2/15/2011

शोध

कधी कधी असं होतं की खूप खूप लिहावंसं वाटतं. खूप काही सुचतंय असं वाटतं अन बाह्या सरसावून लॅपटॉपसमोर ठाण मांडलं की एकत्रित येणार्‍या विचारांचा कल्लोळ उठतो. पण काहीच सुसंबद्ध बाहेर पडत नाही. एकदम आभाळ भरून यावं, कुंद कुंद वातावरण व्हावं अन पाऊसच पडू नये तद्वत. विचारांचा कल्लोळ पार थकवून टाकतो. ऑफिसातल्या कामाच्या रगाड्यापासून ते प्रियतमवियोगाच्या दुःखापर्यंत अन बँकेत जमा न झालेल्या पगारापासून ते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीपर्यंत, सर्व तर्‍हेचे अन सर्व प्रकारचे विचार एकत्रितच येतात.
मला लहानपणी कुणीतरी सांगितलेलं आठवतं, की शून्य वैचारिक अवस्था कशी गाठावी, तर एकाच वेळी निरनिराळे विचार करायला सुरूवात करावी. आपोआपच सगळे विचार एकमेकांना कॅन्सल करू लागतात आणि थोड्या वेळाच्या अशा कठोर उपासनेनंतर मेंदू शांत शांत होऊ लागतो. माझ्याबाबतीत तसं सहसा घडत नाही. मी निरनिराळे विचार करू लागलो की मी अजून भंडावून जातो. बहुतेक माझा प्रोसेसर फारच ऍडव्हान्स असावा अन उपरोल्लेखित उपाय हा जुन्या प्रोसेसर्सवर उपयोगी असावा. मला शून्य वैचारिक अवस्था तेव्हा लाभते, जेव्हा मला खरंच विचार करावासा वाटतो. माझ्या मेंदूमध्ये बहुदा 'नॉट गेट' (इंजिनियर्सच्या भाषेत) बसवलेलं आहे. म्हणजे कुठलीही आज्ञा दिली की तो अगदी विरूद्ध कृती करतो. मी ठरवलं की आज अमुक एका विषयावर लिहायचं, म्हटलं की विचार करणं आलं अन विचार करणं म्हटलं की मला लाभलीच शून्य वैचारिक अवस्था.
पण एरव्ही कसलेही अपूर्व विचार कधीही सुचतात. उदाहरणार्थ, एके दिवशी मी मेट्रोमध्ये चढलो. अन नेहमीप्रमाणे चार सीट्सच्या बाकड्याची कोपर्‍यातली सीट पकडली. अन नकळतच पुढच्या स्टेशनांवर चढणार्‍यांचं निरीक्षण करू लागलो. प्रत्येकजण पहिल्यांदा कोपर्‍यातली सीट पकडायचा प्रयत्न करतो. दोन माणसांच्यामध्ये बसणं सहसा लोक टाळतात. मला माझीच सवय जाणवली. मीसुद्धा नेहमी कोपर्‍यातली जागा घेतो. विमानात आवर्जून येण्याजाण्याच्या मार्गाबाजूची सीट मागतो. एकदा दोन माणसांच्या मध्ये बसावं लागलेलं तर बराच वेळ मी अवघडलेला होतो. कॉलेजात असताना केमिस्ट्रीच्या प्रोफेसरांनी इलेक्ट्रॉन्सबद्दल शिकवताना सांगितलं होतं, की इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये कसे भरायचे, तर रिकाम्या बसमध्ये लोक चढले की कसे बसतात तसे. म्हणजे पहिल्यांदा सगळ्या विंडो सीट्स भरतात आणि मग त्यांच्या बाजूच्या सीट्स. थोडक्यात माणूस पहिल्यांदा एकटाच राहणं पसंत करतो. नंतर पर्याय नाही तर दुसर्‍या माणसाजवळ. हे वागणं थोडं विचित्र भासतं, जेव्हा आपण माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं म्हणतो तेव्हा.
पण खरंच माणूस सामाजिक प्राणी आहे कारण एका पातळीनंतर त्याला समाजाची गरज भासते. पण ती एका पातळीनंतर. त्याआधी प्रत्येक माणूस एकटा असतो. आणि त्याला तसंच राहायला आवडतं. अर्थात प्रत्येकाची ही पातळी वेगळी असते. पण असतेच. ज्याला आपण पर्सनल लाईफ म्हणतो. वैयक्तिक आयुष्य. त्यामध्ये कधीकधी जीवनसाथीलादेखील स्थान नसतं. ही पातळी नकळतच अस्तित्वात असते प्रत्येकामध्ये.
महाराजी नावाचे एक प्रवचनकार आहेत. झीटीव्ही यूकेवर अशी बरीच प्रवचनं लागतात. रविवारी सकाळी जाग आल्यावर डोळे चोळत चाळा म्हणून टीव्ही लावावा तर हाच प्रकार चालू असतो. मी सहसा मनोरंजन म्हणून पाहतो पण कधीकधी एखादा चांगला विचार कानी पडतो. तसंच त्यादिवशी महाराजींचं प्रवचन चालू होतं, तेव्हा ते म्हणाले. "प्रत्येक माणसाची दोन जगं असतात. एक जग बाहेरचं ज्यामध्ये तो जगत असतो. आणि दुसरं त्याच्या आतमधलं जे त्याच्याआत जगत असतं. बाहेरच्या जगात कितीही सुखं आणि दुःखं असली तरी त्याच्या आतमधल्या जगामध्ये फक्त एकच सुख आणि एकच दुःख असतं. ते सुख काय आहे ह्याच्या शोधातच तो आयुष्यभर असतो आणि ते सुख मिळत नाही हेच त्याचं एकमेव दुःख असतं."
अतिशय गोंधळात टाकणारा अन अशा विदेशांमध्ये पैसे घेऊन प्रवचन देणार्‍या हायफाय बाबाला शोभणाराच विचार आहे. पण त्यामध्ये मला थोडंसं तथ्य जाणवलं. आपल्या आतलं जग, ज्याला आपण वैयक्तिक आयुष्य म्हणतो, ज्याला प्राणपणानं जपण्यासाठी आपण एका विशिष्ट पातळीपर्यंत स्वतःतच राहतो, त्यामध्ये आपण नक्की काय करतो? आपण स्वतःलाच शोधत असतो किंवा ते एक सुख शोधत असतो. आणि ते मिळत नाही ह्याचं दुःख बाळगत बाहेर एक सर्वसामान्य आयुष्य जगत असतो.
काही नशीबवान माणसं ह्या शोधाच्या शेवटापर्यंत पोचतात. त्यांना ते सुख सापडतं किंवा नाही हा भाग अलाहिदा, पण ते असफल शोधाचं दुःख मात्र संपवण्यात यशस्वी होतात.

42 comments:

  1. "the answer to life the universe and everything" he google var search maar. Tula uttar milel.

    ReplyDelete
  2. खरंय. कधीच न संपणारा हा शोध तू शब्दबद्ध मात्र चांगला केला आहेस. !

    ReplyDelete
  3. पटलं..

    बाबा, तू प्रवचनं ऐकायला सुरूवात केली... हिमालय दूर नहीं है! ;)

    ReplyDelete
  4. Anonymous7:45 PM

    :)

    बाबा... गंमत माहितीये किती दिवसानी मी ’नॉट गेट’ हा शब्द ऐकला .. कसले दुरावलेय मी माझ्या ईंजिनीयरिंगपासून :( ...

    असो, पोस्ट आवडली... पटली!!

    प्रवचनं कसली ऐकतोस रे आणि :).. आप +१०० केल्याशिवाय कमेंट पुर्ण नाही व्हायची माझी ;)

    ReplyDelete
  5. ओह्ह्ह्ह महाराज श्री श्री श्री विद्याधर बाबा वैश्विक सत्य मांडलय आपण :)
    बाकी तु जे म्हणालस ते पटल आणि गॉटल् पण ;)

    ReplyDelete
  6. "आपण स्वतःलाच शोधत असतो किंवा ते एक सुख शोधत असतो. आणि ते मिळत नाही ह्याचं दुःख बाळगत बाहेर एक सर्वसामान्य आयुष्य जगत असतो."

    एक गोष्ट मिळवल्यानंतर त्यातलं सुख न उपभोगता दुसरी कुठली तरी गोष्ट जास्त चांगली आहे, ती हवी कायम दुःखी रहातो .. ह्यावर काहीच उपाय नाही.
    इट्स पार्ट ऑफ लाइफ.

    ReplyDelete
  7. Anonymous8:46 PM

    लेखकाचे विचारमंथन आवडले, याच विचारावर मी केलेली कविता आठवली...

    आजकाल काहीच सुचत नाही..
    लिहावे म्हणून बसले तर काहीच सुधरत नाही
    स्मृतिभ्रंश झाल्या सारखं शब्दच आठवत नाहीत..

    आधी लिहीलेल्या कधीतरी ओळी
    वाचतो पुन्हा पुन्हा तरी अर्थ लागत नाही
    मी आहे कोण याचा काही थांगपत्ता लागत नाही..

    माहिती आहे दोष तुझा नाही मुळी
    मी हरवलो आहे कुठे याचा शोध लागत नाही
    समोरच्या आरश्यात दिसते छबी, पण तो मी नाही..

    (http://www.mimarathi.net/node/5158)

    ReplyDelete
  8. माहित नाही...कारण होतं काय कि हे आत्मिक सुख बऱ्याचदा आपल्या जवळच्या लोकांवर अवलंबून रहातं...आणि त्यांच्या सुखांच्या कल्पना आणि आपल्या कल्पना ह्यातील तफावतींमुळे कायम एक आतल्याआत झगडा चालू रहातो...
    स्वत:चा शोध? I don't know....
    (Am I making sense? I doubt! :) )

    ReplyDelete
  9. बाबा,काय एव्हढे मनाला लावुन घेतलेस रे......नाही म्हणजे शोधकार्य सुरु केलेस. तुझ्या मुखातुन प्रवचने ऐकायची ही माझी पहिलीच वेळ रे..बाकी उत्तम लिहिलेस...
    असाच प्रवचने देत रहा...आप आहेच तुझ्या पाठीशी...;);)

    ReplyDelete
  10. विद्याधर! पोस्ट अतिशय आवडली.खूप क्लिअर लिहिलंत!

    ReplyDelete
  11. फक्त शोध घेता घेता आजूबाजूच्या गोष्टीचा आस्वाद घ्यावा. नाहीतर आपण शोधत शोधत पुढे जातो आणि शेवटी मागे वळून पहातो तेंव्हा आधीच आलेले आनंदाचे क्षण हातून निसटून गेलेले असतात. त्या परिस शोधणार्‍या माणसासारखे.

    ReplyDelete
  12. "काही नशीबवान माणसं ह्या शोधाच्या शेवटापर्यंत पोचतात. त्यांना ते सुख सापडतं किंवा नाही हा भाग अलाहिदा, पण ते असफल शोधाचं दुःख मात्र संपवण्यात यशस्वी होतात. "
    हे वाक्य पटलं... पुरेपुर पटलं मान्यवर !!

    ReplyDelete
  13. विद्या, कुठल्याही गोष्टीतले सुखं हे ज्याक्षणी गवसलं त्याक्षणीच संपलेलं असतं. ही सुखाची शोकांतिकाच! आणि कदाचित म्हणूनच हा शोध संपत नसावा.
    तुझ्या नेहमीच्या शैलीत अतिशय सुसंबध्द विचार मांडलेस! छान!

    ReplyDelete
  14. ओंकार,
    ते ठाऊक आहे रे मित्रा.. पण तुझ्या पेपरातल्या गणिताचं उत्तर जर तुला थेट कुणीतरी सांगितलं, तर तू जगासाठी पेपरात पास होशील, पण स्वतःसाठी होशील का? हा खरा प्रश्न आहे! :)

    ReplyDelete
  15. हेरंब,
    माणूस कस्तुरीमृगासारखाच भटकत राहतो! :-|

    ReplyDelete
  16. आनंदा,
    मी हिमालयात नाही जाणार... गड्या आपुला आल्प्स बरा! :P

    ReplyDelete
  17. तन्वीताई,
    अचानकच एखादा शब्द आठवतो अन ओळख पटायला कधीकधी वेळ लागतो... एखादा दूरचा नातेवाईक असल्यासारखा! :D
    अगं आणि दुसरं काहीच नसतं त्यावेळी टीव्हीवर.. तोंड धुताना वगैरे चालू ठेवायला मजा येते.. :)

    ReplyDelete
  18. सुहास,
    अरे हेच एकमेव सत्य सगळे बाबा आपल्याला पाजतात. मी म्हटलं प्रभुजींच्या नावानं आपणही आपला ब्रँड काढावा! :P धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  19. महेंद्रकाका,
    होय अगदी अगदी >>एक गोष्ट मिळवल्यानंतर त्यातलं सुख न उपभोगता दुसरी कुठली तरी गोष्ट जास्त चांगली आहे, ती हवी कायम दुःखी रहातो
    प्रॉब्लेम हाच असतो.. आपल्याला हे कळूनपण वळत नाही.. अन जे मोठमोठे संत महात्मे होऊन गेले..त्यांना नेमकं हेच टाळायला जमलं. :)

    ReplyDelete
  20. राज,
    छान आहे रे कविता!
    धन्यवाद मित्रा!

    ReplyDelete
  21. अनघाताई,
    >>त्यांच्या सुखांच्या कल्पना आणि आपल्या कल्पना ह्यातील तफावतींमुळे कायम एक आतल्याआत झगडा चालू रहातो...
    खरंच.. आपलं 'आतलं जग' नेहमीच एक महत्वाचा पण सुप्त भाग बनून राहतं. आणि त्या जगाला नियम लागू नसतात, अन त्यामुळेच बर्‍याच गोष्टी सेन्सलेस वाटत राहतात. :)

    ReplyDelete
  22. माऊताई,
    हेहे..अगं मनाला काहीही नाही लावून घेतलं. असंच टीपी म्हणून प्रवचनं पाहतो थोडावेळ..
    तुम्ही सगळे आहातच पाठीशी त्यामुळेच नव्या जोमानं शोधकार्य सुरू केलंय ;)

    ReplyDelete
  23. विनायकजी,
    खूप खूप धन्यवाद! :)

    ReplyDelete
  24. सिद्धार्थ,
    तू सांगतोस तोच योग्य मार्ग आहे. पण बहुतेकदा आपण सबकॉन्शस पातळीवरती हा शोध घेत असतो. अनेकदा आपण का दुःखी असतो ते आपल्यालाच कळत नाही. ज्यानं सुवर्णमध्य काढला तो जिंकला! :)
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  25. विक्रांत,
    :) खूप खूप आभार!

    ReplyDelete
  26. श्रीताई,
    हो ना! तसंच होत असावं. अज्ञाताचा शोध. कधीच न सरणार्‍या एकमेव चिरंतन सुखाचा शोध! :)

    ReplyDelete
  27. आरश्यासमोर उभा रहा आणि स्वतःला एक फावडा स्माईल दे. stop questioning and thinking... start living...

    ReplyDelete
  28. जे मिळत त्यातल सुख संपत - म्हणून सुखाचा शोध (आणि दु:खही) चालू राहत खर तर :-)

    ReplyDelete
  29. Personal space varun kaal ch mitrane share keleli hi ad aathavli

    http://www.ibelieveinadv.com/2011/02/klm-personal-space-experiment/

    ReplyDelete
  30. सौरभ,
    बहुतेकदा असंच सगळं झटकून उभं राह्यला मजा येते खरंच! :)

    ReplyDelete
  31. सविताताई,
    होय.. तीच गंमत आहे त्यातली :)

    ReplyDelete
  32. निनाद,
    जबरदस्त आहे ही लिंक!! अगदी हेच जाणवलं होतं मला! :)
    धन्यवाद रे भाऊ!

    ReplyDelete
  33. एकदम बाबा महाराजांच्या मठात बसवलस ...बोला बाबा महाराजी की...:)

    ReplyDelete
  34. सॉलिडच आहे बाबा हे....

    मस्तच..

    ReplyDelete
  35. विभि भो...आपल्याला एक सुख मिळाल की लगेचच दुसर्‍याचा शोध चालु होत...कुठे थांबायच हे जोपर्यंत उमगत नाही तोपर्यंत हा शोध चालुच राहणार...तु सुंदर शब्दबद्ध केल आहेस...आवडल.

    ReplyDelete
  36. बा वत्सा, सुखाचा शोध घेण्यात सुख शोधावा.. सुखी होता येईल मग.कारण शोध कधी संपणारा नाही, त्यामुळे हे ’सुखाचा शोध घेण्यातले सुख’ सुद्धा कधीच संपणार नाही आणि चिरंतन टिकणारे सुख लाभेल.. कसे आहेत स्वामी संकेतानंदांचे विचार??? तुझे कल्याण होवो !!

    ReplyDelete
  37. अपर्णा,
    हेहेहे... एव्हढं झालं की काय खरंच! :P

    ReplyDelete
  38. सारिका,
    ब्लॉगवर स्वागत! खूप धन्यवाद!
    भेट देत राहा! :)

    ReplyDelete
  39. योगेश,
    हे मात्र खरं.. की चिरंतन शोध चालूच राहतो! धन्यवाद रे भाऊ! :)

    ReplyDelete
  40. संकेतानंद,
    >>सुखाचा शोध घेण्यात सुख शोधावं
    लई भारी भावा... आवडला विचार! :)

    ReplyDelete
  41. Anonymous11:13 PM

    >>>फक्त शोध घेता घेता आजूबाजूच्या गोष्टीचा आस्वाद घ्यावा. नाहीतर आपण शोधत शोधत पुढे जातो आणि शेवटी मागे वळून पहातो तेंव्हा आधीच आलेले आनंदाचे क्षण हातून निसटून गेलेले असतात. त्या परिस शोधणार्‍या माणसासारखे.

    ही सिद्धार्थची प्रतिक्रिया आणि त्यावर तुझा खालील उत्तर
    >>>>सिद्धार्थ,
    तू सांगतोस तोच योग्य मार्ग आहे. पण बहुतेकदा आपण सबकॉन्शस पातळीवरती हा शोध घेत असतो. अनेकदा आपण का दुःखी असतो ते आपल्यालाच कळत नाही. ज्यानं सुवर्णमध्य काढला तो जिंकला!

    ह्यात पूर्ण सार आला तुझ्या लेखाचा ....!!!
    आल्प्सासाठी कधी निघातोयास.... :)

    ReplyDelete
  42. देवेन,
    अरे त्यादिवशी फारच वैचारिक अभिसरण झालेलं.. त्यामुळे आल्प्सची इच्छा.. नंतर कॅन्सल केली आयडिया ;)
    धन्यवाद रे!

    ReplyDelete