8/20/2010

कालछिद्र - २

भाग - १ पासून पुढे

हे सगळं काय होतं? एक काळाला पडलेलं छिद्र, जे माझ्या मेंदूशी आणि आत्म्याशी त्या वीजेनं जोडलं गेलं होतं? की नुसतेच माझ्या मनाचे खेळ?

मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज द्यायला डॉक्टर तयार झाले. लाडू कावळ्याच्या वेळी खोलीभर झालेल्या पाण्याचा अन्वयार्थ माझ्या धक्क्याने जमिनीवर पडलेला फ्लास्क असा लागला होता. पण मी भिजलो कशाने होतो, ह्याचं उत्तर मी सोडून कुणाकडेच नव्हतं. मी घरी पोचलो पण मला बिलकुल स्वस्थता मिळत नव्हती. माझं मन पुनःपुन्हा कालछिद्राकडे झेप घेत होतं. एक प्रकारचा चस्का लागला होता. तब्बल ५ दिवस झाले होते मला काळाचे पापुद्रे ओलांडून. आताशा तल्लफ यायला लागली होती. आई-बाबा एक दिवस सकाळचेच कुणाकडे तरी गेले. आणि मी तहानलेल्या माणसानं पाण्याचा एक थेंब शोधावा, तस्मात पेपर शोधत होतो. आदल्याच दिवशी बहुतेक रद्दी टाकण्यात आली होती. माझी अस्वस्थता वाढत होती. आणि अचानक माझी नजर एका कोपर्‍यात गेली. तिथे एक काळवंडलेला पेपर पडला होता. मला शंका वाटली, म्हणून मी अजून जवळ गेलो आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हा तोच पेपर होता, जो माझ्याबरोबरच वीजेतूनही बचावला होता. मी तो पेपर उचलणार एव्हढ्यात दरवाजाची बेल वाजली. मी नाईलाजानंच दार उघडायला गेलो. कुरियरवाला होता. घाईगडबडीत सही करून त्याला कटवलं. दरवाजा बंद केला आणि एखाद्या नशैडीनं भांगेकडे जावं त्या उत्कटतेनं मी विद्युतंजय पेपराकडे निघालो पण एकदम पायात काहीतरी आलं. मी खाली पाहतो तर त्यादिवशीचा ताजा पेपर. मी अधाश्यासारखा तो पेपर उचलला आणि वाचायला लागलो.

मी एका मोठ्या महालसदृश इमारतीमध्ये उभा होतो. इमारत अनोळखी वाटत होती. काहीतरी विचित्र अशी जाणीव होत होती. चहूकडे 'जनाब', 'वजीर-ए-आज़म', 'वजीर-ए-आला' असले शब्द ऐकू येत होते. मला जनाब हा शब्द माहित होता, पण वजीर-ए-आज़म? मी मुगले आजम ऐकलं होतं. आम्ही आमच्या एका मित्राला, चुगले आजम आणि एकाला फुकटे आजम ही म्हणायचो, पण वजीर-ए-आज़म? आणि वजीरे आला, हे कुठलं मराठी? वजीर आला किंवा वजीर आले. वजीरे हे कुठलं रूप आणि त्यापुढे आला. जाऊ दे. एव्हढा सगळा विचार करेपर्यंत एकदम मोठा जमाव समोरून येताना दिसला. आधी वाटलं की मोर्चेकरी आहेत, मग लक्षात आलं पत्रकार आहेत. सगळ्यांच्या ओळखपत्रांवर उर्दूत खरडलं होतं काहीतरी आणि मग माझ्या डोक्यात पुन्हा एकदा प्रकाश पडला की आपण पाकिस्तानात आहोत. मी पुन्हा आजूबाजूला पाहिलं. काहीतरी गडबड वाटत होती. अचानक एकदम हळू आवाजात चर्चा होत असल्यासारखं वाटलं. मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. मी उभा होतो त्याच दालनात एका बाजूला एक पडदा टाकून ठेवला होता. मी तिकडे गेलो. जसजसा जवळ जात होतो, आवाज थोडा थोडा वाढत चालला होता. मी पडद्यामागे पोचलो आणि पडदा थोडासा सरकवून डोकावलो. पाहतो तर काय, समोर एका सोफ्यावर आपले परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा आणि एक खुनशी चेहर्‍याचा गृहस्थ बसले होते. तो बहुधा पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री असावा असा मी अंदाज़ बांधला. कारण एस.एम. कृष्णा त्याला सज्जड दम देत होते. भारतानं एव्हढे पुरावे देऊनही 'हाफिज़ सईद' ला पुरावा ही मागणी का मान्य केली जात नाही. भारताच्या सामंजस्याला भारताचं दौर्बल्य समजू नका वगैरे हाग्या दम इंग्रजीत देणं चाललं होतं. एस.एम. कृष्णांचा आवाज दोन फुटांपलिकडेही ऐकू येतो आणि त्यांच्या चेहर्‍यावरच्या रेषाही हलतात हा साक्षात्कार मला अचानकच झाला होता. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री चक्क खाली मान घालून ऐकत होता आणि सगळं मान्य असल्याचंही उर्दूत सांगत होता. एव्हढ्यात मी ज्या पडद्याला धरलं होतं तो पडदा वरूनच तुटला आणि मी तोंडावर पडलो.

आई मला उठवत होती.

'असा हॉलच्या जमिनीवरच कशाला झोपला होतास रे? तब्येत तर ठीक आहे ना?' आई काळजीच्या स्वरात विचारत होती. पण मला काही ऐकू कुठे येत होतं. मला पुन्हा अशक्तपणा आला होता, पण हवी ती किक मात्र मिळाली होती.

कसेबसे दोन दिवस ढकलले आणि पुन्हा आई आणि बाबा एकत्र बाहेर पडण्याचा मणिकांचन योग जुळून आला. आताशा माझ्या प्रत्येक संदिग्ध बेशुद्धीच्या घटनास्थळी मिळालेल्या वर्तमानपत्रांवरून आईचा संशय वर्तमानपत्रांवर बळावला होता. त्यामुळे घरातली वर्तमानपत्र गायब होऊ लागली होती. पण मी हुशारीनं स्वयंपाकघरातल्या फडताळांच्या फळ्यांवर टाकलेलं एक वर्तमानपत्र काढलं. जुनं तर जुनं. आणि वाचायला सुरूवात केली.

मी एका बंगल्याच्या हॉलमध्ये उभा होतो. मला काही संदर्भ लागायच्या आत, मोठमोठ्या किंकाळ्या ऐकू यायला लागल्या. एक बाई वरच्या मजल्यावरून जिवाच्या आकांतानं धावत खाली आली. मी जागच्या जागीच थिजलो. तिच्या अंगावर ठिकठिकाणी रक्त होतं. तिच्या मागोमाग एक पुरूष हातात चाकू घेऊन धावत खाली आला. मी काही कळण्याच्या स्थितीत नव्हतो. ती बाई दरवाजाच्या दिशेनं धावली, पण तिला दरवाजाच उघडता येईना. मग ती मागे आली आणि सरळ माझ्या दिशेनेच धावायला लागली. मी उभ्या जागी हादरलो. तो माणूस तिच्या मागेच होता. त्यानं तिला मधेच गाठलं, सोफ्यावर ढकललं आणि ... आणि भोसकून ठार मारलं. मग त्यानं त्याची नजर वर केली आणि ती माझ्यावर स्थिरावली. आईनं त्याक्षणी मला जागं केलं नसतं, तर काय झालं असतं हे मला ठाऊक नाही. मी जागा झाल्या झाल्या उलट्या करायला लागलो. न जाणे किती वेळ उलट्या करत होतो. पोटातला कणनकण बाहेर पडला पण मळमळ जात नव्हती. ते रक्ताचं थारोळं डोळ्यांसमोरून जात नव्हतं. मी पुन्हा पेपरांना हात न लावण्याचा प्रण केला.

दोन दिवस झाले होते. हळूहळू गाडी पूर्वपदावर येत होती. मी सोफ्यावर बसून रिमोटशी खेळत होतो. तेव्हा एका न्यूज चॅनेलवर, "क्या रोहिणीका पती ही उसका खुनी है?" अशा नावाची एक सेगमेंट सुरू झाली. खाली, हां किंवा ना साठी वापरायचे एसएमएस कोड्स स्क्रॉल होत होते. पण एकदम टीव्हीवर आलेल्या फोटोनं माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. ही तीच बाई होती. होय, तीच. मी कसा विसरू. तीच. तेच डोळे, तेच नाक. म्हणजे मी हिचा खून पाहिला होता! पण मग पुढे आलेल्या बातमीनं मी सुन्नच झालो. तिचा खून नवर्‍यानं केला होता आणि नवर्‍याला शिक्षा सुनवायची तेव्हढी बाकी होती आणि नवरा.... तो नव्हता ज्याला मी पाहिलं होतं!

मी इंटरनेटवर बसून गेल्या दोन महिन्यांतली सगळी वृत्तपत्र चाळली आणि मला ते विवक्षित पान मिळालं. इंटरनेटवर धुंडाळताना मी फार काळजीत होतो, पण इंटरनेटवर वाचताना मला ते होत नव्हतं, जे पेपर वाचताना व्हायचं. मी ते पान काळजीपूर्वक परत वाचलं. त्या पानावर खून झाल्याझाल्याची प्राथमिक माहिती होती आणि पोलिसांचा प्राथमिक अंदाज एका चोरानं हे कृत्य केलं असल्याचा होता, ह्याचंच वर्णन केलेलं होतं. मी विचारात पडलो.

हे कसं शक्य आहे. मी जे पाहिलं, ते सत्य होतं, की जे न्यायालयात सिद्ध झालंय ते? पेपरात लिहिलेलं जर मी प्रत्यक्षात बघू शकतो, अनुभवू शकतो, तर तेच खरं असणार ना. काय चाललंय नक्की! मी कोलमडून गेलो होतो. शरीर थकत होतं आणि मनही.

दुसर्‍याच दिवशी मी एक प्रयोग करायचा ठरवला. मी घराच्या खालच्या सार्वजनिक वाचनालयातून एक पेपर लपवून घेऊन आलो. कारण माझ्या घरातली सगळी वर्तमानपत्र एव्हाना गायब झालेली होती. कुणी आजूबाजूला नाही हे पाहून मी ते वर्तमानपत्र समोर ठेवलं आणि वाचायला लागलो. पहिलीच बातमी नक्षली हल्ल्याची होती. नक्षलवाद्यांनी किती निर्घृणपणे ४० पोलिसांची हत्या केली ह्याचं अंगावर काटा आणणारं वर्णन होतं. पण गंमत बघा. मी ते वर्णन पूर्ण वाचून काढलं आणि मला काहीही झालं नाही. मी तिथेच होतो. हातात पेपर धरून. मला काहीच कसं झालं नाही? मी त्या हल्ल्याच्या जागी कसा पोचलो नाही? मी मनोमन देवाचे आभार मानले, कारण मी मूर्खासारखी एव्हढी डेंजर बातमी वाचायला घेतली होती.

मग मी त्याखालची बातमी वाचायला घेतली. विदर्भातल्या एका शेतकर्‍याच्या आत्महत्येची बातमी होती. त्याच्या कुटुंबाची दुर्दशा वर्णन केली होती. आश्चर्य म्हणजे मी तीसुद्धा बातमी पूर्ण वाचून काढली आणि मला काहीही झालं नाही. च्यामारी, म्हणजे माझा मेंदू ह्या विचित्र कालछिद्राच्या संपर्कात येऊनही आपला निर्ढावलेपणा राखून होता म्हणायचा. की मी चक्क बरा झालो होतो? मला कळेना.

मग मी दुसरं पान उघडलं, तर एकदम तीच नेहमीची संवेदना निर्माण झाली. मी एका भल्यामोठ्या स्टेडियमसमोर उभा होतो. एकदम डोळ्यांचं पारणं फिटावं असं स्टेडियम होतं. थोडं बारकाईनं पाहिलं, तर तिथे लागलेलं मोठं होर्डिंग दिसलं, 'दिल्ली, २०१०'. मायला, म्हणजे मी चक्क राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्टेडियमच्या बाहेर उभा होतो. जवळपास पूर्ण बांधून होत आलेलं स्टेडियम. मी रखवालदाराचा डोळा चुकवून, पत्रकारांच्या गर्दीत लपून आत शिरलो आणि माझे डोळेच दिपून गेले. इतकं सुंदर आणि सुबक बांधकाम होतं. प्रेक्षकांची बसायची सोय, व्हीआयपी स्टँड, प्रेस बॉक्स सगळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं! माझा ऊर राष्ट्राभिमानानं भरून आला. आणि एकदम कुणीतरी माझा ऊर बडवत असल्याची मला जाणीव झाली. खिडकीतल्या कबुतरांच्या धक्क्यानं टेबलावरची दोन पुस्तकं जमिनीवर बसलेल्या माझ्या छाताडावर पडली होती आणि मी राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रेक्षागृहातून माझ्या शयनगृहात परतलो होतो. मी अजून बरा झालो नव्हतो. माझा कालछिद्राशी संपर्क अजूनी अस्तित्वात होता. पण मग हे काय होत होतं? काही बातम्यांना मी काही रिस्पॉन्स देत नव्हतो, पण काही बातम्यांना देत होतो, असं का?

दुसर्‍या दिवशीच टीव्हीवर राष्ट्रकुल स्पर्धेच्या स्टेडियमचं स्टिंग ऑपरेशन झाल्याची बातमी झळकली. स्टेडियमचं प्रत्यक्षात किती बांधकाम अपूर्ण आणि हलक्या दर्जाचं झालंय हे दाखवणारा एक स्टिंग व्हिडिओ सगळ्या वाहिन्यांवर दाखवला जात होता आणि ती सगळी चित्र आणि मी बघून आलो होतो, ती चित्र किती वेगळी होती हे मला जाणवलं. मला काही सुधरतच नव्हतं. हा सलग दुसरा धक्का होता. मी बघितलेलं खोटं कसं काय ठरलं होतं? आणि जर ते खोटंच होतं तर मी तिथे कसा पोचलो होतो? मी ते सगळं खरं असल्यागत कसं काय पाहिलं होतं? आणि त्या काहीच न जाणवलेल्या बातम्या? प्रश्न वाढत चालले होते, पण उत्तरं सापडत नव्हती.

आता मी सोफिस्टिकेटेड पद्धतीनं माझे कालछिद्राचे प्रयोग करायचं ठरवलं होतं. मी एक गजराचं घड्याळ घेऊन बसणार होतो. कदाचित, अक्षय कुमारचा ८X१० तस्वीर बघितल्याचा परिणाम असावा. १० मिनिटांचा गजर लावला आणि वाचनालयातून लपवून आणलेला पेपर समोर ठेवला. पहिली बातमी बारावीच्या निकालाची होती आणि मी कुठेही गेलो नाही. जसाच्या तसा. मग मी विचार केला की आपण वर्ल्ड कप फुटबॉल बघून येऊ. तर तिथेही तीच गत. काहीतरी गडबड झाली होती खास. कदाचित माझी शक्ति हळूहळू क्षीण होत होती. माझा कालछिद्राबरोबरचा संपर्क कमी होत होता कदाचित. मग मी सहजच एक रँडम पान काढलं आणि वाचायला लागलो.

मी एका मोठ्या आलिशान बोटीच्या डेकवर उभा होतो. बोट जुन्या जमान्यातली दिसत होती. समुद्र शांत दिसत होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता. बोटीच्या एका मजल्यावरून मस्तपैकी पार्टी चालू असल्याचा आवाज येत होता. मी डेकवर असाच भटकत होतो, तर मला समोरच एका टोकाला, चक्क लिओनार्दो दीकाप्रिओ आणि केट विन्स्लेट त्यांची फेमस पोज घेऊन उभे असलेले दिसले. मी डोळे पुनःपुन्हा चोळले. हे खरंच असं घडत होतं? मी नक्की वाचत तरी काय होतो? ओ माय गॉड, टायटॅनिक सिनेमाची कथा तर नाही? मेलो. जहाजाची कशालातरी धडक बसली. गेम! संपला आमचा अवतार अशी माझी खात्री झाली आणि तेव्हढ्यात मी लावलेला गजर वाजला. मला त्यानंतर दोन दिवस खार्‍या वार्‍यांचा वास येत होता. कदाचित मतलई वार्‍यांचाही असेल, पण ते मला कळत नाहीत. चालायचंच!

पण ह्या सगळ्या अनुभवांमुळे माझी शारीरिक आणि मानसिक दोन्ही अवस्था वाईट होत चालली होती. माझं डोकं आता एका ट्रॅकवर धावायला लागलं होतं. मग मी तब्येतीकडे लक्ष न देता प्रयोगांचा धडाका लावला. अतिरेकी आणि नक्षलवादी हल्ल्यांच्या बातम्या काहीही न होता वाचून काढल्या, विदर्भातल्या सावकारांच्या कर्जामुळे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याला जरी भेटता नाही आलं, तरी दारू पिऊन आत्मह्त्या करणार्‍या शेतकर्‍यांना भेटून आलो. देशांतली भुकेनं मरणारी जनता बघायला मिळाली नाही तरी एक्स्पोर्टर्सच्या रिकाम्या धान्यकोठारांना भेट देऊन आलो. कर्जबाजारी, देशोधडीला लागलेले गिरणीकामगार बघता आले नाहीत, पण मिलला आग लागण्यास कारणीभूत असलेलं शॉर्टसर्किट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. १२५करोडचं रिलीफ पॅकेज मिळालेलं उद्ध्वस्त लेह बघायला मिळालं नाही, पण १००० करोड खर्चून बदललेलं दिल्लीचं रूपडं पाहिलं, इराक युद्ध पाहायला मिळालं नाही पण इराकमध्ये सापडलेली धोकादायल अण्वस्त्र बघितली, जागतिक मंदीमुळे बेरोजगार झालेली माणसं भेटली नाहीत पण पगारकपात झालेले फायनान्स जायंट्सचे अर्थसल्लागार सीईओ मात्र दिसले, ३००% वेतनवाढ घेणार्‍या लोकसभेत जाता आलं नाही, पण लोकसभेवरील हल्ल्यात शहीदांना न्याय मिळताना पाहिला. अहो काय काय पाहिलं नाही, त्याची यादी कशाला करू, काय काय पाहिलं ते सांगतो. हाऊसफुल्ल चाललेला 'रावण' चा शो पाहिला, खच्चून गर्दी झालेली अशोकराव चव्हाणांची सभा पाहिली, समाजसेवा करताना संजय दत्त पाहिला, सलमान आणि कतरिनाचा विवाहसोहळा पाहिला, सामाजिक जबाबदार्‍या पार पाडणारे अंबानी बंधू पाहिले, शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेले पाहिले.

अधे मधे मी पुरवणी वाचायचो. त्यातले लोकांचे अनुभव वाचताना कधीकधी कुणाचा दुखण्याशी लढा, कुणाची मूकबधिर मुलाच्या लढ्याची कहाणी वाचताना, त्यांना भेटावंसं खूप वाटायचं. पण कधी भेटता आलं नाही. पण एकदा ताम्हिणी घाटात चुकीच्या बाजूला लावलेल्या गाडीतून दरीचं जवळून दर्शन झालं, एकदा त्याच घाटात चढावर गाडी असताना ब्रेकखाली टेनिसचा बॉल आल्यानं ब्रेकफेल झाल्यागत स्थिती उद्भवली, हरवलेले मोबाईल, चोरीला गेलेली कागदपत्रं असं बरंच कायकाय परत मिळताना बघितलं. अहो एव्हढंच काय, मी तर चक्क एकदा सायना नेहवालला भेटलो आणि ती माझ्याबरोबर बॅडमिंटन नाही तर टेनिस खेळली. आता हे सांगितल्यावर लोक मला वेड्यात काढतील, पण काढोत. मी खरंच तिच्याबरोबर खूप वेळ खेळलो आणि दमून गेलो. गजर मी चुकीचा लावल्याने तो उशिराने वाजला. मी भानावर येईस्तो पार घामाघूम झालो होतो. हा एक नवाच पायंडा पाडत होतो मी. आजपर्यंत लाडूकावळ्याच्या प्रसंगानंतर मी तिकडे गेल्यावर घटनाक्रम बदलायच्या फंदात पडलो नव्हतो. पण हल्ली हल्ली मी हा प्रकारही सुरू केला होता. कारण, हे प्रकरण समांतर विश्वाचं असल्याचा माझा ठाम ग्रह झाला होता, त्यामुळे मी निर्धास्तपणे माझं दुहेरी आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगत होतो.

त्यानंतर एके दिवशी बर्‍याच दिवसांनी बाबांनी आमची चारचाकी मला चालवायला दिली. मी ती घेऊन निघालो होतो. रस्त्याला फारशी गर्दी नव्हती. अचानक लूज झालेलं ग्लोव्ह कंपार्टमेंट उघडलं आणि त्यातनं काहीतरी खाली पडलं. मी गाडी चालवता चालवताच नजर खाली वळवली. तर तो माझा तोच विद्युतंजय पेपर होता. माझा विश्वासच बसेना. आणि नकळतच मी त्यातल्या मजकुरावर नजर फिरवली.

मी एका इस्पितळसदृश ठिकाणी होतो. माझ्या समोरच एक परदेशी गोरी छोटी मुलगी युनिफॉर्मसदृश कपडे घालून गाणी ऐकत बसली होती. पोरगी मोठी गोड होती. मी हळूवार चालत तिच्याजवळ गेलो, तर तिनं तिचे हेडफोन्स काढून मला दिले. मी ते कानात घातले आणि घात झाला. त्यामध्ये एव्हढ्या मोठ्याने गाणी वाजत होती की काही विचारू नका. ती गाणी ऐकण्याची पाच मिनिटं माझं आयुष्य बदलून टाकायला पुरेशी होती.

मी पेपरातल्या बातमीतून अमेरिकेतल्या एका वेड्यांच्या इस्पितळात आलो होतो. आणि इथे ती गाणी ऐकतानाच कदाचित तिथे काहीतरी अपघात झाला असावा. घटनाक्रम बदलण्याची माझी खोड मला महागात पडली असावी. मी एकतर तिथे मेलोय किंवा कोमात गेलोय. कारण मला गेल्या पाच वर्षांत कुणी उठवलंच नाहीये. मी इथेच आहे, ह्या अमेरिकेतल्या वेड्यांच्या इस्पितळात. अडकून पडलोय. कालछिद्रच बंद झालंय. एकाच आशेवर जगतोय, की तो मृत्यू नसावा, कोमाच असावा. आणि एक दिवस मी कोमातून बाहेर येईन आणि खरंच सांगतो, पुन्हा कधीही पेपराला हात लावणार नाही!

-समाप्त-

34 comments:

  1. माझी पहिल्या भागावरील प्रतिक्रिया मागे घेतो.
    बाबा खुपच आवडली रे कथा .
    एकदम वेगळी स्टाईल.
    कथा आवडली.विचार करायला प्रवृत्त केलस.

    ReplyDelete
  2. अरे काय.. कुठून कुठे गुंफण घालतोय. हा हा .. मज्जा आली पण वाचायला.

    आणि शेवटी पडलास 'लिंबात'...

    ReplyDelete
  3. लय भारी राव !!!
    काय काय सुचु लागलय तुला....शेवट मस्त..झकास !!!!
    तुझ्या क्रमशःचा निषेध मी करुच शकत नाही....[:P]
    "वाचली तुझी मुलगी ताई" असे म्हणणा~यांचाच *** !!!!हे हे हे हे..

    ReplyDelete
  4. अरे कुणीतरी आवरा रे विभीला! हा मोकाट सुटलाय ;) Inception inspired आहे का ही पोस्ट? झकास झाली आहे.

    ReplyDelete
  5. च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक....शॉलीड....जबराट...

    विभ्या भौ कसलं लिहल आहेस...निव्वळ अप्रतिम.

    ReplyDelete
  6. बाबा, सहीये एकदम !! रोहणा म्हणतोय त्याप्रमाणे शेवटी डायरेक्ट लिंबात गेलास ;)

    >> पण ह्या सगळ्या अनुभवांमुळे माझी शारीरिक आणि मानसिक दोन्ही अवस्था वाईट होत चालली होती.

    हा संपूर्ण परिच्छेद जबर आहे !!!

    (आगाऊपणा : मुपीगिरी नसती तर कदाचित अजून परिणामकारक झाला असता का?)

    ReplyDelete
  7. अरे विभिदा कसलं लिहितोस रे तू ....एकदम भन्नाट...जबरी.... मजा आली राव..शेवट पण अगदी वेगळाच ..........

    ReplyDelete
  8. Anonymous10:41 PM

    आता दोन्ही भाग एकत्रच वाचले..एकदम खिळवुन ठेवलस रे बाबा....कस काय सुचत रे हे सगळ तुला...भारीच...बाकी हेरंबच्या आगाउपणाला माझही अनुमोदन मुपीगिरी नसती तर अजुन परिणामकारक झाली असती कथा...

    ReplyDelete
  9. सलमान आणि कतरिनाचा विवाहसोहळा पाहिला खळ्ळ खटाक...... दुखवलस दोस्ता... मी तुला हे बघायला नव्हत सांगितलं.

    --------------------------------
    खच्चून गर्दी झालेली अशोकराव चव्हाणांची सभा पाहिली, समाजसेवा करताना संजय दत्त पाहिला, सलमान आणि कतरिनाचा विवाहसोहळा पाहिला, सामाजिक जबाबदार्‍या पार पाडणारे अंबानी बंधू पाहिले, शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेले पाहिले.....

    बाकी या मेडिया वाल्यांनी किती चांगल छापलंय नाही ते वाचून तु किती किती सामान्य लोकांच्या पलीकडच्या चांगल्या गोष्टी पाहिल्यास....

    असाच लिंबात सुखी रहा.....

    ReplyDelete
  10. सागर,
    मला कथा कालच संपवायची होती. पण फार उशीर झाला होता, म्हणून पूर्ण टायपून संपवली नाही. असो.
    तुला आवडली. बरं वाटलं!
    असाच तुला योग्य वाटतं ते सांगत राहा!
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  11. रोहना,
    अरे मलाच कळत नव्हतं मी कसा लिहित गेलो ते. शेवट ठरवलाच नव्हता. शेवटी जसा सुचला तसा लिहिला! :)
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  12. माऊताई,
    बरेच दिवस परक्या देशात काढल्याचे परिणाम आहेत हे :D
    बाकी,
    निषेध आवडला एकदम! ;)

    ReplyDelete
  13. अभिलाष,
    धन्यवाद भाऊ!
    अरे मी इन्सेप्शन अजून पाहिलाच नाहीये. त्याच्यावर लिहून आलेल्या सगळ्या पोस्ट्स "टू रीड" मध्ये ठेवल्यात! सिनेमा बघितल्यावरच वाचण्यासाठी!
    पण मी नोलानचा खूप मोठ्ठा पंखा आहे.. साम्यस्थळं आहेत की काय सिनेमाबरोबर? अहोभाग्य माझे..

    ReplyDelete
  14. योगेश,
    कैच्याकै मंडळ आभारी आहे! ;)

    ReplyDelete
  15. हेरंबा,
    धन्यवाद रे!
    अरे मनातलं बरेचदा कुठेतरी बाहेर येतंच..
    बाकी मुपीगिरी करण्यासाठी दोन कारणं होती..
    १. मी मुळात ही पोस्ट कथा नाही, तर मुपीवर सटायर म्हणून लिहिणार होतो. पण पुढे मला वेगळंच काहीतरी सुचलं.
    २. कथानायकाचं पात्र जसं माझ्या डोक्यात होतं, ते दाखवण्यासाठी मी तसं केलं, पण कदाचित ती आयडिया पोचली नाही व्यवस्थित!

    ReplyDelete
  16. सागर(नेरकर),
    खूप खूप आभार रे!
    शेवट ऍक्च्युअली गेल्या काही दिवसांत अनेक उत्तम कथा वाचल्या त्यांचा परिपाक असावा!

    ReplyDelete
  17. देवेन,
    धन्यवाद रे! अनेकदा कंटाळ्यातून असल्या कल्पना स्फुरतात ... :)
    बाकी, मुपीगिरीचं हेरंबला सांगितलं तेच!

    ReplyDelete
  18. सचिन,
    अरे भाई! मुद्दामच विवाह सोहळा पाहिला, नाहीतर जाता आलं नाही असं नसतं का लिहिलं ... ;)
    अरे बरेचदा चांगलं पाहण्यासाठी अमानवी शक्तीच लागते! ;)
    कैच्याकै मंडळ लय भारी आहे!

    ReplyDelete
  19. विक्रम,
    तुझी मनापासून दिलेली प्रतिक्रिया आवडली!
    पुढच्या वेळेस कमी करायचा नक्की प्रयत्न करेन!
    अशीच निर्धास्त प्रतिक्रिया देत राहा!
    खूप खूप धन्यवाद रे!

    ReplyDelete
  20. बाबा पहिला भाग समजला होता की नव्हता हाच प्रश्न होता.... लेकिन ईस बार भी मागच्या वेळच्या स्टोरी सारखाच हुवा.... दुसरा भाग वाचके सॉरी म्हणणा पडेगा....


    वेगळाच तरिही खिळवून ठेवणारा प्रकार आणलायेस यावेळेस.... कथा नक्कीच आवडली!!

    बाकि हेरंब +१ .... माझेही प्रामाणिक मत ’मुपी’ करमणुक म्हणुन वगैरे ठीक होते पण पुरे ते आता... तुझ्याकडे प्रचंड प्रतिभा आहे तीचा वापर कर!! (जाम ताईगिरी झाली ना... असु देत!! :) )

    ReplyDelete
  21. अजून एक तू हेरंबला दिलेले उत्तरही वाचले आहे... सटायर लिहिणार होतास ना... ठीक आहे आता एक पोस्ट त्या अनुषंगाने होऊ देत... :)

    ReplyDelete
  22. ताई,
    अगं कदाचित कुठेतरी मी मेसेज पोचवायला कमी पडलो असेन...
    किंवा माझ्यावर जो मुपीचा शिक्का बसलाय, त्यामुळे त्यापलिकडचं मला जे सांगायचं होतं ते वाचकांना दिसू शकलं नाही...
    असो...मुपीनं मला खूप छान मोमेंट्स दिल्यात त्यामुळे मी आभारी आहे...पण मी सटायर कदाचित लिहू शकणार नाही कारण आय ऍम टू बायस्ड फॉर दॅट!

    ReplyDelete
  23. >> पण कदाचित ती आयडिया पोचली नाही व्यवस्थित

    अरे बाबा तसं नाही रे. आयडिया एकदम व्यवस्थित पोचली. म्हणून तर "हा संपूर्ण परिच्छेद जबर आहे !!!" असं म्हंटलंच मी आधीच्या प्रतिक्रियेत. पण मुपी वगळून जर नुसत्याच बातम्या आल्या असत्या तर त्यातल्या वेदनेने कथा अजून धारदार, वेदनादायक आणि परिणामकारक झाली असती का असा बिचार करत होतो मी.. नक्की माहीत नाही म्हणूनच आठवणीने "का?" टाकलाय प्रतिक्रियेत.. आधीच्याही आणि आत्ताच्याही.

    ReplyDelete
  24. हेरंबा,
    अरे ती आयडिया पोचली ते ठीकच...
    पण जो मुपीचा वापर मी केलाय, त्याचा आणि शेवटाकडे त्याच्या लिंबोत जाण्यासाठी जे स्थान मी निवडलं, त्याचा एक संबंध होता. तो माझ्यावरच्या शिक्क्यामुळे कुणाच्याच लक्षात आला नाही! :(
    असो..
    खूप धन्यवाद रे! आवर्जून उत्तर लिहिलंस म्हणून!

    ReplyDelete
  25. बाबा मस्तच आहे कथा, मी दोन्ही भाग एकदमच वाचले त्यामूळे खुप जास्त मजा आली. सही आहे...

    ReplyDelete
  26. अवधूतभाऊ,
    ब्लॉगवर प्रतिक्रियेच्या रूपात स्वागत!
    मंडळ लय भारी आहे!
    धन्यवाद! ;)

    ReplyDelete
  27. आता पहीले म्या कुठं हाये ते कवाधरून शोधतेय नव्हं का... न्हायी म्हणजे वर्तमानपत्रातून जाऊदे राव पन मनातून तरी मायदेशात जाता याया हवं का न्हायी... पर, :( काय बी साधना झालय गड्या...

    विद्या, तू इन्सेप्शन पाहिला नाहीस म्हणतो आहेस पण तू समांतरच चालला आहेस. सही रे! एक वेळ तर अशी आली की मला वाटले की आता तू खरेच गायब झालेला असशील. याहू वर तुला ’ याहूउउउ " ची आरोळी ठोकणार होते... पण घाबरले. ही ही... मजा आली. ( वाचताना थोडी दमछाक झाली खरी... :ड )

    ReplyDelete
  28. हाहाहा श्रीताई,
    मनातून देशात जायला मिळालं असतं तर मज्जाच मज्जा (हा मज्जातंतूंवरचा श्लेष आपोआप झालाय ;) )!
    इन्सेप्शन बघायचाच आहे.. पण चांगली कॉपी मिळेना अजून.. आता उत्कंठा फारच वाढलीय... मुद्दाम इन्सुलेट करून ठेवलंय, त्याबाबतच्या सगळ्या बातम्यांपासून स्वतःला! :)

    ReplyDelete
  29. ते बरं केलंस. नाहीतर मेला सस्पेन्सच फोडून टाकतात. बाकी कोणी काहीही म्हणू देत " शटर आयलंड " नंबर वन वर. :) जोर का झटका जोरसेही लगे.... इन्सेप्शन मध्ये थोडे मुद्दे मनात मांडत गेले तर सस्पेन्स आपोआप उलगडतो... मात्र अजून एक मोठ्ठा सस्पेन्स अध्यारूत ठेवलाय हे मात्र खरं.

    ReplyDelete
  30. 'शटर आयलंड' "टू वॉच" लिस्टमध्ये आहेच...
    आता मिळाले दोन्ही की तुटून पडतो! :)

    ReplyDelete
  31. Anonymous2:15 AM

    Besttttttttttttttttttttttttttttttttttt

    ReplyDelete
  32. बॅड गाय,
    ब्लॉगवर स्वागत! तुमचा ब्लॉगही पाहिला..छान आहे!
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! भेट देत रहा..

    ReplyDelete
  33. katha khup chan ahe.i like it....

    ReplyDelete