2/13/2010

इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ !

'नटरंग' सिनेमामध्ये एक छान कटाव आहे. तशी 'नटरंग'ची सगळीच गाणी मला आवडतात, पण सध्याची परिस्थिती पाहून ह्या ओळी फारच समर्पक वाटतात.


"मिरगाचा (मॄग नक्षत्राचा) हंगाम दाटला, फाटलं आभाळ। इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ॥"

२६/११/२००८ ला रात्री ११ वाजता मी विमानाने मुंबईला उतरलो होतो. विमानातच सूचना मिळाली होती की शहरात काहीतरी घडलंय म्हणून. पण किती भयंकर आहे ह्याचा अंदाज आधी आप्रवसन (इमिग्रेशन) ला आणि मग विमानतळाबाहेरची सुरक्षाव्यवस्था बघून आणि शेवटी विमानतळावरून घरी जातानाचे रिकामे रस्ते पाहून आला. आणि घरी पोहोचल्यावर टीव्ही पाहून अंदाजाचं रुपांतर अविश्वासात झालं. मग ते हल्ले संपल्यावर तिथे मेणबत्त्या लावायचे प्रकार झाले. नेत्यांनी एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढल्या. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. मुंबईच्या 'स्पिरिट'ला सलाम झाला. शहीदांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबांना मदतीच्या नावाखाली त्यांचे अपमानही झाले. मीडियावाल्यांनी चार-पाच वर्षांची कमाई ४-५ महिन्यांमध्येच करून घेतली. सरकारतर्फे पाकिस्तानला ललकारण्यात आलं संबंध तोडण्याची भाषा झाली. "पुरावे" सुपूर्द करण्यात आले. जिवंत दहशतवाद्याच्या खटल्यातून सर्व मृतांना न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी झाल्या.

७-८ महिनेच झाले असतील. पुन्हा तेच सरकार निवडून आलं. ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते, बहुतेकांना पुन्हा तीच खाती मिळाली. बाकीच्यांची राजकीय पुनर्वसनं झाली. पाकिस्तानने 'पुरावे' अपुरे असल्याचे सांगत सर्व प्रमुख आरोपींना सोडून दिलं. हाफिज सईद गच्च गर्दीच्या रॅल्या घेतोय. 'जिहाद' चे नारे देतोय. कसाब, एकमेव जिवंत अतिरेकी आता प्रसारमाध्यमांचा अन्नदाता आहे. कसाब कोर्टात हसला, त्याने डोळ्याच्या एका कोपर्‍यातून पाहिलं, तो मराठीत बोलला, आज कसाब कोर्टात असताना मजा झाली वगैरे वगैरे. कोणाच्या हे लक्षात आहे का की ह्याच माणसामुळे १८४ जिवंत माणसं मेली. मुंबई पोलिसांचे ३ खंदे अधिकारी गेले. पण आपण मात्र पाकिस्तानी कलावंत आणि त्यांचे क्रिकेटपटू भारतात यावेत ह्याच काळजीत. त्यांच्या रोजीरोटीची जवाबदारी आपली असल्यागत. फक्त दीड वर्ष झालं असेल, आता आपण "पाक खेळाडू आपले पाहुणे आहेत. आपण त्यांचा अपमान नाही केला पाहिजे. ते सर्वोत्तम आहेत." असं म्हणणार्‍या एका कणाहीन माणसाच्या एका सिनेमासाठी पाठिंबा देतो. इथे खेळाडूंना कुणाचाही विरोध नाही. विरोध देशाला आहे. त्यांना सर्व बाबतीत एकटं पाडल्याखेरिज शांततेचं महत्व कळणार नाही. पण आपण सहिष्णू आहोत. इथे हाच पैशांसाठी लग्नांमध्ये नाचणारा नट गुलशन कुमार खटल्यात व्यस्त असल्यामुळे साक्ष देऊ शकला नाही आणि भरत शाह खटल्यात उलटला होता ह्याचा सर्वांना सोयिस्कर विसर पडतो. इथे पुन्हा विरोध सिनेमाला नाही तर व्यक्ति आणि वृत्तीला आहे. आपलं सरकार सगळा पोलिसी फौजफाटा त्याच्या सिनेमाच्या दिमतीला लावतं, हेच सरकार मराठी सिनेमावर अशीच वेळ आलेली असताना तमाशा पाहतं कारण तेव्हा सरकारातलेच मंत्री आपली अब्रू वाचवण्यासाठी सिनेमा रोखत असतात. सगळा फौजफाटा सिनेमाच्या मागे असल्यामुळे पुण्यात अतिरेकी अगदी सहज बॉम्ब फोडतात. १० लोक मरतात. तरी ४-५ महिन्यांपूर्वी निवडणुकांपर्यंत गर्जना करणारं सरकार पाकिस्तानबरोबर बोलणी करायला तयार होतं. आणि पुन्हा पाकिस्तानी म्हणतात, आम्ही नाही झुकलो, तेच झुकले शेवटी. आणि तरीही आपण पुनःपुन्हा तेच सरकार निवडून द्यायचं.

महागाई वाढलीये. ८०च्या दशकात, बायकांनी लाटणे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. आता लोकांना विचारा. लोक म्हणणार, काय करणार आपण? अरे? महागाई निवडणुकांच्या आधीपासून आहे, काय केलंत तुम्ही निवडणुकांच्यावेळी? घरी बसून लोळलात. पुन्हा तेच सरकार आलं आणि हेच चालणार. महागाई वाढणार, दहशतवाद वाढणार, पाकिस्तान असंच आपल्या तोंडावर थुंकणार. आपण मात्र सिनेमांना पाठिंबा द्यावा, तो कुणी काढलाय त्याच्याशी आपल्याला काय? उद्या अफझल गुरु किंवा कसाबल घेऊन सिनेमा आला तरी आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करण्यासाठी तो सिनेमा बघायचा. महागाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दहशतवाद ह्या विषयी आपण काय करणार? खरंच, आपण काय करणार?

असं म्हणतात, की प्रत्येक मनुष्यसमूहाला त्याच्या लायकीनुसार नेता मिळतो. खरंय, अगदी शंभर टक्के खरं आहे.

षंढ झालो आहोत आपण! काही करायचंच नाही आहे कुणाला! सगळ्यांना फक्त स्वतःची काळजी आहे. पण सगळे हे विसरतात, की ज्या आगीकडे ते "आपल्याला काय त्याचं" म्हणून पाहतायत, ती आज नाहीतर उद्या त्यांच्याच घरात येणार आहे. पण पर्वा कुणाला आहे. लाचारीची सवय झालीये. मुघल आणि इंग्रजांनी आपल्या लाचार प्रवृत्तीचा फायदा घेऊनच राज्य केलं. आता घरभरू नेते करताहेत. एके काळचे आपण शूर म्हणवणारे, इतिहासातच शूर राहिलो आहोत. आता तर स्थिती सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे आहे.

"इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ ।"

7 comments:

  1. अरे आपली पोलीस यंत्रणा सिनेमाना PROTECTION देत माहीत आहे ना...सरकारचा आदेश ना...बाकी शहर गेला %&%$%$#

    ReplyDelete
  2. ब्लॉगवर स्वागत सुहास. दुर्दैवी पण खरंच आहे.
    प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  3. jevha samanya manus ektra yeun praytna karel tevha paristiti badlel.

    ReplyDelete
  4. ब्लॉगवर स्वागत राहुल.
    तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे.

    ReplyDelete
  5. chaan lihale aahe aavadale.

    :)


    raj jain
    www.mimarathi.net

    ReplyDelete
  6. प्रतिक्रियेबद्दल आभार राज.

    ReplyDelete
  7. >>प्रत्येक मनुष्यसमूहाला त्याच्या लायकीनुसार नेता मिळतो.

    Again, perfect. Netaa ha kahi aakashatun tapkat nahi, to aaplyatunach yeto. AapaN sudharle nahi tar aaple nete sajjan asave ashi apeksha karNe chukiche ahe.

    ReplyDelete