स्वागत!

नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर स्वागत!

1/29/2011

झापडं

जन्माला मीही तिथेच आलो
पण बाकीच्यांइतका नशीबवान नव्हतो
माझ्या बापाकडे पैसा नव्हता
रूढार्थाने मी श्रीमंत नव्हतो
मोठं होता होता कळलं
श्रीमंती पैशांची नसते
श्रीमंती असते संस्कारांची
तिथे मी कमनशीबी नव्हतो
नोकरीला लागेस्तोवर जगच बदललेलं
एकदम अंगावर येणारं
प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मागणारं
अन देणारा मी एकटाच नव्हतो
नव्या जगाच्या नियमांना
सरावणं फारच अवघड होतं
संस्कारांवर दरोडा पडला
पण पुरेसा श्रीमंत मी होत नव्हतो
सरकारी चाकांना वंगण लागतं
हे निर्लज्जपणे सांगत होतो
पण कुटुंबाची जवाबदारी उचलणारा
मी काही जगात एकटाच नव्हतो
डोळ्यांवर झापडं घालून चालताना
सगळीकडचा हाहाकार अनुभवत होतो
मी अन माझं घर ह्यापलिकडे
कुणाचं देणं लागत नव्हतो
कॅन्सरसारखी खोल विवेकबुद्धि
हाडांमध्ये रुतून बसलेली
तिची हाक टाळून चालत राहायला
मी कुणी राजकारणी नव्हतो
एक दिवस दुखणं असह्य झालं
अन साकळलेलं रक्त बाहेर आलं
इतक्या वर्षांचा साचलेला आवाज
थांबवायचा प्रयत्न मी करीत नव्हतो
तोंडावर कुलूप लावून जगणार्‍यानं
जगाचा नियम मोडला होता
राखणदारांच्या झोपा उडल्या
पण मी आता थांबणार नव्हतो
तेव्हा जगानं झापडं बंद केली
जेव्हा काडी माझ्या दिशेनं झेपावली
आग मलाच लागली होती
पण मी एकटाच जळत नव्हतो

26 comments:

 1. हम्म
  चांगल शब्दबद्ध केलस.
  "कॅन्सरसारखी खोल विवेकबुद्धि
  हाडांमध्ये रुतून बसलेली
  तिची हाक टाळून चालत राहायला
  मी कुणी राजकारणी नव्हतो"

  आवडल

  ReplyDelete
 2. अरे अप्रतिम रे.... काय सही कविता लिहिलीस !! तू आता आधिकारिक कवी झालास !!!

  ReplyDelete
 3. सागर,
  धन्यवाद भाऊ! :)

  ReplyDelete
 4. संकेतानंद,
  धन्यवाद रे भावा! छान वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचून! :)

  ReplyDelete
 5. मस्त रे ... लय भारी ....

  ReplyDelete
 6. माझ्या बापाकडे पैसा नव्हता
  रूढार्थाने मी श्रीमंत नव्हतो
  मोठं होता होता कळलं
  श्रीमंती पैशांची नसते
  श्रीमंती असते संस्कारांची
  तिथे मी कमनशीबी नव्हतो.

  हे खरचं आवडलं...:)

  कॅन्सरसारखी खोल विवेकबुद्धि
  हाडांमध्ये रुतून बसलेली
  तिची हाक टाळून चालत राहायला
  मी कुणी राजकारणी नव्हतो..

  सुंदर !!!:) :):)

  नविन वर्षात नविन विभी बघायला मिळतोय..उत्तम..असाच लिहित रहा..

  ReplyDelete
 7. ट्युनिशियाच्या जाळाची धग जाणवतेय... अर्थपूर्ण!!

  ReplyDelete
 8. कसलं भारी... कातिल राव... एकदम कातिल...

  ReplyDelete
 9. विभि, असा कसा रे तू वाया गेला?
  आनंद शिंदे, अल्ताफ राजा वाट पाहत असताना ही गीतकारी नेमकी कुणासाठी ??? ;)

  मस्त लिहिलं आहेस..

  ReplyDelete
 10. जळतंय त्याची धग जाणवतेय...

  एका पिढीने वाट लावून टाकली आहे....आता पुढल्या पिढीचा डाव आहे....

  ReplyDelete
 11. Anonymous3:08 AM

  >>>>विभि, असा कसा रे तू वाया गेला?
  आनंद शिंदे, अल्ताफ राजा वाट पाहत असताना ही गीतकारी नेमकी कुणासाठी ??? ;)

  मस्त लिहिलं आहेस.. +१००

  अरे अजून आम्हाला बाबाच्या लग्नाची गोष्ट लिहायची आहे रे... ;)

  बाबा आज मात्र ’आगाऊ अभिनंदन’ :)(मोह आवरला नाहिये... पोस्ट लिही पटकन)

  ReplyDelete
 12. सचिन,
  धन्यवाद भावा! :)

  ReplyDelete
 13. माऊताई,
  नवी विटी, नवा दांडू! :)

  ReplyDelete
 14. श्रीताई,
  डोक्यातून विचार जातच नाहीत गं! :(

  ReplyDelete
 15. सौरभ,
  भावा..तुझ्या कातिल कॉमेंटमुळे खरंच एकदम आनंद वाटला! धन्यवाद रे!

  ReplyDelete
 16. आनंदराव,
  ही गीतकारी करून मी आनंद शिंदे अन अल्ताफ राजांसाठीच करतोय..त्यांना चौकटीबाहेर काढायला 'पाहिज़े'! ;)

  ReplyDelete
 17. विक्रम,
  आभार रे भाऊ!

  ReplyDelete
 18. अनघाताई,
  :(
  :)

  ReplyDelete
 19. तन्वीताई,
  ती पोस्ट लिहायसाठी पार मस्कतहून मुंबईस यावं लागेल हां!! :D
  आणि हो... आज संध्याकाळी होईल पूर्ण!! :):)

  ReplyDelete
 20. Anonymous8:49 PM

  >>>> ती पोस्ट लिहायसाठी पार मस्कतहून मुंबईस यावं लागेल हां!! :-D

  तुझी ही कमेंट गौराला दाखवते थांब मग ती तुझे ’हसतील त्याचे’ वाले बौद्धिक घेईल :)

  मुंबईला यावे लागेल म्हणजे काय भाऊ, अवं येनारचं नावं आमी, करवल्यांबिन कुटे लगिन व्ह्तं काय वो!!!... :)

  ReplyDelete
 21. तन्वीताई,
  हेहेहे... गौराचं बौद्धिक अनुभवायचंय एकदा!!!
  आणि करवल्यांविना लग्नाचंही खरंच आहे म्हणा... :D

  ReplyDelete
 22. अंगावर आली एकदम !! शेवट फारच चटका लावणारा :(

  ReplyDelete
 23. Anonymous4:14 AM

  कविता आवडली पण हिंदी पिक्चरसारखा शेवट happy व्हावा म्हणून ह्या चार ओळी सुचल्या


  जाळलो तरी पर्वा न्हवति
  कारण ठिणगी मी टाकली होती
  माझी राख झाली खरी
  पण विझूनही मी उरलो होतो!!

  ReplyDelete
 24. तृप्ती,
  शेवटच्या ओळीदेखील छानच! :)
  धन्यवाद!

  ReplyDelete