भाग -१,
भाग -२,
भाग -३,
भाग -४,
भाग -५,
भाग -६,
भाग -७,
भाग -८,
भाग -९,
भाग -१०,
भाग -११,
भाग -१२,
भाग -१३,
भाग -१४,
भाग -१५,
भाग -१६,
भाग -१७,
भाग -१८ आणि
भाग -१९ पासून पुढे
"मला
वाटलं होतं की तू म्हणालेलास आता पुन्हा भेटणं नाही म्हणून." तो मनुष्य स्वतःचे घारे डोळे नरेंद्रवर
रोखून म्हणाला.
"तुझा
धंदा असा आहे की तुझ्याकडे मला यावं लागेल, ह्याचं
भाकितही तूच केलं होतंस." नरेंद्र
तितक्याच शांतपणे म्हणाला. रेखा
फक्त शेजारी बसून पाहत होती.
समोरचा माणूस फक्त हसला आणि म्हणाला,
"काय काम आहे?"
"ही
यादी." रेखानं
शर्टाच्या खिशातून एक यादी काढून टेबलावर ठेवली.
त्यानं त्या यादीकडे रोखून पाहिलं आणि त्याच्या चेहर्यावरचे
भाव झरझर पालटले. "काय
हवंय तुम्हाला ह्याचं?"
"ह्यांच्यातली
फायनान्शियल लिंक." रेखा
पुढे म्हणाली आणि तिनं नरेंद्रकडे पाहिलं.
"तुला
माहितीय हे काय आहे, राईट?" त्या माणसानं नरेंद्रकडे पाहून म्हटलं.
"होय. आणि मला ह्यातल्या उर्वरित लोकांचे डिटेल्स हवे आहेत?" नरेंद्र म्हणाला.
"उर्वरित?" तो विचारात पडला आणि एकदम त्याची ट्यूब
पेटली आणि त्यानं पुन्हा ती लिस्ट वाचली, "ओ
माय गॉड."
"तुला
अवघड काही नाही. कॉम्प्युटर्स, आर्थिक व्यवहार, चीट
फंड, लोकांना गंडा घालणे आणि फसवणे, हेच तर तुझं बलस्थान. तुझ्यासारखी
लोकं सुखी असतात बघ." नरेंद्र
हसत म्हणाला.
"सुख हा एक असा गंडा आहे जो स्वतःला घालणं प्रत्येकालाच जमतं असं नाही." तोही
हसत म्हणाला.
"एकदम
खोल यार." असं म्हणून नरेंद्र
जोरात हसला आणि त्यानं टाळीसाठी हात पुढे केला. पुराणिकनं
टाळी दिली आणि तोही हसण्यात सामील झाला.
रेखा कित्येक दिवसांत पहिल्यांदाच नरेंद्रला इतकं मनमोकळं
हसताना पाहत होती. तिच्याही
चेहर्यावर हलकं हसू उमटलं.
-----
रमेश दुबईतल्या आलिशान हॉटेलच्या लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर
बाहेर पडला. रूम नंबर ४५२ च्या
समोरच्या बाजूला दोन रूम सोडून क्लिनिंग सुरू होतं. रमेशनं
क्लिनिंगवाली बाई खोलीत शिरल्यावर त्याच्या ट्रॉलीत्नं एक बाथरोब काढून घेतला आणि
स्वतःचे कपडे लिफ्टशेजारच्या चिंचोळ्या जागेत काढून ठेवले.
मग नुसताच टॉवेल गुंडाळून तो क्लिनिंगवाल्या बाईकडे गेला.
"एक्सक्युज
मी. आय फर्गॉट माय की इनसाईड. आय हॅड कम आऊट टू डिस्पोज ऑफ द गारबेज." त्यानं मजल्याच्या टोकाकडे असलेल्या
कचरापेटीकडे अंगुलीनिर्देश करत स्वतःच्या बाथरोबच्या रिकाम्या खिशांमध्ये हात घालत
म्हटलं.
क्लिनिंगवाली बाई फक्त हसली आणि तिनं रूम ४५२ उघडून दिली. तो 'थँक
यू' म्हणून आत शिरला आणि चटकन त्यानं
दरवाजा लावून घेतला आणि त्याच्या कपाळावर कुणीतरी बंदूक लावली. दोनच मिनिटांत ती बंदूक रमेशच्या हातात होती आणि ती व्यक्ति
जमिनीवर.
रमेशनं त्याच्यासमोर हात केला,
"पुराणिक!" रमेश
म्हणाला.
पुराणिक हसला आणि रमेशचा हात धरून तो उभा राहिला.
"इथे
तू माझं काही बिघडवू शकणार नाहीस." पुराणिक
समोरच्या गादीवर बसत म्हणाला.
"मी
तुला गोळी घालू शकतो, ऍरेस्ट
करू शकत नसलो तरी."
"मग
तुला हवी आहे ती माहिती कशी मिळेल?" पुराणिक
डोळे रोखून म्हणाला.
"माहिती
दिलीस तर ह्याखेपेला मी तुला काही करणार नाही ह्याची हमी देतो."
पुराणिक फक्त हसला.
"काय
झालं?"
"काही
नाही."
"कुठे
आहे रतन?" रमेशनं बंदुकीची नळी
त्याच्या डोक्यावर दाबली.
"तो
माझ्याकडे एक कागद घेऊन आला होता."
"कसला
कागद?"
"मलाही
कळलं नाही काय होतं ते. पण
त्या कागदाची कॉपी मी काढून ठेवली आहे, पुढेमागे
त्याच्यापासून प्रोटेक्शन म्हणून."
"कुठे
आहे तो कागद?"
"एअरपोर्टजवळच्या
एका पोस्टबॉक्सेसची सोय देणार्या दुकानात आहे." पुराणिकनं
खिशात हात घातल्याबरोबर रमेशनं ट्रिगरवरचं बोट घट्ट केलं,
"चावी देतोय मी तुला." पुराणिक
थांबूम म्हणाला. त्यानं खिशातून चावी
काढली आणि रमेशच्या हातात ठेवली.
रमेशनं बंदूक त्याच्या डोक्यावरून बाजूला केली. मॅगझिन काढलं आणि त्यातल्या गोळ्या काढून बाथरोबच्या खिशात
टाकल्या. बंदूक गादीखाली भिरकावली.
"पुन्हा
काही लागलं तर बिनदिक्कत या. आता
बंदूक नाही वापरणार मी." पुराणिक
हसत म्हणाला.
"तू
माझ्याबरोबर येतोयस." रमेश
म्हणाला.
'माझ्यापर्यंत पोचणारा
कुठलाही माणूस तुझ्यापर्यंत पोचलाच पाहिजे, ही
तुझी थियरी तुला महाग पडणार बहुतेक रतन.' पुराणिक
रमेशच्या शेजारी टॅक्सीत बसल्या बसल्या स्वतःशीच म्हणत होता.
-----
ती ठरल्याप्रमाणे गार्ड टॉवरच्या समोर असणार्या पोस्ट
ऑफिसच्या गच्चीवर येऊन उभी होती. गार्ड
टॉवरच्या उंचीपेक्षा थोडीशी जास्त मागची भिंत असल्यामुळे गार्ड टॉवर दिसत नव्हता
पण नरेंद्रचं कॅल्क्युलेशन बरोबर असलंच पाहिजे होतं. तिला
फक्त इलेक्ट्रिसिटी सोडलेली कुंपणं दिसत होती.
बबनच्या मदतीनं सेटिंग लावून वल्लभ आणि पुराणिक एकाच कोठडीत
आले. त्याच्या कोठडीच्या मागच्या भिंतीतून
दोन महिने सलग झटून त्यांनी एक मोठं भगदाड पाडलेलं होतं. त्यावर
शोलेचा पोस्टर लावून ठेवला होता. तिथून
जेलच्या स्यूवेजमध्ये शिरता येत होतं आणि तिथून थेट तंबूच्या मागच्या एका
भल्याथोरल्या ड्रेनेज मॅनहोलपर्यंत पोचणं शक्य होतं. मॅनहोलच्या
समोरच्या गार्ड टॉवरच्या मध्ये एक भलंथोरलं अशोकाचं झाड वाढलेलं होतं आणि
तुरूंगाच्या प्रशासनाच्या ते कापण्यातल्या दिरंगाईमुळे मॅनहोलपासून ते
वर्कशॉपपर्यंत ब्लाईंड स्पॉट निर्माण झालेला होता. पण
भिंतीपर्यंत पोचणं अशक्यच असल्यामुळे कुणी ते झाड तोडण्याची घाई करत नव्हतं.
प्रार्थनेच्या वेळेमध्ये तंबूच्या मागे असणारा वर्कशॉप बंद
करून सगळेजण मोकळा वेळ किंवा प्रार्थनेसाठी येत असत. बबन
आणि म्हमद्या दोघेही वर्कशॉपमध्ये कामाला होते. त्यामुळे
त्यांनी थोडावेळ मागे रेंगाळायचं ठरलं.
बरोबर भोंगा होण्याच्या पाच मिनिटं आधी वल्लभ आणि पुराणिक
भगदाडातून पलिकडे गेले आणि स्युएजमधून नाक धरून कसेबसे मॅनहोलपर्यंत पोचले आणि
भोंगा होण्याची वाट पाहू लागले. ते
पोचताच भोंगा झाला आणि वरून पावलांचा आवाज येऊ लागला. आतला
वास असह्य होत होता. कशीबशी
त्यांनी दहा मिनिटं काढली आणि मॅनहोलचं झाकण उघडलं गेलं. पलिकडे
म्हमद्या आणि बबन होते. त्यांनी
त्यांना हाताला धरून बाहेर काढलं आणि ते चौघे वर्कशॉपमध्ये गेले आणि ठरल्याप्रमाणे
शिडी आणि एक दोर घेऊन बाहेर आले.
आता ते तंबूकडे पाहू लागले.
तो सगळेजण जमा झाल्यावर हळूहळू चालत प्रार्थनेसाठी पोचला. तंबूत नेहमीप्रमाणेच थोडासा गोंधळ माजलेला होता. तो चटई आणायच्या मिषानं तंबूच्या मागच्या बाजूला ठेवलेल्या
चटयांच्या ढिगाकडे गेला आणि कुणाचं लक्ष नाही पाहून तंबूचं कापड उचलून त्यानं
पलिकडे पाहिलं. त्याचा अंदाज बरोबर होता. तिथला गार्ड कामाला कंटाळलेला होता. तो
शांतचित्तानं चहा पित होता. प्रार्थना
सुरू झाल्याबरोबर त्याची ड्यूटी बदलत असे आणि तो नवा गार्ड यायच्या आधीच खाली उतरत
असे. त्याप्रमाणे तो खाली उतरू लागल्याबरोबर
तो तंबूच्या मागून बाहेर आला आणि त्यानं बाकी चौघांना खूण केली. ते शिडी आणि दोरी घेऊन टॉवरच्या बरोबर समोर भिंतीपर्यंत पोचले. आता त्यांना थोडा वेळ होता. त्याप्रमाणे
त्यांनी शिडी लावली. ती
अर्थातच अर्धीच होती. त्यावर
टोकाला चढून त्यानं हूक बांधलेला दोर टॉवरवर भिरकावला. पहिला
गार्ड उतरून दुसरा चढला नसला तरच धडगत होती. पण
तो वेगानं वर चढला आणि सगळं ठीक असल्याची खूण केली. त्याबरोबर
बाकीचे तिघेही एक एक करून पाच मिनिटांत वर आले. अजूनही
दुसरा गार्ड वर आलेला नव्हता. त्यांच्याकडे
फक्त दोन मिनिटं होती. म्हमद्या
तंबूच्या मागच्या बाजूस जाऊन ह्यांच्या दिशेनं पाहत उभा राहिला. त्याच्या सुटकेसाठी जास्त दिवस नसल्यानं तो आतच थांबून
डिस्ट्रॅक्शन करणार होता. त्याच्या
घरी पैसे पोचले होते.
"इलेक्ट्रिसिटी
डिसेबल केली का?" त्यानं
वल्लभला विचारलं.
खालच्या ड्रेनेज सिस्टममध्येच कुंपणाच्या इलेक्ट्रिसिटीचा
स्विच असल्याची माहिती बबननं काढली होती. "होय. केलाय."
त्याबरोबर त्यानं खिशातून पुराणिकला आणायला सांगितलेलं लाल
फडकं कुंपणावर टाकलं. तशी
समोरून झरझरत एक तार आली आणि बरोब्बर कुंपणाच्या तारेला अडकली. आणि त्यावरून सरसरत काही सेकंदांतच ती आली. म्हमद्या अजूनी खुणेची वाट पाहत होता.
"ही
इथे का आली? अरे गार्ड येईल ना. आपल्याला तिथे जायचं ठरलं होतं ना?"
बबन म्हणाला.
"होय
रे हे काय केलंस तू?" पुराणिक
आणि वल्लभलाही काही कळेना झालं.
"गार्ड
येणार नाही इतक्यात वर." तो
बबनकडे पाहत म्हणाला.
"म्हणजे?" पुराणिकनं विचारलं.
त्यानं तिच्यासमोर हात केला आणि तू त्याच्याकडे भांबावून पाहत
राहिली.
"बंदूक." तो म्हणाल्यावर तिनं एकदम चाचपडून
बंदूक काढून दिली.
त्यानं सायलेन्सर चेक केला आणि बबनला गोळी घातली आणि त्याच्या
तोंडावर हात ठेवून त्याची किंकाळी दाबली.
आता सगळेच स्तब्ध झाले होते.
"बबन
त्याच लोकांचा माणूस आहे जे माझ्याशी खेळले आणि ह्यांच्या नवर्याचा ज्यानं खून
केला. आपल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी पोस्ट
ऑफिसच्या खाली त्यांची माणसं ठेवली आहेत. आपण
इथून पळून तिथे पोचलो की तिथे आपल्या सर्वांना ते मारणार आणि पळताना मारलं म्हणून
डिक्लेअर करणार."
"मग
इथपर्यंत तरी का आलोय आपण?"
"बबन. तो इथनं पळून जाणार आहे." असं
म्हणून त्यानं पलिकडच्या कुंपणावर उडी मारली आणि हातातला दोर खाली सोडला. पलिकडे बरोबर खाली एक ट्रक उभा होता.
त्यानं चटकन बाकी सर्वांना अर्धं दोरावरून नंतर उड्या मारून
ट्रकमध्ये उतरवलं आणि तेच ओलं लाल फडकं आतल्या भिंतीपलिकडे फेकलं. त्याबरोबर म्हमद्या तंबूत शिरला आणि एकदम चक्कर येऊन पडल्याचं
नाटक करू लागला. इथे तोदेखील ट्रकमध्ये
उतरला आणि ते सगळेचजण पुण्याच्या दिशेनं निघाले. ट्रकमध्येच
त्यांनी तिनं आणलेले कपडे घातले आणि पुण्यात पोचताच ट्रक सोडून पायी चालत वेगवेगळे
निघाले. वल्लभला त्यांनी पुढच्या प्लॅनमध्ये
समाविष्ट ठेवलेलं नव्हतं. ते
तिघे पुराणिकनं ठरवलेल्या जागी पोचले.
पुराणिकनं त्यांच्यासाठी कार्ड तयार ठेवलेली होती.
"नरेंद्र
विजयकांत हजारे आणि रेखा नरेंद्र हजारे." पुराणिक
हसत ती कार्ड त्यांना देत म्हणाला.
"नवरा-बायको?" ती
आश्चर्यानं म्हणाली.
"ते
योग्य कव्हर आहे कारण आपल्याला एकत्र राहावं लागेल. नवरा-बायको म्हटल्यावर जास्त संशयानं किंवा तिरस्कारानं कुणी वागत
नाही." नरेंद्र तिला म्हणाला.
"ह्म्म. मग आता अहो-जाहो
बंद करावं लागेल आपल्याला." ती
तिचं कार्ड पाहत म्हणाली, "कॅरॅक्टर
हिस्टरी असेल ना काहीतरी?"
"ही
घ्या. गेली वर्षानुवर्षं इमानेइतबारे ह्या
आणि अशा अनेक नावांचे सगळे रेकॉर्ड्स बनवतो आहे मी. सरकारी
आणि इतर अनेक कागदोपत्री ही खरीखुरी माणसं आहेत. टॅक्स
भरतात, बिझनेस करतात.
हे घ्या सगळे रेकॉर्ड्स." पुराणिक
डोळा मारत म्हणाला.
"हा
देशातला एक आघाडीचा कॉनमॅन आहे." नरेंद्र
त्याच्याकडे पाहून म्हणाला.
"माहित
आहे ते मला. त्यांच्यामार्फतच मी
तुमच्या आय मीन तुझ्यापर्यंत पोचले. त्यांची
तुझ्याशी जवळिक पाहिली नसती, तर
तुझ्यापर्यंत पोचणं अवघडच होतं."
"पण
मी जेलमध्ये वेडा असल्याचं भासवत होतो, ते
तुमच्या कसं लक्षात आलं?" पुराणिक
म्हणाला.
"मी
वकील आहे. तेव्हढं मला लगेच कळतं."
"बरं, शिळोप्याच्या गप्पा खूप झाल्या. मी
मागितलेलं सामान आणि पैसे?"
पुराणिकनं दोन सूटकेसेस कोपर्यात होत्या त्याकडे बोट दाखवलं.
"कोण
आहे तुमचा एव्हढा विश्वासू माणूस?" रेखानं
आश्चर्यानं विचारलं.
त्यावर पुराणिक फक्त हसला.
"आता
ह्यापुढे कदाचित आपली भेट पुन्हा व्हायची नाही." नरेंद्र
नेहमीसारखाच कोर्या चेहर्यानं म्हणाला.
"तुला
माझ्याकडे परत यावंच लागेल मित्रा." पुराणिक
हसत म्हणाला.
त्यानं नरेंद्रला मिठी मारली आणि नरेंद्र-रेखा सूटकेसेस घेऊन तिथनं बाहेर पडले.
"मूर्खांना
छोट्या बॅगा म्हणजे काय ते ही कळत नाही." नरेंद्र
त्याच्या टिपिकल टोनमध्ये म्हणाला. रेखा
त्याच्याकडे पाहतच राहिली. "आधी
नव्या बॅगा घेऊया आणि मग पुण्यातच पहिलं एक काम आहे ते करूयात."
"मग
त्यानंतर?"
"पुढचा
टप्पा इंदूर. तुम्हाला सापडलेल्या
डायरीतल्या पानांनुसार."
"माझ्या
नवर्याला सापडलेल्या."
"तेच
ते."
-----
"आपल्याला
सगळी माहिती त्यांच्या भावाकडून मिळणार आहे ना? कुठे
आणि कधी भेटणार आहे तो आपल्याला?" रेखा
त्याच्या कुशीत शिरत म्हणाली.
"उद्या
सकाळी आपल्याला हॉस्पिटलला जायचंय." तो
तिच्या केसांतनं हात फिरवत म्हणाला.
"हॉस्पिटल?"
"तो
एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. त्याला
वारंवार हॉस्पिटलमध्ये औषधं आणायला जावं लागतं. तर
तो तिथेच धंद्याचं काम करतो, कुणाला
संशय येत नाही." नरेंद्र
नेहमीच्याच सहजपणानं म्हणाला.
"पण
मग.."
"नाही. तो मरणार नाहीये इतक्यात."
ती काहीच बोलली नाही.
-----
रमेश तो कागद पुनःपुन्हा वाचत होता. त्यामध्ये
उत्तमराव बेळे-पाटील, ऍडव्होकेट वर्तक, ऍडव्होकेट
शर्मा, ए.बी. महातो, एसीपी
कोल्हे आणि इतर काही नावं होती. त्याच्या
पोलिसी डोक्याप्रमाणे ती हवाला डायरीतली लिस्ट वाटत होती.
आणि त्यातले चार जण रतननं यमसदनी पाठवलेले होते आणि एकाला
रमेशनं. ती नक्की काय लिस्ट होती ह्या विचारानं
त्याचं डोकं भणाणून गेलं.
'पुराणिकच्या
सांगण्यानुसार रतन मुंबईत होता, त्याअर्थी
त्याचं टारगेट मुंबईतलंच असणार. त्याच्याकडे
वेळ फार कमी होता. जर
रतन मुंबईतलं काम करून निघून गेला तर मग त्याला ट्रॅक करणं अवघड होईल.' असा विचार करतच त्यानं दुबईतनंच शिंदेंना फोन केला आणि
लिस्टमधल्या उर्वरित लोकांची माहिती काढायला सांगितली. तो
विमान लँड होण्याची वाट पाहू लागला.
-----
"नमस्कार
जोगसाहेब. आमच्यासाठी काहीतरी आहे म्हणे
तुमच्याकडे." नरेंद्र
थोड्याशा मोठ्या आवाजात म्हणाल्यावर कोपर्यातल्या टेबलावर नर्ससमोर बसून गप्पा
मारणार्या माणसानं त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं.
"पुराणिकचा
भाऊ जोग कसा?" रेखानं
हळूच नरेंद्रला विचारलं.
"तरच
ते व्यवस्थित काम करू शकतील ना." तो
हळूच म्हणाला आणि जोगकडे वळला.
जोगनं त्याला एक छोटीशी वही दिली. नरेंद्रनं
ते खिशात टाकलं आणि जायला वळला एव्हढ्यात जोग त्याला म्हणाला, "तुझे आई-वडील
पलिकडच्याच वॉर्डमध्ये आहेत. बघणारपण
नाहीस काय?"
"काय?" रेखाचे एकदम डोळे विस्फारले.
नरेंद्रला तो संवाद नको होता. पण
जोग बोलतच राहिला. "होय. त्याची आई ब्लडप्रेशरमुळे बरीच आजारी असते. आता ती ऍडमिटच आहे. त्यामुळे
बाबादेखील जवळपास अख्खा दिवस तिथेच असतात."
-----
"ओके. थँक्स." एव्हढं
म्हणून नरेंद्र रेखाचा हात धरून वळला आणि ते दोघे हॉस्पिटलच्या बाहेर पडले.
"अरे
असं काय करतोस? आणि त्याला कसं माहित रे
तू कोण आहेस?"
"मी
माझं सरकारी आयडी बनवलेलं होतं. मी
जेव्हा नक्षल्यांसोबत होतो, तेव्हा
पुराणिक कामाचा माणूस आहे हे मला कळलं होतं. त्याला
अन त्याच्या ह्या भावालाच मी माझे सरकारी रेकॉर्ड्समधले डिटेल्स बदलायला सांगितले
होते. त्यामुळे त्यां दोघांना माझी अख्खी
कुंडली ठाऊक आहे." असं
म्हणत तो बस स्टॉपकडे निघाला.
"अरे
पण तरी आई-वडलांना नाही भेटणार तू? त्यांचे असे किती दिवस उरले असतील?"
"त्यांच्यावर
नजर असेल."
"म्हणजे?"
"ते
दोघे मला तुरूंगात भेटायला आले होते. मी
ओळख दाखवली नाही आणि ते परत गेले. पण
त्या लोकांना संशय तर आलाच असणार. त्यामुळे
ते त्या दोघांवर नजर ठेवून असतील, मी
भेटायला गेलो किंवा भेटून गेल्याचं कळलं जरी, तरी
त्यांना ओलिस धरून मला ब्लॅकमेल करायला ते पुढेमागे पाहणार नाहीत. मी त्यांच्यापासून दूर आहे तेच चांगलं आहे."
"पण त्यांना
एकदाही भेटणार नाहीस? शेवटचा
पण नाही?"
"मी
माझा शेवटचा कॉल त्यांना एकदा केला होता." बोलताना
त्याचा आवाज थोडासा बदलला, "चल
आता लवकर घरी. आपल्याला आज रात्रीच
लखनौला जायला निघायचंय. त्याची
तयारी सुरू कर. मी एक काम करून येईन
रात्रीपर्यंत."
-----
रमेश मुंबईला उतरेपर्यंत संध्याकाळ झाली होती. शिंदेंकडून त्यांना मुंबईतलं एकच टारगेट वॉर्ड ऑफिसर
एलकुंचवार अजून ठीकठाक असल्याचा रिपोर्ट आला होता. रमेशनं
तिथे स्वतः शिंदेंना जाऊन घरावर नजर ठेवायला सांगितलं होतं. बाकी काहीही पाठवून त्यांला रतन हातचा घालवायचा नव्हता.
तो तिथे पोचला आणि त्यानं शिंदेंना सापडलेल्या दुसर्या लीडवर
फॉलो-अप घ्यायला पाठवून दिलं. आणि तो स्वतः समोरच्या इमारतीतून घरावर नजर ठेवून वाट पाहत
राहिला. त्या इमारतीतून एलकुंचवारांच्या
घराच्या चारही खोल्या दिसत होत्या.
सुमारे अर्ध्या तासानं एलकुंचवार सोफ्यावरून उठले आणि
बाथरूममध्ये शिरले. बाथरूमच्या
खिडकीतून काहीही दिसत नव्हतं. पाच
मिनिटं झाल्यावर रमेशला संशय येऊ लागला. त्यानं
इमारतीवर नजर फिरवली आणि त्याच्या लक्षात आलं की वरचा फ्लॅट बंद आहे. त्याची ट्यूब पेटली आणि तो धावतच एलकुंचवारांच्या घरी पोचला. त्यानं दरवाजा तोडला आणि तो आत शिरला.
घरी अजून कुणीच नव्हतं आणि बाथरूमचा दरवाजा अजूनही बंदच होता. त्यानं तो दरवाजा तोडला आणि आतमध्ये बाथटबमध्ये एलकुंचवार
फक्त अंतर्वस्त्रांवर पडलेले होते आणि हेअरड्रायरदेखील त्याच पाण्यात होता. 'ऍक्सिडेंट! व्हेरी
क्लेव्हर.' तो मनाशीच म्हणाला आणि
त्यानं बुटानं हेअर ड्रायरचा सप्लाय काढून टाकला. पटकन
त्यांची नस चेक केली. त्यांचे
प्राण गेलेले होते. त्यानं
बाथरूमवरचं नुसत्या प्लेट्सचं सिलिंग उघडलं आणि त्यातनं तो पाईपलाईन्ससाठीच्या
भागात शिरला. खिशातून टॉर्च काढून तो
पाहू लागला. एका हातात गन होती. त्यामध्ये त्याला सरपटल्याच्या खुणा दिसल्या. त्यांचा माग काढत तो निघाला. एका
ठिकाणी तो थांबला आणि त्यानं वर पाहिलं आणि जोरात धक्का दिला. त्याबरोबर वरची टाईल हलली आणि त्यावरच्या कारपेटमुळे परत तशीच
बसली. त्यानं जोर लावून कारपेटसकट टाईल उचलली
आणि पटकन वर आला. समोर त्याच्यावर बंदूक
रोखून नरेंद्र उभा होता.
-----
रेखा सामान आवरत होती. पण
तिच्या डोक्यातून नरेंद्रच्या आईवडिलांचा विचार काही केल्या जात नव्हता. ती आपलं मागचं आयुष्य मागेच सोडून आली होती. स्वतःच्या पासपोर्टवर एका गरजू मुलीला लॉन टर्म व्हिजावर तिनं
टर्कीला पाठवून दिलं होतं आणि स्वतःची ओळख मिटवून टाकली होती. पण तिला कधीच वाटलं नव्हतं की तिला पुन्हा एकदा आयुष्य
नव्यानं सुरू करावंसं वाटेल. आता
तिला तसं वाटत होतं. ते
नातं तिला परत सापडलं होतं. पण
तिला नरेंद्रला पुन्हा माणसांत आणावंसं वाटत होतं. तिला
त्याच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. तो
भेटू शकत नसला तरी काय झालं. ती
तर भेटू शकत होती त्यांना. असा
विचार करून ती हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली. जोगलाच
विचारून ती एकदा त्याच्या आई-वडलांना
भेटणार होती. त्यांना तो ठीक आहे आणि
आपल्याबरोबर आहे हे सांगणार होती. त्यांना
आणि तिलाही खूप समाधान वाटणार होतं. एक
नातं गवसणार होतं.
-----
रमेशनं क्षणार्धातच गोळी चालवली. नरेंद्रनं
ती चुकवली पण मग अजून गोळ्या चालू नयेत ह्यासाठी रमेशनं त्याच्यावर झडप घातली. तीदेखील नरेंद्रनं शिताफीनं चुकवली. अजून
थोडावेळ त्यांची झटापट चालली पण इरेला पेटलेल्या रमेशनं नरेंद्रला काबूत आणलं. त्याच घरातल्या चादरी घेऊन त्यानं नरेंद्रला एका खुर्चीला
बांधलं.
"मी
पुराणिकला म्हणालो होतो. जो
तुझ्यापर्यंत पोचू शकतो, तो
माझ्यापर्यंत पोचलाच पाहिजे. मी
बरोबर होतो." नरेंद्र
म्हणाला.
"मी
तुला गाठलं, त्याचं श्रेयही तूच
घेणार का?"
"नाही
साहेब. पुराणिक जिवंत राहावा ह्यासाठीच मी
त्याला हे बोललो. कारण त्यानं प्राण
जाईस्तो माझा पत्ता तुम्हाला दिला नसता."
"बडबड
बंद कर आणि तुझे सगळे गुन्हे कबूल कर."
"गुन्हे
कबूल करून काय होणार आहे?"
"तू
माझ्या बहिणीला मारलंयस."
"काय? कधी?"
"आठ
वर्षांपूर्वी. नाशिकच्या एका स्थानिक
पेपरातली वार्ताहर होती ती. तिनं
गडचिरोलीत जाऊन तिथल्या नक्षलवाद्यांच्या भयानक कृत्यांवर संशोधन करून मोठी
लेखमाला लिहिली होती. जी
अनेक मोठ्या पेपरांतही छापून आली. आणि
त्यानंतर एक दिवस तिची निर्घृण हत्या केली गेली. तिचं
तिच्या पेपरातल्याच संपादकासोबत अफेअर असल्याची वावडी उठवली गेली आणि तो संपादकही
परागंदा झाला."
"आठ
वर्षांपूर्वी मी नक्षलवादी नव्हतो साहेब." नरेंद्र
त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला, "मी
तेव्हा विवेक जोगळेकर होतो."
"म्हणजे
त्या तुरूंगात भेटायला आलेल्या दांपत्याचा मुलगा? चांगला
तयारीचा आहेस खोटं बोलण्यात."
"आता
काय बोलू साहेब मी. पुरावा
देऊ शकत नाही मी. पण मी इथे बसून माझ्या
बाकी सगळ्या खुनांची कबूली देऊ शकतो तर त्याच एका का नाही.
बंदूक तुमच्या हातात आहे. मी
बांधलेला आहे."
"तुझ्या
बॉस लोकांपर्यंत पोचायचंय मला."
"माझ्या
कुणापर्यंत?"
"तुला
गोळी घालायला मला फारसा वेळ लागणार नाही. दुसर्यांदा
तेच काम करताना अशीही हातात सफाई येते."
"दुसर्यांदा? तुमच्या माझ्याइतक्याच वयाकडे पाहून तुम्ही पहिल्यांदाच गोळी
चालवली असेल असं वाटत नाही. आय
मीन, तुम्ही एकापेक्षा जास्त मारले असतील
असं वाटलेलं मला."
"मी
खूप गुन्हेगारांना मारलंय."
"मग
हा 'पहिल्यांदा' जो
म्हणालात, तो गुन्हेगार नव्हता का?"
"नाही. तो पोलिस ऑफिसर होता."
"एक
मिनिट. म्हणजे मग मी गुन्हेगार नाहीये का? सॉरी तुम्हाला कन्फ्युज करायचं नाहीये मला, पण मीच गोंधळलोय."
"मी
आधीही बर्याच गुन्हेगारांना मारलंय, त्यांचा
गुन्हा मी सिद्ध केला होता."
"मग
पोलिसाला कशाला मारलंत?"
"त्यानं
एका निरपराध पत्रकाराचा खून केला होता."
"मग
गुन्हा सिद्ध नाही झाला असं कसं म्हणता?"
"म्हणजे
मी अंधारात गोळीचा आवाज ऐकला आणि त्याला तिथून धावताना पाहिलं आणि तिथे अजून कुणीच
नव्हतं."
"पण
मग फरक काय पडतो?"
"फरक
हा पडतो की मी आधी जितक्यांना मारलंय, त्यांचे
गुन्हे माझ्यासमोर होते."
"त्यामुळे
त्यांना मारणं जस्टिफाय करता येतं?"
"होय."
"मग
मला मारणं कसं जस्टिफाय करणार?"
"तू
१०० लोकांना मारल्याचे पुरावे आहेत."
"१००?? जास्त होतंय साहेब." मग
थोडा विचार करून नरेंद्र पुढे म्हणाला, "५०
असेल."
"पण
तरी तुम्ही अगदी सगळेच गुन्हे डोळ्यासमोर घडताना थोडीच पाहत असाल."
"पोलिसाला
मारलं तेव्हा मी पूर्णपणे अलिप्त नव्हतो. माझ्या
तसं करण्यामागे काही वैयक्तिक कारणंही असावीत असं मला वाटतं."
"तो
पत्रकार.."
"ती."
"ओके, ती पत्रकार तुमची कुणी.."
"डझन्ट
मॅटर. मी जे केलं ते योग्य नव्हतं."
"योग्य-अयोग्य असं काही नसतं साहेब."
रमेश नरेंद्रकडे पाहू लागला. नरेंद्र
पुढे म्हणाला, "कायदेशीर-बेकायदेशीर, आनंदी-दुःखी असू शकतं, पण
योग्य-अयोग्य असं काही नसतं. गोष्टी फक्त घडतात. लोक
मरतात. कधी आपण साधन असतो, कधी कारण तर कधी फक्त बघे."
"फार
तत्वज्ञान झाडतोयस, हात
बांधलेत तर. मला माझ्या वरिष्ठांनी
सांगितलंय की तूच माझ्या बहिणीला मारलंस म्हणून सगळं व्यवस्थित सांग नाहीतर गोळी
घालेन मी."
"पण
मी तुम्हाला सांगतोय की तो मी नव्हेच. मी
तेव्हा गुन्हेगारच नव्हतो."
"म्हणजे
तू आता गुन्हेगार आहेस हे तू मान्य करतोस."
"हो, पण माझा गुन्हा तुमच्यासमोर सिद्ध झालेला नाही."
"डझन्ट
मॅटर तुला मी वैयक्तिक आकसातून मारू शकतो."
"पण
ते अयोग्य ठरेल."
"तूच
म्हणतोस ना योग्य-अयोग्य नसतं म्हणून.."
"हो
पण कायदेशीर-बेकायदेशीर आणि आनंदी-दुःखी असतं."
"बरं
ठीक आहे ना मग. मी बेकायदेशीर वागेन पण
तुला गोळी घालून मला आनंदच होईल."
"ओह्ह. गोळी घालून आनंद होईल. चांगलं
आहे. दॅट मेक्स यू अ सायकोपॅथ."
"अच्छा
तर आता १०० खून केलेला माणूस मला सायकोपॅथ म्हणतोय."
"१००?"
"बरं
५०."
"पण
मला कुणाला मारल्यावर आनंद होत नाही साहेब. दॅट्स
सायकोपॅथिक. मला काहीच वाटत नाही. रितेपण. दॅट्स
डिफरंट."
"अच्छा
अच्छा. मग क्लिनिकल डिप्रेशन असेल का?" रमेश खोचकपणे म्हणाला.
"लेट्स
कट द क्रॅप ऑफिसर. विषयाभोवती
फिरणं बंद करूयात का?"
"तत्वज्ञान
कोण शिकवत होतं?"
"तुमचा
वापर केला जातोय."
"मला
तेच जाणून घ्यायचंय की कोण माझा वापर करून घेतंय?"
"म्हणजे?"
"मला
त्या माणसांपर्यंत पोचायचंय."
"एक
मिनिट. तुम्हाला ऑर्डर्स जे लोक देतात, ते कोण आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही."
"मला
वाटतं तुला जास्त ठाऊक असेल कारण तू त्यांचा खास आहेस."
"खास
तर तुम्हीही आहात हो त्यांचे."
"जास्त
शहाणपणा करू नकोस. खुर्चीला
बांधलेला तू आहेस."
"ह्म्म." नरेंद्रनं एक दीर्घ निश्वास सोडला. "तुम्हीदेखील एक प्यादेच, ज्याला वजिराची कत्तल करायचीय."
"मला
वाटतं ती कायदेशीर चाल आहे."
"होय. पण गंमत ही आहे, की
ह्या खेळामध्ये वजिर नाहीये, राजा
नाहीये. फक्त सैन्य आहे आणि सैन्याला माहित
नाही की त्यांच्या चाली कोण खेळतं."
"म्हणजे?"
"माझ्या
शर्टाच्या खिशात एक छोटीशी वही आहे ती काढा."
रमेशनं बंदूक तशीच धरून ती वही बाहेर काढली. आणि त्याची पानं पलटू लागला. पहिल्या
पानावर उत्तमराव बेळे-पाटील, शर्मा, वर्तक, महातो, कोल्हे, एलकुंचवार, कुणीतरी
पाटील, नेने, सुकेरकर
अशी नावं होती. दुसर्यापानावर
एलकुंचवारचं परत नाव, पुन्हा
एकदा पाटील मग अजून पाच-सहा
वेगवेगळी नावं होती. त्यानं
खिशातला पेपर बाहेर काढला आणि पहिल्या पानासोबत कंपेअर केला.
"तो
पेपर मला वर्तककडे मिळाला आणि महातोकडून मी तो डिकोड करून घेतला." नरेंद्र म्हणाला.
"काय
आहे हे? हवाला?"
"एक्झॅक्टली."
"पण
ही बाकीची पानं कशी मिळाली तुला."
"त्यालोकांची
इल्लिगल पैशांची कामं करणारी माणसं तीच असतात जी पूर्वी आमचीही कामं करायची."
"म्हणजे
नक्षलवाद्यांची? म्हणजे पुराणिक?"
"बरोबर."
"पण
म्हणजे ह्यातलं कोण?"
"ह्यातलं
कुणी एक नाही साहेब, सगळेच."
"पण
मग?"
"हे
एक जाळं आहे साहेब. सहा-सात जणांचं एक नेटवर्क, त्यातल्या
एका-दोघांची आणखी वेगवेगळी नेटवर्क्स, मग त्यातल्या दोघा-तिघांची
अजून वेगळी. हे सगळे काळ्यापैशाचे
व्यवहार करतात. आणि काळा पैसा म्हटला की
नक्षलवाद्यांचा पैसा, टेररिस्टांचा, आयएसआयचा पैसा त्यातच येतो. हे
सगळेच एकमेकांसोबत व्यवहार करतात. हा
व्यवहार आहे. इथे गद्दारी, देशाभिमान वगैरे गोष्टी नसतात. निष्पाप
जीवांची काळजी नसते. त्या
त्या वेळी, ती ती कामगिरी एव्हढंच
फक्त. मग त्यासाठी पैसा कुठूनही कुठेही फिरतो. मुंबईतल्या कट्टर पार्ट्यांकडून पूर्व भारतातल्या
नक्षलवाद्यांपर्यंत पोचतो. सत्ताधारी
पक्षाकडून आयएसआयकडे जातो. सीआयएकडून
सत्ताधारी पक्षाकडे आणि चीनकडून विरोधी पक्षाकडे, तिथून
माओवादी, नक्षलवाद्यांकडे आणि तिथून पुन्हा
आयएसआय, उल्फा मार्फत सत्ताधार्यांकडे."
रमेश अविश्वासानंच त्या वहीची पानं उलटत होता. काही काही पानं ओळखीची दिसत होती.
"हे
पैसे ज्या कामांसाठी फिरतात ती कामं करणार्यांना बरेचदा माहितही नसतं की आपण
नक्की काय करतोय आणि कुणासाठी काम करतोय. परदेशी
चलन बँकेखेरीज बाहेरून बदलून घेणार्याला कल्पना नसते की ते पुढे कुठे जाणार. त्याला बदलून देणार्यालाही त्या पैशांचं शेवटचं स्थळ ठाऊक
नसतं. ते कुठेही रेकॉर्ड नसलेलं परकीय चलन
टेररिस्टांच्या हातात पडतं. मग
त्यातनंच गोळ्या बनतात आणि त्या ते मुळात बदलून घेणार्याचाच जीव घेतात.
एक छोटीशी फाईल १०० रूपयांची लाच खाऊन हलवणार्या प्यूनला माहित नसतं की तो किती मोठ्या जमीन घोटाळ्याला हातभार लावतोय. तो घोटाळा करणार्या मंत्र्याला माहित नसतं की बिल्डर कुणाचे पैसे त्याला आणून देतोय. बिल्डरला माहित नसतं की त्याच्या फायनान्सरचा पैशांचा स्रोत काय आहे. तो स्रोत असतो अशाच इतर दोन नंबरचे धंदे करणार्या बिल्डर्सकडून आणलेले देशाबाहेर बसलेल्या गुंडांकडचे खंडणीचे पैसे, जे त्या बिल्डर्सनी धाकदपटशानं छोट्या घरमालकांची घरं स्वस्तात विकत घेऊन कमावलेले असतात. मी कित्येक लोकांना केवळ सामान्य गावकर्
यांची पिळवणूक करणारे म्हणून मारलं
पण मी नक्की
कुणासाठी काम करत
होतो हे मला
आजही ठाऊक नाही.
तुम्ही माझा पाठलाग केलात,
एका त्यांच्यातल्याच भ्रष्ट पोलिसाला मारलंत पण कुणासाठी ते तुम्हालाही ठाऊक नाही.
ही पद्धत
आहे ह्या नेटवर्कची.
कम्युनिस्ट पार्टीसारखं काम
चालतं ह्या नेटवर्कचं.
कुणीही डोईजड आणि
निरूपयोगी होऊ लागला
की त्याला संपवायचं.
सगळं एकमेकांत इतकं गुंतलेलं आहे की शत्रू नक्की कोण आहे तेच कळायला मार्ग नाही." नरेंद्र बोलतच होता.
"मला कर्नल नामक एका माणसानं बरीच माहिती दिली होती."
"अहो त्या लिस्टमध्ये कर्नलही असतील आणि जनरलही."
"एक तुकडा तुम्ही शोधलात. एक तुकडा विराजनं शोधला आणि काही तुकडे मी जोडून हे एक चित्र बनवलंय. पण हे सुद्धा संपूर्ण चित्र असेलच असं नाही. ह्या लिस्टमध्ये प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश, सरकारी वकिल, बचाव वकील, अकांऊंटंट्स, मुद्रांक अधिकारी, पोलिस, राजकारणी, पत्रकार, गुन्हेगार सगळेच आहेत. आणि अशीच अजून अनेक नेटवर्क्स अस्तित्वात असतील."
रमेश अविश्वासानं पानं उलटत होता. "पण कुठंतरी चांगले लोक असतीलच ना?"
"असतील ना. म्हणून तर अजून अराजक माजलेलं नाही. पण कोण चांगलं आणि कोण वाईट हे कोण आणि कसं ठरवणार?"
"सुभानराव
बेळे-पाटील." रमेशनं
मधल्याच एका पानावर नाव वाचलं.
"होय. उत्तमरावांचा पुतणा."
"तरीच."
"तरीच
काय?"
"तुला
भेटायला जेलमध्ये त्याची मैत्रीण आली होती. अन
तू त्याच्या सख्ख्या काकाचा खुनी असून. म्हणजे
स्वतःच्या काकाच्या खुनात.."
"तोच
निवडून आला ना सीटवर."
रमेश विषण्णपणे पानं उलटत होता.
आणि अचानक दाराबाहेर कसली तरी चाहूल लागली. रमेश दबकत दारापाशी गेला आणि फटीतून पाहिलं तर बाहेर शिंदे
होते. त्यानं दरवाजा उघडून शिंदेंना आत घेतलं.
"खाली
बाथरूमचं सिलिंग उखडलेलं दिसलं म्हणून वरच्या फ्लॅटचा संशय आला मला." बोलतानाच शिंदेंच लक्ष नरेंद्रकडे गेलं, "रतन सहदेव!"
ते एकदम म्हणाले.
"त्याच्या
म्हणण्याप्रमाणे विवेक जोगळेकर. आणि
खिशातल्या आयकार्डाप्रमाणे नरेंद्र हजारे." रमेश
वहीची पानं उलटत म्हणाला.
"हे
काय आहे?"
"हे
आपले सगळे शत्रू किंवा माझे सगळे बॉस." रमेश
खिन्नपणे म्हणाला.
"साहेब. ह्याची ऍकॉम्प्लिसपण पकडली गेलीय. तेच
सांगायला आलो मी इथे. तुमचं
नेटवर्क येईना म्हणून सिन्नरकरांना फोन केला. त्यांनी
मला थेट तुमच्याकडे जायला सांगितलं."
"काय?" नरेंद्र जागच्याजागीच उडाला, "कोण पकडलं गेलं?"
"सायली
सरपोतदार." शिंदे म्हणाले.
"कसं
पण?"
"मला
माझ्या खबर्यांमार्फत पुराणिकच्या भावाचं काम कुठून चालतं ते कळलं होतं. त्यानुसार मी हॉस्पिटलवर गेलो. तर
तिथे त्याला भेटायला ती स्वतःच आली."
नरेंद्र हताश झाला. "ती
माझ्या आई-वडलांना भेटायला गेली असणार." आणि त्यानं हातांची हालचाल सुरू केली.
"हलू
नकोस." शिंदे म्हणाले. तेव्हढ्यात रमेश जवळपास ओरडलाच,
"शिंदे!"
"काय
झालं साहेब?"
रमेशनं वहीचं शेवटून दुसरं पान त्यांना दाखवलं.
"सिन्नरकर?" शिंदे घाबरतच म्हणाले.
"काय? आणि तुम्ही त्याला तिचा पत्ता दिलात?
ती माझ्या आई-वडलांना
भेटायला गेलीय. सगळंच संपलं आता. आणि तुम्ही इथे येताय हे त्यांना ठाऊक आहे. त्यांना मला पकडायसाठीचं लिव्हरेज मिळालंय आता ते तुम्हा
दोघांना संपवायला इथे येतच असतील आणि फुकटात मीसुद्धा त्यांना इथे सापडेन." असं म्हणतच नरेंद्रनं हात सोडवले. आणि उठून उभा राहिला. रमेश
अजूनही स्तंभितच झाला होता. प्रत्येक
पावलावर सिन्नरकरांनी कसं त्याला बेमालूमपणे स्वतःच्या दिशेनं पुढे केलं होतं हे
त्याच्या लक्षात येऊ लागलं. तोवर
नरेंद्रनं जमिनीवर पडलेली बंदूक उचलली. शिंदेंनीही
बंदूक ताणली.
"आता
एकमेकांविरूद्ध नव्हे एकत्र लढावं लागणार आहे." नरेंद्र
म्हणाला आणि बाहेर सायरन वाजू लागले.
रमेशनं शिंदेंकडे पाहून मान डोलावली आणि डायरी खिशात ठेवून
बंदूक चेक केली.
"पण
आपण पोलिस आहोत साहेब. पोलिस
आपल्याला कशाला मारतील?"
"तुम्ही
पोलिस आहात शिंदे. तुम्ही
जा इथून."
"पण
साहेब?"
"नंतरचं
नंतर बघू. आत्ता तुम्ही सहज बाहेर पडू शकता. तुमचं कुटुंब आहे शिंदे. विचार
करू नका."
"ठीक
आहे मी त्यांना डिस्ट्रॅक्ट करतो."
शिंदे गेले आणि त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आणि बाहेर पडायचा पवित्रा घेतला.
-----
रमेश आणि नरेंद्र एकाच दुचाकीवर बसून वेगानं जात होते. रमेश चालवत होता आणि नरेंद्र उलटा बसून बंदूक ताणून चहूकडे
नजर ठेवून होता. ते हॉस्पिटलपर्यंत पोचले
तोवर रात्र पडली होती. दूर
कुठेतरी सायरनचे आवाज येऊ लागले होते. हॉस्पिटलमध्ये
स्मशानशांतता होती. नरेंद्र
वेगानं धावत वर पोचला. सर्वत्र
रक्ताचं थारोळं पसरलं होतं. त्याला
जोगचा मृतदेह दिसला. तो
त्यांतनंच वाट काढत पलिकडच्या वॉर्डात निघाला. रमेश
त्याच्या मागेच होता.
"लवकर
चल इथून. पोलिस पोचतच असतील." असं रमेश म्हणेपर्यंत त्यानं
नरेंद्रकडे पाहिलं. तो
दगडासारखा स्तब्ध उभा होता.
समोर हॉस्पिटल बेडवर त्याच्या आईचा मृतदेह रक्ताच्या
थारोळ्यात होता आणि त्याच्या पायाशी त्याचे वडील आणि रेखाचा मृतदेह पडलेला होता.
रमेशनं नरेंद्रच्या खांद्यावर हात ठेवला.
"अपहरणाचा फसलेला प्रयत्न!", नरेंद्रच्या
तोंडून शब्द बाहेर पडले.
रमेश त्याच्याकडे पाहत होता. त्याच्या
डोळ्यांत एक अश्रूही नव्हता. फक्त
खोल वेदना दिसत होती. चेहरा
कोरा होता आणि आवाजात सूक्ष्म कंप होता. दोन मिनिटं स्तब्ध राहिल्यावर तो जायला वळला.
"आता
काय?" रमेश त्याला म्हणाला.
"ती
वही." त्यानं रमेशच्या खिशात
हात काढून ती वही घेतली. "आता
एक एक करून.."
"सुरूवात
सिन्नरकरपासून कर." रमेश
त्या मृतदेहांकडे पाहत म्हणाला. त्याची
बहीण, सुवर्णा, कोल्हे
सगळेच प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागले होते.
नरेंद्र चालूदेखील लागला.
"एक
मिनिट." रमेश म्हणाला, "मी पण येतो तुझ्यासोबत!"
"ही तुमची
लढाई नाही."
"तुझी
तरी लढाई कुठे होती ही."
"आता
माझी झालीय." तो
कंप पावणार्या आवाजातदेखील शांतपणे बोलत होता.
"पण
हिनं तिच्या लढाईत तुला सामील केलंच ना?" रमेश
म्हणाला.
"त्याचं
तिला काय फळ मिळालं पाहतोयस ना?"
"पण
मी करू काय? ते लोक येऊन मला मारूनच
टाकतील."
"ते
तुला मारणार नाहीत. त्यांना
मी अजून सापडलो नाहीये. आणि
तू मला भेटलायस हे त्यांना ठाऊक नाहीये."
"पण
तूच तर तिथे म्हणालास की आम्हाला मारायला..."
"तसं
बोललो नसतो तर मला घेऊन तू तिथून निघाला असतास काय?"
"आता
काय उरलंय माझ्या आयुष्यात? माझ्या
बहिणीचा खुनी कदाचित मला कधीच सापडणार नाही. राजे
आणि डॉ. काळे निष्कारणच मारले गेले, त्यांच्या खुन्यांनाही मी पकडू शकत नाही कारण ते नक्की कोण
आहेत हेच मला कधी कळणार नाहीये. ज्यांच्यावर
विश्वास टाकला ते सिन्नरकरच खुन्यांचे बाशिंदे निघाले. इतकं
असहाय मला आयुष्यात कधी वाटलं नाही. जगायला
कारण काय उरलंय?" रमेश
हताश होऊन म्हणाला.
"जगायचं
कारण? शोधत राहा किंवा कारण तुला शोधेल." नरेंद्र म्हणाला आणि वॉर्डाबाहेर पडला.
पोलिसी गाड्यांचे सायरन जवळ येऊ लागले.
शिंदे घाईगडबडीनं आत शिरले आणि समोर मृतदेहांशेजारी हताशपणे
बसलेला रमेश त्यांना दिसला. पोलिसांनी
एरिया कव्हर केला. मीडियादेखील
पोचला होता. नरेंद्र केव्हाच निघून
गेला होता. शिंदे रमेशला आधार देऊन
बाहेर घेऊन आले. बाहेर आणतानाच ते
त्याच्या कानात म्हणाले, "सिन्नरकरांचा
राहत्या घरीच गोळ्या घालून खून झाला तासाभरापूर्वी. म्हणजे
त्यांनी खबर देताच त्यांचाच काटा निघाला."
ऍम्ब्युलन्सच्या दारात जाऊन रमेश बसला. तेव्हा अचानकच एकीकडून भैरवी आली.
"इन्स्पेक्टर!" ती म्हणाल्यावर रमेशनं चमकून तिच्याकडे
पाहिलं. "मी टीव्हीवर शिंदेंना
पाहिलं आणि अंदाज बांधला की तुम्ही इथे असाल. मी
इथून जवळच राहते ना."
-----समाप्त-----