2/23/2010

हरिश्चंद्राची फॅक्टरी

कित्येक दिवसांपासून पहायचाय पहायचाय म्हणता म्हणता शेवटी रविवारी 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहिला. गेल्या काही आठवड्यांमध्ये एकामागे एक असे उत्तम मराठी सिनेमे पाहिलेत. त्यामुळे 'हरिश्चंद्राची..' कडून अपे़क्षा फारच वाढल्या होत्या, पुन्हा ऑस्करवारीला जाऊन आल्यामुळे असलेल्या अपेक्षा वेगळ्याच. आणि 'हरिश्चंद्र' आपल्याबद्दलच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो.

भारतातील पहिलं चलतचित्र बनवणार्‍या एका कलंदर पण दूरदर्शी माणसाची झपाटलेली गोष्ट अतिशय हलक्याफुलक्या आणि नीट पाहिलं तर तितक्याच जबाबदारीने सांगण्यात दिग्दर्शक परेश मोकाशी शंभर टक्के यशस्वी होतात.

सिनेमा पाहणार्‍या विविध वयोगटातील, विविध आवड असणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाला आपलंसं करेल अशी सिनेमाची हलकीफुलकी तरीही ह्रदयस्पर्शी मांडणी आहे. पण तरीही काही समीक्षकांच्या मते सिनेमा हलकाफुलका होण्याचा नादात फाळकेंच्या लढाईचं गांभीर्य थोड्या प्रमाणात नष्ट झाल्यासारखं वाटतं. पण मला मात्र ते मान्य नाही. कारण माझ्या मते सिनेमा हलकाफुलका आहे तो केवळ मोकाशींनी तसा बनवलाय म्हणून नव्हे तर फाळकेंचं व्यक्तिमत्वच तसं प्रतीत होतं. अगदी डबघाईची स्थिती असतानाही केवळ ज्याच्याशी भांडण केलं त्या जुन्या भागीदाराला दिलेल्या वचनापायी स्वतःची पूर्ण क्षमता असूनही नव्यानं धंदा करण्यास नकार देणार्‍या ह्या जगावेगळ्या माणसाचं आयुष्य असंच दिलखुलास असायचं. आणि आयुष्यातले अतिशय ताणाचे प्रसंगही मोकळेढाकळे होतात ते त्यांच्या विलक्षण प्रतिभाशाली पत्नीच्या पाठिंब्यामुळे. जर त्यांची पत्नी त्यांच्या प्रत्येक निर्णयात केवळ मूकपणानेच नाही तर सक्रिय सहभागी होत नसती तर कदाचित फाळकेंची कथासुद्धा तणावपूर्ण आणि दुःखाची किनार असलेली झाली असती. पण ती तशी न होता केवळ संघर्षपूर्ण आणि अर्थपूर्ण होते. मोकाशींनी त्यांच्या पत्नीचं पात्रही अतिशय ताकदीचं लिहिलं आहे. आणि जितक्या ताकदीने नंदु माधव फाळकेंची व्यक्तिरेखा उभी करतात, तितकीच तोलामोलाची साथ त्यांना विभावरी देशपांडे त्यांना त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत देतात.

केवळ दीड तासांच्या ह्या सिनेमात फाळकेंच्या बहुरंगी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाची फार जवळची ओळख मोकाशी आपल्याला करून देतात. प्रत्येक प्रसंग आपल्याला त्यांच्या विश्वात घेऊन जातो आणि त्या विश्वाचं दर्शन त्यांच्या नजरेने करून देतो. त्यांची निरागसता, असामान्य प्रतिभा, बेधडक स्वभाव आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर त्यासाठी झोकून देण्याची वॄत्ती नंदु माधव अतिशय समरसून दर्शवतात. त्या काळात असलेला वैज्ञानिक दॄष्टिकोन, स्त्री पुरुष समानतेची समज त्यांचं सुसंस्कॄत व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतात. आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे सारे पैलू अतिशय मोजक्या प्रसंगातूनही ठळक सामोरे येतात.

त्यांचं मुळातलंच मिष्किल असणं आणि कठीण प्रसंगातही शांत राहणं सिनेमालाही तसंच असायला भाग पाडतं. त्याकाळात लंडनमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळत असतानाही कायम वेगळी वाट चोखाळणारा हा माणूस जेव्हा भारतात हा व्यवसाय वाढावा म्हणून ती संधी नम्रपणे धुडकावतो, तेव्हा त्यांच्यातल्या सच्च्या देशभक्ताची चुणूक दिसते. त्यांची देशभक्ती व्यक्त करायची पद्धत फक्त वेगळी होती.

मी लिहिलंय त्याहून खूप जास्त अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहा. जितक्या निरागसपणाने हा चित्रपट व्यक्त होतो, तितकाच प्रगल्भ आणि अर्थपूर्णही आहे; फक्त ते जाणवण्यासाठी ती दॄष्टी हवी.

4 comments:

  1. अप्रतीम.. शब्द नं शब्द पटेश...

    ReplyDelete
  2. अनुमोदनाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  3. >>कारण माझ्या मते सिनेमा हलकाफुलका आहे तो केवळ मोकाशींनी तसा बनवलाय म्हणून नव्हे तर फाळकेंचं व्यक्तिमत्वच तसं प्रतीत होतं.
    This is perfect. Paresh Mokashi visited IITB and he talked about this movie. Tyaat lokanni haa prashn vicharla ani tyache uttar paN hech hote....
    Too good an observation. :-)

    ReplyDelete
  4. आयला, हे माझ्यासाठी खरं सर्टिफिकेट आहे...खरंच..मी पास झालो! :D

    ReplyDelete