8/05/2010

नावात काय आहे

कालच टीव्हीवर बातमी बघत होतो. 'टोयोटा' नं जपानमध्ये विक्रमी विक्री केलीय, पण अमेरिकेमध्ये त्यांच्या विक्रीचा नीचांक आहे. काही महिन्यांपूर्वीच 'गुणवत्ता' (क्वालिटी) शी संबंधित अनेक समस्या उद्भवल्याने, टोयोटावर हजारो गाड्या परत मागवण्याची नामुष्की ओढवली होती. अमेरिकेच्या कोर्टांमध्ये त्यांच्यावर बर्‍याच ग्राहकांनी 'सेकंड हँड किंमत' घटल्याबद्दल केसेसही ठोकल्यात. त्यामुळे टोयोटाला आपला गुणवत्ता तपासणी विभाग वाढवावा लागला, अनेक भरपाया द्याव्या लागल्या, कमावलेल्या नावाला बट्टा लागला तो वेगळाच. ह्या सगळ्या प्रकरणामुळे अमेरिकेत आणि इतरत्र त्यांची विक्री विक्रमी घटली, पण टोयोटाचा मूळ देश असलेला जपान मात्र अपवाद ठरलाय. तिथे ह्यावर्षीदेखील लोकांचा टोयोटावरचा विश्वास कायम असल्याचं दिसून आलंय. सर्वेक्षणांमधून हे ही सामोरं आलंय, की मुळात जपानी माणसांना 'त्यांची' कंपनी असलेल्या आणि जगभरात नाव कमावलेल्या टोयोटाचा फार अभिमान वाटतो. युरोपमध्ये पहायला गेलं तर अश्याच प्रकारे, 'सिमेन्स'बद्दल जर्मन लोकांना आणि 'फेरारी' बद्दल इटालियन लोकांना वाटणारा 'जिव्हाळा' आणि अभिमान जाणवतो.

नीट पाहिलं, तर 'टोयोटा' हे नाव जपानी आहे. 'सिमेन्स' हे त्या कंपनीच्या संस्थापकाचं आडनाव (जो प्रसिद्ध संशोधक होता आणि ह्याच्याच नावाने वाहकतेचं एकक आहे) आणि फेरारी हे देखील इटालियन आडनाव आहे. 'होंडा', 'देवू', ही अनुक्रमे जपानी आणि कोरियन आडनावं आहेत. एकंदर 'नोकिया', 'केलॉग्ज', 'कॅडबरी', 'नेस्ले' ह्या सगळ्या परदेशी कंपन्यांची नावं, त्यांच्या त्यांच्या मूळ देशाच्या भाषेतलीच आहेत. माझा मुद्दा असा आहे, की ह्या सगळ्या कंपन्या आपल्याच भाषेतली, आपल्याच मातीतली नावं घेतात आणि नुसत्या स्वतःच्या देशातच नाही, तर जगभरात ते नाव पोहोचवण्यात यशस्वी होतात.

आता आपल्या कंपन्यांकडे पाहू. सर्वप्रथम, 'टाटा' चा सन्माननीय अपवाद आपण बाजूला काढू. 'रिलायन्स', 'इन्फोसिस', 'विप्रो', 'एचसीएल इन्फोसिस्टम्स' ही काही उदाहरणं मोठी. 'पार्ले' हे उत्पादन फक्त भारतातच प्रसिद्ध आहे, तीच गत 'बजाज'चीतरीही त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देऊ. 'गोल्ड स्पॉट', 'थम्स अप'(ही पूर्वी देशी कंपनी होती, मग ती 'कोक'ने विकत घेतली.), 'व्हिआयपी' ही अजून काही उदाहरणं. अनेक देशी नावांची उत्पादनंही आहेत, जी देशामध्ये बर्‍यापैकी प्रसिद्ध आहेत, पण बहुतांशी त्यांना त्यापुढे जाण्याचा स्कोप नाही. तसंही, मला सर्वसमावेशक असं वक्तव्य करायचं नाहीय, पण एकंदर पद्धत कुणाच्याही लक्षात आली असेल. सहज रस्त्याने चालतानाही, दुकानांची नावं वाचत चला. जुन्या दुकानांची नावं अजूनी, 'गणेश जनरल स्टोर्स' वगैरे दिसतील, तुलनेनं नवं दुकान दिसेल, 'मॅग्नम', 'क्लासिक', 'सॉलिटेअर' आमच्याइथे, 'नीलकमल हेअरकटिंग सलून' आहेच, पण 'रिलॅक्स' हेअरकटिंग सलूनदेखील आहे. 'हेमंत केशकर्तनालया'चं रुपांतर 'हेमंत हेअर कटिंग सलून' मध्ये कधी झालं, हे आमच्याही लक्षात आलं नाही. 'कृष्णा विजय हिंदू हॉटेल'चं नाव 'क्रिष्ना रेस्टॉरंट' झालं, 'वसंत विजय हिंदू हॉटेल'चं असंच काहीतरी 'चायना टाऊन' वगैरे कायसं झालं. बदल झाले, मोठे बदल झाले, पण रोज एखादी गोष्ट बघितली, की तिच्यातले सूक्ष्म-सूक्ष्म होत मोठे झालेले बदल कळत नाहीत, पण एकदम बघायचा कोनच बदलला तर बदल डोळ्यांत भरायला लागतात.

युरोपातल्या लोकांचा भाषाभिमान पाहून मला कधीकधी न्यूनगंड वाटायला लागतो. पण ते असा काही ठरवून अभिमान बाळगत नाहीत, तो तसाच त्यांच्या धमन्यांत वाहतो. त्यांच्या कंपन्यांची नावं, 'क्राऊस माफ्फेई बेर्स्तॉर्फ', 'वेअर गाब्बिओनेत्ता' आणि अजूनही सोपी सोपी आहेत, पण त्यांची नावं, जिथली तिथली स्थानिक. उगाच 'पर्सेप्ट', 'कॅनोनिकल' वगैरे उधारउसनवारीची नावं आणत नाहीत ते सहसा. अपवाद सर्वत्र असतात, पण आपण पद्धत पाहिली, तर अशीच असते. आता तुम्ही विचार करा, 'भिवबा प्लॅस्टिक्स' ह्या नावाने कुणी कंपनी काढली, तर ती किती दिवस टिकेल भारतातच, सोडा महाराष्ट्रात. पण त्यानंच 'जेम प्लास्टिक्स' किंवा 'टॉप प्लास्टिक्स' (माझं इंग्रजी नावांचं सिलेक्शन आणि कल्पनाशक्ती फार थिटी पडतेय आत्ता ह्या क्षणी) असं काहीसं नावानं काढलं, तर त्याचा धंदा चालण्याची शक्यता वाढते. ह्याचं कारण बहुधा, इंग्रजांच्या काळापासून आलेलं, 'परकीय' वस्तूंचं आणि पर्यायाने परकीय नावांचं आकर्षण असावं आणि कालांतराने अमेरिकन झळाळीमध्ये दिपून गेलेले डोळे असावं. 'कोलंबस ट्रॅव्हेल्स' हे नाव 'कडमडेकर यात्रा कंपनी' पेक्षा 'हेप' आणि 'हॅपनिंग' वाटतं. ह्याचं कारण आपल्या शिक्षणात आणि आपल्यावर चहूबाजूनी पडत असलेल्या प्रभावात कुठेतरी असावं.

ह्याचा अर्थ काय होतो? आपण सगळेच (सन्माननीय अपवाद असतीलच) कमीअधिक फरकाने, सहज प्रभावित होऊ शकणारे असतो. आपण स्वतःच स्वतःला कमी का लेखतो हे मला न उलगडलेलं कोडं आहे. एक उदाहरण देतो. माझ्या बाबांच्या मते वुडलँड हे बूट उत्कृष्ट असतात, त्यामुळे मी तेच वापरले पाहिजेत. मला स्वतःला महाग बूट आवडत नाहीत, कारण माझ्यामते माझ्या चालण्याच्या पद्धतीमुळे बूट इतरांच्या मानाने लवकर खराब होतात. पण गेल्या वर्षी मी बाबांच्या पुढे हार मानली आणि वुडलँड घेतले. अपेक्षेप्रमाणे सहा महिन्यांत ते ओळखू न येण्याइतपत पालटले. मी सुट्टीवर आलो असताना दुकानात गेलो आणि स्वस्तामध्ये, त्यांचं उत्तम रिव्हँपिंग करून आणलं. अजून वर्षभर ते टिकले आणि मग त्यांनी राम म्हटलं. मग माझी आणि बाबांची वरात पुन्हा वुडलँडमध्ये. माझा सक्त विरोध ह्याही वेळी मोडून काढण्यात आला आणि पुन्हा महागडे बूट माझ्या पायात आले. काऊंटरवर पैसे देताना, तो दुकानदार पॉलिशचा एक ६० रूपयाचा ब्रश दाखवत होता आणि १००-१५० रुपयाचं पॉलिश दाखवत होता. बाबा म्हणाले, "अरे भाऊ, तुम्ही एव्हढे महाग बूट विकताय, तर १००-१५० रूपयाच्या गोष्टी तुम्ही फुकट दिल्या पाहिजेत. वुडलँडसारख्या परदेशी कंपनीला शोभत नाही असं."

तर तो म्हणाला, "काका(हे तो बाबांना म्हणाला), वुडलँड भारतीय कंपनी आहे (संभाषण हिंदीत होतं)."

"क्काय?" मी आणि बाबा एकदमच म्हणालो.

बाबांचा भ्रमनिरास झाला होता. मला क्षणभर वुडलँडबद्दल आदर वाटून गेला.

विचार करा, जर वुडलँडने तितक्याच उत्तम क्वालिटीचे बूट, 'अरण्य' किंवा तत्सम नावाने विकले असते, तितक्याच उत्तम शोरूम्समध्ये, तर ते एव्हढे नावाजले असते का? (ओके, बर्‍याच जणांना वुडलँड माहित नसेल तर ठाऊक नाही, पण मोठ्या शहरांमध्ये त्यांचं बर्‍यापैकी प्रस्थ आहे) ह्या एका प्रसंगानं मी स्वतःच विचारात पडलो, की असं का? ती भारतीय कंपनी आहे म्हटल्यावर माझ्या आणि वडलांच्या अपेक्षा कमी झाल्या होत्या का? नक्की काय वाटलं होतं त्या क्षणी? नेहमी स्वदेशी स्वदेशी म्हणणारा मी, चारचाकीही घ्यायची तेव्हा महिंद्रा किंवा टाटा असं स्कोडावाल्यांसमोर बोलणारा नक्की कसा विचार करतो?

नावामध्ये असा काय महिमा आहे, की ज्यामुळे किस्मत बदलते. क्षेपणास्त्रांची नावं, 'अग्नी', 'पृथ्वी' किंवा 'घौरी' अशी का ठेवतात? 'रघू', 'रमेश' किंवा 'अस्लम' अशी निरुपद्रवी का ठेवत नाहीत? युद्धमोहिमांची नावं 'पराक्रम', 'विजय' अशी का ठेवतात, '११२' किंवा '३६४' अशी आकड्यांमध्ये का ठेवत नाहीत? बर्‍याच नावांशी 'अस्मिता' कशी काय जोडली जाते? खूप विचित्र विषय आहे. मी कधीही भरकटेन अशी भीती वाटतेय. त्यामुळे पुढच्या परिच्छेदात संपवायचा प्रयत्न करतो.

कुठून कुठे फिरून आलो मी. स्थानिक नावं, त्याच्याशी जोडलेला अभिमान, नावांशी जोडलेली अस्मिता, देशी विदेशी कंपन्या, आपली स्वतःलाच कमी लेखायची वृत्ती, परकीय नावं आणि परकीय वस्तू जास्त चांगल्या असल्याचा आपला ग्रह. छ्या. एव्हढं सगळं लिहूनही अजून खूप काही लिहायचं बाकी आहे असं वाटतंय. नावात किती किती काय काय आहे.

टीप - लेखाचं 'नाव' नीट पाहिल्यास कळेल, शेवटी प्रश्नचिन्ह नाहीये. एका विरामचिन्हाने 'नावात काय आहे' ह्याची व्याख्यासुद्धा बदलली!

34 comments:

  1. जबरदस्त लिहिलं आहेस बाबा.. एकूण एक मुद्दा पटला.. भारतीय कंपन्यांच्या इंग्रजी नावांबद्दल मलाही नेहमी असंच वाटायचं हे असं का?

    वुडलँडचा किस्सा पुरेसा बोलका आहे.. [रच्याक, आपलं वुडलँड हे च्यामारिकेच्या टिंबरलँड वरून प्रेरित आहे (असं म्हणतात/मानतात) ]!!

    तळटीप खासच !!

    ReplyDelete
  2. Yaachaa "fakt" aapalyaa nyoongandaashich sambandh aahe ka?
    Mhanje bhaarataat udyog faarase navhte. Tyamule ashaa kshetraat fakt paradeshee companies asaayachyaa. Tyamule paradeshee companies-cha naav quality-shee jodla gela lokaanchya manaat.

    ReplyDelete
  3. नावाचा खूप परीणाम होतो. नांव अट्रॅक्टीव्ह असेल तर विशेषतः इंग्रजी असेल तर जास्त लोकं आकर्षित होतात. अजूनही इंग्रजी नावांचे स्तोम कमी झालेले नाही. सगळ्या पंचतारांकित हॉटेल्स मधे रेस्टॉरंट्सची नांवं इंग्रजीच का असतात?? अनुत्तरीत प्रश्न आहे हा.

    ReplyDelete
  4. प्रोफेट...बाबा, चांगला मुद्दा मांडला आहेस.. कधीही दुकानात गेलो तर हा अनुभव पहिला येतो..

    - मुक्त कलंदर

    ReplyDelete
  5. विभी, मुद्दा १००% पटला. याला आपली मानसिकता जबाबदार आहे. ’वुडलॅन्ड’ चा प्रसंग बरंच काही सांगतो. मलाही वाटत होतं की वुडलॅन्ड ही परदेशी कंपनी आहे. आपल्या कडच्या मोठ्या कंपन्यांना आता नावं बदलणं शक्य नाही.....म्हणजे आपण कितीही म्हणालो की नावात काय आहे? तरी नावातच सगळं आहे.........तुमची अस्मिता, स्वदेशाभिमान. मला या चीनी-जपान्यांचं म्हणून तर कौतुक वाटतं. त्यांनी काही झालं तरी स्वत:च्या देशाशी-संस्कृतीशी नाळ तोडलेली नाही. पाश्चात्य देशांतील कोणत्याही मोठ्या शहरात जा तिथे किमान एक चायना टाऊन तर असतंच. त्या चायना टाऊन मध्ये सगळ्या "मेड इन चायना" वस्तु मिळतात. सगळ्या दुकानांच्या नावांच्या पाट्या ह्या प्रामुख्याने चीनी भाषेत असतात. तसं इंडीया टाऊन पहायला कधी मिळेल?

    ReplyDelete
  6. बाबा... नावात तर सर्व काही आहे... विषय खूपच मोठा आणि व्यापक आहे.. ह्यावर आधील प्रगल्भ लिखाण हवंय... ह्या लेखात तू नुसता विषयाला शिवून आला आहेस... अधिक खोलात जाऊन लिही ना!!!

    काय म्हणतोस.. वुडलँड भरतोय कंपनी आहे??? मला अभिमान आहे मी सुद्धा गेली ५ वर्षे प्रत्येक ठिकाणी वुडलँडचे बूट वापरतो... आणि 'टाटा' बद्दल मला प्रचंड आदर आहे... नितीमुल्य जपून व्यवसाय कसा करावा ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'टाटा'.

    आता इंग्रजी नावांचे नवीन आलेले फॅड म्हणजे हौसिंग कॉम्प्लेक्सना दिली जाणारी नावे.. इटालिअन, रोमनपासून कुठून कुठून शोधून आणतात... ह्या बाबतीत आपली भारतीय नौसेना जबरी आहे... काय एक एक संस्कृत आणि भारतीय नावे ठेवते... :)

    ReplyDelete
  7. बाबा, सर्व मुद्दे पटण्यासारखे आहेत.

    खर तर भारतीय लोकांच्या या मानसिकतेचा बाहेरील UNIVERSITY ने अभ्यास/सर्वे करायला हवा.

    ReplyDelete
  8. विभि...तुझ्याशी १००% सहमत...देशाभिमान किंवा आपल्या भाषेबद्दलचा अभिमान हा उपजत नसानसात असायला हवा.आपल्याकडे पाश्चात्य देशाधील प्रत्येक गोष्ट ही उच्च दर्जाची आपली मात्र टाकाउ किंवा डाउन मार्केट असाच समज आहे.

    पोस्ट मस्त झाली आहे.

    गाड्यांचा विषय निघालाय म्हणुन...तुला खाली एक दुवा देतोय तो नक्की बघ.

    http://www.vardenchi.com/

    ReplyDelete
  9. विभी मस्त मुद्दा घेतलायेस.....आणि खरय तुझं हा सल भारताबाहेर पडल्यावर आणि प्रकर्षाने जाणवतो....

    बाकि वुडलॅंडबद्दल खरच नव्हते माहित.... आपल्याला माहित नसते कारण खरं तर आपल्याला गरजच भासत नाही तसली काही!!! असो... रोहन म्हणतोय तसं अजुन खोलात लिही जरा तूला व्यवस्थित हाताळता येइल हा विषय!!

    @ योगेश, वर्देची संकेतस्थळ पाहिलेय मी... गाड्या या प्रकारात विशेष रस नसतानाही तिथल्या बाईक्स आवडल्या होत्या :)

    विभी तळटीप खरोखरच मस्त!!!

    लिहीत रहा रे!!

    ReplyDelete
  10. Mastach aahe post...!!! Khoop Sahi...!!! :)

    ReplyDelete
  11. वुडलॅण्डला मी सुद्धा विदेशी कंपनी समजायचो.. तुझ्या संपुर्ण लेखाशी १००% सहमत.

    ReplyDelete
  12. विभि, पेटलायस एकदम, जरा श्वास घेऊ देत की आम्हाला वाचताना :) मस्त लिहतोयस रे, लिहते रहा.
    राहिला, पोस्ट बद्दल, नावात काय आहे?
    ब्रँडनेम मॅटर्स, मग भले तुम्ही त्या नावाखाली खाली काहीही विका, उद्या मक्डोनाल्ड्सने क्लोदिंग चेन सुरू केली तरी ती खायला, आइ मिन घ्यायला लोक येतील ;)

    ReplyDelete
  13. far chan lihila ahes mitra

    ReplyDelete
  14. आपली भाषा आपल्याच लोकांना कळत नाही हेच खरे. मी पत्रव्यवहार करताना (आणि एरवीही)भाषेची सरमिसळ शक्यतो टाळतो. पण त्याने माझीच फजीती होते. दोन किस्से सांगतो.
    १. मी पाकिटावर मराठीत पत्ता लिहिला. द्वारा असे लिहून त्याखाली माझा पत्ता आणि प्रति असे लिहून ज्याला पत्र पाठवायचे त्या व्यक्तिचा पत्ता. तर टपाल खात्याकडून पत्र माझे पत्र मलाच परत देण्यात आले. कहर म्हणजे पत्र आणून देणारा कर्मचारी मला म्हणाला,"तुम्हाला पत्र नक्की कोणाला पाठवायचंय त्यावर टू (TO) असे लिहा. त्याशिवाय आम्हाला समजत नाही."
    २. एकदा एका वाहतूक पोलिस निरीक्षकाची मी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तिची त्यांनी दखल घेऊन आयुक्तांकडे पाठविली. आयुक्तांनी त्यांचे दोन कर्मचारी माझ्या घरी पाठविले पण त्यांना आठ दिवस माझे घर सापडलेच नाही कारण माझ्या तक्रार अर्जावर मी माझा संपूर्ण पत्ता मराठीत लिहिला होता व तो कोणाला समजू शकत नव्हता.
    तो असा आहे - भूखंड क्रमांक ८६, पेठ क्रमांक २५, पिंपरी-चिंचवड नवनगर, निगडी पुणे ४११०४४.

    पण इथले लोक पत्ता असा लिहितात - प्लॊट नं.८६, सेक्टर नं.२५, पीसीएनटी, निगडी पुणे ४११०४४.

    पण शेवटी पोलिसांनी टपाल कार्यालयात जाऊन माझा पत्ता दाखविल्यावरच त्यांना माझे घर सापडले कारण एव्हाना टपाल कर्मचार्‍यांना मी माझ्या मराठी पत्त्याची सवय लावली होती.

    असो तर आपल्याकडे आपली स्थानिक भाषा (मराठी) तीस ते पस्तीस टक्के लोकांना च समजते. शुद्ध स्वरूपात लिहिल्यास पाच टक्क्यांहून अधिक लोकांना कळणे शक्यच नाही.

    त्यामुळे आपली / संस्थेची / उत्पादनांची नावे सर्वांना आकर्षित करून घेणारी हवी असल्यास इंग्रजीत ठेवण्या शिवाय गत्यंतर नाही. शिवाय त्या नावांनी कोठे अर्ज करायचा असेल / खाते खोलायचे असेल तर इंग्रजी स्पेलिंग लिहावे लागतेच ते अतिशय त्रासदायक ठरते.

    २००२ साली मी माझी उद्योग संस्था सुरू केली. मला तिचे नाव नवनगर उद्योग असे ठेवायचे होते पण या सर्व गोष्टींचा व्यावहारिक विचार करून ते शेवटी ’न्यू टाऊन एन्टरप्रायसेस’ असे ठेवले. याचे इंग्रजी स्पेलिंग सहसा कोणीच चुकत नाही त्यामुळे मला ग्राहकांकडून मिळणारे धनादेश अचूक असतात.

    ReplyDelete
  15. हेरंबा,
    खूप धन्यवाद रे!
    बाकी, ते टिंबरलँडचं मीही ऐकलं होतं..खरंही असेल!

    ReplyDelete
  16. ओंकार,
    अरे मी असं म्हणत नाहीये, की ह्याचा संबंध 'फक्त' आपल्या न्यूनगंडाशीच आहे, पण अनेक फॅक्टर्स आहेत, पण नीट पाहिलं, तर त्याच्या मुळाशी आपली शिक्षणव्यवस्था आणि त्यातून उद्भवलेल्या अनेक समस्या दिसतील...न्यूनगंड हे बायप्रॉडक्ट आहे!
    बाकी, टाटा तर अश्या काळात सुरू झाली, जेव्हा भारत स्वतंत्रही नव्हता..
    आणि टिळकांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या स्वदेशी जहाजकंपनीबद्दल इथे थोडं वाचता येईल.
    http://akbrahms.blogspot.com/2010/07/blog-post_31.html

    ReplyDelete
  17. महेंद्रकाका,
    अगदी तेच म्हणायचंय मला...की असं काय आहे, की इंग्रजी नावं हे एक फॅड होऊन बसलंय...आपल्याला इतकं काय फॅशनेबल वाटतं..

    ReplyDelete
  18. भारत,
    होय रे..दुकानांचं तर डोळ्यांत भरतं रे एकदम!
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  19. अलताई,
    होय आता नावं बदलणं मुश्किलच आहे, पण ज्या नवीन कंपन्याही निघतात, त्यांची नावं 'ग्लोबल' दृष्टिकोनातून का ठेवली जातात कळत नाही? परदेशी लोकांना नोकियाचा अर्थही कळत नाही, तरी फिनिश लोकांच्या नोकियानं उभी पृथ्वी गाजवली की नाही (साक्षात बिल क्लिंटननं जाहिरातीत काम केलं होतं)!
    चीनी जपानी लोकं तर ह्याबाबत खासच! कालच बीबीसीवर लंडनमधल्या चायनाटाऊनची बातमी दाखवत होते (चायनीज सरकार, लिव्हरपूल फुटबॉल क्लब विकत घेतंय कदाचित त्यामुळे)..अगदी तू म्हणतेस तसंच सगळं!

    ReplyDelete
  20. रोहना,
    खरंच, टाटा, टाटाच आहे...अजून कुणी टाटासारखं नाहीच...ऊर अभिमानानं भरून येतो जग्वारवर टाटाचं चिन्ह पाहून..
    अरे हो ना, वुडलँडचा माझ्यासाठीही धक्का होता..मी दोनदोनदा विचारलं त्या दुकानदाराला...:)
    अरे आपली सशस्त्र दलं भारी नावं देतात रे...फार छान वाटतं!
    आणि अरे, खूप लिहावंसं वाटत होतं, मग भरकटायची भीती वाटायला लागली...त्यातून जाम दमलो होतो...मग सिंहावलोकन करून आवरतं घेतलं...;)
    घेईन कधीतरी विस्तृत परामर्श (जमेल तसा)!

    ReplyDelete
  21. सचिन,
    ही कल्पना उत्तम आहे, कुणीतरी ह्या मानसिकतेचा अभ्यास करायलाच हवा! :)

    ReplyDelete
  22. अरे योगेश, ही गोष्ट देशाबाहेर पडण्याच्या आधी, आपल्याच विमानतळापासून दिसायला लागते. दोन अनोळखी भारतीय माणसं, विमानतळावर, विमानात किंवा परदेशात कधीही इंग्रजीतूनच बोलतात..असो विषयांतर होतंय...
    वर्देंची आवडलं बरं का...आपलं हार्ले डेव्हिडसनला दिलेलं उत्तर दिसतंय...पण बाईक्सच्या मॉडेल्सची नावंही आपली असती, तर दुधात साखर पडली असती...असो..हे ही नसे थोडके...
    करेन विस्तृत लिहायचा प्रयत्न कधीतरी!
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  23. अगं ताई,
    एकदा माझा इटालियन सहकारी मला म्हणाला होता, युअर इंग्लिश इज बेटर दॅन मी बीकॉज यू आर बायलिंग्युअल!
    मला क्षणभर कळेना...हो मी बायलिंग्युअल आहे, पण मराठी आणि हिंदी असा...मग हे सत्य बोचलं, की नाही...इंग्रजीनं एक जागा केव्हाच काबीज केलीय...
    बाकी ह्यामध्ये अजून खोलात शिरायचा प्रयत्न करेन जमेल तेव्हा!
    आणि हो...मला ताईकडून कौतुक करून घ्यायला आवडतं...त्यामुळे नवनवीन पोस्टा पाडतच राहिन.. ;)

    ReplyDelete
  24. मैथिली,
    खूप खूप धन्यवाद! :)

    ReplyDelete
  25. आनंदा,
    वुडलँड माझ्यासाठी धक्का होता..एव्हढा धक्का मला बाटा ही परदेशी कंपनी आहे, हे कळल्यावरही बसला नव्हता!

    ReplyDelete
  26. सुहासा,
    धन्यवाद भाऊ! अरे जोवर जमतंय, लिहून घेतोय रे...
    ब्रँडनेमबाबत मी तुझ्यासोबत सहमत आहे!

    ReplyDelete
  27. युवराज,
    ब्लॉगवर स्वागत भाऊ...
    प्रतिक्रियेसाठी लय लय आभार!
    असाच भेट देत राहा!

    ReplyDelete
  28. चेतन,
    ब्लॉगवर स्वागत!
    तुम्ही म्हणताय ते सगळे मुद्दे अगदी अचूक आणि बिनतोड आहेत...
    शतप्रतिशत खरे...
    पण तरीही कुठेतरी वाटतं, ही घडलेली प्रक्रिया उलट होणं महाकठिण असलं, तरी अशक्य नक्कीच नसावं...कदाचित नुसतीच आशा असेल..भाबडी आशा..
    पण आशेवर जग चालतं म्हणतात!
    प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
    असेच भेट देत राहा!

    ReplyDelete
  29. चीनी संस्कृतीविषयी थोडेसे -

    चीन मध्ये ८५ टक्के लोकांची एकच भाषा एकच आहे ती म्हणजे - मॆंडरीन. उरलेल्या १५ टक्के लोकांची भाषा आहे - कॆंटोनीज. पण गंमतीचा भाग असा की यांची लिपी एकच आहे आणि त्यातही शब्द लिहीण्याची पध्दतही एकसारखीचा आहे. फक्त उच्चार वेगवेगळे आहेत. म्हणजे समजा एखाद्या शब्दाचा उच्चार मॆंडरीनमध्य़े ’अबक’ असा उच्चार होत असेल व केंटोनीज मध्ये तो ’ईफ़ग’ असा होत असेल तरी तो शब्द लिहीण्यासाठी एकच लिपी वापरली जाईल व एकाच प्रकारे तो शब्द लिहीला जाईल. त्यामुळे मॆंडरीन मध्ये लिहीलेला मजकूर कॆंटोनीज मध्ये वेगळ्या उच्चारात जरी वाचला गेला तरी अर्थ व्यवस्थित पोचला जाईल.

    याउलट भारतात, १५ प्रमुख भाषा, त्यातील काहींची देववनागरी तर इतरांची वेगळी लिपी या सगळ्या बाबींमुळे इंग्रजीचाच आधार घेतला जातो.

    पुण्यात मला व्यवसाय करायचा असेल तर निम्म्याहून अधिक परप्रांतीय ग्राहक माझ्याकडे येणार (त्यात गुजराथी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, इशान्य भारतीय सगळेच आले). या सर्वांना समजण्यासाठी मला इंग्रजीची मदत लागणारच. आणि मराठी ’ब्रॆंड नेम’ घेऊन त्याची आंग्ळाललेल्या उच्चारात वाट लावण्यापेक्षा सरळ परकीय च नाव घेतलेले केव्हाही सोयीस्कर.

    चीन शी आपली तुलना सध्या तरी करता येऊ शकणार नाही.

    ReplyDelete
  30. फारच चांगला विषय हाताळला आहेस.. भारतीय लोकांना इंग्रजी विषयी असलेले अनाठायी आकर्षण हे मलाही पडलेलं फार मोठ्ठं कोडं आहे... याचा एक उत्तर असं सुचतं कि आपल्याला स्वतःच्या भाषा/संस्कृती विषयी विशेष अभिमानाच नाहीये.. परकीय करतात तेच great, तेच hi-fi. हेच कारण आहे की महाराष्ट्रात राहून मराठीचा अभिमान नाही.. आणि भारतीय पातळीवर भारतीय संस्कृतीचा अभिमान नाही... पण हि मानसिकता कुठे तरी बदलायला हवी..
    ओंकार ने suggest केल्यानुसार संस्कृत मधील नावंही बरीच भावतात.. जसे 'अग्नी', 'विराट', 'विक्रांत', 'अवनी'.. त्यामुळे भारतीय कंपन्यांना हि नावं ठेवण्यात (theorotically) काहीच हरकत नसली पाहिजे.. पण तशी परीस्थिनी नाही हेच दुर्दैव.

    भारतीय नावाच्या कंपन्यांविषयी जरासे :
    १) टाटा : हे जरी भारतीय आडनाव असले, तरीही मी जेव्हा लहानपणी ऐकत असे, तेव्हा मला हे बाय-बाय चे दुसरे इंग्रजी रूप टा-टा असेच वाटे.. त्यामुळे ते भारतीय आडनाव आहे, हे कळण्या-आधीच ते पाश्चात्य आहे अशा गैर-समाजानेच मी टाटा कंपनीला ओळखतो
    २) सत्यम : हे अस्सल भारतीय नाव आहे. आणि कंपनी पण बरीच प्रसिध्ध आहे(/होती ?).. पण मालकाने कंपनीच्या नावाच्या एकदम विरुद्ध चाळे करून नाव 'मिट्टी मे मिला दिया'
    ३) मारुती : हे नाव तर जुन्या style चं असूनही कंपनी लोकप्रिय आहे.. त्याचं कारण कदाचित त्याच्यापुढे असलेलं 'सुझुकी' हेच असू शकेल..
    ४)'बरिस्ता' (इटालियन शब्द) आणि 'कॅफे कॉफ्फी डे' या दोन्ही भारतीय chains आहेत.. पण भारतीय ग्राहक त्यांच्या परकीय नावाला भुलून त्यांना परकीय समजूनच त्यात जात असावा... (woodland type)

    ReplyDelete
  31. चेतन,
    तुमच्या म्हणण्यात तथ्यांश आहे, तरीही...आपल्याला इंग्रजीला देशी पर्याय देता येईल का, हा मला पडलेला प्रश्न आहे...असो...
    पुन्हा केव्हातरी!

    ReplyDelete
  32. कल्पेश,
    तुझं म्हणणं खरं आहे...
    बाकी ही उदाहरणं बोलकी आहेत..
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  33. टाटा हे आपल्या देशात विश्वासाचे प्रतिक मानले जाते तसेच त्यांनीही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे हे त्यांच्या जागो रे अशा जाहिरीतीतून दिसून येते
    बाकी ते वुडलँडचे आमच्यासाठीहि नवीनच होते
    ajun ak
    BABA te word verification band karta ka plz lay Taras hoto ;)

    ReplyDelete
  34. विक्रम,
    टाटाला माझा नेहमीच सलाम आहे...मुंबई हल्ल्यानंतरही त्यांची प्रतिक्रिया आणि क्रिया दोन्ही खूप बोलक्या होत्या!
    वर्ड व्हेरिफिकेशनच्या फारच तक्रारी येऊ लागल्याने, ते बंद करण्यात आलेले आहे!

    ReplyDelete