4/15/2010

योगायोग

आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी, घटना अश्या घडत असतात, की ज्यामध्ये कमालीचा योगायोग असतो. आता हे बघा ना, एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या मुलानं/मुलीनं एखाद्या मुसलमान मुलीशी/मुलाशी प्रेमविवाह करावा, अगदी सोवळंओवळं पाळणार्‍या घरातल्या मुलांनी आंतरजातीय विवाह करावे, हे आणि असे अनेक विचित्र योगायोग रोजच्या रोज घडत असतात. जगातल्या मोठमोठ्या माणसांनाही हे असले विचित्र चेष्टाप्रद योगायोग चुकले नाहीत. अहिंसावादी म्हटले जाणारे गांधी बंदुकीच्या गोळीने मेले. कार्ल मार्क्सचा साम्यवादावरचा ग्रंथ कोणी प्रकाशक मिळेना म्हणून एका भांडवलदाराच्या मदतीने प्रकाशित केला गेला. काही योगायोग मात्र काळजाला चटका लावून जातातते योगायोगांपेक्षा जास्त काळाची क्रूर थट्टा म्हणून शोभतात. एखाद्या महान स्वावलंबी माणसाचं जीवनाच्या अखेरच्या काळात परावलंबी होणं, एखाद्या शूर सैनिकाचा रुग्णशय्येवर थोड्क्याच आजाराने अंत होणं. असाच चटका मला माझ्या एका मित्रांनी सांगितलेल्या बातमीने लागला. त्यांचे अतिशय जीवाभावाचे स्नेही असलेले "सर्पमित्र', एका सर्पाच्याच चावण्याने दगावले.
मराठीमध्ये एक शब्द आहे, "दैवदुर्विलास". ह्या शब्दाशिवाय दुसरा कुठलाही शब्द मला सुचला नाही ही बातमी ऐकल्यानंतर. सर्पमित्र सुनील रानडे, ही एक वल्ली होती. अर्थात मी त्यांना प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही. जेव्हढंही ऐकलं ते सगळं आमच्या कंपनीतलेच एक सहकारी मित्र आहेत, त्यांच्याकडून. हे आमचे सहकारी, सर्पमित्र रानडेंचे स्नेही. दोघेही होमगार्डमध्ये एकत्र होते. त्यावेळी आमचे सहकारी रानडेंचे सिनीयर होते. त्यांची चांगली मैत्री होती. रानडेंनी प्रेमविवाह केला. घरच्यांच्या इच्छेविरोधात जाऊन. त्यावेळीही आमच्या सहकार्‍यांचा त्यांचा विवाह घडवून आणण्यात मोलाचा वाटा होता. साहजिकच, त्यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. रानडे, परळच्या प्राणिइस्पितळात नोकरीला होते. आणि त्यांच्या कुटुंबासमवेत ते तिथल्याच स्टाफ क्वार्टर्समध्ये राहायचे. दवाखान्यात सापांना ठेवण्याची जागा नव्हती, म्हणून रानडे सापांना आपल्याच घरी ठेवायचे. रानडेंनी एकदा एका जहाजातून अजगरही जिवंत पकडून त्याचे प्राण वाचवले होते. त्यांनी बर्‍याच सापांना असंच जीवदान दिलं होतं.
एक दिवस बायको माहेरी गेली असताना, रात्री सापांना बघताना, किंग कोब्रा त्यांना चावला. त्यांनी स्वतः विष उतरवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्यांना यश आलं नाही. आणि शेजार्‍यांनी त्यांना इस्पितळात नेईपर्‍यंत उशीर झाला होता. वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी एका सर्पमित्राचा सर्पाच्याच चावण्याने मॄत्यू झाला. दैवदुर्विलास - दुसरं काय?
आता त्यांच्या पत्नी त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहाय्याने पुन्हा उभ्या राहायचा प्रयत्न करतायत. मुलांच्या शाळेसाठी म्हणून आणि दुसरी सोय करता यावी म्हणून क्वार्टर्समध्ये थोडा कालावधी वाढवून मिळावा ह्यासाठी आता त्यांचे प्रयत्न चाललेत. साहजिकच आमचे सहकारीही प्रयत्न करतच आहेत.
बातमी ऐकून दुःख झालं होतं, पण त्याहून जास्त हतबलता येते, ती आपण काही करू शकत नाही ह्या भावनेने. दैवाचे क्रूर खेळ तर थांबवू नाही मी, पण प्रार्थनेपलीकडेही कुणासाठी काही करता यावं, ह्यासाठी मात्र प्रार्थना कराविशी वाटतेय; हा काही योगायोग नाही.

18 comments:

  1. वाईट वाटलं वाचून. आणि तू म्हणतोस ते दैवदुर्विलास अगदी खरे आहेत.
    माझ्या एका चुलतभावाचा इलेक्ट्रीकल इंजिनिअर असलेला मामा स्वतःच्या घरात इलेक्ट्रीक शॉक लागून गेला ती घटना आठवली. :-(
    आपल्या हातात फक्त प्रार्थना करणंच दुसरं काय?.. :-(

    ReplyDelete
  2. थोर ह्रुदयरोगतज्ञ डॉ. नीतू मांडके हे ह्रुदयरोगानेच गेले.
    हा ही १ योगायोग.

    ReplyDelete
  3. मला हे दैव असे का वागते याचे कोडे अजुन उलगडले नाही... खरंय आपल्या हातात प्रार्थना करण्याशिवाय काय पर्याय आहेत...

    ReplyDelete
  4. पट्टीचे पोहणारे माझे मावस आजोबा नाशिकला गंगेच्या पुरात नेहमीच उडी मारत.अनेक बुडणा~यांचे प्राण वाचवलेत.पण अशीच एकदा पुरात उडी मारली आणि वर आलेच नाहीत. :( डॉक मांडकेसरांनी माझ्या बाबांना नऊ तास ऑपरेशन करून झगडून अगदी गेलेला जीव परत आणला पण स्वत: मात्र... कोणाच्याच हाती काहीच नसते. फार वाईट वाटले वाचून.

    ReplyDelete
  5. हेरंब, खरंच रे प्रार्थनां करणंच आपल्या हातात..

    ReplyDelete
  6. अनिकेत, ब्लॉगवर स्वागत. होय, ते डॉ. मांडकेन्च माझ्या डोक्यात आलंच नाही.

    ReplyDelete
  7. अगदी सहमत आनंद.

    ReplyDelete
  8. भानसताई, तुमचं वाचून वाईट वाटलं. खरंय अगदी,कुणाच्याच हातात काही नसते.

    ReplyDelete
  9. आयुष्यभर ’दारुबंदीसाठी’ झगडलेल्या महात्मा गांधींच्या वस्तू एका ’मद्यसम्राटाने’ लिलावात चढ्या भावात खरेदी केल्या.

    ReplyDelete
  10. होय रे जेव्हा हे घडलं, तेव्हा ह्या विचित्र योगायोगाने मलाही थोडं हसूच आलं.

    ReplyDelete
  11. ह्या घटना वाचून फार दुखः झाले पण काय करणार जेवण हे फार unpredictable आहे.
    आणि ऐनवेळी प्रयत्नांना उपयश येत उसल्यास आपण प्रार्थना करण्याव्यतरिक्त काहीच उरत नाही !

    ReplyDelete
  12. ह्या घटना वाचून फार दुखः झाले पण काय करणार जेवण हे फार unpredictable आहे.
    आणि ऐनवेळी प्रयत्नांना उपयश येत उसल्यास आपण प्रार्थना करण्याव्यतरिक्त काहीच उरत नाही !

    ReplyDelete
  13. खरंय,
    प्रतिक्रियेसाठी आभार आशिष!

    ReplyDelete
  14. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  15. ऑस्ट्रेलियन क्रोकोडाइल हंटर स्टीव इर्विन स्टिंग रे नामक निर-उपद्रवी माश्याच्या काट्याने मेला.... :-(

    ReplyDelete
  16. होय तो ही एक विचित्र योगायोगच होता. ब्लॉगवर स्वागत अभिलाष. आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  17. animal planet वर एक कार्यक्रम आहे fatal attractions यात फ़क्त अशाच घटना दाखवतात...एका माणसाने पाळलेल्या साप चुकून मोकळा राहिला आणि मग माणसालाच मारले. आणखी एका बाईने पाळलेल्या बिबळ्याने तिची नोकरी गेल्यामुळे तिला त्याला पुरेसे अन्न देता येत नव्हते आणि बहुतेक हा उपाशी राहिला म्हणून एकदा ती त्याला जेवण द्यायला गेली तर तिलाच मारून खाल्ले...आणि मुख्य कुणाला माहित नाही तिचा मुलगा शाळेतुन आला आणि आईला शोधणार तर हे...मी तो कार्यक्रम पाहायची हिम्मत आता करत नाही...

    ReplyDelete
  18. बापरे, भयंकर कार्यक्रम आहे. ऐकलं नव्हतं कधी.

    ReplyDelete