2/07/2010

नटरंग

अप्रतिम. एवढा एकच शब्द माझ्या मनात आला, जेव्हा मी नटरंग बघितला.(अर्थात कुणाचे ह्याबाबतीत माझ्याशी मतभेद असू शकतात.) खरं म्हणजे काही गोष्टी शब्दांमध्ये वर्णन करणं शक्यही नसतं आणि योग्यही नसतं. कारण जर चित्रपटांचं वर्णन शब्दांमध्ये करता आलं असतं तर, कादंब-यांवर चित्रपट बनले नसते. पण ब्लॉग म्हटलं की शब्द आलेच. आणि शब्द म्हणजे माझं स्वतःला व्यक्त करण्याचं सध्या तरी एकमेव माध्यम आहे.

मी सिनेमांची परीक्षणं करणं केव्हाच सोडलं आहे. कारण मला प्रत्येक सिनेमामध्ये काहीना काही आवडतंच. पण मजा अशी झालीय, की मला नटरंगमध्ये सगळंच आवडलं. अगदी वेशभूषेपासून, ते अप्रतिम संगीतापर्यंत. पण नटरंग एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो, ते अतुल कुलकर्णींमुळे. अतुल कुलकर्णी "गुणा कागलकर" च्या व्यक्तिरेखेमध्ये अनेकानेक रंग भरत जातात आणि डॉ. आनंद यादवांची कादंबरी वेगवेगळ्या पातळ्या पार करत जाते. मी डॉ. यादवांची मूळ कादंबरी वाचली नाहीय, पण नक्कीच त्यांना स्वतःलाही ह्या सिनेमाचा अभिमान वाटला असेल यात वाद नाही.

रवी जाधव ह्यांचं दिग्दर्शन नवोदितासारखं वाटतंच नाही. आणि त्यांचा एडव्हर्टायझिंगचा अनुभव चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहतो.  सर्व प्रमुख कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. तो काळ, ते प्रसंग आपल्याला त्यांच्या विश्वात घेउन जातात. एका सच्च्या कलावंताचं दुःखं आणि त्यायोगे त्याच्या नातेवाईकांच्या वाट्याला आलेलं दुःखं सगळं अंगावर येत राहतं. नशीबाचे विचित्र खेळ बघून मन सुन्न होतं. पण सगळ्या परिस्थितींमध्ये सुद्धा असलेली गुणाची निरागसता आणि सचोटी पाहून काळजाला पीळ पडतात आणि प्रेरणासुद्धा मिळते. हाच ह्या चित्रपटाचा विजय आहे, की ही एका प्रतिभावान, सच्च्या पण परिस्थितीने गांजलेल्या कलाकाराची विलक्षण कथा असूनही त्या कलेशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या प्रेक्षकालासुद्धा आतपर्यंत स्पर्शून प्रेरणा देते.

4 comments:

  1. >>मी सिनेमांची परीक्षणं करणं केव्हाच सोडलं आहे. कारण मला प्रत्येक सिनेमामध्ये काहीना काही आवडतंच.
    चित्रपट परिक्षण म्हणजे केवळ सिनेमावर आसुड ओढणं असे समजतो का तू?

    परिक्षण नसलं तरी जे वाटले ते लिहु शकतो.. त्याला परिक्षण म्हणायचं की आढावा हे वाचनाराच ठरविणार...

    नटरंग बद्दलच्या मतांबद्द्द्ल सहमत.. फक्त शेवट थोडा गुंडाळल्यासारखा झाला...

    ReplyDelete
  2. अरे बंधू..तसं नाही...
    मला काही ना काही आवडतं..आणि मग माझं त्या सिनेमातल्या अवगुणांकडे दुर्लक्ष व्हायला लागतं..मग परीक्षण निष्पक्ष राहत नाही..म्हणून...
    उदाहरण खाली तूच लिहिलंस...शेवट कदाचित खरंच गुंडाळलाय...पण मला कळलं का ते? नाही!

    ReplyDelete
  3. Editing paN vyavasthit nahi ahe. Tyaachi baayko to duur aahe mhaNun haal apeshta ani tirkya nazra sahan karat aste. Tichi manasthiti evdhi khalavte ki ti tyala soDun dete. Aata he sagle haLu haLu dakhvaayla have. PaN pichchar madhye he sagle ekach scene madhye gundaLale aahe.

    Pichchar madhye music aaNi Atul KulkarNi chi acting soDun mala kahich nahi aavadle. Direction paN evdhe kahi great navhte. A story like this could have been exploited. But that's good enough to give this movie a 3 or 3.5 star.

    Baaki tu tar lihich re. Changlya goshti ekdum lakshaat yet nahit. Ase kahi vachle tar te consciously lakshaat yete.

    ReplyDelete
  4. धन्यवाद सागर,
    तू म्हणतोयस त्यात तथ्य असावं. पण मी वर लिहिलं तशी मला त्या त्या सिनेमाची कावीळ होते आणि सगळंच एकाच रंगाचं दिसायला लागतं..;)

    ReplyDelete