9/12/2010

विचित्र

'मुंबई मेरी जान' ह्या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे. आर. माधवन ट्रेन पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लाससमोर उभा असतो. आणि अचानक एक विविध इन्व्हेस्टमेंट्सची माहिती सांगणारा माणूस त्याला जबरदस्तीनं सेकंड क्लासच्या डब्यात घेऊन जातो. आणि त्याच ट्रेनमध्ये माधवनच्या नेहमीच्या फर्स्ट क्लासमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतो. माधवन बाल बाल बचावतो. तो एजंट ज्याला माधवन मनातल्या मनात शिव्या घालतच सेकंड क्लासमध्ये चढतो, तो प्रत्यक्षात देवदूतासारखाच असतो. ह्याउलट 'जॉनी गद्दार' मध्ये शेवटच्या दृश्यामध्ये काव्यात्म न्याय दाखवण्यात आलाय, ज्यामध्ये गैरसमजामधून योग्य माणसाचा खून होतो. एकदम विचित्र.

असेच अनेक अनुभव वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यानंतरही वाचण्यात आले होते. कुणी मेडिकल स्टोअर्स मध्ये जाण्यासाठी खाली उतरलं होतं. कुणी त्याच दिवशी ऑफिसात उशिरा आले होते, तर कुणी नेमके तो एकच दिवस काही कामानिमित्त वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये गेले होते आणि मृत्युमुखी पडले. २६/११ हल्ल्यानंतरही सारख्याच प्रकारचे अनुभव वाचले मी. मला अशा विचित्र घटना फार भुरळ पाडतात. मी बराच वेळ विचार करत बसतो.

नक्की काय घडतं अशा क्षणी. इतक्या माणसांची भविष्य एका घटनेवर जेव्हा अवलंबून असतात, तेव्हा नक्की खेळ कशाचा असतो. ज्याला नशीब म्हणतात तेच, की निव्वळ शक्यतेचं एक गणितीय सूत्र. २५ बाटल्या जमिनीवर घरंगळत सोडल्या आणि वरून एक दगड सोडला, तर किती बाटल्या फुटतील, एव्हढा सोपा हिशोब, की पाप-पुण्याचे तराजू तोलून झालेली दैवी निवड?

मग अशा वेळेस प्रश्न पडतो, की निरपराध लोक मरतात पण गुन्हेगार मात्र मजेत आयुष्य जगतात. इथे कुठला हिशोब आणि कुठले ठोकताळे लागतात? दाऊद इब्राहिम, ओसामा आणि बरेचसे राजकीय नेते बिनबोभाट मजेचं ऐषारामी आयुष्य जगताहेत आणि आपल्या जगण्याच्या मरण्याच्या किल्ल्याही त्यांच्याच हातात? पाप-पुण्याचा कुठल्या प्रकारचा मापदंड इथे वापरला जातो. की मग आपल्या अशा अनिश्चित जगण्यातच जगाची व्यवस्था आहे. जगाची रचनाच तशी झालीय. आपण मरणं, कुत्र्याच्या मौतीनं मरणं हेच आपलं प्रारब्ध आहे. पण मग आपण जी विविध जीवनध्येय घेऊन जगतो, त्याला काय अर्थ आहे. मला जर खूप मोठा सिनेदिग्दर्शक बनायचंय आणि मी फर्स्टक्लासच्या डब्यातल्या ब्लास्टमध्ये मेलो, तर काय उपयोग होता, त्या रात्रंदिवस जोपासलेल्या स्वप्नाचा आणि ढोरमेहनतीचा? की मग ते मी तितकंच करणं हेच जगाच्या व्यवस्थेचा भाग आहे? पण हा विचार फारच दैववादी होतोय.

आता ह्याच वाक्याचा दुसरा अर्थ कसा निघतो बघा. की मग ते मी तितकंच करणं हेच जगाच्या व्यवस्थेचा भाग आहे? ह्याचा दुसरा अर्थ हा ही होतो, की हे कर्मवादी वाक्य आहे. मी माझं कर्म करत राहणं, हेच माझं दैव आहे? बापरे.. मी रिकरिंग लूप मध्ये जातोय. पण प्रारब्धाला घाबरून, किंवा प्रारब्धाला शरण जाऊन आपण जर जीवनध्येय घेतलंच नाही तर आपण जगणारच नाही.

माझ्या वरच्या विचारांवरून, 'कर्म कर फल की अपेक्षा न कर' हे वाक्य १००% दैववादी आहे. असो. तर एव्हढा मानसिक गोंधळ माजण्याचं कारण एव्हढंच आहे, की मी 'मॅन्स सर्च फॉर मीनिंग' हे पुस्तक वाचत होतो. त्यामध्ये 'ज्यू कॉन्सन्ट्रेशन कॅम्प'मधून परतलेल्या एका सायकॉलॉजिस्टचे अनुभव आहेत. त्यामध्ये त्यानं बराच वैचारिक ऊहापोह केलाय, माणसाच्या जगण्यावर आणि जगण्याच्या कारणावर. त्याच्या मते माणूस आयुष्यभर जगण्यामागचं कारण आणि पर्यायाने अर्थ शोधत असतो. कधी कधी त्याला ते कारण कुणीतरी सांगावं लागतं, किंवा अचानकच त्याला त्याची जाणीव होते. आणि मग तो त्या कारणासाठी जेव्हा आयुष्य जगतो, तेव्हा तो खर्‍या अर्थाने जगतो. आणि कधी कधी हा शोध, हेच त्याच्या जगण्याचं कारण बनून जातं. कॅम्पमध्ये अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, कधी कधी तर स्वतःलाच परावृत्त करण्यासाठी तो कशा पद्धतीने माणसांना कारणं शोधायला, जीवनाचा अर्थ समजायला मदत करायचा ह्याबद्दलही त्यानं छान लिहिलंय.

त्यामध्ये योगायोगाने दोनतीनवेळा तो कसा वाचतो हे सांगण्याबरोबरच तो एक पर्शियन दंतकथा सांगतो. ती दंतकथा आत्ता आठवली आणि त्यावरूनच हे सगळं विचारचक्र सुरू झालं.

एकदा एका पर्शियन श्रीमंत माणसाच्या घरात काम करणार्‍या नोकराला बागेत प्रत्यक्ष मृत्यू सामोरा येतो. मृत्यूला पाहून त्याची पाचावर धारण बसते. तो धावतच आपल्या मालकाकडे जातो. रात्रीची वेळ असते. तो मालकाला झाला प्रकार सांगतो आणि रातोरात तेहरानला - राजधानीला- जाण्याची परवानगी मागतो. मालक काळजीनंच त्याला सगळ्यात वेगवान घोडा देतो, जेणेकरून तो पहाटेच तेहरानला सुखरूप पोहचेल आणि पुरेसे पैसे आणि शुभेच्छा देतो.

थोड्या वेळाने मालक बागेत फेरफटका मारायला जातो, तर त्यालासुद्धा मृत्यू दिसतो. तो मृत्युला नोकराला घाबरवल्याबद्दल जाब विचारतो. तर मृत्यू म्हणतो, "अरे काही नाही. तो अजून इथे कसा हे पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. कारण त्याची माझी भेट उद्या पहाटे तेहरानमध्ये ठरली होती."

38 comments:

  1. खरंय असे विचार नेहमी चालू असतात. ह्यावरूनच ’Final Destination' सिनेमांची मालिका आठवते.

    ReplyDelete
  2. विभी, काय गंमत आहे पाहा... गेले काही दिवस असेच सारे मनात घोळते आहे. " ज्याचे भरले तो चालला " मग तो अर्ध्यातून उठतोय की आणिक काही मागे सोडून... जावे तर लागतेच.

    राहून राहून सद्दामच्या मरणाचे/त्याला पकडून देहदंडाची शिक्षाही इतकी चटकन अमलात येण्याचे नवल वाटते. अजून ओसामाचे नखही दिसत नाही आणि तेही इतक्या भयानक पार्श्वभुमीवर... थोडक्यात मरण चुकत नाही. आणि न ठरलेल्या वेळी येत नाही.

    पोस्ट मुद्देसुद. आवडली. मृत्यू बोलावून नेतो म्हणतात ते खरेच नं...

    ReplyDelete
  3. पोस्ट नेहमीप्रमाणेच स्वांत:संवादु
    काही वेळा काळ आलेला अस्तो पण वेळ आलेली नसते.
    काही वेळा काळ आणि वेळ दोन्ही येतात.
    कुणा एकाच्या नशीबामुळे सगळे वाचू शकतात तर सगळे एकसारखा शेवट नशीबात असलेले एकत्र येतात त्यावेळी.

    ReplyDelete
  4. ------------------------
    पाण्याचा रंग कोणता आहे?
    जो मिसळू तो.
    म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही.

    आयुष्याचा अर्थ काय आहे?
    ------------------------

    ReplyDelete
  5. Anonymous8:32 PM

    आनंद चित्रपटातील डायलॉग....(श्री ताईच्या पोस्ट मधुन साभार)

    " ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जहांपनाह, उसे न आप बदल सकते हैं और न मैं, हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है, कब, कौन, कैसे उठेगा कोई नहीं बता सकता... "

    ReplyDelete
  6. संकेत आपटे8:45 PM

    थोडं आध्यात्मिक:
    जो माणूस पुण्यवान असतो किंवा ज्या माणसाचा पापांचा साठा कमी असतो, असा माणूस देवाचा लाडका असतो. त्याला शिक्षा अशा वेळी मिळते ज्यावेळी त्याच्या आसपास त्याचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी असतात; त्याच्यामध्ये शिक्षा सहन करण्याची क्षमता असते. यामुळे तो माणूस सुधारण्याची शक्यता असते. जसजसा माणूस त्याच्या पापांमध्ये भर घालू लागतो तसतसा तो देवाच्या नजरेतून उतरत जातो. आणि ज्यांनी आयुष्यभर फक्त पापाच्याच मार्गाने वाटचाल केली अशा नराधमांना शिक्षा अशा वेळी मिळते ज्यावेळी ते अगदी असहाय्य असतात. प्रेमाचं असं कुणी माणूस त्यांच्याजवळ नसतं. त्यावेळी शिक्षेची तीव्रता खूप जास्त जाणवते. आणि केलेल्या पापांना शिक्षा ही मिळायचीच. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. बर्‍याचदा अनेक लोकांचे हाल आपल्याला बघवत नाहीत. देवाने या सगळ्यांतून त्यांना सोडवावं असं सारखं सारखं वाटत राहतं. हे असे लोक मागच्या जन्मीच्या पापांची फळं भोगत असतात. म्हणूनच तर श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, ’फळाची अपेक्षा न धरता कर्म करत राहा.’ एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत जरूर करावी, पण आपण आपलं ध्येय गाठूच ही अपेक्षा मात्र धरू नये. कारण, आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटना आपल्या हातात नसतात. आपण फक्त कळसूत्री बाहुल्या असतो. खरा सूत्रधार ’तो’ असतो. असो. ही माझी कमेंट जरा जास्तच विस्तृत झाली आहे. आता थांबतो. आमेन. :-)

    ReplyDelete
  7. विभि, खुप दिवसांपासूनचं.. पण अगदी मनातलं..

    ReplyDelete
  8. बाबा,पोस्ट सुंदर झालंय.

    ReplyDelete
  9. काय योगायोग आहे! आज मराठीब्लोग्स वर ३ ब्लॉग मध्ये मृत्यू बद्दल लिहिले आहे. एक महेंद्र काकांचा, एक तुझा आणि एक प्रभाकर पंतांचा ब्लॉग.

    एकदम मुद्देसूद विचार मांडले आहेत. नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट लेख!

    ReplyDelete
  10. मृत्यू... एक शाश्वत सत्य !! एक गूढ.. जितकं शोधू, बोलू तेवढं कमी. छान उहापोह केला आहेस.

    ती पर्शियन लोककथा जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली होती त्यावेळी साधारण असेच विचार डोकावले होते....

    ReplyDelete
  11. Had always liked this Persian story.. there is another kind of such story in Mahabharata. When Yudhishthira decides to do some 'dana' next day, Bheema wants to celebrate saying 'you have conquored death'(you know you are going to live for next 24 hours!).. we should be ready for it any moment .. with this feeling if we live, we may live better :-)

    Sorry again for commenting in English.. during travel I do not have the Marathi font!

    ReplyDelete
  12. देवदत्त,
    ब्लॉगवर स्वागत!
    होय ना...अचानकच विचारांची साखळी तयार होते...
    फायनल डेस्टिनेशन चांगली मालिका होती..मी पाहिलेत ते सिनेमे..
    प्रतिक्रियेसाठी खूप आभार भाऊ!
    येत राहा असाच!

    ReplyDelete
  13. श्रीताई,
    तू, मी आणि महेंद्रकाका आपण सगळ्यांनी नेमकं हेच लिहिलं गेल्या दोन-तीन दिवसांत.. काय कळेना..
    खरंच...विरोधाभास खूप आहे जगात...
    खूप गुंतागुंतीचे प्रश्न पडत राहतात!

    ReplyDelete
  14. अलताई,
    खरंच.. काळ आणि वेळ ह्यांचं गणित कुणालाच उमगत नाही...त्यासाठी कुठलेही, कसलेही ठोकताळे नाहीत...कदाचित तीच जगण्यातली आणि मरण्यातलीही मजा आहे!

    ReplyDelete
  15. ओंकार,
    डेडली एकदम...
    आयुष्याचा अर्थ...
    निरनिराळे कोन, निरनिराळे चष्मे.. खरंच..!

    ReplyDelete
  16. देवेन,
    हा एक अतिशय अप्रतिम डायलॉग आहे...
    पण का कुणास ठाऊक कधी कधी प्रचंड निराशावादी वाटतो..कदाचित अटळ सत्यच आहे ते!

    ReplyDelete
  17. संकेत,
    तू म्हणतोस ना तो दृष्टिकोन जग हे एका न्याय्य व्यवस्थेवर चालतं असा आहे. आणि तो एका अंगाने मला पटतोही..
    पण खरंच मी इतकं चित्रविचित्र वाचत असतो ना...की माझा कधी कधी जाम गोंधळ उडतो...
    शेवटी एका सामान्य बुद्धू माणसाच्या हातात काय राहतं.. आपलं काम करत राहणं... आणि हाच बेसिक फंडा महाभारतात सांगितलाय...सगळं चक्र फिरून पुन्हा तिथेच येतं..
    आणि दॅट्स द ब्यूटी ऑफ इट!
    आणि चांगलं झालं रे इतकी विस्तृत लिहिलीस..हा विषयच तसा आहे!

    ReplyDelete
  18. आनंदा,
    आपलं ह्यावर थोडं बोलणंही झालं होतं..ओझरतंच...पण झालं होतं..
    त्यामुळे भापो..

    ReplyDelete
  19. mynac दादा,
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  20. निरंजन,
    खरोखर योगायोगच आहे...विचित्र..
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  21. हेरंब,
    न उकलणारं, अशक्य, अप्राप्य असं गूढ...कस्तुरीसारखंच आपल्यातच असणारं, पण शेवटपर्यंत न उकलणारं..
    अरे ती लोककथा वाचून एकदम विचारकल्लोळ उठला होता...
    ते पुस्तक वाचलं नसशील तर वाच.. व्हिक्टर फ्रँकल चं आहे..

    ReplyDelete
  22. सविताताई,
    ही युधिष्ठिराची कथा मी आधी ऐकल्यासारखी वाटतेय..पण खरंच खूप शिकवणारी आहे...
    सॉरी नका म्हणू हो..तुम्ही इतक्या आवर्जून प्रतिक्रिया देता, हे खूप आहे..
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  23. माझा व आई मध्ये झालेला सवांद आठवला

    आई-अरे सागर तुला ते अमुक अमुक काका माहित आहेत का?अरे काळ अचानक वारले ते.
    मी-अग पण मी त्यांना काही दिवसापूर्वीच भेटलो होतो एकदम छान होते.
    आई-अरे हो .दुपारच जेवण केल अन थोडावेळ झोपतो म्हणून झोपले ते झोपेतच गेले

    प्रसंग दुसरा
    मी -आई अग त्या काकूंची तब्येत कशी आहे?(ज्या काकू गेले ६ महिने झाले अंथरुणाला खिळून आहे व डॉ नि सुद्धा त्यांच्या जगण्याची आशा सोडली आहे )

    आई- अरे काही नाही अजून आजारीच आहेत त्या.खूप हाल होत आहेत त्यांचे .घरात होता होता नव्हता सर्व पैसा गेला आता कर्ज काढून त्यांन जिवंत ठेवलय

    :( :( :(
    खरच विचित्र आहे

    ReplyDelete
  24. विभि...हे सर्व खुप विचित्र आहे...म्हणजे आपल्या बुदधी पलीकडच...तुला एक अनुभव सांगतो...

    माझी मोठी मावशी महामार्गावर चालत्या जीपमधुन पडली होती पण तिला मुकामार बसण्याव्यतिरिक्त काहीच झाल नाही...त्यानंतर साधारण २-३ महिन्यांनी घरी येताना रस्त्यात फ़क्त ठेच लागल्याच निमित्त झाल अन खाली पडली ती कायमचीच परत कधीही न उठण्यासाठी.. :( :(

    ReplyDelete
  25. सागर,
    अरे सगळं एकदम अनाकलनीय आणि अगम्य आहे असं वाटायला लागतं हे असं काही ऐकलं की! विचित्र..

    ReplyDelete
  26. योगेश,
    जगाचा न्याय आणि व्यवस्था... विक्षिप्त आणि विचित्र वाटतात!
    :(

    ReplyDelete
  27. एक असाच किस्सा सांगतो. ह्या गणपतीला माझा मित्र न्युयॉर्कहुन सिरॅक्युसला ज्या बसने आला त्या बसचा पुढे अर्ध्या तासात अपघात झाला. एक्झिट चुकला आणि डबलडेकर बस, ड्रायव्हरने कमी उंचीच्या पुलाखालुन नेली. ४ ठार, १२ जण जखमी.
    २००४ला १८ सप्टेंबरला गणपती होते. लक्षात रहायचं कारण मी १६चं बेळगाव-मुंबई बसचं तिकिट रद्द करुन १७चं केलं. आणि माझ्या बसचा अपघात झालेला. बऱ्याच कोलांट्याउड्या घेतलेल्या बसने. ३ वर्ष बसने नियमित प्रवास केलेला... पण अपघातानंतर एक भिती बसली ती बसलीच आहे. आर. माधवनची जी अवस्था दाखवली आहे ती अनुभवली आहे (आता कमी प्रमाणात अनुभवतोय). वहम एक बार बैठे तो निकलना मुष्किल है...

    ReplyDelete
  28. विचित्र घटना घडतात तेव्हा कसं रिअ‍ॅक्ट व्हावं हेही कळत नाही पटकन. खूप उशिरा त्या घटनांचे अर्थ जेव्हा समजायला लागतात तेव्हा असं वाटतं, आपण खरंच ’त्याच्या’ हातातलं खेळणं आहोत. सगळं ’त्याच्या’ मर्जीनेच होत असतं.

    ReplyDelete
  29. सौरभ,
    अवघड असते रे ही अवस्था! मी विचारही करू शकत नाही!
    :(

    ReplyDelete
  30. कांचनताई,
    हो ना! ही भावना बरेचदा हंबलिंग असते, पण जास्तकरून भीतीदायक!

    ReplyDelete
  31. keerti9:59 PM

    hyavarun ekach samajat ki apan sarv tya shaktichya hatatil kathputali ahot

    ReplyDelete
  32. Anonymous4:48 AM

    Life Goes On!

    ReplyDelete
  33. कीर्ती,
    ब्लॉगवर स्वागत!
    होय, एकंदर तसंच जाणवतं!
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  34. Anonymous,
    खरं आहे...
    खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  35. बाबा पोस्ट मुद्देसुद झालीय आणि ती गोष्ट फ़ारच छान आहे रे...अंतर्मुख व्हायला होतंय....

    on a side note तुम्ही तिघं आता जरा थोडं नव्याने जन्म किंवा आहे ते जगणं सुंदर करणं असंही लिहा नं?? वातावरण फ़ार गंभीर होतंय आणि ते सारखं सारखं गदगद नको...शेवटी शाश्वत सत्य आपल्याला माहित आहेच...पण मला वाटतं त्या विचारात जगण्याला सुंदर करायचं राहून जायला नको....

    ReplyDelete
  36. अपर्णा,
    अगदी अगदी! वेगळे विचार यावेत ही माझीही इच्छा आहे! बाकी हा आपला एक योगायोगच झाला! बघू!
    धन्यवाद!

    ReplyDelete
  37. विधिलिखित. कोण टाळू शकणार? मी जन्माला आले त्या क्षणालाच तो दिवस ठरलेला आहे....उलट प्रवास त्याच्याच दिशेने चाललेला आहे... मृत्यू कधी भोज्जा करेल काय माहित? तयारी आपली करून ठेवलेली आहे.. :)

    ReplyDelete
  38. अनघा,
    विचित्र पण सत्य!

    ReplyDelete