2/04/2011

समान शत्रू

काल मित्रांसोबत कॉफी घेताना नेहमीप्रमाणेच 'चिंता करितो विश्वाची' चाललं होतं. विषय होता 'इजिप्त'. मी म्हटलं, 'वेस्टर्न मीडिया सध्या लोकशाहीवादी अन मुस्लिम ब्रदरहूड ह्या दोन विरोधी पक्षांमध्ये कसे मतभेद आहेत हे दाखवण्यात गुंग आहे. अन खरंच गंमत होणार आहे सगळी. कारण मुस्लिम ब्रदरहूड हा कट्टरवादी पक्ष आहे अन बाकी लोकशाहीवादी आहेत. पण दोघेही होस्नी मुबारकच्या मात्र विरूद्ध आहेत.'
तेव्हा एका मित्रानं एका सामाजिक प्रयोगाबद्दल सांगितलं, ज्यामध्ये दोन युवकांचे गट बनवण्यात आले अन त्यांना एका कॅम्पवर ठेवण्यात आलं. अन काही कारणांचं निमित्त करून त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण करण्यात आलं. मग त्यांचं आपापसातलं वैमनस्य मिटवायचे प्रयत्न सुरू केले गेले. पण वैमनस्य मिटेना. मग त्यांच्या धर्मांचे धर्मगुरूही बोलावले गेले. धर्मगुरूंचं सांगणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं अन त्यानंतर त्यांनी आदरपूर्वक वैमनस्य संपवायला नकार दिला. निर्वाणीचा उपाय म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणार्‍या ह्या गटांच्या कॅम्पचं पाणीच तोडून टाकण्यात आलं. दोनेक दिवस उलटल्यानंतर पाण्याची समस्या गंभीर बनली. अन मग थोडा शोध घेता दोन्ही गटांच्या लक्षात आलं की पाण्याचा मुख्य पाईपच कापण्या आलाय अन आता तो पाईप दुरूस्त करण्यासाठी सगळ्यांना एकत्र काम करावं लागेल. मग त्या दोन्ही गटांनी मिळून एकत्र तो पाईप दुरूस्त केला अन कॅम्पवरचं संकट टळलं. पण इतक्या उपायांनीही शक्य न झालेलं काम म्हणजे दोन्ही गटांचं मनोमिलन पाणीटंचाईनं घडवलं. अर्थात नंतर त्यांच्यात पुन्हा भांडणं झाली का वगैरे तपशील मला ठाऊक नाहीत. पण तात्पर्य हे की, समान शत्रू नेहमीच दोन किंवा अधिक गटांना एकत्र आणतो.
मी कॉलेजात असताना डब्ल्यू डब्ल्यू एफच्या कुस्त्या पाहायचो (अजूनही वेळ मिळेल तेव्हा पाहतो). त्यात जेव्हा ट्रिपल थ्रेट किंवा फोर-वे अर्थात निघांचा किंवा चौघांचा सामना असायचा, तेव्हा सर्वांत ताकदवान एकासमोर बाकीचे सगळे एक व्हायचे अन सर्वप्रथम सगळ्यांत ताकदवान प्रतिस्पर्ध्याला बाहेर काढण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग ते आपापसात लढून पुढचा निर्णय घ्यायचे. तसंच काहीसं इजिप्तमध्ये चालू आहे. होस्नी मुबारकच्या ३० वर्षांच्या एकछत्री सत्तेला विरोध करण्यासाठी सगळेच अतृप्त गट उभे राहिलेत. मग समान शत्रू मुबारकला प्रथम हटवण्यासाठी ते सगळे आपापसांतले मतभेद भांडणंदेखील बाजूला ठेवून एकत्र लढत आहेत.
त्यावरनं पुढे थोडी विवादास्पद चर्चा झाली. ती म्हणजे भारतासारखा प्रचंड विरोधाभासी देश फक्त दहशतवाद, पाकिस्तान ह्यांसारख्या समान शत्रूंमुळे अजूनही एकत्र उभा आहे. ज्या दिवशी ही कारणं संपतील, त्यादिवशी आपले तुकडे पडणं निश्चित आहे. मला स्वतःला हे विधान फारसं पटलं नाही, पण एक क्षण अंगावर काटा आला. म्हणजे, ज्या गोष्टीसाठी पाकिस्तानातल्या अनेक शक्ति अक्षरशः आकाशपाताळ एक करताहेत, ते फक्त त्यांना स्वतःला संपवून मिळू शकतं? पण मग आपले लोक निरक्षरता, गरीबी, बेरोजगारी, अंधश्रद्धा असल्या समान शत्रूंविरूद्ध का एक होऊन लढू इच्छित नाहीत? असा एक काव्यात्म विचारही माझ्या मनात आला. पण पुढच्या क्षणी ते कोडंसुद्धा सुटलं, कारण जर ह्या समान शत्रूंविरूद्ध आपण लढलो, तर आपण एक होऊ अन आपल्यातल्या दुहीचा फायदा घेणारी माणसं आयुष्यातून उठतील. त्यामुळे सध्या ते सगळे (वाचा राजकारणी) आपापसातले मतभेद विसरून फक्त त्यांचा समान शत्रू म्हणजे सामान्यांमधली जागृती, एकी ह्याविरूद्ध लढताहेत अन लोकांसमोर अस्तित्वात नसलेला शत्रू उभा करून आपला कार्यभाग साधताहेत. सध्यातरी ते त्यात यशस्वी होतानाच दिसताहेत. महाराष्ट्रात ह्याचं जिवंत उदाहरण पुतळे, समाध्या अन चित्रांवरून निर्माण होणार्‍या दंगलसदृश स्थितीच्या रूपात समोरच आहे.

26 comments:

  1. अगदी योग्य.. सहमत !

    ReplyDelete
  2. काही वर्षापूर्वी अशाच पुतळ्याच्या कारणावरून मित्राशी चर्चा करत होतो. आपल्या देशात विघातक कार्य करणार्यांना स्वत:ला शस्त्रास्त्रांची गरजच नाही, फक्त कुठल्यातरी पुतळ्याची विटंबना करायची. लगेच लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. दंगली होतात.

    लोकांसमोर अस्तित्वात नसलेला शत्रू उभा करून आपला कार्यभाग साधताहेत. सध्यातरी ते त्यात यशस्वी होतानाच दिसताहेत हेच खरंय.

    ReplyDelete
  3. सहमत बाबा.. टाईम्स मध्ये वाचलं होतं, इंग्रज लोकांमधील विचारवंतांनी असं सांगितलं होतं की इतकी विविधता असणार्‍या भारताचे लवकरच तुकडे होतील (स्वातंत्र्याच्या वेळी).. पण इतक्या दिवसांनंतरही भारत टीकून आहे त्याची कारणं बहुदा तू म्हणतोस तीच आहेत.. अगदी सहमत..

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर....सहमत...

    ReplyDelete
  5. पण मला वाटत हल्ली हे काही लोकांच्या लक्षात येऊ लागलंय, कि हे पुढारी आपल्याला नको त्या गोष्टीत अडकवतायत. व त्यातून ते 'स्वहिता'साठी, जनतेचे लक्ष नाही त्या गोष्टीत गुंतवून ठेवतायत. मग आपण एकमेकांशीच भांडत बसतो...जाळपोळ करतो, दंगली माजवतो. आपल्याला मस्तपैकी 'उल्लू' बनवतायत आणि स्वत: गब्बर होतायत. आपण म्हणजे कोंबड्या..हे पुढारी आपल्यात लावून देणार झटापट आणि हे बाहेर उभे राहून बघणार गंमत!
    लावासा प्रकरण बाहेर आले तर लगेच कांदे महागले!
    ह्याला उपाय काय हे नाही कळलेलं अजून. मतदान हा उपाय मानावा, तर हे XX उमेदवार पण गुंडच!

    ReplyDelete
  6. आपापसात लढणे हे बाहेरच्यांबरोबर लढण्यापेक्षा कमी जबाबदारीचे असल्यानेच केवळ अजून भारत एकसंघ आहे .:)

    ReplyDelete
  7. फोडा आणि राज्यकरा हाच या राजकारण्यांचा मंत्र आहे.

    ReplyDelete
  8. Anonymous9:20 PM

    अगदी सहमत.

    ReplyDelete
  9. सहमत!!!! जटील विषय आहे... गर्दीचे मानसशास्त्र कामी येते अशा जागी !! आपण गर्दीला कुठल्या विषयाचे महत्त्व पटवून देतो त्यावर गर्दी निर्णय घेते आणि वागते.. जर मी जनतेला पटवेन की बिहारींचे महाराष्ट्रात स्थलांतर जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे तर भारनियमन आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी महत्त्वाच्या वाटू लागतात. स्थलांतराचा मुद्दा बातमी बनतो आणि जनतेच्या खर्‍या समस्य़ांकडे दुर्लक्ष होते.पोळी भाजली जाते. समान शत्रू नकळत बदलला जातो. उपासमार समान शत्रू न बनता पुतळ्याची विटंबना बनते.. आपला ’खरा’ समान शत्रू कोण हे गर्दीला पटले पाहिजे तर योग्य दिशेने वाटचाल होते, अन्यथा जाळपोळ ,दंगल आहेच !! कष्टी करणारी बाब पण सत्य !!
    छान विषय काढलास..

    ReplyDelete
  10. You said it! अगदी बरोब्बर आहेत तुमचे निष्कर्ष!

    ReplyDelete
  11. देवदत्त,
    खरंच, 'मुकी बिचारी कुणी हाका' सारखा प्रकार होतो बरेचदा!

    ReplyDelete
  12. आनंद,
    वरवर तरी तसंच चित्र दिसतंय खरं! :)

    ReplyDelete
  13. योगेश,
    धन्स भाऊ! :)

    ReplyDelete
  14. अनघाताई,
    खरं आहे की हल्ली थोडंफार कळतं आहे लोकांना, पण अजून ते फक्त एकाच ठराविक छोट्या वर्गाला... जो खरा मतदार आहे (थोडक्यात जो नेमानं भरघोस मतदान करतो) तो मात्र अजूनही अज्ञान अन निरक्षरतेच्या फासातून बाहेर आलेला नाही. त्यामुळे हे विदारक चित्र अजून बराच काळ असंच राहण्याच्या शक्यता आहेत! :(
    आपली मात्र वांझोटी चिडचिड होत राहते!

    ReplyDelete
  15. राजीवजी,
    तसंच असावं! :-|

    ReplyDelete
  16. अलताई,
    ब्रिटीश गेले अन दुर्दैवाने आपलीच माणसं त्यांचाच कित्ता गिरवत बसलीत! :(

    ReplyDelete
  17. राज,
    धन्यवाद मित्रा!

    ReplyDelete
  18. संकेतानंदा,
    अरे एकदम सिंपल फिलॉसॉफी आहे...
    विदर्भापासून शेकडो मैल दूर, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरून लक्ष उडवणं सोपं आहे. त्याचप्रमाणे मुंबईपासून दूर परप्रांतीय लोंढ्यांच्या मुद्द्यावरून.. असाच खेळ खेळत राहतात... पण त्यांना नेमून दिलेलं प्रशासनाचं काम मात्र ते लोक करत नाहीत...अन आपण मूर्ख बनत राहतो :(

    ReplyDelete
  19. विनायकजी,
    धन्यवाद! :)

    ReplyDelete
  20. गोरे गेले पण त्यांची रणनिती मात्र भारताच्या नसानसात रुजवून गेले. :(

    एकदा इकडे दगड मारायचा... भावना भडकावायच्या... मग अर्ध तुटलेलं लटकत मुंडकं तसंच सोडून दुसरीकडे दगड मारायचा... अव्याहत चालणारा खेळ...

    मुक्या जनतेतील मुठभरांना हाताशी पकडून त्यांच्या बिनडोक डोक्यात आपला मसाला भरून ठिणगी लावून टाकायची झालं...

    ReplyDelete
  21. bhari post aahe baba....ekdam 100% patesh....salaam..

    ReplyDelete
  22. श्रीताई,
    खरंच
    >>गोरे गेले पण त्यांची रणनिती मात्र भारताच्या नसानसात रुजवून गेले.
    मनस्ताप होतो फक्त! :(

    ReplyDelete
  23. अपर्णा,
    धन्यु गं! :)

    ReplyDelete
  24. Anonymous11:29 PM

    बाबा अगदी सहमत...

    ReplyDelete