4/20/2010

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर

परवाच कुठल्याश्या बातम्यांच्या साईटवर मी सेलेब्स(सेलेब्रिटीज)चे विविध ऑब्सेसिव्ह डिसॉर्डर ह्याबाबतचं एक प्रेझेन्टेशन पाहत होतो. बेकहॅम, लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि अजून कोण कोण. तेव्हाच ते वाचताना मला असं वाटायला लागलं की असल्या बर्‍याच सवयी तर मला सुद्धा आहेत (टीप-ही बढाई नाही). आता हे पहा, दरवाज्याच्या हॅंडलला जीवाणूंच्या भीतीने हात न लावणे, किंवा एखादी गोष्ट वारंवार नीटनेटकी करायचा प्रयत्न करणे (अगदी ती वस्तू जागची हललीही नसली तरी), किंवा लिओनार्डोच्या "एव्हिएटर" प्रमाणे कुठल्याही घराबाहेरच्या व्यक्तिला किंवा वस्तूला हात लावावा लागल्यावर वारंवार हात धुणे ह्या असल्या विचित्र प्रकारांना ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर (ह्यापुढे - ऑकडि) असे म्हणतात.
तर मला काय आहे बरं. हं,मला घरातली हॉट प्लेट बंद केलीय हे तीनचारदा खातरजमा करून घ्यावसं वाटतं. त्याच्या नॉब बरोबर इंडिकेटर लाईट दिलेला असूनही मी दोन दोनदा नॉबला हात लावून बघतो, न जाणो कधी इंडिकेटर लाईट बंद झाला असला तर? मग वरून मी हॉटप्लेटला हातही लावून बघतो (अर्थात अगदी सांभाळून). आता मला सांगा हॉटप्लेट ही बंद केल्याकेल्या कधी थंड होते का? पण तरीही मी हात लावून बघतो. हा तद्दन मूर्खपणा आहे हे मला कळतं, पण वळत नाही. हे सगळं रामायण झालं की मी स्वयंपाकघरातून बाहेर पडताना मोठा दिवा बंद करून पुन्हा हॉटप्लेटकडे बघतो. इंडिकेटर बंद आहे की नाही हे बघायला (नो कॉमेंट्स). मग मी घराबाहेर पडताना आपण किल्ली घेतलीये ना ही काळजी असते. दोनदा खिशात किल्ली चाचपली, की मी दरवाजाबाहेर पडतो. पण दरवाजा लावण्याअगोदर दुसरी शंकेची पाल चुकचुकते. त्याचं काय आहे, मी एका अशा रेसिडेन्समध्ये राहतो, जिथली सगळी व्यवस्था एका हॉटेलची मॅनेजमेंट बघते, त्यामुळे किल्लीचं वगैरे हॉटेलसारखं आहे, राहिली आत किंवा हरवली तर नवीन बनवून मिळते कारण ती इलेक्ट्रॉनिक की असते, सिस्टममध्ये जुनी आपोआप डिसेबल होते. हां तर कुठे होतो, पाल चुकचुकते. तर अशी पाल चुकचुकते की आत्ता की चालते आहे की नाही. कारण दरवाजा बंद केल्यावर मला आत काही राहिल्याचं आठवलं तर खाली रिसेप्शनवर जाऊन पुन्हा किल्ली बनवावी लागेल. असा दगा कधी झालेला नाही, पण इलेक्ट्रॉनिक कीच की हो. मग मी ती खात्री करण्यासाठी चावीचा उघड्या दरवाजावरच प्रयोग करून बघतो. ती चालतेय हे पाहून मी थोडा शांत होतो (आता मला सांगा, जर नसली चालत तर मी काय करणार आहे? पण ऑकडि). मग मी एकदाचा दरवाजा लावतो. मला दरवाजा लावल्यानंतर तो लागलाय कि नाही हे पुन्हा पुन्हा हॅंडल ओढून चेक करायची सवय आहे. पण हे फार सामान्य स्तरावर नाहीये, मी अक्षरशः तीन ते चार वेळा हा प्रकार करतो. त्यामुळे मला हल्ली दरवाज्याचं हॅंडल खिळखिळं झाल्यासारखं वाटायला लागलंय. पुन्हा एव्हढं झाल्यावर मी जसा दूर चालत जातो, दोन तीनदा मागे वळून पाहतो आणि खातरजमा करून बघतो की मी खरंच दरवाजा लावलाय ना! पुढे? मग जिना उतरून खाली आलो की डोक्यात आलंच, हॉटप्लेट व्यवस्थित बंद केलीय ना आपण?
वरील परिच्छेदामध्ये कुठेही मी अतिशयोक्ती अलंकाराचा प्रयोग केलेला नाहीये. मी एकदा व्हेनिसला फिरायला गेलेलो असताना रस्त्यात मला मी हॉटप्लेट बंद न केल्याचं प्रकर्षाने जाणवायला लागलं (अगदी ऑकडि) आणि माझ्याजवळ तेव्हा मोबाईलही नव्हता, तेव्हा मी रस्त्यातल्या एका पब्लिक फोनवरून शेजारच्या अपार्टमेंट मधल्या मित्राला फोन करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. तो घरी नव्हता हे एक, आणि हॉटप्लेट व्यवस्थित बंद केली होती हे दुसरं. वर वर्णिलेला संपूर्ण घटनाक्रम जसाच्या तसा जेव्हा मी सुट्टीच्या दिवशी बाहेर पडतो तेव्हा होतो. ऑफिसच्या दिवशी न होण्याचं एकमेव कारण म्हणजे मी अगदी बसच्या निघायच्या वेळेच्या एक मिनिट आधी हॉटप्लेटच्या प्रसंगापर्यंत आलेलो असतो, त्यामुळे जर मी पुढचा घटनाक्रम बदलला नाही तर माझं दिवसाचं वेळापत्रक बदलू शकतं.
मला दुपारच्या जेवणावेळी संपूर्ण भरलेल्या कॅटीनमधून बरेच वेळा हातातून भरलेला ट्रे घेऊन शेवटच्या बाकाकडे जाताना कुठल्याही क्षणी आपल्या हातून ट्रे पडेल आणि आपली फजिती होईल असं वाटत असतं. लिफ्टमधून एकटं जाताना नेमकी आत्ता लिफ्ट अडकली तर? असं गेली दोन वर्ष त्याच लिफ्टनं प्रवास करूनही वाटतं. कुठल्याही लाईनमध्ये उभा राहिलो की आपल्या नंबरवरंच खिडकी बंद होईल अशी भीती वाटत राहते. एखाद्या सुंदर मुलीसमोर उभं राहून कॉफी पिताना कुठल्याही क्षणी आपल्या हातातला कप निसटून अंगावर सांडेल आणि आपली फजिती होईल असं वाटत राहतं.'अंगावर चट्टा' पाहिल्यावर मला 'डॉक्टरांना भेटा'वं की काय असं वाटायला लागतं. 'नारू टाळ'ण्यासाठी मी 'पाणी गाळतो'. कधी कधी मी जेव्हा स्वतःशी बोलतो, तेव्हा मला वाटायला लागतं की मला स्किझोफ्रेनिया आहे. ब्लड टेस्टहून आल्यावर आपला पांढरपेशा काऊंट कमी येईल की काय असं वाटायला लागतं. पोट बिघडलं की आपल्याला गॅस्ट्रो झाला वाटतं असा विचार मनाला चाटून जातो. ब्लॉग लिहून पोस्ट केला की दर तासाने मला कॉमेंट आली असावी असं वाटत राहतं आणि त्यामुळे मी सारखा मेलबॉक्स चेक करतो. आणि सेलेब्सचे ऑकडि पाहून आपल्यालाही आहे अशी मनाची ठाम समजूत होते.

16 comments:

  1. हा हा हा आयला.. जबरदस्त भन्नाट. 'ऑकडि' च्या मारी.

    खुल्ला कन्फेशन : यातली शेवटची ऑकडि (ब्लॉग कमेंटवाली) आपल्याला बी हाये. :-)

    ReplyDelete
  2. सत्यवचन की हो... सहीच झालेयं ऑकडि.... शेवटच्या ओळीशी सगळेच सहमत असणार... हा हा....
    घराला नक्की कुलूप लावलेयं नं ही शंका आम्ही क्रुजला-करेबियन्सला निघालो आणि विमानतळावर मला आली. पण नव~याला सांगून बोलणी खायची हिंमत नाही म्हणून नऊ दिवस तोंड दाबून बुक्क्याच्या मार... रोज रात्री भयंकर स्वप्ने पडत... संपूर्ण घर चोरांनी धुऊन नेलेय... कसली क्रुज आणि कसले आयलंड्स.... :(

    ReplyDelete
  3. "ऑकडी" सही आहे...मला इथल्या प्रिस्क्रिपशन मेडिसीनचे साईड इफ़ेक्ट एकदा वाचले आणि मग ती गोळी घेतली की सगळेच्या सगळे साइडइफ़ेक्ट्स एकदम मला येतील असं वाटतं....म्हणून पुष्कळदा डागदरकडे जाणं टाळणे हा उपाय करुन पाहाते....:)

    श्रीताई, तुझी क्रुजची गम्मत आम्हाला पण कळली..टुकटुक...:)

    ReplyDelete
  4. Kharach Ki Ho, Kontahi manas-shastra che book vachtanna aplyla to mano vikar jhalaly asa vatat rahate...

    ReplyDelete
  5. Watch a movie - "As good as it gets" - "ऑकडी" war ahe but light ahe !! wiki var hya moive baddal barich mahit pan ahe

    ReplyDelete
  6. अगदी खरंय मित्रा...
    मला सुद्धा असले बरेचशे ऑकडि आहेत...पण शाळेत असताना खुपचं जास्ती प्रमाणात ऑकडि होते असं मला प्रकर्षाने जाणवतंय...अमुक एक गोष्टं केली की परीक्षेत जास्ती गुण मिळतील असे कित्येकदा वाटायचे :)

    ReplyDelete
  7. हाहाहा हेरंब...ती आपल्या समस्त ब्लॉगरजमातीला ब्लॉयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर घ्यावीच लागते अशी अनुभूती आहे..

    ReplyDelete
  8. भाग्यश्रीताई, ते फिलिंग भयानक असतं. कसलाही नीट आनंद घेता येत नाही.

    ReplyDelete
  9. अपर्णा,
    तो ऑकडि तर विचित्रच. मला बरेचदा अनोळखी औषधं घेतल्यावर आपल्याला ओव्हरडोस झाला तर अशी भीती वाटते.

    ReplyDelete
  10. ब्लॉगवर स्वागत विश्वास. डिप्रेशन, नर्व्हस ब्रेकडाऊन असले प्रकार मला आठवड्यातून दोन-तीनदा होतात.
    प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  11. ब्लॉगवर स्वागत विक्रम. हो मी ऐकलंय त्या सिनेमाबद्दल. आता बघतो लवकरच. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  12. कपिल,
    ते प्रकार मी इंजीनियरीन्गपर्यंत करत होतो.

    ReplyDelete
  13. Anonymous1:45 AM

    खरयं अगदी... ऑकडि नाव पण मस्तय :)

    मला पुर्वी अश्या बऱ्याच शंका यायच्या जसे आपण गॅस बंद करायला विसरलोय, कुलूप नीट लावलेले नाही वगैरे... हल्लीचे पेटंट म्हणजे घराबाहेर निघताना रेसिडंट कार्ड विसरलेय, आणि पैसे नेमके दुसऱ्या पर्स मधे राहिलेत..... या धाकाने तर हल्ली मी पैसे सगळ्या पर्सेस मधे वाटून ठेवते....

    ReplyDelete
  14. ब्लॉगवर स्वागत तन्वी,
    बाकी सगळं सांभाळून घेता येतं, पण परक्या देशात पैसे आणि रेसिडेंट कार्ड ह्या गोष्टींना पर्याय नसतो..मग ह्याच भयगंडातून ऑकडि चा जन्म होतो...:)
    प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  15. सहीच विद्याधर, ऑकडी ग्रेटच.. ब्लॉग कमेंटवाली, कुलुप नीट लावलं का नाही, रेल्वे, विमाना प्रवास करताना ते सुटण्याची ऑकडी तर मला नेहमीच सतावते.... लेख एकदम मस्त

    ReplyDelete
  16. धन्यवाद आनंद,
    अरे रेल्वे, विमान प्रवास तर विचारू नकोस....ते तिकीट चेक करून करून जीर्ण शीर्ण होऊन जातं.

    ReplyDelete