4/11/2010

अ, ब आणि क

मी जेव्हापासून सिनेमे अनुभवण्यासाठी म्हणून बघायला लागलो, तेव्हापासून माझी नजर नुसतीच गोष्ट किंवा अभिनय किंवा आवडते नट-नट्या (नट आपलं उगाच जोडशब्द म्हणून लिहिलंय) ह्याकडे न राहता इतर अनेक गोष्टींकडे जाऊ लागली (हे लिहिणार होतो म्हणूनच आवडते नट-नट्या{पुन्हा नट ...} आधी लिहिण्याचा खटाटोप). असो. तर इतर गोष्टी म्हणजे कॅमेरा ऍंगल, प्रकाशयोजना पण ह्या तांत्रिक गोष्टी फारश्या समजत नसल्यामुळे त्यांचा जास्त विचार न करता माझी गाडी वळते ती संवाद आणि संवादफेकीकडे.
मला वैयक्तिकदृष्ट्या ब-क दर्जाचे सिनेमे फक्त संवाद आणि संवादफेकीसाठी आवडतात (उदाहरणार्थ, मिथुनदांचं सेल्ल्युलॉईडवरचं महाकाव्य - "गुंडा"(१९९८)). हे सिनेमे तद्दन भिकार वाटू शकतात लोकांना. वाटोत, बिचार्‍यांना आयुष्यातल्या केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकावं लागतं ते त्यांना नाही कळायचं.  मला हे सिनेमे आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे, ते कुठेही सत्य किंवा पाथब्रेकिंग वगैरे असण्याचा आव आणत नाहीत. नागवे तर नागवे, उगाच 'नग्नचित्र ही काय कला आहे तुम्हाला नाही कळायचं' असले आव आणणं नाही. म्हणूनच मला त्यातून निर्मळ मनोरंजन मिळतं. अर्थात, त्यामध्ये बीभत्सपणा अंमळ जास्त असतो, पण शेवटी ह्या सिनेमांचा टारगेट ऑडियन्स असतो. आता वानगीदाखल गुंडातला पुढचा संवाद पहा,
"ए कौन है बे तु?"-एक व्हिलन मिथुनदाला.
"मैं हूं जुर्म से नफरत करनेवाला, गरीबों के लिये ज्योती और तुझ जैसे गुंडों के लिये ज्वाला।"-मिथुनदा.
"बना के तुझे मौत के मुंह का निवाला, गाड दूंगा तेरी छाती में मौत का भाला।"-....
आता मला सांगा ह्या असल्या फालतू संवादांपासून सिनेमातले जवळपास सगळे संवाद यमक जुळवून आहेत, काही बीभत्स, काही खरंच विनोदी. मग का नाही मी ह्या सिनेमाला महाकाव्य म्हणायचं. असेच संवाद मिथुनदा आणि धर्मेंद्रच्या उतारवयातील अनेक सिनेमांमध्ये आहेत. पण असो, मी जर सुरु झालो तर फक्त संवादांचाच एक ब्लॉग होईल.
ह्या सिनेमांमध्ये आपले मराठीतले आघाडीचे अभिनेते मोहन जोशी हटकून असतातच. गुंडा, लोहा अश्या अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या ब-अभिनयाचा लोहा मनवलेला आहे. तर आपण कुठे होतो. संवाद आणि संवादफेक. तर अश्या सिनेमांमध्ये बरेचसे कलाकार फडतूस असतात. स्वस्तात कामे करणारे. त्यामुळे त्यांचा दर्जा हा सिनेमाच्या एकूण दर्जाशी साधर्म्य साधणारा असतो. पण ह्या सिनेमांमध्ये जे मिथुनदा, धर्मेंद्र, शक्ति कपूर सारखे मंझे हुए कलाकार असतात त्यांचीसुद्धा खास ह्या सिनेमांसाठी एक टाळ्या घेणारी संवादफेक असते. एरव्ही "आय एम कृष्णन अय्यर येम ये." म्हणून अप्रतिम अभिनय करणारा मिथुनदा, जेव्हा "दो..चार..छे..आठ..दस.....बस.." म्हणतो, तेव्हा तो फक्त कूली शंकर असतो. "मेरा नाम है सुरज..ट्रक ड्रायव्हर सुरज." ह्या संवादाची कल्ट फॉलोईंग तर "द नेम इज बॉन्ड.." पेक्षाही जास्त असेल. धर्मेंद्रचं "कोई हसीना जब रूठ जाती है तो..." हे तुम्हाला पानीकम वाटायला लागेल, जर तुम्ही "पुट ऑन द घुंगरू ऑन माय फीट ऍंन्ड वॉच माय डीराम्मा.."(तहलका) पहाल. आणि तुम्ही जगप्रसिद्ध "सुसाsssईड" म्हणणारा हाच का धर्मेंद्र असा विचार कराल जेव्हा तो "मैं हूं गरम धरम...मुझे कैसी शरम."(पुन्हा तहलका) असं म्हणत नाचतो.
हे सिनेमे नुसतेच भिकार असतात अशातला भाग नाही, कधीकधी अत्यंत हिडीस उपमा देऊन संवादांना नटवलेलं असतं. आता लोहामध्ये एक भिकार सिच्युएशन आहे. एकेकाळचा मोठा भाई दीपक शिर्के('एक शून्य शून्य वाला) आता अगदी बरबाद आहे आणि तो दुसर्‍या एका भाईकडे मदतीची याचना करायला आलाय. त्याच्या ओळी आहेत, "मैं बिना पेट्रोल की गाडी हूं, मैं बिना नशे की ताडी हूं, मैं वो फटेली साडी हूं, जिसे कोई हिजडा भी नही पेहनेगा।"
अशा वेळी माझा सलाम जेव्हढा त्या कलाकाराला असतो, तेव्हढाच त्या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन पुन्हा ओरडून पहा मी किती खालच्या पातळीवर आहे हे सांगण्यासाठी कलेजा लागतो, तो जर चोप्रा आणि जोहरकडे असता, तर "कांताबेन" आणि "ये कान में डाल.."(कल हो ना हो), "बोमन इराणीचं दोस्तानामधलं पात्र" आणि "सेक्सी सॅम" (कभी अलविदा ना कहना) हे बीभत्स विनोद आजची पिढी किंवा मॉडर्न सोसायटीच्या नावाखाली खपवण्याचा दांभिकपणा त्यांनी केला नसता. असो. माझे मुद्दे, दृष्टीकोन सगळ्यांनाच पटतील असं नाही. ते पटावेत असा अट्टाहासही नाही. आपण पुढे जाऊ.
माझी अजून एक आवडती गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा. नाचातले नाही. एकूणातच सिनेमातले, किंवा अगदी हल्लीच्या सिरियलमधलेही (होय मी सिरियल्स बघतो. मी खुल्लम खुल्ला सांगतो की मी सिरियल्स बघतो). आणि हे फक्त ब-क वाले नाही सगळ्याच अगदी मेनस्ट्रीम (इथे द्व्यर्थ आहे का? मेन म्हणजे पुरुष सुद्धा होतं) सिनेमातलेही. हे लोकसुद्धा एक प्रकारचे 'ब आणि क'च, कारण मुख्य पात्र म्हणजे 'अ', हे आपले उगाच पूरक. ह्याचा अर्थ मला ब आणि क हा प्रकार एकूणातच भलताच आवडतो असा होतो. पण शाळेत मी 'अ' वर्गात होतो आणि गणितातल्या 'ब, क आणि ड' गटाशी माझे फारसे सलोख्याचे संबंध नव्हते.
तर आपण ब आणि क कॅटेगरीच्या पात्रांवर होतो. म्हणजे बघा हिरो हिरॉईनला पाणीपुरी खायला घालतोय, तेव्हा पाणीपुरीच्या गाडीवाल्याच्या चेहर्‍याचं कधी निरीक्षण केलंय तुम्ही कधी? अगदी मजेदार भाव असतात. म्हणजे कधी कधी एखादा हळूच आपण कॅमेरात दिसतोय की नाही हे डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघत असतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो आणि तो इस्त्री (मला कधीकधी प्रश्न पडतो, काही उत्तर भारतीय, 'स्कूल'ला 'इस्कूल' 'स्तर'ला 'इस्तर' म्हणतात, मग ते 'स्त्री' ला 'इस्त्री' म्हणत असतील का?{समस्त स्त्रीवर्गाची आत्ताच माफी मागतो}) मारल्यागत करून उभा राहतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो पण त्याला दाखवायचं नसतं की तो कॅमेरा कॉन्शस आहे, मग तो उगाच खोटं हसू किंवा आपण आजूबाजूला बघण्यात गर्क आहोत असा आव आणत राहतो किंवा एखादा एवढा कॅमेरा अनकॉन्शस असतो की आपण सीनचा भाग नसून आपणपण शूटींग बघायला आल्यासारखा पूर्ण सीनभर हिरो हिरॉईनकडे पाहत राहतो. मग एखाद्या सीनमध्ये, स्पेशली ९०' च्या दशकातल्या सिनेमांमध्ये हिरो किंवा हिरॉईन रस्त्यावर नाचगाणी करत असतात, तेव्हा उभ्या क्राऊडमध्ये एखाद्याकडे जाऊन काहीतरी वेगळं म्हणजे त्याची टोपी काढतात किंवा त्याची दाढी कुरवाळतात किंवा त्याचा विग काढतात वगैरे, तेव्हा त्या एका माणसाचा चेहरा बघण्यासारखा असतो. कारण हे क्राऊड म्हणजे बरेचदा खरंच रस्त्यावरचं शूटींग बघायला आलेलं क्राऊड असतं, तेव्हा सिनेमाच्या मुख्य कलाकाराबरोबर आपण एका सीनमध्ये आहोत हा अनुभवच त्यांचा चेहरा तेजोमय करायला पुरेसा असतो, त्यामुळे बरेचदा त्यांची फजिती होतेय असा सीन असतो, पण त्या माणसाच्या चेहर्‍यावर असे भाव असतात की त्यावेळी समर्थांनी त्याला विचारलं की "जगी सर्व सुखी असा कोण आहे?' तर तो "मी" असं छाती ठोकून उत्तर देईल(मला माहितेय की ही जरा ओढून ताणून उपमा झालीय, खरं म्हणजे मी "स्वतः मेनका त्याचे पाय चोळून देतेय" असे भाव असतात असं लिहीणार होतो, मग अचानक पुलंचं 'असा मी असामी' आठवलं, मग म्हटलं टॅरॅंटीनो स्टाईल 'होमेज' देऊया. आणि बघा एकाच कंसात मला पुलं आणि टॅरॅंंटीनो दोन्ही माहितीयेत हे सांगूनही झालं). पण त्याहून जास्त मजेशीर भाव असतात ते ह्या फजिती होणार्‍याच्या शेजारी उभे असणार्‍यांच्या चेहर्‍यावर. आपण कॅमेरात व्यवस्थित येत असू की नाही ह्याची एकीकडे काळजी आणि येत असू तर नीट दिसत असू ना ही विवंचना (कारण सिनेमा रिलीज झाल्यावर नातेवाईक, शेजारी, सहकारी सगळ्यांना दाखवायचं तर धड दिसायला तर हवं ना). माझा हा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे, मी लहान होतो तेव्हा - साधारण सहावी सातवीत असेन - माझ्या एका मित्राच्या आईने "ताकधिनाधिन" ह्या तेव्ह्याच्या सह्याद्रीवरच्या हीट टीव्ही शोसाठी पासेस मिळवले होते. तो शो होता "लहान मुलांचा खास", त्यामुळे माझा मित्र, मी आणि अजून एक अशी आम्ही तीन लहान मुलं गेलो होतो शूटींगला. आम्ही नशीबवान म्हणून ऍंकर उभे राहतात त्यांच्या शेजारीच आम्ही होतो. आपल्या तिरंग्याच्या तीन रंगाच्या टोप्या पोरांना वाटल्या होत्या. मला भगवा मिळाला होता. ती टोपी मी बरेच वर्ष जपून ठेवली होती, अजूनही घरी कुठेतरी असेल. च्यायला अर्ध्या तासाचा तो शो पण त्याचं शूटींग पाच तास चाललं होतं. प्रत्यक्ष शूटींगमध्ये तुम्ही मुख्य कलाकार नसाल तर काहीच मजा नसते हे तेव्हा माझ्या बालमनाला पहिल्यांदाच कळलं होतं. असो, तर मी एंकर्स च्या शेजारी बसलो होतो त्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये आपण असू असं वाटत होतं (अर्थात ते थोडंफार खरंही होतं), त्यामुळे जेव्हाही ते ऍक्शन म्हणायचे मी एकदम विचारवंतासारखा चेहरा करायचो आणि स्पर्धकांबरोबर काही विनोद झाला की उगाच फार मोठा विनोद झाल्यागत कंपल्सरी हसायचो. आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या की अगदी जीवाच्या आकांताने टाळ्या वाजवायचो. अर्थात माझ्या मेहनतीचं मार्जरीन झालं (चीजमध्ये खूप अनवॉन्टेड फॅट्स असतात), कारण कधीतरी कुणीतरी तो एपिसोड पाहून, तू त्यात होतास का, म्हणून विचारल्याचं आठवतंय, नाही नाही एक मिनिट, त्यांनी विचारलं, तेव्हा मी ती भगवी टोपी घातली होती काय? च्यायला, कुठून तुम्हाला सांगायला गेलो, आयुष्यातल्या एका निखळ आनंदाच्या क्षणावर कायमसाठी संशयाचा बोळा फिरला. जाऊ द्या.
त्यानंतर असेच मस्त हावभाव न्यूज चॅनेलचे पत्रकार ज्या राह चलत्या आम आदमीचे इंटरव्ह्यू घेतात त्यांचे असतात ("अ वेन्सडे" चित्रपटात स्नेहल दाभी ह्या कलावंताने ते अप्रतिम दर्शवलेत). आपण कोणीतरी फार जाणकार दिसतो म्हणून आपल्याला विचारताहेत असं काहींना वाटत असतं, तर काहींना आपण स्मार्ट दिसतो असं वाटत असतं, तर काही आपण खरंच विचारवंत आहोत असं समजून पल्लेदार वाक्य फेकतात. तर त्याच्या आजूबाजूला उभे असलेले 'ह्यालाच का विचारतायत" असा विचार करत असतात, तर काही त्याच्यानंतर आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं ह्याची जुळवाजुळव (मनातल्या मनात) करण्यामध्ये गुंतलेले असतात, तर काही घरी फोन करून अमका चॅनेल लावा, मी दिसतोय का बघा आणि शेजार्‍यांना सुद्धा सांगा वगैरे करण्यात व्यस्त असतात. इथे सुद्धा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे (आहेच का? म्हणजे काय, माझा ब्लॉग आहे, मी स्वतःची लाल नाही करणार तर कोणाची). एकदा आमच्या कॉलेजात एक न्यूज चॅनेलवाले आले होते, मी तेव्हा जी.एस. असल्याने (कळला ना महत्वाचा मुद्दा, मी जी.एस. होतो, बाकी नाही वाचलंत तरी चालेल) मी समन्वय करत होतो. सगळी जनता कॅमेरासमोर उभी झाली. मग त्यांनी "बसमध्ये कंडक्टर २५ पैश्यांचं नाणं परत देईल तर तुम्ही काय कराल?" असला काहीतरी प्रश्न विचारला. कोणी कोणी काय काय पुड्या सोडत होतं, कसलं उत्तर आणि कसलं काय, सगळं लक्ष कॅमेराकडे. नाहीतर आम्ही, कॅमेराचं आमच्याकडे बिलकूल लक्ष नसूनही नेटाने फ्रेममध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो. कुणी घरी फोन लावले, मी मात्र मला विचारलं तर मी काय सांगावं ह्याची जुळवाजुळव करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. व्यर्थ अशासाठी की मी प्रश्न नीट ऐकलाच नव्हता आणि दुसरं मी समन्वयक असल्याने तांत्रिकदृष्ट्या मी कॅमेराच्या मागचा माणूस होतो आणि त्या निर्दयी कॅमेरामनने माझं कॅमेरासमोरचं टॅलेंट लोकांसमोर येउ नये ह्याची पुरेपूर खबरदारी घेतली. म्हणतात ना मीडिया बायस्ड आहे, खरंच.
तर असो. मुद्दा हा की सगळ्यांनी आजपासून मुख्य पात्र, कथा, आणि आवडत्या नट-नट्या (पुन्हा नट..) यांच्या पलीकडे बघायला सुरुवात करा. कारण तरच तुम्ही कुठल्याही कलाकृतीतला निखळ आनंद घेउ शकाल आणि त्या पात्रांनाही(आमच्यासारख्या) त्यांचं ड्यू क्रेडीट मिळेल.

16 comments:

  1. सुंदर लेख रे मित्रा! गुंडा आणि लोहा हे अप्रतिम चित्रपट आहेत ह्यात काही वादच नाही!

    ReplyDelete
  2. हाहाहा...कपिलभाऊ...
    समानशीले व्यसनेषु सख्यं!

    ReplyDelete
  3. Hi Vidyadhar. Lekh khupac chaan ahe. Maja ali vachun. Me Pranav Joshi. Netbhet blog var lihito. Tyach sandharbat aaplyashi bolaiche hote. If u dont mind can i have ur e mail id?

    ReplyDelete
  4. विद्याधरा, सुटलायस नुसता.. जबरदस्त लेख हा पण. आता कळलं तुझ्या प्रोफाईल पिक्चरचं रहस्य. ;-)

    ReplyDelete
  5. @ प्रणव...ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार..तुमच्या इमेल ला मी आज उत्तर पाठवतोय...
    @हेरंब, तुला लेख आवडला म्हणजे मी नक्कीच चांगला लिहिला असणार..धन्यवाद...
    @यॉ डॉ, भाई, तुला माहित नसेल मी तुझी 'बाष्कळ बडबड' वाचून भलताच प्रभावित आहे, अख्खाच्या अख्खा वाचलाय मी. कधी कॉमेंट नाही टाकली कारण हल्लीच वाचायला घेतला आणि सगळे लेख आता जुने झालेत..तुझ्या ब्लॉगमुळेच मला असलं काहीतरी लिहायची प्रेरणा मिळाली...तुला लेख आवडला...मी धन्य झालो...
    कॉमेंट फार मोठी होतेय...(मग पुन्हा हे वाक्य लिहायची काय गरज?)

    ReplyDelete
  6. एकदम मस्त. खूपच आवडला. आणखी एक गम्मत असते. ८०-९० च्या चित्रपटांमध्ये नट-नट्या घोळक्यात नाचतात तेव्हा त्यांच्या सोबत नाचाण्यारया नार्ताकांशी संवाद साधतात. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावर जे भाव असतात ते अप्रतिमच.
    तशीच हि पोस्टही अप्रतिम. गम्मत आली वाचून.

    ReplyDelete
  7. धन्यवाद देविदास..आणि ब्लॉगवर स्वागत!

    ReplyDelete
  8. अप्रतिम पोस्ट...

    त्यामुळे जेव्हाही ते ऍक्शन म्हणायचे मी एकदम विचारवंतासारखा चेहरा करायचो आणि स्पर्धकांबरोबर काही विनोद झाला की उगाच फार मोठा विनोद झाल्यागत कंपल्सरी हसायचो. आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या की अगदी जीवाच्या आकांताने टाळ्या वाजवायचो.

    हा.हा.पु.वा.

    ReplyDelete
  9. धन्यवाद आनंद....

    ReplyDelete
  10. काय क्लास लिहिले आहे. मस्त !!
    वाचून खूप हसले.

    ReplyDelete
  11. खूप धन्यवाद मीनल...ब्लॉगवर स्वागत!

    ReplyDelete
  12. अरे तुम ये क्या करती.... क्या लिखति.... :) नकळतच अतिशय आवडत्या झालेल्या 'मिथुनदा'ला सलाम !!!

    ReplyDelete
  13. हाहा...रोहन...
    >>नकळत आवडता झालेला...बर्‍याच जणांचं असं होतं! ;)

    ReplyDelete
  14. संकेत आपटे6:27 PM

    मस्त लिहिलं आहेस. रच्याक, ’गुंडा’ रियली रॉक्स. स्वतःवर बलात्कार होणार असेल तर कोणत्याही स्त्रीची पहिली प्रतिक्रिया काय असेल? बलात्कार करणार्‍यापासून दूर जाणं किंवा पळून जाणं. पण गुंडामध्ये मात्र मुकेश ऋषी बलात्कार करायला गेल्यावर ती बाई काव्य करत बसते! ’तू है कुत्तेका पिल्ला, तेरी ज़िंदगी जैसे पानीका बुलबुला’ वगैरे वगैरे...

    ReplyDelete
  15. हाहा...संकेत,
    गुंडा रॉक्स...हे एकच वैश्विक सत्य आहे माझ्या मते! ;)
    गुंडातलं प्रत्येक काव्य...अप्रतिमच आहे...
    मला वाटतं, तो संवादलेखकाच्या आयुष्यातला ऑल टाईम हाय होता...!!!

    ReplyDelete