"पप्पा, तो आपला अकाऊंटंट आहे ना?" अनु वडिलांना ब्रेकफास्टच्या वेळी सांगत होती.
"कोण?"
"तो सिटी ऑफिसला बसतो ना, सहा महिन्यांपूर्वी जॉईन झालाय."
"ओह्ह, उमेश! ब्राईट बॉय. दिवस-रात्र न बघता मान मोडून काम करतो, असा रिपोर्ट आलाय त्याचा. मुलगा मेहनती आहे, पुढे जाईल."
तिच्या चेहर्यावर हलकं स्मित आलं. "पप्पा, त्याला साहित्य वगैरेंमधलं खूप चांगलं कळतं."
क्षीरसागरांनी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं.
"म्हणजे पप्पा, मीच दोन तीनदा जबरदस्तीनं जाऊन त्याला भेटले. तसं त्याच्या मनातही काही नाहीये आणि अजून काही नाहीये."
"पण तुला एका मामुली अकाऊंटंटमध्ये एव्हढा का इंटरेस्ट!"
"पप्पा, तो खूप चांगला मुलगा आहे. बाकी काही नाहीये अजून."
"हे अजून अजून काय लावलंयस?"
"पप्पा, मी एव्हढंच म्हणतेय, की त्याला तुमच्या पब्लिकेशनमध्ये एडिटोरियल साईडला शिफ्ट करा. बघा काय कमाल करेल तो!"
क्षीरसागर विचारात पडले. पब्लिकेशन शहराबाहेर होतं. म्हणजे तो इथून दूर गेला असता. एका दगडात दोन पक्षी.
पण सगळेच फासे उलटे पडले. उमेशनं पब्लिकेशनमध्ये दोन वर्षं काढली आणि सगळी ट्रेड शिकून तो शहरात स्वतःचं पब्लिकेशन काढायला परतला. अनु तर त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. पण उमेशचं लक्ष फक्त स्वतःच्या पब्लिकेशनमध्येच होतं. पाच वर्षं राबून त्यानं स्वतःचं एक स्थान शहरात निर्माण केलं. एक अतिशय प्रथितयश असा तरूण उद्योगपती म्हणून तो उभ्या शहरात प्रसिद्ध होता. पण स्त्रियांबद्दल त्याची असलेली विलक्षण अलिप्तता हीदेखील त्याच्याबद्दलच्या चर्चेचा कायम विषय होती. क्षीरसागरांनाही त्याचं कौतुक होतं, त्यामुळेच अनुच्या इच्छेनुसार त्यांनी उमेशच्या आई-वडिलांशी आणि उमेशशी बोलणी करून त्यांचा साखरपुडा उरकला होता. अनु उमेशच्या होकारानंतर हवेतच होती. तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. उमेश आपल्यावर प्रेम करत नाही, ह्याची तिला जाणीव होती. त्यातून उच्च स्थानाचा आणि अति कामाचा उमेशवर वाईट परिणाम सुरू झाला होता. पण ह्या सगळ्यातून लग्नानंतर मार्ग निघेल हा अनुचा विश्वास होता.
आणि आज तो दिवस आला होता. आज उमेश कायमचा अनुचा होणार होता. अनु लग्न पूर्ण एन्जॉय करत होती. पण उमेशच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. तशात कमलेश घाबराघुबरा आला होता.
"काय झालं? सांगशील लवकर."
"अरे, गंधेची बायको..."
"हां तिचं काय?"
"अरे ती... ती नाहीये रे..."
"काय?" उमेशला घेरी यायचीच बाकी होती.
"काय बरळतोयस तू?"
"होय. मी स्वतः बघून आलो आत्ता. कन्फर्म करून आलोय. ती गंधेचीच बायको आहे, पण ती, ती नाहीये."
"अरे, पण हा सुरेश पुरुषोत्तम गंधेच आहे ना. लग्नपत्रिका मी स्वतः बघितली होती."
"होय रे. पण ती, ती नाहीये."
उमेश अवाक् झाला होता. थोडा वेळ तो विचारात गढला.
"मला गंधेच्या बायकोला भेटावं लागेल."
"वेडा झालायस काय?" कमलेश काळजीत पडला.
उमेशनं एक फोन फिरवला.
----
मिसेस गंधे अनोळखी घरात जसं चालावं तश्याच चालत नोकरानं दाखवलं, त्या खोलीत शिरल्या. आणि समोर उमेशला पाहून एकदम दचकल्या.
"दचकू नका. मीच खोटं बोलून इथे बोलावलं तुम्हाला. माझ्या होणार्या सासूनं नाही, मीच तो निरोप पाठवला, कारण मला काहीतरी फार महत्त्वाचं विचारायचंय तुम्हाला!"
"काय?" मिसेस गंधेंना काहीच कळत नव्हतं.
"तुमचं आणि मिस्टर गंधेंचं लग्न कधी झालं? आणि तुम्ही त्यांच्या पहिल्या पत्नी आहात का? आणि नाही, तर त्यांच्या पहिल्या पत्नीचं काय झालं?"
ह्या विचित्र प्रश्नांच्या सरबत्तीनं त्या गांगरून गेल्या. पण मग उमेशच्या चेहर्यावरचे भाव पाहून त्यांच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला लागला.
"तुम्ही तेच उमेश का?"
----
उमेश लग्नमंडपात उभा होता. पण मिसेस गंधेंचे शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. तो आतून पूर्ण कोलमडला होता. त्याला पुन्हा एकदा तीच असहायतेची भावना घेरत होती. त्याच्या डोक्याला मुंडावळ्या होत्या. शेजारी सजून अनुप्रिया बसली होती. स्वर्ग त्याच्या पायाशी येणार होता. कित्येक कॅमेरे त्याच्यावर रोखलेले होते. समोर हवनकुंड होतं. पण तो त्यात कसली आहुती देत होता.
अनुप्रियाला त्याचा अस्वस्थपणा जाणवत होता. कारण कळत नव्हतं. तो अजूनी चुळबुळत होता. मंत्रोच्चारण सुरू झालं होतं. आणि अचानक त्याला समोर मिस्टर आणि मिसेस गंधे दिसले. मिसेस गंधेंच्या चेहर्यावरचे भाव त्यानं बघितले मात्र तो मंडपातच उठून उभा राहिला. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. अनुप्रियाचे वडील, अनुप्रिया, त्याचे आई-वडिल सगळेच गडबडले. त्यानं मुंडावळ्या काढल्या आणि अनुप्रियाच्या डोळ्यांत बघितलं. तिच्या काय ते लक्षात आलं. त्यानं मुंडावळ्या तिच्या हातात ठेवल्या आणि तो सरळ दरवाजाच्या दिशेनं चालायला लागला. सगळेच गडबडले. एकच गोंधळ उडाला.
उमेश बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडला आणि त्यानं सर्वप्रथम आपला कोट काढून फेकला. चालता चालताच त्यानं टाय काढून टाकला आणि त्यानं रिक्षाला हात केला. रिक्षा एका छोट्याश्या बिल्डिंगसमोर थांबली. त्यानं रिक्षावाल्याला पाचशेची नोट काढून दिली आणि सुटे न घेताच तो बिल्डिंगमध्ये शिरला. त्यानं बाह्यांची बटणं सोडवली आणि बाह्या दुमडतच तळमजल्यावरच्या घराची बेल वाजवली. एक मिनिटानं दरवाजा उघडला.
तिची नजर उमेशवर पडली मात्र, ती स्तब्ध झाली. तिला कळतच नव्हतं काय चाललंय.
"आत तरी घेशील?"
आत शिरून तो सोफ्यावर बसला.
"तुला काय वाटलं, तू मला भीक देशील आणि मी घेईन?"
तिच्या चेहर्यावर फक्त प्रश्नचिन्ह होतं.
"तुझ्या बहिणीनं मला सगळं सांगितलं. तू कसा ऐनवेळी लग्नाला नकार दिलास आणि मला शोधायला निघालीस. ज्यामुळे तुझ्या चुलत बहिणीचं तडकाफडकी लग्न गंधेशी लावलं गेलं. पण मी शहर सोडून गेलो होतो, हे कळल्यावर तू माझ्या आई-बाबांना काहीही न सांगता परत आलीस. आणि महिन्याभराने मी शहरात परतलो, तेव्हा तुला कळलं नाही. पण जेव्हा मी खूप मोठा झालो, तेव्हा माझ्यावर हक्क न सांगण्याचा तू निर्णय घेतलास."
ती त्याच्या चेहर्याकडे पाहत होती. आणि तो तिच्या डोळ्यांत.
"सगळे निर्णय तूच घेतलेस ना. मला सोडायचाही, गंधेशी लग्न न करण्याचाही, आणि माझ्याकडे परत न येण्याचाही! स्वतःला तू समजतेस तरी कोण?" त्याच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या. तोच असहायपणा पुन्हा त्याला जाणवत होता. तो मनानं आज पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये बसला होता आणि आपल्या आयुष्याचे निर्णय आपोआप झालेले बघत होता. "मी तिथे तुझ्याबद्दलची हेट्रेड, तुझ्याबद्दलचा द्वेष मनात जागवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या द्वेषापोटी, त्या ईर्ष्येपोटी वर वर चढत होतो. पण आत्ता जाणवतंय, की तो द्वेष तुझ्याबद्दल नव्हता, तर माझ्याबद्दल होता. मी स्वतःचाच द्वेष करत होतो. आणि त्यापायीच मी पुढे जाण्यासाठी धावत होतो, जेणेकरून मला स्वतःकडे बघायला वेळच मिळू नये. धावता धावता मी सगळं मिळवलं, आलिशान गाडी, घर, महागडा मोबाईल, उंची कपडे, मोठ्या लोकांमध्ये ऊठबस, उंची लाईफस्टाईल. पण एव्हढं सगळं बाह्य आणि लौकिक यश मिळूनही मी सुखी नव्हतो, कायम एक बोचरी जाणीव मन कुरतडत राहायची. पूर्वी सहज कवितेतून मिळत असलेली शांतता त्या रेस्टॉरंटमधून तू उठून गेल्यापासून कधीही परत मिळाली नाही. आजही माझ्या लग्नात मी पाण्यासारखा पैसा खर्च करून तुला जळवायला निघालो होतो खरा, पण त्यात माझाच स्वतःबद्दलचा द्वेष कमी करण्याची धडपड जास्त होती. पण माझं हे यशही तूच भीकेत दिल्यासारखं वाटतंय मला. कारण ह्या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस. प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुझ्याचमुळे मी आज जसा आहे, तसा आहे."
तो जितकं बोलला, त्यानंच त्याला थकल्यासारखं वाटत होतं. तो नुसताच तिच्याकडे पाहत होता.
"तुला मी काय सांगू, त्या संध्याकाळी तुझे पाणावलेले डोळे मला तुझ्या हृदयाची शकलं दाखवत होते. ते पाहून माझं काळीज पिळवटत होतं. कॉलेजात तुझ्या आधारानं असलेली मी, तुलाच मोडताना पाहत होते. पण त्याहीपेक्षा दुःखदायक जाणीव ही होती, की तुझ्या मोडण्याचं कारण मीच होते. तुझ्या दाटलेला स्वर, तुझी विनवणी मला काहीच सहन होत नव्हतं. पण तुझ्यासमोर स्वतःला दुबळं दिसू द्यायचं नव्हतं मला.
रात्री गादीवर पडल्यावर मी खूप अस्वस्थ होते. तुझे डोळे माझा पाठलाग करत होते. तुझ्या मिठीतली ती आश्वासक ऊब आता मला पुन्हा कधीच मिळणार नाही, ही भयावह जाणीव अचानकच मला झाली आणि माझ्या मनानं बाजू बदलली. दुसरा अख्खा दिवस मी काय करू पेक्षा कसं करू ह्याच विचारात होते आणि शेवटी मी एका अविवेकी निर्णयामुळे दुसरा अविवेकी निर्णय घेतला. मी घरातून निघून गेले. माझ्या आई-वडिलांना, सगळ्या कुटुंबियांना अवघड स्थितीत ढकलून. पण वसुधानं तिच्या काका-काकूंची म्हणजे माझ्या आई-वडिलांची लाज राखली आणि माझ्याऐवजी लग्नाला उभी राहिली.
इकडे मी तुझ्या घरी पोचले, तर तू शहर सोडून गेल्याचं तुझ्या आई-वडिलांकडून कळलं. तू तुझ्या घरी आपल्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतंस, हे त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं. मी तर त्याक्षणी कोलमडूनच गेले होते. मी एकाच वेळी किती जीवांना भरकटवलं होतं आणि दुःखात टाकलं होतं. त्याच विमनस्क अवस्थेत माझ्या मैत्रिणीनं मला आधार दिला. आई-वडिलांनीही मोठ्या मनानं मला माफ केलं आणि मी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. तू शहरात परत आल्याचं मला कळलं नाही. आणि कदाचित तुझे आई-बाबा तुला माझ्या येण्याबद्दल सांगायला विसरले. आणि अचानक दोन-तीन वर्षांनी तुझं नाव दुमदुमायला लागलं. मी हर्षभरित झाले आणि सरळ तुझ्याकडेच यायला निघणार होते. पण मग विचार केला, की आज तू तिथे आहेस कारण मी तुझ्यासोबत नाहीये. कदाचित मीच तुझ्या आयुष्याला लागलेलं ग्रहण होते. आणि पुन्हा तेव्हा तुझ्याजवळ जाणं म्हणजे तुझ्या यशातला वाटा मागण्यासारखं वाटलं मला.
मी कायमसाठीच एकटी राहायचं एव्हाना ठरवलं होतं. मी केलेल्या चुकांची भरपाई म्हणून. दुःख खूप होतं, पण तुझ्या यशाकडे बघून मी खुश राहायचे. मग एक दिवस तुझ्या साखरपुड्याची बातमी वाचली आणि क्षणभर खूप दुःख झालं. ढसाढसा रडावंसं वाटत होतं. पण मग सावरलं. तू आनंदात असशील ह्या जाणीवेनंच मन शांत केलं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वसुधा तुझी लग्नपत्रिका मला दाखवत होती. तिला ठाऊक नव्हतं की तू तोच आहेस. पण मी ती पत्रिका डोळेभरून पाहिली. गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर सगळीकडे येत असलेल्या तुझ्या लग्नसराईच्या बातम्या पाहून मला किती आनंद होत होता आणि किती दुःख होत होतं, हे माझं मलाच कळत नाही."
"ही सगळी प्रसिद्धी फक्त तुला जळवण्यासाठी होती." तो खजील होत म्हणाला. "मला ह्या लग्नात फक्त एव्हढाच इंटरेस्ट होता."
तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. "मी माझ्या एका अविवेकी निर्णयामुळे किती जणांची आयुष्य बदलली आणि किती जणांना दुखावलं ह्याची काही गणतीच नाहीये. पण आज तू इथे आलास आणि हे सगळं बोललास. तुला खरं सांगू, मला प्रायाश्चित्त झाल्यासारखं वाटतंय."
ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती.
तो पुढे झाला, त्यानं तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या भाळी ओठ टेकवले.
"अश्रू बापुडे अथक वाहती,
शब्दांना न सुचे काही,
शब्द हरवले ओठांत कुठे,
अर्थ डोळ्यांवाटे वाही"
आज कित्येक वर्षांनंतर त्यानं पुन्हा काव्य केलं होतं.
"मला जे हवं होतं ते मिळालं उमेश! तू आलास आणि मला आणि तुला दोघांनाही हरवलेला तू सापडलास. आता मात्र तू परत जा!"
"काय?"
"होय. जी चूक आठ वर्षांपूर्वी मी केली, ती तू आज करू नकोस. तुझ्यावर प्रेम करणार्या इतक्या माणसांना दुखवू नकोस. मी तुझ्याशिवाय राहायला शिकलेय आणि ह्या आठवणी मला आयुष्यभर पुरतील. पण जी तिथे मंडपात तुझ्या जाण्यानं कोसळली असेल, तिला तुझी गरज आहे!"
उमेश तिच्या डोळ्यांत पाहत होता. ही तीच होती, जिनं प्रॅक्टिकल निर्णय घेऊन त्याला तोडलं होतं आणि इमोशनल निर्णय घेऊन स्वतःचं लग्न मोडलं होतं. तीच आज त्याला सुवर्णमध्य काढायला सांगत होती.
----
उमेश रिक्षातून बंगल्यासमोर उतरला. सगळे पाहुणे पांगले होते. उमेश शांतचित्तानं चालत बंगल्यात शिरला. दिवाणखान्यातच मंडप होता. मंडपाशेजारीच त्याचे आई-वडिल आणि अनुचे वडिल चिंताग्रस्त चेहर्याने बसले होते. उमेशकडे त्यांचं लक्ष गेलं पण उमेशची नजर अनुला शोधत होती. आणि त्याला अनु दिसली. ती अजूनी हवनकुंडासमोरच्या तिच्या जागेवर स्तब्ध बसली होती. तिचे वडिल त्याला काहीतरी बोलणार ह्याआधी तो बोलला.
"अनु..."
तिनं एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिचा विश्वासच बसत नव्हता. ती उठून उभी राहिली आणि धावतच त्याच्याजवळ गेली. ती त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत होती आणि तो मिश्किल हसत होता. आणि ती त्याला एकदम बिलगली. आजवर कधीही हे तिनं केलं नव्हतं. त्याच्या अंगावर एक गोड शिरशिरी आली. ती शांतता, ज्यासाठी तो इतके दिवस धडपडत होता, जिला क्षणभर फक्त स्पर्शून आल्यागत वाटायचं आत्ता त्याच्या चहूकडे असल्याचं त्याला जाणवत होतं.
"स्पर्शातूनही न कळे असे कुठले कोडे पडले,
श्वासातूनही न कळे असे कुठले काव्य हे स्फुरले,
स्पर्शा-श्वासापलिकडले हे बंध आज जे जुळले,
दोन जीवांचे स्वतंत्र असे अस्तित्वही मग नुरले."
--समाप्त--
अख्खी कथा एकत्र इ-बुक म्हणून इ-बुक्स पानावर वाचा!