4/25/2010

ब्लाईंड चान्स, किएस्लोव्स्की आणि मी

"समांतर विश्व" नावाचा एक प्रकार असतो, ऐकला असेल तुम्ही सगळ्यांनी, सगळ्यांनी नाही तरी बर्‍याच जणांनी. थोड्क्यात सांगायचं झालं तर आपण जशी निवड करतो,जश्या शक्यता असतात किंवा जसे निर्णय घेतो, त्यावरून पुढची घटना ठरते. म्हणजे उदाहरणार्थलल्या मोदी सकाळी उठतो, तो ठरवतो की आज थरूरला कोपर्‍यात घ्यायचा, चांगलीच जिरवायची त्याची. 'आपल्याशी पंगा घेतो काय?' मग तो संगणक चालू करतो, जालसंपर्कित(ऑनलाईन - आभार-"शुद्ध मराठी") होतो आणि ट्विटर चालू करतो. कोची टीमच्या काळे पैसे धारकांची नावे टाईप करतो आणि कळ दाबणार तेव्हा -
. तो विचार करतो की जाउ दे. कशाला उगाच नडनडी, आपण पुन्हा एकदा बोलू त्याच्याशी, गॅबीचं प्रकरणही वेगळ्या प्रकारे निस्तरता येईल. शरदकाकांशी बोलून लातूरच्या पार्टीलाही शांत करू आणि वसूमावशींशी बोलून नंदूकाकालाही समजावता येईल. शश्या कसाही असला तरी आपला एकेकाळचा दोस्त आहे. हां आता लडकी की वजह से दोस्ती मे दरार तो आती है, पण दोस्त दोस्त को समझ नही पायेगा तो कौन? आणि तो लिहिलेलं खोडून टाकतो. गॅबीसाठी शश्याला पाठवलेले मेल्स काढून टाकतो. गॅबीला लिहिलेले मेल्स काढून टाकतो. शांत चित्ताने पैश्यांचे नवे आकडे तपासतो आणि संगणक बंद करून पुढच्या कामांना लागतो. मग सगळं ठरल्याप्रमाणे होतं. "एकमेकां साह्य करु, अवघे धरू सुपंथ।"
. तो विचार करतो - "साला मित्राच्या पाठीत खंजीर खुपसतो, तेही एका बाईवरून! रॉट इन हेल!" आणि कळ दाबतो. पुढे काय होतंय ते सगळ्यांना दिसतंय.
ही म्हणजे दोन "समांतर विश्व". एका निवडीवर, एका शक्यतेवर अवलंबून. ही समांतर विश्व खरोखर अस्तित्वात असतात असंही काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे, आत्ता मी जसा आहे, त्याहून वेगळा मी पण ह्या अथांग विश्वात कुठेतरी आहे, म्हणजे थोडक्यात माझ्या असंख्य निवडींवरून जन्मलेले असंख्य मी अस्तित्वात आहेत आणि अजून चालूच आहेत. असो, मुद्दा तो नाही. मुद्दा हा की ह्या जबरदस्त संज्ञेचा वापर करून कोणी चित्रपट बनवला नाही तरच आश्चर्य वाटेल. पण सत्य हे आहे की आजवर माझ्या माहितीप्रमाणे ह्यावर जास्त सिनेमे आलेले नाहीत. आणि त्यातले दोन मी स्वतः पाहिलेत, बाकींबद्दल मी फक्त ऐकलंय किंवा वाचलंय. पण जो सिनेमा मी काल पाहिला - 'किएस्लोव्स्की'चा "ब्लाईंड चान्स" - त्याचं गारूड अजूनी उतरत नाहीये.
त्याचं झालं असं. मी इथे 'झी टीव्ही यूके' चा पंखा आहे. पर्यायच नाहीये, माझ्याकडे झी यूके आणि झी सिनेमा यूके एव्हढे दोनच हिंदी चॅनेल्स येतात. तर त्यावरती जे विलक्षण सिनेमे लागतात ते पाहून माझं भारतीय सिनेमाबद्दलचं ज्ञान प्रचंड वाढलंय. नावही न ऐकलेले हिंदी सिनेमे, जुन्या काळचे हिंदी सिनेमे, ते दक्षिणेकडचे डब केलेले सिनेमे असे सगळे प्रकार इथे आवर्जून पाहायला मिळतात. एकदा असाच एक दक्षिणेकडचा सिनेमा डब केलेला लागला होतो.  दाक्षिणात्य भारतीय सिनेमाला माझ्या मनात एक वेगळंच (आदराचं{हे तिरकस पकडायचं की सरळ वळणाचं हे तुमचं तुम्ही ठरवा}) स्थान आहे. त्यामुळे मी मनापासून तो चित्रपट पाहू लागलो. पण काही तसंच महत्वाचं काम निघाल्याकारणे मी तो सिनेमा पाहू शकलो नाही. पुन्हा महिन्याभरात तोच सिनेमा लागला(हे अतिशय सामान्य आहे, चकित होण्यासारखं काही नाही. म्हणूनच एखादा सिनेमा मिस केल्याचं टेन्शन येत नाही). ह्यावेळी मी तासभर पाहिला(मधूनच) पण मला बिलकुल काहीही अर्थबोध झाला नाही. हा माझ्या बुद्धीचा आणि सिनेमाविषयक ज्ञानाचा सरळसरळ अपमान होता. सिनेमाचं नाव होतं 'दो रास्ते-१२B'(रास्तावरून आठवलं - कुठल्याही आर्मीच्या कॅम्पाबाहेर पाटी असते 'यह आम रस्ता नही है।' मी लहान असताना ती पाटी 'यह आम सस्ता नही है' अशी वाचल्याचं आठवतंय.असो.). मग मी विकीमातेला प्रणाम केला आणि माहिती काढली. तर त्या सिनेमाचं मूळ तामिळ नाव "१२B" एव्हढंच होतं. आणि पूर्ण वाचल्यावर कळलं की तो समांतर विश्वाच्या तत्वावर बनला होता आणि मी तो मूळ निवडीचा भाग न बघितल्यामुळे मला अर्थबोध होत नव्हता. आणि हे ही कळलं की तो सिनेमा ग्विनेथ पॅल्ट्रोच्या "स्लायडींग डोअर्स' ह्या इंग्रजी सिनेमावर बेतलेला आहे. मग मी 'स्लायडींग डोअर्स' बद्दल वाचलं तर कळलं त्याची मूल संकल्पना 'ब्लाईंड चान्स' ह्या क्रिश्तॉफ किएस्लोव्स्कीच्या सिनेमावरून घेतलेली आहे. आता किएस्लोव्स्कीचं नाव आलं की माझं डोकं बाकी कामे बंद करून सिनेमाच्या शोधात लागतं आणि अखेर तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'ब्लाईंड चान्स' माझ्या हातात आला आणि मी तो काल पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर माझी किएस्लोव्स्कीवरची श्रद्धा अधिकच दृढ झाली. माहित नसणार्‍यांसाठी सांगतो(ह्यात कुठेही बढाई नाही, मला किएस्लोव्स्की माहितीये तो ही एक प्रकारचा ब्लाईंड चान्सच, कसा ते पुढे), किएस्लोव्स्की हा एक पोलिश सिनेलेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होता. त्याने एकाहून एक सरस चित्रनिर्मिती केली आहे. तो आणि त्याचा मित्र आणि सहपटकथालेखक क्रिश्तॉफ पिएसिविच ह्यांनी पोलिश व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक जबरदस्त सिनेमे बनवलेत. नुसते पोलिशच नाही तर कॅथॉलिसिझम वर आणि टेन कमांडमेंट्सवर बनवलेले "डेकालॉग" हे दहा लघुपट माझ्यामते जगात ऑल टाईम बेस्ट आहेत. फ्रान्सच्या तिरंग्यावरून बनवलेले ब्ल्यू, व्हाईट आणि रेड हे ही सांकेतिक आणि कलात्मक सिनेमाची अप्रतिम उदाहरणे आहेत.
समांतर विश्वाचा धागा पकडून सांप्रत समाजाची अवस्था आणि व्यवस्था दाखवणं किती लोकांना सुचेल. किएस्लोव्स्कीनं एका काल्पनिक संकल्पनेला वास्तवाची एवढी धार लावलीय, की ती तत्कालीन पोलिश समाजरचनेला आडवा छेद देऊन जाते. एकच मुख्य पात्र, वैद्यकीय शिक्षणाच्या चौथ्या वर्षाला असलेला. थोडंसं वेगळं लहानपण गेलेला तो वडीलांच्या मृत्यूनं आणि मृत्यूपूर्वी त्यांना न भेटू शकल्यानं अस्वस्थ होतो. त्याला सारखं वाटत राहतं की ते त्याला काहीतरी सांगू इच्छित होते. त्या अस्वस्थतेतच तो सुट्टी घेऊन आयुष्याचा पुनर्विचार करू इच्छितो आणि वॉर्साला जायची ट्रेन पकडायला जातो. पण त्याला उशीर झालाय, ट्रेन फलाटावरून निघालीय. तो ट्रेनच्या मागे धावतो. इथे दोन शक्यता आहेत, तो ट्रेन पकडतो किंवा नाही. किएस्लोव्स्की त्यात तिसरी शक्यता टाकतो, तो ट्रेन सुटल्यावर कशी प्रतिक्रिया देतो. त्यावरून तीन समांतर विश्व निर्माण होतात. एकात तो कम्युनिस्ट असतो, दुसर्‍यात तो कम्युनिस्टविरोधी(क्रांतिकारक) असतो आणि तिसर्‍यात तो सरळमार्गी, पापभीरू, बूर्झ्वा मध्यमवर्गीय असतो. त्याच्या तीन समांतर विश्वात तीच पात्र असतात पण त्यांचं महत्व त्या त्या विश्वात वेगवेगळं असतं. सुरुवातीला पडलेली अनेक कोडी उलगडत जातात. शेवट असा नाहीच ह्या सिनेमाला, कारण उद्देश्य चान्स म्हणजे शक्यता ही संकल्पना ठसवणं आणि महत्वाच म्हणजे तत्कालीन पोलिश व्यवस्थेवर भाष्य करणं. शक्यता ही संकल्पना तर इतकी कल्पकपणे वापरलीये, की नीट पाहिलं तर सिनेमातल्या प्रत्येक पात्रावर शक्यतेचा परिणाम झाल्याच जाणवतं.
मी कॉलेजात असताना मित्रांबरोबर गप्पा मारत रस्त्याच्या कडेला उभा होतो. त्यादिवशी मी आतल्या बाजूला उभा होतो. एका गाडीचं नियंत्रण सुटलं आणि ती आमच्या अंगावर आली. दोन्ही मित्र बाहेरच्या बाजूला होते त्यामुळे ते वाचले, गाडीनं मला ठोकलं. पाय फ्रॅक्चर झाला. आणि पुढे त्यातून पाठीचं दुखणं उद्भवलं. त्यामुळे ऐन शेवटच्या वर्षी मी दोन महिने बेडरेस्टवर होतो. मग तेव्हा "जिंदा" नावाचा टुकार सिनेमा आला. घरीच असल्यामुळे मी उगाच नेटवर चाळा करताना रेडीफवर त्याचं परीक्षण वाचलं. त्यातून कळलं की तो 'ओल्डबॉय' ह्या कोरियन सिनेमावर बेतलेला आहे, जो इतका बोल्ड आहे की बघायला जिगर पाहिजे. झालं, मी तो सिनेमा शोधला आणि पाहून कोरियन सिनेमाच्या प्रेमात पडलो. पार्क चान वूक चे सगळे सिनेमे मिळवून पाहिले. घरी बसल्याबसल्या हेच धंदे. मग विचार केला आता फक्त कोरियन का बाकीचेही पाहू. मग बरा झाल्यावरही वेड संपलं नाही. मुंबईच्या प्रभात चित्र मंडळाची सदस्यता घेतली. माझा पहिलावहिला मामि चित्रपट महोत्सव पाहायला गेलो. आणि तिथे डेकालॉग सिरिज चालली होती. मला रोज येणं शक्य नव्हतं. मग ती सिरिजही मिळवली आणि किएस्लोव्स्कीच्या प्रेमात पडलो ते आजतागायत. त्याचे थोडेच सिनेमे असतील आता जे मी पाहिले नाहीयेत. किएस्लोव्स्कीला जाऊनही बरीच वर्षे झालीत.
इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत थेटरात सगळे मिळून सात सिनेमे बघितलेल्या माझा, सिनेमा हा प्राणवायू झाला. कोण कुठला पार्क चान वूक, कोण कुठला किएस्लोव्स्की आणि कोण कुठला मी. हे सगळं कसं आणि का घडलं. मी त्या दिवशी रस्त्याच्या कडेला आतल्या बाजूला उभा होतो म्हणून. ब्लाईंड चान्स.

7 comments:

  1. सुंदर लिहिले आहेस.. हा चित्रपट मिळवुन पाहतो...

    'जिंदा' हा टूकार नव्हता.. 'ओल्ड्बॉय' इतका चांगला नसला तरी भारतिय सिनेमाच्या मानाने खुप बरा होता.. असो हे माझं मत आहे...

    पण लेख आवडला...

    ReplyDelete
  2. किएस्लोव्स्कीचे सर्वच सिनेमे डेडली असतात यात काही वादच नाही. विशेषत: रेड, ब्ल्यू, व्हाईट मला प्रचंड आवडतात आणि डेकॅलॉगमधला पहिला भागपण खासच.
    (किएस्लोव्स्की आवडणाऱ्यांना जनरली क्युबरीकचे सिनेमे आवडतात असे माझे निरीक्षण आहे)

    समांतर विश्वाबद्दल वाचून रन लोला रनची आठवण झाली - तू हा पाहीला असशीलच नसलास तर जरुर बघ.

    ReplyDelete
  3. अजून एक विसरला. बटरफ्लाय ईफेक्ट साधारण तसाच आहे.

    Sidenote -
    Jabbar blog ahe, readermadhe post yetakshaneech vachato me :)

    ReplyDelete
  4. धन्यवाद आनंदा, अरे कुठल्याही चित्रपटाचे आपले प्रो आणि कॉन्स असतातच. जिंदा मला आवडला नाही कारण त्यात स्टाईल मला जास्त वाटली. असो. पण ब्लाईण्ड चान्स बघच. किएस्लोव्स्कीचा पंखा होशील. आणि किएस्लोव्स्किचे डेकालोग मिळाले तर बघच. कारण माझ्यामते जगात दोन प्रकारचेच लोक आहेत, एक ज्यांनी डेकालोग पाहिलाय आणि दुसरे ज्यांनी पहायला हवा.

    ReplyDelete
  5. यॉ डॉ भाई,
    होय मी क्युब्रीकबद्दल खूप ऐकलय, पण कर्माची गती, मी अजून त्याचा एकही पिक्चर पाहू शकलो नाहीये. रन लोला रन नेक्स्ट ऑन लिस्ट आहे. टोम टिकवर किएस्लोव्स्किचा एकलव्य आहे. त्याचा हेवन पण बाकी आहे अजून पहायचा, स्क्रीनप्ले किएस्लोव्स्किचा आहे.
    आणि भाई, साईड नोट बद्दल धन्यवाद. अपेक्षा वाढल्या कि जवाबदारीही वाढते.

    ReplyDelete
  6. विद्याधरा, जबराट....

    बाकी 'तो अपघात झाला नसता तर' च्या समांतर विश्वात तू आत्ता काय करत असशील याचा विचार करत होतो मी :P

    ReplyDelete
  7. धन्यवाद हेरंब,
    अरे मी तो विचारच करू शकत नाही....कारण नुसता किएस्लोव्स्कीच नाही..तर अजूनही बऱ्याच गोष्टी घडल्यात त्यामुळे ...

    ReplyDelete