढला होता इतक्यात दरवाजा वाजला.
"शिंदे आले असतील." म्हणून रमेशनं दार उघडलं.

-----

तो त्याच्या कोठडीमध्ये नेहमीसारखा उंचावरच्या छोट्या खिडकीतून येणार्‍या थोड्याशा प्रकाशाकडे पाहत भिंतीला टेकून बसला होता, जेव्हा हवालदारानं त्याला दरवाजाजवळ बोलावलं आणि कुणीतरी भेटायला आलं असल्याचं सांगितलं आणि हातांसाठीची फट उघडली. 'ती'च असेल असा विचार मनाशी करत त्यानं नेहमीप्रमाणे पाठमोरा होऊन दोन्ही हात छोट्याशा फटीतून बाहेर काढले. हवालदारानं हातांना हातकड्या अडकवल्यावर त्यानं हात आत घेतले. हवालदारानं फट बंद करून दरवाजा उघडला. त्याबरोबर तो बाहेर पडला. हवालदाराच्या मागे चालत चालत तो मुख्य बराकीत आला आणि तिथनं इतर सेल्सच्या समोरून जात ते एका वेगळ्या कॉरिडॉरमध्ये आले. तिथनं सरळ चालत ते भेटींच्या कक्षात शिरले. भल्याथोरल्या काचेच्या अलिकडे जाळी आणि त्याच्याअलिकडे सात-आठ कैदी ओळीनं बसले होते आणि काचेच्या पलिकडे त्यांना भेटायला आलेली मंडळी ज्याच्या-त्याच्या समोर बसलेली होती. बोलण्यासाठी दोन्हीकडे टेलिफोन दिलेले होते. भेटायला आलेल्या मंडळींच्या मागे तीन बंदुकधारी हवालदार उभे होते आणि त्यामागे खोलीत शिरण्याचा दरवाजा. त्यामागे मात्र केवळ एका कॉरिडॉरची भिंत दिसत होती. मागचा कॉरिडॉर बराच मोठा असावा कारण तिथे नैसर्गिक प्रकाश फारसा दिसत नसे. त्याची नजर हॉलभर तिला शोधत होती. पण ती कुठेच दिसेना. तो तसाच खोलीत शिरल्याजागी स्तब्ध उभा राहिला. हवालदारानं ते पाहून त्याला टोकलं आणि नजरेनंच काय झालं विचारलं, पण तो नेहमीसारखाच गप्प राहिला आणि खोलीच्या दरवाज्याकडे एकटक पाहत राहिला. हवालदारानं त्याला हाताला धरून ओढलं आणि एका रिकाम्या खुर्चीच्या दिशेनं ढकललं. त्यानं समोर पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. त्यानं हवालदाराकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. हवालदारानं त्याला बसायची खूण केल्यावर तो खुर्चीत बसला. लगोलग त्याच्यासमोरच्या टेलिफोनमध्ये काहीतरी वाजलं. फोनचं रेकॉर्डिंग सिस्टम बंद झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. खोलीतल्या सिक्युरिटी कॅमेर्‍यांवरचे लाईट एकदम फ्लिकर होऊ लागले आणि ती आत शिरली. दिसायला फार सुंदर नसली तरी ठसठशीत. नाक थोडंसं अपरं, गव्हाळ वर्ण, कोरलेल्या भुवया आणि स्लीव्हलेस ब्लाऊज सोबत ऑफ व्हाईट साडी अशा नेहमीच्याच पेहरावात ती आली होती. ती त्याच्याकडे पाहून हसली तरी त्याचा चेहरा कोराच होता. ती त्याच्यासमोर बसली आणि तिनं फोन उचलून त्यालाही तसंच करायची खूण केली.
"तब्येतीची काळजी घे स्वतःच्या. तुला आम्ही काही होऊ देणार नाही. लवकरच सुटका होईल." एव्हढं बोलून तिनं फोन ठेवला आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागली.
त्यानं फक्त मान डोलावली, फोन खाली ठेवला.
ती उठली आणि चटकन निघून गेली. त्याबरोबर रेकॉर्डिंग मशीन पूर्ववत झालं आणि कॅमेरे पूर्ववत झाले. त्याबरोबर तो ही उठला आणि चालू लागला. पुनश्च स्वतःच्या कोठडीच्या दिशेनं चालू लागल्यावर हवालदारानं त्याला बंदुकीनं ढोसलं. त्यानं प्रश्नार्थक चेहर्‍यानं हवालदाराकडे पाहिलं.
"मोकळा वेळ." हवालदार म्हणाला आणि त्यानं मैदानाच्या दिशेनं हात केला. नाईलाजानंच तो मैदानाच्या दिशेनं चालू लागला. ह्या सगळ्याचा त्याला कंटाळा आला होता.
'किती दिवस अजून जिवंत राहायचं आहे तेच कळत नाही. आत्तापर्यंत पाच वेळा आत्महत्या केली असती मी. ह्या लोकांची निवडणुकांसाठी राजकारणं आणि माझ्यावर जिवंत राहायची बळजोरी. प्रातर्विधी करतानाही माणूस सोबत असण्यापेक्षा वाईट अवस्था ती कोणती' असा स्वतःशी विचार करतच तो मैदानात जाळी पार करून शिरला आणि नेहमीच्या बेंचवर जाऊन बसला. आज तो थोडासा लवकर आला होता. बाकीच्या कैद्यांना एक एक करून आत सोडायला आत्ता सुरूवात होत होती. दूर एका कोपर्‍यात 'अहिंसा ट्रस्ट'चा तंबू होता. तिथे स्वयंसेवक चटया टाकत होते. त्या तंंबूच्या मागे १०० फूटांवर तुरूंगाची आतली भिंत होती. किमान २० फूट उंचीच्या त्या भिंतीवर दोन फुटांचं तारेचं कुंपण होतं. त्याच्या पलिकडे जी मोकळी जागा होती त्यामध्ये दर पन्नास फुटांवर एक गार्ड टॉवर होता. आणि त्यामागे तुरूंगाची दुसरी भिंत जी पंचवीस फूट उंच होती. त्यावर जे तारेचं कुंपण होतं, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सोडलेली होती. प्रत्येक गार्ड टॉवरमध्ये एक बंदुकधारी गार्ड होता. त्याची नजर अशी भिरभिरत होती, की त्याच्याकडे पाहणार्‍याला वाटावं तो सहज इकडेतिकडे बघतोय. पण तो रोज तिथल्या प्रत्येक गार्डची हालचाल पाहायचा. त्यांतल्या कुणाचं कामामध्ये जास्त लक्ष नसतं, कधीतरी वाजणारे हॉर्न्स आणि लोकांच्या येणार्‍या अत्यंत क्षीण आवाजावरून पलिकडे नक्की काय असावं ह्याचा तो अंदाज बांधत असे. त्याला काही करायचं नसलं तरी त्याचं डोकं असंच धावत असे.
तेव्हाच नेहमीप्रमाणे पुराणिक त्याच्यादिशेनं आला आणि शेजारी बसून तो पाहत होता त्या दिशेनं पाहू लागला.
"गांधीवादी येतील आता. येणार आहेस काय आज? फुल टीपी चालतो. लोक इमोशनल होतात उगाच." पुराणिक नेहमीसारखाच एकटा बोलू लागला.
त्याची नजर अजूनही भिरभिरतच होती ती पलिकडच्या बाकावर बसलेल्या ग्रुपवर स्थिरावली. त्यातल्या वल्लभवर क्षणभर जास्तच. त्या दोघांची नजरानजर झाली आणि ते दोघे पुन्हा वेगवेगळ्या दिशेला पाहू लागले.
तेव्हाच 'अहिंसा'वाल्यांचा एक ग्रुप त्यांच्या दिशेनं चालत येऊ लागला. त्यातले दोनजण वल्लभच्या ग्रुपकडे गेले आणि बाकीचे दोघे, त्यात एक स्त्री आणि एक पुरूष होते, ते पुराणिक आणि त्याच्याकडे आले.
"ग्रुप थेरपीसाठी येता का? मनःशांती लाभेल." त्यांच्यातला पुरूष बोलू लागला. पण त्याची नजर त्यातल्या स्त्रीवर स्थिरावली. तीदेखील त्याच्याकडेच पाहत होती.
"चला तुम्हीदेखील. विचार नका करू फार." ती बोलत होती. मैदानात प्रचंड ऊन होतं, त्यामुळे त्याच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप येत होती. त्याला फक्त तिचे डोळे नीट दिसले. चॉकलेटी रंगाचे त्याच्यावर रोखलेले.
त्याला काय वाटलं ते त्यालाही कळलं नाही. तो चटकन उठला.
"रतन." जाळीपलिकडून हवालदाराचा घोगरा आवाज आला, "कुठे जातोयस?"
त्यानं जागच्याजागीच वळून हवालदाराकडे पाहिलं.
"त्यांना आमच्यासोबतच घेऊन जातो आहोत." तिनं हवालदाराला नम्रतेनं सांगितलं. त्याबरोबर हवालदारानं दुसर्‍या एकाला स्वतःच्या जागी उभं राहायला बोलावलं आणि तो त्याच्यासोबतच तंबूकडे निघाला.
तंबूजवळ गेल्यावर हवालदार थोडासा लांब उभा राहिला आणि रतन आणि पुराणिक केलेल्या गोलामध्ये बसले. मग गांधीजी म्हणायचे त्या प्रार्थना म्हणायला सुरूवात झाली. त्या गोलाच्या आतमध्ये, स्वयंसेवकांसोबत दोन आणि गोलाच्या बाहेर चार हवालदार उभे होते. सगळेजण तल्लीन होऊन प्रार्थना म्हणत होते पण रतन अर्थातच गप्प होता. पुराणिक इथेतिथे पाहण्यात मग्न होता तेव्हा ती रतनच्या शेजारी येऊन बसली आणि त्या आवाजामध्येच हळूच त्याच्या कानात ती काहीतरी कुजबुजली. त्याबरोबर रतन एकदम चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. त्याची नजर तिच्या लांबसडक केसांकडे गेली पण तो लगेच भानावर आला आणि चटकन उठून उभा राहिला. त्याबरोबर हवालदारानं बंदूकीची नळी त्याच्या पाठीवर लावली. तिनं गडबडीनं उठून सारवासारव केली पण तो तिथून निघून गेला.

-----

"तीच त्यांची पहिली भेट. त्यानंतर दोन दिवसांनी रतनला फाशी डिक्लेअर झाली आणि त्यानंतर दोनच दिवसांत सुप्रीम कोर्टात अपील झालं." शिंदे बोलत होते.
"म्हणजे तिचा अन ह्या अपिलाचा काही परस्परसंबंध असावा असं तुम्हाला वाटतं?" रमेश स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला.
"शक्य आहे. पण अपीलांवर रतनच्या सह्या होत्या. ते इतकं सोपं नसतं. कायद्याची जाणकार मंडळी असल्याखेरीज असलं काही अशक्य आहे." सिन्नरकर थोडा विचार करून म्हणाले.
"ती वकीलच आहे. चांगली नावाजलेली." रमेश म्हणाला.
"पण ती रतनला पळवेल कशाला मग? आणि काय रिलेशन आहे हे सगळं?" शिंदे.
"मग नंतर काय झालं पण?" रमेशनं विषय पूर्वपदावर आणायला म्हटलं.
"त्यानंतर तेच. त्यानं अन्नपाणी वगैरे सोडलं आणि एकदम खंगला. त्यानंतर सुप्रीम कोर्टातही फाशी टिकली आणि त्यानंतर जेव्हा माफी याचिका गेली, तेव्हा त्याचं आत्महत्यासत्र सुरू झालं. तो कुणाशीच फारसा जवळ नव्हता, आणि एकांतवास असल्यानं कुणाला काही माहित नाही, त्यामुळे हा कालखंड पोलिस सांगतात त्यावरच अवलंबून आहे."
"मग पुढे?"
"मग एक दिवस पुराणिक त्याला जबरदस्तीनं ग्रुप थेरपीला घेऊन गेला आणि म्हमद्याच्या सांगण्याप्रमाणं पुराणिक, ती आणि रतन तिघे जवळजवळ बसले. रतनची इच्छा नसूनही रतननं बरंच काही ऐकून घेतलं.

-----

"तुला ऐकायची इच्छा नसली तरी एकदा मी काय बोलते ऐकून घे. तुझा माफीअर्ज टाकण्याइतकी रिस्क मी घेतलीय तर एव्हढं तर तू माझ्यासाठी करूच शकतोस." ती हे म्हणाल्याबरोबर त्यानं चिडून वर पाहिलं.
पुराणिकनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "मीच तिची मदत केलीय."
आता त्यानं पुराणिककडे रागानं पाहिलं.
"काय दिलंय रे तुला ह्या लोकांनी? तुला मरायचंय मरायचंय म्हणतोयस? पण इतके दिवस तुझ्या केसचं मायलेज घेत होते आणि तुला मरू देत नव्हते. आता हिनं तुझा जीव वाचवायचं ठरवलं तर तुला मारायला निघालेत कारण आता तुझं जिवंत राहणं त्यांच्या फायद्याचं नाही." पुराणिक पुढे म्हणाला, "ही काय सांगते ते ऐक, मग तुझ्या डोक्यात प्रकाश पडेल."
त्यानं तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
"मी सायली सरपोतदार. त्यादिवशी म्हणाले त्याप्रमाणे तुमचा जीव वाचवणार्‍या सब-इन्स्पेक्टरची पत्नी." तिचा आवाज बदलला तरी चेहरा तसाच करारी होता. त्याला समोरच्याचं नीट निरीक्षण करण्याची सवयच होती. ती पुढे बोलू लागली, "तुमचा जीव वाचवल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं गप्प राहू लागलात, त्यावरून माझ्या नवर्‍याला तुमच्याबद्दल एकूणातच संशय येऊ लागला. कारण तुम्हाला बेळे-पाटलांच्या काफिल्याची जेव्हढी माहिती होती. त्यावरून तुम्हाला कुणीतरी आतून खबर दिली असण्याची शक्यता त्यांना नक्की वाटू लागली. त्यातच बेळे-पाटलांसारखं व्यक्तिमत्व मेल्यावर सहानुभूतीच्या लाटेनं महाराष्ट्रात शंभर टक्के त्यांच्याच पक्षाचं सरकार परत येणार हे निश्चित झालं आणि तुमची केस इमानदारीनं चालवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हवा उभं करायचं काम सुरू असल्याचं तुम्हालाही कळत असेलच. तुम्हाला मरू देत नव्हते असं मला ह्यांच्याकडून कळलं." तिनं पुराणिककडे पाहून म्हटलं त्याबरोबर त्यानं चिडून त्याच्याकडे पाहिलं.
"ती काय सांगतेय ते नीट ऐक मग तुला कळेल मी का तिला सर्व सांगितलं ते."
"तुम्हाला ते काय म्हणताहेत ते कळतंय?" ती आश्चर्यानं म्हणाली.
"होय. आम्ही काही वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं तेव्हा बनवलेली सायलेंट भाषा आहे. त्याला बोलता येतं आणि मला समजते." पुराणिक म्हणाला, "पण ते सोडा. पुढे सांगा."
"तर ह्या मोठ्या हालचालीकडे पाहून विराजनं म्हणजे माझ्या नवर्‍यानं स्वतः तपास सुरू केला आणि सिक्युरिटी कंपनीतल्या माणसामार्फत ते प्रादेशिक पक्ष कार्यालयातल्या एका कार्यकर्त्यापर्यंत पोचले. त्याच्याकडून त्यांना बीडच्या प्रदेशाध्यक्षाचं नाव कळलं. म्हणजे पक्षातल्याच लोकांनी बेळे-पाटलांचा काटा काढला असावा असा त्यांचा ठाम समज झाला."
"अशक्य आहे ते. मला सुपारी विरोधी पक्षवाल्यांकडून मिळाली होती." त्याच्या तोंडून चक्क शब्द फुटले आणि एकदम प्रार्थना संपून शांतता झाली.
मग सगळ्यांनी आपापले आठवडाभरातले अनुभव सांगायला सुरूवात झाल्यावर ते तिघेजण गप्प बसले.

-----

"त्यादिवशी म्हमद्यानं ते तिघे काय खिचडी पकवतात त्यावर लक्ष द्यायचं ठरवलं आणि पुढच्या आठवड्यात त्याच्याजवळ बसायचं ठरवलं."
"पण जर तिला असंच काही करायचं होतं तर तिनं घरी का सांगितलं की ती 'अहिंसा ट्रस्ट' मध्ये जाते आहे? तिला ते गुप्त ठेवता आलं असतंच ना?" रमेश स्वतःशीच बोलला.
"ती प्रो नाहीय रमेश. आणि तिचा संबंध ह्या सगळ्याशी असा जोडला जाईल असं तिला वाटलंही नसेल. कारण तुरूंगात हे स्वयंसेवक खरी नावं सांगत नाहीत. आणि तिच्या घरपर्यंत कुणी पोचेल ह्याचा तिला अंदाजही आला नसेल." सिन्नरकर विचार करत म्हणाले, "तुम्ही तिच्या नवर्‍याचे मित्र निघणं हा केवळ योगायोग ज्यामुळे ती कोण आहे ह्याची ओळख पटली, नाहीतर कसं शक्य होतं."
"बीसाईड्स आपण अंदाज बांधून चाललोय की ही तीच आहे जी रतनसोबत पळाली. कारण म्हमद्यानं पळणारीला दोनशे फूटांवरून पाहिलं आणि त्याचं म्हणणं आहे की तिनं केस कापून बॉयकट केलेला होता."
"आणि ट्रस्टच्या सांगण्यानुसार तिनं नोकरी रतनच्या पळण्याच्या दोन महिने अगोदर सोडली होती. त्यामुळे आपण फक्त स्पेक्युलेट करू शकतो की ही ती होती."
"पण म्हमद्या छाती ठोकून सांगतोय ना की तुरूंगात भेटायला येणारी तीच पळून जाणारी नव्हती."
"हो पण दॅट डझन्ट प्रूव्ह एनीथिंग. ती कुणीतरी तिसरीही असू शकते." सिन्नरकर म्हणाले.
रमेशनं डोक्याला हात लावला. "नथिंग मेक्स सेन्स. इमिग्रेशन रेकॉर्ड्सप्रमाणे विराजची बायको एक वर्षाच्या व्हिजावर टर्कीला गेली आहे आणि माझ्याकडे तिच्याविरूद्ध काहीच नसल्यामुळे तिथल्या एम्बसीला काही विचारूही शकत नाही."
"वी हॅव टू अझ्युम की विराजची बायको सायलीच रतनसोबत पळाली आहे."
"ऍझम्प्शन्सवर आपण किती पुढे जाणार?" सिन्नरकर.
"ऍझ्युम नाही केलं तर कुठेच जाणार नाही आपण. पुढे बोला शिंदे." रमेश रेस्टलेस झाला होता.
"त्या आठवड्यात दुसरं आक्रित घडलं. रतन वल्लभकडे स्वतःहून गेला आणि त्याच्याशी बोलू लागला..."

-----

"गडचिरोली का? कुठलं गाव?" तो विचारत होता.
"सिरोंचा." वल्लभ म्हणाला, "पण तुला कसं कळलं की.."
"त्यानं काय फरक पडतो." तो तुटकपणे म्हणाला.
"पण आज माझ्याकडे?"
"तू रोज आमच्यावर नजर का ठेवून असतोस आणि माझा जीव वाचवण्याचं सत्कार्य तू का केलंस असे प्रश्नही मी विचारू शकतो, पण मला आत्ता त्यांची उत्तरं नको आहेत."
"मग?"
"मला एका दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर हवंय." तो शांतपणे म्हणाला.
"काय?"
"आम्ही दोन महिन्यांनंतर जेलमधून पळून जाणार आहोत. तू येणार का?"
"काय?" वल्लभ एकदम आश्चर्यचकित झाला.

-----

"त्या दोघांचं काय बोलणं झालं हे म्हमद्याला कळलं नाही पण म्हमद्यानं हे त्याचा खास मित्र बबनला सांगितलं आणि दोघांनीही रतनच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते दोघेजण पुढल्या आठवड्यामध्ये रतनच्या जवळच बसले आणि प्रार्थना सुरू झाल्याबरोबर कान टवकारून बसले. पण रतन त्यादिवशी पूर्णवेळ गप्प बसला आणि एक शब्दही बोलला नाही. फक्त इथे तिथे विचित्रपणे पाहत राहिला आणि ती आणि पुराणिक दोघेजण त्याच्याकडे टक लावून पाहत राहिले. पण वल्लभ तिथे कुठेच जवळपास नव्हता.
प्रार्थना संपल्याबरोबर रतन उठला आणि तिथून निघाला, त्याबरोबर म्हमद्या आणि बबन त्याच्यामागे गेले. तो थेट वल्लभकडे गेला आणि ते दोघे फक्त एकमेकांच्या शेजारी पंधरा मिनिटं काहीही न बोलता बसून राहिले..." शिंदे बोलतच होते.

-----

"तो काय बोलला हे तुम्हाला कळलं का?" पुराणिकनं तिला विचारल्यावर तिनं नकारार्थी मान डोलावली.
"इथे जे दोघेजण बसलेले, ते आपलं बोलणं ऐकायला आलेले होते, त्यामुळे तो फक्त संकेतांमध्ये बोलून गेला." पुराणिकनं म्हमद्या आणि बबनच्या जागेकडे इशारा करत म्हटलं.
ती काहीच बोलली नाही.
"तुमच्या नवर्‍याला सापडलेल्या डायरीतली मी त्याला सांगितली. ती नावं ऐकल्यावर त्यालाही खात्री पटलीय की तुमच्या नवर्‍याचा संशय योग्य आहे. हे खूप मोठं षड्यंत्र आहे आणि त्यामध्ये त्याच्या मनःस्थितीचा फायदा घेऊन त्याला वापरलं गेल्याचं त्यालाही लक्षात आलंय. तुम्ही आता परत इथे येऊ नका. आता बरोब्बर दोन महिन्यांनी २५ तारखेला तुम्ही जेलसमोरच्या पोस्ट ऑफिसच्या गच्चीवर येऊन उभं राहायचं."
"काय?" तिला काही कळेनासं झालं.
"दॅट्स हाऊ इट वर्क्स. त्याचे प्लॅन्स फक्त त्यालाच कळतात."
"पण हा माझा प्लॅन असायला हवा. माझ्या नवर्‍याचा खून झालाय, मला सूड हवाय."
"तुम्ही त्याच्याकडे आला आहात मदतीसाठी, तर आता त्याच्याच कलांनी घ्या माझं ऐकाल तर. तो जितक्या सहजतेनं हे सर्व करू शकेल, तितकं कुणीही करू नाही शकणार."
"मग तो इतके दिवस का पळत नव्हता?"
"कारण त्याला मरायचं होतं."
"मग आता काय झालं?"
"त्याचा वापर झाल्याचा त्याला राग आलाय. मुळात वापर त्याचा वापर होत होता हे लक्षात आल्यानंच त्यानं नक्षलवादी गट सोडला आणि तो मुंबईत आला. मुंबईत तो फक्त मला ओळखत होता कारण मी अधूनमधून नक्षलवाद्यांचे फंड ट्रान्सफर करत असे. त्यानं जगण्याची इच्छाच गमावली होती. पण त्याला काहीतरी चांगलं करून मरायचं होतं. त्यामुळे ह्या देशातल्या सर्वाधिक भ्रष्ट नेत्याची सुपारी निघाली आहे हे कळताच त्यानं माझ्यामार्फतच ती सुपारी मिळवली. माझा काही संबंध राहू नये म्हणूनच मी स्वतः पकडला जाऊन आत येऊन बसलो. आणि त्यानं तिथे काम फत्ते करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण आधी तुमच्या नवर्‍यानं मग तुम्ही आणि मग इथे वल्लभनं त्याचा वारंवार जीव वाचवला. आणि आता त्याला कळलं की त्यानं जे केलं ते व्यर्थच होतं. मृत्यूच्या दाढेतून इतक्या वेळा वाचण्यालाही काही अर्थ असावा."
ते दोघेजण चटया गोळा करण्याच्या मिषानं बोलत होते. चटया आवरून झाल्यावर कोपर्‍यामध्ये ठेवलेल्या मोठ्या सतरंजीवर त्यांनी सर्व चटयांच्या गुंडाळ्या ठेवल्या आणि पुराणिक तिथून निघून गेला.

-----

"..त्यानंतर पुराणिक परत आला आणि त्यानं रतनला काहीतरी खूण केली त्याबरोबर रतन उठून निघून गेला आणि वल्लभ आणि पुराणिक आपापल्या रस्त्यानं गेले."
"एक मिनिट. आपण हे सगळं वर्णन का ऐकतो आहोत?" सिन्नरकर शिंदेंना मध्येच रोखत म्हणाले.
"कारण ह्यावरून आपल्याला काही क्लू लागू शकतो का हे कळेल." रमेश म्हणाला.
"पण तू म्हमद्याची कुंडली मांडणार होतास त्याचं काय झालं?"
"त्याच्या घरच्यांकडे अचानक पैसे आले आहेत. पण कुठून आले हे कसं कळणार?"
"अजून कुठून येणार?" सिन्नरकर सूचकपणे म्हणाले.
"ओह राईट. इट मस्ट बी पुराणिक."

आणि सिन्नरकरांचा फोन वाजू लागला. पाच मिनिटं फोनवर बोलून त्यांनी फोन खाली ठेवला.

"ओरिसामध्ये वल्लभची डेड बॉडी पोलिसांना मिळाली आहे." ते म्हणाले आणि रमेश आणि शिंदेंकडे पाहू लागले.

"तुरूंगातून पळताना बबनचा खून झाला." शिंदे म्हणाले.
"लास्ट वी हर्ड, रतन पूर्व भारतातच कुठेतरी होता आणि आपल्याला वल्लभ मेल्याची खबर आली आहे." रमेश म्हणाला.
"आता मी म्हमद्याची चूक समजून असं ऍझ्युम केलं की तुरूंगातून पळताना रतनसोबत ती शिक्षिका होती. आणि ती पण आता मेली आहे. तर जर का मी रतनचा चौथा साथीदार असेन, तर मी कुठे असेन?" सिन्नरकर रमेशकडे पाहत म्हणाले.
रमेशची ट्यूब पेटली, "एकतर स्वर्गात किंवा देशाबाहेर."
शिंदे बाकी दोघांकडे पाहत होते.
"आणि देशाबाहेर जर तो गेला असेल तर त्याचा माग काढणं अवघड नाही." रमेश पुढे म्हणाला.
सिन्नरकरांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
"वकार." रमेश हसत म्हणाला आणि सिन्नरकरांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरलं. त्यांनी फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट उघडली आणि तिवारींचा फोन डायल केला.

-----

"तुमचा पळायचा प्लॅन आहे हे मी सगळ्यांना जाऊन सांगेन." बबन अचानकच पुराणिक आणि त्याच्याजवळ येऊन म्हणाला.
"आणि? त्यानं काय होईल असं तुला वाटतं?" तो शांतपणे म्हणाला.
"प्रत्येकालाच यायची घाई होईल आणि तुमचा प्लॅन फ्लॉप होईल." बबन तोंड विचकून हसत म्हणाला. म्हमद्या थोड्या अंतरावर उभा राहून पाहत होता आणि वल्लभ नेहमीच्याच जागेवर त्याच्या ग्रुपसोबत बसून सर्व ऐकत होता.
तो नेहमीच्याच कोर्‍या चेहर्‍यानं दोन मिनिटं बबनकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, "जा सांग सगळ्यांना. बघू काय होतं ते."
बबनला अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. तो चकित होऊन पाहतच राहिला.
"ए काय चाललंय रे?" थोड्या अंतरावर उभा हवालदार हे चौघे-पाचजण एकत्र झाल्याचं पाहून दरडावून म्हणाला.
"काही नाही साहेब." म्हणून बबन त्याच्याजवळ गेला आणि काहीतरी गोड बोलू लागला. पाच मिनिटांनी हवालदार 'धार मारून येतो रे साल्यांनो, गपचूप राहा' असं म्हणून तिथून निघून गेला.
बबन परत त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. "मी चुकीच्या पद्धतीनं बोललो. मला पण तुझ्या प्लॅनमध्ये सामील करा प्लीज. माझी बायको, पोरं आहेत यार. आणि माझी तुरूंगात थोडी वटपण चालते, पाहिलंसच तू."
"तुझी एव्हढी वट चालते तर तुला माझी काय गरज आहे?" तो तितक्याच शांतपणे म्हणाला.
"प्लीज यार प्लीज." तो एकदम गयावया करत म्हणाला.
"एक म्हणजे मी तुझा यार नाही आणि दुसरं म्हणजे हा शहाणपणा माझ्यासमोर परत करायचा नाही." तो दरडावून म्हणाला.
"सॉरी."
"उद्या ह्याच वेळेस ये इथे. चल निघ आता."
बबन आणि म्हमद्या गेल्यावर वल्लभ त्यांच्याजवळ आला.
"तो कसा माणूस आहे ठाऊक आहे ना तुला?" पुराणिक म्हणाला.
"पण त्यानं बवाल केला तर आपल्याला महागात पडेल." तो म्हणाला.
"पण मग कामातही मदत घ्यायला हवी ना त्याची?"
"हो तर. प्लॅनचा प्रत्येक भाग त्याला व्यवस्थित कळायला हवा." तो म्हणाला.
तेव्हढ्यात हवालदार परत आला आणि मोकळा वेळ संपल्याचा भोंगा वाजला.

क्रमशः 

टीप - अंतिम भाग म्हणून जे लिहिलं ते फारच लांब झाल्याकारणे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून पोस्ट करतोय. आजच संध्याकाळी उत्तरार्ध आणि पर्यायाने शेवटचा भागही पोस्ट करेन.

6/07/2012

मृत्युदाता -१८

भाग -१, भाग -२, भाग -३, भाग -४, भाग -५, भाग -६, भाग -७, भाग -८, भाग -९, भाग -१०, भाग -११, भाग -१२, भाग -१३, भाग -१४,  भाग -१५, भाग -१६ आणि भाग -१७ पासून पुढे


"पण पोलिसांचा खबर्‍या ते वॉन्टेड क्रिमिनल हा प्रवास कसा काय झाला?" रेखानं अचानकच विचारलेल्या प्रश्नानं नरेंद्रची ट्रेनच्या खिडकीबाहेर बघताना लागलेली तंद्री भंग पावली.
त्यानं एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मग बोलू लागला, "मी इमाने-इतबारे पोलिसांना खबरा देण्याचं काम करत होतो. काम तसं जीवावर बेतणारंच होतं, पण मला जीवाची कसलीच काळजी नसल्याचा साक्षात्कार मला ट्रेनमध्ये झाला होता. त्याप्रमाणेच पुढे सर्व सुरू होतं. सगळ्यात विचित्र मला ह्या गोष्टीचं वाटत होतं, की केलेल्या खुनांबद्दल मला काहीच वाटत नव्हतं. मला कुठेही अपराधी भावना आली नाही की स्वतःबद्दल घृणा वाटली नाही. मला काहीच वाटत नव्हतं हे सत्य होतं. जणू काही मी आयुष्याचा एक दिवस संपवून दुसरा सुरू केला होता. मुळात मला कसल्याच भावना राहिल्या नव्हत्या. कदाचित माझा भावनिक मृत्यू झाला होता."
"ह्म्म."
"तुला खरं वाटणार नाही मी काय बोलतोय ते. पण माझ्या जागी असणं किती विचित्र असेल हे तुला कळणार नाही. अवघड म्हणत नाही मी, विचित्र. जणू जगाला दोनच रंग उरलेत. काळा अन पांढरा. जिवंत आणि मृत, बस."
"बस बस. पुढे बोल."
"त्याच विचित्र मानसिक स्थितीमध्ये मी नक्षलवादी ट्रेनिंग घेतलं. बंदुका चालवणे, विविध प्रकारचे मार्शल आर्ट्स, सर्व्हायव्हल टेक्निक्स, डोंगरदर्‍या, दारूगोळा. मी मुळात इंजिनियर असल्यानं आधुनिक उपकरणं हाताळायला मी पटकन शिकलो. त्यामुळे मी त्यांच्या गुप्तचर विभागात होतो. रतन सहदेव त्यांच्यातला लेजेंड होता. तुझा विश्वास बसणार नाही, पण नक्षलवाद्यांकडच्या सगळ्या यंत्रणा आपल्या आर्मीएव्हढ्याच किंवा कांकणभर सरसच असतील. कारण त्या चीन, आयएसआय, सीआयए इत्यादींकडून येतात."
"सीआयए?"
"होय. ते एक विचित्र नेक्सस आहे. कोण कुणासाठी काम करतं हेही समजणं अवघड होतं बरेचदा. पण ते पुढे सांगतो. तर मी खबरा पोचवत असतानाच माझ्या ध्यानात आलं, की ह्या खबरांचा पोलिस गावकर्‍यांचे जीव वाचवण्यासाठी किंवा नक्षलवादी गटांवर छापे मारण्यासाठी करत नसून गावकर्‍यांना लुटण्यासाठी आणि नक्षलवादी गटांना राजकारण्यांच्या तालावर नाचवण्यासाठी करत होते. त्यांच्या सोयीनुसार नक्षली नेत्यांची एन्काऊंटर्स होत होती, किंवा नक्षली नेत्यांकडून खंडण्या घेऊन छुपा कारभार सुरू होता. शस्त्र, ड्रग्ज, हवाला सगळंच. ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझा कॉन्टॅक्ट असलेल्या पोलिसाला जाब विचारला, तेव्हा तो त्यांच्यातलाच असल्याची माहिती काढायला मला वेळ लागला नाही."
"मग?"
"मग काय? त्याला मारलं मी." नरेंद्र शांतपणे तिच्या नजरेला नजर देऊन म्हणाला. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. तो पुढे बोलू लागला, "त्यानंतर मी कट्टर नक्षलवादी बनायचा प्रयत्न करू लागलो. तळ्यात मळ्यात राहण्याचा मला कंटाळा येऊ लागला होता. कंटाळा ही एकच भावना शिल्लक राहिली होती बहुदा. पण मग मी गावकर्‍यांची विविध प्रकारे मदत करणं अन्य गटांपासून किंवा पोलिसांपासून वेळप्रसंगी संरक्षण करणं इत्यादी गोष्टी करू लागलो."
"मग कल्पना कुठे?" रेखा मध्येच म्हणाली.
"सांगतोय सगळं पुढे." नरेंद्र एक एक शब्दावर जोर देत म्हणाला, "मी ट्रेनिंगला लागल्यापासूनच कल्पनाशी माझी ओळख झाली होती. ती लहानपणापासून त्याच गावांमध्ये लहानाची मोठी झालेली. ती स्त्रियांना ट्रेनिंग देत असे. पण मदतकार्य, धडक कृती इत्यादी वेळी आम्हाला एकत्र काम करावं लागे आणि बरेचदा सराव मोहिमा असत, त्यावेळीही आमचं बोलणं होई. मी बाहेरून आलेलो असल्यानं तिला माझ्याबद्दल फार कुतूहल असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. सुरूवातीला तिला माझ्याबद्दल संशय असल्यानं ती माझ्याशी जास्त बोलत असे आणि माझ्यावर नजर ठेवून असे. पण मी ते फार पूर्वीच ताडलं होतं आणि त्यामुळे माझं खबरा पोचवणं अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे मी तिच्याशी हळूहळू फ्लर्ट करू लागलो. गोड बोलू लागलो. तिला थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट देऊ लागलो. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. तिचा संशय कमी होऊन ती माझ्याकडे आकर्षित झाली. मी नकळत घोडचूक करून बसलो होतो. माझ्या मनात प्रत्यक्ष काहीच नव्हतं, पण ती गुंतत चालली होती.
आणि मग जेव्हा मी पूर्णवेळ नक्षलवादी बनलो, तेव्हा मी पोलिसाला मारलं म्हणून ती माझ्या अजूनच प्रेमात पडली. माझ्यासाठी सगळं अवघड होऊन बसलं. आता तिच्याशी प्रेमाचं नाटक करण्याची मला काहीच गरज नव्हती. पण न करूनही काय स्पष्टीकरण देणार होतो? पण एक मात्र होतं, मी स्वतःला आमच्या गटाच्या नक्षल विचारासाठी वाहून घेतलं होतं. पण मग एक दिवस आक्रीत घडलं. आमचा नेता मारला गेला आणि जो नवा नेता बनला, तो पैसे आणि दहशतीसाठी राजकारण्यांशी छुपी हातमिळवणी करू लागला. मी गुप्तहेर विभागात होतो, त्यामुळे मी अधून मधून काही कामगिर्‍या करत असे."
"म्हणजे खून."
"ह्म्म. इफ यू पुट इट ब्लंटली." असं म्हणून तो पुढे बोलू लागला, "तर ह्या कामगिर्‍या आम्ही बरेचदा सहकारी संघटनांसोबत करत असू. राजकारणी, नेते, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी इत्यादी लोकांचे 'खरे' चेहरे आम्हाला दाखवले जात असत आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी आम्हाला मिळत असे. पण अर्थातच आम्हाला ते नक्की कोण हे सांगितलं जात नसे. त्यावेळेस मी उल्फा, बोडो, चीनी गुप्तहेर ह्या सर्वांसोबत काम केलं आणि त्याच काळात मी आयएसआयसोबत अर्थात जावेदसोबत काम केलं. पण मी जसजसा शिकत होतो, मला मी नक्की कुणाबरोबर आणि काय काम करतोय ते शोधून काढण्याची अक्कल येऊ लागली. जे चेहरे 'खरे' म्हणून दाखवले जाताहेत, ते सर्व बनावट आहे आणि आपण फक्त काही ठराविक नक्षलवादी नेत्यांच्या आणि त्यांच्या आश्रयदात्या राजकारण्यांच्या आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या मार्गातले काटे काढत आहोत हे लक्षात येऊ लागलं. सामान्य, गरीब पिचलेल्या माणसासाठी लढण्याऐवजी त्यांच्याच पाठीराख्यांचं रक्त सांडतोय हा साक्षात्कार झाला. सरकारी जुलूमाविरोधात क्रांतीच्या नावाखाली देशद्रोह करतोय हे माझ्या लक्षात येऊ लागलं. मला ते सगळे प्रकार लगेच कळू लागल्यामुळे माझा भ्रमनिरास झाला.
माझी त्यावेळेस सर्व बाजूंनी घुसमट होत होती. हातनं होत असलेल्या खुनांचं काहीच वाटत नव्हतं. एखाद्या जिवंत व्यक्तीला मारल्यावर जो मनावर परिणाम होऊ शकतो तोच मुळात होत नव्हता. राग, लोभ, मत्सर, प्रेम वगैरे काहीच उरलं नव्हतं. उरली होती एकच आदिम भावना, हिंसेची. कल्पनाच्या माझ्याबद्दलच्या भावना फारच गहिर्‍या होत चालल्या होत्या आणि मला तिच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. आणि तेव्हाच हा सत्तापलट झाला.
अशातच एके दिवशी माझ्या आणि कल्पनाच्या नात्यानं एक नको ती पायरी ओलांडली आणि मला मी काय करून बसलोय ह्याचा साक्षात्कार झाला."
रेखाच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम पालटले. नरेंद्रच्या ते लक्षात आलं आणि तो बोलायचा थांबला.

-----

"तुम्ही जेलमधून बाहेर आला आहात, तर तिथे कुणाला शंका येत नाही का?" रमेश डोळ्यांवरचा गॉगल काढून टेबलावर ठेवत म्हणाला.
"मी लॉन्ड्री करतोय." शिंदे कटिंग चहा भुरकत म्हणाले.
"आता हे जेलमधल्या कैद्याचं नाटक बेकायदेशीर राहिलेलं नाही शिंदे."
"म्हणजे?"
"आता 'ते' लोकंपण माझ्या साईडनं आहेत."
"कसं काय?"
"मी सिन्नरकरांना भेटल्याचं त्यांना लक्षात आलं असावं बहुदा, त्यामुळे घाईगडबडीनं त्यांनी मला स्वतःच्या बाजूनं करून घ्यायचा उपाय शोधलाय."
"काय?"
"त्यांनी मला माझ्या बहिणीच्या खुन्याचं नाव सांगितलं." रमेश अत्यंत शांतपणे म्हणाला.
"काय?" शिंदेंचा आवाज एकदम चढला, "मग तुम्ही इतके शांत कसे?"
"मी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवू शिंदे? नाव काय सांगितलं ते तरी ऐकाल."
"काय?"
"रतन सहदेव."
"..."
"त्यांनी मला डीएनए एव्हिडन्स दिला आहे. आता बोला."
"मग अजून काय पाहिजे आहे तुम्हाला."
"ते लोक काहीही फॅब्रिकेट करू शकतात शिंदे."
"तरी..."
"आय नो. मी चान्स घेत नाहीच आहे. एवीतेवी रतन हाच आपला पुढचा धागा आहे."
"मग आता पुढे?"
"त्या बाईबद्दल आणि प्रत्यक्ष तुरूंगफोडी पाहिलेल्या माणसाबद्दल अजून माहिती मिळाली का?"
"नाही साहेब. प्रत्यक्ष पळताना पाहिल्याचं खूप जण सांगतात पण काहीतरी गडबड आहे. नुसत्या बढाया आहेत. त्यादिवशीच्या सगळ्यांच्या पोझिशन्सचा आता मला बर्‍यापैकी अंदाज आलाय. त्यावेळेस पळण्याच्या प्रत्यक्ष जागेजवळ जे जे लोक असू शकत होते, त्यांच्यावर मी नजर ठेवून आहे. त्यातला एकजण एकदम निवांत असतो, त्याला कसलीच काळजी नसते. त्यावरून त्याचा घडलेल्या गोष्टीशी काहीतरी संबंध असावा, बहुतेक त्यानं प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी पाहिल्या असाव्यात आणि तो त्यांचा आतला माणूस असावा असं मला वाटतं. पण तो असा सांगणार नाही. त्याला विश्वासात घ्यावा लागेल." शिंदे पिण्याचा आविर्भाव करत म्हणाले.
"त्या सगळ्यांची नावं द्या मला, मी त्यांच्या कुंडल्या मांडून पाहतो." रमेशनं एक कागद पुढे केला.
शिंदेंनी चटचट त्या कागदावर चार नावं खरडली.
"रतनबद्दल पोलिसांनी काय सांगितलं ते आधी व्यवस्थित सांगा आता."
"फारच बोलकी माहिती आहे साहेब, म्हणूनच वेळ काढून या म्हटलं होतं मी."
"ह्म्म."
"रतन ज्या दिवसापासून पकडला गेला, त्यानं तोंडातून एक शब्दही नाही काढला. त्याला फक्त फाशी हवी होती बहुतेक. त्यामुळे तो गप्प राहिला. खटल्यातही आणि जेलमध्ये इंटरोगेशनलाही. कुणाचंही नाव सांगितलं नाही त्यानं. त्यानं आधीच आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याचे हात कायम बांधलेले असत. पण तो तसा शांत होता. आक्रस्ताळेपणा नाही, आदळआपट नाही. इथे आल्यानंतर त्याला वेगळ्याच बराकमध्ये सेपरेट सेलमध्ये ठेवलेलं होतं. त्याचा मोकळा वेळही त्याच मैदानात पण एका जाळीच्या पलिकडे असायचा. तो फक्त येऊन शांत बसायचा आणि परत जायचा. पण जसजसा खटल्यामध्ये वेळ जाऊ लागला, तो अस्वस्थ होऊ लागला. तो काही बोलत नसूनही न्यायप्रकिया प्रचंड वेळखाऊ ठरत होती. त्यानं मागितला नसतानाही आपल्या न्यायव्यवस्थेप्रमाणे त्याला जो वकील मिळाला, तो हाय प्रोफाईल केस पाहून मायलेज खाण्यासाठी विविध स्टंट्स करू लागला. रतन १७ वर्षांचा असून त्याला बालगुन्हेगार म्हणून केस चालवावीपासून ते पकडला गेलेला रतन हा खरा गुन्हेगार नाहीच असली वक्तव्य करण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्यामुळे खटला उगाचच खेचला जाऊ लागला. मग रतनवरची रिस्ट्रीक्शन्स थोडी कमी झाली. त्याला मोकळ्या वेळी इतर गुन्हेगारांसोबत सोडण्यात येऊ लागलं. आणि त्याची पुराणिकसोबत ओळख झाली."
"चिटफंडकार पुराणिक?"
"होय. तो रतनसोबत तासनतास बोलत बसायचा."
"पण रतन बोलू लागला होता?"
"नाही. रतन गप्पच बसून राहायचा, पण पुराणिक तासनतास बोलायचा आणि वल्लभचा ग्रुप त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसून पुराणिकचं बोलणं ऐकायचा."
"म्हणजे पळालेला तिसरा कैदी."
"होय. तुरूंगात एक समाजसेवी संस्था यायची गांधीवाद शिकवायला. थोड्या दिवसांतच रतनलाही त्यांचे स्वयंसेवक सभांना घेऊन जाऊ लागले. आणि रतनला फाशी डिक्लेअर झाली. पण काहीतरी झालं आणि रतनच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल झालं. आणि रतन अजूनच अस्वस्थ राहू लागला. त्यानं सभांना जाणं, पुराणिकबरोबर बसणं बंद केलं. काही दिवस तर त्यानं अन्नपाणीही सोडलं, पण तुरूंगाच्या अधिकार्‍यांनी त्याला सलाईन लावून जगवलं. सुप्रीम कोर्टातही त्यानं गप्प राहणंच पसंत केलं, पण त्याच्या वतीनं एका वकीलाला वकीलपत्रही दिलं गेलं होतं."
"म्हणजे? त्याला मरायचं होतं पण त्याच्या वतीनं कुणीतरी हे करत होतं? त्याच्या मनाविरूद्ध? आणि कुणालाच ती व्यक्ति कोण हे माहित नव्हतं?"
"बहुतेक त्याला स्वतःलाही. पण सुप्रीम कोर्टातही फाशीवर शिक्कामोर्तब झाल्यावर तो पुन्हा नॉर्मलला आला. त्याला भेटायला 'ती' शिक्षिका बाई येतंच होती. पण तिचं काय सांकेतिक बोलणं चालायचं ते कुणालाच कळायचं नाही. पण त्यानंतर पुन्हा गडबड झाली आणि रतनच्या वतीनं राष्ट्रपतींकडे माफी याचिका गेली."
"पण रतन बोलू शकत होताच ना? मग तो बोलत का नव्हता की हे सर्व मी करत नाहीये. मला असलं काही करायचं नाही वगैरे."
"तेच कुणाला कळत नाही. दरवेळेस असं काही झालं की 'ती' शिक्षिका बाई त्याला भेटायला यायची आणि मग तो अस्वस्थ होऊन परत सेलमध्ये जायचा. पण माफीअर्ज झाल्यावर मात्र कडेलोट झाला. कारण माफीअर्ज जाणं म्हणजे आपल्या देशात जवळपास फाशी रद्द झाल्यासारखंच. आणि पुन्हा त्यानं जर असं म्हटलं असतं, तर त्याच्या वकीलांनी 'मानसिकदृष्ट्या अक्षम' असा युक्तिवाद मांडला असता आणि फाशीच रद्द झाली असती. पण ह्यावेळेस बाई भेटून गेल्यावर कसं कुणास ठाऊक रतनकडे ब्लेड आलं आणि त्यानं स्वतःची नस कापून घेतली, पण वल्लभनं हवालदारांना त्याच्याकडे पाहून यायची टीप दिली आणि वेळीच त्याचा जीव वाचला. रतन मानसिकदृष्ट्या अक्षम आहे असं कुणालाच म्हणायचं नव्हतं, म्हणून मग ते तसंच दाबून ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यानं स्वतःचं डोकं भिंतीवर आपटायचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला. स्वतःच्या पायजम्याची फाशी लावून घ्यायचा प्रयत्न केला. मोकळ्या वेळेत जाळीवर स्वतःची नस कापून घ्यायचा प्रयत्न केला, पण पुन्हा वल्लभमुळे त्याचा जीव वाचला. वल्लभच्या ग्रुप त्याच्यावर कायम नजर ठेवून असे. कारणं काय ती कळायला मार्ग नाही."
"कारण रतनही एकेकाळी नक्षलवादी होता." रमेश म्हणाला.
"ओह्ह. तरीच. पण मग त्याला जबरदस्तीनं पुन्हा सभांना नेऊ लागले आणि हळूहळू त्याचा तो भर ओसरला. त्या संस्थेची एक विवक्षित स्वयंसेवक त्याच्यामध्ये फारच लक्ष घालू लागल्यावर तो पूर्वपदावर येऊ लागला आणि चक्क बोलायला लागला."
"ह्म्म. ही तीच का जिनं त्याला पळायला मदत केल्याचं सांगतात?" रमेश म्हणाला.
"होय. तीच."
"मग तिच्याबद्दल काय माहिती?"
"तिच्याबद्दल फार माहिती मिळत नाहीये हो. ती त्या गांधीवादी संस्थेची स्वयंसेवक होती. रतनशी फार बोलायची. बाकी फारशी माहिती नाही कुणाला. तिला रतनमध्येच जास्त इंटरेस्ट होता. संस्थेचं नाव अहिंसा ट्रस्ट."
"ह्म्म." रमेश स्वतःशीच म्हणाला आणि एकदम त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, "काय म्हणालात? अहिंसा ट्रस्ट?"
"हो. का?"
रमेशच्या डोक्यात एकदम कनेक्शन्स लागायला लागली.
विराज गेल्यानंतर जेव्हा रमेश विराजच्या कुटुंबाला भेटायला गेला होता. तेव्हा तिथे त्याला कळलं की विराजची विधवा आता विराजच्या कुटुंबासोबत लातूरमध्ये राहत नाही. विराजच्या मृत्यूनंतर तिनं घर सोडलं होतं. आणि ती पुण्याच्या एका स्वयंसेवी संस्थेत कार्य करायला म्हणून गेली होती. आणि त्यांनीही संस्थेचं नाव हेच सांगितलं होतं. 'अहिंसा ट्रस्ट'. आता पुढची चौकशी अहिंसा ट्रस्टमध्येच करणं भाग होतं.
"पण बबन महाडिकचं काय? तो कुठे येतो पिक्चरमध्ये?" प्रकट रमेश म्हणाला.
"तेच तर ना साहेब. पोलिसांच्या मते त्यांचा एकमेकांशी दूरान्वयानंही संबंध नव्हता. बबन महाडिक लीडर लोकांचा माणूस म्हणून त्याची वट असायची. आणि तो अन त्याच्या ग्रुप वेगळाच असायचा."
"हम्म. कदाचित कैद्यांपैकीच कुणाकडून तरी आपल्याला संपूर्ण कथेचा उलगडा होईल."
"बरं. पण मग तुम्ही?"
"अहिंसा ट्रस्टकडे जातो आता."
"पण तुम्ही अहिंसा ट्रस्टमधून कुठे जाणार आहात? तिनं खोटं नाव दिलं असलं तर?"
"हरकत नाही. मला सगळे मार्ग चोखाळले पाहिजेत. कारण मला ह्या पळालेल्या चौघांपैकी एकाचा तरी माग हवा आहे शिंदे. त्याखेरीज रतनपर्यंत पोचणं महामुष्किल आहे. बबनचा मृत्यूदेखील का आणि कसा झाला ते कळायला हवं." शिंदेंनी मान डोलावली. मग तो पुढे म्हणाला, "तुम्ही जास्तीत जास्त उद्या रात्री तिथे थांबा. परवा काही झालं तरी बाहेर या. कारण माझा ह्या लोकांवर विश्वास नाही." रमेशनं डोळ्यांवर पुनश्च गॉगल चढवला आणि तो उठून निघून गेला.

-----

रेखानं नजर फिरवली होती आणि ती एकटक खिडकीबाहेर पाहत होती. नरेंद्र तिच्याकडेच पाहत होता. आपण सत्य सत्य म्हणून सांगताना काय बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आलं होतं. तिच्या मनात काय सुरू असावं ह्याचा त्याला थोडा थोडा अंदाज येत होता. पण कुठेतरी आत त्याला जाणवत होतं, की हे पूर्वीसारखं नाहीये. कल्पनाच्या बाबतीत जसं घडलं होतं, तसं हे नव्हतं. कुठेतरी आतमध्ये त्यालाही रेखाबद्दल काहीतरी वाटत होतं. त्यानं खूप विचार केला आणि मग हलकेच तिच्या हातावर हात ठेवला. तिनं आधी हाताकडे मग त्याच्याकडे पाहिलं. तिचे डोळे डबडबले होते. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव होते आणि चेहरा नेहमीप्रमाणेच कोरा. तिनं त्याचा हात झटकायचा प्रयत्न केल्यावर त्यानं तिचा हात घट्ट धरला. तिच्या भरल्या डोळ्यांतले अश्रू हलकेच गालांवरून ओघळले. ती बाहेर पाहू लागली. नरेंद्रनं तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिच्या गालांवरचे ओघळ स्वतःच्या बोटांनी पुसले. तिनं नजर खाली केली, तर त्यानं तिच्या हनुवटीला धरून हलकेच तिचा चेहरा वर केला. उजवा हात त्यानं अजूनही घट्ट धरून ठेवला होता. शेजारच्या कंपार्टमेंटमधले लोक त्या दोघांकडेच पाहत होते. आणि ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांत एकटक पाहत होते.
असाच काहीवेळ गेल्यावर तो हळूच म्हणाला, "माझं तुझ्यावर.. प्रेम आहे सायली."
तिच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम पालटले आणि ती एकदम मुसमुसून रडायला लागली. त्यानं तिला जवळ ओढलं आणि तो थोडा जागेवर सरकला आणि दोघेही त्याच्याच सीटवर बसले. आणि तो तिला हलकेच थोपटू लागला.
"तू मला पण सोडून निघून जाशील का एक दिवस?" तिनं थोडासा भर ओसरल्यावर हुंदके देत विचारलं.
"कधीच नाही." तो क्षणाचाही विचार न करता म्हणाला.

-----

"रतन फासीचा कैदी होता रे भाऊ. त्याला आपण फारसा ओळखायचो नाय." म्हमद्या पूर्ण टाईट झाला होता.
"मग? कसा काय त्याचा खास झालास तू?"
"लय लंबी कहाणी है भौ." म्हमद्या अजून एक घोट मारत म्हणाला.
"मग सांग की आरामात, अख्खी रात्र आणि अख्खा खंबा पडला आहे आपल्याकडं." शिंदे डोळे मिचकावत म्हणाले.
"रात भर जाम से जाम टकरायेगा.. रात भर जाम से.." म्हमद्या थोडासा जास्तच झिंगल्याचं शिंदेंच्या लक्षात आलं तशी ते लगेच गाडी विषयावर आणू लागले.
"रतन नक्की कसा होता जेलमधे?"

-----

"त्या रात्रीनंतर दुसर्‍या दिवशी सकाळीच मी एक मोठा निर्णय घेतला." नरेंद्र रेखाला हलकेच थोपटत म्हणाला. बाहेर मिट्ट काळोख पडला होता. सगळा डबा शांत झोपला होता. ट्रेन आपल्याच लयीत थडथडत जात होती. बाहेर माळरानंच माळरानं एकामागे एक पळत होती. रेखा नरेंद्रच्या बाहुपाशात एकदम थकल्यासारखी रेलून बसली होती.
"सकाळी आमचा नेता मैदानात बसून सराव पाहत होता. बाकी लोकही त्यांची त्यांची कामं करत होते. नक्षलवादी कॅम्प म्हणजे एखादी छोटीशी वसाहतच असते."
"हो त्यादिवशी कल्पनाकडे पाहिली ना." ती बोलली आणि एकदम कल्पनाचं नाव आल्यामुळे तिला थोडंसं वाईट वाटलं.
"ह्म्म. तशीच थोडीफार. तर मी युनिफॉर्म घातला नाही. साधे कपडे घातले, एके-४७ उचलली आणि सरळ जाऊन आमच्या नेत्यावर मैदानातच सर्वांदेखत गोळ्या झाडल्या. सगळे एकदम अवाक् झाले. त्याचं निश्चेष्ट शरीर छिन्नविच्छिन्न होऊन माझ्यासमोर पडलेलं होतं आणि मला नेहमीसारखंच काहीही वाटत नव्हतं. मी शांतपणे सर्वांवरून नजर फिरवत होतं. मी बंदूक बाजूला फेकली आणि कुणीतरी पुढे येऊन माझ्यावर झडप घालेल किंवा मला गोळ्या घालेल ह्याची मी वाट पाहू लागलो. पण पाच मिनिटं झाली तरीही भर ओसरत नव्हता. कल्पनादेखील अवाक् होऊन स्तब्ध उभी राहून पाहत होती. आणि अचानकच एकाला कंठ फुटला. आणि तो चक्क माझा जयजयकार करू लागला."
"काय?"
"होय. आणि त्याच्यापाठोपाठ सर्वांनीच त्याच्या सुरात सूर मिसळला आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांना कुणालाच हा नेता आवडत नव्हता आणि मी त्याला असा संपवल्यामुळे ते माझ्या धडाडीवर खूष झाले आणि त्यातल्या एकानं मी फेकलेली बंदूक परत माझ्या हातात दिली आणि मी नवा नेता असल्याचं जाहीर करून एकच गलका सुरू केला.
मी ह्या झालेल्या घटनेनं भांबावून गेलो. मला काय करावं तेच कळेना. लोक माझा जयजयकार करत होते आणि कल्पना खुषीनं आणि कौतुकानं माझ्याकडे पाहत होती. आणि तेव्हढ्यातच मला कल्पना सुचली.
मी जोरात ओरडून सगळ्यांना शांत केलं आणि बंदूक घेऊन कल्पनाच्या दिशेनं चालत गेलो. सगळे काय होणार म्हणून पाहू लागले. कल्पनाच्या डोळ्यात आशा, उत्कंठा आणि कौतुक दाटून आलं होतं. मी ती बंदूक तिच्या हातात दिली आणि जोरात ओरडून सर्वांना आजपासून मी नव्हे तर कल्पना नवी नेता असल्याचं सांगितलं. आणि मी गट सोडून कायमचा जात असल्याची घोषणाही मी त्याच क्षणी केली. सर्वत्र शांतता पसरली. कल्पनाच्या डोळ्यातले त्यावेळचे व्यथित भाव मी आजही विसरू शकलेलो नाही. मी अजून काहीही न बोलता तिथून निघून गेलो. त्यादिवसानंतर मी कल्पनाला भेटलो तो परवाच." आणि नरेंद्र बोलता बोलता थांबला. रेखाला दमल्यामुळे आणि मनावरचं बरंच ओझं उतरल्यामुळे शांत झोप लागली होती. त्यानं तिला थोपटणं थांबवलं.
ट्रेनच्या खिडकीतून मंद चंद्रप्रकाश येत होता. त्या प्रकाशात रेखाचा डोळे मिटलेला शांत चेहरा खूपच सुरेख दिसत होता. इतक्या दिवसांच्या सोबतीत त्यानं रेखाला कधीच इतक्या जवळून निरखून पाहिलं नव्हतं. तिची रेखीव जिवणी, सरळ तरतरीत नाक आणि आखीव भुवया. खिडकीतून येणार्‍या थोड्या वार्‍यानं तिच्या बॉयकट केसांमध्ये हलकीशी सळसळ होत होती. नरेंद्र तिच्याकडे पाहतच राहिला. आणि त्याला त्याची आणि तिची पहिली भेट आठवली.

-----

रमेश 'अहिंसा ट्रस्ट' च्या ऑफिसात बसून तिथले रिस्पॉन्सिबल येण्याची वाट पाहत होता. तिथे लगबगीनं काम करणारी, फोनना उत्तरं देणारी चुणचुणीत मुलगी पाहून त्याला आपल्या बहिणीची आणि पर्यायानं सुवर्णाची आठवण येऊ लागली. आणि गेल्या काही दिवसांतला सगळा घटनाक्रम त्याच्या डोळ्यांसमोर झरझर येऊ लागला.

रमेशनं ट्रिगर ओढला पण ट्रिगर जाम झाला होता. त्यानं पुनःपुन्हा तोच प्रयत्न केला पण ट्रिगर काही केल्या हलेना. आणि रमेशला साक्षात्कार झाला की आपला मृत्यू आत्ता लिहिलेला नाही आणि असा लिहिलेला नाही. आणि त्याक्षणी त्याला आपण काय पळपुटेपणा करतो आहोत ह्याची जाणीव झाली आणि स्वतःचीच लाज वाटली. झाल्या चुका त्या निस्तरणं हे आपल्या ह्या आयुष्याचं उद्दिष्ट करायचा निर्णय त्यानं त्याचक्षणी घेतला. असं ठरवल्यावर त्याला थोडंसं बरं वाटू लागलं.
त्यानं भरलेल्या बॅगा उचलल्या आणि घर बंद करून तो बाहेर पडला. मोबाईल फोनचं सिमकार्ड काढून जाळून त्यानं फेकून दिलं आणि तडक मुंबई गाठली. मुंबईत तो सर्वप्रथम शिंदेंना भेटला आणि त्यांना त्यानं अथपासून इतिपर्यंत सर्व काही सांगितलं. शिंदेंना सगळं सांगितल्यावर त्याला त्याच्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. तो एकदम शांत झाला. तोवर त्याच्या कानावर एसीपी आणि पत्रकाराच्या डबल मर्डरमुळे हाहाकार उडाल्याच्या बातम्या आल्या. त्या राती गावाच्या दुसर्‍या टोकाला देवीचा उत्सव असल्यानं सगळे गावकरी तिथे होते आणि त्यामुळे डबल मर्डरला साक्षीदारच नसल्याचीही बातमी त्याला कळली. रमेश जणू काही व्यसनमुक्ती करत होता. तो स्वतःला बहिणीच्या आणि सुवर्णाच्या मृत्यूपासून वेगळं काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी त्यानं स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. आश्चर्य म्हणजे कर्नल आणि त्याच्या माणसांकडूनही त्याच्याशी कुणी संपर्क केला नव्हता. कदाचित त्यांनाही तोवर रमेशचा माग लागला नव्हता. शिंदे त्यांच्यापरीनं त्याची सर्व मदत करत होते. त्याला सगळ्या बातम्या देत होते आणि स्वतःची नोकरी सांभाळून रोज त्याला भेटायला, त्याच्याशी बोलायला जात होते.
अशातच त्याला नवं खूळ चढलं. राजे आणि डॉ. काळेंच्या पत्नींना त्यानं जे जे केलं ते सर्व सांगून टाकायचं आणि मग त्या जी शिक्षा देतील ती मान्य. शिंदेंनी त्याचं मन वळवायचा परोपरी प्रयत्न चालवला पण रमेश त्यांना दाद देईना. त्यानं ते एकदम मनावरच घेतलं. आणि तेव्हाच नैतिक जवाबदारीतून इंदूरचे कमिशनर सिन्नरकरांनी राजीनामा दिल्याची बातमी आली आणि आश्चर्य म्हणजे ते रमेशचा माग काढत मुंबईला रमेशकडे आले. तिथेच चित्र पालटलं. त्यांनी रमेशला राजे आणि डॉ. काळे आणि त्याचमार्फत त्याच्या बहिणीच्या अन सुवर्णाच्या खुनामागे कोण आहे ते शोधून काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आणि त्याच्या डोक्यावरून माफी मागण्याचं भूत उतरवलं.
मग त्या तिघांनी मिळून प्लॅन बनवला आणि त्याअंतर्गतच शिंदे अंडरकव्हर जेलमध्ये कैदी म्हणून गेले, सिन्नरकर त्यांचे जुने कॉन्टॅक्ट्स वापरून माहिती काढू लागले आणि रमेश सगळे तुकडे जुळवायचा प्रयत्न करू लागला.
अहिंसा ट्रस्टच्या ऑफिसात शिरतानाच आपण योग्य ठिकाणी आलो आहोत ही जाणीव त्याला होऊ लागली होती. इथे काहीतरी कामाचं मिळणार असं त्याला आतून वाटत होतं, त्यामुळेच तो कितीही वाट पाहावी लागली तरी चालेल, ह्याच तयारीनं तिथे बसला.
रमेशची तंद्री त्याच मुलीच्या बोलावण्यामुळे तुटली. त्या ऑफिसातले रिस्पॉन्सिबल आले असल्याचं अन त्यांनी रमेशला त्यांच्या कक्षात बोलावल्याचं तिनं त्याला सांगितलं. रमेश धन्यवाद म्हणून उठला आणि तिनं दाखवलेल्या दिशेनं गेला.

क्रमशः

6/05/2012

मृत्युदाता -१७


नरेंद्र आणि रेखा हळूहळू चालत रस्त्याच्या दिशेनं निघाले होते.
"आपण इतके हळूहळू का चालतो आहोत?" रेखा अजूनही झालेल्या प्रकारानं थोडीशी हादरलेली होती.
"कारण धावत जाऊन काही उपयोग नाहीये. आपण एनर्जी वाचवलेली बरी."
"आणि मागून अजून लोक आले तर?"
"अजून लोक येणार नाहीत हे नक्की. आता येतील ती कल्पनाची माणसं. पण त्यांनाही यायला वेळ आहे. तोवर आपण इथून गेलेलो असू."
त्यानंतर थोडा वेळ कुणीही काहीही बोललं नाही. थोड्या वेळानं ते रस्त्याजवळ पोचले.
रस्ता जरी थोडाफार मोठा असला तरी आडगावात असल्यानं फारसा रहदारीचा नव्हता आणि त्यातून मध्यान्ह जवळ असल्यानं रहदारी अगदीच कमी होती. त्यामुळेदेखील दूर अंतरावर झालेल्या शूटआऊटकडे कुणाचं लक्ष गेलं नव्हतं आणि गेलं असलं तरी तो घाबरून पळून गेला असण्याचीच शक्यता होती. पोलिसांना बोलावणं हे एकंदरच भारतीय संस्कृतीत बसत नसल्यामुळे नरेंद्र निवांत होता. एका छोट्या बॅगेत त्यानं कामाचा दारूगोळा आणि काही निवडक हाताला सोप्या अशा बंदुका घेतल्या होत्या.
"बर्‍याच दिवसांनी बिन खर्चाचं कामाचं सामान मिळालं." नरेंद्र बॅगेकडे इशारा करत डोळे मिचकावत म्हणाला.
रेखा काहीही बोलली नाही.
"काय झालंय तुला?"
रेखानं त्याच्याकडे रोखून पाहिलं.
"काय झालंय? तू झालायस. तुला रक्ताचं, माणसांचं, मृतदेहांचं काहीच वाटत नाही का रे? किती सहजपणे कुणाच्याही डोक्यात गोळी घालतोस. रक्ताच्या थारोळ्यात फिरतोस. अंगावरचे रक्ताचे डाग पुसतोस. आणि मी तुझ्यावर.." रेखा शहारली.
नरेंद्र सगळं शांतपणे ऐकत होता. समोरून एक सरकारी बस थडथडत येत होती. नरेंद्रनं हात करून बस थांबवली आणि ते दोघेजण त्या जवळपास रिकाम्या बसमध्ये अगदी शेवटी जाऊन बसले.नरेंद्रनं बॅग थोडीशी पुढे वरच्या स्टँडवर ठेवली.
"तिथे का ठेवतो आहेस?"
"वेळ पडली तर आपली नाही म्हणून सांगता येईल."
"ड्रायव्हरनं पाहिलं असेल ना."
"तेव्हा ही दाखवायची." नरेंद्रनं शर्टातून तशीच दुसरी बॅग बाहेर काढली आणि सीटखाली सरकवली. "ते लोक सारख्या बॅगा घेऊन फिरत होते, त्याचा आपल्याला फायदा." नरेंद्रनं माफक विनोद केला पण रेखाचा चेहरा कोराच राहिला आणि ती खिडकीबाहेर पाहू लागली. नरेंद्रनं बसमधल्या इतर लोकांवर एक नजर फिरवली.

-----

"तू त्या लोकांना पहिल्या भिंतीवरून उडी मारताना पाहिलं होतंस?" जेलच्या कॅन्टीनमध्ये एक कैदी दुसर्‍या कैद्याला विचारत होता.
"हो यार. सगळंच पाह्यलं मी. बर झालं नाही गेलो ते."
"म्हणजे? तुला पण विचारलं होतं?"
"हो यार. तो दाढीवाला होता एक, तो एकदा हळूच विचारायला मला."
"मग?"
"माझी दोन वर्षं बाकीयेत रे. पुरी करणं ठीक ना यार."
"ह्म्म."
"मायला तू इतका साफ कसा बोलतो रे?"
"व्हाईट कॉलर लोकांच्यात राहून. बरं ते सोड. पण मग नक्की काय काय अन कसं कसं झालं ते सांगतोस का?"

-----

रेखा खिडकीबाहेरच पाहत होती. तिच्या डोक्यात असंख्य विचारांचं मोहोळ उठलेलं होतं. 'मी कशासाठी सगळं सुरू केलं? काय काय नाही केलं. आणि आज काय होऊन बसलंय. अजूनही मी त्याच रस्त्यावर चालतेय. पण आता त्याहून जास्त काहीतरी वेगळं का हवंसं वाटावं? भावना एव्हढ्या तकलादू असाव्यात की एकीमुळे दुसरी तुटून जावी? की प्रेमाची भावना द्वेषाच्या भावनेपेक्षा मजबूत असते म्हणून ती द्वेषाच्या भावनेला मोडून काढते? पण खरंच मला जे वाटतंय ते प्रेम आहे नुसतंच शारीरिक आकर्षण? झालेल्या गोष्टीला थोडीथोडकी नव्हे, दोन वर्षं उलटलीत. शारीरिक आकर्षण शक्य आहे. पण खरंच शारीरिक आकर्षण? नुसतं त्याच्याबरोबर असावंसं वाटणं आणि त्याच्या प्रत्येक दोषाकडे काणाडोळा करणं म्हणजे शारीरिक आकर्षण? ओढ वाटते त्याच्याबद्दल पण तरी हे नुसतंच शारीरिक आकर्षण कसं असेल? पण मग प्रेम? अशा माणसावर? जो कायम 'मी माणूस नाही' असं सांगत असतो?' तिचं विचारचक्र नरेंद्रच्या आवाजानं मोडलं.

"मी ट्रेनच्या ज्या डब्यात बसलो होतो, तिथे तीन बंदूकधारी येऊन उभे राहिले होते आणि गाडी संथगतीनं पुढे सरकत होती." नरेंद्र हळू आवाजात एका सुरात तिच्याकडे न पाहता बोलत होता.
रेखाला त्याच्याकडे पाहून थोडंसं हसू आलं. आणि मग ती पुढे ऐकू लागली.

"ट्रेन न थांबवण्याचे नक्षलवाद्यांचे असावेत. त्याप्रमाणे गाडी चालली होती आणि माझ्या डब्यातल्यांपैकी एकाकडे वायरलेस होता, त्यावरून तो इतर डब्यातल्यांशी तेलुगुमध्ये संपर्क साधत होता. मी एका बर्थवर मुटकुळं करून पडलो होतो. आयुष्यात अचानकच भरपूर थरार एकत्र निर्माण झाला होता. माझ्या कंपार्टमेंटमध्ये एक अख्खं कुटुंब बसलं होतं आणि ते भीतीनं थरथर कापत होतं. मी चहूकडे नजर फिरवत होतो. डब्यामध्ये सर्वत्र भीतीची सत्ता होती. पण मलाच काही वाटत नव्हतं. आणि माझ्या काही न वाटण्याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. काही दिवसांआधीपर्यंत नुसतं एकट्यानं निर्णय घ्यायलाही घाबरणारा मी, एक नव्हे तीन खून करून पळालो होतो आणि त्याबद्दलही भीती तर नव्हतीच, पण आता प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा असतानादेखील माझ्या अंगावर साधा शहाराही आला नव्हता. त्या विचारानंच माझ्या अंगावर शहारा आला आणि मी डब्यातल्या घडामोडी लक्ष देऊन पाहू लागलो. जवळच्या झोळीत आदल्या दिवशी केलेल्या खुनाचं हत्यार, तो भाजी कापण्याचा चाकू होता. तो घट्ट पकडून मी परिस्थितीचा अंदाज घेऊ लागलो.
थोड्या वेळानं डब्यातल्याच दोघा तरूणांनी एका बंदूकधार्‍यावर झडप घातली आणि त्याला आडवा घातला. तोवर दुसर्‍या बंदूकधार्‍यानं त्या दोघांवर गोळ्या झाडायला सुरूवात केली आणि तिसरा बंदूक सरसावून तिथे पाहू लागला. मी तिसर्‍याच्या मागे होतो. मी चाकूसकट खाली उडी मारली आणि तिसर्‍याला कंठस्नान घालून दुसर्‍यावर झडप घातली. त्यालाही मारून मी त्या दोघा तरूणांकडे गेलो. ते गोळ्या लागल्यामुळे विव्हळत पडलेले होते. त्यांनी झडप घातलेला तिसरा अर्धवट गुंगीत पडला होता. त्याच्याही गळ्यावरून चाकू फिरवून मी उभा राहिलो.
डब्यातल्या लोकांना नक्की कशाला घाबरावं तेच बहुदा कळत नव्हतं. गोळ्यांच्या आवाजानं पलिकडच्या डब्यातून वायरलेसवर मेसेजेस येऊ लागले होते. मी वायरलेस उचलून एका गृहस्थाच्या हातात दिला आणि सगळं ठीक असल्याचं तेलुगुत सांग म्हणून समजावलं. पण आवाज ऐकून काहीतरी शंका येणारच पलिकडे हे मी जाणून असल्यानं दोन डबे जोडण्याच्या इंजिनच्या दिशेचा दरवाजा बंद करून मी इंजिनच्या विरूद्ध दिशेच्या दरवाज्याकडे गेलो. तिथून मागे दोनच डबे होते. दरवाजा बंद करून मी जास्तीत जास्त पाच मिनिटं जास्त मिळवली असती. पण काहीतरी करणं भागच होतं. मला खरं तर अजून कळत नाही की मी जे काही करत होतो, ते कुठल्या आंतरिक ऊर्मीनं करत होतो. मी मागच्या दरवाजाकडे पोचलो, तोवर ट्रेन थांबली. मी शांत उभा राहून कानोसा घेऊ लागलो. आणि अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले. मी घाईगडबडीनं मागचाही दरवाजा बंद केला आणि एका सीटमागे उभा राहिलो.
जवळपास पंधरा मिनिटांनी आमच्या कंपार्टमेंटचा दरवाजाच्या कुलूपावर गोळीबार झाला आणि दरवाजा तोडून पोलिस आत आले. नशीबानं माझ्या वेळीच लक्षात आलं नाहीतर मी झडप घालण्याच्या तयारीत होतो.
पोलिसांनी धडक कृती करून नक्षलवाद्यांचा बीमोड केला होता. आणि त्यानंतर डब्यातल्या इतर लोकांनी माझ्या शौर्याची गाथा पोलिसांना सांगायला सुरूवात करेपर्यंत मी हळूच सटकण्याचा प्रयत्न करत होतो. पण एका पोलिसानं मला गाठलंच. "
"दोन दिवसांत सहा खून?", रेखाचे डोळे विस्फारले होते.
"खून? खून म्हणू शकतो आपण त्याला?" नरेंद्र स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला, "ह्म्म. कदाचित. की वध? की हत्या? की फक्त मृत्यू??"
रेखा काहीच बोलली नाही. त्याचा चेहरा शांत होता. कोरा नव्हता नेहमीसारखा. त्याला आतून कसलंतरी समाधान वाटत होतं.
"त्यानं माझी चौकशी सुरू केली. मी त्याला माझी खोटीच माहिती दिली. शंकर नावाची सुरूवात तिथेच झाली. आणि त्यानं मला नक्षलवाद्यांमध्ये शिरून पोलिसांचा खबर्‍या बनण्याची ऑफर दिली. मी कसलाही विचार न करता हो म्हटलं.
त्यानं मला ट्रेन ऑपरेशनमध्ये पकडलेला नक्षलवादी म्हणून ताब्यात घेतलं आणि मी तुरूंगामध्ये नक्षलवाद्यांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या पोलिसानं माझी एका नक्षलवाद्यासोबत तुरूंगातून पळायची सोय केली आणि मी त्यांचा विश्वास मिळवण्याची सुरूवात झाली."
"तू नक्षलवाद्यांमध्ये पोलिसांचा खबर्‍या होतास?" रेखाला एखादी गुंतागुंतीची रहस्यकथा वाचावी तसं वाटू लागलं होतं.
"नाहीतर मग इतक्या सहजी बाहेरचा माणूस त्यांच्या गोटात शिरेल कसा आणि पोलिस रेकॉर्डमध्ये रतनला मी सहजासहजी कसा रिप्लेस करेन?"
"मग काय बिनसलं नक्की?"
"बरंच काही." नरेंद्र बसच्या पुढच्या काचेतून बाहेर पाहत म्हणाला.
समोर एक पोलिस चेकपोस्ट होती आणि बस हळूहळू रांगेतून पुढे सरकत होती.

-----

"भणगेंच्या मदतीनं मी सिक्युरिटी टेप्समधून रहस्यमयरित्या हरवलेल्या, रतनला तुरूंगात भेटायला येणार्‍या बाईचा चेहरा शोधून काढला आहे." सिन्नरकर हातातली फाईल टीपॉयवर ठेवत म्हणाले.
"ही बाई आणि रतनसोबत पळालेली बाई. दोघी वेगवेगळ्या आहेत." रमेशनं फाईल पाहून रागानंच परत बंद केली.
"आर यू शुअर?"
"शिंदेंनी जेलमधल्या प्रत्यक्षदर्शीच्या वर्णनावरून बनवलेलं हे बघा पोर्ट्रेट." रमेशनं खिशातून दुसरा एक कागद काढून टीपॉयवर ठेवला.
"ह्म्म." सिन्नरकर दोन्ही चित्रं पाहत म्हणाले.
"मलाच जावं लागेल आता तिथे."
"तुम्हाला वाटतंय ही चांगली आयडिया आहे?" सिन्नरकर अविश्वासानं म्हणाले.
"आता वाटण्यासारखं काय आहे साहेब? आय हॅव ऑलरेडी स्क्रूड अप माय लाईफ. आता झालेल्या चुका अन केलेले अन्याय निस्तरायचेत. राजे आणि डॉ. काळेंच्या खुनामागे कोण आहे ते मला रतनशिवाय कुणी सांगू शकणार नाही."
"पण कोल्हेचे पाठीराखे?"
"त्यांनाही रतन हवाय, मलाही रतन हवाय. पाहतो मी कसं जमवायचं ते. पण आता तुम्ही ह्या सगळ्यात पडू नका साहेब. आधीच माझ्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागलेला आहे."
"तुम्ही माझ्यावर उपकारच केलेत असं म्हणेन मी रमेश. पण ते असू दे, मी काय करू ते सांगा फक्त. माझे काही कॉन्टॅक्ट्स अजूनही स्वच्छ आणि चांगले आहेत." सिन्नरकर हसत म्हणाले.
"ह्म्म. ह्या बाईचा काही पत्ता लागतो का ते पाहू शकाल का?" रमेश सिक्युरिटी कॅमेरातल्या फोटोकडे बोट करत म्हणाला."
"ऑलरेडी माहिती काढलीय मी रमेश. ती पुण्यातल्या एका शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे आणि तिथल्या आमदाराची 'खास मैत्रिण'. किंवा आपण असं म्हणू, की ती आमदाराची 'खास मैत्रिण' आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षिका आहे. हा तिचा पत्ता." सिन्नरकर त्याच फायलीतला दुसरा कागद काढत म्हणाले.
"परफेक्ट प्लेस टू स्टार्ट." म्हणत रमेश उठून उभा राहिला.

"एक विचारू का रमेश?" सिन्नरकर अचानकच म्हणाले.
रमेश थांबून त्यांच्याकडे पाहू लागला.
"असं काय झालं की तुम्ही एकदम मुंबईत परतलात आणि आता जीवावर उदार होऊन लढायला उभे राहिला आहात? नुसत्या कोल्हेला मारण्यामुळे हे घडणं अवघड आहे."
रमेश थोडा वेळ शून्यात पाहत राहिला.
"कोल्हेचा मृत्यू हा ट्रिगर होता साहेब. पण खरं कारण आहे साक्षात्कार. कसला, कसा ते शब्दांत सांगणं कठीण आहे."

-----

बस  थांबल्यावर रेखा काळजीनंच नरेंद्रकडे पाहू लागली.
"आता इथेही गोळीबार?" तिनं हळूच विचारलं.
"गरज पडली तर." तो तितकाच हळू म्हणाला, "मागे झालेल्या गोळीबाराची बातमी पोलिसांपर्यंत पोचलेली दिसते."

गाडीत  पोलिस चढले आणि गाडीतल्या एकूण सात-आठ लोकांकडे पाहून आयडेंटिटी प्रूफ मागू लागले. नरेंद्रनं शर्टाच्या आतल्या कापडाच्या तुकड्यानं शिवून ठेवलेलं छोटं पॅकेट काढलं. त्यात दोन ड्रायव्हिंग लायसन्सेस होती. पोलिस जवळ येताच त्यानं पुढे केली.
"नरेंद्र विजयकांत हजारे और रेखा नरेंद्र हजारे। मुंबईसे यहां क्या करने आये हो?" पोलिसानं साशंकपणे विचारलं.
"ट्रेकिंग करने आये थे।"
"सामान कहां है?"
"चोरी हो गया साहब। कपडे देखिये हमारे. चोर का बहुत पीछा किया।" नरेंद्र थोडासा घाबरल्यासारखा आणि चिडल्यासारखा बोलत होता, कुणाचाही त्याच्या गोष्टीवर विश्वास बसावा.
"तो चोर लायसन्स छोड गया क्या?"
"लायसन्स और थोडे पैसे यहां रखे थे साहब।" नरेंद्रनं नुकताच फाडलेला चोरखिसा दाखवला, "अनजान जगह पे यह सब होगा समझकेही आते हैं हम। पहला ट्रेक नही है हमारा।"
"तो यह बॅग किसका है?" पोलिस त्याच्या सीटखाली बोट दाखवत म्हणाला.
नरेंद्रनं एकदम प्रश्नार्थक चेहरा करत खाली पाहिलं आणि घाबरून उठला.
"यह तो पहलेसेही होगा। बम होगा क्या इसमें?" असं म्हणत रेखाचा हात धरून तिला ओढत सीटपासून दूर गेला.
पोलिसही एकदम चक्रावले. ड्रायव्हरला विचारायला त्यांनी घाईघाईनं पुढे बोलावलं. एव्हाना पुढे-मागे गाड्यांची बरीच गर्दी होऊ लागली. त्यातली माणसं उतरून काय सुरू आहे ते पाहू लागली. ड्रायव्हर ती नरेंद्रचीच बॅग असल्याचं म्हणाला तशी नरेंद्रनं रॅकवर ठेवलेली बंदुकांची बॅग हातात घेतली.
"यह हमारा है। उसका पता नहीं.. बम हो सकता है बम..." असं तो जोरात म्हणाला आणि रेखाला जवळपास ओढतच बसमधून खाली उतरला. पोलिसांसकट सगळेच गोंधळले. तो खाली जमलेल्या गर्दीला बॉम्बबद्दल सांगू लागल्यावर तिथे एकच पळापळ झाल. पण रेखा आणि नरेंद्र एका पोलिसांच्या गाडीच्याच आश्रयाला गेले.
मग बॉम्बस्क्वॉड आलं पण बॅगेत काहीच नव्हतं. मग पोलिसांनी परत नरेंद्रला बाजूला घेतलं.
"तुम्हारा सामान चोरी हुआ, तो यह बॅग कैसे रह गया?" पोलिसानं नरेंद्रच्या हातातल्या बॅगेकडे बोट दाखवलं.
"यह खाली बॅग है साहब, खाने का सामान था इसमे।" नरेंद्रनं रिकामी बॅग उघडून दाखवली.

थोड्या वेळानं पोलिसांनी बस पुढे सोडल्यावर रेखा हळूच नरेंद्रच्या जवळ सरकली आणि म्हणाली, "बंदूका कुठे आहेत?"
""ह्या काय इथे?" त्यानं हातातली बॅग उघडून दाखवली.
"मग मगाशी?"
"मी पोलिस व्हॅनच्या आश्रयाला गंमत म्हणून नव्हतो गेलो." नरेंद्र डोळे मिचकावत म्हणाला.
"पण एव्हढी मोठी रिस्क?"
"अवघड नावं घेतली की आयकार्डं विश्वसनीय वाटतात. आणि पोलिसांकडेच मदत मागून घाबरल्याचा उत्तम अभिनय जोडीला असला की पोलिस सहसा विश्वास ठेवतात."
"ह्म्म.  पण आता पुढे काय?"
"आता पुढे मुंबईला आपल्या घरी जायचं मिसेस हजारे."


क्रमशः