स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

2/20/2011

आरसा

मी जिथे काम करतो तिथे विविध देशांमधल्या विविध यंत्र बनवणार्‍या कंपन्यांची माणसं येत असतात. अन त्यातल्या बहुतेक कंपन्या अन त्यांची माणसं गेली कित्येक वर्षं आमच्या कंपनीत येताहेत. त्यामुळे त्यांना आमच्या मुंबई ऑफिसातून येणार्‍या इंजिनियर्सबद्दल माहिती असते. त्यामुळे इटालियन कंपनीच्या ऑफिसात भारतीय माणूस चर्चेसाठी बसलेला पाहून कुणालाही सहसा आश्चर्य वाटत नाही, किंबहुना आम्ही भारतीय आहोत हे त्यांना आधीपासूनच ठाऊक असतं (हे आधीच स्पष्ट करण्याचं कारण पुढे कळेल). तशातच मध्यंतरी एका जुन्याच इटालियनच कंपनीची माणसं चर्चेसाठी आली होती. नेहमीप्रमाणे दुपारी जेवायला मी त्यांच्याचबरोबर गेलो. माझा सहकारी इटालियनच असल्याने सगळे त्यांच्या भाषेत सुरू होते. माझ्यासमोर त्यांच्यातला एक मनुष्य बसला होता. तो माझ्याशी बोलू लागला. त्यानं पहिल्याच प्रश्नावर माझी दांडी उडवली अन बर्‍यापैकी पुढे वैचारिक असं आमचं संभाषण झालं. ते असं -
(मी संवाद मराठीमध्ये अनुवादित केला आहे)

तो- माफ कर पण मला एक सांगा, तू नक्की कुठला आहेस? (मला पहिला यॉर्कर, माझा घास घशातच अडकला)
मी- (त्याच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत) भारत.
तो- ओह, भारत! (हे वाक्य एखाद्या मुंबईतल्या अमेरिकन कॉन्सुलेटच्या फेर्‍या मारून थकलेल्या व्हिजाकांक्षी तरूणानं 'ओह, अमेरिका!' म्हणावं, त्या थाटात तो म्हणाला, जे अर्थातच खोटं असल्याचं मला ठाऊक होतं.)
मी- (मला का कुणास ठाऊक असं वाटलं की त्याला मी भारतीय आहे हे ठाऊक आहे अन तो शहर विचारत होता म्हणून लगेच म्हटलं) मुंबई!
तो- (मगाचच्याच थाटात) ओह, मुंबई!
मी- (त्याच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत फक्त केविलवाणा हसलो)
तो- मग तुला मिलानचं ट्रॅफिक आणि मुंबईचं ट्रॅफिक ह्यांच्यात काय चांगलं वाटतं? (मला दुसरा यॉर्कर! काय संबंध ह्या प्रश्नाचा?)
मी- (पूर्ण गोंधळल्याचे भाव चेहर्‍यावर) मिलान! (तो मिलानचा नसून ऑस्ट्रियन बॉर्डरवरच्या एका छोट्या अन अजून सुबक शहरातला असल्याचं मला ठाऊक होतं)
तो- (आता तो गोंधळला) हे आश्चर्य आहे! तू पहिला माणूस भेटलास मिलानच्या ट्रॅफिकला चांगलं म्हणणारा! (बहुतेक त्याला आजवर युरोपबाहेरचा कुणी भेटलाच नाही)
मी- तू मुंबईला आला नाहीयेस बहुतेक अजून. मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे सावळागोंधळ असतो.
तो- ओह, मला फिरण्याची फारशी आवड नाही. मी फक्त इटलीच्या उत्तरेकडेच फिरतो, तेही जास्त करून फार उत्तरेकडचा युरोप, स्कॅन्डेनेव्हिया वगैरे. मला फारसं आवडत नाही अजून कुठे जायला.
मी- (मनातल्या मनात - चूलकोंबडा आहेस म्हण ना! अन बाहेर) ओह, छान! चांगलं आहे.
तो- इटली अन उत्तरेकडच्या देशांचा फरक लगेच कळतो रे!
मी- माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह त्यालाही दिसलं.
तो- म्हणजे स्वच्छता, शिस्त, टापटीप.
मी- ह्म्म!(माझ्यासाठी आधीच मिलानदेखील, स्वच्छ अन टापटीप आहे. अर्थात इतर युरोपच्या मानानं इटली गलिच्छ म्हणता येईल. पण एका इटालियन माणसानंच इटलीची अशी अब्रू काढावी हे माझ्यासाठी नवल होतं.)
तो- अरे हायवेवरून जाताना कळत माहितीय. तू हायवेला कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये थांब अन तिथल्या स्वच्छतागृहामध्ये जा!(मी कान देऊन तो पुढे काय बोलतो ते ऐकत होतो अन मनातल्या मनात ह्या सुट्टीमध्ये फूडमॉलमध्ये एशियाड थांबली असतानाच्या आठवणी जागवत होतो) तुला माहितीय ऑस्ट्रियामध्ये लहान मुलांसाठी सेपरेट स्वच्छतागृह असतात?
मी- अच्छा!(मधेच ह्याच्या गाडीनं हायवेवर टर्न घेतला. अन मुलांसाठी स्वच्छतागृह तर मी मिलानमधल्या मॉलमध्ये पण पाहिल्याचं मला स्मरत होतं (बहुतेक मुंबईतल्यापण).)
तो- हां, तर ऑस्ट्रियातली हायवे रेस्टॉरंट्सची स्वच्छतागृह बघ अन इटलीतली बघ, फरक लगेच कळतो.
मी- एक सहमतीचं हास्य.
तो- अरे इटलीतली इतकी गलिच्छ असतात की जावंसं वाटत नाही, अन ऑस्ट्रियातली अशी असतात की तू ऍक्च्युअली त्यांना लिव्हिंग रूम समजून तिथेच राहू शकतोस.
मी- आयला हो? (इथे इंग्रजीतलं 'रियली?' असं होतं. अन मी मनात म्हटलं की बरंय बाबा हा भारतात नाही आला.)
तो- माझ्या मते सार्वजनिक स्वच्छतागृह हा स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा असतो.
मी- खरं आहे! (स्वामीजींनी एक जबरदस्त 'पते की बात' फायनली केली होती. त्याचं वाक्य मला पुरेपूर पटलं होतं.)

माझ्या शेवटच्या 'खरं आहे!' मधली सत्यता त्यालाही जाणवली अन तो खुष झाला. आणि मग स्वच्छतागृह पुराण थांबवून कामाची थोडी चर्चा करू लागला. मीही केव्हापासून तो 'भारतात हे कसं असतं?', असं काहीतरी विचारेल ह्या दहशतीखाली जेवत होतो, ते आता मोकळेपणाने जेवू लागलो.

34 comments:

 1. हाहाहाहा ....
  एखाद्या मुंबईतल्या अमेरिकन कॉन्सुलेटच्या फेर्‍या मारून थकलेल्या व्हिजाकांक्षी तरूणानं 'ओह, अमेरिका!' म्हणावं, त्या थाटात तो म्हणाला

  सार्वजनिक स्वच्छतागृह हा स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा असतो. एकदम खरंय.

  ReplyDelete
 2. "केव्हापासून तो 'भारतात हे कसं असतं?', असं काहीतरी विचारेल ह्या दहशतीखाली जेवत होतो, ते आता मोकळेपणाने जेवू लागलो."

  खरंच किती भिती वाटत असेल नाही का?? जोक अपार्ट, पण आपल्याकडे अजूनही बराच स्कोप आहे इम्प्रुव्हमेंटला.

  ReplyDelete
 3. मीही केव्हापासून तो 'भारतात हे कसं असतं?', असं काहीतरी विचारेल ह्या दहशतीखाली जेवत होतो, ते आता मोकळेपणाने जेवू लागलो. :) :) :) :)

  ReplyDelete
 4. Anonymous8:27 PM

  व्हिजाकांक्षी ;) :)

  पते की बात एकदम पटली :)
  >>>मीही केव्हापासून तो 'भारतात हे कसं असतं?', असं काहीतरी विचारेल ह्या दहशतीखाली जेवत होतो, ते आता मोकळेपणाने जेवू लागलो.

  अक्षरश: .... पोस्टचा वहाता ओघ पहाता तू भारतात हे कसे असते याचे कसे वर्णन करणार या विचाराने मी ही धास्तावले होते ;)

  ReplyDelete
 5. कुठल्या तरी दिवाळी अंकातल्या एका लेखात वाचले होते मी असे. मुलगा लग्नासाठी म्हणून मुलगी पहायला जातो. आणि त्याची आई ते लोक कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी स्वच्छतागृहातील स्वच्छतेचा एक निकष लावतात.

  ReplyDelete
 6. विभि...

  भारतीय अन पाश्चात्य संस्कृती मध्ये मुख्य काय फ़रक आहे???

  पाश्चात्य देशात तुम्ही कोठेही किस करु शकता पण सुसु नाही केलीच तर दंड.

  याउलट भारतात तुम्ही कोठेही सुसु करु शकता पण जर काय किस केला तर..........

  समजल ना????

  बाकी पोस्ट भारी... :) :)

  ReplyDelete
 7. विभी.. हे हे हे...

  बाबाच्या भिंतीवर बसुन बरंच काही वाचायला मिळतंय...

  ReplyDelete
 8. अशी पद्धत ऑफीस निवडताना पण करतात, म्हणजे तिथली वॉशरूम्स किती काटेकोरपणे स्वच्छ असतात ह्यावरून मालकाची वचक दिसते :)

  सार्वजनिक स्वच्छतागृह हा स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा असतो. एकदम मान्य..लाख पते की बात

  ReplyDelete
 9. सार्वजनिक स्वच्छतागृह हा स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा he agdi kharech, tyala ekda ST stand waril mutrigharat nyala have. Excellent article. Please also read articles on my Blog: http://prakashwata.blogspot.com

  ReplyDelete
 10. >> सार्वजनिक स्वच्छतागृह हा स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा >>
  काय बोलून गेला राव तो..

  >>मीही केव्हापासून तो 'भारतात हे कसं असतं?', असं काहीतरी विचारेल ह्या दहशतीखाली जेवत होतो, ते आता मोकळेपणाने जेवू लागलो. >>
  हे तर भारीच :)

  ReplyDelete
 11. सार्वजनिक स्वच्छतागृह हा स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा ... पते की बात! :) आणि योमू +१००, :D

  ReplyDelete
 12. आनंदा,
  अरे खरंच तो एकदम वेगळ्याच आविर्भावाने, आदराने खोटं बोलला! :)

  ReplyDelete
 13. महेंद्रकाका,
  खरंच, आपल्याकडे प्रचंड स्कोप आहे, पण इच्छाशक्ती नावाचा प्रकार नाही. चलता है चलाते रहो, ह्या फंड्याने आपली वाटचाल असते सहसा! :)

  ReplyDelete
 14. विक्रम,
  अरे खरंच एकदम सांभाळून बोलत होतो मी, त्यानं विषय बदलल्यावर मी सुटकेचा निःश्वास टाकला! :)

  ReplyDelete
 15. तन्वीताई,
  अगं पर्सनली मला कुठलाही विषय कुठेही बोलताना बिलकुल काहीही वाटत नाही. आत्यंतिक निर्विकारपणे मी चर्चा करू शकतो, जेवतानाही ;)
  पण इथे चर्चा हळूहळू देशाच्या दिशेने सरकायला लागली होती, तिथे तडजोड नाही! :D

  ReplyDelete
 16. सागर,
  मी अशाच पद्धतीचं कुठेतरी वाचल्याचं स्मरतंय खरं, पण तेच असेलसा भरवसा नाही! पण खरंच बरेचदा माणसांची एकंदर मानसिकता कळते हे सत्य आहे! :)

  ReplyDelete
 17. योगेश,
  पार बाराकार मारून गेलास की रं!!!
  (नारदाच्या वाक्याला टाळी आमच्या बाबांनी घेतली च्या तालावर! ;) )

  ReplyDelete
 18. सारिका,
  खूप धन्यवाद! :)

  ReplyDelete
 19. सुहास,
  अरे एकदम बोलता बोलता तो तत्वज्ञान सांगून गेला! :)

  ReplyDelete
 20. प्रकाश देवकाका,
  ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद!
  नक्की वाचतो तुमचा ब्लॉग! :)

  ReplyDelete
 21. मयूर,
  अरे विषय कुठून कुठे घेऊन गेला, पण बात पते की करून गेला!! :)
  धन्यवाद रे!

  ReplyDelete
 22. श्रीताई,
  माझ्या डोक्यातच काय अनेकांच्या डोक्यात असे विचार येत असतील, पण ह्या मनुष्यानं इतका मस्त सारांश काढला, की एकदम कौतुक वाटलं त्याचं!
  अन योगेशनं तर काय, आज एकदम युसूफ पठाणची खेळी खेळलीय इथं! ;)

  ReplyDelete
 23. त्याने जो निकष सांगितलेला तो मी काही महिन्यांपूर्वी वाचला होता.त्याचे म्हणणे अगदी खरे आहे रे..
  बाकी अजून एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? स्वतःच्या देशाला शिव्या घालण्याची प्रवृत्ती वैश्विक आहे.. फ़क्त आपणच ते करत नाहीत.

  ReplyDelete
 24. संकेतानंद,
  अरे स्वतःच्या देशाला शिव्या सगळेच घालतात, पण सहसा इतर देशीयांसमोर नाही... पण इथे काही वेगळंच होतं... हा मनुष्य वेगळ्याच मूडमध्ये होता! :D

  ReplyDelete
 25. बाबा,
  बर्याच दिवसांनी वाचतोय ब्लोग....
  आवडला...मस्त लिहिला आहे... मी कल्पना करू शकतो जेवतानाची चर्चा

  ReplyDelete
 26. थोडक्यात स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा असलेलं सार्वजनिक (अ)स्वच्छतागृह हे आरश्यासारखं स्वच्छ असलं पाहिजे.. नाही का? :)

  योमुं(नारदा), बाबाच्या वाक्यावर टाळी घेतलीस तू :D

  ReplyDelete
 27. खरं आहे. (ह्यात तुझ्या बोलण्यातली सत्यता आहे बरं का?)

  बाकी महेंद्र काका +१. फक्त बराच ऐवजी मी बराराराराराराराराssssच म्हणेन.

  ReplyDelete
 28. अरे ही पोस्ट सुटली होती की काय...बाबा वाचताना माझ्या अंगावर काटा आला...:D
  अगदी हा नाही पण भारताबद्दलच्या काही प्रश्नामुळे प्रदेशात कानकोंड व्ह्यायचे प्रसंग येतातच ....एकदा माझी शेजारीण तिची गर्दीची व्याख्या सांगत होती तेव्हा मी मनात म्हटलं हिला जर मी मुंबईला घेऊन गेले तर विमानतळावरूनच पळ काढेल...

  ReplyDelete
 29. अरे बापरे इथे मी उत्तरं दिलीच नव्हती होय! :-o
  अवधूत,
  हो रे.. आपली संभाषणं तुला चांगलीच ठाऊक आहेत! :D
  धन्यवाद भाऊ!

  ReplyDelete
 30. हेरंबा,
  हो ना... अगदी आरशासारखं स्वच्छ! :)
  योमुं म्हणजे आपला पिंच हिटर झालाय! :D

  ReplyDelete
 31. सिद्धार्थ,
  :D
  'खरं आहे!' :)

  ReplyDelete
 32. अपर्णा,
  होय.. कधीकधी कानकोंडं व्हायला होतं.. कारण शेवटी आपल्या अन त्यांच्या संस्कृतीत अन बर्‍याच गोष्टींच्या प्राथमिकतेत फरक आहेत, जे सगळेच समजू शकतात असं नाही...
  गर्दीचं मात्र एक नंबर, बरेच गोरे गांगरतात! :D

  ReplyDelete
 33. Anonymous11:24 PM

  ती पते कि बात एकदम पटली .... मला वाटते त्याने स्लमडॉग पाहिला असेल म्हणून जेवताना तुला इथल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाबद्दल विचारलं नसेल...योमुची प्रतिक्रिया भारी ....

  ReplyDelete
 34. देवेन,
  मला डाऊट आहे की त्याला भारताबद्दल काहीही ठाऊक होतं. त्याला खरंच काहीच कल्पना नसावी असं मला एकंदर त्याच्या बोलण्यावरून वाटलं. एनीहाऊ.. वाचलो एव्हढं खरं ;)

  ReplyDelete